Sunday, January 12, 2020

लहानपण देगा देवा - उंच होता आमचाही झोका!

लहानपण देगा देवा - उंच होता आमचाही झोका!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   माझा जन्म अंजनगावचा. जन्माची वेळ रात्री साडे आठची. हे कशावरून. तर सी पी रेल्वेची नॅरो गेज पॅसिंजर गाडी (नंतर लोक  तिला शकुंतला गाडी म्हणू लागले), रात्री साडे आठला स्टेशनवर यायची. स्टेशनवर जायचा रस्ता आमच्या घरावरून जायचा. त्या रस्त्यावर उतारूंची ये जा सुरू झाली होती. म्हणजे रात्रीचे साडे आठ झाले असले पाहिजेत. आस्मादिकांची गाडीही मातेच्या उदरातून त्याचवेळी भूतलावर अवतरली होती. गाडी स्टेशनवर आल्याची शिट्टी झाली आणि त्याचवेळी आस्मादिकांनीही भूतलावर अवतरल्याची ग्वाही पहिला टाहो फोडून दिली. म्हणून आस्मादिकांचा जन्म रात्री साडे आठचा.
  आमच्या प्लाॅटचे क्षेत्रफळ 100x100 फूट असे चांगले ऐसपैस होते. (अजूच्या घराचा प्लाॅट याहूनही मोठा आहे, बरंका!) त्याला काटेरी तारेचे कंपाऊंड होते. दोन खांबामधली जागा मेंदीची झाडे लावून झाकली होती. अंगणात कडुलिंबाची एकूण पाच भली मोठी झाडे होती. एक झाड तर एवढे मोठे होते की त्यामुळे उरलेली चार झाडे उंच वाढू शकत नव्हती. ती आडवी पसरली होती. त्यापैकी एका झाडाची एक फांदी आडवी वाढली होती. जमिनीला अगदी समांतर! तिने कंपाउंड ओलांडून बाहेर आपला विस्तार नेला होता. ही फांदी जमिनीपासून 20 फूट उंचीवर आडवी व जमिनीला समांतर अशी गेली होती.
   माझे वडील तसे कल्पक होते. मुले घरात सारखा दंगा करतात, अशी आईची तक्रार असायचा. त्यातले मनू व बंडू हे अतिशय सज्जन होते. दंगा करू नका, म्हटले की, गप्प बसायचे. पण मी तसा नव्हतो. गप्प बैस, म्हटले की, याला आणखीनच चेव येतो, अशी आईची रास्त तक्रार होती. मुलांना काहीतरी ‘उद्योग’दिला पाहिजे, असा विचार करून वडलांनी बाजारातून काथ्याचा दोरखंड आणवला. आडव्या गेलेल्या फांदीला तो दोर बांधून त्यांनी झोका तयार करवून घेतला. पाय ठेवायला लाकडाची पट्टी लावली आणि जो कोणी दंगा करील त्याने झोक्यावर 25 उठाबशा काढायच्या, अशी शिक्षा फर्मावली. पण झाले भलतेच. आमच्यासाठी ते खेळणेच होऊन बसले. येताजाता आम्ही त्यावर झोके घेऊ लागलो. अगोदर नंबर कुणाचा, यावरून आमच्यात भांडणे होऊ लागली. मी सगळ्यात लहान म्हणून माझा नंबर पहिला, हे मी मनू व बंडू कडून कबूल करवून घेतले. पण उषाने मध्येच फांदी मारली. कारण ती सर्वात लहान होती. पण तिला झोका घेता येत नसे. तिला फळीवर बसवून आम्ही झोके द्यायचे, अशी तडजोड झाली. मनू व बंडू मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी झोके देण्याची जबाबदारी घ्यावी. माझे काही चुकले आणि ती झोक्यावरून खाली पडली तर तिला लागायची भीती होतीना. माझा हा प्रस्ताव मान्य झाला.
   तेव्हापासून अनेक वर्षे आम्ही त्या झोक्यावर मनमुराद झोके घेत असू. कोणाचा झोका उंच जातो, अगदी जमिनीला समांतर जातो, अशा आमच्या शर्यती लागायच्या. झाडाची फांदी व झोक्याची दोरी कंपाऊंडच्या बाहेर गेली होती. ती वाटेने येणाऱ्या जाणाऱ्याला लागू नये म्हणून झोक्याची फळी झोके घेऊन झाल्यावर कंपाऊंडच्या खांबाला आम्ही अडकवून ठेवीत असू.
   हळूहळू आमचा हा झोका गावभर आवडता झाला. जोतो येताजाता मनसोक्त झोके घ्यायचा व नंतर तो कंपाऊंडच्या खांबला अडकवून ठेवायचा. यात रेल्वे स्टेशनवर जाणारे येणारे उतारू, हमाल हेही झोके घेण्याचा आनंद लुटायचे.
  दिवसातला पहिला झोका घेण्याचा मान गावातल्या  एका पखालजीचा असायचा. एका काठीच्या दोन्ही टोकांना राॅकलचे रिकामे झालेले चौकानी पिपे भरून तो पाण्याची नेआण करीत असे. त्याचा मार्ग घरावरून जायचा. भल्या पहाटे तो घरापाशी यायचा. पाण्याने भरलेले डबे खाली ठेवायचा आणि मनसोक्त झोके घ्यायचा. झोके घेतांना दोराचा कऽरकऽर असा आवाज यायचा. तो आईला बरोबर ऐकू यायचा. तिच्यासाठी तो ’अलार्म’च होऊन बसला होता. झोक्याच्या आवाजाने ती जागी व्हायची. पखालजी आला, म्हणजे आता उठले पाहिजे, असे म्हणत ती कामाला लागायची. झोके घेऊन झाले की, पखालजी झोका खांबाला नीट अडकवायचा आणि आपले ओझे पुन्हा खांद्यावर घेऊन मार्गस्थ व्हायचा.

No comments:

Post a Comment