Monday, November 21, 2022

चीनमध्ये महिलांच्या हाती फक्त पाळण्याची दोरी तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक २२/११/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. चीनमध्ये महिलांच्या हाती फक्त पाळण्याची दोरी वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर - 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? चीनमधील सत्ताधारी पक्षाच्या या पंचवार्षिक परिषदेस पक्षाचे 2300 प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेचे आयोजन भव्यदिव्य आणि डोळ्याचे पारणे फेडणारे असते. डोळे दिपवणारे व्यासपीठ, कडक शिस्त, कडेकोट सुरक्षा आणि लक्ष वेधून घेईल अशी कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षकांची फौज तैनातीला होती. उपस्थित असलेल्या 2300 प्रतिनिधींच्या सुटांच्या काळ्यारंगातलाही एकसारखेपणा जाणवल्याशिवाय रहात नव्हता. या 2300 प्रतिनिधीतून 200 सदस्यांची मध्यवर्ती समिती आणि 170 सदस्यांची पर्यायी समिती निवडली जाते. मध्यवर्ती समिती 25 सदस्यांच्या पोलिट ब्युरोची निवड करते. पोलिटब्युरो 7 सदस्यांच्या सर्वशक्तिमान स्थायी समितीची निवड करतो. यांचा प्रमुख म्हणजे जनरल सेक्रेटरी शी जिनपिंग. हाच पक्षप्रमुख जसा चीनचा अध्यक्ष असतो, तसाच तोच मध्यवर्ती लष्करी आयोगाच्या अध्यक्षपदीही असतो, म्हणजेच सरसेनापतीही असतो. ही तीनही पदे पुढील 5 वर्षे म्हणजे 2027 पर्यंत शी जिनपिंग यांचेकडे असतील. त्यांनी चीनला आर्थिक, सामरिक आणि राजकीय दृष्ट्या सर्वश्रेष्ठपदी न्यायचा दृढनिश्चय केलेला आहे. कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायना च्या स्थायी समितीत (स्टॅंडिग कमेटी) 7 सदस्य पुढील 5 वर्षे सर्वसत्ताधारी असणार आहेत. हे सर्व शी जिनपिंग यांचे एकनिष्ठ समर्थक असून ते निरनिराळ्या क्षेत्रातील अधिकारीही आहेत, हे विशेष. यावेळी शी जिनपिंग माओ प्रमाणेच वागले असे म्हणतात. बाहेर हकललेले विरोधक अधिक उपद्रवकारी न ठरोत, म्हणजे मिळवली. सर्वशक्तिमान सप्तसहकारी शी जिनपिंग - यांनी पदासीन राहण्याबाबतच्या अटी आपल्याला लागू होणार नाहीत, अशी तजवीज अतिशय कौशल्याने केली. आपले प्रतिस्पर्धी आणि संभाव्य पर्यायींना त्यांनी शिताफीने दूर केले. हे करतांना त्यांनी अगोदर कामगार कार्यकर्त्यांना आपलेसे केले. यांचा संबंध सुरक्षा आणि आर्थिक धोरणांशी असे. ली क्वियांग - पक्षाचे शांघायचे 2017 पासूनचे सेक्रेटरी असलेले ली क्वियांग एकदम पोलिट ब्युरोच्या स्टॅंडिंग कमेटीतच येऊन धडकले आहेत. झियांग झेमिन हे माजी अध्यक्ष आणि झू रॅांगजी हे माजी प्रिमियरही शांघायचे सेक्रेटरी राहिलेले होते. यावरून शांघायचे सेक्रेटरीपद किती महत्त्वाचे असते, हे लक्षात येईल. पक्षाचे शांघाय येथील प्रमुख आणि जिनपिंग यांचे विश्वासू सहकारी ली क्वियांग यांच्यासह इतर निष्ठावंतांनाही पदोन्नती मिळाली आहे. सध्याचे पंतप्रधान ली केकियांग यांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपेल, त्यानंतर त्यांची जागा ली क्वियांग घेतील. खरेतर कोविड साथीची हाताळणी ली क्वियांग यांनी योग्य रीतीने केली नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, परंतु खुद्द शी जिनपिंग यांच्यावरही हाच आरोप करता येऊ शकतो. म्हणून या मुद्याकडे काणाडोळा केला गेला असावा. झाओ लेजी - भ्रष्टाचार विरोधी पोलिस दलातील दरारा असलेले हे अधिकारी पक्ष कार्यकर्त्यांवर जरब ठेवण्यासाठी शी जिनपिंग यांना उपयोगी ठरलेले आहेत. हे विरोधकांना बाजूला सारण्यासाठी, कार्यकर्त्यांची शी जिनपिंग यांच्यावर निष्ठा निर्माण करण्यासाठी उपयोगी सिद्ध झाले आहेत. वांग हुनिंग - 62 वर्षांचे वांग हुनिंग यांची सैद्धांतिक बैठक पक्की असल्याचे मानले जाते. हे पूर्वीही स्टॅंडिंग कमेटीचे सदस्य होते. हे शी जिनपिंग यांचे सल्लागार मानले जातात. पक्षसदस्य नसलेले गट, धार्मिक संघटना आणि अल्पसंख्यांक याबाबत सल्ला देणारे अशी यांची ओळख आहे. काई क्युई - 66 वर्ष वयाचे काई क्युई हे तसे नवागत आहेत. पण शी जिनपिंग यांचे मात्र ते जुने सहकारी आहेत. हे बेजिंगचे मेयर होते. 2022 च्या बेजिंग ऑलिंपिकचे यशस्वी आयोजन हा यांच्या शिरपेचातील महत्त्वाचा तुरा मानला गेला आहे. डिंग झुएक्सियांग- 60 वर्ष वयाच्या डिंग झुएक्सियांग यांचा पक्षाचे कार्यालय प्रमुख या नात्याने असलेला अनुभव महत्त्वाचा मानला जातो. पक्षाविषयीच्या सर्व बित्तमबातम्या यांना मुखोद्गत आहेत, अशी यांची विशेषता सांगितली जाते. यांना शी जिनपिंग यांचे चीफ ऑफ स्टाफ मानले जाते. ली शी - 66 वर्ष वयाच्या ली शी यांचे अर्थकारण हे विशेष क्षेत्र मानले जाते. हे कडक आर्थिक शिस्तीचे पुरस्कर्ते मानले जातात. महिलांच्या हाती मात्र पाळण्याची दोरीच! गेल्या 25 वर्षानंतर पहिल्यांदाच चीनमध्ये पोलिटब्युरोमध्ये महिलांना प्रतिनिधित्व असणार नाही. पोलिट ब्युरोत निदान एकतरी महिला असावी या प्रथेला शी जिनपिंग यांनी फाटा दिला आहे. पुढील 5 वर्षे तरी पोलिटब्युरोच्या सात सदस्यांमध्ये महिला असणार नाही. कोविड झार म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सुन च्युनलान यांच्या वयाला 68 वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांना निवृत्ती घ्यावी लागली. पण या नियमाला अपवाद करून काही सदस्य पोलिटब्युरोमध्ये आहेत, हे उल्लेखनीय आहे. सत्तेवर 100% पकड हा एकमेव हेतू समोर ठेवून पोलिटब्युरोतील नेमणुका शी जिनपिंग यांनी केल्या आहेत. शेन यिक्विन या प्रांतस्तरावरच्या प्रमुख असलेल्या महिलेला यावेळी संधी मिळेल आणि त्या पोलिटब्युरोवर नियुक्त होतील असे अनेकांना वाटत होते. दुसरी एक महिला शेन युयु या तर नॅशनल पीपल्स कॅांग्रेसच्या स्टॅंडिंग कमेटीच्या व्हाईस चेअरवूमन होत्या. त्यांची वर्णी पोलिटब्युरोत लागेल असाही काहींचा कयास होता. पण तसेही झाले नाही. या दोघींना सेंट्रल कमेटीच्या 205 सदस्यात सामावून घेतले गेले. या कमेटीत फक्त 11 महिला आहेत. आजपर्यंत फक्त 8 महिलाच पोलिटब्युरोची पायरी चढू शकल्या आहेत. त्यापैकी 4 महिलांची गुणवत्ता बड्या नेत्यांच्या अर्धांगिनी एवढीच होती. माओत्से डॅांग आणि चाऊ एन लाय यांच्या पत्नी या चारपैकी दोन होत्या.1949 या वर्षी कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायनाची स्थापना झाली. तेव्हापासून पक्त 8 महिलाच सर्वोच्चस्तरातील समितीत होत्या. त्यापैकी चार महिलांची विशेष गुणवत्ता कोणती होती, हे सर्वज्ञात आहे. शी जिनपिंग हे लिंगसमानतेचे खंदे समर्थक मानले जातात. पण सध्यातरी चीनमध्ये महिलांची भूमिका चूल आणि मूल यापुरतीच सीमित असल्याचे दिसते आहे. आज चीनमध्ये जन्मदर काळजी वाटावी इतका कमी झाला आहे. विवाहितांच्या संख्येतही लक्षणीय घट होताना दिसते आहे. शी जिनपिंग यांनी तर महिलांना उपदेश केला आहे की, त्यांनी कुटुंबातील बाल आणि वृद्धांची काळजी वहावी. तसेच लहान मुलांच्या शिक्षणावरही लक्ष केंद्रित करावे. विरोधकांना पदच्युत केले शी जिनपिंग औपचारिक रीतीने 22 ऑक्टोबर 2022 ला तिसऱ्यांदा चीनचे सर्वसत्ताधीश झाले याचे आश्चर्य वाटायला नको. सत्तेवर त्यांची पकड होतीच तशी. सत्तेवर त्यांची पोलादी पकड आणखी पक्की बसणार हेही ओघानेच आले. सहाय्यक म्हणून त्यांनी आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या सहकाऱ्यांची निवड केली यातही विशेष असे काही नाही. राष्ट्रीय सुरक्षेसाठी तंत्रज्ञानावर आधारित सामर्थ्य आता चीनच्या दिमतीला असणार आहे. कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायना च्या दोन सर्वोच्च आणि शक्तिशाली समित्या म्हणजे 24 सदस्यांचा पोलिट ब्युरो आणि सात सदस्यांची स्टॅंडिंग कमेटी यात आता नवीन आणि शी जिनपिंग यांच्याशी एकनिष्ठ असलेल्यांचाच भरणा आहे. एकेकाळी कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायना मध्येच हू जिंताओ यांचा यूथ लीग ग्रुप, झियांग झेमीन यांचा शांघाय ग्रुप आणि शी जिनपिंग यांचा गट असे तीन पक्षांतर्गत गट होते. या दोन वेगळ्या गटातील कोणालाही आता नवीन रचनेत स्थान नाही. चीनमध्ये यापुढे जे काही घडेल, चांगले वा वाईट, यासाठी फक्त आणि फक्त शी जिनपिंग हेच उत्तरदायी असतील. जे चार निवृत्त झाले त्यात प्रिमियर केक्वियांग सुद्धा आहेत. 67 वर्ष वयाच्या या नेत्याच्या सेवानिवृत्तीला चांगला एक वर्षाचा अवकाश होता. हू च्युनहुवा यांच्याकडे भावी प्रिमियर म्हणून पाहिले जायचे. ते न आता स्टॅंडिग कमेटीत आहेत न पोलिट ब्युरोमध्ये. याचा अर्थ त्यांची पदावनती झाली असा घ्यावा लागतो. चीनला राजकीय, आर्थिक, सामाजिक, सैनिकी आणि तांत्रिक बाबतीत नेत्रदीपक प्रगती करायची झाली तर असे काही बदल करायलाच हवेत, अशी शी जिनपिंग यांची धारणा असावी. पोलिट ब्युरोमध्ये दोन कमांडर आहेत. ते सेंट्रल मिलिटरी कमीशनवर व्हाईस चेअरमेन असतील. यातील झॅंग योक्सॅान हे 72 वर्षांचे होऊनही सेवानिवृत्त झाले नाहीत. संरक्षण खात्यातील एक मंत्री चेन वेनकिंग हेही पोलिट ब्युरोमध्ये आहेत. याचा अर्थ त्यांना लवकरच आणखी वरचे पद मिळणार आहे. प्रांतस्तरावरच्या अनेक नेत्यांना अशाच बढत्या मिळाल्या आहेत. थोडक्यात असे की, शी जिनपिंग यांचे खरेखुरे आणि संभाव्य प्रतिस्पर्धी यांची ‘नीट’ व्यवस्था लावून विश्वासू आणि दुसऱ्या फळीतील लोकांना शी जिनपिंग यांनी सोबत घेतले आहे. अशी सर्व अनुकूल जुळवाजुळव केल्यानंतरही या 69 वर्षांच्या नेत्याला कोविड काही अजूनही धडपणे आवरता न आल्यामुळे तो कातावल्या सारखा झाला आहे. आणखी असे की चीनची बाजू घेणारे विशेषत: व्यापारी संबंध ठेवणारे देश पाश्चात्यांमध्येही होते. पण युक्रेनप्रकरणी चीनने रशियाची बाजू घेतल्यामुळे तसेच तैवानप्रकरणी चीनची भूमिका न पटल्यामुळे ते चीनपासून खूपच दूर गेले आहेत. उत्तर कोरिया, इराण आणि रशिया सोडले तर चीन आज पार एकटा पडला आहे. खुद्द चीनमध्येही शी जिनपिंग यांचे बाबतीत अशीच परिस्थिती केव्हा उद्भवेल ते सांगता यायचे नाही. मग शी जिनपिंग मानभावीपणे भलेही म्हणोत की,’ तुम्ही सर्वांनी एकमताने निवडून दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो’.

No comments:

Post a Comment