Monday, September 11, 2023

                          चिन्यांची जिवंत राहण्यासाठीची मरमर!

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 12/09/2023  हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

चिन्यांची जिवंत राहण्यासाठीची मरमर!

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

Email - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

                               चिन्यांची जिवंत राहण्यासाठीची मरमर!

   जेनेटिक औषधे स्वस्त आणि मूळ औषधांइतकीच परिणामकारक असतात. गेली अनेक वर्षे भारतात तयार झालेल्या जेनेरिक औषधांवर चीनने बंदी घातल्यामुळे चिनी रुग्णांची अतिशय दयनीय  स्थिती झाली होती.

  जेनेरिक औषधे म्हणजे काय? 

   पेटंटच्या अधिकाराखाली एखाद्या कंपनीने एखादे औषध एखाद्या खास नावाने  (ब्रॅंड नेम) बाजारात आणले असेल आणि तेच औषध त्याच प्रमाणात, त्याच घटकांसह पेटंटचा कालावधी संपल्यानंतर, म्हणजेच पेटंट कालबाह्य झाल्यानंतर,  त्यातील घटकांच्या मूळ नावाने (तेच ब्रॅंड नेम नाही) विक्रीस आणले असेल तर त्याला जेनेरिक औषध असे म्हणतात. अशी औषधे रास्त नफा आकारूनही  खूप स्वस्तात विकली जातात (विकता येतात) कारण आता संशोधनावर पुन्हा खर्च करायचा नसतो.  त्यामुळे ती स्वस्तात तयार होतात आणि स्वस्तात विकूनही नफा सुटत  असतो. या औषधांची शुद्धता आणि परिणामकारकता ब्रॅंडेड औषधासारखीच असते. काही कंपन्या आपले वेगळे ब्रॅंड नेम देऊनही ही औषधे विकतात. जसे की, ‘ग्लीव्हेक’ या ब्रॅंड नावाचे ल्युकेमियावरील औषध ‘नोव्हार्टिस’ नावाच्या कंपनीने तयार केले असून त्याची किंमत सामान्यांच्या आटोक्याबाहेरची आहे पण एका भारतीय कंपनीने हेच घटक याच प्रमाणात घेऊन ‘वीनत’ या नावाचे जेनेरिक औषध तयार केले असून ते अतिशय स्वस्तात उपलब्ध असते. ब्रॅंडेड औषधाला जागतिक मान्यता प्राप्त झालेली असते, हे खरे. पण ती ग्राहकांना खूप जास्त किमतीला विकली जात असतात, कारण त्यांच्या निर्मितीसाठी त्या बाबतच्या संशोधनासाठी आणि उत्पादनासाठी त्या कंपनींने बराच खर्च केलेला असतो. त्यामुळे ते औषध दुसरी कंपनी काही विशिष्ट काळ जाईपर्यंत तयार करू व विक्री करू शकत नाही. त्या काळानंतर ते औषध पेटंट फ्री होते. आता तसेच औषध दुसरी कंपनी तयार करते. हेच जेनेरिक मेडिसिन होय. ते स्वस्तात विकूनही या कंपनीला पुरेसा लाभ होतो आणि ग्राहकांनाही कमी पैशात मूळ औषधाच्या तोडीचे औषध मिळते. 

   थोडक्यात असे की, जेनेरिक औषधे  म्हणजे अशी औषधे की, ज्यातील घटकांचे प्रमाण, त्याची गुणवत्ता, शरीरांतर्गत वहनाचा मार्ग, त्याचा उपयोग आणि त्याची कामगिरी ब्रॅंडेड औषधासारखीच असते पण त्याला मूळ किंवा अन्य कोणतेही ब्रॅंड नाव नसते. त्याचा रंग, आकार आणि पॅकिंग किंवा संरक्षक वेश्टन किंवा आवरण वेगळे असते. ही औषधे त्या त्या देशातील सरकारी नियमांप्रमाणेच तयार केलेली असतात.

     भारत आणि जेनेरिक औषधे

  भारत सरकारने 1960 च्या दशकाच्या सुरुवातीस भारतीय कंपन्यांना तसेच 1970 मध्ये पेटंट कायद्याद्वारे अधिक औषध उत्पादनास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. ]पेटंट कायद्याने खाद्यपदार्थ आणि औषधांसाठीचे ‘रचना पेटंट’ काढून टाकले.

   आज जेनेरिक औषधांचा जगातला सर्वात मोठा पुरवठादार भारत आहे. भारतीय औषधेपुरवठाक्षेत्र जगाला हव्या असलेल्या लसींपैकी 50% लसींचा पुरवठा करते, अमेरिकेच्या गरजेपैकी 40% जेनेरिक औषधे पुरवते तर ब्रिटनच्या गरजेपैकी 25% औषधे पुरविते. 

    चिनी आणि अमेरिकन चित्रपट आणि जेनेरिक औषधे 

  ‘डाईंग टू सर्व्हाईव्ह’, ही एका ल्युकोमिया झालेल्या चिनी रुग्णाची आणि चीनला हादरवून सोडणाऱ्या भारतीय कॅन्सर  ड्रगची कहाणी आहे. या चित्रपटाचे चीनमध्ये अभूतपूर्व स्वागत झाले होते. हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. या कथेचा नायक लू यंग याला भारतातून तस्करी करून आणलेल्या ड्रगची विक्री केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. असे या चित्रकथेचे बीज आहे. या चित्रपटातील ‘रील लाईफ’ आणि ‘रीअल लाईफ’ मधील साम्य प्रेक्षकांना चांगलेच भावलेले दिसते.

   अशीच घटना अमेरिकेतही घडली होती. यावरही चित्रपट बेतला गेला होता. या चित्रपटाचे नाव होते ‘डल्लास बायर्स क्लब’. याला ऑस्कर पारितोषकानेही सन्मानित केले गेले होते. या कथेचा नायक होता, रॉन वूड्रूफ! एक ‘एड्स’ झालेला रुग्ण! ही कथा आहे 1980 च्या सुमारासची. एड्स या रोगावरील औषधांच्या किमती तेव्हा गगनाला भिडल्या होत्या. एवढी किंमत मोजणे, रॉन वूड्रूफला अशक्यच होते. म्हणून त्याने तस्करी करवून/करून अमेरिकेबाहेरून प्रभावी, परिणामकारक पण स्वस्त जेनेरिक औषधे आणवली. यांचा फायदा तो इतर रुग्णांनाही करून देत असे. चिनी चित्रपट ‘डाईंग टू सर्व्हाईव्ह’ आणि अमेरिकन चित्रपट, ‘डल्लास बायर्स क्लब’ यात असे विलक्षण साम्य आहे.

  चीनमध्ये लू यंग या नावाचा एक व्यापारी असतो. कॅन्सरवरचे भारतात तयार झालेले एक प्रभावी औषध तस्करी करून आणून विकल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली जाते. भलीमोठी किमंत असलेले आणि पाश्चात्य जगात मान्यता पावलेले औषध घेण्याची त्याची ऐपत नसते, तर भारतात तयार झालेल्या स्वस्त जेनेरिक औषधांना चीनमध्ये बंदी असते. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात भरपूर कमाई केली होती.

सत्यकथा

   मुळात सत्यकथा काहीशी अशी आहे. 2002 मध्ये लू यंग याला ल्युकेमिया झाल्याचे तपासणीअंती लक्षात आले. त्याला ‘नोव्हार्टिस’ नावाच्या कंपनीने तयार केलेले ‘ग्लीव्हेक’ नावाचे औषध  घेण्यास सांगण्यात आले. या औषधाच्या एका बाटलीची किंमत 2.5 लाख रुपये सांगण्यात आली. लू यंगने हे औषध घेऊन 70 लाख रुपये खर्च केला. मग त्याने ‘वीनत’ या नावाचे कॅन्सरवरचे भारतीय औषध घेणे सुरू केले. ते पहिल्या औषधाइतकेच प्रभावी तर होतेच शिवाय त्याची किंमत मात्र पहिल्या औषधाच्या तुलनेत एकदशांश इतकीच होती. पण या औषधाला चीनमध्ये बंदी असल्यामुळे त्याने तस्करी करून हे औषध चोरमार्गाने चीनमध्ये आणवले आणि स्वत: हे औषध घ्यायला आणि इतरांनाही ते विकत द्यायला सुरवात केली.

   ही तस्करी होती, हा गुन्हा होता. 2014 मध्ये चिनी अधिकाऱ्यांनी लूला अटक केली. पण चिनी सर्वोच्च न्यायालयाने नरम आणि सौम्य भूमिका घेतली. त्याची प्रकृती आणि त्याने शेकडो नागरिकांना सद्हेतूने मदत केली होती, हे लक्षात घेऊन न्यायालयाने कठोर शिक्षा तर केली नाहीच, शिवाय आरोपीने दुसऱ्या कुणालाही लुबाडले नव्हते की फसवले नव्हते, त्यामुळे त्याचे कृत्य गुन्हा या प्रकारात मोडत नाही, अशी उदारमतवादी भूमिका घेऊन लूला मुक्त केले. या चित्रपटातील अनेक दृश्ये मुंबईतली आहेत. कदाचित मुंबईहूनच या औषधांची तस्करी करण्यात आली होती, म्हणून निर्मात्याने मुंबईची निवड चित्रिकरणासाठी केली असावी. 

 गुन्हा नव्हे, जिवंत राहण्यासाठीची मरमर!

    चित्रपटात ‘फार्मा’ कंपनीवर कडक शब्दात टीका करण्यात आली आहे. कारण भरमसाठ किमतींमुळे चिनी आरोग्यसेवेवर वाईट परिणाम होत होता. चित्रपटात फार्मा कंपनीचा एक बडा अधिकारी शांघाय पोलिसांसोबत चर्चा करतांना दाखविला आहे. वीनतच्या अवैध विक्रीबाबत काय उपाययोजना करावी,  या विषयावर ही चर्चा केंद्रित होती. दुसऱ्या एका दृश्यात लू पोलिस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घालतांना दाखविला आहे. तो म्हणतो, “माझा गुन्हा एवढाच होताना की, मी ‘जिवंत’ राहण्यासाठी ‘मरमर’ करीत होतो!” “आय वॅाज डाईंग टू सर्व्हाईव्ह!”

   या चित्रपटाचा प्रत्यक्ष परिणाम असा झाला की, अडमुठ्या, भारतविरोधी आणि भावनाशून्य  चिनी सरकारनेही भारतातून आयात होणाऱ्या 28 जेनेरिक औषधांवरची बंदी हटवली शिवाय आयात करही रद्द केला. यातील एक औषध होते, ‘वीनत!’ या 28 औषधांच्या आयातीमुळे आणि त्यांच्यावरील कर रद्द केल्यामुळे असंख्य चिनी रुग्णांचे प्राण वाचले आहेत. 


No comments:

Post a Comment