Saturday, August 13, 2016

क्लिंटन यास अनावृत पत्र
एका धीरोदात्त मातृत्त्वाचे हिलरी क्लिंटन यास
 खुले पत्र
 या पत्राच्या मूळ लेखिका हेलन विकर्ट या स्तंभ लेखिका या नात्याने कार्यरत असून त्यांच्या लेखाचा, भाषांतराच्या मर्यादेत व आशयाशी प्रामाणिक राहून केलेला हा काहीसा स्वैर अनुवाद आहे. मूळ पत्र वाचण्याची मजा काही औरच आहे. अनावृत पत्राचा नमुना, अमेरिकेतील महिलांच्या विश्वातील एक मतप्रवाह, निवडणुकीच्या राजकारणातील प्रचाराचा नमुना अशा अनेक दृष्टीने हे पत्र रंजक, मनोवेधक व बोधप्रद वाटावे, असे आहे.
स्वैर अनुवाद - वसंत गणेश काणे
प्रिय मिसेस क्लिंटन,
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन. इतिहासाने नोंद घ्यावी अशी ही घटना! स्त्रिमुक्ती चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा! स्त्रिला जखडणारी काचेची भिंत तू एकदाची भेदलीसच.
   पण यासाठी किती मूल्य चुकवावे लागले आहे? कल्पना आहे का?
मी एका सुंदर मुलीची आई आहे. आपल्या जीवनाचे मोल अमोल आहे, अशी शिकवण तिला द्यावी. त्याचे मूल्य जगातील सर्व बाबींपेक्षा जास्त आहे, हे मला तिच्या मनावर बिंबवायाचे आहे. ईश्वराने तिला या भूतलावर एक विशिष्ट हेतू समोर ठेवून पाठविले आहे, असे माझे तिला सांगणे असते. या भूतलावरील आपल्या स्थानाबद्दल तिला कधीही शंका असू नये, यावर माझा कटाक्ष असतो.
एका प्रमुख राजकीय पक्षाने एका महिलेला, तिने जीवनात जे साध्य केले त्याची दखल घेत अध्यक्षपदासाठीची उमेदवारी बहाल करावी, ही घटना आपणा महिलांना साजरी करता यावी इतकी सनसनाटी स्वरूपाची ठरली असती तर किती चांगले झाले असते बरे! जिचा आदर्श समोर ठेवावा, जिची प्रशंसा करावी, अशी एखादी व्यक्ती माझ्या मुलीसमोर ठेवता आली असती तर मला किती बरे वाटले असते म्हणून सांगू? पण माझे, माझ्या मुलीचे व देशातील असंख्य महिलांचे दुर्दैव असे की, मी हे करू शकत नाही.
   मिसेस क्लिंटन मला वाईट याचे वाटते की, केवळ माझ्या मुलीलाच नव्हे, तर सगळ्याच मुलींना - आणि तेही या देशातल्याच नव्हे तर सर्व जगातल्या- तू हे दाखविले आहेस की, आपल्यावरचे या जगातले अदृश्य बंधन भेदायचे असेल तर तुम्हाला खोटं बोललं पाहिजे, फसवलं पाहिजे, शिव्या दिल्या पाहिजेत, अपमान केला पाहिजे, रुबाब कसला पाहिजे आणि दुर्लक्ष केले पाहिजे. स्वत:ला कमी लेखून तू इतरांनाही धोका देत आहेस.
    आपल्या नवऱ्याला, तो आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात अनेकानेक महिलांवर घाला घालीत असतांना, त्यांना कमी लेखत असतांना तू त्याच्याकडे कानाडोळा करून त्याला तसे वागू दिलेस हा आदर्श मी माझ्या मुलीसमोर ठेवू का? त्या महिलांची काहीच किंमत नव्हती का?  सांग मला. निदान यापुढे तरी  तू असे करणार नाहीस, अशी मी आशा बाळगते. तू त्या महिलांच्या अधिकारांसाठी जशी भांडलीस (म्हणजे भांडली नाहीस), तशीच माझ्याही अधिकारांसाठी भांडणार आहेस का? असे तू करणार नाहीस, अशी मी आशा बाळगते. आणि भगिनीभावाचे काय गं? आपल्या नवऱ्याची दुष्कृत्ये तू चव्हाट्यावर मांडलीस का? नाही. तू तसे केले नाहीस. उलट त्या दुष्कृत्य करणाऱ्याला तू बळ दिलेस आणि बळी पडलेल्या भगिनींना गप्प बसवलेस. तू हे सर्व कसे सहन करतेस ग? हेच का तुझे महिलांचे सबलीकरण? चांगलय!
 समानतेच्या बाता मारतेस आणि आपल्याच हाताखालच्या महिला अधिकाऱ्यांना पुरुषांपेक्षा कितीतरी कमी पगार देतेस? जे देश आपल्या देशातील महिलांना वाईट वागवतात, त्यांना छळतात इतकेच नव्हे तर त्यांना ठार मारतात, त्या देशांकडूनही तू देणग्या स्वीकारतच असतेस? शिवाय वर आपण कशा महिलांच्या समान हक्कांचा पुरस्कार करीत आहोत, अशा बातही मारत असतेस. यालाच म्हणतात दुहेरी मापदंड नाही?
  अमेरिकेचे स्वप्न साकार व्हावे यासाठी अहर्निश झटणाऱ्या आमच्या सारख्यांशी जवळीक साधण्याचा तुझा खासा प्रयत्न सुरू असतो. पण संघर्ष काय चीज आहे याची तुला सुतराम कल्पना नाही. तुझे १२ हजार डाॅलर किमतीचे ते अर्मानी जाकीट? एका भाषणाची तुझी ती  २ लक्ष ५० हजार डाॅलर फी? ह्या गोष्टी बरंच काही सांगून जातात. ढोंगबाजी नव्हे का ही?
  तुझा आदर्श ठेव आणि विसंबून रहा, असे मी माझ्या मुलीला कसं सांगू? अमेरिकन मुलांसमोर जिचा आदर्श ठेवावा अशी तू आहेस, असं तुला प्रामाणिकपणे वाटतं का? माझी मुलगी बातम्या बघते. परदेशात अमेरिकनांवर हल्ले झाले, त्यांची कत्तल झाली हे तिच्या कानावर आहे आणि हे तुझ्या डोळ्यासमोर घडत असूनही तेव्हा तू काहीही न करता शुंभासारखी नुसती गप्प उभी राहिलीस? त्यांच्या रक्ताने तुझे हात डागाळलेले असतांना सर्व दोष इतरांवर ढकलण्याचा तू अटोकट प्रयत्न नाही केलास? आणि वर तोंड करून सभागृहाला सांगितलेस, आता काय त्याचे म्हणून? अप्रामाणिकपणा नव्हे का हा?
    या सगळ्याचा अर्थ असा होतो की, मिसेस क्लिंटन, तू महिलांची तारणहार नाहीस. या देशातील महिलांच्या माथी आपले खोटे नाणे मारण्याचा तुझा खटाटोप आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अनेकांना तो खरा वाटतो आहे. माझ्या व माझ्या मुलीच्या वतीने तू लढावस असं मला वाटत नाही. तुझ्या समोर फक्त एकाच महिलेचे हितसंबंध आहेत आणि ती महिला तूच आहेस. अमेरिका देश म्हणून एकसंध असावा यासाठी तू काहीही केलेले नाही. याउलट फूट पाडण्याचे मात्र खूप प्रयत्न केलेस. त्यात यशस्वीही झालीस. अभिनंदन! तू सत्तेसाठी हापापलेली अाहेस. सत्ता मिळविण्यासाठी तू कोणत्याही थराला जाशील. तू लुच्ची आहेस, भामटी आहेस तुझ्यामुळे देशाची मान खाली गेली आहे.
मिसेस क्लिंटन, खरी महिला कसे व्हावे, हे मला माझ्या मुलीला शिकवता यावे, ही माझी प्रार्थना आहे. सबल महिला. स्वाभिमानी महिला. निर्मात्याच्या नजरेतून जी स्वत:ला पाहू शकेल, अशी महिला. करुणा, दया, सेवा व निस्वार्थी भाव असलेली महिला. जी प्रामाणिक आणि समतोल वृत्तीची असेल आणि इतरांच्या अपेक्षांकडे लक्ष देणारीही.
मिसेस क्लिंटन, तसं पाहिलं तर मी तुझे आभारच मानले पाहिजेत. माझ्या मुलीने कसे होऊ नये, हे तुझ्याकडे पाहून मला चांगले कळले आहे. आता तिने कसे व्हावे, ते दाखवण्याचे धैर्य मला प्राप्त होवो.
तुझी विश्वासू
हेलन विकर्ट
ताजा कलम.
जाताजाता, भावी अध्यक्षासाठी, मग तो डोनाल्ड ट्रंप असो वा तू, मी ईश्वराचरणी प्रार्थना करते. ईश्वर आम्हाला असे करावयास सांगतो. तो कोणत्याही हृदयात सत्य आणि प्रामाणिकपणा निर्माण करू शकतो.

No comments:

Post a Comment