एका कोंबड्याने निर्माण केलेले वादळ
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
चीनचा नकाशा चुकीचा दाखवला म्हणून देशभक्त चिनी नागरिक भारतावर कमालीचे व खूपच उखडले आहेत. इंडिया टुडे नावाच्या नियतकालिकाने आपल्या मुखपृष्ठावर मोठ्या कोंबड्याच्या आकारात चीन व लहान पिल्लाच्या आकारात पाकिस्तानचे चित्र दाखविले आहे. चित्र कसले, हे एक व्यंगचित्रच आहे. चीन व पाकिस्तानची जवळीक दाखवायचा, चीनच्या तुलनेत पाकिस्तान किती क्षुल्लक आहे, हे मनावर बिंबवण्याचा व पाकिस्तान चीनच्या पुरता कह्यात गेला आहे, असा काहीसा अर्थबोध या व्यंगचित्रावरून होतो/होऊ शकतो. सध्या भारत व चीन या देशामधील संबंध तर अगोदरच ताणलेले असतांना किंवा म्हणूनच, हे व्यंगचित्र या नियतकालिकाने आपल्या मुखपृष्ठावर छापले आहे.
व्यंगचित्रामुळे वादळ - सामान्य नागरिकत नव्हेत तर चीनमधील वृत्तप्रसार माध्यमे सुद्धा या नकाशामुळे संतापलेली आहेत. असं काय आहे या नकाशात (व्यंगचित्रात)? विनोदाचे एवढे वावडे का असावे, या लोकांना? कारण वेगळेच आहे. कोंबड्याच्या आकारातल्या चीनच्या चित्रात तिबेट दाखविलेला नाही, तसेच तायवानही दाखविलेले नाही. पाकिस्तान एका कोंबडीच्या पिल्लाच्या आकारात दाखविले आहे. पाकिस्तानात सध्या एवढ्या उलाढाली होत आहेत की पाकी नागरिकांना या व्यंगचित्राकडे लक्ष देण्यासाठी बहुदा वेळच मिळाला नसावा. पण चिनी प्रतिक्रिया मात्र ताबडतोब आली आहे. त्यामुळे अगोदरच तणावपूर्ण असलेले संबंध आणखीनच ताणले जाण्याची शक्यता चिनी नागरिक व प्रसार माध्यमे व्यक्त करीत असतांना भारताला शेलक्या शिव्या हासडीत आहेत. चीनचा हा ‘सुधारित नकाशा’ (व्यंगचित्र) इंडिया टुडेच्या ३१ जुलै २०१७ च्या अंकाच्या मुख्यपृष्ठावर छापलेला आहे. तो पाहून चिनी नागरिकांची देशभक्ती उफाळून आली, अनेकांनी मासिकाबरोबर भारताचाही कठोर शब्दात धि:क्कार केला आहे.
व्यंगचित्राचा हेतू - इंडिया टुडे या मासिकात ‘चीनचे नवीन पिल्लू’ या नावाची कव्हर स्टोरी आहे. चीन पाकिस्तानमध्ये मुक्तहस्ताने भरघोस गुंतवणूक का करतो आहे? भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. चित्रात चीन मोठ्या कोंबड्याचे आकारात तर पाकिस्तान पिल्लाच्या आकारात दाखविला आहे. सोबत त्या त्या देशांचे झेंडे दाखविले आहेत, त्यामुळे शंकेला जागाच नाही.
त्या नकाशात तिबेट व तायवान दाखविलेले नाहीत, ही बाब चिनी लोकांच्या ताबडतोब लक्षात आली व खटकली. तिबेट व तायवानवर आपले स्वामित्व आहे, असा चीनचा दावा आहे, हे जग जाणते. चीन तायवानला मूळचा आपलाच पण आजचा मात्र निष्ठा बदलणारा प्रदेश मानतो. तिबेटला तो चीनचाच पण स्वायत्त प्रदेश मानतो. या दोन्ही प्रदेशांवरील स्वामित्त्वाबाबत राजकीय सरगरमी सुरू असते.
अशा शिव्या व असा प्रतिसाद - ‘असे भुक्कड मासिक कशाला कोणाला वाचावेसे वाटेल?’, एका चिनी वाचकाची प्रतिक्रिया.
‘तिबेट चीनचा अविभाज्य भाग आहे, अशा क्षुल्लक कृतीने ही स्थिती बदलणार आहे थोडीच?’, एका वाचकाने भारताला सुनावण्याचा प्रयत्न केला आहे.
‘असा पोरकटपणा करणारा भारत देश कधीही सामर्थ्यवान होणार नाही’, दुसऱ्या एका वाचकाची मुक्ताफळे.
चीनमधील रागावलेल्या जनतेच्या प्रतिक्रियांची दखल इंडिया टुडेने आपल्या वेबसाईटवर फारशी घेतलेली नाही. पण एक बेरकी विधान मात्र केले आहे. आमच्या नियतकालिकांच्या मुखपृष्ठांनी आजवर सीमा सरकवल्या असतीलही पण त्या सीमा कल्पकतेच्या होत्या व त्यामुळे आमच्या वाचकांचा कधीही अपेक्षाभंग झालेला नाही. चीनचा कोंबडा म्हणून चित्र काढतांना तिबेटची व तायवानची अडचण होत असणार, हा साधा मुद्दा चिनी वाचकांच्या लक्षात आलेला दिसत नाही.
भारतातील प्रचलित नावापेक्षा चीनने प्रत्येक भूभागासाठी वेगळे नाव योजलेले असते. भूतानमधील ज्या भूभागाला आपण व भूतान डोकलाम म्हणतो, त्याला चीन डोंगलॅंड म्हणतो. त्यामुळे चीन नक्की कोणत्या भागाबद्दल बोलतो आहे, ते चटकन कळत नाही.
ढकलाढकली - इंडिया टुडे या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर जेव्हा हे कोंबडं व पिल्लू अवतरले त्याच्या अगोदरच धगधगत असलेला डोकलाम पठाराच्या सीमे विषयीचा मुद्दा सुद्धा निकराला आला होता. परिणामत: चीनने तिबेटमध्ये सैनिकी कवायत सुरू केली आहे, तर खुद्द सीमेवरही चीन दंड थोपटू लागला आहे. मध्यंतरी चिनी व भारतीय सैन्यात ढकलाढकली सुरू होती.
गेल्या ३० वर्षात एवढा तणाव निर्माण झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल बेजिंगला आले आहेत व दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी या डोकलाम प्रकरणी चर्चा केली आहे.
No comments:
Post a Comment