Monday, October 2, 2023

 पूर्वेतिहास खलिस्तानचा

(लेखांक पहिला )

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक ०३/१०/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

पूर्वेतिहास खलिस्तानचा

(लेखांक पहिला )

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    

Email- - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

पूर्वेतिहास खलिस्तानचा

(लेखांक पहिला )


    1940 मध्ये मुस्लीम लीगच्या लाहोर अधिवेशनात मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी  करण्यात आली. हिंदूंसाठी  हिंदुस्थान आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान असे दोन देश झाल्यास शिखांना स्वतंत्रस्थान कुठेच मिळणार नाही, अशी भावना शिखांमध्ये निर्माण झाली. म्हणून शिखांचेही स्वतंत्र राष्ट्र असले पाहिजे अशी मागणी करण्यास शिखांनी सुरवात केली. 1940 मध्येच डॉ. वीरसिंग भट्टी यांनी पहिल्यांदा स्वतंत्र खलिस्तानची कल्पना मांडली. त्यांना यापासून परावृत्त करण्याच्या हेतूने स्वतंत्र भारतात शीख समुदायाला अर्ध-स्वायत्तता देण्याची ग्वाही महात्मा गांधी यांनी दिली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही 1946 च्या कलकत्त्याच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत हीच भूमिका कायम ठेवली. त्यामुळे स्वतंत्र खलिस्तानचा मुद्दा तेव्हा काहीसा मागे राहिला.

  पण पुढे  एका पत्रकार परिषदेत नेहरू यांनी या भूमिकेत बदल केला आणि त्यामुळे शीख समुदाय नाराज झाला. हिंदूंच्या राज्यात आपल्यावर अन्याय होईल, ही  भीती शिखांच्या मनात निर्माण झाली. खलिस्तानचा प्रश्न अशाप्रकारे नव्याने निर्माण झाला, असे काहींचे मत आहे. 

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 

प्रचंड रक्तपातासह 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली. 1966 मध्ये पंजाबची स्थापना झाल्यावर अकाली दलाच्या नेत्यांनी खलिस्तानची मागणी पुढे केली. इंग्लंडमधील चरणसिंह पंथी आणि आणि डॉ. जगजित सिंह चौहान यांनी सत्तरच्या दशकात ही मागणी केली होती. 

डॉ.चौहान सत्तरच्या दशकात ब्रिटनमध्ये राहत असत आणि अमेरिका आणि पाकिस्तानला भेटी देत असत. काही तरुणांनी 1978 मध्ये खलिस्तानच्या मागणीसाठी ‘दाल खालसा’ या पक्षाची स्थापना केली होती. 

1955 मध्ये हरमंदिर साहिब म्हणजेच अमृतसरच्या सुवर्णमंदिराजवळ स्वतंत्र पंजाबी सुभ्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई झाली. या कारवाईमुळे शिखांच्या अस्मितेला धक्का पोहोचला, असे इतिहासकार डॉ. गुरबचनसिंग बच्चन यांचे मत आहे.

   1973 मध्ये आनंदपूरला साहिब शिरोमणी अकाली दलाने एक ठराव मंजूर केला त्यानुसार शीख धर्माला एक वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. हिंदू धर्मापासून शीख धर्म वेगळा करावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. याच बरोबर केंद्र-राज्य संबंधाचा पुनर्विचार करून घटनेत  राज्याला जास्त अधिकार मिळावेत अशीही मागणी करण्यात आली होती. पुढच्या काळात अनेक  संस्था खलिस्तानच्या समर्थनासाठी उभ्या राहिल्या पण यथावकाश बहुतेक अस्तंगतही झाल्या. 

  नंतर स्वतंत्र खलिस्तानच्या चळवळीत 1970 च्या दशकात जर्नैलसिंग भिंद्रनवालेचा उदय झाला. अकाली दलाचा पंजाब मधील प्रभाव कमी करण्यासाठी कॅांग्रेसनेच भिंद्रानवाले याला उभे केले होते. पण पुढे तोच कॅांग्रेसच्याही विरोधात गेला, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या घटनेला ‘नवीन भस्मासुराच्या जन्माची कथा’,  असे काही  संबोधतात.  भिंद्रानवाले तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय होता. त्याने खटपटी लटपटी करून थेट सुवर्ण मंदिरातच आपले बस्तान ठेवले. 

  1970 ते 1980च्या दशकात पंजाबात हिंसक कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली. यामागे भिंद्रनवाले यांचा हात होता, असे म्हटले जात होते. ते उगीच नव्हते. याच काळात पंजाब केसरी वृत्तपत्राचे संपादक लाला जगतनारायण यांची हत्या झाली. निरंकारी समाजाच्या लोकांवर हल्ले होऊ लागले. पंजाबात प्रचंड  अस्थिरता निर्माण होणार, अशी चिन्हे दिसू लागली. त्यातही फक्त हिंदू समाजावरच नव्हे तर  सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या  शिखांवरही हल्ले होत.  

ऑपरेशन ब्लू स्टार 

   परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं बघून भारत सरकारने लष्कराची मदत घेत ऑपरेशन ब्लू स्टार आखून  या मोहिमेत सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवले गेले. या कारवाईत भिंद्रनवाले आणि त्यांचे अनेक अनुयायी मारले गेले. या कारवाईदरम्यान मंदिरातल्या जुन्या लायब्ररीलाही आग लागली. त्यात अनेक जुनी हस्तलिखिते आणि ग्रंथ जळून राख झाले. या संपूर्ण कारवाईदरम्यान पंजाबच्या गावागावांमधल्या शीख तरुणांना पोलिसांनी केवळ संशयावरून ताब्यात घेतले होते, असे म्हणतात. भारताच्या इतिहासातली शिखांच्या संबंधातली ही अतिशय धक्कादायक घटना ठरली. त्यामुळे शीख समुदायाच्या भावना प्रचंड दुखावल्या. 

  इंदिरा गांधींची हत्या 

  ऑपरेशन ब्लू स्टारचा सूड उगवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांच्या निवासस्थानी त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी हत्या केली. या हत्येनंतर दिल्लीत प्रचंड प्रमाणात दंगली उसळल्या आणि हजारो निरपराध शिखांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. या घटनेमुळे शीख अन्य भारतीयांपासून खूपच दुरावले. यानंतर पुढची 12 वर्षे शीख अतिरेक्यांच्या कारवायांमुळे पंजाबच नाही, तर संपूर्ण भारतदेशच अस्थिर झाला होता.             

                  कॅनडातील खलिस्तानी 

   सुवर्ण मंदिरातील ॲापरेशन ब्ल्यू स्टार आटोपते न आटोपते तोच कॅनडामध्ये अतिरेकी शिखांनी उचल खाल्ली. विमान अपघात घडवू, हिंदूंची कत्तल करू, अशा धमक्याही त्यांनी दिल्या.  कॅनडाच्या संसदेचे मवाळ सदस्य उज्जल दोसांग यांनी अतिरेक्यांविरुद्ध विचार व्यक्त करताच त्यांना धमक्या देण्यात आल्या.

  1998 च्या नोव्हेंबर महिन्यातील 18 तारखेला कॅनडामधल्या एका पत्रकाराची - तारासिंग हायेर यांची- हत्या करण्यात आली. याही वेळी संशयाची सुई खलिस्तानी अतिरेक्यांच्याच दिशेने वळत होती. कॅनेडियन शीख असलेले तारासिंग हे इंडो-कॅनेडियन टाईम्सचे प्रकाशक होते. एकेकाळी ते खलिस्तानसमर्थक होते. पण त्यांनी एअर इंडियाची फेरी क्रमांक 182 च्या बाबतीतल्या घातपातावर कडक टीका केली होती. हा कट रचला जात असतांनाचा संवाद आपल्या कानावर पडला असून तशी साक्ष आपण देणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. या अगोदर 24 जानेवारी 1995 ला तरसेम सिंग पुरेवाल यांचीही हत्या करण्यात आली होती. ते ब्रिटनमधील पंजाबी साप्ताहिक देस परदेसचे संपादक होते. तरसेम सिंग पुरेवाल यांच्या हत्येच्या मुळाशी सुद्धा खलिस्तानवादीच असावेत, असे मानले गेले. शीख जहालवादाबाबतीतली त्यांची शोधपत्रकारिता या हत्येला कारणीभूत असल्याचे मानले गेले. 

   यानंतर कॅनडामधील ज्यांनी ज्यांनी खलिस्तानविरोधी लिखाण केले त्या सर्वाना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत गेल्या. 2008 मध्ये डॅा मनमोहनसिंग यांनी शीख दहशतवादाबाबत चिंता व्यक्त केली  होती. 2017 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर ते खलिस्तानला सहानुभूती दाखवीत असल्याचा आरोप करीत  त्यांची भेट घेण्यास नकार दिला होता. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी, खलिस्तान हा मुद्दा न कॅनडात आहे न पंजाबात, असे ठणकावून सांगितले. तेव्हा जस्टिन ट्रूडो यांनी भूमिका जाहीर केली की, कॅनडा खलिस्तान चळवळीच्या पुनरुज्जीवनाला समर्थन देणार नाही. पण कॅनडात शिखांची व्होट बॅंक आहे. कॅनडातील बहुसंख्य शीख समाज खलिस्तान चळवळीच्या पाठीशी नाही, हे खरे . पण खलिस्तानवाद्यांच्या दंडेलीमुळे ते गप्प आहेत. जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पक्षाला शिखांची व्होट बॅंक आपल्या बाजूने हवीच आहे. त्यासाठी खलिस्तानवाद्यांच्या सर्व मागण्या मान्य ते करतात. त्यांना हवी तशी वक्तव्ये देतात. बोलवित्या धन्याची भूमिका खलिस्तानी नेतृत्वाकडे असते. सर्वसामान्य कॅनेडियन समाजाला हे आवडत नसून जस्टिन ट्रूडो यांची लोकप्रीयता झपाट्याने कमी होत चालली आहे. 2025 ची  निवडणूक जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पक्षाला जड जाणार, असे भाकीत राजकीय पंडितांनी आजच वर्तविले आहे. पण भारतासाठीचा जास्त गंभीर मुद्दा हा आहे की, जो शीख समाज एकेकाळी भारताचा खड्गहस्त मानला जात होता, त्यातला एक घटक,  लहानसा असला तरी,  आज खलिस्तानी समर्थक होऊन भारताच्याच जीवावर उठला आहे.

(अपूर्ण)


No comments:

Post a Comment