Saturday, December 28, 2019

ज्ञानयोद्धा व्याख्यानमाला
   समाज प्रबोधनाचा साप्ताहिक अभिनव प्रयोग

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
९४२२८०४४३०    E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    जनतेमध्ये निरनिराळ्या विषयांची माहिती पोचवून प्रबोधन घडवून आणणे हा कोणत्याही व्याख्यानमालेचा उद्देश मानला जातो. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात वृत्तसृष्टीने आपली कात टाकलेली नव्हती, त्यामुळे त्या काळात व्याख्यानमाला हेच ज्ञानप्रसाराचे एक प्रमुख माध्यम म्हणून स्वीकरले गेले, असे उल्लेख आढळतात. व्याख्यानमालेद्वारे संस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे विषय, विज्ञान, आरोग्य, साहित्य, अर्थकारण, कायदा, शिक्षण आणि इतिहास असे सर्व प्रकारचे विषय हाताळले जात. इंग्लंडमधील हाईड पार्क वरील व्याख्याने, पुण्याची वसंत व्याख्यान माला, न्यायक्षेत्रातील व्हि. एम. तारकुंडे मेमोरियल व्याख्यानमाला आदींची नावे आपल्यापैकी अनेकांना नक्कीच माहीत असतील. अशीच एक व्याख्यानमाला, ज्ञानयोद्धा व्याख्यानमाला या नावाने श्री दिलीप देवधर यांच्या संयोजकत्वाखाली नागपुरात 2008 पासून दर शनिवारी नियमितपणे सुरू असली तरी हा उपक्रम 1 जानेवारी 1969 पासून निरनिराळ्या शीर्षकानुसार सुरू होता.
   सूत्रधार - दिलीप देवधर
  नागपुरातील एक प्रतिष्ठित उद्योजक, श्री दिलीप देवधर हे संघाचे सखोल अभ्यासक म्हणून तसेच निरनिराळ्या राजकीय विषयांवर बेधडक भविष्यकथन करणारे या नात्याने ज्ञात आहेत. फार मोठा जनसंपर्क आणि प्रसिद्धी माध्यमांशी जवळीक साधून असलेले, लोकांचे उद्बोधन, प्रबोधन व्हावे, अशी कळकळ व तळमळ असलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. या दिशेने अगोदर सांगितल्याप्रमाणे 1969 पासूनच त्यांचे अनेक उपक्रम सातत्यपूर्ण पण अनियमित स्वरुपात म्हणजे अधूनमधून  सुरू होते.
 विविध बॅनर्स पण एकच उद्देश
  प्रारंभी नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या बॅनरखाली नंतर क्रमाने अखिल भारतीय  विद्यार्थी परिषदेच्या नावाने, पुढे राष्ट्रीय युवक आघाडी, महाराष्ट्रीय व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक क्लब आणि भारतीय शेअर होल्डर्स, इंटलेक्चुअल कमांडोज क्लब, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स क्लब आदींच्या नावाने, वतीने किंवा विद्यमाने, व्याख्याने होत होती. थोडक्यात असे की, या व्याख्यानमालेचा प्रारंभ जरी 1 जानेवारी 1969 या दिवशी झालेला असला तरी ‘ज्ञानयोद्धा व्याख्यानमाला’ हे नाव तसे बरेच नंतरचे आहे.
मुलखावेगळे प्रयोग, विविध वक्ते व विषय
   सहाजीकच आजचा दर शनिवारी व्याख्यान असा नियमितपणाही तेव्हा नव्हता. एक वर्षात 101 भाषणे, 41 दिवसात 41 भाषणे, 1 दिवसात 71 भाषणे, 13 तासात 51 भाषणे, 3 तासात 12 भाषणे असे सत्कृतदर्शनी मुलखावेगळे  व विक्षिप्त वाटणारे प्रयोग ज्ञानयोद्धा भाषणमालेने यशस्वी केले आहेत. 24 तास म्हणजे रात्रंदिन किंवा ‘सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळी 10 पर्यंत’, असा अखंड पण अशक्य वाटणारा व रेकाॅर्ड स्वरुपी उपक्रम या  भाषणमालेने एकेकाळी नोंदविला आहे, यावर तर अनेकांचा विश्वासही बसणार नाही. अशाप्रकारे 1969 ते 2019 या अर्धशतकात हजारावर वक्त्यांची भाषणे तर नक्कीच झाली असतील. 1969 ते 2009 या काळात सर्वच व्याख्यानमालांमध्ये श्री.विक्रम साठे यांचा सक्रीय व मोलाचा सहयोग होता, हे नमूद करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दुसरी चांगली संधी लाभणे अशक्य आहे. वक्त्यांबाबत बोलायचे तर,  बाळासाहेब ठाकरे, कुमार सप्तर्षी, डाॅ. अरूण लिमये, जांबुवंतराव धोटे, श्रीकांत जिचकार, नितीन गडकरी, किरीट  सोमय्या, हुकुमचंद कछवाह, जगन्नाथराव जोशी, राम शेवाळकर, विजयराव देशमुख, कर्नल सुनील देशपांडे, सुरेश भट, महेश एलकुंचवार, डॅा. भा. ल. भोळे, नी. र. वऱ्हाडपांडे, डाॅ. वि. स. जोग, मा. गो. वैद्य, सुरेश द्वादशीवार, मामासाहेब घुमरे, डॅा. मधुकरराव आष्टीकर, निलंजन मुखोपाध्याय, गिरीश गांधी, अरूण सोनकीया, आडमचे शोधक डॅा. अमरेंद्रनाथ, प्रशांत जोशी, डॅा. रा.ह. तुपकरी, सलील गोखले, सुबोध आणि प्रबोध देशमुख, मदनदास देवी, देवेंद्र फडणवीस, असे शंभराहून अधिक प्राध्यापक, लेखक, पत्रकार, कलावंत, अभ्यासक, क्रीडापटू, सैन्याधिकारी अशी ही न संपणारी  यादी आहे. तसेच विषयांबाबतही म्हणता येईल. धर्म, अर्थ आणि काम या पुरुषार्थांवर ज्ञानयुगीन शैलीने असंख्य भाषणे या व्याख्यानमालेच्या विद्यमाने झाली आहेत. गत 25 वर्षांमध्ये तर अनेक तज्ज्ञ डाॅक्टरांनी डझनावारी विषय मांडले आहेत  या उपक्रमाचे नावच डॅाक्टर टेल मी अबाऊट xxxx असे होते. बजेट. जीडीपी, उद्योजकता, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड, रिलिजन, वर्ण, कास्ट, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील किमान शंभर विषयावरील भाषणे, दारू, सिगरेट, संभोग, नग्नता, समसंभोग, सिनेमा इत्यादी विषयांवर परिसंवाद, तसेच व्यक्ती, चित्रपट, पुस्तके, फ्युचरामा, युद्धे, सोशल मीडिया, टीव्ही अशा विषयावर आयोजित प्रबोधनपर कार्यक्रम, वक्त्यांनी मानधन न घेण्याच्या व संस्थाचालकांच्या सेवाशुल्क न आकारण्याच्या सहकार्यासह पार पडले आहेत. स्थानमहात्म्याची माहिती द्यायची तर, मातृसेवासंघाचे रंजन सभागृह, विदर्भ राष्ट्रभाषा परिषदेचे व हडस हायस्कूलचे प्रांगण, तरूण भारत व गिरीपेठेतील महिला कला निकेतन यांची सभागृहे तसेच रवींद्र सभागृह, मोहपा, देवलापार, पांजरा यासारखी लहान गावे अशा निरनिराळ्या ठिकाणी व आता गेली 25 वर्षे तर धरमपेठ शिक्षण संस्थेच्या वास्तूत व सध्या धरमपेठ माध्यमिक शाळेच्या शहापुरकर सभागृहात व्याख्यानमालेचे कार्यक्रम संपन्न होत आहेत.
  पोथीवाचन ते ज्ञानयोद्धा व्याख्यानमाला
   या काळातच म्हणजे 1972 पासूनच, धरमपेठ कॅालेजमध्ये 10/12 प्राध्यापकांचे विविध विषयांवर चर्चा करणारे एक सुघटित अभ्यासमंडळ सुरू झाले होते. संस्कृतचे विद्वान प्राध्यापक डॅा पिंपळापुरे यांच्या घरी दर बुधवारी आणि गुरुवारी हे प्राध्यापक एकत्र येत असत. या स्थानाला त्यांनी ‘धर्मपीठ’ हे नाव व मूळ ग्रंथ वाचनाला ‘पोथीवाचन’ असे नामाभिधान योजले होते. वर्षभर वाचन, नंतर त्यावर अभ्यासपूर्ण लिखाण, कुणी विद्वान शहरात आल्यास त्याचे अभ्यासवर्गात भाषण व वर्षाच्या शेवटी नामवंत विद्वानाला बोलावून 2 दिवसांची व्याख्यानमाला असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित होत असत. 1993 साली श्री दिलीप देवधर या वर्गात येऊ लागले. त्यांच्या पाठोपाठ डॅा रामभाऊ तुपकरी, डॅा संजीव केळकर, श्री श्रोत्री असे अनेक अभ्यासक या अभ्यासवर्गाशी निगडित झाले. आता धरमपेठ कॅालेजमधील ते बहुतेक प्राध्यापक निवृत्त झाले आहेत. तरीही हा कार्यक्रम सुरूच राहिला. पण तो अनेकांच्या घरी होऊ लागला आणि पुढे त्या अभ्यासवर्गाचे देवधरांच्या या उपक्रमात विलिनीकरण होऊन  ‘ज्ञानयोद्धा’ हे आजचे बृहत व नियमित स्वरुप अस्तित्वात आले.
    असे हे वेगळेपण
    अध्यक्षीय भाषण, पुष्पगुच्छाने स्वागत, आभार प्रदर्शन या कर्मकांडाना इथे स्थान दिलेले नाही. टाईम मॅनेजमेंट, वक्तशीरपणा, व्यवस्थापन इत्यादीसाठी प्रत्येक व्याख्यानात एक माॅनीटर असतो. सदस्य नोंदणी, निवडणुका, कार्यकारिणी, निमंत्रण इत्यादी पद्धती ज्ञानयोद्धा व्याख्यानमालेत नाहीत.
   जगन्नाथाचा रथ नक्की कोण ओढतो आहे, हे जसे सांगता यायचे नाही, तसेच या 51 वर्षांच्या व्याख्यानमालेच्या कालखंडाबाबत म्हणता येईल तरीही श्रेय नामावलीतील अनेक नावे सुटण्याची शक्यता असली तरी श्री दिलीप देवधर यांच्या सोबत व त्याच तळमळीने आणि कळकळीने सहभागी असणाऱ्यात सर्वश्री. डाॅ कृष्णराव भागडीकर, बाळासाहेब बोरावर, डाॅ. रा.ह. तुपकरी, डॅा. उषा गडकरी, सुरेश देशपांडे, मोहन परसोडकर, अविनाश जकाते, बाबा कुळकर्णी, विजय मोकाशी, डाॅ. सुरेश खेडकर आदी महनीय  व्यक्तींचा ज्ञानयोद्धा व्याख्यानमालेच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वाचा सहभाग असून अशी ही श्रेयनामावली आणखीही वाढविता येईल आणि भविष्यात अशीच वाढत जाईल.

No comments:

Post a Comment