Friday, July 12, 2019

ती वीस पावले

   ती वीस पावले
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यातील सीमा रेषा ओलांडून वीस पावले टाकून उत्तर कोरियाच्या भूमीवर पाय ठेवला आहे. या भेटीचे जागतिक राजकारणात एवढे महत्त्व आहे की, कुणीतरी पावलांची  ही नेमकी संख्या मोजली आहे. संवाद संस्कृतीच्या इतिहासात ही घडी एक ऐतिहासिक घडी मानली जाईल, असे काही भाष्यकार म्हणत आहेत तर काहींना या सर्व कथाभागाला जे महत्त्व आहे, ते केवळ प्रतिकात्मक आहे, असे वाटते आहे. तर काहींना ‘हा पब्लिसिटी स्टंट’ वाटतो आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी टाकलेली ही पावले एका कोरियासारख्या छोट्याशा द्विपकल्पात टाकलेली पावले नाहीत तर ती अख्या भूतलावर आजवर टाकलेल्या पावलातील महत्त्वाची पावले ठरणार आहेत, असेही काहींना वाटते आहे. तर काहींना तर या घटनेचे महत्त्व इतके जास्त वाटते आहे की त्यांनी त्यावेळची स्थानिक वेळ 3 वाजून 45 मिनिटे होती, असा तपशील नोंदवून ठेवला आहे. ट्रंप आणि किम जाॅंग उंग यांच्यातील चर्चेच्यावेळी या दोघांव्यतिरिक्त दुसरे कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे या दोघात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे कळायला मार्ग नाही. पण या भेटीअगोदर डोनाल्ड ट्रंप यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांचे सोबत जेवता जेवता चर्चा केली होती, ह्या सामान्य घटनेलाही बरेच महत्त्व प्राप्त प्राप्त झाले आहे.
  अशी ही दोन वेगळी व्यक्तिमत्त्वे
   यावेळी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाॅंग उन यांच्या चेहऱ्यावर दिलखुलास हास्य फुललेले कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही व्यक्ती आजवर सर्व जगाने तिरस्कार करीत वाळीत टाकलेली कदाचित एकमेव व्यक्ती असावी. अण्वस्त्रधारी होण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगून असलेली एक व्यक्ती, जगाने अव्हेरलेली एक व्यक्ती, एक अत्यंत अविश्वसनीय व्यक्ती, मानवी हक्क प्रतिक्षणी पायदळी तुडवणारी व्यक्ती अशा अनेक ‘उपाधी’  किमच्या नावाअगोदर किंवा नंतर लावल्या जात. तर डोनाल्ड ट्रंप हे एक धसमुसळे आणि फारसा विधिनिषेध न पाळणारे म्हणून ओळखले जातात. एकूण काय तर दोन्ही व्यक्तिमत्त्व् आपापल्या परीने विरळीच आहेत.
  किमसारख्या सर्वगुणसंपन्न व्यक्तीची भेट घेण्यासाठी जगातल्या पहिल्या क्रमांकाच्या महाशक्तीचा प्रथम नागरिक थोडी थोडकी नव्हे तर मोजून वीस पावले चालून गेला ही आजवरची एक सर्वात मोठी ऐतिहासिक घटना ठरेल, असे आजतरी सर्वांना वाटते आहे. अकस्मात घडलेली आणि म्हणून जशीच्या तशी जगभर प्रसृत (ब्राॅडकास्ट) झालेली ही घटना डोनाल्ड ट्रंप आणि किम यांना कूटनीतीतील शिखरावर पोचविती झाली आहे. राजकारणात व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यादृष्टीने डोनाल्ड ट्रंप यांच्या शिरपेचातील हे एक चमचमणारे पीस ठरावे असे आहे.
   भेट कशासाठी?
    अशा प्रकारची विशेषणांची बरसात क्वचितच पहायला मिळते. पण ती बाजूला सारून रोखठोक विचार प्रसृत व्हायलाही सुरवात झाली आहे. ट्रंप यांनी किम यांना अमेरिकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले आणि ते किम यांनी ते ताबडतोब स्वीकारले सुद्धा. पण प्रत्यक्षात ही भेट नजीकच्या भविष्यकाळात घडून येईल असे निरीक्षकांना वाटत नाही. कारण अमेरिकेत लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होणार ती पार पडल्याशिवाय कोणतीही महत्त्वाची हालचाल होण्याची शक्यता नाही. पण डोनाल्ड ट्रंप निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत, हे स्पष्टपणे दिसू लागले आहे. या भेटीमुळे अमेरिकेत आपल्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा आणि नवीन झळाळी प्राप्त होईल, असा डोनाल्ड ट्रंप यांचा कयास असावा आणि म्हणून हा प्रयास असावा, असे निरीक्षकांचे मत आहे. अमेरिकेतील अंतर्गत राजकारणाचा विचार केला तर हा काळ संक्रमणाचा काळ आहे. वर्षभरात नवीन अध्यक्षाची निवडणूक होणार आहे.  ती पार पडल्यानंतरच नवीन अध्यक्ष महत्त्वाचे राजकीय निर्णय घेईल.
   पण या घटनेला जागतिक पैलूही आहेत. दुसऱ्या महायुद्धात एकसंध कोरियावर एकीकडून अमेरिकेने तर दुसरीकडून रशियाने चाल केली होती. रशियाने जिंकलेला भाग म्हणजे उत्तर कोरिया. तिथे साम्यवादी राजवट स्थिरपद झाली. अमेरिकेने जिंकलेला भाग म्हणजे दक्षिण कोरिया. इथे लोकशाही राजवट आली. दक्षिण कोरियाची भरभराट झाली तर उत्तर कोरिया भणंग भिकारी होऊन किम यांच्या जुलमी राजवटीत पिचत राहिला. पण त्याने अण्वस्त्रधारी होण्याचा ध्यास घेतला. अमेरिकेविरुद्ध उभारावयाच्या आघाडीचा एक प्यादा म्हणून किमच्या महत्त्वाकांक्षेला चीन व रशिया यांनी अहमहमिकेने खतपाणी घातले. पण आजमितीला या दोघांनाही हा मोती नाकापेक्षा जड वाटू लागला आहे, असे वाटावे, असे संरकेत आहे. पण त्याचबरोबर उत्तर कोरिया आपल्याच कह्यात असावा, अशी सूप्त चुरस रशिया आणि चीन या दोघातही आहे.
   चतुर किम
   किम हे तसे चतुर व्यक्तिमत्त्व आहे. हळूहळू आपण चीन आणि रशिया या दोघांनाही नकोसे होत चाललो आहोत, हे त्यांनी नक्कीच ताडले असणार. मुळात अमेरिकेवर गुरगुरण्याची हिंमत किमने दाखविली ती चीनच्या भरवशावर. वाटाघाटींना सुरवात झाली ती सुद्धा चीनने मान डोलावल्यावरच. पण अमेरिकेशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करता आले तर ते किमसाठी बरेच आहे की. रशिया आणि चीनही मग चुचकारणं चालू ठेवतील. राजकारणात कोण केव्हा कोणती खेळी खेळेल, हे सांगता यायचे नाही.  नक्की काय आहे त्याचा उलगडा व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत वाट पाहणेच आपल्या हाती आहे.
अमेरिकेत खळबळ पण उलटसुलट मतप्रदर्शन
  पोप फ्रान्सिस यांनी भेटीचे स्वागत केले आहे. अमेरिकेत डेमोक्रॅट पक्षात या भेटीचे पडसाद उमटले नसते तरच नवल होते. निरनिराळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
  गेल्या निवडणुकीतील एक उमेदवार सिनेटर बर्नी सॅंडर्स यांनी म्हटले आहे की, उत्तर कोरियाचे बाबतीत कधी धमक्या तर कधी गळाभेट हा प्रकार डोनाल्ड ट्रंप यांच्या धरसोडवृत्तीशी सुसंगतच आहे.
 निदान हा फक्त देखावा आणि प्रसिद्धीसाठीची स्टंटच ठरू नये म्हणजे मिळविली, अशी कोपरखळी अनेकांनी वाहिन्यावरील चर्चेतही मारलेली आढळते.
  तर हे कुंपणापलीकडच्या शेजाऱ्याशी वस्तूंची देवाघेवाण करावी, तसे झाले. राजकीय वाटाघाटींच्या मुळाशी निश्चित भूमिका आणि उद्दिष्ट हवे, दुसऱ्या एका सिनेटरची प्रतिक्रिया होती.
 थांबा आणि वाट पहा, याची फलश्रुती समोर येईल तेव्हाच काही प्रतिक्रिया द्यायचे  बघू, अशी सावधगिरी बाळगणारेही कमी नाहीत.
 डोनाल्ड ट्रंप यांना एका हुकुमशहाची अशाप्रकारे भेट घेताना लाज कशी वाटली नाही, अशी जळजळीत भडास व्यक्त  करीत मानवाधिकारवाद्यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली आहे.
अशी भेट घेण्यापूर्वी  अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा काहीतर विचार करायला हवा होता? ही घटना आपल्याला कमीपणा आणणारी आहे, असे अनेक अमेरिकनांना वाटते आहे.
  एका क्रूर आणि बेदरकार हुकुमशहाशी अशी सलगी करून प्रसिद्धी मिळविणे म्हणजे अमेरिकेच्या सुरक्षेशी, तडजोड करण्यासारखे आहे. आता आपल्या मित्रांना आणि मानवी मूल्य जपणाऱ्यांना कसे तोंड दाखवणार?
   बराक ओबामा यांचीही किमशी भेट घेण्याची इच्छा होती, त्यांना ते जमले नाही, मला ते जमते आहे, म्हणून डेमोक्रॅट पक्ष माझ्यावर आगपाखड करतो आहे, असा टोमणा डोनाल्ड ट्रंप यांनी  डेमोक्रॅट पक्षावर मारला आहे.  तर हे धडधडीत असत्य आहे. बराक ओबामा यांनी किमची भेट घेण्याचा विचार कधीही केला नव्हता, असे डेमोक्रॅटिक पक्षाने जाहीर केले आहे.
तर सीएनएन या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, ही भेट ही एक ऐतिहासिक घटना आहे, हे मान्य पण उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा त्याग कधीही करणार नाही, हे नक्की. प्रत्यक्ष वाटाघाटी सुरू होताच हे स्पष्ट होईल. अहो, कारण अण्वस्त्रांच्या भरवशावरच तर किमचे आसन टिकून आहे.
   ही भेट वाटते तेवढी व तशी अचानक झालेली नाही. दोन्हीकडच्या प्रतिनिधींची अगोदर भरपूर वेळ गुप्त खलवतं झाली होती. अचानक भेट हे शुद्ध नाटक आहे.
   एकूण काय तर   नक्की काय झालं आहे, याची नोंद एकट्या चित्रगुप्ताजवळच असेल, नाही का?

No comments:

Post a Comment