Monday, August 7, 2017

कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान की शाप?

कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान की शाप?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    युवाल नोह हरारी हा एक आधुनिक इस्रायली  इतिहासतज्ञ असून त्याने ‘सेपियन्स ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्यूमनकाइंड’  या नावाचा ग्ंथ लिहला आहे. बिग बॅंग झाल्याची घटना एक वैज्ञानिक व ऐतिहासिक सत्य मानून व ते गृहीत धरून त्याने हा इतिहास लिहिला असून १३.५ अब्ज वर्षापासूनच्या इतिहासातील घडामोडींचा कथाभाग तपशीलवार वर्णन करून सांगितला आहे. त्याने वर्तमानकाळातील मानवापर्यंतचा तपशीलही त्याने शास्त्रज्ञ व इतिहासकार या दोन्ही भूमिका स्वीकारून कथन केला आहे. हा ग्रंथ मुळातून वाचावा अशा योग्यतेचा  असून त्यात भारताचा इतिहास मात्र पुरेसा व बरोबर मांडलेला नाही.  ही उणीव म्हणा किंवा याबाबतचे लेखकाचे अज्ञान म्हणा, बाजूला ठेवले तर हा ग्रंथ वाचनीय नक्कीच आहे.
अधिक प्रतिभावान जीव पृथ्वीचा ताबा घेणार? - ग्रंथाचा शेवट करतांना लेखकाने एक निरीक्षण नोंदविले आहे. गेली २/३ हजार वर्षे वगळली तर पृथ्वीवर झालेले बदल नैसर्गिक निवडीच्या (नॅचरल सिलेक्शन)  आधारे होत होते. निसर्गात तोपर्यंत अनेक प्राणी व वनस्पती वंश निर्माण व्हायचे व जीवन कलहात नष्टही व्हायचे. या निर्मिती व विनाशाच्या प्रक्रियेवर निसर्गाशिवाय अन्य घटकांचा परिणाम होत नसे.  मानवाला बुद्धीची जाणीव झाल्यानंतर त्याने प्रथम नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेला आपल्या बौद्धिक क्षमतेची जोड दिली. पण पुढे मानव आपल्या बुद्धीचा वापर करून ही निर्मिती व विनाशाची प्रक्रिया नियंत्रितही करू लागला. याचा परिणाम म्हणून नैसर्गिक प्रक्रिया बाधित झाली व हिचा परिणाम भविष्यात असा होईल की मानवाऐवजी आणखी एखादा अधिक प्रतिभावान जीव पृथ्वीचा ताबा भविष्यात घेऊ शकेल, असे भाकीत त्याने वर्तविले आहे. एका प्रचंड तपशीलाच्या ग्रंथातील  ही माहिती पुष्कळशी अपूर्ण व अनेक प्रकारे तपशीलात चुकीची असल्याचे गृहीत धरले/ मान्य केले  तरी सध्या ती आधाराला घेऊन विचार करायला हरकत नाही.
 कृत्रिम बुद्धी - मानवाने बुद्धीचा वापर करून कॅल्क्युलेटर तयार केला. जे गणित सोडवायला बुद्धी वापरावी लागायची ते काम एक यांत्रिक प्रक्रिया करू लागली. पुढे तर ० व १ हे दोनच अंक वापरून त्याने एक संगणकप्रणाली विकसित केली. त्याचे आजचे, आधुनिक व विकसित स्वरूप म्हणून यांत्रिक मानव (रोबोट) त्याने निर्माण केला व त्याच्या करवी अनेक बौद्धिक कामे मानव आज करून घेतो आहे. हा सर्व प्रकार कृत्रिम बुद्धिमता म्हणून ओळखला जातो. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देऊन अशक्यप्राय वाटणाऱ्या बाबी साध्य केल्या आहेत. ही कृत्रिम बुद्धिमता वरदान स्वरुपात जशी सिद्ध झाली आहे तशीच ती शाप स्वरुपात काम करते आहे किंवा कसे अशी शंका यावी असा प्रकार नुकताच उघडकीला आला आहे.
यंत्रमानवात स्वयंनिर्णयक्षमतेचा विकास  - घटना अशी आहे की, एक विशिष्ट काम करण्याकरता दोन यंत्रमानवांची (रोबोट) ची योजना करण्यात आली होती. त्यांना आपापली कामे नेमून दिली होती. ती दोघे आपापली नेमून दिलेली कामे अचुकपणे व निमूटपणे पार पाडीत होती. पण एक दिवस यापेक्षा काहीतरी वेगळे घडते आहे, असे वाटू लागले. अधिक खोलवर अभ्यास केल्यावर लक्षात आले की, या यंत्रमानवांनी परस्परांशी स्वतंत्र संपर्कव्यवस्था प्रस्थापित केला आहे. कमांडसाठी वापरली जाणारी इंग्रजी भाषा त्यांनी झुगारून दिली. पुढे असेही जाणवू लागले की या दोन यंत्रमानवांनी परस्परांशी संपर्क करण्याकरिता स्वत:ची अशी भाषाही विकसित केली आहे. तिचा बोध इतरांना काही केल्या होईना. यंत्रमानवांनी दिलेली चाकोरी ओलांडून स्वत: निर्णय घ्यायला सुरवात केली आहे, हे कळताच, सर्व संबंधितांना एकच हादरा बसला. यंत्रमानवात स्वयंनिर्णयक्षमता येऊ शकेल, असे कुणालाही स्वप्नातही वाटले नव्हते.
कविकल्पना प्रत्यक्षात अवतरली - ही घटना फेसबुक सारख्या एका सोशल मिडिया कंपनीच्या बाबतीत घडून आली आहे, असे वृत्त आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) निर्मितीक्षेत्रात यामुळे एकच खळबळ उडाली असून रोबोट निर्मितीबाबत फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे किंवा कसे याबाबत विचार सुरू झाला आहे. यापूर्वी कथा कादंबऱ्यात व चित्रपटात अशा कल्पना करून अनेक कथा रचलेल्या आपल्याला माहीत आहेत. पण हा प्रकार प्रत्यक्षात घडतो आहे की काय हा प्रश्न आज शासत्रज्ञांना भेडसावत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजे काय? - कृत्रिम बुद्धीमत्तेला यंत्रात आढळून येणारी बुद्धिमत्ता असे म्हणता येईल. आजवर ही क्षमता सजीवातच असते, असे मानले जात असे. संगणक शास्त्रात बौद्धिक साधनांचा ( एजंट्स) अभ्यास  व उपयोग अपेक्षित आहे. जे यंत्र परिस्थतीचे आकलन करून विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न करते, ते यांत्रिक बौद्धिक साधन म्हणून ओळखले जाते. शिकणे व समस्या हाताळणे या परिस्थितीच्या आकलनावर व तर्कावर अवलंबून असलेली कार्ये असून ही क्षमता मानवी मनालाच साध्य असते, असे आजवर आपण आजवर मानत होतो.
रोबोटचा सर्वसंचार - रोबोट ही विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित एक प्रणाली (मेकॅनिझम) असून ती चाकोरी सोडून जात नाही. चाकोरीच्या शिस्तीचे पालन ती प्रामाणिकपणे करते. आज्ञा (कमांड) पालन हा तिचा धर्म असतो. संगणकशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र, भाषाविज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी या सारख्या शास्त्रात या प्रणालीचा वापर करतात. आज्ञापालनाचे बाबतीत (फाॅलोइंग कमांड) या प्रणालीची शंभर टक्के प्रामाणिकता गृहीत धरलेली असते. पण रोबोटचा प्रमाणाबाहेर वापर झाला तर रोबोटयुगाची निर्मिती तर होणार नाही ना? या प्रश्नाने शास्त्रज्ञांची मती गुंग झाली आहे. इन्पेक्टर राज जाईल तेव्हा जावो. पण त्या अगोदरच मशीनराज निर्माण झाले तर काय करायचे? आपण एका नवीन भस्मासुराला तर जन्माला घालीत नाही आहोत ना? अशी शक्यता गृहीत धरून मोहिनीचे रूप घेऊ शकणाऱ्या श्रीकृष्णाची आराधना करायला सर्वसामान्यांनी आतापासूनच सुरवात केलेली बरी.

Saturday, August 5, 2017

संक्रमण काळातील मूल्यमापन

संक्रमणकाळातील आॅनलाईन मूल्यमापन (इव्हॅल्यूएशन)
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
 परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका परीक्षकांकडे पाठविणे व परीक्षकांनी त्या तपासून पुन्हा केंद्राकडे रवाना करणे ही पेपर तपासण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या पद्धतीमुळे होणारे घोटाळे/चुका/गैरप्रकार ह्या बाबीही आपल्या चांगल्याच परिचयाच्या आहेत. यावर उपाय सापडत नव्हता. आॅनलाईन व्हॅल्यूएशन पद्धती हा एक चांगला उपाय म्हणता यावा, असा आहे. आजकाल डिजिटिलायझेशन हे नाव आपण अनेकदा ऐकतो. डिजिटिलायझेशन म्हणजे नक्की काय, याबद्दल अनेकांच्या मनात येत असेल. शास्त्रीय परिभाषेचा कमीतकमी वापर करून घेतलेली माहिती आपणा सर्वसामान्यांना उपयोगी पडेल, असे वाटते.
डिजिटिलायझेशन म्हणजे काय- ? डिजिट म्हणजे अंक. म्हणून डिजिटिलायझेशन म्हणजे अंकात रुपांतर करणे. उत्तरपत्रिका सामान्यत: अक्षरात लिहिलेल्या असतात. या अक्षरांचे अंकात रुपांतर करणे म्हणजे उत्तरपत्रिकातील मजकूर अंकांच्या स्वरुपात मांडणे, असा अर्थ घेऊन सध्या चालण्यासारखे आहे. अशी ‘अंकित’ उत्तरपत्रिका परीक्षाजवळच्या संगणावर पाठवायची. त्याने मूळ स्वरुपात तपासायची व केंद्राकडे तपासून परत पाठवायची, असे या योजनेचे ढोबळमानाने स्वरूप आहे. या पद्धतीत तपासण्यातील अनेक चुका, अंकांची बेरीज आदी नगण्य होतात. तपासण्याची गतीही वाढते, असे अनेक फायदे आहेत, यात शंका नाही. मात्र हे एक नवीन तंत्र आहे. ते व शिकण्याची व हस्तगत करण्याची तसदी, शिकणे सोडून शिकवायची सवय झालेल्या शिक्षकांना घेणे आज प्राप्त झाले आहे. युगानुकूलतेची ही मागणी असल्यामुळे, तिला नाके मुरडणे, तिला विरोध करणे म्हणजे कालप्रवाहाच्या विरुद्ध जाणे, हे होय. अशी भूमिका घेणारे काळाच्या ओघात वाहून जातील. शिक्षक हा समाजातला एक सुबुद्ध वर्ग मानला जातो, तो तसा आहेही. त्यामुळे शिक्षकांनी ही योजना स्वीकारली. मुंबई विद्यापीठाने ही योजना स्वीकारली, तिचा अवलंब केला पण  निकाल जाहीर करण्यास उशीर झाला व राज्यपालांना साक्षात कुलगुरुंनाच निकाल ३१ जुलै २०१७ च्या आत लावाच असे निर्देश द्यावे लागले. एकच बोभाटा झाला. चर्चेच्या फैरी झडू लागल्या. कुलगुरूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे रहावे लागले. हा सर्व प्रकार दुर्दैवीच म्हणावयास हवा. मग दोष कुणाचाही असला तरीही.
उडते विमान दुरुस्त करायचे आहे -  शिक्षणविषयक बदल घडवून आणणे हे वेगळे व स्वत:चे वेगळेपण असलेले काम आहे. ही अवस्था फक्त शिक्षणक्षेत्राचीच आहे, असे नाही. पण या बदलांचा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी येत असल्यामुळे याची संवेदनशीलता अधिक जाणवते. शिक्षणातील बदलांची तुलना उडते विमान दुरुस्त करण्याच्या प्रकाराशी करतात. असे विमान आकाशात थांबवता येत नाही, विमानाची गती किंवा उंचीही कमी करता येत नाही व ते नादुरुस्त अवस्थेत ठेवताही येत नाही. तसेच काहीसे शिक्षणक्षेत्राचे आहे. यात पथदर्शक प्रकल्पही (पायलट प्रोजेक्टही) राबवता येत नाहीत. म्हणजे अगोदर एखाद्या लहानशा घटकावरच प्रयोग करता येत नाहीत. जसे अभ्यासक्रमातील, पाठ्यपुस्तकातील बदल. असे बदल संपूर्ण क्षेत्राला एकदम लागू करावे लागतात. यासाठीची सर्व तयारी पूर्ण होईपर्यंत शाळा, महाविद्यालये बंदही ठेवता येत नाहीत. त्यामुळे शिक्षणप्रक्रिया चालू ठेवूनच हे बदल करावे लागतात. कितीही प्रयत्न केले तरी सांधेबदल होतांना, एक रूळ संपून आगगाडीच्या डब्याचे चाक दुसऱ्या रुळावर जातांना खडखडाट होतोच. पूर्वी रुळांची लांबी कमी असे. आजकाल ती तुलनेने बरीच जास्त असते, त्यामुळे खडखडाट कमी होतो, एवढेच.
आॅनलाईन व्हॅल्यूएशनचे फायदे-  आॅनलाईन व्हॅल्यूएशनचे फायदे खूप आहेत. पेपर तपासण्याचा वेळ व खर्च फार मोठ्या प्रमाणात  वाचेल. तपासण्यातील अचुकता वाढेल. सतत मागोवा व आढावा घेता येईल. उत्तरपत्रिका सुरक्षित राहतील. उत्तरपत्रिका गहाळ होण्याचा प्रकार थांबेल. तपासतानाच्या चुका तेव्हाच्या तेव्हा दाखवता व दुरुस्त करता येतील. उत्रपत्रिकेची प्रत विद्यार्थ्याला देणे अधिक सोपे होईल. माहितीच्या अधिकारात विचारले जाणारे प्रश्नही अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येतील.
  डिजिटल व्हॅल्यूएशन करणारे मुंबई विद्यापीठ हे जगातले अशा प्रकाऱ्या विद्यापीठातील अव्वल विद्यापीठात समाविष्ट होणारे विद्यापीठ ठरणार आहे, हे लक्षात घेतले म्हणजे या निर्णयाचे महत्त्व लक्षात येईल. असे बदल करतांना अडचणी येणारच. गैरसोय होणारच. त्यांचे स्वरूप कमीतकमी कसे करता येईल, ते मात्र पाहिले पाहिजे. 
टीकाकारांचे प्रकार - मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयावर टीकेची झोड उठविणाऱ्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. पहिला प्रकार असा की, काहींना हा बदल एक/दोन वर्षानंतर झाला असता, तर बरे झाले असते, असे वाटते. कारण विचारले तर म्हणाले की, त्यावेळी मी सेवानिवृत्त झालेलो असेन. यातला विनोद बाजूला ठेवून विचार करू. काहींना बदल नकोच असतात. त्यांचा विरोध किंवा त्यांची नाखुशी समजून घेऊनही म्हणायला हवे की, अशी टीका दुर्लक्षूनच पुढे जायला हवे. काहींचे हितसंबंध प्रभावित झाले आहेत. पेपर तपासतांना करता येण्यासारख्या गैरप्रकारांना फार मोठ्या प्रमाणात आळा बसतांना पाहून ही मंडळी आकांडतांडव करणारच. त्यांचा काय विचार करायचा? काहींची टीका राजकीय भूमिकेतून होत आहे. तेही त्यांच्या राजकीय भूमिकेला अनुसरून असल्यामुळे त्याचाही गांभीर्याने विचार करण्याचे कारण नाही. पण उशिराने निकाल लागल्यामुळे काहींची नोकरीसाठीची मुलाखतीची संधी हुकणार आहे. तर काहींच्या पुढच्या अभ्यासक्रमातील अर्ज करण्याची संधी हुकणार आहेत. यापैकी जी महाविद्यालये देशांतर्गत आहेत, त्यांना मुदत वाढवून देणे शक्य आहे. तशी विनंती विद्यापीठाने केली असून त्या विनंतीला अनुकूल प्रतिसादही मिळतो आहे, असे दिसते आहे. उरलेल्या ज्या इतरांना निकाल लवकर लावूनच हवा आहे, त्यांचा निकाल विद्यापीठाने लवकर लावून दिला आहे, असे कुलगुरूंचे म्हणणे आहे. हे प्रकार फारसे चांगले नसते तरी संक्रमणकाळात असे अपवाद करावे लागणारच.
मूलभूत अडचणी दूर व्हायला हव्यात - खरा मुद्दा वेगळाच आहे. त्याचा मात्र गांभीर्याने विचार आपण केला नाही, तर जागतिक स्पर्धेत टिकून राहतांना आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आपली सगळीच प्रशासनव्यवस्था अतिशय शिथिल झालेली आहे. कार्य संस्कृती (वर्क कल्चर) च्या बाबतीत आपला क्रमांक फार खालचा लागतो, नवीन पिढी जुन्या पिढीच्या मानाने अधिक गतीने काम करते आहे, हा त्यातल्यात्यात समाधानाचा भाग आहे. सर्व्हर डाऊन होत नाही, असे क्षेत्र शोधूनच सापडू शकेल. त्यामुळे कोकण किंवा तशा दूरच्या भागात परीक्षकांना खोळंबून रहावे लागले, यात नवल ते काय? सर्व्हरची गती कमी होणे, हे तर आपल्या पाचवीलाच पुजले आहे. अधूनमधून व अनेकदा मोक्याच्या वेळी बिजलीचे रुसणेही नवीन नाही. चांद्रयानात बसून चंद्रापर्यंत जाऊन एकवेळ सुखरूप परत येता येईल, पण घरून चंद्रयान केंद्रापर्यंत आपण वेळेच्या आत पोचूच याची हमी देता येईल का? या अडचणींचा संबंध कार्यसंस्कृतीशी, कौशल्याशी आहे. या बाबतीत आपल्याला बरीच मजल मारायची आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा जाणवते आहे