Monday, March 2, 2020

असा निवडला जातो अमेरिकेचा अध्यक्ष


असा निवडला जातो अमेरिकेचा अध्यक्ष
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
 ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    2016 या सम वर्षातील नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवारनंतरच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच 8 नोव्हेंबरला अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक झाली होती. पहिल्या सोमवारनंतरचा पहिला मंगळवार असा शब्दप्रयोग का करायचा? नुसता पहिला मंगळवार असे का म्हटलेले नाही? 2016 सालचेच उदाहरण घेऊया. या वर्षी नोव्हेंबर महिन्यातला पहिला मंगळवार 1 तारखेला आलेला होता. पण हा पहिल्या सोमवारनंतरचा मंगळवार नव्हता. पहिल्या सोमवारनंतरचा पहिला मंगळवार 8 तारखेला आला होता. म्हणून  2016 मध्ये 8 नोव्हेंबरला निवडणूक झाली होती. 2020 साली नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरचा पहिला मंगळवार 3 तारखेला येतो आहे. म्हणून 3 नोव्हेंबरला निवडणूक होईल. ही स्पष्टता येण्यासाठी दर चार वर्षानंतर येणाऱ्या सम वर्षी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरच्या पहिल्या मंगळवारी अध्यक्षपदाची निवडणूक होईल, अशा आशयाचा शब्दप्रयोग अमेरिकन राज्यघटनेत व तदनुषंगिक नियमात केलेला आढळतो.
       पॅाप्युलर व्होट्स व इलेक्टोरल व्होट्स    
  अमेरिकेत 2016 मध्ये ठोकळमानाने 32 कोटी लोकसंख्येपैकी 21 कोटी मतदारातून 55.7% मतदान झाले होते. यावेळी अमेरिकन जनमत (नॅशनल पॅाप्युलर व्होट) हिलरी क्लिंटन यांच्या बाजूचे होते. हिलरी क्लिंटन यांना 48.2 % म्हणजेच 6 कोटी 58 लाख 53 हजार 514 मते मिळाली होती. तर डोनाल्ड ट्रंप यांना 46.1 % म्हणजे 6 कोटी 29 लाख 84 हजार 828 मते मिळाली होती. याचा अर्थ असा की, हिलरींना 28 लाख 68 हजार 686  मते जास्त मिळाली होती. पण निकाल नॅशनल पॅाप्युलर व्होट्सच्या आधारे (जनमत) लागत नाही. तो इलेक्टोरल व्होट्सच्या आधारे लागतो. डोनाल्ड ट्रंप यांना 304 इलेक्टोरल व्होट्स होती तर हिलरी क्लिंटन यांना 227 होती. 50 पैकी 30 राज्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने तर 20 राज्ये हिलरींच्या बाजूने होती. त्यामुळे डोनाल्ड ट्रंप हिलरी क्लिंटन पेक्षा जास्त इलेक्टोरल व्होट्स मिळून विजयी झाले होते. पॅाप्युलर व्होट्स व इलेक्टोरल व्होट्सचे गौडबंगाल समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
    अमेरिकन कॅांग्रेस ची रचना
  अमेरिकन काॅंग्रेसची (संसदेची) हाऊस ॲाफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (जशी आपली लोकसभा) / हाऊस व सिनेट (जशी आपली राज्यसभा) अशी दोन सभागृहे आहेत.
१. हाऊस - अमेरिकेत लहान-मोठी एकूण 50 राज्ये (स्टेट) असून त्यांच्या वाट्याला लोकसंख्येच्या प्रमाणात रिप्रेझेंटेटिव्ह असतात. जसे, लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य कॅलिफोर्निया असून त्याच्या वाट्याला 53 रिप्रेझेंटेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे टेक्सासला 36, न्यूयाॅर्क व फ्लोरिडाला 27, इलिनॅाइस व पेन्सिलव्हॅनियाला 18 अशा प्रकारे लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व म्हणजे 50 राज्यांना रिप्रेझेंटेटिव्ह मिळाले आहेत. राज्य कितीही लहान असले तरी निदान एक तरी रिप्रेझेंटेटिव्ह मिळणारच. जसे अलास्कासारख्या डझनावारी लहान राज्यांच्या वाट्याला एक रिप्रेझेंटेटिव्ह आला आहे. अशाप्रकारे 50 राज्यांचे एकूण 435 रिप्रेझेंटेटिव्ह होतात. यांची निवडणूक दर दोन वर्षांनी होत असते. अध्यक्षाची चार वर्षाची कारकीर्द निम्मी होताच ही निवडणूक सम वर्षी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतरच्या मंगळवारी होत असते.
२. सिनेट - प्रत्येक राज्याला दोन सिनेटर मिळाले आहेत. कॅलिफोर्नियासारख्या भल्या मोठ्या राज्याला व अगदी छोट्या राज्यांनाही प्रत्येकी दोनच सिनेटर मिळाले आहेत. अशा प्रकारे सिनेटवर 50 राज्यांचे एकूण 100 सिनेटर असतात. दर दोन वर्षांनी सिनेटचे ⅓ सदस्य निवृत होऊन नव्याने निवडणूक होत असते.
इलेक्टोरल काॅलेज - अध्यक्षीय मतदारांच्या मतदासंघाला इलेक्टोरल काॅलेज व मतदारांना इलेक्टर्स असे म्हणतात. हा मतदारसंघ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी व तेवढ्यापुरताच दर चार वर्षांनी निर्माण होत असतो. प्रत्येक राज्यातील इलेक्टर्सची संख्या त्या राज्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह व सिनेटर यांच्या संख्येतकी असते. या न्यायाने कॅलिफोर्नियाला 53+2= 55 इलेक्टर्स तर अलास्कासारख्या लहान राज्यांना 1+2=3 इलेक्टर्स मिळतात.  म्हणून एकूण इलेक्टर्स = 435 (रिप्रेझेंटेटिव्ह)+100 (सिनेटर) = 535 होतील. याशिवाय राजधानी वाॅशिंगटनला असलेले अधिकचे 3 इलेक्टर्स मिळून 538 इलेक्टर्स होतात. निवडून येण्यासाठी 270 मते (50 % पेक्षा निदान एक मत जास्त) मिळणे आवश्यक असते. ती ज्याला मिळतील तो विजयी घोषित होतो. मग दुसऱ्या उमेदवाराची पॅाप्युलर व्होट्स कितीका जास्त असेनात. हिलरी क्लिंटन यांची पॅाप्युलर व्होट्स तर जवळजवळ 30 लाखांनी जास्त होती. त्यांनी पॅाप्युलर व्होट्समध्ये आघाडी घेतली पण इलेक्टोरल व्होट्स कमी मिळाली व म्हणून ज्याला इलेक्टोरल व्होट्स जास्त तो निवडून आला
            ज्याला पॅाप्युलर व्होट्स जास्त त्याची पूर्ण स्लेट विजयी
  प्रत्येक राज्यात दोन्ही पक्ष आपल्या इलेक्टर्सची यादी/पाटी (स्लेट) तयार करून जाहीर करतात. जसे 2016 मध्ये कॅलिफोर्नियात डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांनी आपापल्या 55 व्यक्तींची स्लेट तयार केली होती. एकाच व्यक्तीचे नाव रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तसेच स्लेटवरच्या यादीतही असू शकते. डेमोक्रॅट पक्षाला 61% तर रिपब्लिकन पक्षाला 33 % पॅाप्युलर व्होट्स मिळाली. त्यामुळे डेमोक्रॅट पक्षाच्या स्लेटवरच्या सर्वच्या सर्व 55 व्यक्ती इलेक्टर्स म्हणून निवडून आल्या. आता दुसरे उदाहरण पाहू. मिशिगन राज्यात रिपब्लिकन पक्षाची बढत फक्त 0.3% होती तरीही रिपब्लिकन पक्षाच्या स्लेटवरच्या सर्वच्या सर्व 16 व्यक्ती इलेक्टर्स म्हणून निवडून आल्या होत्या.   2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांना 304 इलेक्टोरल व्होट्स होती तर हिलरी क्लिंटन यांना 227 होती. डोनाल्ड ट्रंप यांनी जिंकलेली राज्ये 30 व मते 304 होती. तर हिलरी क्लिंटन यांनी जिंकलेल्या 20 राज्यातील इलेक्टोरल व्होट्सची संख्या 227 होती.
   अटीतटीच्या लढती
    कोलोराडो राज्याच्या वाट्याला 9 जागा असून  47% पॅाप्युलर व्होट्स डेमोक्रॅट पक्षाला तर 45% पॅाप्युलर व्होट्स रिपब्लिकन  पक्षाला मिळाली होती. म्हणजे डेमोक्रॅट पक्षाला 2% चीच आघाडी होती. तरीही डेमोक्रॅट पक्षाच्या स्लेटवरचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. तर फ्लोरिडामध्ये  रिपब्लिकन पक्षाला 1% ची आघाडी होती. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या  स्लेटवरचे सर्वच्या सर्व म्हणजे 29 उमेदवार निवडून आले.  मिशिगनमध्ये रिपब्लिकन पक्षाला 0.3% आघाडी, मिनेसोटामध्ये डेमोक्रॅट पक्षाला 1.4% ची  आघाडी, नॅार्थ हॅंपशायरमध्ये डेमोक्रॅट पक्षला 0.2% ची आघाडी, पेन्सिलव्हॅनियामध्ये 1.1% ची रिपब्लिकन पक्षाला आघाडी, व्हिस्कॅान्सिनमध्ये 1% ची रिपब्लिकन पक्षाला आघाडी , अशाप्रकारे अटीतटीची झुंज झाली होती.
स्विंग स्टेट्स
    डेमोक्रॅट पक्षाने कोलोरॅाडो, मिनेसोटा, नेवाडा, नाॅर्थ हॅंपशायर, यातील एकूण 29 जागा निसटत्या मताधिक्याने जिंकून कायम राखल्या होत्या. तर फ्लोरिडा , मिशिगन, पेन्सिलव्हॅनिया, व्हिस्कॅान्सिन, अशा एकूण 75 जागा रिपब्लिकन पक्षाने निसटत्या मताधिक्याने का होईना पण डेमोक्रॅट पक्षाकडून हिसकून घेतल्या होत्या. अशा रीतीने एकूण 104 जागा निसटत्या बहुमताच्या आहेत. निसटता विजय ही बेभरवशाचीच बाब आहे, हा विजय कोणत्याही पक्षाच्या पदरात पडू शकला असता. पण आलटून पालटून इकडून तिकडे जाणाऱ्या या राज्यांच्या निकालावरच  निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो. अशा राज्यांना स्विंग स्टेट्स असे नाव आहे. शेवटी 304 - 227 = 77 जागांचे बहुमत रिपब्लिकन पक्षाला होते. यावरून लढत कशी व किती चुरशीची झाली होती ते लक्षात येईल. पण शेवटी विजय तो विजयच! नाही का?

No comments:

Post a Comment