Friday, July 14, 2017

मोदींची इस्रायल भेट - दुसरी बाजू

मोदींची इस्रायल भेट - दुसरी बाजू
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
 (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
भारत आणि इस्रायलच्या राष्ट्रप्रमुखांची यावेळी तेलअविव इथे झालेली भेट अनेक वैशिष्ट्यांनी युक्त होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा पंतप्रधान प्रथमच इस्रायलला भेट देत होता. इतका उशीर होण्यामागे आपण कधी उघडपणे तर हळूच दोन कारणे सांगत होतो. इस्रायलशी सलगी केली तर अरब राष्ट्रे नाराज होतील. त्यांची नाराजी आपल्याला परवडणार नाही. खनीज तेलासाठी आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत ना? पण आपण हे विसरतो की, अरब राष्ट्रांनाही खनीज तेलासाठी गिऱ्हाईक हवेच होते ना? भारताएवढी मोठी व एकटी बाजारपेठ त्यांना कुठे मिळणार होती? अडवणूक केलीच असती, तर ती किती काळ टिकली असती?
आपली दांभिकता - आपले दुसरे कारण तात्त्विकतेवर(?) आधारित होते. काय तर म्हणे, इस्रायलने मानवी हक्कांचे सतत हनन चालविले होते. ते राष्ट्र अरबांवर सतत हल्ले करीत होते. जणू अरब राष्ट्रात काय किंवा साम्यवादी देशात  काय, मानवतेला नित्यनवीन घुमारेच फुटत होते की नाही? त्यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे (!) संबंध होतेच की. यासाठी सौम्य शब्द वापरायचे म्हटले तरी दांभिकता किंवा भोंदूपणा याशिवाय दुसरा आणखी सौम्य शब्द प्रयत्न करूनही सापडणार नाही.
परिस्थितीने अक्कल शिकवली - पण पुढे परिस्थिती बदलत गेली. पाकिस्तानशी मुकाबला करावा लागला. चीनने आक्रमण केले. चीनने आक्रमण केले, तेव्हा अमेरिकेने शस्त्रे देऊ केली. पण पाकिस्तानशी संघर्ष झाला तेव्हा इस्रायलकडेच पहावे लागले. इस्रायलने शस्त्रे पुरविली. हळूहळू इस्रायलशी असलेले आपले सबंध अधिकाधिक दृढ होत गेले. पण तरी पंतप्रधानांच्या इस्रायल भेटीसाठी ७० वर्षे जावी लागली. पंतप्रधानपदी मोदींना यायची वाट पहावी लागली.
जंगी स्वागत का? - भेटीचे निमित्ताने आपले पंतप्रधान मोदी यांचे जंगी स्वागत झाले. अगत्याला सीमा नव्हती. इस्रायलचे संपूर्ण सरकार स्वागतासाठी सामोरे आले होते. यजमान देशाने अमूक एक करायचे बाकी ठेवले नव्हते. पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू व राष्ट्रपती रुव्हेन रुव्हलीन प्रत्येक प्रसंगी शिष्टाचाराला फाटा देऊन जातीने हजर असत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आवभगत करण्यात त्यांनी तसूभरही कमतरता येऊ दिली नाही.
बहुआयामी संबंध - भारत व इस्रायल हे आता एकमेकांचे नुसतेच चांगले मित्र झालेले नाहीत, नुसतेच एकमेकांचे विकास व तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार झालेले नाहीत, नुसतेच मूलतत्त्वावादाचे, सायबर सुरक्षेचा भेद करणाऱ्यांचे व दहशतवादाचे पारिपत्य करणारे साथीदार झालेले नाहीत, तर सैनिकी डावपेच तसेच मोक्याच्या व योजनाबद्ध व्युव्हरचना रचणारे  ते  सहयोगीही होत आहेत.
या निमित्ताने जारी झालेल्या संयुक्त घोषणापत्राचा थोडासाही बारकाईने अभ्यास केला तर यावेळी झालेल्या विविध करारांचे वेगळेपण लक्षात येईल.
संयुक्त घोषणापत्रासोबत व्यक्त झालेले विचारही तेवढेच महत्त्वाचे - उभय देशांच्या या कर्तृत्वशाली नेत्यांमधील वैचारिक, धोरणात्मक व क्रियान्वयन विषयक एकवाक्याता जशी संयुक्त घोषणापत्रात प्रगट होते आहे/ जाणवते आहे,  तशीच उभयपक्षी स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हे दोन्ही नेते जे बोलले आहेत, त्या बोलण्याचे स्वरूप औपचारिकतेच्या मर्यादा ओलांडणारेही झालेले दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत, आम्ही संरक्षणविषयक बाबतीत याहीपेक्षा (हा ‘याही’ शब्द महत्त्वाचा आहे) खूप काही करायचे ठरविले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू म्हणाले आहेत,  भारताच्या पंतप्रधानांची इस्रायलची ही पहिली वहिली भेट ऐतिहासिक महत्त्वाची ठरणार यात शंका नाही. पण या निमित्ताने उभय देशातील जनतेमध्ये असलेले जुने मैत्रीचे बंध नव्याने  बळकट होत आहेत, हे विशेष महत्त्वाचे आहे.
मोदींच्या शैलीची महती - इस्रायलच्या पंतप्रधानांना भारतभेटीसाठी सहकुटुंब येण्याचे पंतप्रधान मोदी यांनी दिलेले निमंत्रण पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी ज्या तत्परतेने व उत्फूर्तपणे स्वीकारले, तो एक टिपून ठेवावा, असा क्षण होता. अर्थात मोदी जिथे जिथे गेले आहेत, ज्या ज्या कुणाला भेटले आहेत, त्या त्या प्रत्येकाशी वैयक्तिक स्नेहबंध निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. याचा प्रत्यय हॅम्बुर्गच्या जी-२० गटाच्या बैठकीत आलेला छायाचित्रकारांनी टिपला आहे. मोदींना पाहताच डोनाल्ड ट्रंप त्यांच्याकडे चालत गेले आणि त्या दोघांना बोलतांना पाहताच इतर देशांच्या नेत्यांनी त्यांना गराडा घातलेला पाहताच सर्व छायाचित्रकार त्या दिशेने धावतांना आपण पाहिले आहेत.
प्रत्यक्ष अनुभवाचे भुक्तभोगी पण भान कायम - भारत व इस्रायल या दोन्ही देशांना, ‘फर्स्ट हॅंड व्हायलन्स ॲंड हेट्रेड’, चा अनुभव असून त्या दोघांच्याही देशातील शांततेला व स्थैर्याला धोका निर्माण झालेला आहे, हा मुद्दा मोदींनी अधोरेखित केला आहे. पण तेवढेच बोलून मोदी थांबले नाहीत. शेतकी उत्पादनात वाढ व पाण्याच्या दुर्भिक्षावर मात या सकारात्मक मुद्द्यांवरही मोदींनी तेवढाच भर दिला आहे.
यामुळे एक पहिली वहिली ऐतिहासिक भेट एवढेच या भेटीचे फलित नाही, तर एका विस्तृत मैत्रीचा ( ब्राॅड बेस्ड फ्रेंडशिप) व भरभक्कम मैत्रीचा पाया या भेटीत घातला गेला आहे. याचे प्रत्यंतर आणखी एका प्रसंगातून येते.
मोशे व त्याच्या आजीआजोबंची हृद्य भेट - मोशे होल्ट्सबर्ग या मुंबईतील दहशतवादी हल्यातून वाचलेल्या, तेव्हाच्या  २ वर्षांच्या व आताच्या ११ वर्षाच्या बालकाला, मोदींनी ज्या ममतेने व  प्रेमाने कुरवाळले आणि तू व तुझे कुटुंबीय भारतात केव्हाही व कितीही काळ येऊन राहू शकता, असे आश्वासनवजा निमंत्रण दिले, या निमंत्रणाने इस्रायलमधील दूरच्या अफुला गावातून खास मोदींना भेटण्यासाठी आलेले, रुबी शिमाॅन रोझेनबर्ग व त्यांची पत्नी, हे या बालकाचे आईकडूनचे आजी आजोबा, तसेच मोशेचे न्यूयाॅर्कहून खास मोदींना भेटण्यासाठी आलेले, वडलांकडूनचे आजी अजोबा असलेले अनक्रमे फ्रयडा व नॅकमन होल्ट्सबर्ग हे चौघेच गहिवरले असतील, असे नाही. तर इस्रायलचे जनमतालाही गहिवरून आले असेल. असा या बालकाच्या भेटीतून दिलेला अनौपचारिक संकेत, हा मोदींचा आणखी एक स्वभावविशेष म्हटला पाहिजे.
छब हाऊसमधील ‘ती’ घटना- या बालकाच्या बाबतीत मानवतेचे दर्शन घडविणारी आणखीही एक विशेषता आहे. गॅब्रिएल व रिव्हका होल्ट्सबर्ग या आपल्या मातापित्यांसोबत २ वर्षांचा चिमुकला मोशे मुंबईला छब हाऊसमध्ये असतांना लष्कर- ए- तोयबाच्या अतिरेक्यांनी त्याच्या आईवडलांना ठार केले. त्या दोघांच्या प्रेतांमध्ये मोशेला उभा व जिवंत असलेला पाहून त्याच्या दायीने - सॅंड्रा सॅम्युएलने - त्याला उराशी कवटाळले व स्वत:च्या जीवाची परवा न करता सुरक्षित जागी धावत नेले. तिला इस्रायलने वास्तव्याचा परवाना दिला असून सध्या जरी ती मोशेची रोजची काळजी वाहत नसली तरी दर आठवड्याला नेमाने त्याची भेट घेत असते.
 भावनाविष्कार - मोशेचे वडलांकडून आजी अजोबा असलेले अनक्रमे फ्रयडा व नॅकमन होल्ट्सबर्ग हे दोघे न्यूयाॅर्कहून मोदींना भेटण्यासाठी आले होते. ते मोशेला म्हणाले, ‘बाळा, तू यहुदी धर्मगुरू झालास तर मला आवडेल पण तुझी तशी इच्छा असेल, तरच बरं’.
 पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू मोशेला म्हणाले की, ‘मी जेव्हा भारताला भेट द्यायला जाईन, तेव्हा तूही माझ्या बरोबर चल.’ आईकडूनचे आजोबा रोझेनबर्ग वार्ताहरांकडे पाहून म्हणाले, ‘भारत आम्हाला विसरला नाही, याचा आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. केवळ मोशेलाच नव्हे तर आम्हालाही भारताच्या प्रेमाचा अनुभव येतो आहे. ईश्वर भारताचे व पंतप्रधान मोदींचे भले करो’.
   छोट्या मोशेला छब हाऊस मधला ‘तो’ प्रसंग आठवत नाही म्हणा किंवा त्याबद्दल तो बोलत नाही म्हणा. तो एवढेच म्हणतो की, ‘ (मुंबईतले) छब हाऊस हे त्याचे घर आहे’.
मोशे मोदींना उद्देशून म्हणाला, ‘ आपका हमारे देश मे स्वागत है’, मी मोठा झालो की, मुंबईला येईन आणि छब हाऊस मध्येच मुक्काम करीन. माझी आणि माझ्या आईवडलांचीही आठवण असू द्या.’
ही सर्व घटना एका गंभीर वातावणात घडत होती. एरवी निर्विकारपणे वार्तांकन करणारे वार्ताहर व छाया चित्रकार यांनाही गहिवरून आले होते. या संपूर्ण कार्यक्रमात अतिरेक्यांबद्दल कुणीही एक चकार शब्दही उच्चारला नाही, हा या घटनेचा आणखी एक पण सर्वात महत्त्वाचा विशेष म्हटला पाहिजे. राजकीय सल्लामसलती सोबत घडणाऱ्या घटनांची ही दुसरी बाजू त्याहीपेक्षा निदानपक्षी तेवढीच महत्त्वाची नाही का?

No comments:

Post a Comment