Monday, March 16, 2020

नेतान्याहूंना तिसऱ्यांदा बहुमताची हुलकावणी!

नेतान्याहूंना तिसऱ्यांदा बहुमताची हुलकावणी! 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
   2000 वर्षांच्या दीर्घ विजनवासानंतर 14 मे 1948 रोजी ज्यू लोकांचे लोकशाहीप्रधान एकमेव स्वतंत्र राष्ट्र डेव्हिड बेन- गुरियन यांच्या नेतृत्वात जन्माला आले. 21,000 चौ.किमी. क्षेत्रफळाच्या चिमुकल्या इस्रायलची लोकसंख्या जवळजवळ 87 लक्ष (जगातील 0.11%) असून यापैकी ज्यू 74%, मुस्लिम18%, ख्रिश्चन 2% व 6% अन्य आहेत. 
 सिंगल नेशनवाईड कॅान्स्टिट्युएन्सी
   इस्रायलच्या  क्नेसेट/नेसेट मध्ये (संसदेत) 120 जागा आहेत. ‘क्लोज्ड लिस्ट प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन’ पद्धतीनुसार संपूर्ण देशाचा एकच मतदार संघ (सिंगल नेशनवाईड काॅन्स्टिट्युएन्सी) आहे. पक्षांना देशभरात मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार निवडणुकीअगोदरच जाहीर केलेल्या यादीतील उमेदवार क्रमवारीनुसार निवडून आले असे मानले जाते. बहुतेकदा आघाडीचेच सरकार सत्तारूढ होत आले आहे. यावेळी 87 लक्ष लोकसंख्येपैकी 64 लक्ष मतदारांमधून पूर्वीपेक्षा जास्त म्हणजे  71% मतदारांनी एका वर्षात तिसऱ्यांदा मतदान केले. वर्षभरात लागोपाठ तिसऱ्यांदा निवडणूक होऊनही मतदानाची वाढलेली टक्केवारी स्थिरतेसाठी होती. पण याहीवेळी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
 दुसऱ्या व तिसऱ्या निवडणुकीतील पक्षांचे बलाबल 
  अ)  विद्यमान पंतप्रधान बेंजामिन (बीबी) नेतान्याहू यांच्या पुराणमतवादी, कट्टर, उजव्या व आर्थिक उदारवादी लिकुड पक्षाला पूर्वी 25.10 टक्के मते म्हणून 25 जागा होत्या; यावेळी (तिसऱ्या निवडणुकीत) 4 % मते वाढून 29.5 % झाल्यामुळे,  36 जागा मिळून 11 जागांची घसघशीत वाढ मिळाली आहे. पंतप्रधानांवर लाचखोरी, अफरातफर आणि विश्वासघाताचा आरोप असूनही लिकुड पक्षाच्या जागा वाढल्या. झंझावाती व धडाकेबाज प्रचारात त्यांनी ज्यूंबद्दलच्या अत्याभिमानाला साद घातली, डाव्यांच्या भीती दाखविली, सुरक्षा, सुबत्ता आणि यशस्वी राजकारणाची हमी दिली, तसेच वारंवार घ्याव्या लागणाऱ्या निवडणुका, हे विषय त्यांनी आपल्या अमोघ वाणीने हाताळले. पण पूर्ण बहुमत काही मिळाले नाही. ‘डील ॲाफ द सेंच्युरी’ म्हणून अखंड जेरुसलेमचे स्वप्नही त्यांनी जनतेला दाखविले होते. पण व्यर्थ! 
  पूर्वी पुराणमतवादी व मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता असलेल्या शास पक्षाला 7.44% मते म्हणून  9 जागा होत्या तर यावेळी 7.71% मते म्हणून 9 जागा मिळून तोटा वा फायदा झालेला नाही. 
   पूर्वी  युनाइटेड तोरा ज्युडाइजम पक्षाला 6.06% मते म्हणून  7 जागा मिळाल्या होत्या तर यावेळेस 6.01%मते मिळाल्यामुळे 7 जागाच मिळाल्या आहेत.
  पूर्वी यामिना पक्षाला 5.87% मते म्हणून 7 जागा मिळाल्या होत्या तर यावेळेस 5.23% मते मिळाल्यामुळे 6 जागा मिळाल्या आहेत. 
   अशाप्रकारे उजव्या धार्मिक गटाला पूर्वी 47 जागा होत्या त्यात वाढ होऊन 58 जागा (लिकुड 36, शास 9, युनाइटेड तोरा ज्युडाइजम 7, आणि यामिना 6 = 58, म्हणजे बहुमताला 3 कमी) आहेत.
 ब) पूर्वी बेनी गॅंट्झ (माजी लष्करप्रमुख) यांच्या उजव्या, उदारमतवादी ब्ल्यू व्हाईट या विरोधी पक्षाला 25.95 % मते म्हणून 33 जागा होत्या; यावेळी 26.6 % मते ही किंचित वाढ आहे, म्हणून 33 जागा मिळून काहीही फायदा तोटा झालेला नाही. नेतान्याहूंचा भ्रष्टाचार हा त्यांचा प्रचारातला प्रमुख मुद्दा होता, हे महत्त्वाचे!   
   पूर्वी लेबर पार्टीला  4.80 % मते म्हणून 6 जागा होत्या तर यावेळेस मात्र 5.83% मते मिळाल्यामुळे 7 मिळाल्या आहेत. 
अशाप्रकारे विस्कळित मध्यममार्गी व डाव्या गटाला पूर्वी 39 जागा मिळाल्या होत्या त्यात एका जागेची भर पडून 40 जागा ( ब्ल्यू-व्हाईट 33, लेबर 7= 40 ) मिळाल्या आहेत. या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या पक्षांची मते फार मोठ्या प्रमाणात कमी झाली आहेत.
क) जाॅईंट लिस्ट पक्ष (अरबांच्या गटांचे संघटन) आणि इस्रायल बेतेनु पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले आहेत. 
  पूर्वी  जाॅईंट लिस्ट पक्षाला 10.60 % मते म्हणून 13 जागा होत्या तर  यावेळी 12.6 % मते म्हणून 15 जागा मिळून 2 जागांचा फायदा झाला आहे.
 पूर्वी लिबरमन ह्यांच्या सुधारणावादी व मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता असलेल्या इस्रायल बेतेनु (रशियन ज्यू) पक्षाला 6.99% मते म्हणून 8 जागा होत्या तर यावेळेस 5.75 % मते म्हणून 7 जागा मिळाल्या आहेत. 
ड) आणि पूर्वी डेमोक्रॅटिक युनियन पक्षाला 4.34% मते होती म्हणून 5 जागा मिळाल्या होत्या आहेत  पण यावेळी एकही जागा मिळाली नाही 
इलेक्टोरल थ्रेशहोल्ड (उंबरठा) ओलांडावाच लागतो. 
   पक्षाला 3.25 %  तरी मते मिळालीच पाहिजेत. नाहीतर त्या पक्षाला मिळालेल्या मतांचा विचार टक्केवारी काढतांना  व त्यानुसार जागा वाटपात केला जात नाही. असा हा 3.25 % मतांचा उंबरठा (इलेक्टोरल थ्रेशहोल्ड) आहे. पूर्वी डेमोक्रॅटिक युनियन पक्षाला 4.34% मते होती म्हणून 5 जागा मिळाल्या होत्या आहेत  पण यावेळी 3.25 % ही मते न मिळाल्यामुळे एकही जागा मिळाली नाही. 
    अल्पमताचे सरकार, पण कुणाचे? 
      वर्षभरात तिसऱ्यांदा निवडणूक घेऊनही स्पष्ट बहुमतासाठी नेतान्याहू यांना 3 जागांची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी मध्यममार्गी- डाव्या गटातून पक्षांतर घडवून आणण्याच्या खटपटीत आहेत. एकप्रकारे सत्तेच्या चाव्या इस्रायल बेतेनु पक्षाच्या हातीही असू शकतात. हा पक्ष तसा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. या पक्षाचे सदस्य आणि कार्यकर्ते रशियातून इस्रायलमध्ये आलेले आहेत. या निवडणुकीत यांची एक जागा कमी झाली आहे. हे नेत्यानाहू यांचे कडवे विरोधक आहेत. त्यामुळे या दोघात तडजोड होण्याची शक्यता दिसत नाही. जॅाईंट लिस्टमधील घटक तर अरब आहेत. ते तर नेतान्याहूकडे वळूनही पाहणार नाहीत. एक शक्यता हीही आहे की, नेतान्याहू अल्पमतातले सरकार स्थापन करतील आणि ते पाडून चौथ्यांदा निवडणूक लादण्याची प्रतिपक्षाची (विशेषत: चिमुकल्या व वारंवार झालेल्या निवडणुकींमुळे कफल्लक झालेल्या) हिंमत आजमावून पाहतील.     
     इकडे नेतान्याहूवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतची सुनवाई लवकरच सुरू होते आहे. ही संधी साधून माजी लष्करप्रमुख ब्ल्यू व्हाईट पक्षाचे बेनी गॅंट्झ हे आपल्या 33 जागा व इस्रायली अरबांच्या जॅाईंट लिस्टच्या 15 सदस्यांना आणि इस्रायल बैतेनू पक्षाचे एव्हिगर लिबरमन यांच्या 7 सदस्यांना सोबत घेऊन 55 सदस्यांचे अल्पमताचे सरकार स्थापन करण्याच्या विचारात आहेत. कोरोना व्हायरसची कृष्णछाया भेडसावत असतांना निर्नायकी अवस्था फारकाळ राहू देण्यास इस्रायलचे अध्यक्ष  रिव्हेव रिव्हलीन तयार नाहीत. ते मूळचे नेतान्याहूंच्या लिकुड पक्षाचे असले तरी इस्रायली अरबांना सोबत घेण्यास अनुकूल आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते, असे म्हणतात. खरंच असे काही घडणार आहे का? घोडा मैदान जवळच आहे. त्यामुळे फारकाळ वाट पहावी लागणार नाही

No comments:

Post a Comment