Monday, July 3, 2017

चीन, भारत व भूतान - एक संघर्षप्रवण त्रिकोण

चीन, भारत व भूतान - एक संघर्षप्रवण त्रिकोण 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  आंतरराष्ट्रीय सीमारेषेबाबाबतची काटेकोर अंमलबजावणी आमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे, असे म्हणून चीनने नुकताच एक विक्रमी राजकीय विनोद केला आहे. तसेच यासाठी संबंधित देशांच्या संयुक्त चमूने पाहणी करीत असावे, असा शहाजोगपणाचा सल्लाही दिला अाहे. मोजून अकरा अन्य देशांसोबत अशी यंत्रणा आपल्या पुढाकाराने सुरू असल्याचा हवाला देण्यासाठी चीनने शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या चीनमधील दलिगन येथील बैठकीचे निमित्त साधले आहे. आता चीन, रशिया, कझख्स्तान, किरगिझस्तान, तजिकिस्तान उझबेकिस्तान, भारत व पाकिस्तान हे या शांघाय संघटनेचे सदस्य आहेत. दहशतवादाचा विरोध व आंतरराष्ट्रीय सीमा नियंत्रण हे दोन मुख्य मुद्दे समोर ठेवून ही बैठक आयोजित होती. याला विनोद म्हणून संबोधण्यामागचे कारण असे आहे की, या बैठकी अगोदर चीनने सिक्कीम (भारत) व भूतान यांच्या भूभागात पूर्वी केलेले करार मोडून घुसखोरी केली आहे.
हिमालयाच्या कुशीत स्थिरावलेला चिमुकला भूतान - भूतान हा देश सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला व हिमालयाच्या पर्वत रांगांनी अक्षरश: कुशीत घेतलेला देश आहे. या देशात रस्त्याने चालतांना आपण एकतर उतरंड उतरत तरी असतो किंवा चढण चढत तरी असतो, असे म्हटले जाते. भूतानच्या उत्तरेला चीन व दक्षिणेला भारत आहे, हे बहुतेकांना माहीत आहे. तसा भूतानचा नेपाळशी सीमा संबंध नाही कारण मध्ये सिक्कीम आहे. तसेच बांग्लादेशाशीही भूतानच्या सीमा लागून नाहीत. कारण पश्चिम बंगाल व आसाम मध्ये येतात. म्हणजे असे की, भूतानच्या सीमा दक्षिणेला भारताशी तर उत्तरेला चीनशी (तिबेटशी) लागून आहेत.
चिमुकला पण स्वतंत्र देश - मालदीवपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या भूतान मध्ये थिंफू हे राजकीय राजधानीचे शहर आहे तर फुंत्शोलिंग ही जणू आर्थिक राजधानी आहे. बस. संपली भूतानमधील महत्त्वाच्या शहरांची नावे. असा हा चिमुकला देश या भूतलावर आजवर शतकानुशतके स्वतंत्र राहिला आहे, याला योगायोग, एकेकाचे नशीब, दुर्लक्षणीय प्रदेश किंवा तटस्थतेचा स्वाभाविक परिणाम यापैकी काय म्हणावे, हे सांगणे कठीण आहे.
चीन भूतान सीमावादाचे कारण - तिबेट व भारतीय उपखंड  यांच्या मधून जाणारा प्राचीन रेशमी रस्त्यामुळे  (सिल्क रूट) भूतानला भौगोलिक व राजकीय विलगता प्राप्त झाली आहे. (नावाने सिल्क रूट असलेला हा रस्ता काटेरी तारांसारखा अनेक देशांवर ओरखडे काढणारा आहे.) भूतान बहुतांशी बौद्धधर्मी आहे, ही आणखी एक विशेषता म्हणायला हवी. १९ व्या शतकात वांगचुक घराण्याने भूतानला राजकीय एकछत्र प्राप्त करून दिले. कारण काहीही असेल पण ब्रिटिश राजवटीने भूतानशी स्नेहाचे संबंध राखले. खरेतर भूतानला चिरडणे ब्रिटिशांना मुळीच अवघड नव्हते. मग ब्रिटिश असे का वागले? सध्या या मुद्याचा विचार न केला तरी चालेल. पण यामुळेच आज चीन- भूतान सीमावाद निर्माण झाला आहे. नाहीतर तोही भारत - चीन सीमावाद झाला असता. कारण भूतान ब्रिटिशांनी व्यापला असता तर तो आज इतर प्रांतांप्रमाणे भारताचाच एक हिस्सा झाला असता. 
सुखी पण अविकसित देश - आज या देशात घटनामान्य राजेशाही (काॅन्स्टिट्यूशनल माॅनर्की) व द्विपक्षीय लोकशाही नांदते आहे. भूतानच्या राजाला राक्षस राजा (ड्रॅगाॅन किंग) म्हणत असे तरी सुखाच्या मापनयंत्रात भूतानचे स्थान बरेच दाखविले जाते. याचे श्रेय भूतानमधील गगनचुंबी शिखरांना असेल का? यापैकी एक शिखर -गंगखर प्युनसुम - आजवर कुणाही गिर्यारोहकाला पादाक्रांत करता आलेले नाही. भूतानचा आर्थिक स्वातंत्र्य, व्यापार सुलभता व शांततामय समाजजीवन यातला क्रमांक अव्वल आहे. दरडोई उत्पन्न खूपच चांगले आहे, भ्रष्टाचार नाहीच म्हटले तरी चालेल. पण तरीही भूतान हे एक अविकसितच राष्ट्र आहे. आधुनिकतेचा भूतानला फारसा स्पर्श झालेला नाही.
बड्या राष्ट्रांशी संबंध नसलेला देश - जगातील फक्त ५२ देशांशी व युरोपियन युनियनशी भूतानचे राजकीय संबंध आहेत. भूतान संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य असला तरी सुरक्षा समितीच्या पाचही स्थायी बड्या सदस्यांशी (अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया व चीन) भूतानचे राजकीय संबंध नाहीत. पण सार्क संघटना (बांग्लादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, व अफगाणिस्तान या देशांची संघटना) , बिमस्टेक ( बे आॅफ बेंगाॅल इनिशिएटिव्ह फाॅर मल्टि सेक्टोरल टेक्निकल ॲंड एकाॅनाॅमिक कोआॅपरेशन या लांबलचक नावाचे बिमस्टेक हे लघुनाम असून या संघटनेचे बांग्लादेश, इंडिया, म्यानमार, श्रीलंका थायलंड भूतान व नेपाळ हे देश सदस्य आहेत.) व अलिप्त चळवळीशी त्याचे सदस्यत्वाचे संबंध आहेत. भूतानी सैन्य व भारतीय सैन्य यात पूर्वापार स्नेहाचे व घनिष्ट संबंध आहेत तसेच भारत भूतानी सैनिकांना प्रशिक्षणही देत असतो.
ही सर्व माहिती सविस्तरपणे पाहण्याचे कारण असे की, चीनने भूतानच्या हद्दीत रस्ता बांधण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ भूतानशी नव्हे तर भूतान, भारत व चीन या तीन देशांशी संबंधित होणे कसे क्रमप्राप्त आहे, हे स्पष्ट होईल. 
स्वाभीमानी भूतान - भूतानच्या हद्दीतील डोकलाम भागात रस्ता बांधण्यासाठी चीनने घुसखोरी केली आहे. यामुळे या भागातील जैसे थे परिस्थिती बदलण्याचा धोका आहे. भूतानने याबाबत चीनला खडसावले असून उभय देशातील सीमारेषा लक्षात घेता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने या भागात सुरु केलेले बांधकाम ताबडतोब थांबवावे व जैसे थे स्थिती ( स्टेटस को) निर्माण करावी, असे बजावले आहे. भूतान व चीन यात प्रत्यक्ष राजकीय संबंध नसल्यामुळे हा संदेश भूतानने चीनला भारताकरवी दिला होता/आहे.
भारताचाही चीनला इशारा -चीनने २०१२ साली केलेल्या परस्पर सामंजस्याचा भंग केला असून, त्यामुळे सुरक्षेवर गंभीर परिणाम होतील,’ असा स्पष्ट इशारा भारतानेही चीनला दिला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘१६ जून रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक रस्ते बांधण्यासाठी डोकलाम भागात घुसले असून त्यांनी रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला आहे. रॉयल भूतान आर्मीच्या सैनिकांनी चीनच्या सैनिकांना त्यांच्या कृत्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. भूतानमध्ये प्रशिक्षणाच्या निमित्ताने असलेल्या भारतीय जवानांनी आणि भूतानच्या सैनिकांनी चीनच्या सैनिकांना जैसे थे स्थिती न बदलण्याचे आवाहनही केले. जैसे थे स्थिती बदलण्याचा भारताच्या सुरक्षिततेवरही गंभीर परिणाम होत आहे या बाबीचीही चीनने दखल घ्यावी.’  
भारताचा या प्रकरणाशी संबंध कसा पोचतो? - तसेच भूतानमध्ये चीनने आता जे अतिक्रमण केले आहे, ते डोकलम पठार हे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या असलेल्या सिक्कीमलगत आहे. भारत, तिबेट व भूतान यांच्या सीमा डोकलाम पठारावर मिळतात. तेथून बांगलादेशची हद्दही केवळ ५२ किलोमीटर आहे. ईशान्य भारताला जोडण्यासाठी हा एकमेव चिंचोळा मार्ग आहे. हा भाग कुणाच्या हातात गेल्यास भारताचा ईशान्येतील सात राज्यांशी संपर्क तुटेल. त्यातून चीनचा अरुणाचलावर डोळा आहेच.  
चीनच्या उलट्या बोंबा - पण सिक्कीम व चीन लगतच्या प्रदेशात  भारतीय जवानांनीच चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा चीनचा आरोप केला आहे. भारताने हा आरोप ताबडतोब व स्पष्टपणे फेटाळला आहे. आपल्या शेजारच्या लहान राष्ट्राचे संरक्षण ही भारताची नैतिक जबाबदारी आहे. यादृष्टीनेच भारतीय सैनिक भूतानच्या सैनिकांना प्रशिक्षण देत असतात. ५० ते ६० भारतीय सैनिकांची प्रशिक्षक चमू या क्षेत्रात तैनात होती व त्यावरूनच चीनने भारतीय सैन्य भूतानमध्ये तैनात असल्याची बोंब मारायला सुरवात केली आहे.
   भारत, चीन व भूतान हा त्रिकोण -भारत आणि चीन यांच्यात भूतान या तिसऱ्या देशाचीही सीमा येत असल्याने संबंधित तिन्ही देशांशी चर्चा करूनच सीमा रेषा आखली जाईल, असे चीनने २०१२ मध्येच मान्य केले होते. भूतान बरोबर परस्परच सीमारेषा निश्चित करण्याचा प्रयत्न या समजुतीचा भंग ठरेल, असेही भारताने नमूद केले आहे.
नाथु ला मार्गे सुरू असलेली मानस सरोवर यात्रा रद्द - तणावाचे वातावरण लक्षात घेऊन सिक्किममधील नाथुला येथून होणारी कैलास मानसरोवर यात्रा भारताने रद्द केली व या भागातून यात्रेला जाणाऱ्या ८०० हून अधिक भाविकांसाठी उत्तराखंडमधील लिपूलेख खिंडीतून यात्रेला जाण्याचा मार्ग सुरू केला आहे.  
नियंत्रणरेषेवर सज्जता - सिक्कीम-भूतान-तिबेटच्या सीमाभागात भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी गेल्या काही दशकांनंतर या दुर्गम सीमाभागात प्रथमच प्रत्येकी तीन हजार सैनिक नियंत्रण रेषेवर तैनात केले आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी गंगटोक येथे लष्कराच्या १७ माउंटेन डिव्हिजनच्या मुख्यालयाला, तसेच कलिमपाँग येथील २७ माउंटेन डिव्हिजनच्या मुख्यालयाला भेट देऊन आपल्या लष्कराच्या सज्जतेचा आढावाही घेतला आहे. ‘भूतानची भूमी भारतीय सीमेजवळ आहे, तसेच दोन्ही देशांत सुरक्षेसंदर्भात सहकार्य करण्याबाबत व्यवस्थाही आहे. भूतानचे चीनशी सरळ राजकीय संबंध नाहीत. त्यामुळे भूतान आपली भूमिका भारताकरवी कळवीत असतो. भूताननेही संबंधित जमीन आपली असल्याचे स्पष्ट केले आहे. या जमिनीवर चीन फेरफार करण्याचा प्रयत्न करतो आहे. तेथे जाऊन जमिनीवर ताबा मिळवू, असे कोणाला वाटत असेल; तर ते चुकीचे आहे. चीनचा टोमणा - पण नियंत्रण रेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर १९६२ च्या युद्धापासून धडा घेण्याचा इशारा देणा‍ऱ्या चीनला भारताने शुक्रवारी सडेतोड प्रत्युत्तर दिले. आताचा भारत आणि १९६२ चा भारत यामध्ये फरक असल्याचे केंद्रीय संरक्षण व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चीनला सुनावले आहे.
१९६७ मध्ये भारताने चीनला शिकवला धडा - १९६७ साली सिक्कीम भारतात सामील व्हायचे होते. सिक्कीममधील नाथुला व चोला खिंडींवर ताबा मिळविण्यासाठी चीनने १९६७ च्या सप्टेंबर- आॅक्टोबर मध्ये केलेले आक्रमण भारतीय फौजांनी चिनी फौजांना येथेच्च बदडून निष्फळ ठरविले. उभयपक्षी बरीच जीवितहानी झाली. तटस्थ निरीक्षकांनी या संघर्षाबाबत मत नोंदविले आहे की, प्रतिपक्षाला वाटाघाटीसाठी प्रवृत्त करण्यासाठी बळाचा वापर यापुढे यशस्वी होणार नाही, हे चीनला या निमित्ताने कळून चुकले आहे.
१९७९ मध्ये व्हिएटनामनेही चीन समोर माघार घेतली नव्हती - चीनच्या आंतरराष्ट्रीय दादागिरी पुढे नमायचे  नाही, अशा निर्धाराने व्हिएटनामने चीनला १९७९ मध्ये टक्कर दिली होती. व्हिएटनाममधील सीमेवरच्या काही ठिकाणांवर ताबा मिळवून आता आम्ही व्हिएटनामची राजधानी हनोई सर करू शकतो, अशी शेखी मिरवीत, चीनने १९६२ मध्ये भारतावरील आक्रमण जसे एकतर्फी युद्धविराम करून आटोपते घेतले होते, तोच प्रकार व्हिएटनामबाबतही करून पाहिला होता. पण व्हिएटनामला आपले कंबोडियाबाबतचे धोरण बदलविण्यास भाग पाडण्याच्या चीनच्या वल्गना हवेतच विरल्या होत्या.
चीनची धमकी किती गंभीर - १९६२ सालची भारताची युद्ध लढण्याची तयारी व आजची भारताची संरक्षण सिद्धता याबद्दल आपल्यापेक्षाही जास्त जाणीव चीनला असेल, इतके चीनचे गुप्तहेर खाते तरबेज आहे. भारताची उत्तर सीमा चीनसाठी अडचणीचे युद्धक्षेत्र आहे. या भागाचा सराव असलेला तिबेटी तरूण लष्करात यायला तयार नाही. चीनमधील समुद्र किनाऱ्या लगतच्या क्षेत्रातून येणारे तरूण सैनिक या भागात पुरत्या क्षमतेने लढू शकणार नाहीत. दक्षिण चिनी समुद्रात चीन अनेक कटकटींनी अगोदरच बेजार आहे. चीनचा जानी दोस्त पाकिस्तान आपल्या भूभागातून चीनमध्ये होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवू शकत नाही. पाकिस्तान व उत्तर कोरिया सोडल्यास चीनचे खरे चाहते जगात शोधूनच काढावे लागतील. चीनची इच्छा नसतांनाही रशियाने आपल्या प्रभावाने भारताला शांघाय आॅर्गनायझेशनचा सदस्य करून घेतले आहे. या शिवाय भारताशी कुरापत काढल्यामुळे, भारत व अमेरिका अधिक जवळ येणार असतील तर ते चीनला परवडणारे नाही. त्यामुळे चीन प्रत्यक्ष संघर्ष करण्यापूर्वी दहादा विचार करील. पण शत्रूला युद्ध करावेसेच वाटू नये, अशी स्थिती निर्माण व्हायची असेल तर भारताने स्वत:च शस्त्रास्त्रसज्ज असायला हवे, याला पर्याय नाही. आजच्या मोदी शासनाइतकी या बाबतीतली जागृती, तत्परता व तडफ या पूर्वी चीनने अनुभवली नसणारच. याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. त्यामुळे मुजोरी, कुरापती, अपशकून ( सुरक्षा परिषदेत स्थायी प्रवेश मिळू नये, न्युक्लिअर सप्लाय ग्रुपची सदस्यता मिळू नये, आदी), फारच फार तर चकमकी यांच्यापुढे चीन जाण्याची शक्यता दिसत नाही.
सिक्कीम सीमेवरची घुसखोरी - याला अनुसरून आता पुन्हा सिक्कीमलगतच्या सीमाभागात सुरू असलेल्या वादावरूनही चीनने आपला आडमुठेपणा कायम ठेवला आहे. सिक्कीममधील वादाबाबत भारताशी राजनैतिक पातळीवर चर्चा करण्याचा मार्ग अजूनही खुला आहे; परंतु भारतीय सैन्याने संबंधित भूभागातून माघार घेतली तरच ही चर्चा होऊ शकते, अशी अट चीनने घातली आहे. डोकलाम भागात चिनी सैन्याने सुरू केलेल्या रस्तेबांधणीला भारतीय लष्कराने जोरदार आक्षेप घेतला. त्यावरून उभय देशांतील सैन्यांत १८ जूनला वाद झाला. डोकलामवर आपलाच हक्क असल्याचा चीनचा दावा आहे, तर या भागात चीनने घुसखोरी केल्याचा भारताचा आरोप आहे. यावरून उभय देशांत वाद निर्माण झाला आहे. संबंधित पक्षांनी संयम बाळगणे गरजेचे असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. द्विपक्षीय समझोत्यांचे पालन करून जैसे थे परिस्थिती एकतर्फी बदलता कामा नये, असे चीनच्या भूमिकेवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत व चीन यांच्या दरम्यान विशेष प्रतिनिधी प्रक्रियेत जे मतैक्य झाले होते, त्याचा दोन्ही देशांनी आदर राखावा. चिनी सरकारने सिक्कीममधील भागात रस्तेबांधणी सुरू करून या समझोत्याचा भंग केल्याचे भारताने स्पष्ट करून हा प्रकार थांबवावा, असे चीनला बजावले आहे.
नक्की काय घडले? - आजवरचा घटनाक्रम असा आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान डोकलाम  भागात रस्तेबांधणीसाठी आले होते. भूतान सरकारच्या मदतीने भारतीय अधिकाऱ्यांनी चिनी बांधकाम पथकाशी संपर्क साधला व जैसे थे परिस्थिती राखण्यास सांगितले.
भारत व भूतान यांच्यात नेहमीच सल्लामसलत होत आली आहे, त्यानुसार भूतान व भारत एकमेकांच्या संपर्कात होतेच. भूतानच्या राजदूतांनीही चीन सरकारचा त्यांच्या नवी दिल्लीतील दूतावासामार्फत निषेध केला आहे आणि सिक्कीम भागातील सीमेच्या संदर्भात सांगायचे तर २०१२ मध्ये परस्पर सामंजस्याचा करार झाला होता. त्यानंतर विशेष प्रतिनिधी पातळीवर बैठकही झाली होती. भूतानच्या लष्कराने संबंधित रस्ते बांधणी करणाऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. 
चीनने करार मोडला - वेटसाॅप नामग्याल हे भूतानचे भारतातील राजदूत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, डोकलाम हा वादग्रस्त भाग आहे पण चीन व भूतान यात लिखित करार असा आहे की, जोपर्यंत या बाबत शांततापूर्र्ण मार्ग निघत नाही तोपर्यंत जैसे थे स्थिती कायम राखावी. कोणीही एकतर्फी कारवाई करू नये. म्हणून रस्ता बांधण्याचे काम थांबवावे, अशी आमची मागणी आहे.
चीनचा आरोप - चीनने भारतावर आरोप केला आहे की, भारताने सिक्कीम सीमेबाबत विनाकारणच कुरापत काढली आहे कारण जवळच लागून भूतान बरोबरचा सीमावाद आहे. भूतान हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. त्याची कड घेऊन वाद करण्याचे भारताला कारणच काय आहे?, अशी मल्लिनाथी चीनचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते लू कॅंग यांनी केली आहे. भूतानचे चीन सोबत राजनैतिक संबंध नसल्यामुळे भारत हे निमित्त साधून आक्षेप घेत आहे. भूतान व चीन यातील सीमा अंतीमरीत्या आखलेल्या नाहीत. ही दोन्ही सार्वभौम राष्ट्रे आहेत. यात तिसऱ्याची लुडबुड या प्रश्नी का असावी?, असा टोमणा चीनने भारताला मारला आहे. तर भूतानचे चीनशी राजनैतिक संबंध नसल्यामुळे भूतानच्या वतीने व सांगण्यावरून भारताने हा मुद्दा उपस्थित केला आहे, हे भारताने स्पष्ट केले आहे. पण याचा चीनला सोयीस्कर विसर पडलेला दिसतो आहे. सिक्कीमलगत च्या क्षेत्रातही चीनची घुसखोरी असून चीनने भारताच्या हद्दीतील बंकर उध्वस्त केले आहेत. भारतीय सैनिकांशी शारारिक रेटारेटी करण्यापुरतेच सध्याच्या संघर्षाचे स्वरूप असले तरी विलक्षण तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांचे प्रत्येकी तीन हजार सैनिक या भागात सध्या तैनात आहेत. या पार्श्वभूमीवर चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त लू कांग यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन चीनची भूमिका मांडली. सामान्यपणे अशाप्रकारे सीमावादावर अधिकृतपणे बोलण्याचे दोन्ही देशांकडून टाळले जाते.
चीनची पत्रकार परिषद - भारतीय लष्कराने केलेल्या कथित ‘घुसखोरी’चे फोटो पत्रकार परिषदेत दाखवून चिनी प्रतिनिधी कांग म्हणाले की, ‘भारताने घुसखोरी केल्यामुळे आम्ही नवी दिल्ली आणि बीजिंग या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत. भारताच्या घुसखोरीचे फोटो परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील. दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक संवादाचा मार्ग खुला आहे. भारताने आपले सैनिक हद्दीत परत बोलवावेत, असे आवाहन आम्ही करतो. सध्याचा वाद सोडविण्याचा तसेच, संवाद साधण्यासाठी ही पूर्वअट असेल.’ 
  कांग यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी वेगळी पत्रकार परिषद घेऊन भूतानने केलेला चिनी घुसखोरीचा दावा फेटाळून लावला.
नकाशा युद्ध - आणखी एक नवीनच शक्कल लढवीत चीनने एक नवाच नकाशा प्रसिद्ध केला आहे, या नकाशात भारत-चीन आणि भूतान या तीन देशांच्या त्रिकोणी सीमेजवळ चीनने भूतानचा काही भाग आपला दाखविला आहे. या डोकलाम भागात भारतीय सैनदल आहे, डोकलाम हा भूतानचा भाग मानला जातो मात्र चीनने यावर आपला कब्जा असल्याचे म्हटले आहे.
अडीच आघाडी - भारतीय लष्कर एकाच वेळी अडीच आघाड्यांवर ( पाकिस्तान, चीन व काश्मीरमधील अतिरेकी व फुटिरतावादी चळवळी) लढण्यासाठी सज्ज आहे, असे विधान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी नुकतेच केले होते. चिनी लष्कराने त्यांचे हे वक्तव्य बेजाबदार असल्याचे म्हटले आहे. भारतीय लष्करातील काही विशिष्ट व्यक्तीने इतिहासातून धडा घ्यावा आणि युद्धाबाबतची ओरड थांबवावी, असे लष्कराचे प्रवक्ता कर्नल कियान म्हणाले. बहुदा त्यांना भारतीय लष्कर व शासन यात एकवाक्यता नाही, असा संभ्रम निर्माण करायचा असावा.
रणगाड्याची चाचणी शुद्ध हेतूने- चीनने गुरुवारी भारतीय सीमेनजीक तिबेटमधील दुर्गम हिमालयीन भागात कमी वजनाच्या रणगाड्याची चाचणी घेतली. यामागे कोणत्याही देशाला लक्ष्य करण्याचा उद्देश नसून, ही चाचणी रणगाड्याचे मापदंड तपासण्यासाठी होती, असे चीनच्या लष्कराने म्हटले आहे. वेगळा अर्थ काढू नका, असे चीन म्हणत असला तरी कशाचा काय अर्थ लावायचा, हे न कळण्याइतके कुणीही आता दुधखुळे राहिलेले नाही.
  चीनला रस्ता बांधायचाच आहे. हिंदी महासागरात प्रवेश हवाच आहे, युरोपमध्ये प्रवेशासाठी खुष्कीचा मार्गही मोकळा करून हवा आहे. हे सर्व समजा उद्या मिळालेही पण त्या मोबदल्यात भारताची बाजारपेठ गमवावावी लागली तर ते चीनला परवणार आहे का? भारताची साथ नसती तर भूतानची आपल्याला अडकाठी करण्याची हिंमत झाली नसती, असा चीनचा होरा आहे. भूतानची हिंमत व भारताची साथ यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे, त्याची आगपाखड सुरू आहे. सिक्कीम मधूनही हा रेशमी रस्ता जातो आहे. चीनला यालाही विरोध झालेला खपत नाही. ही सरळसरळ दादागिरी आहे. चीनची ही दादागिरी कितीतरी अगोदरच हेरून/ओळखून माजी संरक्षण मंत्री जाॅर्ज फर्नांडिस म्हणाले होते की, आपला खरा शत्रू चीन आहे. तेव्हा ही भूमिका अनेकांना,  विशेषत: साम्यवाद्यांना, आवडली नव्हती. पण जाॅर्ज फर्नांडिस किती बरोबर होते, ते आपले साम्यवादी बांधव सोडल्यास आता सर्वांनाच पटेल, असे वाटते. साम्यवादी देश आक्रमक नसतात, ते मुक्तिदाते असतात, अशी त्यांची ठाम समजूत असते.

No comments:

Post a Comment