Monday, June 6, 2022

जननायक आणि राष्ट्रदूतांमधला जिव्हाळा तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक: 31/ 05/ 2022 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. जननायक आणि राष्ट्रदूतांमधला जिव्हाळा वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड. एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? ‘जगातील प्रत्येक देशात भारताचा राजदूत असतो. पण तो एकटा असतो. जगातील प्रत्येक देशात असलेले भारतीय हे त्या देशातील भारताचे राष्ट्रदूत आहेत’, अशी अभिनव भूमिका मोदींनी युरोपमध्ये मांडली. मोदींनी युरोपच्या 2 ते 4 मे 2022 या तीन दिवसांच्या आटोपशीर दौऱ्यात जर्मनीचे नवनिर्वाचित चान्सेलर ओलाफ शोल्झ, डेनमार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रेडेरिकसेन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॅान यांच्याशी द्विपक्षीय आणि युक्रेनसह अन्य आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा तर केलीच, पण यांच्या व्यतिरिक्त डेनमार्कची राजधानी कोपेनहेगन येथे, आईसलंडच्या पंतप्रधान केट्रिन याकोबस्दोत्तिर, नॅार्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर, फिनलंडच्या पंतप्रधान सॅना मरिन आणि स्वीडनच्या पंतप्रधान मॅगडलिना अँडरसन या राष्ट्रप्रमुखांसहही अशीच चर्चा केली. स्वागतासाठी जमलेल्या भारतीयांचा त्यांनी ‘भारताचे राष्ट्रदूत’, म्हणून गौरव केला. मोदींचे आजवरचे सर्वच दौरे आटोपशीर, उपलब्ध वेळेचा जास्तीतजास्त उपयोग करून घेणारे आणि यशस्वी ठरले आहेत. हाही दौरा तसाच होता. या दौऱ्यात मोदींनी एकूण 65 तासांत 25 बैठकांना उपस्थिती लावली, 8 जागतिक नेत्यांबरोबर विचारविनीमय केला आणि डझनावारी करारही केले. पण प्रत्येक ठिकाणी त्या त्या देशातील भारतीयांशी त्यांनी आवर्जून संवाद साधला. युरोप दौऱ्याचे वेगळेपण कोविडप्रकोपानंतरचा हा मोदींचा पहिला मोठा दौरा होता. तसेच त्याला धगधगत्या युक्रेनयुद्धाची पार्श्वभूमीही होती. संबंधित सर्व राष्ट्रप्रमुख भारतानेही रशियाला दोषी मानावे या मताचे होते. युरोपातील आणि युरेपाबाहेरीलही बहुतांश राष्ट्रांनी अशीच भूमिका घेत रशियावर अनेक निर्बंधही लादले आहेत. अशा परिस्थितीत युद्धविराम आणि चर्चेद्वारेच समस्येची सोडवणूक होईल, या युद्धात कोणाचाही विजय होणार नाही, ही आपली तटस्थ भूमिका कायम ठेवीत, यजमान देशांना न दुखवता, द्विपक्षीय चर्चेतून अनेक संकल्प आणि करारांबाबत सहमती घडवून आणणे, ही सोपी गोष्ट नव्हती. पण मोदींसाठी हेही ‘मुमकिन’ ठरावे, यात नवल नाही. डेनमार्कच्या आश्चर्यचकित पंतप्रधान एखाद्या नेत्याच्या भेटीसाठी किंवा त्याला केवळ बघण्यासाठी आलेल्या त्याच्या चाहत्यांचा उत्साह इतका शिगेला पोचलेला दिसावा आणि तो नेताही राजकीय क्षेत्रातला असावा, याचे आश्चर्य डेनमार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रेडेरिकसेन यांना आवरत नव्हते. हे जमलेल्या श्रोत्यांना सांगत त्यांनी आपला आनंद आणि आश्चर्य व्यक्त करताच श्रोत्यांनीही त्यांना गरमजोशीने प्रतिसाद दिला. हे दृश्य यावेळी डेनमार्कची राजधानी कोपेनहेगनमध्ये ठळक स्वरुपात समोर आले असले तरी ती मोदींसाठी नवलाईची बाब नाही. मेट्टे फ्रेडेरिकसेन यांची म्हणजे एका परिपक्व राजकीय नेत्याची ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. जिथे जिथे गेले, तिथे तिथे, मोदी मोदी असा जयजयकार मोदी सोमवारी मेच्या 2 तारखेला बर्लिन विमानतळावर उतरले. युरोपच्या तीन दिवसांच्या भेटीचा हा पहिला थांबा (स्टॅाप) होता. विमानतळावर उतरताच मोदी प्रथम जर्मनीतील ठिकठिकाणून आलेल्या आणि कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून विमानतळावर वाट पाहत असलेल्या भारतीय लोकांच्या स्वागताला समोरे गेले. पुढे एका स्वागतसमारंभातही ते सहभागी झाले. यावेळी जर्मनीत भारतीयांनी संपादन केलेल्या यशाचा भारतीयांना अभिमान वाटतो, अशा शब्दात मोदींनी जर्मनीतील भारतीयांचा गौरव केला. भारताचा प्रत्येक देशात फक्त एकच राजदूत असतो, पण त्या त्या देशातील असंख्य भारतीय हे भारताचे त्या देशातले राष्ट्रदूत आहेत, ही संकल्पना मोदींनी या दौऱ्यात अनेकदा मांडलेली आढळते. म्हणून त्या त्या देशांतील मूळ भारतीयांची भेट घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो, असेही मोदी ठिकठिकाणी म्हणाले आहेत. कोपेनहेगन येथे मोदींनी बदललेल्या भारताचा परिचय उपस्थितांना करून देतांना आज भारत युनिकॅार्नच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, हे सांगितले. कार्यक्रमात सहभागी झालेले नागरिक भारताच्या विविध भाषिक भागातून आलेले आहेत हे मोदींनी त्या नागरिकांना त्या त्या राज्याच्या भाषेत संबोधून डॅनिश पंतप्रधानांना जाणवून दिले. आमच्या भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आमची सर्वांची संस्कृती एकच म्हणजे भारतीय आहे, असे मोदींनी या निमित्ताने त्यांना जाणवून दिले. सर्व समावेशकता आणि सांस्कृतिक विविधता हे भारतीय समाजाचे शक्तिस्थान आहे. आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे ‘जग हेच एक कुटुंब ’ मानणारे आहोत, याची आठवण मोदींनी करून दिली. या कार्यक्रमात डॅनिश पंतप्रधानांची उपस्थिती त्यांच्या भारतीयांबाबतच्या प्रेम आणि आदरभावाची परिचायक आहे, असे सांगत त्यांनी डॅनिश पंतप्रधानांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले. संवादप्रधान भाषणात पुरेशी जवळीक निर्माण करीत मोदींनी डेनमार्कमधील भारतीयांकडून एक आश्वासन मिळविले. त्यानुसार आता डेनमार्कमधला प्रत्येक भारतीय निदान 5 डॅनिश नागरिकांना भारतभेटीसाठी प्रवृत्त करणार आहे. मोदींनी सोबत नेलेल्या भेटवस्तू मोदींनी यजमान देशांच्या प्रमुखांना भेट देण्यासाठी आणलेल्या सर्व वस्तू मानवी कौशल्य वापरून तयार केलेल्या होत्या. देण्यासाठी भेटवस्तू आणणे यात वेगळे काय आहे?. पण त्यातून भारतीय संस्कृतीची विविधता, लष्करी परंपरा, प्राचीन कलाकुसर, कारीगिरी आणि संपन्न भूतकाळ व्यक्त होत असेल तर? हे वेगळेपण नाही का? राजस्तानी कलाकुसर असलेली ढाल, छत्तिसगडची 4000 वर्षांपूर्वी मेणाचा साचा वापरून तयार केलेली डोक्रा बोट, चांदीची मीनाकारी केलेला पक्षी, पितळी तारांनी गुंफलेला राजस्थानी जीवनवृक्ष (ट्री ॲाफ लाईफ), रोगन पेंटिंग, उबदार आणि नाजूक तंतूंनी विणलेली पाश्मीना शाल, मथुरेचे सांझी पेंटिंग, अशा काही भेटवस्तू वेगळेपण लक्षात यावे म्हणून उदाहरणादाखल सांगता येतील. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॅाग ( क्वाड) शिखर परिषद 22 मे 2022 ला रविवारी संध्याकाळी मोदींनी जपानसाठी प्रस्थान ठेवले. तिथल्या 40 तासात 23 बैठका, 35 उद्योगपतींची भेट, या व्यतिरिक्त क्वाड संमेलनात सहभाग असा भरगच्च कार्यक्रम पार पाडावा मोदींनीच. 24 तारखेच्या या शिखर परिषदेत क्वाडचे सर्वात ज्येष्ठ सदस्य नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, यजमान जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अँथनी अल्बानिस हे देखील सहभागी झाले. जपानमधील मुक्कामात मोदी यांनी जपानमधील उद्योगसम्राटांशीही संवाद साधला. तसेच जपानमधील विविध क्षेत्रातील काही प्रमुख नेत्यांशीही चर्चा केली, ती वेगळीच. सोबतच जपानमधील भारतीय नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होण्यासाठी त्यांनी वेळ काढला नसता तरच नवल होते. पंतप्रधानांचे जंगी स्वागत मोदींचे टोकियो विमानतळावर आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी तेथे उपस्थित असलेल्या भारतीयांनी ‘जय श्री राम’ आणि ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. नंतर मोदी टोकियोमधील हॉटेल न्यू ओटानी मध्ये मुक्कामाला गेले. युरोप आणि जपान भेटीत एक प्रमुख फरक लक्षात आला तो असा की जपानमध्ये मोदींच्या स्वागतासाठी हॉटेलबाहेर भारतीयांसोबतच जपानी नागरिकांनीही मोठ्या संख्येत एकच गर्दी केली होती. जंगी स्वागताने भारावून गेलेल्या मोदींनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या मुलांशीही गप्पागोष्टी केल्या. यावेळी 5 व्या वर्गात शिकत असलेल्या एका जपानी मुलाने म्हणजे रित्सुकी कोबायाशी याने मोदींशी हिंदीत बोलायला सुरवात केली. त्याचे हिंदी भाषेवर असलेले प्रभुत्व पाहून मोदींना अतिशय आश्चर्य वाटले. या मुलाला, ‘तू एवढे चांगले हिंदी कसे शिकलास’, असा प्रश्न देखील त्यांनी केला. या मुलाने मोदींच्या स्वागतासाठी तीन भाषेत लिहिलेल्या शुभेच्छा संदेशांचा मोदींनी स्वीकार केला. त्यांनी कोबायाशी याला स्वाक्षरी देखील दिली. मोदींना भेटून आनंद झाल्याची प्रतिक्रिया या मुलाने व्यक्त केली. भारतीय मुलांनी आपापल्या मातृभाषेत आणि त्या त्या लीपीत लिहिलेले स्वागत फलक आणले होते. त्या सर्वांवर मोदींनी आपली स्वाक्षरी दिली. असे प्रसंग त्या मुलांच्या विस्मृतीत कधितरी जातील का? मोदींबद्दल असे म्हणतात की मोदी वेगळे असे काहीच करीत नाहीत. पण ते करण्याची त्यांची पद्धतच तेवढी वेगळी असते. ‘मोदी टच’, म्हणतात, तो हाच. पुन्हा पुन्हा मोदींचा जयजयकार जपानी आणि जपानमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांनी मोदींचे भव्य स्वागत केले. मोदींनी देखील अनेकांशी हस्तांदोलन करीत या नागरिकांशी संवाद साधला, त्यांची विचारपूस केली. यावेळी मोदींच्या जयजयकाराने सगळा परिसर दुमदुमून गेला. भारतीय नागरिक तिरंगा फडकवीत ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत उभे होते. एक जननायक या नात्याने मोदींचे भारतीय नागरिकांशी असलेले अटूट नाते आपण नेहमीच अनुभवतो, परदेशांतील भारतीयांना राष्ट्रदूत असे संबोधून त्यांच्याशीही जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणारा हा नेता, ‘या सम हाच’, असे म्हणण्याचा मोह आवरत नाही.

No comments:

Post a Comment