नकारात्मक प्रचार
नको रे बाप्पा!
नकारात्मक प्रचार कसा उलटतो, याचा भारतातील निवडणुकीत चांगलाच अनुभव आल्यामुळे अनेक राजकीय पुढार्यांना नकारात्मक प्रचार नको रे बाप्पा!, असे वाटत असावे अशी समजूत होती. पण एवढी जबरदस्त थप्पड खाऊनही अनेकांना शहाणपण आलेले दिसत नाही. मग लक्षात आले की, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हेच खरे. अशी खोड लागूच नये, म्हणून लहानपणापासूनच योग्य संस्कार करण्याचा एक कौतुकास्पद प्रकार नुकताच पाहण्यात/वाचनात आला.
अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील यॉर्क काउंटी मध्ये (काउंटी म्हणजे जिल्हा) वसलेले यॉर्क हे त्याच नावाचे एक टुमदार शहर आहे. या शहरात सेंट्रल यॉर्क हायस्कूल नावाची अठराशे विद्यार्थी असलेली एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. या प्रांतातच नव्हे तर देशभरात एक चांगली शाळा म्हणून तिचा लौकिक आहे. दर महिन्याला या शाळेचे एक मासिक प्रसिद्ध होत असते. द प्राउलर या नावाच्या मासिकात शाळेचे विद्यार्थी निरनिराळ्या विषयावर लेख लिहीत असतात. क्राऊनपेक्षा थोड्यामोठ्या आकाराचे चोवीस पानांचे हे मासिक असून यात एका विद्यार्थिनीने मे महिन्याच्या अंकात ‘निगेटिव्ह कँम्पेन बॅकफायर्स’ या शीर्षकानुसार एक लेख लिहिला आहे.
या लेखाचा हा स्वैर अनुवाद आपल्या देशातील नकारात्मक प्रचार करणार्याच्या डोळ्यात चांगलेच अंजन घालेल, असे वाटते. या लेखिकेसमोर आपल्या येथील निवडणुकीतील प्रचारच असावा, असे वाटते. प्रतिस्पर्धी उमेदवाराची सर्व प्रकारची खरीखोटी अंडीपिल्ली काढली की, आपण चांगले उमेदवार आहोत, असे सिद्ध होते, अशी लोकांची समजूत असते. गेल्या मार्चमध्ये अमेरिका देशात अशीच एक निवडणूक पार पडली. पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील गेल्या निवडणुकीत नकारात्मक प्रचाराचा प्रकार अनुभवला आला. एका उमेदवाराने दुसर्या विरुद्ध प्रचार करताना त्याची काळी बाजूच समोर यावी, या दृष्टीने प्रचाराचा धुमधडाका सुरू केला. प्रतिस्पर्धी उमेदवार किती आणि कसा वाईट आहे, हेच तो सांगत राहिला. लोक या अपप्रचाराला नुसते कंटाळलेच नाहीत तर त्यांना या अपप्रचाराचा उबग आला. त्यांनी असा प्रचार करणार्या उमेदवाराकडे साफ पाठ फिरवली. त्याचा प्रतिस्पर्धी उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आला. परनिंदा करून आपले चांगलेपण सिद्ध होत नाही, हा धडा आपण शिकला पाहिजे.
लेख लिहिणारी मुलगी बारावीची विद्यार्थिनी आहे. तिला ज्या गोष्टी एवढ्या लहान वयात कळल्या त्या आपल्याला मोठेपणी तरी कळतील का?
- वसंत गणेश काणे
यॉर्क, अमेरिका
No comments:
Post a Comment