Monday, April 4, 2022

रशिया युक्रेनचे दोन तुकडे करणार ? वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? रशिया आणि युक्रेन यातील संघर्ष हा दोन विषम शक्तींमधला लढा आहे, असेच सर्व जग सुरवातीपासून मानून चालले होते. खुद्द रशियाचीही हीच समजूत होती. सैनिकी सिद्धतेचा विचार केला तर रशियाचे सैन्य अंदाजे 9 लक्ष तर युक्रेनचे फक्त 2 लक्ष आहे. हा चौपटीचा हिशोब शस्त्रास्त्रे आणि आनुषंगिक बाबतीतही आहे. रशियाने स्वत: या संघर्षाला विशेष सैनिकी कारवाई (स्पेशल मिलिटरी ॲापरेशन) म्हणूनच संबोधले आहे, युद्ध म्हणून संबोधलेले नाही. संघर्ष सुरू होऊन दोन/तीन दिवस होताच युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडून पलायन केले, असे वृत्त रशियाच्या वतीने प्रसृत करण्यात आले होते. पण आपण युक्रेनमध्येच ठाण मांडून आहोत आणि राहू अशी घोषणा झेलेन्स्की यांनी केली आणि आता महिना होऊन गेला तरी झेलेन्स्की युक्रेनमध्येच आहेत. आस्ते कदम रशियाला अजूनही एकाही शहरावर पूर्णपणे ताबा मिळवता आलेला नाही. रशियाला शहरांना वेढा घालून त्यांची पुरवठाशृंखला तोडून त्यांची कोंडी करून त्यांना शरण यावयास भाग पाडायचे होते, असा निष्कर्ष राजकीय पंडित काढू लागले आहेत. लढाईचे प्रचारकी तंत्र लक्षात घेतले तर रशियाने आपण ठरवूनच दमाने घेत आहोत, असे जगाला सांगणे स्वाभावीकच म्हटले पाहिजे. तर आम्ही रशियांची युद्धसामग्री नष्ट करीत चाललो आहोत, रशियाच्या सैनिकांनाच नाही तर त्याच्या तोलामोलाच्या अधिकाऱ्यांनाही यमसदनी पाठवीत आहोत, हा युक्रेनचा दावाही अनपेक्षित म्हणता यायचा नाही. पण आता जग या निष्कर्षाप्रत पोचले आहे की, रशियाचे या युद्धाबाबतचे वेळापत्रक कुठेतरी चुकले आहे आणि म्हणून हे ‘आस्ते कदम’ सुरू आहे. गती का मंदावली? सुरवातीला रशियाने युक्रेनच्या सैनिकी ठाण्यांवर आणि शस्त्रास्त्रांच्या साठ्यांवर हल्ले करायचे ठरविले होते, असे दिसते. सैनिकांचा खातमा आणि शस्त्रास्त्रांच्या साठ्यांचा नाश या दोन बाबी एकदा का साध्य झाल्या की युक्रेनसमोर शरणागती पत्करण्याशिवाय उपायच उरणार नाही, हा रशियाचा अंदाज चुकीचा ठरला. आता रशिया नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करतांना सांगतो आहे की, तिथे युक्रेनचे सैनिक दबा धरून बसले आहेत. पण ठिणठिकाणी संघर्षतत्पर निडर सामान्य नागरिकही रणगाड्यांसमोर ठाण मांडून त्यांना अडवीत आहेत, अशी दृश्ये जगभर दाखविली जातांना दिसत आहेत. एक वृद्ध महिला एका रशियन सैनिकाला जाब विचारतांना दिसते आहे. ती त्याला म्हणते आहे, ‘तुझे इथे काय काम आहे? तू इथे का आला आहेस? ताबडतोब इथून निघून जा.’ तो सैनिक गोंधळलेला दिसतो आहे. या महिलेला काय उत्तर द्यावे, ते त्याला सुचत नसावे. अनेक रशियन सैनिकांना युक्रेनच्या सैनिकांनी सहज ताब्यात घेतलेले पाहिले की, ही रशियनांची सक्तीची आणि नाखुशांची लष्करभरती केलेल्यांची तुकडी तर नव्हती ना, असा संशय व्यक्त केला जातो आहे. सक्तीने भरती केलेल्या सैनिकांचे शिक्षण बेताबाताचेच असते, त्यांची शस्त्रेही सामान्य दर्जाची असतात. दीर्घ मुदतीच्या चिवट लढ्यासाठी आवश्यक असलेली क्षमता त्यांच्यात नसते, असे मानतात. तसेच रशियन गाड्या आणि रणगाडे ठिकठिकाणी चिखलात रुतून बसतात, याचा अर्थ काय लावायचा? हवामानाबाबत पुरेसा गृहपाठ न करताच रशियाने मोहिमा आखल्या आहेत, असा निष्कर्ष काढायचा की काय? हे युद्धनिपुण सेनाधिकाऱ्याचे काम असू शकत नाही. एकतर हे खरे असेल किंवा रशिया या भ्रमात तरी होता की, ही मोहीम फारसा प्रयत्न न करताच यशस्वी होणारी आहे, म्हणून अशा काही बाबा दुर्लक्षित राहिल्या असाव्यात. शस्त्रे पुरविली, सैन्य नाही नॅार्थ अटलांटिक ट्रिटी अलायन्स आणि अमेरिका यांनी प्रत्यक्ष सैन्य न पाठवता युक्रेनला सर्व प्रकारच्या सैनिकीसामग्रीची मदत केली आहे. तिचा योग्य उपयोग करण्याचे कौशल्य युक्रेनच्या निधड्या छातीच्या सैनिकांमध्ये होते. लष्कराला साह्य देणाऱ्या नागरिकांनीही सैनिकांची ही भूमिका तत्परतेने आणि आत्मीयतेने साध्य केली. परंपरागत शस्त्रांप्रमाणे नवीन हत्यारे चालविण्यास शिकण्यासाठीही ते अहमहमिकेने समोर आले. युक्रेनियनांची देशनिष्ठा, जिद्द आणि जिगर वाखाणण्यासारखी सिद्ध झाली. रशियाचा अपेक्षाभंग अमेरिका आणि नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ॲार्गनायझेशन अफगाणप्रकरणी जसे मूक प्रेक्षकासारखे वागले आणि घाईघाईने देशाबाहेर पडले तसेच ते याही वेळी वागतील, असे रशियाने गृहीत धरले असावे. शिवाय असे की, युरोपातले बहुतेक देश आपल्या खनिजतेलावर आणि नैसर्गिक इंधन वायूवर अवलंबून असल्यामुळे युक्रेनला मदत करण्यापूर्वी ते दहादा विचार करतील, असाही रशियाचा कयास होता. तोही चुकीचा ठरला. डोनाल्ड ट्रंप यांच्या कारकिर्दीत नॅार्थ अटलांटिक ट्रिटी अलायन्स आणि अमेरिका यातील संबंध तुटले नाहीत एवढेच. यापुढे आपले आपल्यालाच पहावे लागेल, अमेरिकेवर मदतीसाठी अवलंबून राहण्यात अर्थ नाही, ही भावना युरोपात निर्माण झाली होती. बायडेन यांनी युरोपची समजूत घालून ही भावना दूर करण्याचे आपल्यापरीने अत्यंत कसोशीचे प्रयत्न केले पण एकदा का संशय निर्माण झाला की तो सहजासहजी दूर होत नाही. रशियाची अशीच अटकळ होती. ती पण चुकीची ठरली. सौम्य प्रकृतीच्या वयोवृद्ध बायडेन यांनी आपल्या पाठीशी अमेरिकन जनमत मोठ्या खुबीने उभे केले आहे. असे करतांना अमेरिकन रक्त सांडणार नाही याची ग्वाही ते अमेरिकन जनतेला सतत देत होते. सैन्याची अपेक्षा ठेवू नका, उरलेली सर्व आर्थिक मदत आणि युद्धसामग्री पुरवू असा विश्वास त्यांनी युक्रेनला दिला आणि तसे ते वागले सुद्धा. मिसाईल लॅांचर आणि ड्रोन यांचा यशस्वी वापर रशियाची आगेकूच थोपवण्यासाठी त्यांना खांद्यावर वाहून नेता येतील अशी आयुधे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन, तुर्कस्थान आदींनी पुरविली आहेत. अमेरिकेचे जॅवेलीन मिसाईल लॅांचर आणि तुर्कस्तानचे बायरॅक्टर कॅामबॅट ड्रोन यांचा उपयोग युक्रेनच्या सैन्याने मोठ्या शिताफीने केलेला आपल्याला टीव्ही वाहिन्यांवर दिसत असतो. युक्रेनचे सैनिक हे मिसाईल लॅांचर खांद्यावर वाहून नेतांनाही आपल्याला टीव्ही वाहिन्यांनी दाखविले आहेत. तर मानवरहित ड्रोन अचूक लक्ष्यवेध करतांना दिसत आहे. ग्रेनेडसोबत या दोन आयुधांचा वापर करून आणि मार्गातले पूल उडवून तसेच गनिमी कावा वापरून रशियाच्या सैनिकांच्या आगेकुचीची गति मंद करण्यात युक्रेनला यश प्राप्त झाले आहे. युक्रेनची सीमा रशियाला लागून आहेत. या भागात रशियन फुटिरतावाद्यांनी आपले बस्तान बसवले आहे. या भागात युक्रेनचे सैनिक आणि रशियाधार्जिणे फुटिरतावादी यांत गेली सात आठ वर्षे चकमकी झडत असतात. यामुळे युक्रेनच्या सैनिकांना रशियन सैनिकांचे युद्धतंत्र पुरतेपणी कळले आहे. त्यामुळेही रशियन फौजांना अडवायचे कसे, हे ते जाणून होते. असे असले तरी युक्रेनला युद्ध संपायला हवे आहे. झेलेन्स्कीचा रशियाला प्रस्ताव आहे की, आम्ही कोणत्याही सैनिकी गटात सामील होणार नाही. युक्रेनमध्ये परकीय फौजांना प्रवेश देणार नाही किंवा परकीयांना युक्रेनमध्ये ठाणी उभारू देणार नाही. पण आमची सुरक्षा धोक्यात आल्यास मात्र, नाटोच्या कलम 5 नुसारच्या ‘सामूहिक सुरक्षा’ विषयक तरतुदींचा आधार घेऊ. तसेच मास्कोने युरोपीयन युनीयनमध्ये सामील होण्यास विरोध करू नये. रशियाची आर्थिक कोंडी आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाविरुद्ध अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. रशियाला हेही अपेक्षित नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक व्यवहार घडविणारी स्वीफ्ट नावाची आर्थिक विनीमय संस्था आहे. या संस्थेतून सर्व रशियन बॅंकांची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे रशियाचे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. जगात ठिकठिकाणी असलेली रशियन संपत्ती गोठवण्यात आली. जगातील रशियन धनवंतांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. खुद्द रशियातून अनेक आर्थिक संस्था आणि विचारवंत आणि उद्योजक बाहेर पडले आहेत. खनिज तेल आणि इंधनवायू रशियातून येणाऱ्या भूमिगत वाहिन्यातून जर्मनीला मिळत होता. म्हणून जर्मनीने नरम भूमिका घेतली होती. पण जर्मन जनमताने आपल्या देशाला नरमाई सोडण्यास भाग पाडले आहे. एककल्ली पुतिन पुतिन यांचा कुणावरही विश्वास नसतो आणि ते एककल्ली आहेत. कुणाचंही ऐकून घ्यायला ते तयार नसतात. पुतिन यांच्या मनाचा निश्चय होताच त्यांनी आक्रमण करण्यापूर्वी युक्रेनवर प्रशासनावर, ते नव-नाझी असल्याचा आरोप केला आणि युक्रेनच्या नागरिकांची या हुकुमशाही राजवटीपासून मुक्तता करण्याच्या हेतूने आपण युक्रेनमध्ये सैन्य पाठवीत आहोत, असे जाहीर केले. पण युक्रेनची जनता रशियाविरुद्धच खवळून उठली. ती वोलोदिमिर झेलेन्स्की या आपल्या अध्यक्षांच्या पाठीशी खंबीरपणाने आणि एकदिलाने उभी राहिली. झेलेन्स्की जन्माने ज्यू आहेत. त्यांच्या पूर्वजांना त्यावेळच्या जर्मन नाझी शासनाच्या छळाला बळी पडावे लागले होते. आपण नाझी प्रवृत्तीचे असूच शकत नाही, हे त्यांनी जनतेला पटवून दिले. रशियन सैन्य द्नीपर नदीच्या काठावर येऊन थांबणार? इकडे युक्रेनचीही नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ॲार्गनायझेशन आणि अमेरिकेविरुद्ध एक मोठी तक्रार होती आणि आहे. यांचा एकही सैनिक लढाईत उतरला नाही, आता तर विमानादी सामग्री देण्याचे बाबतीतही त्यांनी टाळाटाळ सुरू केली अशी युक्रेनला खरेतर विनाकारणच शंका आहे. काही शस्त्रे आहेतही असे गृहीत धरले तरी पण ते वापरण्यासाठी सैनिक अपुरे पडू लागतील. अशी विषम लढाई आणखी किती दिवस चालेल? 9 मे पर्यंतच्या मुदतीच्या आत द्नीपर नदीच्या काठापर्यंत रशियन सैन्य पोचेल का? नंतर रशिया थांबेल का? युक्रेनच्या गुप्तहेर खात्याच्या माहितीनुसार रशियाला युक्रेनचे दोन तुकडे करायचे आहेत. हे खरे आहे का? का मध्येच आणखी काही घडेल? मूक प्रेक्षकांनी आपल्या कल्पनाशक्तीला फार ताण देऊ नये, यातच शहाणपणा नाही का?

No comments:

Post a Comment