Monday, March 23, 2020

अमेरिकन डॅाक्टरांचे नागरिकांना अनावृत पत्र

अमेरिकन डॅाक्टरांचे नागरिकांना अनावृत पत्र
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 
मोबाईल 9422804430  
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
   अमेरिकेत कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होत असून मृत्युदरही काळजी वाटावी असा आहे. असे असले तरी जनतेत अनेक चुकीच्या समजुतींनी घर केले असून समाज माध्यमांद्वारे प्रसारित होत असलेली माहिती चिंता वाटावी अशी आहे. अमेरिकेतील बोस्टनस्थित आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या 40/50 जगविख्यात डॅाक्टरांनी जनजागृती करण्याच्या हेतूने अमेरिकन नागरिकांना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या अनावृत पत्राचा हा काहीसा स्वैर पण तरीही नेमका व संपादित भाग आपल्यालाही बोधप्रद ठरेल असे वाटते. अमेरिका ही आज एक जागतिक महासत्ता आहे. तिथल्या विख्यात वैद्यकीय विशारदांनी स्पष्ट शब्दात दिलेला हा इशारा अमेरिकन जनतेत जागृती व्हावी या हेतूने दिलेला असून आपणही नोंद घ्यावी असा आहे. तसेच याबाबत आपण घेत असलेली खबरदारी अभिमान व समाधान वाटावी, अशीच आहे. 
    परिस्थिती चिंता वाटावी, अशी आहे. 
   कोरोना व्हायरसबाबत नागरिकांमध्ये असलेले संभ्रम, चुकाची माहिती आणि सोशल मीडियातील या रोगाला क्षुल्लक मानण्याची वृत्ती आमच्या अनुभवाला आल्यामुळे सोप्या आणि स्पष्ट शब्दात या रोगाचे गांभीर्य जाणवून देण्यास आम्ही उद्युक्त झालो आहोत. कोरोना हा सर्दीला कारण असलेल्या व्हायरस सारखाच आहे, असे वृत्त ‘ॲानलाईन’वर आलेले आम्ही बघितले आहे. तसेच कोरोनाची बाधा झाल्यास जोरदार सर्दी झाल्याप्रमाणे त्रास होईल इतकेच, अशा आशयाचा मजकूर आमच्या पाहण्यात आला आहे. याचे स्वरूप यापेक्षा गंभीर असणार नाही. जिवाचे बरेवाईट होण्याचा तर प्रश्नच नाही, असा आशय आमच्या वाचण्यात आला आहे. हे खरे आहे की खोटे, ही बाब तुम्ही कोण आहात (लहान मूल/सुदृढ/अशक्त/तरूण किंवा प्रौढ), यावर अवलंबून आहे. पण आपण सर्व समाजाचा साकल्याने विचार केला पाहिजे, नाही का?
   निसर्गनिर्मित व नवीन 
   कोरोनाव्हायरस मानवांसाठी पूर्णपणे नवीन आहे. हा सर्दीला कारणीभूत असलेल्या व्हायरसच्याच जातकुळीचा असला तरी आणि याची लक्षणे अनेक प्रकारे सर्दीसारखीच भासत असली तरी या व्हायरसची मानवाशी पहिल्यांदाच गाठभेट होत असल्यामुळे आपल्यापैकी कुणातही याचा सामना करण्याची क्षमता या पूर्वीच निर्माण झालेली  नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
  संसर्गक्षमता दसपट
    या व्हायरसची लागण अख्या मानवजातीत वेगाने होत असून, श्वसनमार्गातून बाहेर पडणाऱ्या स्रावांतून हा एकापासून दुसऱ्याकडे/दुसऱ्यांकडे संक्रमित होत असतो. याची संसर्गक्षमता सर्दीच्या तुलनेत दसपट आहे, हे लक्षात घ्या. लागण झालेले बहुतेक (80 %) बरे होतील. 20 % लोकांना गंभीर स्वरुपाचा न्युमोनिया होईल व त्यांना दवाखान्यात दाखल व्हावे लागेल. 2 /3  टक्यांसाठीच हा घातक ठरेल. पण आमचे हे भाकीत इटालीत खोटे ठरले आहे. याचे एक कारण असे आहे की, त्या देशाची आरोग्यजपणूक यंत्रणा तोकडी पडली. तिथे 70 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांच्या बाबतीत घातक ठरण्याचे प्रमाण 8 ते 20 % आहे. एखाद्या लहान मुलाला बाहेर खेळताखेळता या व्हायरसची बाधा झाली तर घरातल्या वडिलधाऱ्यांना त्याचा संसर्ग दाराच्या कडीला किंवा टेबलाला  स्पर्श झाल्यास लगेच होऊ शकतो.
   साथीच्या रोगांची संपर्क गती 
   साथीचे रोग पसरण्याची गती मोजण्याची शास्त्रज्ञांची एक खास पद्धत आहे. हा एक अंक असून, आर झिरो किंवा आर नॅाट (नॅाट म्हणजेही शून्यच) असे त्याचे नाव आहे. हा अंक काढण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. ती अशी. आजारी व्यक्ती बरे होण्यापूर्वी किंवा दगावण्यापूर्वी किती लोकांमध्ये रोगसंक्रमण करते यावरून हा अंक ठरतो. कोरोना व्हायरसचा आर झिरो किंवा आर नॅाट 3 असतो, असे आढळून आले आहे. म्हणजे असे की, कोरोनाचा रोगी बरा होण्यापूर्वी किंवा दगावण्यापूर्वी सरासरीने 3 लोकांत रोगसंक्रमण करतो. ही गती किती प्रचंड आहे, हे पुढील गणनावरून लक्षात येईल.
    जॅामेट्रिकल प्रोग्रेशनने प्रसार 
   एका कोरोनाबाधिताने 3 लोकांना पहिल्या फेरीत बाधित केले, तर दुसऱ्या फेरीत हे तिघे प्रत्येकी आणखी तिघांना म्हणजे एकूण 9 लोकांना बाधित करतील. तिसऱ्या फेरीत ही संख्या पुन्हा तिपटीने वाढून 27 होईल. अशाप्रकारे 15 व्या फेरीत बाधितांची संख्या 1,43,48,907 (1 कोटी, 43 लक्ष, 48 हजार, 907) होईल. या 15 फेऱ्या काही आठवड्यातच पूर्ण होतील. संख्यावाढीच्या या प्रकाराला भूमितीय श्रेढी (श्रेणी नव्हे) - जॅामेट्रिकल प्रोग्रेशन- असे नावआहे.
    शाळा/महाविद्यालये, खेळाची मैदाने अशा गर्दीच्या जागी तर एका नरड्यातून संक्रमित होणाऱ्या बाधितांसाठी याहीपेक्षा कमी वेळ पुरेल. पहिली व्यक्ती तरूण आणि धडधाकट असेल तर ती बरी होईल पण नंतरच्या लाखो लोकांचे काय? त्यात कितीतरी वयोवृद्ध, अशक्त व लहान मुले असतील. त्यांचे काय?
   आर झिरो = 3 हा अंक नक्की किंवा कायम नाही. केवळ संरक्षक व प्रतिबंधात्मक उपायांनीच तो कमी करता येतो. कारण यावर औषध किंवा लस उपलब्ध नाही. हा अंक  जेव्हा 1 पेक्षा कमी होईल, तेव्हाच या रोगाची साथ मावळेल. म्हणून बाधितांना वेगळे ठेवणे (क्वारंटाईन) व सामाजिक विलगीकरण (सोशल डिस्टंटिंग) महत्वाचे आहे. या कामाची गती आज  समाधानकारक नाही. ती वाढविलीच पाहिजे.
    एकमेव उपाय  
   व्हायरसची पसरण्याची गती कमी करणे हा एकमेव उपाय आज अमेरिकेत आपल्या हाती आहे. आपल्या देशात हॅास्पिटलांची संख्या कितीही असली तरी ती अपुरीच पडणार. व्हेंटिलेटर्सची संख्याही भरपूर आहे पण तीही अपुरीच पडणार. आमच्या इटालियन मित्रांनी आपले अनुभव आम्हाला सांगितले/कळविले आहेत. त्यांना व्हेंटिलेटर्स, तज्ञ डॅाक्टर, नर्सेस, आयसीयु बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळे कुणाला वाचवायचे आणि कुणाला नाही, असा प्रश्न त्यांना पडतो आहे. काहींना तर साधे उपचार देणेही शक्य होत नाही. आजमितीला आपण अमेरिकन, इटालियन लोकांच्या तुलनेत फक्त 11 दिवस मागे आहोत. त्यांच्या व आपल्या वैद्यकीय सोयीसुविधा जवळपास सारख्याच आहेत. पेशंट्सचा भला मोठा लोंढा लवकरच आमच्यासमोर येऊन ठाकणार आहे. असे झाल्यास काय करणार? मात्र आपल्या लहानमोठ्या सामाजिक नेत्यांच्या हाती एक प्रभावी मार्ग उपलब्ध आहे. ते आम्हा डॅाक्टरांना आक्रमक होऊन मदत करू शकतात. वेगळे ठेवणे - क्वारंटाईन / आयसोलेशन आणि सामाजिक विलगीकरण - सोशल डिस्टंटिंग यासाठी समाजघटकांना प्रवृत्त करणे हे त्यांना सहज शक्य आहे. यातून कोरोनाव्हायरसचा चढता आलेख ते सहज सपाट करू शकतील आणि या रोगाचा विळखा सैल होईल व तो मावळेल.
   आमची या सामाजिक नेतृत्वाला कळकळीची विनवणी (इंप्लोअर) आहे की, आमच्या मदतीला उभे रहा. ईमेल पाठवून सर्व शिक्षणसंस्थांना तातडीने सुटी देण्यास सांगा. लहान मुलांना तर एकलकोंडेपणा तापासारखा छळतो. दोस्तांना भेटू द्या म्हणून ते हट्ट करतील, वाढदिवसांच्या पार्ट्यांची व सामाजिक समारंभांची ते आतुरतेने वाट पाहत असतील. या मुलांना आवरण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. आठवड्यावर आठवडे एकट्याने काढतांना ते बोअर होतील. पण आपल्या हाती आजतरी प्रतिबंधात्मक उपायच आहेत, हे लक्षात घ्या. (कोरोनाव्हायरसवर औषध उपलब्ध नाही)
कोणते आहेत, हे उपाय?
  1. सर्व खेळ बंद. ( दोघातला म्हणजे जोडीदाराबरोबरचा सुद्धा)
  2. एकत्र येणे बंद.
  3. पार्कातल्या खेळण्यांवरचे खेळ, जिम, हॅाटेलिंग, चित्रपटगृहात चित्रपट पाहणे, बंद. सभागृहातल्या कोणत्याही कार्यक्रमांना  सरळ सुट्टी.
  4. सर्व दौरे रद्द करा, अगदी आवश्यकच असेल तरच प्रवास करा. ही निवासस्थाने स्वच्छ आहेत, अशा जाहिराती येत आहेत, ती तशी असतीलही पण तेवढे पुरेसे नाही.
  5. घरीच थांबा, घरून काम करा, किराणा व औषधे आणण्यासाठी बाहेर पडावेच लागले तर तातडीने कामे उरकून तडक घरी परत या.
  6. हात साबणाने धुवा. बोटांच्या बेचकांमध्येही साबण लावून 20 सेकंदभर हात धूत रहा.
  7. परिस्थिती इतकी काही गंभीर नाही, उगाच बाऊ करू नका, असे समाज माध्यमात येत असेल तर तिकडे पूर्ण दुर्लक्ष करा. हा आणीबाणीचा काळ आहे म्हणून कोणतीही अफवा पसरवू नका किंवा तिला बळी पडू नका, कारण त्यामुळे तुमचे व तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मित्रांचे कायमचे नुकसान होऊ शकेल.
   या व अशा दक्षता घ्या आणि पुढचे काही आठवडे प्रयत्नपूर्वक सुरक्षित आणि निरोगी रहा.

No comments:

Post a Comment