Sunday, September 24, 2017

लचके तोडणारे लांडगे व बिचारे अफगाणिस्तान राष्ट्र

लचके तोडणारे लांडगे व बिचारे अफगाणिस्तान राष्ट्र
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 
नागपूर ४४० ०२२   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
 आजचा अफगाणिस्तान हा इस्लामिक रिपब्लिक आहे. ६५,००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या देशाला समुद्र किनारा नाही. देशाच्या दक्षिण व पूर्व दिशेला पाकिस्तान, पश्चिमेला इराण, उत्तरेला तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान हे तीन देश व वायव्येला किंचितसा चीन आहे, चीनच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सिल्क रूट जवळूनच जात असल्यामुळे चीनचे आर्थिक हितसंबंध या देशाशीही संबंधित आहेत. या देशाची लोकसंख्या ३३ मिलीयन इतकी आहे.
  एक अतिप्राचीन देश - ५०,००० वर्षांपासून अफगाणिस्तानात मानव नांदत होता, असे म्हणतात. या दृष्टीने पाहता अफगाणिस्तानची  इजिप्तशीही तुलना होऊ शकेल. भारत व अफगाणिस्तानात सिंधू संस्कृती स्थिरपद असल्याच्या खुणा आढळतात. नंतर मात्र अनेक राजवटींचे बरेवाईट (बहुदा वाईटच) अनुभव या देशाच्या वाट्याला आले आहेत व ते आजही पुरते संपलेले नाहीत. असा संघर्षयुक्त संपर्क ज्यांच्याशी आला त्यात अलेक्झांडर, मौर्य, अरब, मोगल, इंग्रज व शेवटी आता आता रशियाशी व पाश्चात्यांशी आलेला संपर्क, हे त्यातल्या त्यात बहुपरिचित म्हणता येतील. कुशान, गझनवी, घोरी, खिलजी, मोगल व दुराणी अशी प्रमुख व इतर तुलनेने अपरिचित साम्राज्ये अशी एकूण दहा साम्राज्ये या देशाने आजवर  सहन केली आहेत. एखाद्या देशाच्या मागे नशीब कसे हात धुऊन पाठीमागे लागलेले असते हे पहायचे असेल, तर अफगाणिस्तानचा इतिहास बघावा. बौद्धांनीच कायती करुणा या देशात आणली असेल ती असेल. ती एकतर तशी अल्पकाळच टिकली व तिच्याही पाऊलखुणा तालिबान्यांनी काही वर्षांपूर्वी राॅकेट डागून छिन्नविछिन्न केल्या. बामीयन शहरातील बौद्धांच्या मठांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी पर्वतात कोरलेली शिल्पे बुद्धाची शिल्पे होती. बामायन हे नाव संस्कृत वर्मायन या नावाचे अपभ्रंश स्वरूप आहे.
  इंग्रजांची हुशारी - इंग्रज खरोखरच हुशार म्हटले पाहिजेत. भारत व रशिया यात मधोमध अफगाणिस्तान हे बफर स्टेट म्हणून कायम असावे, असा यशस्वी खटाटोप त्यांनी केलेला दिसतो. १९१९ च्या सुमारास अमानुल्ला नावाच्या कर्तबगार राजाने या देशात आधुनिकतेचा प्रसार व प्रचार केला. १९७० पर्यंत तसे बरे चालले होते पण नंतर बंडाळी झाली. ती शमते नाहीत शमते तोच गृहयुद्धाने अफगाणिस्तानला ग्रासले. रशियाने ही संधी साधली व अफगाणिस्तानला आपल्या वर्चस्वाखाली आणले. त्या नंतर पुढे या देशात इस्लामिक स्टेट स्थापन झाले. या निमित्ताने तालिबान्यांचा या देशावर तब्बल ५ वर्षे ताबा होता. हे सर्व घडत असतांना अमेरिकेला  फारशी जाग  आली नव्हती. ११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे  ट्विन टाॅवर्स तालिबान्यांनी बेचिराख केल्यानंतरच अमेरिका खडबडून जागी झाली व खवळून उठली. तिने तालिबान्यांना हकलले व पाश्चात्यधार्जिणी पण लोकशाही चौकट अफगाणिस्तानमध्ये स्थापन केली. तरीही आजही ४० टक्के भूभागावर खऱ्या अर्थाने तालिबान्यांचाच वट चालतो, असे म्हणतात व मानतात. स्वत:ला चटका बसला तरच अमेरिका पेटून उठते, एरवी मानवी हक्कांच्या हननाचे तिला सोयरसुतक नसते, हे या निमित्ताने जगाने पुन्हा एकदा अनुभवले.
टपलेले लांडगे - आजची स्थिती अशी आहे की, अफगाणिस्तानमध्ये मुख्यत: इराण, रशिया, अमेरिका, पाकिस्तान व चीन यांचे मतलबी हितसंबंध गुंतलेले आहेत. सचोटीने अफगाणिस्तानच्या पुनर्निर्माण कार्यात फक्त भारतच सहभागी झाला आहे, हे दिसते. पण अफगाणिस्तानच्या बाबतीत चर्चा करतांना भारताला वगळण्याचे पाकिस्तान व चीनचे  कटकारस्थान अमेरिका व रशिया हे दोघेही अनेकदा मूग गिळून गप्प राहून पाहत असत. आता मात्र अफगाणिस्तानची ‘जबाबदारी’ भारताने मोठ्या प्रमाणात उचलावी, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना वाटू लागले आहे. 
इराण व अफगाणिस्तान -  1935 साली राजा झहीर शहा व पर्शियन राजवंशातील पहलवी यांच्यामधील संबंध नोंद घ्यावी इतके चांगले होते. पण 1979 मध्ये इराणमध्ये क्रांती झाली. त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले. तेव्हापासून मुजाहिद्दिन, अफगाण निर्वासित, तालिबान व हेलमंद नदीचे पाणी वाटप व अमेरिकेचा अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप हे इराणच्या दृष्टीने वादाचे मुद्दे होते व आहेत. भरीस भर ही की, हेलमंद नदीने आपला प्रवाहच बदलला. तसा या प्रश्नांबाबत उभय देशात करार झाला होता. पण याची पुष्टी/मंजुरी ( रॅटिफिकेशन) झाली नव्हती.
ठकांमधील साठमारी - 1979 मुजाहिद्दिन गटाने बंडाळी माजवली. यांना पाकिस्तानने प्रशिक्षण, शस्त्रे व पैशाची कुमक पुरवली होती. हे पाहून त्यांच्या पारिपत्यासाठी रशियाने आपले 1 लक्ष सैनिक अफगाणिस्तानमध्ये उतरवले.
1985 मध्ये इराणनेही अफगाणिस्तानमधील शियांना उचकवले. परिणाम म्हणून झालेल्या संघर्षानंतर १ लक्ष शिया निर्वासितांनी इराणमध्ये अनुमतीने इराणमध्ये आश्रय घेतला. इराणने तालिबान्यांविरुद्ध सरळ सरळ संघर्षाची भूमिका घेतली.
  2001 मध्ये हमीद करझई राजवट अफगाणिस्तानमध्ये सुरू झाली व इराणचे अफगाणिस्तानशी असलेले संबंध इराणच्या तालिबानविरोधी भूमिकेमुळे अधिकच सुधारले. इकडे इराण अण्वस्त्रे तयार करीत आहे अशी खरी/खोटी माहिती अमेरिकेला मिळाली व तिने इराणची आर्थिक कोंडी केली व जागतिक वातावरणही इराणच्या विरोधात खूपच तापवले. पण तालिबानच्या प्रश्नाबाबत मात्र इराण व अमेरिकेच्या हेतूंमध्ये एकवाक्यता होती. पण अफगाणिस्तानमध्ये सुन्नींची संख्या जास्त आहे. त्यामुळे इराण शियांना मदत करीत आहे म्हणून अफगाणिस्तान इराणवर नाराज तसेच अमेरिका इराणची कोंडी करीत असल्यामुळे इराण अमेरिकेवरही नाराज अशी विचित्र स्थिती निर्माण झाली. आंतरराष्ट्रीय संबंध किती क्लिष्ट व प्रत्येकाच्या हितसंबंधांवरच अवलंबून असतात, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
इराण व अफगाणिस्तान - अमेरिकेच्या फौजा अफगाणिस्तानमध्ये १६ वर्षे तळ ठोकून होत्या. या काळात झालेल्या संघर्षात १,५०,००० व्यक्तींना आपल्या प्राणांना मुकावे लागले. शेवटी अमेरिकेने आपल्या फौजा मागे परत अमेरिकेत बोलविण्याचे ठरविले. व्हिएटनाम नंतर दुसऱ्यांदा अमेरिकेचे अफगाणिस्तानमध्ये हात पोळल्याची ही कबुलीच होती. राजकारणात एक सत्ता एखाद्या संघर्षातून आपले अंग काढून घेते तेव्हा निर्माण होणारी पोकळी कुणी ना कुणी भरून काढतोच. याहीवेळी तसेच झाले. सौदी अरेबिया व इराण पुढे सरसावले. पण या दोघात विळ्याभोपळ्याइतके सख्य आहे. 
  या काळात अमेरिकेने जी कारवाई केली त्यामुळे इराणचे दोन शत्रू अनायासाचेच गारद झाले. अमेरिकेने इराकमधील सुन्नी पंथीय सद्दाम हुसेनचा काटा काढला होता. इराकची जनता बहुसंख्येने शियापंथीय व शासनप्रमुख सद्दाम हुसेन हा मात्र सुन्नी पंथीय हा विरोधाभास दूर झाला होता / अमेरिकेने दूर केला होता. दुसरा शत्रू सुन्नीपंथीय तालिबानी गट होता. तोही शियापंथीय इराकचा शत्रूच होता. त्याचेही पारिपत्य करण्याची भूमिका अमेरिकेने स्वीकारली होती. या काळात इराणने मात्र गुपचुप आपले सामर्थ्य वाढविण्याचे काम हाती घेतले होते. तसेच इराणने इराकलाही आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न चालविला होता.
 अफगाणिस्तानला आपल्या देशातून सर्वच परकीय फौजा निघून जाव्यात व आपला देश एक सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयाला यावा, असे वाटत होते. अशी रास्त इच्छा, अपेक्षा व प्रयत्नांची दिशा अफगाणिस्तानची होती. पण अफगाणिस्तानचे लचके तोडण्यासाठी सर्वच जागतिक सत्ता टपून होत्या. या प्रयत्नात अनेक देशांनी आपले पूर्वापार वैर बाजूला सारून मैत्रीही केली. त्याचे एक ढळढळीत उदाहरण म्हणजे शियापंथीय इराण व सुन्नीपंथील तालिबान यांची हातमिळवणी झालेली जगाला दिसली. इराणने या सुन्नीपंथीय तालिबान्यांना, पैसा, शस्त्रे, इंधन तर पुरवलेच, पण तसेच त्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्या रांगड्या तालिबान्यांमध्ये युद्धकौशल्यही निर्माण करून दिले. ही सांगड राजकारणातील विक्षिप्त शैय्यामैत्री म्हणून ओळखली जाईल. ‘पाॅलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज’, हे सु/कु वचन या निमित्ताने प्रत्यलाला आले. या भूमिकेमागची दोन कारणे होती. इराणला अमेरिकेची व नाटोची लुडबूड या प्रदेशात नको होती. दुसरे कारण असे की, अफगाणिस्तानमध्ये स्थिरता निर्माण होऊन एक सुन्नीप्रधान राष्ट्र उभे रहावे असे इराणला नको होते. यासाठी इराणने सुन्नीपंथीय तालिबान्यांनाच हाताशी धरले. काट्याने काटा काढतात, असे म्हणतात ते हेच.
तालिबानी मन्सूर इराणचा पाहुणा - तालिबान्यांचा एक सुन्नीपंथीय प्रमुख नेता मन्सूर याला शियापंथीय इराणणने जवळ केले. त्याची मित्रासारखी  व पाहुण्यासारखी खातिरदारी केली. हे बघून रशियानेही मन्सूरसाठी लाल गालिचा (रेड कार्पेट) आंथरला. रशियातही मन्सूरचे येणे सुरू झाले. अमेरिका ह्या सर्व घडामोडी मुकाट्याने हातावर हात ठेवून बघणार होती, थोडीच. तिने मन्सूरच्या हालचालींवर ड्रोन्सचा घारीसारखा वापर करीत पाळत ठेवली व एके दिवशी त्याला ड्रोनहल्ला करून अचूक टिपले. यावेळी मन्सूर एकटा व निशस्त्र होता, असे म्हणतात. खरे खोटे परमेश्वरच जाणे. पण मन्सूरचा हा अतिविश्वासयुक्त बेफिकीरपणा व अमेरिकेची चतुराई यामुळे मन्सूरला प्राणाचे मोल द्यावे लागले, हे मात्र खरे. 
अफगाणिस्तान म्हणजे तालिबान्यांची टाकसाळ - जगातील नव्वद टक्के अफू अफगाणिस्तानमध्ये होते, असे म्हणतात व मानतात. तालिबानी गट याचा चोरटा व्यापार करून पैसा मिळवत होता. या व्यापारात इराणनेही आपले हात धुवून घेतले व अफूच्या तस्करीतून बक्कळ पैसा मिळवला.
या मन्सूरची पाकिस्तानशी बऱ्यापैकी दोस्ती होती. पण बऱ्या पैकीच.  कारण पाकिस्तानी राजवटीवर सुद्धा सुन्नीपंथीयांचा पूर्णांशाने प्रभाव असला तरी तो पाकिस्तानचे आदेश मात्र मानीत नसे. म्हणून पाकिस्तानची नाराजी होती. याशिवाय मन्सूरची तालिबान व रशियाशी असलेली घनिष्टताही पाकिस्तानला मान्य नव्हती. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे हे हिडिस स्वरुप सर्वसामान्यांच्या मनात शिसारी निर्माण करणारे आहे. राष्ट्राराष्ट्रातील हितसंबंधांचा गुंता समजून घेताना मेंदूलाही मुंग्या आल्याशिवाय राहणार नाहीत.
अफगाणिस्तान व रशिया - रशियाने 1979 मध्ये रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यामुळे मुस्लिम जगतात या आक्रमणामुळे असंतोष निर्माण झाला होता. अफगाणिस्तानच्या आजच्या स्थितीला हे आक्रमण फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत झालेले आहे. मात्र आज रशिया व अफगाणिस्तानचे संबंध बऱ्याप्रकारे सुधारले आहेत. काबूल व मास्कोत परस्परांच्या वकिलाती आहेत. 
अफगाणिस्तान बफर स्टेट असावे - 1837 मध्ये रशिया व ब्रिटन यात संघर्ष सुरू झाला होता. रशिया भारतीय उपखंडात प्रभाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, असा ब्रिटनला संशय होता. 1839-40 मध्ये इंग्रज अफगाण युद्धही झाले होते. त्यावेळचा भारत व रशिया यात एक बफर स्टेट स्वरुपात  अफगाणिस्तान असावे, अशी ब्रिटनची इच्छा होती. दोन सामर्थ्यशाली देशात एखादा छोटासा देश असला महणजे त्या दोघात संघर्ष होत नाही. या लहान देशाला बफर स्टेट असे म्हणतात. 1917 मध्ये रशियात राज्यक्रांती झाली. त्या काळात परागंदा झालेल्या विरोधी विचाराच्या लोकांनी अफगाणिस्तानमध्ये आश्रय घेतला होता. 1950 ते 1990 या काळात रशिया व अमेरिका यात अफगाणिस्तान व अन्य देशांवर प्रभाव स्थापन करण्यासाठी चेल्यांकरवी युद्ध (प्राॅक्सी वाॅर) सुरू होते. प्रत्यक्ष युद्ध न करता असे युद्ध लढले जायचे. यामुळे अणुयुद्धाची भीती न राहता एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न केला जात होता. 
रशियाचा स्वार्थ - रशियाची उद्दिष्टे स्पष्ट होती. एकतर इराणमधील तेल विहिरींवर रशियाचा डोळा होता. यात अफगाणिस्तानची अडचण होती. दुसरे म्हणजे भारतीय उपखंडात रशियाला प्रभाव निर्माण करायचा होता. तिसरे म्हणजे घातक शस्त्रांची चाचणी घेण्यासाठी एखादा विराण प्रदेश हाताशी असण आवश्यक होते. चौथे असे की, कच्चा माल व स्वस्त तयार माल मिळविण्याचा मार्गही अफगाणिस्तानमधून जात होता. 
 या पार्श्वभूमीवरच 1979 मध्ये रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले. जगभर विरोधी प्रतिक्रिया उमटली. रशियाधार्जिणी नजिबुल्लाची राजवट 1993 पर्यंत अफगाणिस्तानमध्ये होती. या दीर्घ काळात अफगाणिस्तानची थोडीफार प्रगती झाली. पण पुढे अमेरिका व इराणच्या मदतीने तालिबानी बंडखोरांनी रशियाला अफगाणिस्तानमधून पुरतेपणी हकलले. त्यांनी रशियातील चेचन बंडखोरांनाही आश्रय दिला होता. ट्विन टाॅवर्सच्या विध्वंसानंतर 2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये शिरकाव करून तालिबान्यांशी संघर्ष करायला प्रारंभ केला. हळूहळू तालिबानी मागे हटले. पण आजही ४० टक्के भूभागावर तालिबान्यांचा वट चालतो, असे म्हणतात. 
2010 मध्ये हमीद करझई अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर होते त्यांनी रशियाला खडसावले व तालिबान्यांना पाठिंबा देऊ नका, अशी गळही घातली. पण तालिबानी बंडखोर अधूनमधून अफगाणिस्तानात स्फोट घडवून आणतच असत. हे आजतागायत तसेच चालू आहे.
अफगाणिस्तान व पाकिस्तान - हे  दोन्ही इस्लामी देश आहेत, सार्क (साऊथ एशियन असोसिएशन फाॅर रीजनल कोआॅपरेशन) चे सदस्य आहेत, दोघेही नाटोचे सदस्य नसूनही अमेरिकेचे खास संबंधातले मित्रदेश आहेत. पण या दोन देशात वादाचे मुद्देही बरेच आहेत. पहिला मुद्दा आहे ड्युरांड लाईन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सीमारेषेचा. ही रेषा ब्रिटिशांनी आखली होती. दुसरा मुद्दा आहे, मुजाहिद्दिनबाबतचा. मुजाहिद्दिन हे गनिमी काव्याने लढणारे अफगाणी जिहादी लोक आहेत. ते सुरवातीला रशियाला बेजार करीत असत, आता अफगाणिस्तानला बेजार करीत आहेत. तिसरा मुद्दा आहे अफगाणी निर्वासितांचा. चौथा मुद्दा आहे, तालिबान्यांचा. यांच्या मार्फत पाकिस्तान आपल्या देशात उत्पात घडवून आणतो, असा अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर आरोप आहे. पाचवा मुद्दा आहे पाणी वाटपाचा आणि सहावा व पाकिस्तानला सर्वात जास्त खटकणारा मुद्दा आहे भारतासोबत वाढत चाललेल्या अफगाणिस्तानच्या जवळिकीचा. नुकताच पाकिस्तान नॅशनल असेम्ब्लीने एकमताने डोनाल्ड ट्रंप यांचा निषेध केला आहे. अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीत भारताचा वाढत्या प्रमाणात सहभाग असावा, अशी अमेरिकेची भूमिका आहे म्हणून ठरावात असा विरोध करण्यात आला आहे. 
अफगाणिस्तान व चीन - पाकिस्तान व अफगाण्स्तान यातील वैमनस्य दूर व्हावे व अतिरेक्यांचा उभयतांना त्रास होऊ नये, यासाठी मनापासून प्रयत्न केले. अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान व अमेरिका यांनी संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करावा, असे सुचविले. भारताला वगळून हा प्रयत्न असावा, अशी चीनची भूमिका होती. वन बेल्ट वन रोड साठी या भागात शांतता असावी, अशी चीनची इच्छा होती. सुरवातीला अमेरिकेला हे मंजूर होते. पण डोनाल्ड ट्रंप यांनी भारताच्या भूमिकेवर भर दिला आहे. चीनचा पाकिस्तानवर प्रभाव आहे. पण अफगाणिस्तानची अमेरिकेशी जवळीक व विश्वास जास्त आहे.
अफगाणिस्तान व भारत - भारताचे अफगाणिस्तानशी पूर्वापार घनिष्ठ संबंध आहेत. अफगाणिस्तानशी निखळ मैत्री, उभयपक्षी उपकारक ठरतील असे व्यापारी संबंध ठेवणारा व कायमपणे ठेवू इच्छिणारा भारत हा एकमेव देश आहे. 
1980 साली रशियाच्या सक्रिय पाठिंब्यावर अफगाणिस्तानात डेमो क्रॅटिक रिपब्लिक आॅफ अफगाणिस्तान स्थापन झाल्यानंतरही  भारताने त्याला याच भूमिकेतून मान्यता दिली होती.
 1990 मध्ये अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध झाले व तालिबानी राजवट आली. या काळात 1995 पर्यंत भारताचे अफगाणिस्तानशी असलेले संबंध अगदीच सुमार होते. तालिबानी राजवट उलथून लावण्याच्या कामीही भारताने साह्य केले आहे. हा एवढा एक कालखंड सोडला तर अफगाणिस्तानच्या बाबतीत मानवतावादी दृष्टीकोनातून मदत व पुनर्निर्माण कार्यात भारताचा कायम सहभाग होता व आहे. शिक्षणसंस्थांसाठी, हाॅस्पिटलसाठी व शासकीय कार्यालयांसाठी इमारती बांधून देणे, रस्ते तयार करणे, तांत्रिक साह्य देणे, सलमा धरण बांधून देणे, संसद सभागृह उभारून देणे व होतकरू विद्यार्थ्यांना हजारोंच्या संख्येत शिक्षण व शिष्यवृत्या देणे, अफगाण नागरिकांना सैनिकी प्रशिक्षण देणे ही कामे भारताने निखळ मैत्रीच्या भूमिकेतून पार पाडली आहेत. म्हणूनच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना भारताने याहीपेक्षा मोठी व महत्त्वाची भूमिका अफगाणिस्तानबाबत स्वीकारावी, असे एकीकडे वाटते, तर दुसरीकडे या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची अफगाणिस्तानमधून फौजा परत घेण्याची भूमिका आता अमेरिकेने बदलली आहे. इराणच्या समुद्किनाऱ्यावर चाबहार बंदर बांधण्याच्या भारताच्या निर्णयाचा अफगाणिस्तानलाही लाभ होणार आहे. एरवी अफगाणिस्तानमध्ये जायचे तर पाकिस्तानच्या भूमीवरून जावे लागते. यावेळी पाकिस्तान सतत काहीना काही अडथळे निर्माण करीत असतो. आता भारतातून समुद्रामार्गे चाबहार बंदरात फक्त सात दिवसात मालाची वाहतुक करता येईल. शांत, सुरक्षित व पुनर्निर्मित अफगाणिस्तान निर्माण करण्याची भारताची भूमिका आहे, हे भारताला जसे भूषणावह आहे, तसेच अशी भूमिका घेणारे देश जगात खूप कमी असावेत, ही एक विदारक वस्तुस्थितीही आहे, हे आपण विसरता कामा नये.

No comments:

Post a Comment