बेळगावचा ठाणेदार होणार मिशिगनचाही 'ठाणेदार'?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
कर्नाटक प्रांतातील बेळगाव येथील एका सामान्य कुटुंबात जन्मलेला श्रीनिवास ठाणेदार हा आज अमेरिकेतील मिशिगन प्रांताचा गव्हर्नर होण्याच्या आकांक्षेने डेमोक्रॅट पक्षाचा उमेदवार म्हणून दावा करीत आहे. अनेक टक्केटोणपे खात आज यशस्वी लेखक व उद्योजक म्हणून श्रीनिवाय ठाणेदार यांनी अमेरिकेत नाव कमावले आहे. २००४ साली त्यांनी आपले आत्मचरित्र, ‘ही श्रींची इच्छा’, या नावाने प्रसिद्ध केले आहे. हे आत्मचरित्र मराठीतील एक बेस्ट सेलर ठरले आहे. याचे नाट्यरुपांतरही गाजले. सध्या याच पुस्तकाच्या प्रसाराचे निमित्ताने ते मुंबईला आले आहेत. ३० वर्षांपूर्वी बेळगावहून मुंबईला आल्यावर त्यांचा मुक्काम दादरच्या कृष्ण लाॅजमध्ये होता. आज ते नरीमन पाॅईंटमधील हिल्टन टाॅवरमध्ये उतरले आहेत.
ते अमेरिकेतील मिशिगन प्रांतातील ॲन अर्बोर येथे पत्नी शशी, दोन मुले, नील व समीर यांचे सोबत व सोबतीने यशस्वी कालक्रमणा करीत असतांना त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन मुलांचा सांभाळ करीत त्यांनी आपल्या उद्योगाचा डोलारा उभारला आहे.
बालपण व शिक्षण - श्री १४ वर्षांचा असतांना वडलांना वयाच्या ५५ व्या वर्षी सक्तीची सेवानिवृत्ती पत्करावी लागली. लहानसहान कामे करून श्री ८ जणांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू लागला. कमवत व शिकत त्याने मुंबई विद्यापीठाचे रसायनशास्त्रात पदव्युत्तर स्तरापर्यंतचे शिक्षण संपादन केले.
शालांत परीक्षेत श्रीला ५५टक्के गुण मिळाले होते. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने विजापूर बॅंकेत नोकरी मिळविली. बॅंकेच्या नकळत शिक्षणही सुरू ठेवले. पण प्राचार्यांना हे मान्य झाले नाही. ते त्याला परीक्षेला बसू देईनात. त्याने उपकुलगुरूस्तरापर्यंत लढा देऊन कशीबशी अनुमती मिळविली. पण आता परीक्षेसाठी बॅंक १५ दिवसांची रजा देईना. तेव्हा तो तसाच विजापूरहून धारवाडला आला. रात्रंदिवस अभ्यास करून त्याने परीक्षा दिली. अर्थातच बॅंकेने मात्र त्याला नोकरीतून काढून टाकले.
विदूषक निवडला गेला - बॅंकेतली सोन्यासारखी नोकरी शिकण्याच्या हट्टापायी गमावणाऱ्या श्रीला सगळ्यांनी वेड्यात काढले. पण अभ्यास फळाला आला. त्याने रसायनशास्त्रात एम एससीच्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळविली. लगेचच भाभा अॅटाॅमिक रीसर्च सेंटरमध्ये मुलाखतीसाठी बोलावणे आले. मुलाखतीला जाताना वाटेत तो चिखलात पडला आणि अक्षरश: बरबटला गेला. पण तो तसाच विदुषकासारख्या अवस्थेत मुलाखतीला गेला आणि आश्चर्य म्हणजे निवडला गेला.
अमेरिका व्हिसा देईना - १९७९ साली त्याने सहाव्यांदा प्रयत्न करीत अमेरिकेचा व्हिसा मिळविला. अमेरिकेत आल्यावर त्याची परत भारतात येण्याची मुळीच शक्यता नाही या कारणास्तव चार वेळा त्याला व्हिसा नाकारला गेला होता. सहाव्यांदाही नाकारला गेला असता पण त्या दिवशी व्हिसा नाकारणारी अमेरिकन अधिकारी महिला अधिकारी -व्हर्जिनिया - रजेवर होती. तिच्याऐवजी काम करणाऱ्या तिच्या सहाय्यकाने व्हिसा मंजूर केल्यामुळे तो केवळ योगायोगानेच अमेरिकेत आला व ॲक्राॅन विद्यापीठात पीच डी साठी प्रयत्न करू लागला. पुढे मिशिगन विद्यापीठात डाॅक्टरेटनंतरचा त्याने अभ्यास केला. तसेच पेट्रोलाईट काॅर्पोरेशन मध्ये त्याने व्यवस्थापकीय पदेही सांभाळली.
मातेची प्रेरणा - आई - सुलोचना ठाणेदार - मला शिक्षणासाठी सतत प्रेरित करीत असे, असे श्रीनिवास ठाणेदार सांगतात. शिक्षणाशिवाय दारिद्र्यातून सुटका नाही, असे ती म्हणायची. संकटांचा सामना कसा करायचा, ते तिने मला शिकवले. अमेरिकेत नोकरी तर सहज मिळाली पण मला माझा स्वत:चा उद्योग उभारायचा होता. १९९१ मध्ये मला ती संधी मिळाली. श्रीनिवासने चेमीर/पाॅलिटेक लेबाॅरेटरी ७५ हजार डाॅलर्र देऊन विकत घेतली. चेमीर/पाॅलिटेक कंपनीची संस्थापक व वैज्ञानिक क्लॅरा क्रॅव्हरने, मला कंपनी ७५ हजार डाॅलरला विकत घेतोस का, म्हणून विचारले. कंपनी विकत घेऊन मी ती भरभराटीला आणली.
यशस्वी उद्योजक ठाणेदार - या कंपनीत तेव्हा तीनच कर्मचारी कामकरीत होते. अल्पावधीत चौपट मिळकत व ४०० कर्मचारी असा त्या कंपनीचा विस्तार व विकास झाला. उद्योजक कंपन्यांचे अध्यक्ष बिल शिओनिओ म्हणतात, ‘ नवीन गोष्टी तात्काळ शिकायच्या व हाताखालच्या व्यवस्थापकांवर जबाबदारी सोपवताना त्यांना विश्वासाने अधिकारही प्रदान करायचे, या भूमिकेमुळे श्रीनिवास ठाणेदार यशस्वी झाला आहे. या काळात तो इतर कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय जबाबदाऱ्याही सांभाळत होता. २०१० पर्यंत त्याने अनेक कंपन्या विकत घेतल्या व सांभाळल्या. अडचणीत असलेल्या कंपन्यांना मार्गदर्शन करून त्याने कूस बदलून विकास करावा, हे तो इतके अचुक सांगत असे की, याबाबत कुणीही त्याचा हात धरू शकत नसे. यशाच्या शिखरावर असतांना त्याची वार्षिक आय ६० दशलक्ष डाॅलर इतकी होती व संपत्तीचे मूल्य १३२ दशलक्ष डाॅलर एवढे होते. औषधिनिर्माणक्षेत्र, सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ, आरोग्य व सौष्ठव या सारखी उद्योगक्षेत्रे त्याने सफलतेने हाताळली. उद्योगाचे निमित्ताने त्याने हाताळलेले विषय कुणालाही आश्चर्यचकित करतील असे आहेत.
अबब! अगणित विषय, क्षेत्रे व उपकरणे - आॅरगॅनिक, इनआॅरगॅनिक, पाॅलीमर, ॲनॅलिटिकल केमेस्ट्री, फेल्युअर ॲनलिसीस, डी- फाॅर्म्युलेशन, मटेरियल कॅरेक्टरायझेशन, प्राॅडक्ट डिफेक्ट ॲनलिसीस, इन्फ्रारेड स्पेक्टोस्कोपी, स्कॅनिंग इलेक्ट्राॅन मायक्राॅस्कोपी, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी यापैकी कोणत्याही एका क्षेत्रावरच जरी त्याने आपले लक्ष केंद्रीत केले असते, तरी ते वैशिष्ट्यपूर्ण मानले गेले असते. वैज्ञानिक उपकरणेही त्याने किती हाताळली म्हणून सांगावे? अशा सर्व उपकरणांबाबतची कोणतीही समस्या उद्भवली की अवघ्या मिशिगन प्रांतात श्रीनिवास ठाणेदाराच्या ॲव्होमीन ॲनलिटिकल सर्व्हिसेसचे दार ठोठवणे हा हमखास उपाय असे. तो केवळ ‘ट्रबल शूटरच’ नव्हता तर संशोधक, निर्माता व कुशल मार्गदर्शक म्हणूनही सर्वपरिचित होता.
पुनश्च हरिओम - पण पुढे अमेरिकेत मंदीची लाट आली. औषधांची गुणवत्ता तपासणारी त्याची सहयोगी कंपनी ॲझोफार्मा तोट्यात गेली व बॅंकेने मूळ कंपनीवर २६.५ दशलक्ष डाॅलरचा दावा ठोकला. २०१० मध्ये कोर्टाने रिसीव्हर नेमून श्रीच्या कंपन्या विकून बॅंकांना देय कर्जाची वसुली केली. सर्वस्व गेल्यावरही श्रीची उमेद कायम होती. काही काळ त्याने आपला मुलगा नील यांच्या रसायनिक परीक्षण कंपनीत श्री मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. पण नंतर त्याने ॲव्होमीन ॲनलिटिकल सर्व्हिसेस या नावाने एक कंपनी स्थापन केली व ती नावारूपाला आणली.
राजकारणात प्रवेश - २०१६ साली श्रीनिवास ठाणेदार यांनी एक मुलखा वेगळाच निर्णय घेतला. कंपनी विकून त्यांनी मिशिगन राज्याच्या गव्हर्नरपदाची निवडणूक डेमोक्रॅट पक्षाचा उमेदवार म्हणून लढविण्याचे ठरविले. तुम्ही हा निर्णय का घेतला, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, या देशाने मला खूप काही दिले आहे. आता परतफेड करायची वेळ आली आहे. मिशिगन प्रांत दारिद्र्याने, बेकारीने, अशिक्षितपणाने ग्रासला आहे. या प्रांतात राजकीय कुरघोड्या पक्षपात हे प्रकार बोकाळले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. डेट्राईट सारख्या शहराची लोकसंख्या तर ६० टक्याने कमी झाली आहे. शहरालाच दिवाळे काढायची वेळ आली आहे. मी ही स्थिती बदलण्याची आकांक्षा उराशी बाळगून गव्हर्नरपदाची निवडणूक लढविणार आहे.
अभिनव जाहीरनामा - मित्रांनो, डेमोक्रॅट पक्षाचा गव्हर्नरपदाचा (म्हणजे आपला येथील मुख्यमंत्रीपदाचा) मिशिगन प्रांताचा उमेदवार या नात्याने, मी आपल्याला आश्वासन देतो की, आपल्या मिशिगन प्रांताच्या आर्थिक स्थितीत मी आमूलाग्र परिवर्तन घडवून आणीन; शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणीन; विकास व उन्नती घडविण्यास सहाय्यक होतील अशा पायाभूत सोयीसुविधा उभ्या करीन. माझा मूळ पिंड एका वैज्ञानिकाचा आहे. माझ्या या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून मी समस्या हाताळण्याच्या साध्या व सोप्या, किफायतशीर व प्रगतीपर उपाययोजना अमलात आणून समस्या सोडवीन.
अमेरिकन राजकारणात प्रभाव - नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत श्रीनिवास ठाणेदार यांनी डेमोक्रॅट पक्षासाठीचे निधी संग्रहाचे काम हाती घेतले होते. अमेरिकेतील संरक्षणविषयक कारखानदारी मुख्यत: ज्यू लोकांच्या हाती असून ते राजकीय पक्षांना निधी उभारणीच्या कामी साह्य करीत असतात. त्यामुळे त्यांचा अमेरिकन राजकारणावर प्रभाव असतो. २०१६ च्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत निधी उभारणीच्या क्षेत्रात भारतीयांनीही दमदार पदार्पण केले आहे. कर्नाटकातील एका खेड्यात जन्मलेला मराठी श्रीनिवास ठाणेदार हे सुद्धा निधी उभारणीच्या मोहिमेत आघाडीवर होते. अमेरिकेतील आर्थिक दृष्ट्या संपन्न भारतीयांच्या या राजकीय भूमिकेची दखल अमेरिकन राजकारणाने घेतली आहे. ज्यू लोकांप्रमाणे भारतीय लोकांचा अमेरिकन राजकारणावर प्रभाव निर्माण होण्याच्या दिशेने श्रीनिवास ठाणेदारांनी उचलेले हे पाऊल एक महत्त्वाचा टप्पा (माईल स्टोन) ठरेल, यात शंका नाही.
ही तर आपली सगळ्यांची इच्छा - ‘ही श्रींची इच्छा’, या आपल्या मराठी आत्मचरित्राच्या प्रसाराच्या निमित्ताने ते सध्या भारतभेटीवर आले असून मुंबई मुक्कामी त्यांनी आपली जीवनगाथा सर्व भारतीयांसमोर उलगडली आहे. हे पुस्तक भारतातीय गावकुसातील तरुणाईने वाचावे, असे त्यांना वाटते. ‘स्वप्न बघण्याची इच्छा असेल तर सर्वकाही शक्य आहे’, हे मला त्यांना सांगायचे आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी हे पुस्तक इंग्रजीत भाषांतरित व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिकेतील वंचितांनाही ते स्फूर्तीप्रद ठरेल, असे त्यांना वाटते. श्रीनिवास ठाणेदारांच्या पाठीशी श्रींची इच्छा तर नक्कीच आहे. आपण आपल्या इच्छेचे पाठबळही त्यांच्या पाठीशी उभे करू
No comments:
Post a Comment