Sunday, July 29, 2018

सूड, संहार व राजस्थानातील राजकारण


सूड, संहार व राजस्थानातील राजकारण
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee?  
  ऐतिहासिक काळात राजस्थान ही वीरांची, शूरांची, हुतात्म्यांची जन्मभूमी म्हणून ओळखली जायची. दुर्दैवाने आज ती चोर, दरोडेखोर, लुटारू, खून व खंडणीखोरी यासाठीही प्रसिद्धी पावली आहे. यातील अनेक रजपूतही आहेत. 
   आनंदपाल सिंग या कुख्यात, खंडणीखोर व बीई पर्यंत शिकलेल्या रजपूत गुंडावर पाच लाखाचे बक्षीस होते. रजपुतांची राजस्थानात उपेक्षा केली जाते, त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांचा सत्तेतील न्याय्य वाटा नाकारला जातो, अशी  भावना गेल्या अनेक वर्षांपासून रजपुतांमध्ये दृढमूल झालेली आहे. त्यामुळे आनंदपाल सिंग हा आपल्यावरील या अन्यायाला वाचा फोडतो, असे अनेक रजपुतांना वाटत असे. एवढ्यात तर तो रजपूत समाजातील एका वर्गात अतिशय लोकप्रिय झाला होता. त्याला ते हीरोच मानीत असत. तो 24 जूनला चुलू जिल्ह्यातील मालासार या खेड्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला. पण त्याच्या कुटुंबीयांचा आरोप असा आहे की, तो शरण यायला तयार असतांनाही पोलिसांनी त्याचे एनकाऊंटर केले.  पोलिसांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. पोलिस कमांडो सोहन सिंग हा या एनकाऊंटरमध्ये जबर जखमी झाला होता व  त्याला विमानात घालून उपचारासाठी हलवावे लागले होते, हेही पोलिसांकडून सांगितले जाते. पण आनंदपाल सिंगाच्या खातम्यानंतर राजस्थानातील रजपुतांमध्ये संतापाची एकच लाट उसळली. यावेळी झालेल्या दंगलीत एकजण प्राणास मुकला तर पोलिसांसह अनेक जखमी झाले. या प्रकरणी सीबीआय चौकशीची त्याच्या कुटुंबीयांनी केलेली  मागणी तातडीने मान्य करण्यात आली. राजस्थानमध्ये आज वरवर शांतता दिसत असली तरी संतापाची व सूडाची आग आतल्या आत धुमसतेच आहे.
  ही घटना राज्यातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला 2018 च्या विधान सभेच्या व 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत बरीच अडचणीची ठरू शकेल, अशी चिन्हे आहेत. तसे पाहिले तर आनंदपाल सिंग गेली दोन दशके चर्चेत होताच, पण जिवंत आनंदपाल सिंगापेक्षा मृत आनंदपाल सिंगच प्रभावी व परिणामकारक ठरतांना दिसतो आहे.
  त्याने 2000 मध्ये पंचायतीची निवडणूक लढविली होती. पण तो पराभूत झाला होता. मात्र त्याने आपल्या पराभवाचे खापर विरोधकांवर फोडले व बघा, रजपुतांवर कसा अन्याय होतो आहे, असा कांगावा केला. या घटनेतूनच त्याच्या उदयाला प्रारंभ झाला. त्यातच त्याच्या जिवलग मित्राला - बलबीर बानुबाला - विरुद्ध टोळीच्या एका सदस्याने तुरुंगातच टपकवले  आणि आनंदपाल सिंग सुडाने अक्षरश: पेटून उठला. त्याने बिकानेर येथील तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळीतील बलबीर बानुबाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या दोन कुख्यात गुंडांना अतिशय निर्दयपणे ठार केले. अशाप्रकारे तुरुंगाबाहेरील टोळीयुद्ध तुरुंगातही पोचले होते. तुरुंगातही तो दादाच होता. त्याची कसरत धडाक्यात सुरू असायची. व्यायाम करतानाची व पिळदार स्नायू दाखवणारी त्याची छायाचित्रे अलगद तुरुंगाबाहेर येत असत आणि  सोशल मीडियात ती वायुवेगाने प्रसारित होत. पण तो खरा हीरो बनला 2015 साली. तेव्हा तो तुरुंगातून निसटला होता. आता तर तो शेखावती टोळीचा अनभिषिक्त राजाच झाला. सज्जन, चोर व बदमाश हे सर्व त्याचे नाव ऐकताच सारखेच चळचळ कापायचे.
  आनंदपाल सिंगाच्या उदयाच्यामुळाशी अशा अनेक घटना व घटक आहेत. सूड, जातिवैमनस्य, राजकीय वरदहस्त आणि खंडणी हे त्यातील काही प्रमुख घटक आहेत. त्याच्या नावावर खुनासारखे दोन डझन गंभीर गुन्हे आहेत. त्यापैकी नागोर जिल्ह्यातील दिलवारा येथील जीवनराम गोदारा खून खटला व सिकार जिल्ह्यातील गोपाल फोगावत खून खटला हे दोन खटले जातिवैमनस्यामुळेही विशेष प्रसिद्धी पावले होते.
   पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर आनंदपाल सिंग याच्या पाठीराख्यांनी ही चकमक बनावट आहे, असा आरोप करून राजस्थानभर हैदोस घातला. रस्ते बंद केले, सार्वजनिक मालमत्ता लुटली, पोलिसांविरुद्ध निदर्शने केली व सीबीआय चौकशीची मागणी केली.
  एका कुख्यात गुंडाला एवढे जनसमर्थन कसेकाय मिळाले याचा शोध घेतांना विचारवंत, समाजधुरीण व मानसशास्त्रज्ञ यांच्या मेंदूला मुंग्या आल्या. रजपुतांसारखीच जाट हीही अशीच लढवैय्या जात राजस्थानमध्ये आहे. या दोघात इतिहासकाळापासूनचे वैमनस्य आजही तसेच कायम आहे. या दोघातील वर्चस्वासाठीची तेव्हापासून चालू असलेली लढाई थांबण्याचे नाव घेत नाही.
    आनंदपाल सिंगाची जात रावण रजपूत आहे. अन्य रजपुतांमध्ये बेटी संबंधासाठी ही जात हलकी समजली जाते. त्यातच आनंदपाल सिंग आपल्या लग्नात नवरदेव म्हणून घोड्यावर बसून मिरवत आला होता. रावण रजपुतांना हा अधिकार नाही. त्यामुळे ‘श्रेष्ठ’ जातीचे रजपूत चांगलेच संतापले होते. पण त्याने ज्या गुंडांना मारले ते जाट समाजाचे होते. जातींमधील संघर्षात वरचढ होत चालले होते. त्यामुळे आनंदपाल सिंगाचे ‘कनिष्ठ’ जातीचे असणे मागे पडले. ऐतिहासिक काळात जाटबहुल भागावरही रजपुतांचे राज्य असे. ही सल जाट समाजात आजही कायम आहे. खरेतर रजपूतही आनंदपालला खालच्या स्तरावरचेच मानीत होते. पण त्याच्या मृत्यूने त्याला हौतात्म्य प्राप्त झाले व जाट गुंडांचे पारिपत्य करणारा शूर रजपूत असेच सर्व रजपूत आनंदपाल सिंगला मानू लागले. तो आता सर्व रजपुतांचा हीरो झाला व ते सर्व त्याच्या पाठीशी एकमुखाने उभे झाले आहेत. जेव्हा एखाद्या सत्ताकेंद्राचे विघटन होते, तेव्हा समाजशास्त्राचा नियम असा आहे की, ती पोकळी फारकाळ तशीच राहत नाही, कुणीतरी ती भरून काढतेच. तसेच आनंदपाल सिंग याचे झाले होते. 
    तसेच याच्या जोडीला पद्मावत चित्रपटाचे चित्रीकरणच उधळून लावण्याचा रजपूत करणी सेनेचा प्रयत्न, पुढे त्या चित्रपटाचे निमित्ताने त्यांनी घेतलेल्या अतिशय आक्रमक भूमिकेतून उसळलेला आगडोंब व चित्रपटाचा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याच्या श्रीमुखात भडकावून त्यांनी घेतलेली टोकाची भूमिका या सर्वांचा राजस्थानमधील येत्या दोन्ही निवडणुकीवर नक्कीच प्रभाव पाडणार आहे, असे निदान आजचे तरी चित्र आहे.
  जाट, रजपूत, गुजर व मीना या राजस्थानमधील प्रभावी व राजकीय दृष्ट्या जागृत जाती आहेत. जिकडे जाट, तिकडे रजपूत असणार नाहीत, तसेच जिकडे गुजर तिकडे मीना असणार नाहीत. आपल्या पोळ्या शेकण्यासाठी राजकीय पक्षांना हे सोयीचेही ठरत असते. अडचण होते ती सबका साथ, सबका विकास, ही भूमिका घेणाऱ्यांची. त्यांच्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन चालतांना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. पण त्यालाच तर राजकारण म्हणतात, नाही का?


No comments:

Post a Comment