Monday, October 18, 2021

कॅनडात पार पडलेली मुदतपूर्व निवडणूक वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? कॅनडातील मुदतपूर्व निवडणुकीतही मतदारांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. या मागची कारणे शोधण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. कॅनडामधील क्युबेक हा प्रांत फ्रेंचबहुल या प्रांतातील फ्रेंच लोकांना आपले स्वतंत्र राष्ट्र असावे, असे वाटत असे. स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपण उरलेल्या कॅनडाशी बरोबरीच्या नात्याने स्नेहाचेच संबंध राखू, अशी त्यांची भूमिका होती. शेवटी या प्रश्नावर 30 ॲाक्टोबर 1995 ला सार्वमत घेण्यात आले. वातावरण एवढे तापले होते की, एकूण मतदान 93.55 % इतके जबरदस्त झाले. कॅनडा एकसंध रहावा या बाजूने निम्यापेक्षा किंचित जास्त म्हणजे 50.58 % मते पडली आणि फुटून निघण्याचा प्रश्न बारगळला आणि कॅनडा एकसंध राहिला. कॅनडाचे वेगळेपण एकूण दहा प्रांत आणि तीन प्रादेशिक विभाग असलेला कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेला अतिशय विरळ लोकसंख्या असलेला तसेच तिन्ही बाजूंनी सागर असलेला महाप्रचंड देश आहे. क्षेत्रफळानुसार विचार केला तर रशियाचे ठोकळमानाने क्षेत्रफळ सर्वात जास्त म्हणजे सुमारे 1 कोटी, 71 लक्ष चौकिमी; दुसऱ्या स्थानच्या कॅनडाचे 1 कोटी चौकिमी; तिसऱ्या स्थानच्या अमेरिकेचे 98 लक्ष चौकिमी; चौथ्या स्थानच्या चीनचे 96 लक्ष चौकिमी; पाचव्या स्थानच्या ब्राझीलचे 85 लक्ष चौकिमी; सहाव्या स्थानच्या ॲास्ट्रेलियाचे 77 लक्ष चौकिमी आणि सातव्या स्थानच्या भारताचे 33 लक्ष चौकिमी आहे. कॅनडा आणि अमेरिका यांना लागून असलेली सीमा 8, 891किलोमीटर एवढी म्हणजे जगातली सर्वात लांब सीमा आहे. पण कॅनडाची लोकसंख्या मात्र फक्त 3 कोटी 80 लक्षच आहे. या सीमेपासून 150 किलोमीटर अंतराच्या आतच कॅनडातील जवळजवळ तीनचतुर्थांश लोकसंख्या ब्रिटिश कोलंबिया, अलबर्टी, ॲांटॅरिओ आणि क्युबेक या 4 प्रांतातच राहते. या लोकसंख्येचे धर्मानुसार विभाजन ख्रिश्चन धर्म - 67.2 %, निधर्मी - 23.9 %, इस्लाम - 3.2 %, हिंदू -1.5 %, शीख -1.4 %, बौद्ध - 1.1 %, ज्यू - 1.0 %, इतर - 0.6 % असे आहे. कॅनडातील अनुत्साही मतदार कॅनडाच्या संसदेच्या 338 जागांच्या मुदतपूर्व निवडणुका 2021 च्या सप्टेंबर महिन्यात पार पडल्या. 2015 मध्ये 68.3%, 2019 मध्ये 67% आणि 2021 मध्ये अचानक घेतलेल्या मुदतपूर्व निवडणुकीत तर 62.3% असे मतदान उत्तरोत्तर कमीकमी होत गेले आहे. कॅनडासारख्या देशातील प्रगत आणि प्रगल्भ मतदारांचा हा अनुत्साह शुभसंकेत निश्चितच नाही. त्यातून ही निवडणूक विद्यमान सभागृहाची मुदत पूर्ण व्हायच्या अगोदरच, पुरेशी पूर्वसूचना न देता, विद्यमान पंतप्रधानांच्या सूचनेला मान्यता देत, गव्हर्नर जनरल महोदया मेरी मे सियॅान यांनी, चटकन मतदान घेऊन (स्नॅप पोल), 2023 ऐवजी 2021 मध्येच उरकली. ही बाब मतदारांना रुचली नसल्याचेही मतदानाची कमी झालेली टक्केवारी सुचविते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या लिबरल पार्टीला 2019 च्या निवडणुकीत 157 म्हणजे बहुमतासाठी 13 जागा कमी पडल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या पक्षाशी म्हणजे 24 जागा मिळविणाऱ्या जगमीतसिंग यांच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीशी युती करून देशाचा गाडा हाकावा लागत होता. या युतीची पुरेपूर किंमत हा खलिस्तानधार्जिणा पक्ष वसूल करीत होता. या पक्षाच्या दबावाखाली येऊन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्या खलिस्तानबाबतच्या अनेक मागण्यांना पाठिंबा द्यावा लागत असे. यामुळे कॅनडाला भारताची नाराजी ओढवून घ्यावी लागायची. बहुदा या आणि अशा अडचणीतून सुटका व्हावी या हेतूने खेळलेली मुदतपूर्व मतदानाची ही खेळी सफल झाली नाही. यावेळी सत्ताधारी लिबरल पक्षाला 159 म्हणजे पूर्वीपेक्षा केवळ दोनच जागा जास्त मिळाल्या आहेत, म्हणजे पूर्ण बहुमतासाठी 11 जागा कमी पडून पूर्वीचीच स्थिती कायम राहिली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॅान्झर्व्हेटिव पार्टीला पूर्वीपेक्षा 3 जागा कमीच मिळाल्या आहेत. एकंदरीने मतदारांनी हाऊस ॲाफ कॅामन्समध्ये जवळपास पूर्वीचीच स्थिती कायम ठेवलेली दिसते. मतांची टक्केवारी आणि मिळालेल्या जागा असे असले तरीही या निवडणुकीत लिबरल पार्टीला मिळालेल्या मतांची टक्केवारी कमी होऊनही जागा मात्र पूर्वापेक्षा 2 ने वाढल्या आहेत. तर कॅानझर्व्हेटिव्ह पार्टीला मात्र मिळालेल्या मतांची टक्केवारी जशी कमी झाली तशीच त्यांना मिळालेल्या जागांची संख्याही 3 ने कमी झाली. ब्लॅाक क्युबेकॅाईस पार्टीला मिळालेल्या मतांची टक्केवारी केवळ 0.1 वाढूनही त्यांना पूर्वीपेक्षा 1 जागा जास्त मिळाली. खलिस्तानसमर्थक न्यू डेमोक्रॅटिक पार्टीला मिळालेल्या मतांची टक्केवारी जवळजवळ 2 % ने वाढली पण याचा परिणाम फक्त एकच जागा जास्त मिळण्यात झाला. ग्रीन पार्टीला मिळालेल्या मतांची टक्केवारी 6.55 वरून 2.33 इतकी दाणकन घसरली पण फटका फक्त एकाच जागेचा बसला. कॅनडातील प्रमुख पक्ष 159 जागा मिळवणारा लिबरल पार्टी हा कॅनडातला सर्वत्र पसरलेला आणि सर्वात जुना पक्ष आहे. तो केवळ जुनाच नाही तर बऱ्यापैकी सक्रीयही आहे हे विशेष! त्यातही 20 व्या शतकात तो 70 वर्षे सत्तेवर होता, हे आणखी एक विशेष!! याचे प्रमुख कारण या पक्षाच्या उदारमतवादी धोरणात आहे. दुसरे कारण हेही आहे की, तो किंचितसा डावीकडे झुकलेला आहे. ‘आहेरे’ पेक्षा ‘नाहीरें’ नाच तो अधिक सवलती देत असतो. याउलट याचा विरोधक कॅान्झरव्हेटिव्ह पक्ष उजवीकडे झुकलेला असल्यामुळे लोकप्रियतेत कमी पडतो. तिसरा न्यू डेमोक्रॅटिक पक्ष जेव्हा जेव्हा लिबरल पक्षाला बहुमत मिळालेले नसते तेव्हा तेव्हा तेव्हा पुरती किंमत वसूल करीत त्याला साथ देत आलेला आहे. लिबरल पक्षाने आपले धोरण जनकल्याणाबरोबरच सर्वसमावेशकही ठेवले आहे, ही या पक्षाची आणखी एक विशेषता आहे. यामुळे समाजातील सर्वच घटकात या पक्षाचे सहानुभूतीदार मतदार आहेत. आरोग्य सेवा, सेवानिवृत्तिवेतन, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज, शांतता आणि सुरक्षेवर भर, इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषांचा राज्यकारभारात सारखाच वापर, शस्त्रे बाळगण्याबाबत कडक नियम, नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांचा आणि स्वातंत्र्यांचा आदर, एखाद्या प्रांताने वेगळे होण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्याच्याशी चर्चा करण्याची तयारी (क्लॅरिटी ॲक्टमध्ये हे नमूद केले आहे), समलिंगी विवाहांना तसेच गर्भपाताला मान्यता या धोरणांमुळे जनतेत अनुकूलतेची भावना असते. 2015 मध्ये 39.5% मते मिळून 184 जागांवर विजय मिळून लिबरल पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. पण 2019 आता 2021 मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती न झाल्यामुळे या पक्षाचे आडाखे चुकले आणि त्याला 2019 प्रमाणे यानंतरही आघाडीचे सरकारच स्थापन करावे लागणार आहे. 119 जागा मिळवणारा कॅान्झर्व्हेटिव पार्टी ॲाफ कॅनडा हा उजवीकडे झुकलेल्या अनेक छोट्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेला पक्ष आहे. डावीकडे झुकलेला लिबरल पार्टी हा पक्ष याचा प्रमुख विरोधक आहे. 2006 ते 2015 या सलग कालखंडात हा पक्ष कॅनडात सत्तेवर होता. विक्री करात कपात, शस्त्रे बाळगण्याबाबत मवाळ धोरण, उद्योजक आणि उद्योगस्नेही भूमिका ही या पक्षाची प्रमुख धोरणे आहेत. तसेच प्रांतांना अधिक स्वायत्तता आणि कायदा व सुव्यवस्थेवर विशेष भर देणारा पक्ष अशीही याची ओळख आहे. 33 जागा मिळविणारा ब्लॅाक क्यूबेकॅाईस पक्ष हा फ्रेंचबहुल क्यूबेक प्रांतातील एकेकाळचा फुटिरतावादी पक्ष असला तरी आता मात्र आपल्या मूळ विभक्ततावादापासून बराच दूर गेला आहे. बहुदा यामुळेच याची मतांची टक्केवारी आणि मिळणाऱ्या जागा 2015 ते 2021 या कालखंडात सतत वाढत गेल्या आहेत. त्यामुळे तो आता आपली विभक्ततेची अतिरेकी मागणी यापुढेही अशीच गुंडाळून ठेवील आणि पर्यावरणसंवर्धनावर आपले लक्ष केंद्रित करील, असे दिसते. परिणामत: कॅनडातील अंतर्विरोध संपून जनतेला स्थिर, प्रागतिक व जनहितकारी शासन मिळावे यासाठीच हा पक्ष यापुढे प्रयत्नशील राहील, असे दिसते. 25 जागा मिळविणाऱ्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीच्या जागा फक्त एकनेच वाढल्या आहेत. जस्टिन ट्रूडो यांच्या उदारमतवादी लिबरल पार्टीला 2019 मध्ये बहुमतासाठी 13 जागांची आवश्यकता होती. न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने ही गरज पूर्ण केली. लिबरल पार्टीला मूळ भारतीय वंशाच्या जगमीतसिंग यांच्या प्रागतिक व काहीसा डावीकडे झुकलेल्या खलिस्तानसमर्थक पक्षाचा पाठिंबा आहे. या पक्षाचे 2019 च्या निवडणुकीत 50 टक्के जागांचे नुकसान 44 ऐवजी 24 जागा मिळून झाले होते. तरीही जगमीतसिंग यांचा हा पक्ष 2019 मध्ये जसा किंग मेकरच्या भूमिकेत होता. तसाच तो आज 2021 मध्येही असेल. जगमीतसिंग हे स्वत: डाव्या विचारसरणीचे, खलिस्तान चळवळीचे खंदे समर्थक आणि व्यवसायाने फौजदारी वकीलही आहेत. 2 जागा मिळविणाऱ्या ग्रीन पार्टीची स्थिती वाईटचच झाली आहे. एलिझाबेथ मे यांच्या या पर्यावरणवादी ग्रीन पार्टीला 2015 मध्ये 1 जागा मिळाली होती त्यात 2 ने वाढ होऊन 2019 मध्ये 3 जागा मिळाल्या होत्या आणि मतांची टक्केवारी तर दुपटीने वाढली होती. 2021 मध्ये मात्र ती जवळजवळ तिपटीने कमी झाली आहे पण तरीही एकाच जागेची किंमत चुकवावी लागली आहे. लोकशाही राजवटीत मतदारांची उदासीनता आणि एकहाती सत्ता न देण्याची जनतेची प्रवृत्ती ही चिंतेची बाब आहे, असा सर्वसाधारण स्वरुपाचा निष्कर्ष काही समीक्षकांनी या निवडणुकीच्या निकालावरून काढला आहे.

No comments:

Post a Comment