Tuesday, May 17, 2016


२०१६ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेगळेपण व हिलरी क्लिंटन (१)
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
हल्ली मुक्काम २७२१, प्राईम रोज लेन, उत्तर याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
      ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेची दर चार वर्षांनी होणारी ५८ वी निवडणूक वेगळीच सिद्ध होईल अशी चिन्हे आहेत. कदाचित पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदी एक महिला विराजमान होईल. पती व पत्नी हे दोघेही राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झाल्याचेही हे पहिलेच उदाहरण असेल. आजमितीला अमेरिकेच्या  प्रतिनिधी सभेत(हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह)  निवडून आलेल्या ४३५ सदस्यांपैकी २४६ रिपब्लिकन व १८८ डेमोक्रॅट पक्षाचे आहेत. तर सिनेटमध्ये १०० सदस्यांपैकी रिपब्लिकन ५४ व डेमोक्रॅट ४४ व दोन अन्य आहेत. अशाप्रकारे दोन्ही सभागृहात रिपब्लिकन पक्षाचे बहुमत तर अध्यक्ष मात्र डेमोक्रॅट पक्षाचा अशी सध्याची स्थिती आहे. ही स्थिती अशीच राहते की बदलते, तेही ८ नोव्हेंबरलाच ठरेल. सध्या दोन्ही सभागृहात ओबामांची अडवणूक होत असते. हा आपल्या येथील राज्यसभेसारखाच प्रकार म्हणायचा. प्रतिनिधी सभेतील सर्व सदस्यांची व सिनेटमधील १/३ म्हणजे ३३/३४ सदस्यांची निवड ८ नोव्हेंबरला होणार आहे. प्रतिनिधी सभेतील सर्व सदस्यांची निवड दर दोन वर्षांनी होत असते. तर सिनेट स्वरूप आपल्या राज्यसभेसारखे आहे दर दोन वर्षांनी जुने  १/३ सदस्य निवृत्त होतात व तेवढेच नवीन सदस्य निवडले जातात. प्रतिनिधी सभेत राज्याच्या वाट्याला लोकसंख्येनुसार कमी अधिक जागा/सदस्य असतात तर सिनेटमध्ये मात्र राज्य लहान असो वा मोठे प्रत्येक राज्यातून निवडून आलेले  दोन सदस्य असतात.
     कॅलिफोर्निया या सर्वात मोठ्या राज्याला प्रतिनिधी सभेत ५३ प्रतिनिधी, टेक्सासला ३६ प्रतिनिधी, फ्लोरिडाला २७ प्रतिनिधी ,न्यूयाॅर्कला २७ प्रतिनिधी आहेत. तर नाॅर्थ व साऊथ डाकोटा सारख्या सात लहान राज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त एकच प्रतिनिधी मिळाला आहे. पण सर्वच्या सर्व म्हणजे पन्नास राज्याना सिनेटवर मात्र प्रत्येकी दोन प्रतिनिधी असतात.
   ही सर्व माहिती अशासाठी बघायची की, समजा उद्या हिलरी क्लिंटन अध्यक्षपदी निवडून आल्या तर त्यांच्या पुढे काय वाढून ठेवले असणार आहे. त्याची कल्पना यावी. त्यातल्यात्यात एक बरे आहे की, प्रतिनिधी सभेच्या सर्व सदस्यांची निवडणूक व सिनेटच्या ३३/३४ सदस्यांची निवडणूक अध्यक्षाच्या निवडणुकीप्रमाणे ८ नोव्हेंबरलाच आहे. सध्या दोन्ही सभागृहात रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असल्यामुळे अध्यक्षीय, प्रतिनिधी व सिनेटच्या निवडणुकीत विजय मिळवून आपण हॅटट्रिक साधणार या स्वप्नात रिपब्लिकन मशगुल आहेत. हिलरी क्लिंटन एकट्या विजयीही झाल्या व प्रतिनिधी व सिनेटमध्ये बहुमत मिळाले नाही तर ओबामाप्रमाणे अडवणुकीचा सामना करावा लागेल.
    रिपब्लिकन पक्षाचे राष्टीय संमेलन १८ ते २१ जुलै २०१६ च्या दरम्यान ओहिओ राज्यातील क्लिव्हलंडला तर डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्रय संमेलन थोड्या उशिराने म्हणजे २५ ते २८ जुलै २०१६ च्या दरम्यान पेन्सिलव्हॅनिया राज्यातील फिलाडेल्फियाला आयोजित आहे. यावेळी दोन्ही पक्षांच्या अध्यक्षीय उमेदवारांची अधिकृत घोषणा होईल आणि प्रचारात रंग भरायला सुरवात होईल. सध्या हिलरी क्लिंटन व बर्नी सॅंडर्स या दोघातला गृहीत उमेदवार ( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) कोण ते अजून ठरलेले नाही. जोपर्यंत राष्ट्रीय संमेलनात रीतसर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत प्रायमरीत सर्वात जास्त मिळवणारा उमेदवार गृहीत उमेदवारच ( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेटच) म्हटला जातो व तो तसा असतोही.
   या वेळचा अध्यक्षपदाचा उमेदवार - एकट्या रेनाॅल्ड रीगनचा अपवाद वगळला तर आजवरचा अमेरिकेचा एकही अध्यक्ष घटस्फोटित नव्हता. रिपब्लिकन पक्षाचे गृहीत उमेदवार (प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) डोनाल्ड ट्रंप यांचा मात्र दोनदा घटस्फोट झालेला आहे. यापूरवीचे दोन अध्यक्ष विधूर होते. तर एक अविवाहित( जेम्स बुचनन १५ वे राष्ट्रपती १८५७ ते १८६१) होता. बिल क्लिंटन जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा हिलरी ‘फर्स्ट लेडी’ झाल्या. उद्या हिलरी अध्यक्षा झाल्या तर बिल क्लिंटन ‘फर्स्ट जंटलमन’ होणार नाहीत.(कारण ते तसे नाहीत - एक टिप्पणी!) त्यांचा उल्लेख प्रेसिडेंट हिलरी क्लिंटन व प्रेसिडेंट बिल क्लिंटन असा करावा लागल. अशा कधी गंभीर तर कधी हलक्या फुलक्या चर्चा वृत्तपत्रात व प्रसार माध्यमात सुरू झाल्या आहेत. एकाने तर टिप्पणी केली आहे की, बिल क्लिंटनला जंटलमन म्हणणे तरी बरोबर ठरेल का? मग फर्स्ट जंटलमन म्हणणे तर दूरच राहिले. बिल क्लिंटन म्हणजे रंगेल गडी. मोनिका व्हिशिंस्की बरोबरचे त्यांचे लफडे उघड झाले, तेव्हा जर हिलरी यांनी घटस्फोट मागितला असता तर जनमताच्या रेट्यामुळे बिल क्लिंटन यांना राजीनामाच द्यावा लागला असता. पण हिलरींनी तसे केले नाही, हा त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा, समजुतदारपणाचा,उदारतेचा भाग मानला जातो. तर अनेक महिलांना तसे वाटत नाही. पुढेमागे आपल्यालाही अध्यक्षपदाची संधी मिळेल या आशेने त्या गप्प राहिल्या, असे त्यांना वाटते. अजून उखाळ्या पाखाळ्यांना ऊत यायचाच आहे. ही नुसती झलक आहे.

  थोडा गांभीर्याने विचार केला तर हिलरींची आजवरची कारकीर्द एक दोन अपवाद वगळता नावे ठेवण्यासारखी नाही.
हिलरी क्लिंटन यांचे आता वय झालेले आहे, हे खरे, पण अमेरिकेत वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या व्यक्ती सुद्धा चांगल्या टुणटुणीत आणि ठणठणीत असतात. ‘अवघे पाउणशे वयमान’, ही ‘कटऑफ लाईन’ अमेरिकेत तरी मानली जात नाही. पण वाढत्या वयाबरोबर ज्येष्ठांच्या मागे ‘पूर्वकर्मांचा’ ससेमिरा लागतो. त्यांची पाटी कोरी नसते. हे लचांडही पत्करावे लागते. एकूण काय फायदेतोटे अनुभवी व अननुभवी अशा दोघांच्याही वाट्याला असतात. पहिले असे की, हिलरी क्लिंटन यांच्यावर जमीन खरेदीबाबत कथित गैरव्यवहारासाठी न्यायालयासमोर पेशी झाली होती.१९७८ सालचे २२० एकर जमीन खरेदीबाबतचे हे प्रकरण ‘वाॅटरव्हाईट स्कॅंडल’ म्हणून ओळखले जायचे. पण या प्रकरणी हिलरी क्लिंटनवर ठपका ठेवता आला नव्हता.
दुसरा मुद्दा हा की, २००८ मध्ये अमेरिकेची इराकमध्ये फसलेली मसलत हिलरी क्लिंटन यांची पाठ सोडत नव्हती. आता २०१६ मध्येही इराण त्यांची पाठ सोडणार नाही. भलेही याबाबतचे निर्णय प्रत्यक्षात ओबामा यांनी घेतलेले का असेनात.  ‘अंदरकी बात’ आम्हाला माहित आहे, असे म्हणत प्रतिस्पर्धी त्यांच्यावर वार करणारच.
हार्ड चाॅईस -एक कठोर कबुलीजबाब तसेच परखड विश्लेषण - हिलरी क्लिंटन यांच्या ‘हार्ड चॉईसेस’ (कठोर पर्याय) या नावाच्या या पुस्तकात इराक व इराण विषयक प्रश्नांचा उहापोह स्वत: हिलरी यांनीच केला आहे. इराकमध्ये अमेरिकन सैन्य पाठवायच्या निर्णयाच्या बाजूने माझे मत होते, हा जसा ओबामा यांचा निर्णय होता, तसाच तो माझाही होता, हे मी नाकारत नाही, असे त्या या पुस्तकात म्हणतात. त्यावेळी माझ्या गाठीला जी माहिती होती, तसेच त्यावेळची जी परिस्थिती होती, तिला अनुसरून माझे हे मत बनले होते, हे नमूद करायला त्या विसरत नाहीत. ‘पण चूक ती चूकच!’, हे म्हणण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याजवळ आहे. पण याला प्रामाणिकपणा म्हणायचे की चतुराई, असा प्रश्न इथे अमेरिकेत विरोधक विचारत आहेत. याचे मूळ अमेरिकन जनमानसाच्या मनोभूमिकेत आहे. अमेरिकन जनमानस उदारमतवादी आहे / असते. ‘आपण चुकलो’, अशी कबुली एखाद्याने दिली की, अमेरिकन लोक त्याला माफ करतात. हिलरी यांचे पती बिल क्लिंटन यांचे त्यांच्या टायपिस्टशी असलेले लफडे बिल क्लिंटन यांनी सुरवातीला नाकारले पण त्यांचे बिंग फुटले आणि ‘खोटारडा अध्यक्ष’ म्हणून लोक अतिशय खवळले. पण ‘मी खोटे बोललो ही चूक झाली’, असे म्हणून त्यांनी कबुली देऊन माफी मागितली, तेव्हा जनतेने त्यांना माफ केले. पतिराजांचा हा अनुभव हिलरी यांच्या गाठीशी असेलच. ‘इराक बाबतचे आपले मत चुकीचे होते’, अशी कबुली देण्यामागे, असेच काही कारण तर नसेल ना?
‘फेल्ड चॉईसेस’ - राजकारणात ‘उत्तराप्रत्युत्तर’ हा प्रकार नेहमीच पहायला मिळतो. ‘हार्ड चॉईसेस’ (कठोर पर्याय) हे पुस्तक प्रसिद्ध होते न होते तोच रिपब्लिकन पक्षाने दुसरे चोपडे प्रसिद्ध केले. याचे नाव आहे, ‘फेल्ड चॉईसेस’(फसलेले पर्याय)! यात हिलरी कशा चुकीचे आणि खोटे बोलत आहेत, हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. डेमोक्रॅटिक पक्षही या चोपड्यातील मजकुराचे खंडन करण्यास चुकला नाही. असे ‘खंडन मंडन’ हा सध्या अमेरिकन राजकीय विश्वाचा एक भागच होऊन बसला आहे.
पापपुण्यात वाटा उचलला- ओबामा यांच्या पहिल्या कार्यकाळात हिलरी यांनी त्यांच्या सोबत काम केले आहे. या कार्यकाळात इराक मधली लढाई आटोपली होती. पण लगेच लिबियाचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी इराकमध्ये सैनिकी कारवाई करण्याचा अमेरिकेचा निर्णय चुकला होता, हे लक्षात  ठेवून (हा निर्णय बुश यांच्या कार्यकाळातला होता ओबामा यांच्या कार्यकाळातला  नव्हता) अमेरिकेने सबुरीची भूमिका घेतली. इराक प्रकरणी आम्ही सद्दाम हुसेन या हुकुमशहाचे समूळ उच्चाटन केले हे खरे असले तरी ‘हुकुमशहाला हटवणे सोपे असते पण त्याच्या जागी दुसरा चांगला प्रशासक आणणे सोपे नसते’, हा धडा आम्ही इराक प्रकरणापासून घेतला आहे, हे हिलरी प्रांजळपणे मान्य करतात. हे आटोपते न आटोपते तोच अफगाणिस्तानचा प्रश्न निर्माण झाला. आता काय करायचे यावर खल झाला. पण ‘सैन्य पाठवायचे’, असा निर्णय अमेरिकेने घेतला. राजकारणात निर्णय घेताना सरळसोटपणे निर्णय घेऊन चालत नसते. प्रत्येक प्रकरणाचे स्वरूप आणि परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, हा धडा हिलरी यांनी अफगाणिस्तानच्या प्रश्नाच्या निमित्ताने गिरवला आहे. ‘इराणमध्ये आम्ही वेगळीच चाल खेळलो’, असे हिलरी म्हणतात. ‘तेल खरेदी करणारे इराणचे ग्राहकच आम्ही तोडले आणि त्याला वठणीवर आणले’. असे अभिमानाने सांगत असतानाच त्या पुढे जे म्हणतात ते महत्वाचे आहे. ‘आम्ही इराणचे ग्राहक तोडले पण त्यांना वाऱ्यावर सोडले नाही, तर त्यांना इराकडून तेल मिळेल अशी पर्यायी व्यवस्थाही करून दिली’. आतातर इराणचा प्रश्नही थोड्याफार कुरबुरी होत असल्या तरी मार्गी लागतो आहे.
परिपक्वतेचा प्रारंभ - खरेतर हा अमेरिकेचा स्वभाव नाही. एखादा देश तरला काय किंवा अतिरेक्यांनी गिळला काय, अमेरिकेला त्याचे फारसे सोयरसुतक नसते. आपले हितसंबंध जोपर्यंत अबाधित असतात, तोपर्यंत अमेरिका अशा प्रकरणी हात घालीत नसते. पण हिलरींचे वेगळेपण या पार्श्वभूमीवर उठून दिसते.  या गोष्टी बघितल्या म्हणजे आपण एका मुरब्बी राजकारणी व्यक्तीबाबत विचार करीत आहोत, हे लक्षात येते. उद्या जर अमेरिका अधिक परिपक्वपणे वागू लागली तर त्याची सुरवात हिलरी यांनी केली असे म्हणता येईल.
वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छ चारित्र्य - हिलरी क्लिंटन यांचे स्वत:चे वैयक्तिक व सार्वजनिक चारित्र्य स्वच्छ आहे. अगदी भारतीय मापदंड लावले तरी चालेल. त्यांचा कायद्याचा गाढा अभ्यास आहे. या तुलनेत बिल क्लिंटन यांचे सगळे ‘रंगढंग’ अजूनही समोर यायचेच आहेत, असे विनोदाने म्हटले जाते. मग या दोघांची जोडी जमली कशी हा एक प्रश्नच आहे. त्यांनी बिल यांना घटस्फोट देण्याचा विचार दोनदा केला होता. पण मग बिल हे अध्यक्षपदाचे उमेदवार ठरणार, असे समजल्यावर त्यांनी हा विचार बदलला. पुढे बिल अध्यक्षपदी असतांनाही असा विचार त्यांनी केला होता, असे म्हणतात. पण तोही विचार त्यांनी रहित केला. हे कसे अगदी अस्सल  भारतीय पतिव्रतेप्रमाणे ( तेही जुन्या काळच्या!) झाले, असे म्हटले पाहिजे. पण यावरून त्यांच्या उदारमतवादी स्वभावाचा तसेच नीतिमत्तेचा एक वेगळाच पैलू समोर येतो, असे जसे म्हणतात, तसेच भविष्यात अध्यक्षपदाची उमेदवारी वाट्याला यायची असेल तर ही किंमत चुकवायला हवी, हा हिशोबीपणा दाखवणे आवश्यकच होते, असेही म्हणणारे आहेत.
दुसरे उदाहरण सार्वजनिक जीवनातील मापदंड ठरावे, असे आहे. हिलरी यांनी ओबामा यांच्या विरुद्ध पक्षांतर्गत अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबतची निवडणूक लढविली होती. त्यावेळी पक्षांतर्गत खुली चर्चा होत असे. या चर्चेत त्या ओबामा यांना दरवेळी चारीमुंड्या चीत करीत असत. पण उमेदवारी ओबामा यांना मिळाली. तेव्हा त्या खुल्या दिलाने त्यांच्या प्रचारात सामील झाल्या एवढेच नव्हे तर पुढे ओबामा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ओबामा यांच्या हाताखाली परराष्ट्र मंत्री म्हणून कामही केले. या निर्णयातही त्यांची हिशोबीपणाची दूरदृष्टीच दिसून येत असल्याची टीका झाली होती व आजही होते आहे.
गडगंज संपत्तीचे रहस्य काय?-
क्लिंटन दाम्पत्याने गडगंज संपत्ती जमा केली आहे. या मागचे रहस्य जाणून घेण्यासाठी एका टीव्ही वाहिनीच्या मुलाखत घेणाऱ्या प्रतिनिधीने जंगजंग पछाडले. पण व्यर्थ! आम्हाला पैसे मिळवणे आवश्यकच होते. पै पै जमा करून आम्ही ही संपत्ती गोळा केली आहे . त्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागले आहेत. ‘लोक सुजाण आहेत, ते योग्यतो निष्कर्ष काढतीलच’, असे म्हणत हा मुद्दा क्लिंटन दांपत्त्याने आटोपता घेतला आहे. ‘हार्ड चॉईसेस या पुस्तकामध्ये बोट ठेवायला एकही जागा चुकूनही राहू नये, अशी काळजी हिलरी यांच्या चमूने घेतलेली दिसते’, अशी टिप्पणी करून एकाने  बरेच काही सुचविण्याचा प्रयत्न केला आहे.
क्लिंटन यांची जाहीर भूमिका - अध्यक्षाचे सर्वात महत्त्वाचे काम आहे, अमेरिकन जनतेला सुरक्षित ठेवण्याचे. आक्रमकांचा खंबीरपणे मुकाबला करणे, इसीसच्या रूपाने आक्रमण करण्यास तयार असलेल्या जागतिक दहशतवादाला भूतलावर किंवा जनमानसात स्थान मिळू नाही/असू नये, यासाठी दहशतवादाची पाळेमुळे निखंदून काढून अतिरेक्यांचे पुरव्ठ्याचे सर्व मार्ग नष्ट करणे, तसेच अंतर्गत व बाह्य धोक्याशी सामना करण्यासाठी भरभक्कम संरक्षक फळी उभी करण्यावर माझा भर असेल.

   


No comments:

Post a Comment