Thursday, August 18, 2016

सरदार पटेलांचे 'ते' पत्र आज किती प्रासंगिक ?
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
                                                                                      Blog - kasa mee?

       दिनांक ७ नोव्हेंबर १९५० रोजी त्यावेळचे भारताचे गृहमंत्री असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे त्यावेळचे पंतप्रधान असलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांना पाठविलेले पत्र आजही प्रासंगिक व प्रस्तुत वाटण्याला एक तात्कालिक पण महत्त्वाचे निमित्तही मिळाले आहे. नागा मंडळींशी करार झाला आहे. १९५० साली सरदार पटेलांनी ह्या प्रश्नाकडे पं नेहरूंचे लक्ष वेधले होते. हा प्रश्न इतके दिवस प्रलंबित रहावा ही बाब जशी गंभीर आहे तसाच तो सोडविण्याच्या दृष्टीने मोदींनी टाकलेले हे पाऊलही पुष्कळ काही सांगून जाते आहे.
या दृष्टीने सरदार पटेलांनी पाठविलेल्या 'त्या' पत्राची उजळणी करता आली तर ते खूप उपयोगाचे ठरणार आहे.
या पत्रात सरदारांनी दहा महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, तसेच त्या अगोदर या पत्रात प्रस्तावना स्वरुपात केलेले प्रबोधनही आजही प्रासंगिक वाटावे असे आहे. त्यामुळे त्या पत्राचा निदान आशय जाणून घेणेही प्रसंगोचित ठरणारे आहे.
        माझ्या मनात तिबेटचा प्रश्न बरेच दिवसापासून घोळतो आहे, असे म्हणत सरदारांनी खय्रा अर्थाने पत्र लेखनाला प्रारंभ केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (स्वत: नेहरूंकडेच कार्यभार होता)   व आपले त्यावेळचे चीनमधील राजदूत श्री के एम पणिक्कर यांच्यातील पत्रव्यवहार बघून वाटणारे असमाधान त्यांनी स्पष्ट शब्दात मांडले आहे व राजदूतांवर ठपका ठेवला आहे. यातून चीनच्या कम्युनिस्ट- साम्यवादी - शासनाचे खरे रूप सरदारांना जाणवले होते व त्याची त्यांनी पूर्ण विचारांती गंभीर दखल घेतली असल्याचे जाणवते. शांततेच्या पुरस्काराचा मंत्र जपत चीन आपली दिशाभूल करीत आहे, आपल्याला अंधारात ठेवतो आहे. आजच्या महत्त्वाच्या (क्रुशियल) प्रसंगी त्यांनी आपल्या राजदूताच्या मनात खोटा आत्मविश्वास निर्माण करण्यात यश मिळवले असून तिबेटचा प्रश्न आपण शांततामय मार्गाने सोडविणार आहोत, अशी त्यांची समजूत करून दिली आहे, असा भ्रम त्यांच्या मनात निर्माण केला आहे. या पत्रव्यहारात जो काळ गेला आहे, त्या काळात चीन तिबेटवर आक्रमण करणार, हे स्पष्ट दिसते आहे. चीनचे हे वागणे दगाबाजी पेक्षा सौम्य शब्दात मांडता येणार नाही, असे सरदार पटेलांना म्हणायचे आहे. दु:खाची बाब ही आहे की, या प्रश्नाचे निमित्ताने तिबेट आपल्यावर पूर्णपणे विसंबून आहे. तिबेटने आपले मार्गदर्शन स्वीकारले आहे. आपण मात्र चीनच्या कुटिल कारवायांपासून तिबेटला वाचवण्यात अपयशी ठरतो आहोत. ताज्या घडामोडी बघितल्या तर आपण दलाई लामांची सुटका ( रेसक्यू) करू शकू, असे दिसत नाही. चीनची धोरणे आणि कारवाया यांच्या स्पष्टीकरणार्थ व समर्थनार्थ आपल्या राजदूतांनी आपली लेखणी खूप झिजवली आहे. चीन समोर आपला पक्ष मांडतांना आपल्या राजदूतांनी कणखरपणा स्वीकारला नाही आणि विनाकारणच लवचिक व बचावात्मक पवित्रा घेतल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अहवालावरून दिसते आहे. चीनला तिबेटमध्ये इंग्रज व अमेरिका या दुक्कलीच्या कारस्थानाची शंका वाटते आहे, यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. यावर विश्वास ठेवणे म्हणजे चीन आपल्याला या दोन राष्ट्रांच्या हातचे बाहुले समजतो आहे, असा होतो. तुम्ही स्वत:( नेहरु) चीनशी संबंध ठेवून आहात आणि तरी सुद्धा चीनला असे खरोखरच वाटत असेल तर याचा सरळ अर्थ असा होतो की, आपण जरी स्वत:ला चीनचे मित्र समजत असलो तरी चीन आपल्याला मित्र मानत नाही. जो आपल्या सोबत नाही, तो आपल्या विरोधात आहे, असे मानण्याची कम्युनिस्टांची मानसिकताच आहे, याची आपण नोंद घेतली पाहिजे, असे सरदार पटेलांनी बजावले होते, हे स्पष्ट होते.
       गेल्या काही महिन्यात आपण काय पाहतो आहोत? रशिया आणि त्याच्या गोटातील राष्ट्रे वगळली तर आपण एकटेच चीनच्या संयुक्त राष्ट्रातील सदस्यतेचा मुद्दा रेटतो आहोत. फाॅर्मोसाच्या बाबतीत अमेरिकेने हमी द्यावी, असे म्हणतो आहोत. चीनची बाजू आपण अमेरिकेपुढे मांडतो आहोत, चीनच्या शंका मांडतो आहोत, चीनचा या बेटावरचा अधिकार कसा न्यायोचित आहे, याला समर्थन देतो आहोत. पण तरीही चीनला आपला संशय वाटतोच आहे, याकडे सरदार पटेलांनी नेहरुंचे लक्ष वेधले आहे. आपला सद्हेतू, मित्रता आणि सदिच्छा  यांची खात्री पटवून देण्याचे बाबतीत आपण काही बाकी ठेवले आहे, असे मला वाटत नाही. चीनमधील आपला राजदूत ही एक सक्षम व्यक्ती असून सुद्धा त्याच्या प्रयत्नानंतरही चीनचे आपल्याबद्दलचे मत काही बदलताना दिसत नाही. चीनने आपल्या फौजा तिबेटमध्ये घुसवण्याच्या मुद्यावर आपण आक्षेप नोंदवताच आपण परकीयांच्या ( इंग्लंड, अमेरिकेच्या ) दबावानुसार आपली भूमिका ठरवत असल्याचा ठपका ठेवला आहे. ही एका मित्राने दुसय्रा मित्राचे बाबतीत वापरायची भाषा नाही तर भावी शत्रूचे बाबतीत वापरायची भाषा आहे, हे नेहरुंच्या नजरेस आणण्याचा सरदार पटेलांचा हेतू स्पष्ट लक्षात येतो.
   तिबेटचे अस्तित्व नकाशावरून पुसले जाणे याचा अर्थ चीनच्या सीमा आपल्या देशाला भिडणे असा होतो. आजवर आपल्याला उत्तर-पूर्व (इशान्य) सीमेबाबत कधीही काळजी करावी लागली नव्हती. हिमालय आपले संरक्षण करीत होता. तिबेटने आपल्याला कधीही त्रास दिला नव्हता. चीन विभाजित होता. आपल्याच अंतर्गत समस्यांनी चिन्यांना इतके ग्रासले होते की, त्याचे सीमांकडे कधी लक्षच गेले नव्हते. १९१४ साली आपण तिबेटसोबत एक करार ( कनव्हेंशन) केला. याला चीनने मान्यता(एंडाॅर्स) दिली नव्हती. स्वायत्त (आॅटाॅनाॅमस ) तिबेटला आपण स्वतंत्र करार स्वरूपात मानले.  आता चीनची प्रति स्वाक्षरी( काऊंटर सिग्नेचर) होण्याचेच तेवढे बाकी उरले होते.सुझरेंटीचा चिन्यांना अभिप्रेत असलेला अर्थ वेगळा दिसतो. यावरून हे स्पष्ट दिसते आहे की, आपण व तिबेट यात ज्या ज्या गोष्टींना मान्यता दिली, त्या सर्व बाबी चीन अमान्य करील. याचा अर्थ असा होतो की, संपूर्ण उत्तर सीमाच आता अस्थिर ( मेल्टिंग पाॅट) होईल. गेली पन्नास वर्षे आपले तिबेटशी जे व्यापारी संबंध आहेत, त्यांचीही हीच गत होईल.
  आता चीन विभाजित नाही. तो एकसंध व सामर्थ्यवान आहे.हिमालयाला लागून असलेल्या उत्तर आणि इशान्य भागात राहणारे लोक वांशिक व सांस्कृतिक दृष्ट्या तिबेटी आणि मंगोलियन लोकांसारखे दिसतात. सीमा निर्धारण न झाल्यास या लोकांची चिनी आणि तिबेटी लोकांशी असलेली जवळीक आपल्याला डोकेदुखी होऊन बसेल. साम्राज्यवादावर साम्यवाद हा तोडगा असू शकत नाही, हा ताजा आणि कटू इतिहास आहे. हे दोन्ही 'वाद' सारखेच चांगले व वाईट आहेत.चिन्यांची महत्वाकांक्षा हिमालयाच्या उतार प्रदेशापुरती सीमित नाही, त्यांना आसामचाही लचका तोडायचा आहे. त्यांची नजर ब्रह्मदेशावरही आहे. त्या देशाची स्थिती तर  आणखीनच बिकट आहे. जिच्या आधारे करारसदृश स्थिती होती, असे म्हणता येईल, अशी मॅकमहोन रेषेसारखी रेषाही त्यांच्या आधाराला  नाही. ऐतिहासिक व वांशिक दाखला देत, हा आमच्या मातृभूमीचा हिस्सा आहे, असे म्हणत एखाद्या भूभाग व्यापायचा ( इर्र्डेंटिझम) व साम्यवादी साम्राज्यवाद ( कम्युनिस्ट इंपेरिलिझम)  आणि पाश्चात्यांचा विस्तारवाद ( एक्पॅंशनिझम) ह्या दोघांची जातकुळी  वेगळी आहे. पहिल्या प्रकाराने तत्त्वज्ञानाचे घोंगडे पांघरलेले असते. हा प्रकार अधिक धोकादायक असतो. वांशिक, राष्ट्रीय आणि ऐतिहासिक हक्काचे नावाखाली तात्त्विक विस्तारवाद (आयडिआॅलाॅजिकल एक्सपॅंशन) दडलेला असतो. त्यामुळे उत्तर आणि इशान्येकडील धोका हा साम्यवादी तसाच साम्राज्यवादीही आहे. पश्चिम आणि वायव्येकडचा धोका तसाच कायम असतांना उत्तर आणि इशान्येकडून नवीन धोका उद्भवला आहे. अनेक शतकानंतर आता दोन आघाड्यावर एकाच वेळी संरक्षण व्यवस्था केंद्रित करावी लागणार आहे. आजवर पाकिस्तानच्या तुलनेत आपले संरक्षक उपाय आपण बेतत होतो. आता उत्तर व इशान्य दिशेने असलेला साम्यवादी चीनचा धोका आपल्याला विचारात घ्यावा लागेल. चीनचे उद्देश आणि महत्त्वाकांक्षा आपल्या मित्रत्वाशी जुळत नाहीत.
    या राजकीय संभाव्य उपद्रवी परिस्थितीचे काय परिणाम होतील ते बघू या. नेपाळ, भूतान, सिकीम, तसेच दारजिलिंग आणि आसामातील अनुसूचित जमातींची वस्ती असलेले प्रदेश हे उत्तर आणि इशान्य भागी आहेत. दळणवळणाचा विचार केला तर या भागात अनेक कच्चे दुवे आहेत. रसद पुरवू शकतील असे कायम स्वरूपी मार्ग नाहीत. घुसखोरीसाठी अपरिमित मार्ग आहेत. अनेक खिंडींपैकी मोजक्याच  खिंडींचे रक्षण करण्यासाठी पोलीसदल आहे. त्यांच्या जवळही पुरेसा दारूगोळा नसतो. यांच्याशी सरळ व प्रत्यक्ष संपर्काची सोय नाही. या भागात रहाणाय्रा रहिवाशांची देशनिष्ठा व देशभक्ती अजून सिद्ध झालेली नाही. दारजिलिंमध्येही मंगोलिया धार्जिणी वृत्तीचे लोक आहेत. नागा आणि पर्वतीय भागातील जमातींशी संपर्क यंत्रणा गेल्या तीन वर्षात उभी राहिली नाही. युरोपियन मिशनरींचे यांच्याशी संपर्क आहेत. पण त्यांचे आपल्याशी सख्य नाही. नुकतेच सिकीममधील वातावरण तापले होते. ते धुमसणे अजून शमले नसेलही.  तुलनेने भूतान शांत आहे खरा पण मुळात त्या लोकांचा  कल तिबेटी लोकांकडे आहे. नेपाळमध्ये सत्ता मूठभर लोकांच्या हाती आणि तीही शक्तीच्या भरवशावर आहे. एकीकडे असंतुष्ट गट आणि दुसरीकडे बुद्धिमत मंडळी यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू आहे. अशा लोकात जागृती निर्माण करणे व  त्यांना संरक्षण दृष्टीने सक्षम करणे कठीण असते. त्यासाठी दृढता, शक्ती व सुस्पष्ट धोरण आखण्याची आवश्यकता आहे. चीन व त्याचा प्रेरणास्थान असलेला रशिया या कच्या  दुव्यांचा फायदा आपल्या महत्त्वाकांक्षा व तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी उठवल्याशिवाय राहणार नाहीत, असे वाटते. समाधानात राहून स्वस्थ बसून किंवा दोलायमान स्थितीत राहून चालणार नाही. आपल्याला नक्की काय हवे ते निश्चित करून ते कसे प्राप्त करायचे हे ठरविणे आवश्यक आहे. याबाबत डळमळीत राहिलो तर आपण दुर्बल होऊ आणि आजच जो धोका स्पष्ट दिसतो आहे तो आणखीनच वाढेल.
  बाह्य धोक्यांच्या जोडीला आता अंतर्गत समस्याही आल्या आहेत. आजवर साम्यवाद्यांना बाहेरच्या देशातील साम्यवाद्यांशी संपर्क ठेवणे, साहित्य व शस्त्रे मिळवणे कठीण होते. पूर्वेला ब्रह्मदेश, पाकिस्थान (आजचा बांग्लादेश) किंवा समुद्रमार्ग असा अडचणीचा मार्गच उपलब्ध होता. आता त्यांची ही अडचण दूर होणार आहे. हेर, पंचमस्तंभी आणि साम्यवादी यांची घुसखोरी आता सहज शक्य होईल. तेलंगण व वरंगल सारख्या एकटदुकट साम्यवादी केंद्रांचाच बंदोबस्त आतापर्यंत करावा लागायचा. आता त्यांना उत्तर आणि इशान्य भारतातून शस्त्रास्त्रे व दारूगोळा  उपलब्ध होऊ शकेल. अशा अनेक समस्या निर्माण होतील. त्या दूर करण्यासाठीचे धोरण व मार्ग निश्चित करावे लागतील. आता विलंब करून चालणार नाही. संरक्षणासोबत अंतर्गत समस्यांचा विचार करावा लादगणार आहे. संवेदनशील सीमा प्रदेशातील प्रशासकीय व राजकीय प्रश्न सोडवावे लागतील.
यानंतर पत्रात सरदार पटेलांनी ओळीने दहा समस्या नोंदवल्या आहेत. १.चीनपासून होऊ शकणारा धोका २. संभाव्य संवेदनशील भागातील दळणवळणाची सुविधा विकसित करणे ३. योग्य ठिकाणी संरक्षण तरतूद पक्की करणे ४. कायमस्वरूपी संरक्षण सिद्धता करणे ५. चीनचा रवैया पाहता सुरक्षा समितीत प्रवेश देण्याबाबत पाठिंबा देण्याचे बाबतीतले धोरण बदलले पाहिजे. कोरियन युद्धात चीनने कोरियाची बाजू युनोच्या विरोधात जाऊन उघडपणे घेतली आहे. ६. नेपाळ, भूतान, सिकीम, दारलिजिंग वगैरे भागातली सीमा मजबूत करणे ७. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम या प्रदेशातील अंतर्गत व्यवस्था सुदृढ करणे ८.  रस्ते,रेल्वे, विमान, बिनतारी संपर्क व्यवस्था निर्माण करणे ९. तिबेटमधील ल्हासा येथील आपले सैन्य व व्यापारी मार्ग याबाबत विचार करणे १०. मॅकमहोन लाईन बाबतची भूमिका निश्चित करणे
      चीन, रशिया, अमेरिका,ब्रिटन व ब्रह्मदेश याबाबतच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची आवश्कता स्पष्ट करून सरदार पटेलांनी ब्रह्मदेशाशी घनिष्ट संबंध स्थापन करण्याचे महत्त्व सांगितले आहे. चीन ब्रह्मदेशावर दबाव टाकील अशी शंका व्यक्त केलेली दिसते आहे. कारण मॅकमहोन लाईन सारखी सीमारेषाही त्या भागात नाही, असे ते नमूद करतात.
खरे तर हे पत्र मुळातूनच अभ्यासावयास हवे आहे. या एकाच पत्रावरून सरदार पटेलांची दूरदृष्टी, स्वभाव, जागरूकता, कणखरपणा, मुत्सद्दीपणा, वैचारिक स्पष्टता आदी गुणांचा परिचय परिचय होतो. या पत्रातील एकेका मुद्याचा व सद्यस्थितीचा विचार केला तर सरदारांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय होण्यासाठी तेवढेही पुरेसे आहे. याचबरोबर आजचे विद्यमान मोदी सरकार उचलत असलेले एकेक पाऊल आणि सरदारांनी केलेल्या सूचना यातील  परस्परसाम्य यांचा अभ्यासही उपयोगी सिद्ध होईल.
निवडणुकीचा काळ एक सर्कस
वसंत गणेश काणे
एका अमेरिकन नागरिकांने वाचकांच्या पत्रव्यवहार या सदरात लिहितांना मजकुरासाठी हे शीर्षक वापरले आहे.
  या काळात भल्याभल्यांचे वस्तुस्थितीबाबतचे भान हरपते. याच काळात शासन शस्त्रास्त्रे, गर्भपात, समलिंगी, स्थलांतरित या सारख्या प्रश्नांबाबत कोणती भूमिका स्वीकारणार ते नागरिकांना कळते. मात्र सभागृहात भरपूर मताधिक्य असतांना त्या त्या पक्षांनी या प्रश्नांबद्दल तेव्हा प्रत्यक्ष असे काहीही का केले नाही, ते आपल्याला जाणून घ्यायची आवश्कता वाटत नाही. निवडणूक आली की या विषयांना घुमारे फुटू लागतात. स्वतंत्र व बलिष्ठ अमेरिका उभारण्याचा विषय याचवेळी ऐरणीवर येतो. एखादी गोष्ट टी व्हीवर पाहिली म्हणजे ती खरीच असली पाहिजे, हे मानण्याचा हाच काळ असतो. बेकारीबद्दल ऊर बडविण्याचा हाच काळ असतो. पण या अगोदर एखाद्या उद्योगपतीने (ट्रंप?) देशाबाहेरचे आपले उद्योग देशात आणून बेकारी दूर करण्याचा प्रयत्न का केला नाही, हे विचारण्याची आवश्यकता कुणालाही वाटत नाही. मेलानिया ट्रंपने मिशेल ओबामा यांच्या भाषणाची सहीसही नक्कल केली हे प्रकरण याचवेळी गाजते. पण हा प्रकार आजच घडला असे नाही, यापूर्वीही घडला आहे व उभयपक्षी (तेव्हा रोनाल्ड रीगन यांनी अशीत नक्कल केली होती) घडला आहे, याची नोंद घ्यावीशी वाटत नाही. हिलरी क्लिंटन यांनी शासकीय कामांसाठी खाजगी ईमेल वापरल्यामुळे त्यांची नाचक्की होणार असेल तर रशियाने केलेले ‘हॅकिंग’ आपल्याला सोयीचे वाटते. अध्यक्ष ओबामा यांनी केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्त्यांची समीक्षा करण्याची ज्यांची जबाबदारी होती, त्यांनी आपली नोकरी कायम रहावी म्हणून ब्रही काढला नव्हता व आपली जबाबदारी पार पाडली नव्हती आणि  या नियुक्त्यांच्या योग्यायोग्यतेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली नव्हती, याचा आपल्याला विसर पडतो. अहो, बरोबरच आहे ना. आजकाल नोकऱ्या मिळताहेत कुठे? मग हातची घालवून बसण्यात काय अर्थ? या सर्व प्रकाराला ‘निवडणुकीचा काळ म्हणजे एक सर्कस’ असे विधान करून मी सर्कशीचा अपमान तर करत नाही ना?
  लोकनेते व प्रशासन यांच्यावरील विश्वास सर्व जगभरच उडत चाललेला दिसतो. लोकशाहीबाबच आस्था बाळगणाऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. हा प्रकार फक्त अमेरिकेतच घडतो आहे, असे नाही. यावर काय उपाय करता आहे का? काही उपाय करता येईल का?
सिरियाला इसीसमुक्त करण्याच्या मोहिमेचा आरंभ
वसंत गणेश काणे
  इराकमधून इसीसला माघार घ्यायला भाग पाडल्यानंतर आता सिरियामधून इसीस आणि साथीदारांविरुद्ध मोहीम सुरू झाली असून रशियाची बाॅम्बफेकी विमाने इराणमधील विमानतळांवरून मध्य सिरियाच्या दिशेने झेप घेत आहेत.
परस्परपूरक कारवाई - या निमित्ताने इराक, इराण व रशिया यात निर्माण झालेला सहयोग जसा महत्त्वाचा आहे, तसाच एकमेकावर सतत गुरगुरत असलेल्या अमेरिका व मित्र राष्ट्रे आणि रशिया यांनी वेगवेगळे राहून पण इसीसला मात द्यायचीच या उद्देशाने केलेली पृथक पण परस्परपूरक कारवाई वेग घेईल अशी चिन्हे दिसत आहेत. चीन तटस्थ आहे किंवा नुसती तोंडपाटिलकी करतो आहे. कारण इसीस आज ना उद्या आपल्यालाही जड जाणार आहे, हे चीनलाही कळून चुकले आहे. थोडक्यात असे की, जगातील सर्व महाशक्ती आपापसातले मतभेद विसरून किंवा निदान या विषयापुरतेतरी तात्पुरते बाजूला सारून एकाच उद्देशाने सरसावलेले दिसत आहेत. असे दृश्य जगाच्या इतिहासात फार कमी वेळा पहावयास मिळाले असेल.
वर्षभर चाललेल्या चर्चेच्या गुऱ्हाळाल यश -  या कारवाईबाबत रशिया व अमेरिका यात जवळजवळ एक वर्ष चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. रशियाची अचानक समजूत पटली आणि रशियाची बाॅम्बफेकी विमाने सिरियातील अलेपो या शहरातील अतिरेक्यांच्या तळावर आग ओकीत आहेत. भौगोलिक दृष्ट्या सिरिया व रशिया यातील अंतर अमेरिका व सिरिया यातील अंतराच्या मानाने खूपच कमी आहे. त्यामुळे रशियाचा सहभाग या मोहिमेत महत्त्वाचा आहे. सोबतीला सिरिया शासनाची विमानेही आहेत त्यामुळे दोघेही हे यश आपलेच असल्याचा दावा करीत आहेत.
   इराणने आजवर आपले तळ वापरण्याची अनुमती अन्य राष्ट्रांना दिल्याची नोंद आढळत नाही. मध्यपूर्वेतील देशांमधले इतर देशांचे तळ वापरून रशियानेही आजवर सिरियावर बाॅम्बहल्ला केल्याची नोंद नाही. सिरियाचे अध्यक्ष बसर असाद यांच्या समर्थनार्थ ही मोहीम सुरू आहे.
    शीर्षस्थस्तरावरील एकोप्याचा परिणाम - अतिरेकी हल्यामुळे जायबंदी झालेल्या सिरियाला मदत करण्याचा निर्णय मास्को व तेहेरान (इराणची राजधानी)  येथील शीर्षस्थ नेत्यांनी घेतल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सोबतीला आता वाॅशिंगटनही आहे. या तिघांपैकी कुणाकुणांमधून एकेकाळी विस्तव जात नसे, हे पाहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये कसे व  कोणते बदल केव्हा होतील, याचे अनुमान करणे किती कठीण आहे, ते जाणवेल. बगदाद (इराकची राजधानी), तेहेरान ( इराणची राजधानी) मास्को व वाॅशिंगटन या ठिकाणच्या शीर्षस्थ नेत्यांचे एकमत होताच तृणमूल पातळीवरही (ग्रासरूट लेव्हल) संक्रांत साजरी होत आहे. आपापली विमाने केव्हा, कुठे व किती उंचीवरून उड्डाण करीत आहेत, हे परस्परांना पुरेसे अगोदर अगोदर कळवून आपापसातल्या टक्करी टाळण्याची खबरदारी मनापासून घेतली जात आहे. इसीस व समविचारी गट यांच्याविरुद्ध कारवाई करणे कसे आवश्यक आहे व त्याशिवाय कसे गत्यंतर नाही, हे या चौघांना मनापासून पटल्याची ही चिन्हे  आहेत. इराण, सिरिया व रशिया आणि इसीस विरोधी गट हेही एकत्र आले आहेत. अमेरिकेने इराणवरील बंधने उठवल्यानंतर इराणवरचा गुपचूप अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न सुरू असल्याचा आळ दूर झाल्यामुळेच हे शक्य झाले आहे. इराणचे तळ वापरता येत असल्यामुळे रशियाचा युद्धखर्चही कमी झाला आहे.
   पायदळाला कूच करता यावे म्हणून - इसीस आणि मित्रगटांच्या ताब्यात असलेला प्रदेश अजून ताब्यात आलेला नाही. पण त्यांचे शस्त्रास्त्रांचे साठे उध्वस्त झाले आहेत, प्रशिक्षण केंद्रे समूळ नष्ट झाली आहेत, मोहिमेवर  नियंत्रण ठेवणारी मुख्यालये बेचिराख झाली आहेत. आता रणगाडे व तोफखाने यांच्या छत्राखाली पायदळाला आगेकूच करतांना फारशी मनुष्यहानी सहन करावी लागणार नाही.
 संक्रांतीचे वातावरण कायम राहो -  या सर्वाचा परिणाम म्हणून इसीसमध्ये फूट पडली असून त्यातील एक गट एकीकडे रशियाशी तर दुसरीकडे अमेरिकेशी संधान बांधण्याच्या प्रयत्नात आहे. पण या दोघांनीही त्यांना अंगावरील झुरळ झटकून टाकावे तसे झिडकारले आहे. इसीसच्या समान संकटाचा धोका ओळखून छोटीबडी राष्ट्रे आपापसातले वैर विसरून निदान आजतरी एकत्र आली असून संक्रांतीचे वातावरण दिसते आहे. पण संक्रांतीनंतर शिमगा येतो, तसे होऊ नये, अशी शांतताप्रेमी जनतेची ईश्वरचरणी प्रार्थना असणार. त्यांच्या हाती अशी प्रार्थना करण्या शिवाय दुसरे असणार तरी काय?
जपानमधील राजसन्यास
वसंत गणेश काणे

  जपानचे ८२ वर्ष वयाचे सम्राट अकिहिटो यांनी वृद्धापकाळामुळे व प्रकृतीमानही ठीक राहत नसल्यामुळे राज्यत्याग करण्याची इच्छा टिव्हीवर भाषण करून व्यक्त केल्याला आठवडा उलटून गेला आहे, माझी प्रकृती दिवसेदिवस ढासळते आहे, असे ते म्हणाले. तसे पाहिले तर यात अस्वाभाविक किंवा ज्याला वृत्तमूल्य असावे, असे काहीही नसावे, असाच सर्वसाधारण समज असेल ? पण असे नाही. त्यांच्या भाषणानंतर जपानी विश्वामध्ये निपनिराळे तरंग उमटले आहेत.
 घटनेत पदत्यागाची तरतूद नाही -  पहिली बाब ही की जपानी राज्यघटनेनुसार सम्राटाने तहाहयात पदावर राहिलेच पाहिजे, असे आहे. त्यांना मध्येच पदत्याग करण्याची अनुमती जपानी राज्यघटना देत नाही. सनातनी लोकांना तर सम्राटांचा हा विचार मुळीच रुचणार नाही की मान्य होणार नाही. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी याबाबत पुढे काय करायचे यावर सरकार गांभीर्याने विचार करील, असे म्हटले आहे.
  सम्राटपदी स्त्री असणार नाही - दुसरे असे की,घटना दुरुस्त करण्याच्या विचाराला प्रारंभ होताच एक मुद्दा नव्याने चर्चेला येणार आहे. जपानमध्ये सम्राटपद वारसा हक्काने पुढील पिढीकडे जात असले तरी तो वारस पुरुषच असला पाहिजे, अशी तरतूद घटनेत आहे. राजपुत्र नरुहिटो यांना आयको नावाची मुलगी असल्यामुळे घटनेतील तरतुदीनुसार ती सम्राटपदी विराजमान होऊ शकणार नव्हती. आयकोचा जन्म झाल्यावर घटनेत बदल करून आयकोला - एका स्त्रीला - राजसिंहासनावर बसवण्याची तरतूद करण्याचा विचार पुढे आला. यासाठी २००५ मध्ये शासनाने तज्ञांची एक समिती नेमून तिला शिफारस करण्यास सांगितले. तिने अनुकूल मतही दिले. पण दरम्यानच्या काळात आयकोला भाऊ मिळाला म्हणजे हिसाहिटोचा - सम्राटाच्या नातवाचा - जन्म झाला. आणि घटना दुरुस्तीचा विचार मागे पडला तो पडलाच. पण आता पदत्यागासाठी अनुमती देणारी घटना दुरुस्ती तर करावी लागेलच. ओघाओघाने सम्राटपदी स्त्री असावी की नसावी हा मुद्दाही चर्चेला येईल (आज पुरुष वारस असल्यामुळे हा प्रश्न तातडीचा राहिलेला नाही हा भाग अलाहिदा)
 सम्राटांची राजकीय चाल आहे काय ? - तिसरे असे की, सम्राटाने राजकीय निर्णय घेण्यावर प्रतिबंध आहेत. हे बंधन आजवर कसोशीने पाळले गेले होते. पण जपानचे राजकारण आज एका वेगळ्याच वळणावर आले असतांना सम्राटांनी हा मनोदय व्यक्त केला आहे. दुसऱ्याच एका कारणास्तव जपानच्या राज्यघटनेत बदल करण्याचा विचार पंतप्रधान शिंझो अबे यांच्या मनात घोळतो आहे. ते कारण  असे की, ‘हिंसाचाराचा व युद्धाचा विरोध’ (पेसिफिझम) या दुसऱ्या महायुद्धानंतर स्वीकारलेल्या भूमिकेला सोडचिठ्टी देण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान शिंझो अबे त्यांना वाटते आहे. त्या दृष्टीने घटनेत बदल करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांचा घटनेत बदल करण्याचा हा मूलगामी विचार आणि सम्राटांनी राजसन्यास घेण्याची व्यक्त केलेली इच्छा यात काही परस्परसंबंध आहे का, याचा शोध राजकीय निरीक्षक घेत आहेत.
   न धरी शस्त्र करी - दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने जणू शस्त्रसन्यासच घेतला आहे. त्या मोबदल्यात सम्राटपद कायम ठेवण्यास अमेरिका राजी झाली, तसेच तिने जपानच्या संरक्षणाची हमीही घेतली आहे. या व्यवस्थेत बदल करण्याचा विचार हा साधासुधा विचार म्हणता यायचा नाही. सम्राटपद टिकवण्यासाठी दिलेले शस्त्रसन्यासाचे अभिवचन १९४५ पासून आतापर्यंत जपानने प्रामाणिकपणे पाळले आहे. आता जपान नव्याने सैन्य उभारणार असेल व शस्त्रास्त्र निर्मितीला प्रारंभ करणार असेल तर जागतिक सत्तासमतोलावर त्याचे फार मोठे परिणाम होतील. अमेरिका, चीन व रशिया या महाशक्तींची याबाबत  भूमिका काय असेल, या विचाराने राजकीय निरीक्षकांची मती गुंग झाली आहे. सम्राटांचा राजीनामा देण्याचा मनोदय ही पंतप्रधान शिंझो अबे यांच्या शस्त्रसज्ज व्हायच्या भूमिकेच्या विरोधातील राजकीय चाल की खऱ्याखुऱ्या आजारपणामुळे  ढासळलेल्या प्रकृतीमुळे उचलेले पाऊल हे लवकरच स्पष्ट होईल.
जपानच्या राजसिंहासनाचे वैशिष्ट्य- जपानच्या राजसिंहासनाला क्रायसॅनथेमम सिंहासन असे नाव आहे. राजप्रासादातील हे खास सिंहासन आहे. जपानचे सम्राट निरनिराळ्या वेळी निरनिराळी सिंहासने वापरतात. नॅशनल डाएट(जपानची संसद) ला उद्देशून भाषण करतांना सम्राट वेगळ्याच सिंहासनावर स्थानापन्न झालेले असतात. जपानचे हे राजसिंहासन खूपच जुन्याकाळपासून अस्तित्त्वात आहे. ख्रिस्तपूर्व ६६० ला निर्माण झालेल्या या ‘गादीवर’ सध्याचे सम्राट अकिहिटो हे १२५ वे सम्राट आहेत.
१९२० साली हिरोहिटो हे राजपुत्र कार्यवाहक शासक (रिजंट) म्हणून काम पाहू लागले कारण खुद्द सम्राट योशिहिटो (तायशो हे मरणोत्तर नाव) यांचे प्रकृतीस्वास्थ्य इतके वाईट होते की, प्रत्यक्षात ते काहीही काम करू शकत नव्हते. जपानी सम्राटांची त्यांच्या हयातीतील नावे व मरणोत्तर नावे वेगवेगळी असतात. योशिहिटो यांच्या मृत्यूनंतर  १९२६ ते १९८९ पर्यंत हिरोहिटो हे सम्राट होते त्यांचे मरणोत्तर नाव शोवा असे आहे. १९८९ पासून सध्याचे सम्राट अकिहिटो असून त्यांचे मरणोत्तर नाव किंजो असेल. हे सिंहासन टिकावे व सम्राटपद कायम रहावे हे जपानच्या आस्थेचे व निष्ठेचे विषय आहेत. त्यासाठी जपानने शस्त्रसन्यास पत्करला आज राजसन्यासाच्या शक्यतेमुळे शतकानुशतके सुरू असलेली परंपरा काय नवीन रूप घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Saturday, August 13, 2016

क्लिंटन यास अनावृत पत्र
एका धीरोदात्त मातृत्त्वाचे हिलरी क्लिंटन यास
 खुले पत्र
 या पत्राच्या मूळ लेखिका हेलन विकर्ट या स्तंभ लेखिका या नात्याने कार्यरत असून त्यांच्या लेखाचा, भाषांतराच्या मर्यादेत व आशयाशी प्रामाणिक राहून केलेला हा काहीसा स्वैर अनुवाद आहे. मूळ पत्र वाचण्याची मजा काही औरच आहे. अनावृत पत्राचा नमुना, अमेरिकेतील महिलांच्या विश्वातील एक मतप्रवाह, निवडणुकीच्या राजकारणातील प्रचाराचा नमुना अशा अनेक दृष्टीने हे पत्र रंजक, मनोवेधक व बोधप्रद वाटावे, असे आहे.
स्वैर अनुवाद - वसंत गणेश काणे
प्रिय मिसेस क्लिंटन,
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन. इतिहासाने नोंद घ्यावी अशी ही घटना! स्त्रिमुक्ती चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा! स्त्रिला जखडणारी काचेची भिंत तू एकदाची भेदलीसच.
   पण यासाठी किती मूल्य चुकवावे लागले आहे? कल्पना आहे का?
मी एका सुंदर मुलीची आई आहे. आपल्या जीवनाचे मोल अमोल आहे, अशी शिकवण तिला द्यावी. त्याचे मूल्य जगातील सर्व बाबींपेक्षा जास्त आहे, हे मला तिच्या मनावर बिंबवायाचे आहे. ईश्वराने तिला या भूतलावर एक विशिष्ट हेतू समोर ठेवून पाठविले आहे, असे माझे तिला सांगणे असते. या भूतलावरील आपल्या स्थानाबद्दल तिला कधीही शंका असू नये, यावर माझा कटाक्ष असतो.
एका प्रमुख राजकीय पक्षाने एका महिलेला, तिने जीवनात जे साध्य केले त्याची दखल घेत अध्यक्षपदासाठीची उमेदवारी बहाल करावी, ही घटना आपणा महिलांना साजरी करता यावी इतकी सनसनाटी स्वरूपाची ठरली असती तर किती चांगले झाले असते बरे! जिचा आदर्श समोर ठेवावा, जिची प्रशंसा करावी, अशी एखादी व्यक्ती माझ्या मुलीसमोर ठेवता आली असती तर मला किती बरे वाटले असते म्हणून सांगू? पण माझे, माझ्या मुलीचे व देशातील असंख्य महिलांचे दुर्दैव असे की, मी हे करू शकत नाही.
   मिसेस क्लिंटन मला वाईट याचे वाटते की, केवळ माझ्या मुलीलाच नव्हे, तर सगळ्याच मुलींना - आणि तेही या देशातल्याच नव्हे तर सर्व जगातल्या- तू हे दाखविले आहेस की, आपल्यावरचे या जगातले अदृश्य बंधन भेदायचे असेल तर तुम्हाला खोटं बोललं पाहिजे, फसवलं पाहिजे, शिव्या दिल्या पाहिजेत, अपमान केला पाहिजे, रुबाब कसला पाहिजे आणि दुर्लक्ष केले पाहिजे. स्वत:ला कमी लेखून तू इतरांनाही धोका देत आहेस.
    आपल्या नवऱ्याला, तो आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात अनेकानेक महिलांवर घाला घालीत असतांना, त्यांना कमी लेखत असतांना तू त्याच्याकडे कानाडोळा करून त्याला तसे वागू दिलेस हा आदर्श मी माझ्या मुलीसमोर ठेवू का? त्या महिलांची काहीच किंमत नव्हती का?  सांग मला. निदान यापुढे तरी  तू असे करणार नाहीस, अशी मी आशा बाळगते. तू त्या महिलांच्या अधिकारांसाठी जशी भांडलीस (म्हणजे भांडली नाहीस), तशीच माझ्याही अधिकारांसाठी भांडणार आहेस का? असे तू करणार नाहीस, अशी मी आशा बाळगते. आणि भगिनीभावाचे काय गं? आपल्या नवऱ्याची दुष्कृत्ये तू चव्हाट्यावर मांडलीस का? नाही. तू तसे केले नाहीस. उलट त्या दुष्कृत्य करणाऱ्याला तू बळ दिलेस आणि बळी पडलेल्या भगिनींना गप्प बसवलेस. तू हे सर्व कसे सहन करतेस ग? हेच का तुझे महिलांचे सबलीकरण? चांगलय!
 समानतेच्या बाता मारतेस आणि आपल्याच हाताखालच्या महिला अधिकाऱ्यांना पुरुषांपेक्षा कितीतरी कमी पगार देतेस? जे देश आपल्या देशातील महिलांना वाईट वागवतात, त्यांना छळतात इतकेच नव्हे तर त्यांना ठार मारतात, त्या देशांकडूनही तू देणग्या स्वीकारतच असतेस? शिवाय वर आपण कशा महिलांच्या समान हक्कांचा पुरस्कार करीत आहोत, अशा बातही मारत असतेस. यालाच म्हणतात दुहेरी मापदंड नाही?
  अमेरिकेचे स्वप्न साकार व्हावे यासाठी अहर्निश झटणाऱ्या आमच्या सारख्यांशी जवळीक साधण्याचा तुझा खासा प्रयत्न सुरू असतो. पण संघर्ष काय चीज आहे याची तुला सुतराम कल्पना नाही. तुझे १२ हजार डाॅलर किमतीचे ते अर्मानी जाकीट? एका भाषणाची तुझी ती  २ लक्ष ५० हजार डाॅलर फी? ह्या गोष्टी बरंच काही सांगून जातात. ढोंगबाजी नव्हे का ही?
  तुझा आदर्श ठेव आणि विसंबून रहा, असे मी माझ्या मुलीला कसं सांगू? अमेरिकन मुलांसमोर जिचा आदर्श ठेवावा अशी तू आहेस, असं तुला प्रामाणिकपणे वाटतं का? माझी मुलगी बातम्या बघते. परदेशात अमेरिकनांवर हल्ले झाले, त्यांची कत्तल झाली हे तिच्या कानावर आहे आणि हे तुझ्या डोळ्यासमोर घडत असूनही तेव्हा तू काहीही न करता शुंभासारखी नुसती गप्प उभी राहिलीस? त्यांच्या रक्ताने तुझे हात डागाळलेले असतांना सर्व दोष इतरांवर ढकलण्याचा तू अटोकट प्रयत्न नाही केलास? आणि वर तोंड करून सभागृहाला सांगितलेस, आता काय त्याचे म्हणून? अप्रामाणिकपणा नव्हे का हा?
    या सगळ्याचा अर्थ असा होतो की, मिसेस क्लिंटन, तू महिलांची तारणहार नाहीस. या देशातील महिलांच्या माथी आपले खोटे नाणे मारण्याचा तुझा खटाटोप आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अनेकांना तो खरा वाटतो आहे. माझ्या व माझ्या मुलीच्या वतीने तू लढावस असं मला वाटत नाही. तुझ्या समोर फक्त एकाच महिलेचे हितसंबंध आहेत आणि ती महिला तूच आहेस. अमेरिका देश म्हणून एकसंध असावा यासाठी तू काहीही केलेले नाही. याउलट फूट पाडण्याचे मात्र खूप प्रयत्न केलेस. त्यात यशस्वीही झालीस. अभिनंदन! तू सत्तेसाठी हापापलेली अाहेस. सत्ता मिळविण्यासाठी तू कोणत्याही थराला जाशील. तू लुच्ची आहेस, भामटी आहेस तुझ्यामुळे देशाची मान खाली गेली आहे.
मिसेस क्लिंटन, खरी महिला कसे व्हावे, हे मला माझ्या मुलीला शिकवता यावे, ही माझी प्रार्थना आहे. सबल महिला. स्वाभिमानी महिला. निर्मात्याच्या नजरेतून जी स्वत:ला पाहू शकेल, अशी महिला. करुणा, दया, सेवा व निस्वार्थी भाव असलेली महिला. जी प्रामाणिक आणि समतोल वृत्तीची असेल आणि इतरांच्या अपेक्षांकडे लक्ष देणारीही.
मिसेस क्लिंटन, तसं पाहिलं तर मी तुझे आभारच मानले पाहिजेत. माझ्या मुलीने कसे होऊ नये, हे तुझ्याकडे पाहून मला चांगले कळले आहे. आता तिने कसे व्हावे, ते दाखवण्याचे धैर्य मला प्राप्त होवो.
तुझी विश्वासू
हेलन विकर्ट
ताजा कलम.
जाताजाता, भावी अध्यक्षासाठी, मग तो डोनाल्ड ट्रंप असो वा तू, मी ईश्वराचरणी प्रार्थना करते. ईश्वर आम्हाला असे करावयास सांगतो. तो कोणत्याही हृदयात सत्य आणि प्रामाणिकपणा निर्माण करू शकतो.

Wednesday, August 10, 2016

हिलरी क्लिंटन  यांची उमेदवारी अमेरिकन राजकीय क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा.
वसंत गणेश काणे
हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी कुणाला आवडो किंवा न आवडो एक गोष्ट नक्की आहे की, ही उमेदवारी अमेरिकन राजकीय क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे. फिलाडेल्फिया येथे त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले ही एक अभूतपूर्व घटना आहे. खुद्द महिलांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची पदे महिलांना मिळावीत, यासाठी काही कमी प्रयत्न केलेले नाहीत. १९१७ मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर जिनेट रॅनकिन ही महिला पहिल्यांदा मोनटॅना या महिलांना मताधिकार मिळावा यासाठीच्या चळवळीत आघाडीवर असलेल्या राज्यातून हाऊसमध्ये निवडून आली. तीन वर्षे याअगोदर महिलांना मतदानाचा अधिकार देणारी १९ वी घटनादुरुस्ती पारित करण्यात आली होती.
  १९४९ साली मार्गारेट स्मिथ ही महिला पतीच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी रिपब्लिकन पक्षाची सदस्य म्हणून नामनिर्देशित झाली व तिने पतीचा सदस्यत्त्वाचा कालावधी पूर्ण केला. नंतर ती स्वबळावर निवडून आली. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने १९६४ साली तिचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले होते. १९७८ कॅनसॅसमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार काॅंग्रेसवर निवडून आल्या होत्या. पदाधिकारी महिलांचे सध्याचे प्रमाण २५ टक्के आहे. मेयरपदावर १८ टक्के महिला आहेत. राज्यविधीमंडळात२४.४ ौटक्के महिला आहेत. सहा महिला गव्हर्नरपदीनिवडून आल्या आहेत.सीनेटमध्ये २० टक्के तर हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये १९ टक्के महिला आहेत.
पण आजवर अमेरिकेच्या अध्यक्षपदी महिला निवडून आलेली नाही. ही कल्पना हास्यकारकच नव्हे तर हास्यास्पद मानली जात असे. तो विडंबनाचाही विषय असे. महिलांना दुबळ्या, अननुभवी आणि भावनेच्या आहारी जाणाऱ्या मानले जात असे. अटीतटीच्या प्रसंगी त्यांच्यावर भरवसा ठेवता येईल, असे मानले जात नसे. जागतिक घडामोडी त्यांच्या समजण्यापलीकडचा विषय मानला जायचा. त्यांचे ज्ञान व बुद्धिमत्ता, अनुभव , सेवा व समर्पण सार्वजनिक क्षेत्रात उपयोगाचे समजले जात नसे.
 हे सर्व समज बघता हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी हे एक क्रांतीकारी पाऊल मानावयास हवे.
धरलं तर चावतं
वसंत गणेश काणे
अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील धोरणाबाबतच्या फटफजिती बद्दल  बरीच चर्चा कानावर पडत असते. पण अमेरिका अफगाणिस्थानमधील युद्धातही अशीच अडकून पडली आहे. त्याबाबत असे फारसे बोललो जात नाही. या युद्धातील सहभागाला वर्षअखेर आता १६ वर्षे पूर्ण होतील. अमेरिकेच्या सामरिक इतिहासातील हे कदाचित सर्वात जास्त काळ चालू राहिलेले युद्ध असावे. व्हिएटनाम युद्धात अमेरिकेचे जवळ जवळ ६० हजार सैनिक गारद झाले होते. पण ते युद्ध त्यामानाने लवकर आटोपले होते.
न संपणारं सुद्ध - अफगाणिस्थानमध्ये सुरू असलेल्या या सोळा वर्षांच्या संघर्षात व्हिएटनाम एवढी मनुष्यहानी झाली नाही पण कोंडी मात्र झाली आहे. ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’, हे वचन या प्रकरणी चपखल लागू पडेल.  बुश यांच्याकडून ओबामाकडे व ओबामा कडून आता जो अध्यक्षपदी निवडून येईल त्याच्याकडे या युद्धाचा वारसा येणार आहे. या संघर्षाचा उल्लेख आता अमेरिकेत ‘न संपणारे युद्ध’, असा करतात.
  दोघेही गप्प - हे युद्ध कसे जिंकायचे, निदान कसे संपवायचे किंवा कसे आटोक्यात ठेवायचे याबाबत रिपब्लिकन पक्षाच्या किंवा डेमोक्रॅट पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय संमेलनात चर्चा झाली नाही. तासापेक्षाही जास्त काळ चाललेल्या आपल्या भाषणात, ना डोनाल्ड ट्रंप या विषयावर बोलले, ना हिलरी क्लिंटन बोलल्या.
   सोपा उपाय - दोघेही हा मुद्दा विसरले नव्हते, हे नक्की. मग ही चुप्पी का बरं? नोव्हेंबरपर्यंत प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोचेल. कोण अज्ञानी, कोण गुन्हेगार; कोण दुष्ट कोण लुच्चा; कोण स्वार्थी, कोण कपटी; कोण करबुडव्या, कोण इस्लामी धनामुळे मिंधा; कोण नागनाथ, कोण सापनाथ असे प्रश्न मतदारांसमोर उपस्थित केले जातील. पण फसलेली सैनिकी रणनीती व पदरी आलेला अपेक्षाभंग यावर चिंतन होण्याची शक्यता नाही.  त्यावर प्रकाश टाकण्याचे कष्टही कोणी घेणार नाही. युद्धाच्या परिणामांची चर्चा करण्याचा विषय आला की, लिपापोती करायची, दुर्लक्ष करायचे किंवा सरळ विसरून जायचे, या सोप्या मार्गाचा अवलंब करायचा, हे सर्वच राजकारण्यांचे ठरलेले दिसते.
 जगभर अनुकूल राजवटी आणू - ११ सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटर बेचिराख झाल्यानंतर अमेरिकेने आपल्या परराष्ट्रीय धोरणात एक महत्त्वाचा बदल केला आहे. आपल्या राष्ट्रीय हिताला धोका निर्माण होऊ शकेल, अशा राजवटी जगात जिथे कुठे असतील, तिथे जाऊन त्या ठेचून काढायच्या आणि त्यांच्या जागी एक उदारमतवादी राजवट उभी करायची हे ते बदललेले धोरण आहे.
  सर्वच प्रयोग फसले - पण अफगाणिस्थानमध्ये अमेरिका आणि मित्र राष्ट्रांचा हा प्रयोग यशस्वी झालेला दिसत नाही. तो कुठे यशस्वी झाला आहे, असा प्रश्न विचारला जातो पण तो प्रश्न सध्या आपण बाजूला सारून विचार करू या. अफगाणिस्थानमध्येही अमेरिकेने आपले रक्त थोडेसेच  सांडले, पण अब्जावधी डाॅलर ओतले, त्या देशाच्या अंदाजपत्रकातील नमूद खर्चाचा पाऊण हिस्सा उचलला पण त्या देशाच्या कुबड्या काही सुटल्या नाहीत. भ्रष्टाचार आटोक्यात आला का? नाही. जगाची बुद्धी थिजवणाऱ्या अफूचे उत्पादन कमी झाले का? नाही.  तालिबान्याचे खच्चीकरण झाले का? नाही. या उलट इसीस आपला जम बसवत असल्याच्या वार्ता मात्र कानावर पडत आहेत. सुधारणा होणे तर दूरच राहिले, विद्यमान राजवट टिकून आहे, हेच यश मानण्याची पाळी अमेरिकेवर अफगाणिस्थानमध्ये आली आहे. अराजकाचा मुद्दा विचारात  घेतला तर अफगाणिस्थानही इराकच्या पावलावर पाऊल टाकीत जाताना दिसतो आहे.
  एकाला समज नाही, दुसरा अडकून पडला - ट्रंप यांना या किंवा अशा प्रश्नांचे आकलनच नाही, भविष्यात होण्याची शक्यता नाही. हिलरी क्लिंटन यांनी आजवर मध्यपूर्वेत किंवा अफगाणिस्थानमध्ये जो गुंता करून ठेवला आहे, नालायक व भ्रष्ट सहकाऱ्यांचा गोतावळा निर्माण केला आहे आणि धरसोडीच्या नीतीमुळे जो गोंधळ घालून ठेवला आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या चक्रव्युव्हातून बाहेर पडण्याचा मार्ग आता त्यांनाही शोधता येणार नाही, असे दिसते. अनेक अमेरिकन सेनाधिकारी त्यांच्यावर सोपविलेल्या कामगिऱ्या पूर्ण न करताच मायदेशी परतले आहेत. त्यांच्या अडचणी जाणून न घेता, अपयशासाठी त्यांनाच जबाबदार धरण्याकडे हिलरी क्लिंटन यांचा कल आहे. सेनाधिकारी फक्त जमिनीवरची लढाई लढतात. राजकीय डावपेचातील चढाई ही राजकारण्यांची जबाबदारी असते. ती साधली तरच रणांगणावर सेनापती यशस्वी होऊ शकतो किंवा त्याने रणांगणावर प्राप्त केलेले यश टिकू शकते.
  उपाय कुणा जवळ? - अमेरिकेने कुवेतला सद्दामच्या तावडीतून बाहेर काढले खरे पण नालायक व भ्रष्ट साथीदार साथीला घेतले, त्यामुळे ते राजकारण फसले. सद्दाम हुसेन जुलमीच होता, त्याला संपविण्याचेही एकवेळ समर्थन करता येईल पण त्याच्या जागी बसवलेला मलिक मलिदा खाणारा तर आहेच पण नालायकही आहे. रशियाला आवरण्यासाठी चीनशी दोस्ती केली खरी पण तोच आता गुरगुरतो आहे, एवढेच नव्हे तर अमेरिकन बाजारपेठ बळकावतो आहे. रशियाभोवती साखळी तयार करण्यासाठी पाकिस्थानला हाताशी धरले खरे पण पण चीनशी दोस्ती करून तोच अमेरिकेला धमकावतो आहे. जवळजवळ सर्व अतिरेकी भस्मासुरांना अमेरिकेचाच वरदहस्त लाभला होता, ते आता अमेरिकेवरच उलटले आहेत. या सर्वावर हमखास उतारा रिपब्लिकन पक्ष म्हणा किंवा डेमोक्रॅटिक पक्ष म्हणा यापैकी कुणाजवळ आहे का याच्या शोधात अमेरिकेचे जनमानस आहे. आजवर अमेरिकेतील इतर पक्ष नगण्य होते. गेल्या निवडणुकीत त्या सगळ्यांना मिळून फक्त एक टक्का किंवा थोडीशीच अधिक मते मिळाली होती. पण सध्याच्या जनमत चाचणीत त्यांना सध्याच दहा टक्के मते मिळतांना दिसत आहेत. जेव्हा नेते कमी पडतात तेव्हा जनताजनार्दनच मार्ग शोधत असतो का?
धरलं तर चावतं
वसंत गणेश काणे
अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील धोरणाबाबतच्या फटफजिती बद्दल  बरीच चर्चा कानावर पडत असते. पण अमेरिका अफगाणिस्थानमधील युद्धातही अशीच अडकून पडली आहे. त्याबाबत असे फारसे बोललो जात नाही. या युद्धातील सहभागाला वर्षअखेर आता १६ वर्षे पूर्ण होतील. अमेरिकेच्या सामरिक इतिहासातील हे कदाचित सर्वात जास्त काळ चालू राहिलेले युद्ध असावे. व्हिएटनाम युद्धात अमेरिकेचे जवळ जवळ ६० हजार सैनिक गारद झाले होते. पण ते युद्ध त्यामानाने लवकर आटोपले होते.
न संपणारं सुद्ध - अफगाणिस्थानमध्ये सुरू असलेल्या या सोळा वर्षांच्या संघर्षात व्हिएटनाम एवढी मनुष्यहानी झाली नाही पण कोंडी मात्र झाली आहे. ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’, हे वचन या प्रकरणी चपखल लागू पडेल.  बुश यांच्याकडून ओबामाकडे व ओबामा कडून आता जो अध्यक्षपदी निवडून येईल त्याच्याकडे या युद्धाचा वारसा येणार आहे. या संघर्षाचा उल्लेख आता अमेरिकेत ‘न संपणारे युद्ध’, असा करतात.
  दोघेही गप्प - हे युद्ध कसे जिंकायचे, निदान कसे संपवायचे किंवा कसे आटोक्यात ठेवायचे याबाबत रिपब्लिकन पक्षाच्या किंवा डेमोक्रॅट पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय संमेलनात चर्चा झाली नाही. तासापेक्षाही जास्त काळ चाललेल्या आपल्या भाषणात, ना डोनाल्ड ट्रंप या विषयावर बोलले, ना हिलरी क्लिंटन बोलल्या.
   सोपा उपाय - दोघेही हा मुद्दा विसरले नव्हते, हे नक्की. मग ही चुप्पी का बरं? नोव्हेंबरपर्यंत प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोचेल. कोण अज्ञानी, कोण गुन्हेगार; कोण दुष्ट कोण लुच्चा; कोण स्वार्थी, कोण कपटी; कोण करबुडव्या, कोण इस्लामी धनामुळे मिंधा; कोण नागनाथ, कोण सापनाथ असे प्रश्न मतदारांसमोर उपस्थित केले जातील. पण फसलेली सैनिकी रणनीती व पदरी आलेला अपेक्षाभंग यावर चिंतन होण्याची शक्यता नाही.  त्यावर प्रकाश टाकण्याचे कष्टही कोणी घेणार नाही. युद्धाच्या परिणामांची चर्चा करण्याचा विषय आला की, लिपापोती करायची, दुर्लक्ष करायचे किंवा सरळ विसरून जायचे, या सोप्या मार्गाचा अवलंब करायचा, हे सर्वच राजकारण्यांचे ठरलेले दिसते.
 जगभर अनुकूल राजवटी आणू - ११ सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटर बेचिराख झाल्यानंतर अमेरिकेने आपल्या परराष्ट्रीय धोरणात एक महत्त्वाचा बदल केला आहे. आपल्या राष्ट्रीय हिताला धोका निर्माण होऊ शकेल, अशा राजवटी जगात जिथे कुठे असतील, तिथे जाऊन त्या ठेचून काढायच्या आणि त्यांच्या जागी एक उदारमतवादी राजवट उभी करायची हे ते बदललेले धोरण आहे.
  सर्वच प्रयोग फसले - पण अफगाणिस्थानमध्ये अमेरिका आणि मित्र राष्ट्रांचा हा प्रयोग यशस्वी झालेला दिसत नाही. तो कुठे यशस्वी झाला आहे, असा प्रश्न विचारला जातो पण तो प्रश्न सध्या आपण बाजूला सारून विचार करू या. अफगाणिस्थानमध्येही अमेरिकेने आपले रक्त थोडेसेच  सांडले, पण अब्जावधी डाॅलर ओतले, त्या देशाच्या अंदाजपत्रकातील नमूद खर्चाचा पाऊण हिस्सा उचलला पण त्या देशाच्या कुबड्या काही सुटल्या नाहीत. भ्रष्टाचार आटोक्यात आला का? नाही. जगाची बुद्धी थिजवणाऱ्या अफूचे उत्पादन कमी झाले का? नाही.  तालिबान्याचे खच्चीकरण झाले का? नाही. या उलट इसीस आपला जम बसवत असल्याच्या वार्ता मात्र कानावर पडत आहेत. सुधारणा होणे तर दूरच राहिले, विद्यमान राजवट टिकून आहे, हेच यश मानण्याची पाळी अमेरिकेवर अफगाणिस्थानमध्ये आली आहे. अराजकाचा मुद्दा विचारात  घेतला तर अफगाणिस्थानही इराकच्या पावलावर पाऊल टाकीत जाताना दिसतो आहे.
  एकाला समज नाही, दुसरा अडकून पडला - ट्रंप यांना या किंवा अशा प्रश्नांचे आकलनच नाही, भविष्यात होण्याची शक्यता नाही. हिलरी क्लिंटन यांनी आजवर मध्यपूर्वेत किंवा अफगाणिस्थानमध्ये जो गुंता करून ठेवला आहे, नालायक व भ्रष्ट सहकाऱ्यांचा गोतावळा निर्माण केला आहे आणि धरसोडीच्या नीतीमुळे जो गोंधळ घालून ठेवला आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या चक्रव्युव्हातून बाहेर पडण्याचा मार्ग आता त्यांनाही शोधता येणार नाही, असे दिसते. अनेक अमेरिकन सेनाधिकारी त्यांच्यावर सोपविलेल्या कामगिऱ्या पूर्ण न करताच मायदेशी परतले आहेत. त्यांच्या अडचणी जाणून न घेता, अपयशासाठी त्यांनाच जबाबदार धरण्याकडे हिलरी क्लिंटन यांचा कल आहे. सेनाधिकारी फक्त जमिनीवरची लढाई लढतात. राजकीय डावपेचातील चढाई ही राजकारण्यांची जबाबदारी असते. ती साधली तरच रणांगणावर सेनापती यशस्वी होऊ शकतो किंवा त्याने रणांगणावर प्राप्त केलेले यश टिकू शकते.
  उपाय कुणा जवळ? - अमेरिकेने कुवेतला सद्दामच्या तावडीतून बाहेर काढले खरे पण नालायक व भ्रष्ट साथीदार साथीला घेतले, त्यामुळे ते राजकारण फसले. सद्दाम हुसेन जुलमीच होता, त्याला संपविण्याचेही एकवेळ समर्थन करता येईल पण त्याच्या जागी बसवलेला मलिक मलिदा खाणारा तर आहेच पण नालायकही आहे. रशियाला आवरण्यासाठी चीनशी दोस्ती केली खरी पण तोच आता गुरगुरतो आहे, एवढेच नव्हे तर अमेरिकन बाजारपेठ बळकावतो आहे. रशियाभोवती साखळी तयार करण्यासाठी पाकिस्थानला हाताशी धरले खरे पण पण चीनशी दोस्ती करून तोच अमेरिकेला धमकावतो आहे. जवळजवळ सर्व अतिरेकी भस्मासुरांना अमेरिकेचाच वरदहस्त लाभला होता, ते आता अमेरिकेवरच उलटले आहेत. या सर्वावर हमखास उतारा रिपब्लिकन पक्ष म्हणा किंवा डेमोक्रॅटिक पक्ष म्हणा यापैकी कुणाजवळ आहे का याच्या शोधात अमेरिकेचे जनमानस आहे. आजवर अमेरिकेतील इतर पक्ष नगण्य होते. गेल्या निवडणुकीत त्या सगळ्यांना मिळून फक्त एक टक्का किंवा थोडीशीच अधिक मते मिळाली होती. पण सध्याच्या जनमत चाचणीत त्यांना सध्याच दहा टक्के मते मिळतांना दिसत आहेत. जेव्हा नेते कमी पडतात तेव्हा जनताजनार्दनच मार्ग शोधत असतो का?