Monday, April 20, 2020

इस्लाममधील 74 फिरके

    
 इस्लाममधील 74 फिरके 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 
मोबाईल 9422804430  
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
   बहुतेक लोक मुस्लीम समाज एकसंध आणि कोणतेही भेदाभेद पाळणारा नसून हिंदू समाजाला मात्र जातीय उतरंडीची बाधा झालेली आहे, या मताचे आहे. ही जातीय उतरंड वाईटच म्हटली पाहिजे, यात मुळीच शंका नाही.  खेदाची बाब ही आहे की, मुस्लीम धर्म सुद्धा थोड्याथोडक्या नव्हे तर मोजून 74 पंथामध्ये/फिरक्यांमध्ये विभाजित आहे. प्रत्येक फिरका स्वत:ला खरा मुस्लीम समजतो आणि त्यामुळे त्यांचे एकमेकाविरुद्ध धर्मयुद्ध सुरू असते. प्रत्येक फिरक्याची मशीद वेगळी आणि त्याच् फिरक्या पुरतीच व साठीच असते.  मुस्लिमांमध्ये सुन्नी 80 % आणि शिया 20 % आहेत. या दोन पंथात पुढील बाबतीत एकमत आहे. पहिले असे की, अल्ला एक आहे. दुसरे असे की, मोहम्मद पैगंबर हे अल्लांचे दूत आहेत. तिसरे असे की, कुराण हा दिव्य ग्रंथ असून तो अल्लांनी पाठविला आहे. केवळ सुन्नी व शियांचेच नव्हे तर अन्य सर्व पंथियांचे या बाबत एकमत आहे. मात्र पैगंबरांचा उत्तराधिकारी कोण?  या प्रश्नाबाबत या दोघात गंभीर स्वरुपाचे मतभेद आहेत. त्यामुळे सहाजीकच मोहम्मद पैगंबरांची वचने आणि कुराणमधील आयतांचा खरा अर्थ या बाबतही मतभेद आहेत.
पवित्र कुराण व हदीस यांचा अर्थ कोण सांगणार?
   अ) सुन्नी पंथ पाच गटात वाटला गेला आहे. यात विश्वास आणि श्रद्धा याबाबत एकमत आहे. पण मुख्य प्रश्न होता तो हा की, कुराण आणि हदीस (पैगंबरांची वचने) यांचा खरा अर्थ कुणाला माहीत आहे? हा अर्थ कोण सांगणार? हे कार्य इमामांकडे सोपविण्यात आले आहे. याचा व्यावहारिक अर्थ असा की, इमाम म्हणतील तेच प्रमाण. इतरांना अर्थ सांगण्याचा अधिकार नाही. कुणी अनाधिकाराने तसा प्रयत्न केलाच तर त्याला मान्यता नाही.
    सुन्नी 
    सुन्नी मुस्लीमांमध्ये इस्लामी कायद्याचा अर्थ/व्याख्या सांगणाऱ्या मुख्यतः ४ विचारधारा (स्कूल्स) आहेत. यांचे ४ इमाम आहेत, १) इमाम अबू हनिफा, २) इमाम शाफई ३) इमाम हंबल ४) इमाम मालिक
1) हनिफी -  हे इमाम अबू हनिफीला मानणारे आहेत. म्हणून यांना हनिफी म्हणतात. यात देवबंद आणि बरेली/बरेलवी असे दोन गट आहेत.  या नावाचे जिल्हे उत्तरप्रदेशात आहेत. हा सर्वात मोठा गट असून या गटाचे अनुयायी मुख्यत: भारत, पाकीस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशात आहेत. बरेली सुफी (गूढवाद) आणि मजार (थडगे) यांना मानतात. तर देवबंद यांना इस्लामविरोधी मानतात. एवढा टोकाचा विरोध या दोघात आहे.
2) मालिकी - हे इमाम मलिक यांना मानणारे आहेत. यांनी इमाम मोत्ता नावाचा ग्रंथ लिहिला आहे. पूर्व आशिया आणि आफ्रिकी देशात यांचे अनुयायी आहेत. हे संख्येने कमी आहेत.
3) हंबली -  हे इमाम हंबल यांना मानणारे आहेत. मख्यत: सौदी, कतार, कुवैत या देशांचे हे रहिवासी आहेत.
4) सल्फी, वहाबी, अहले हदीस - हे कोणत्याही एका इमामाला मानत नाहीत तर प्रत्येकाच्या काही खास शिकवणुकींना मानणारे आहेत. हे इस्लाममधील सर्वात कट्टर गट व  सर्वात गरीब गट आहेत. सौदी हुकुमशहा वहाबी आहेत, तर अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेन सल्फी होता.
5) बोहरा - गुजरात, महाराष्ट्र आणि पाकीस्तान या देशात हा समाज आढळतो. हे लोक मुख्यत: व्यापारी असल्यामुळे सहाजीकच कट्टर नाहीत. दुसरे वेगळेपण हे आहे की, सुन्नी व शिया या दोन्ही मुख्य गटात हे आढळून येतात. सुन्नी बोहरा हे इमाम अबू हनिफीला मानणारे आहेत. कट्टर इस्लामी यांना मुसलमानच मानत नाहीत.
6) अहमदिया - हे हनिफी पंथाच्या कायद्याचे पालन करणारे आहेत. पंजाब प्रांतातील कादियान येथे मिर्जा गुलाम अहमद यांनी या पंथाची स्थापना केली होती. ते स्वत:ला नबी (ईश्वर व मानव यातील मध्यस्त) व धर्म सुधारक मानतात. यांची वसती भारत, पाकीस्तान आणि ब्रिटन मध्ये आढळते. मुस्लीम यांना खरे इस्लामी मानत नाहीत.
शिया
   शिया व सुन्नी यांच्या श्रद्धा वेगवेगळ्या आहेत. आपल्यानंतर इमाम नियुक्त करण्यात यावेत अशी महम्मद पैगंबरांची भूमिका होती. खलिफा (प्रेषिताचा वारस) नियुक्त करणे त्यांना मान्य नव्हते. महम्मद पैगंबर आपला जावई हजरत अली हे उत्तराधिकारी असावेत या मताचे होते. त्यांनी तसे घोषितही केले होते. पण फसवेगिरी करून अबू बकर यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. पहिले तिघे खलिफा खरे नेते नव्हते. ते गासिब होते. म्हणजे त्यांनी खलिफापद हडपले होते. शिया व सुन्नी यात सतत रक्तरंजित संघर्ष का सुरू असतो, ते यावरून स्पष्ट होईल. शिया पंथ मुळातच लहान (20 %) होता/आहे. त्यातच त्याचेही अनेक पंथात विभाजन झाले आहे.
इस्ना अशरी – हा पंथ 12 इमामांना मानतो. जगातील शियांपैकी ७५% शिया या पंथाचे समर्थक आहेत. यांच्या कलमा सुन्नींपेक्षा वेगळ्या आहेत. हे अल्लाह, कुराण, हदीस यांना मानतात. मुख्यत: इराण, इराक, भारत आणि पाकीस्तान देशात ह्या पंथाचे लोक सापडतात.
जैदिया – शियांमधला हा दुसरा मोठा पंथ आहे. इमाम जैद बिन अली यांचे अनुयायी म्हणून हे स्वतःला जैदिया म्हणवून घेतात. येमेन मध्ये हे मोठ्या संख्येत आहेत.
इस्माईली शिया – हे फक्त सात इमामांना मानतात. यांचे शेवटचे इमाम मोहम्मद बिन इस्माईल आहेत, म्हणून हे इस्माईली शिया. 
दाऊदी बोहरा – दाऊदी बोहरा, इस्माईली शिया चे सगळे नियम पाळतात, फक्त यांचे इमाम मात्र एकवीस आहेत. गुजरात व महाराष्ट्रात यांची बऱ्यापैकी लोकसंख्या आहे. मुख्यत: व्यापारी असल्यामुळे हे मितभाषी आणि सगळ्यांशी जमवून घेणारे असे असतात.
खोजा – गुजरात मधील हा मुस्लीम व्यापारी समूह स्वतः ला खोजा म्हणवून घेतो. हे पण बोहरा प्रमाणेच शिया आणि सुन्नी दोन्हीत आहेत. हा पंथ महाराष्ट्र, गुजरात आणि आफ्रिकेत  आढळतो. 
नुसैरी – सिरीयाचा राष्ट्रप्रमुख बशर अल असद या पंथाचा आहे. यात शिया व सुन्नी दोघेही आहेत पण जास्त संख्या शियांची आहे. सिरीयातील गृहयुध्दामुळे हे सध्या विशेष चर्चेत आहेत. 
   अनेक ग्रंथांचा विषय
   इस्लाममधील या वेगवेगळ्या पंथात बहुतेकात रक्तरंजित व टोकाचे कलह आहेत. इतके की, एक दुसऱ्याला मुस्लीम मानतच नाही. सध्या पेट्रो डॅालरमुळे सुन्नींची  चलती आहे. शिवाय साथीला आहे 80 % बहुसंख्या व वहाबी कट्टरता! सर्व 74 पंथांचा किंवा फिरक्यांचा सर्व व तपशीलवार मागोवा अशा एखाद्या छोटेखानी लेखात घेणे अशक्य आहे. तो अनेक ग्रंथांचा विषय असू शकतो. विषयाची तोंडओळख होऊन कुतुहल जागे व्हावे यापुरता जरी हा मजकूर कामी आला तरी खूप झाले, इतक्या अपूर्णता, उणिवा आणि संदिग्धता यात असू शकतात. नव्हे, असतीलच!

No comments:

Post a Comment