Tuesday, April 15, 2014

Benjamin Franklin 15.04.2014


आधुनिक अमेरिकेचा पाया रचणारा बेन्जामिन फ्रँकलीन
(१७ जानेवारी १७०६ -१७ एप्रिल १७९०)
            वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
अमेरिकेचा खरा इतिहास हा तसा २५० वर्षांचाच म्हटला पाहिजे. इंग्लंड, फ्रान्स,जर्मनी, स्पेन, इटली या सारख्या देशातून छळाला, दारिद्र्याला कंटाळून नशीब आजमावण्यासाठी किंवा अनेकदा परागंदा झालेले लोक अमेरिकेत आले आणि स्थायिक झाले.या खंडप्राय देशाचा आकार भारताच्या चौपट आणि लीक्संख्या मात्र एक चतुर्थांश एवढीच आहे. सागराची बरोबरी करू पाहणारी जगातली पाच मोठी सरोवरे म्हणजे सुपीरियर (३१,७०० चौरस मैल क्षेत्रफळ), मिशिगन(२२,३०० चौ मैल), ह्युरॉन( २३,००० चौ मैल), इरी(९,९०० चौ मैल) आणि आँटोरियो (७,३४० चौ मैल) अमेरिकेच्या वाट्याला आली असून जगातला शुध्द पाण्याचा एक चतुर्थांश साठा या सरोवरात आहे, असे म्हणतात. अमेरिकन लोकांना सर्व गोष्टींची तपशीलवार नोंद करून ठेवण्याची सवय आहे. १६०० साल पासूनचा इतिहास विल्य्म्सबर्ग येथे जपून ठेवला आहे.एका जर्मन मुख्याध्यापिकेने आपले पूर्वज कोणत्या वर्षी, कोणत्या तारखेला, कोणत्या बोटीने, कोणत्या समुद्रकिनारी येऊन पोचले होते, याची तपशीलवार माहिती सांगितली होती.
अमेरिकेचे हवामान अत्यंत लहरी आणि बेभरवशाचे आणि उष्णतामानात टोकाचे बदल होणारे आहे. पावसाचे थैमान, कडाक्याची थंडी, हिम वादळे, अनेक फुटी बर्फाचे थर, घनदाट जंगले, खोल दऱ्या, रणरणते उन असलेली वाळवंटे असे निसर्गनिर्मित संभाव्य सर्व प्रकार अमेरिकेत सापडतात. या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर अमेरिकेने मात केली आहे. ती तक्रार करीत बसली नाही. या कामी कुणा एका व्यक्तीचे विशेष योगदान असेल तर ते बेन्जामिन फ्रँक्लीन या महापुरुषाचे!
अमेरिकेची वैशिष्ट्ये
देशाचा विस्तार खूप मोठा आहे का? मग मखमली, गुळगुळीत, मैलोगणती वळणे नसलेले सहा ते आठ पदरी रस्ते बांधले. तरीही वेळ लागतो आहे का? तशी ७० मैल किमान वेगाने वाहन चालविण्याचे बंधन घातले. हवामान लहरी आहे का? घरे, गाड्याच नव्हेत तर, अख्ख्या शाळा, इमारती  वातानुकुलीत केल्या. दूर अंतरामुळे संपर्क साधने कठीण होते आहे का? उत्तम दूरध्वनी व्यवस्थापन निर्माण केले. ‘ यू आर ओन्ली अ फोन कॉल अवे’ हा तिथला परवलीचा शब्दप्रयोग झाला आहे. अमेरिकेतील दिवस उन्हाळ्यात सकाळी ५ ते रात्री ९ असतो तर थंडीत सकाळी ८ ते दुपारी ४ असा आहे ना? मग थंडीत ऑक्टोबरमध्ये शेवटच्या शनिवारी घड्याळे एक तास मागे करा तर एप्रिलच्या पहिल्या शनिवारी पूर्ववत करा. अशाप्रकारे उजेडाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या.
प्रगतीमागचे रहस्य
केवळ अडीचशे वर्षात अमेरिकेने ही प्रगती कशी काय साध्य केली? ह्याची उत्तर  दोनच आहेत. अपार कष्ट आणि सतत नवनवीन शोध! अमेरिका म्हटली की लोकांना आठवते ती चैन, गुन्हेगारी, जुगार, घटस्फोट, सैल स्त्रीपुरुष संबंध आठवतात पण अमेरिकन लोकजीवनाचा  हा अर्धाच भाग आहे. तोच सर्वपरिचीत आहे. पण उरलेला अर्धा भाग महत्वाचा आणि अनुकरणीय आहे. जीवन सुखकर व्हावे यासाठी अमेरिकेने ध्यास घेतला असून नित्य नवे शोध लावावेत, नवनवीन कल्पना पुढे याव्यात, यासाठी अमेरिकेत प्रोत्साहन दिले जाते. कम्पन्या शोध विकत घेतात, लगेच त्यावर आधारलेले उत्पादन बाजारात  आणतात. संशोधक आणि कंपन्या या दोघांचे ही भाग्य फळफळते शिवाय,जनतेचीही सोय होते ते वेगळेच.
फ्रँकलीनची पत्रकारिता
प्रारंभी फ्रँकलीनने उमेदवारी केली.भावाच्या वृत्तपत्रात (न्यू इंग्लंड करंट)मध्ये तो सायलेन्स डॉगुड असे एका विधवेचे टोपणनाव घेऊन तो महिलांच्या बाबतीतल्या अन्यायकारक वागणुकीबाबत पत्रे पाठवीत असे. ही पत्रे खूप गाजली. १६व्या पत्रानंतर तो प्रकट झाला. भावाला त्याचा हेवा वाटे. पुढे त्याने छापखाना विकत घेऊन तो मुद्रक बरोबर संपादकही झाला. तो टोपणनावाने व्यंगचित्र काढत असे. राजकीय व्यंगचित्रकारितेचा तो  जनक मानला जातो. तो नंतर त्याने कॅलेंडरही प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. यात हवामान, पाककृती, भविष्य आणि चिंतनपर लिखाण असे. जणू आपले ‘कालनिर्णय’ यावरूनच बेतले असावे असे वाटते. अमेरिकेतील पहिले पोस्ट ऑफिसही त्याने फिलाडेल्फिया येथे सुरु केले.
असाही  होता फ्रँकलीन
या सर्व नवीन आणि सुधारित तत्त्वप्रणालीचा उद्गाता, पुरस्कर्ता आणि प्रतिपादक म्हणून बेन्जामिन फ्रँकलीन  ओळखला जातो. एडिसन आणि टेलिफोनचा जनक अलेक्झांडर बेल त्याला गुरुस्थानी मानीत. बेन्जामिन फ्रँकलीन हा शास्त्रज्ञ, संशोधक, राजकारणी, तत्त्वज्ञानी, उद्योजक, संगीतज्ञ होता. आपल्याला सगळ्यांना त्याची एक कथा प्रमुखपणे  माहित आहे. पतंगीच्या दोऱ्याला त्याने लोखंडाची किल्ली बांधून आकाशात पाठविली आणि ढगातील वीज जमिनीवर आणली, अशी काहीशी ती कथा आहे. पण बॅटरी, कंडक्टर, धन व ऋण विद्युत हे त्यानेच बारसे केलेले शब्द आहेत. वीजवाहक (लाईटनिंग कंडक्टर) चा शोध त्यानेच लावला. आकाशातून विजेचा लोळ कोसळून इमारतीचे नुकसान होऊ नये म्हणून वीजवाहकाच्या तारेचे एक टोक इमारतीच्या वर ठेवायचे आणि दुसरे टोक खाली जमिनीत प्रायचे अशी ही व्यवस्था असते. यामुळे ढगातील वीज हळूहळू निष्क्रिय होते किंवा वीज पडलीच तर ती या तारेतून इमारतीला नुकसान न करता निघून जाते. घोड्यावर आरूढ होऊन त्याने वादळाचा पाठलाग करून त्याचा वेग मोजण्याचे तंत्र विकसित केले. अमेरिकेतील हवामान खात्याचा तो जनक मानला जातो. इंग्लंड बरोबर बोलणी करण्यासाठी तो अनेकदा बोटीने इंग्लंडला जाऊन आला. पण जाता जाता त्याने गल्फ स्ट्रीमचे मापन करून आखणीही केली. अटलांटिक महासागरातील उष्ण पाण्याचा हा वेगवान जबरदस्त प्रवाह फ्लोरीडापाशी उगम पावतो, अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला उब देऊन पुढे द्विभाजित होतो व त्याची एक शाखा उत्तर युरोपकडे तर दुसरी शाखा पश्चिम आफ्रिकेच्या दिशेने जाते. आपली दृष्टी अधू झाली, दूरचे पाहण्यासाठी एक चष्मा तर जवळचे पाहण्यासाठी दुसरा चष्मा अशी अवस्था टाळण्यासाठी त्याने बायफोकल रचना शोधून योजली. त्याची बायको झुलत्या खुर्चीवर बसून विणकाम करीत असे. याने खुर्चीला दोरी बांधून ती रवी भोवती गुंडाळली. आता झुलणे, विणकाम आणि ताक घुसळणे एकाचवेळी होऊ लागले. या तीन कामांना लागणारा वेळ तिपटीने कमी झाला.
स्थापन केलेल्या संस्था
आगीचा विमा काढण्याची कल्पना त्याचीच. फिलाडेल्फियामधील अग्निशामक दल त्यानेच उभारले. रात्री गस्त घालण्याची प्रथा सुरु करून नागरिकांना सुखाची झोप घेता येईल, अशी तजवीज केली. त्या काळी पुस्तके महाग होती. त्यांचा तुटवडा असे. यावर उपाय म्हणून त्याने फिरते वाचनालय सुरु केले. युपेनची (युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया) स्थापना त्यानेच केली या युनिव्हर्सिटीची गणना आजही जगातल्या पहिल्या दहा उत्तम विद्यापीठात होते. पेन्सिल्वेनिया हॉस्पिटल त्याने स्थापन केले फिलॉसॉफिकल सोसायटीसुद्धा त्यानेच स्थापन केली. १८ व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास स्थापन झालेल्या या संस्था आजही उत्तमपणे कार्यरत आहेत. घर ऊबदार रहावे म्हणून त्याने फ्रँकलीन स्टोव्हची रचना केली पण या शोधाचे पेटंट घेतले नाही.
इंग्लंड आणि अमेरिका
१७५७ ते १७७५ या काळात त्याने वसाहतींच्या हक्कासाठी इंग्लंडशी लढे दिले. या काळात एक गव्हर्नर वरकरणी वसाहतीवाल्यांची बाजू घेई पण आतून इंग्लंडला गुप्त खलिते पाठवी फ्रँकलीनने हे गुप्त खलिते फोडले. या ‘स्टिंग ऑपरेशन’साठी त्या व्हाईट हॉल (इंग्लंडचे शासकीय कार्यालय ) येथे बोलवून त्याला जाहीर तंबी देण्यात आली. त्याचा मुलगा विल्यम हा ब्रिटिशधार्जिणा होता. पितापुत्रात अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नावरून झालेले मतभेद शेवटपर्यंत कायम राहिले. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा जेफरसनने तयार केला पण या कामी फ्रँकलीनचेही महत्त्वाचे योदन होते. १७७६ मध्ये फ्रँकलीनने या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. फ्रान्समध्ये तो अमेरिकेचा वकील म्हणून गेला आणि त्याने फ्रेन्चांची मने जिंकली. १७८३ मध्ये त्याने केला करार ‘पॅरिस करार’ म्हणून प्रसिद्ध आहे. १७ एप्रिल १७९० मध्ये त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या अंत्ययात्रेला २० हजार लोक उपस्थित होते.
         फ्रँकलीनची बोधवचने
फ्रँकलीनची डझनावारी बोधवाक्य आहेत. आपण फ्रँकलीनचे शब्दप्रयोग वापरीत आहोत, हे अनेकदा काळतही नाही. उदाहरणार्थ:-
१.‘अर्ली टू बेड  अँड अर्ली टू राईज, मेक्स अ मॅन हेल्दी,    वेल्दी  अँड वाईज’
२. ‘ गॉड हेल्प्स दोज, हू हेल्प देम्सेल्व्ज’  
३. ‘डोअर्स ऑफ विस्डम आर नेव्हर शट’
४. ‘लिव्ह दि प्लॅनेट बेटर, दॅन यू फाऊनड इट’


No comments:

Post a Comment