Thursday, October 25, 2018

वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारा एका शिक्षिकेचा मानसपुत्र - हॅरी पॉटर

वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारा
एका शिक्षिकेचा मानसपुत्र - हॅरी पॉटर
व.ग. काणे ,
एल् बी 7, लक्ष्मीनगर, पाण्याच्या   टाकीजवळ, नागपूर -440 022 (महाराष्ट्र)
दूरध्वनी- 0712 -2221689  भ्रमणध्वनी 9422804430

 हॅरी पॉटर हा एका लोकप्रियतेचा उच्चांक मोडणार्‍या महाकथानकाचा महानायक म्हणून जगभर प्रसिद्धी पावला आहे. जादुटोणा, चेटुक, करणी यांची जागोजागी पेरणी असणारे कथानक हे या कथेचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकाचे सात खंड प्रकाशित झाले आहेत. यावर सिनेमे, नाटके, स्पर्धा, ध्वनिआवृत्ती (ऑडिओ कॅसेट) अशा प्रसार माध्यमाच्या सर्व प्रकार प्रकारावर लोक अक्षरश: लट्टू झाले आहेत. न्यूयॉर्क येथे चित्रपट मालिकेच्या शेवटच्या भागावर  तर लोक अक्षरश: तुटून पडले होते.
  ’युनिव्हर्सल’ किंवा ’डिस्ने लँड’ने हॅरी पॉटर या एका कल्पित कथानकाच्या महानायकाच्या नावे बंगलुरुच्या ’वंडरला’ प्रमाणे किंवा मुंबई जवळच्या एस्सेल वर्ल्ड प्रमाणे ’अ‍ॅम्युसमेंट पार्क’ सुरू केला आहे. यात या लोकांचा व्यापारी दृष्टिकोन जसा दिसून येतो त्याचप्रमाणे हॅरी पॉटरची अफाट लोकप्रियताही लक्षात येते.
रसिकांनी फतवा धुडकावला.
चर्चने मात्र या कादंबरीबद्दल एक ’फतवाच’ जाहीर केला होता. ’कोणाही ख्रिश्‍चनाने ही कादंबरी वाचू नये’, असे बजावले होते. कारण जादुटोणा, चेटुक, करणी ह्या प्रकारांना ख्रिश्‍चन धर्माचा (बायबलचा) विरोध आहे. या गोष्टी ख्रिश्‍चन धर्मात निषिद्ध मानल्या जातात. त्यामुळे हे पुस्तक कुणी वाचू नये, यावरील तयार सिनेमा कुणी पाहू नये, याची ध्वनिआवृत्ती कुणी ऐकू नये अशा आशयाचे फतवे चर्चने काढले पण हे साफ धुडकावून लावीत ही कादंबरी विकत घेऊन वाचण्यासाठी, सिनेमे पाहण्यासाठी, नाट्यप्रयोगांना हजर राहण्यासाठी जवळजवळ सर्व जगातले आबालवृद्ध रांगा लावून ताटकळत उभे राहिलेले सगळ्यांनी पाहिले आहेत. सिनेमाचे ’अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ सुरू होते न होते तोच ’हाऊस फुल्ल’ चा बोर्ड लावण्याची पाळी येते. न्यूयॉर्कलाही ह्याच गोष्टीचा प्रत्यय आला. पुस्तकाच्या नवीन आवृत्तीच्या विक्रीला सुरवात होते न होते तोच ती आवृत्ती हातोहात संपली. मूळ आवृत्ती निघताच चोवीस तासाच्या आत ’पायरेटेड आवृत्ती’ निघते अणि तीही हातोहात संपते.
वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन
असे काय आहे या कादंबरीमालिकेत? या कादंबरीचा नायक ’हॅरी पॉटर’ तरूण जगतावरच नाही तर आबलवृद्धांच्या भावविश्‍वावर वर्षानुवर्षे (नक्की सांगायचे म्हणजे तब्बल दहा वर्षे) अधिराज्य गाजवतो आहे. देश, भाषा, वय, लिंग, धर्म या सर्वांच्या भिंती तोडून हॅरीने प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळविले आहे. उत्कंठा, रहस्य, थरार, रोमांच भरभरून असलेल्या कथेचा महानायक हॅरी प्रारंभी अगदी दुबळा आणि अगतिकच होता. पण संघर्ष लादला जातो तेव्हा तो धाडसी होतो. कितीही संकटे आली तरी तो डगमगत नाही, डळमळीत भूमिका घेत नाही, प्रत्येक गोष्ट शेवटास जाईतो तिचा पिच्छा सोडत नाही, वाईटावरही चांगल्यानेच विजय मिळविण्याचे व्रत सोडत नाही. अशी ही वाईटा विरुद्ध चांगल्याची लढाई आहे. आपल्या रामायण, महाभारतची उंची कितीतरी मोठी आहे, हे खरे पण ’राऊलिंग बाईच्या’ मानसपुत्राची ही कथा अधूनमधूत त्यांची आठवण करून देते. याचे प्रमुख कारण असे आहे की तिने आपले लिखाण साहित्यकृतींच्या रूढ चौकटीपासून मुक्त करून चाकोरीबाहेर नेले आहे. त्यामुळे केवळ मुलेच नाही तर आबालवृद्ध नागरीक पुन्हा एकदा पुस्तकांकडे/ वाचनाकडे वळले. मृतप्राय झालेल्या वाचन संस्कृतीने कात टाकली आणि एक नवीन, रसरशीत, टवटवीत रूप घेऊन ती पुन्हा जन्माला आली. वाचन संस्कृती लोप पावते आहे, अशी हाकाटी संपूर्ण जगभर होत असण्याचा आजचा काळ आहे. ’लोकांना पुन्हा पुस्तकांकडे कसे वळवता येईल’ या विषयावर विद्वानांमध्ये चर्चा होत आहेत, परिसंवाद घेतले जात आहेत. आणि कोण कुठली ही बाई, आपल्या बालकथेने अख्ख्या जगाला वेड लावते आहे, हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय कसा काय झाला, हे कोडे जाणून घेतलेच पाहिजे.
मुलखावेगळी शाळा - हॉगवर्टस् स्कूल
   या कथेत दोन अफाट कल्पना केल्या आहेत. एक म्हणजे हॉगवर्टस् स्कूल. या शाळेत मानवांमधील ’विझार्ड’ प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असते. विझार्ड या शब्दाचा शब्दकोषातील अर्थ मुखवटा (मास्क) किंवा चेहरे झाकण्यासाठी ऐतिहासिक काळात वापरले जाणारे हेल्मेट असा आहे. या कादंबरीत हा मानवांचा एक प्रकार मानला असून या मानवांमध्ये जादूटोणा करण्याची क्षमता असते असे मानले आहे. अशा मानवांच्या मुलांना जादूटोण्याचे  शिक्षण देणारी ही शाळा आहे. डंबलडोर हा शाळेचा मुख्याध्यापक असून तो चांगल्या कामासाठी जादूटोण्याचा वापर कसा करावा हे शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतो. पण व्हाँडेमॉर्ट हा एक दुष्ट प्रवृत्तीचा विझार्ड असतो. त्याची दुष्टाव्याच्या आधारे संपूर्ण जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा असते. हॅरी पॉटर हा विझार्ड प्रकारचा मानव आहे, हे कळताच डंबलडोर  त्याला आपल्या शाळेत ’पुढील शिक्षणासाठी’ घेऊन येतो. व्हाॅंडेमॉर्ट हा क्रूरकर्मा आणि चांगल्याचा पुरस्कार करणारा हॅरी यांचा संघर्ष या कथेत दाखविला आहे.
अख्खे जग वेडे झाले
   इंग्लंड मधील एका गावात जोन कॅथलिन राउलिंग नावाची एक शिक्षिका  होती. तिला गोष्टी सांगण्याची फार हौस होती. गोष्टी वेल्हाळ पोरंसोरं तिच्यावर जाम खूष असत. कारण तिच्या गोष्टींमध्ये परी असे, परी बरोबर चेटकीण आलीच. आणि जादुटोणा करणार नाही तर ती चेटकीण कसली? भूत पिशाच्च यांचे नाव काढताच अख्खी बच्चा कंपनी भेदरून जात असली तरी ती नसली तर गोष्ट रंगणार कशी? या कादंबरीची सुरवात कशी झाली हे पाहणे जसे रंजक आहे तसेच ते बोधप्रदही आहे. या कथानकाचा नायक हॅरी हा एक अनाथ मुलगा मावशीच्या वाढत असतो. या घरी त्याचा अतोनात छळ होत असतो आणि त्याला अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत असते. शेवटी त्याला ज्या शाळेत डंबलडोरच्या प्रयत्नाने  आणण्यात येते  ती शाळा वाईट कामासाठी प्रसिद्ध असते. म्हणजे भूतखेत, जादुटोणा, करणी करणार्‍यांचा तो एक अड्डाच असतो. त्यामुळे ’बिच्चारा हॅरी’ वाचकांसमोर प्रगट होताक्षणीच त्यांची सहानुभूती खेचून घेतो. एकेका जीवघेण्या संकटावर तो मात करतो, सहकार्‍यांनाही सोडवतो, दुष्टशक्तींवर मित्रांच्या सहकार्याने मात करतो आणि वाचक/ श्रोते/ प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनतो. असा भरभक्कम मालमसाला घेऊन आलेले या कादंबरीचे पहिले हस्तलिखित काही प्रकाशकांनी नाकारले होेते. 1997 मध्ये तिने या कादंबरीचा पहिला भाग लिहून प्रसिद्ध केला आणि शेवटच्या आणि सातव्या भागावर आधारित चित्रपट 15 जुलै 2011 रोजी प्रदर्शित झाला. या कादंबरीचे एकेक भाग जसजसे प्रकाशात आले तसतसे या कादंबरीने विश्‍वविक्रम मोडले. तिचे एकूण 80 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. हॅरी पॉटर, हर्मायनी, रॉन, डंबलडोर, स्नेप, लॉर्ड व्होंडेमॉर्ट, माल्फाय ह्या पात्रांची नावे सर्वतोमुखी झाली. व्हाँडेमॉर्ट हा क्रूरकर्मा आहे. त्याचा व वाईट कामांसाठी सर्वप्रकारचे दुष्ट हातखंडे वापरणार्‍या दुष्टांचा खातमा हॅरी आणि त्याचे साथीदार कसा करतात, हे मुळातूनच वाचावयास हवे. आज जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये रोलिंगबाईचा 142 वा क्रमांक लागतो. या कादंबरीचा सातवा भाग प्रसिद्ध झाला आणि लेखिकेने लिखाण थांबवण्याचे निश्‍चित केले. पण वाचक तिला असे करू देतील का, अशी तिला भीती वाटत होती. या पूर्वी एका लेखकाची झालेली पंचाईत ती विसरू शकत नव्हती. या लेखकाचे नाव होते सर आर्थर कॉनन डॉईल. हा लेखक ’शेरलॉक होम्स’ या प्रसिद्ध गुप्तहेर पात्राचा जनक होता. या पात्राच्या कथांनीही जागतिक उच्चांक मोडले होते. शेवटी ’केव्हातरी थांबलेच पाहिजे’, असा विचार करून लेखकाने एका प्रकरणी होम्सचा अंत होतो असे दाखविले. पण होम्सचे चाहते खवळले. त्यांनी फार मोठे आंदोलन उभारले आणि शेवटी कॉनन डॉईलला आपल्या मानसपुत्राचे पुनरुज्जीवन करण्यास भाग पाडले. त्याला ’द रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स’ या नावाने एक नवीन कथामालिका लिहिण्यास चाहत्यांनी भाग पाडले. तसाच प्रकार हॅरी पॉटरच्या बाबतीत झाला तर? कारण हॅरी पॉटर हाही असाच एक कल्पित महानायक झाला होता.
राऊलिंगबाईची कॉनन डॉईलवर मात
    पण अशी पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून लेखिकेने एक युक्ती योजली आणि कॉनन डॉईलवर मात केली. तिने आपल्या सातव्या भागाचा शेवट अतिशय खुबीदारपणे केला आहे.व्हाँडेमार्ट या खलनायकाच्या खातम्यानंतर हॉगवर्ट स्कूल मधील चेटकाचे सगळे वाईट प्रकार थांबले दुष्टाव्यासाठी करणी करणार्‍यांची मती कुंठित झाली, दुष्टपणा म्हणून जादुटोणा करणारे जळून भस्मसात झाले आणि वाईट प्रकारचा जादुटोणा बंद झाला. स्वत: हॅरी पॉटरने या कामी फार महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो आता मोठा झाला होता. त्याने मिनिस्ट्रीत (पोलिसखात्यात) नोकरी पत्करली होती. त्याचे लग्न झाले होते. त्याला दोन मुलेही झाली होती. आता त्याची विझार्डंसाठी असलेली शाळा पूर्णपणे शापमुक्त झाली होती. त्या शाळेत आता चांगल्या कामांसाठी जादू कशी वापरावी याचेच शिक्षण दिले जात असते. म्हणून त्याने आपल्या दोन्ही मुलांना याच शाळेत घालायचे ठरविले होते. तो रेल्वे स्टेशनवर मुलांना घेऊन आला होता. सोबत त्याचा मित्र रॉन हाही सपत्निक याच कामासाठी आला होता. लवकरच गाडी येणार होती. आणि मुले शिक्षणासाठी आपल्या वडिलांच्याच शाळेत शिकायला जाण्यासाठी प्रस्थान करणार होती. याचवेळी त्याचा मित्र रॉन हाही आपल्या मुलांना घेऊन याच कामासाठी आला आहे. इथे लेखिकेने कादंबरीचा शेवट  केला आहे.
कथानक, तंत्र, मांडणी, सादरीकरण ह्या सर्वांगाने सर्वोत्तम कलाकृती
    एका शिक्षिकेने शालेय जगत ही  पार्श्‍वभूमी घेऊन रचलेली ही लोकविलक्षण कलाकृती आहे. ह्या कादंबरीचे सात भाग क्रमाक्रमाने सरस आणि उत्सुकता वाढविणारे आहेत. हिचे सर्व भागच नव्हेत तर तिची सर्व रूपे म्हणजे कादंबरी, चित्रपट, ध्वनिआवृत्तीचे क्रमश: वाचन सारखीच लोकप्रिय ठरली आहेत. ह्या कथेचे हे वैशिष्ट्य अभ्यासलेच पाहिजे, असे आहे.
सवंग लोकप्रियतेसाठी प्रयत्न नाहीत.
    सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की लेखिका सवंग लोकप्रियतेच्या मागे लागली नाही. सवंग लोकप्रियतेसाठी कथाकादंबर्‍यात नाचगाणी व दारू पिऊन धिंगाणा, मारामार्‍या, खून आणि खुनशीपणा यांची जागोजाग पेरणी केलेली आढळते. स्त्रीपुरुषाचे अश्‍लील चाळे दाखविलेले असतात. या कथानकातही प्रेमसंबंध दाखविले आहेत. हॅरीचा मित्र रॉन दुसर्‍या एका मुलीबरोबर गेला तेव्हा हर्मायनी (मनातल्यामनात रॉनवर प्रेम करणारी नायिका) हॅरीच्या खांद्यावर मान टाकून ढसढसा रडते, तेव्हाच वाचक/श्रोते/प्रेक्षक यांना त्यांच्यातील प्रेमसंबंधांची माहिती कळते.
सामूहिक नेतृत्वाची चाहूल
   कथानकाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की हॅरी हा जनसामान्याचा प्रतिनिधी दाखविला आहे. त्याच्या अंगी एखाद्या अवतारी पुरुषाच्या अंगी असावे असे अफाट कर्तृत्व नाही. तो आपल्या मित्रांचे सहकार्य घेतो तसेच तो त्या मित्रांनाही त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी  धावून जाऊन मदत करतो. सामूहिक नेतृत्वाच्या उद्याच्या जगातील आगमनाची चाहूल या निमित्ताने आपल्याला लागते. स्वत: लेखिकेची सुद्धा हीच भूमिका असावी असे मानायला भरपूर आधार आहे.
    जगातील कोट्यवधी आबलावृद्धांच्या भावविश्‍वावर गेले संपूर्ण दशक अधिराज्य गाजविणारी ही कथा खरेतर बालगोपालांचे रंजन करण्याच्या हेतूने सांगितलेली आहे. कथा रचणारी रचयिती एक शिक्षिका आहे. कोणी महान साहित्यिक वगैरे नाही. पण आज ती अब्जाधीश झाली आहे. कारण कथानकाचे सर्व प्रकार वाचावे, ऐकावे, बघावे (कादंबरी, ध्वनिआवृत्ती, चित्रपट) असे झाले आहेत. या कादंबरीचे वाचन हा तर आदर्श वाचनाचा (मॉडेल रिडिंग) पाठ ठरावा असा झाला आहे. कादंबरीचा विषय किंवा कथानक कुणाला आवडो किंवा न आवडो पण श्रोते, वाचक, प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी, ते खेचून तसेच कायम ठेवण्यासाठी ,कथानक रंजक करण्यासाठी, ते प्रत्येक भागागणिक उत्कंठा वाढविणारे व्हावे म्हणून या शिक्षिकेने कोणती तंत्रे वापरली, उपाय केले, युक्ती योजली, ते जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने हे सर्व प्रकार मुळातून अनुभवावे असे झाले आहेत.
डॅनियल रॅडक्लिफ या नटाने साकारली हॅरीची भूमिका
   डॅनियल 2001 साली तो अकरा वर्षांचा बालक होता. आज तो एकवीस वर्षांचा युवक आहे. वाढत्या वयाबरोबर त्याची आणि सात चित्रपट मालिकांची लोकप्रियताही सतत झेपावत होती. सर्व जग डॅनियलने साकारलेल्या हॅरी पॉटरचे चाहते आहे. कथानकातला खलनायक पण व्यावहारिक जगातील हॅरीचा जानी दोस्त (फास्ट फ्रेंड) हे दोघेही आपल्या सचिन तेंडुलकरचे ’डाय हार्ड फॅन्स’ (बेफाम चाहते) आहेत. हॅरीला (डॅनियलला) भारतभेटीची ओढ लागली असून तो भेटी दरम्यान सचिनची भेट घेऊन त्याची स्वाक्षरीही आपल्या संग्रही ठेवणार आहे.
गोलभिंगाचा चष्मा आणि जादूची छडी
   वॉर्नर ब्रदर्सनी या कथानकावर चित्रपटामागून चित्रपट काढले. त्यात काम करणारे ’नट नट्या’ यांना सुद्धा अफाट लोकप्रियता लाभली आहे. हॅरी पॉटर हा गोलभिंगाच्या काचा असलेला चष्मा (महात्मा गांधीफेम) घालणारा नायक पहिल्या चित्रपटापासून  सातव्या चित्रपटात दाखविला आहे. एकच नट ही भूमिका सर्व चित्रपटात  करतो आहे, असे नव्हे, तर पहिल्या चित्रपटात काम करणारी नटनट्यांची चमूच सातही भागात तीचती वेषभूषा, केशभूषा, रंगभूषा करून वावरते आहे. प्रत्येक भागागणिक त्यांचे वयही वाढलेले आपोआपच दिसते आहे. त्यासाठी मुद्दाम वेगळा ’मेकअप’ करण्याची गरज भासली नाही. भूमिकेसाठी वेगळे नट घेतल्याची दोनच उदाहरणे आहेत. फक्त हे दोनच कायते अपवाद आहेत. एक म्हणजे शाळेचा मख्याध्यापक डंबलडोर आणि दुसरा आहे एक छोटीशी भूमिका वठवणारा नट. डंबलडोरची भूमिका दुसर्‍या नटाला द्यावीच लागली कारण पहिल्या नटाचे मध्येच केव्हातरी निधन झाले. या सर्वच पात्रांना अफाट लोकप्रियता लाभली आहे. त्यातही हॅरी पॉटरची सतत चष्मा लावून वावरणारी ’छबी’ तर लोकप्रियतेच्या शिखरावर कायम आरूढ झाली आहे. तिला एक वेगळे आणि स्वतंत्र ’चारित्र्य’ प्राप्त झाले आहे. हॅरी किशोर/तरुणांचा आयकॉन (आदर्श) झालेला आहे. या चित्रपटात सतत वापरली जाणारी ’जादूची छडी’ (स्विंगिंग बँड) सुद्धा अशीच प्रसिद्धी पावली आहे.
हॅरी पॉटरचे प्रतिमाभंजन झाले.
   मध्यंतरी असे घडले की, संततीनियमनाची साधने (कंडोम) तयार करणार्‍या एका स्विस कंपनीने या साधनांच्या वेष्टनावर एका तरुणाचे चित्र छापले. हा तरूण गोल भिंगाचा चष्मा वापरताना दाखवला आहे. तसेच शेजारी एक छडी दाखविली आहे. ही छडीसुद्धा अगदी ’त्याच जादूच्या छडीसारखी’(स्विंगिग बँड) दिसते आहे.
    या प्रकारामुळे आपल्या या कल्पित कथानायकाचे ’प्रतिमा भंजन’ झाले आहे आणि या महानायकाची सकारात्मक भूमिका डागाळली गेली आहे असा आक्षेप घेऊन ’वॉर्नर ब्रदर्स’ ने कंडोम बनविणार्‍या स्विस कंपनीला कोर्टात खेचले. या कंडोमवरच्या वेष्टनावरील तरुणाचे नावही या कंपनीने ’हॅरी पॉपर’ (हॅरी पॉटरशी साम्य असलेले) असे ठेवले आहे. त्यामुळे ’वॉर्नर ब्रदर्स’च्या दाव्याला चांगलेच बळ प्राप्त झाले. शेवटी कंडोम बनविणार्‍या कंपनीने ही जाहिरात परत घेण्याचे मान्य केले आहे.
विद्यापीठाच्या अभ्याक्रमात हॅरी पॉटर
   डरहॅम विद्यापीठाने या कथानायकाच्या महानायकाचा - हॅरी पॉटरचा - अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या कथेतला जादुटोणा, चेटुक बाजूला ठेवून ’पॉटर मॅनिया’चा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संदर्भात अभ्यास योजला आहे. सत्तर विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असून ’हॅरी पॉटर आणि भ्रम/भासाचे युग’(हॅरी पॉटर अँड द एज ऑफ इल्यूजन) ह्या विषयाचा अभ्यास करून विद्यार्थी बॅचलर ऑफ आर्टसची (बी ए ची) पदवी घेणार आहेत.
   या कथानकाच्या  लोकप्रियतेची कारणे कोणती, याचा अभ्यास हे विद्यार्थी करणार आहेत. आजच्या शिक्षणपद्धतीच्या संदर्भात हॅरी पॉटरचे कथानक कितपत मिळतेजुळते (रिलेव्हंट) आहे, याचाही अभ्यास हे विद्यार्थी करणार आहेत.

No comments:

Post a Comment