Saturday, March 30, 2024

 

तरूणभारत , मुंबई

   आजच्या महत्त्वाच्या विषयाशी संबंधित सोबतचा लेख प्रसिद्ध करण्याचे बाबतीत योग्य तो निर्णय व्हावा, ही विनंती. 

आपला स्नेहाकांक्षी, 

वसंत काणे  मार्च 2024

मालदीवमध्ये  मुइझ्झूंची मनमानी आणि मोदी मॅजिक 


वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com  

Blog - kasa mee? 

   2024 च्या मार्च महिन्यात मालदीव आणि चीन यांच्यामध्ये एका संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानुसार चीन मालदीवला काहीही मोबदला न घेता (ग्रॅटिस) संरक्षण देणार आहे. अशाप्रकारे मालदीवच्या बाबतीत भारतापासून दूरता आणि चीनशी जवळीक याला प्रारंभ झाला आहे. मालदीव भारतासाठी भूराजकीय, सामरिक, आर्थिक, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यापारी अशा विविध दृष्टींनी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या कराराचा परिणाम हिंदी महासागरातील भूराजकीय वातावरणात फार मोठा बदल होण्यात होणार आहे. कारण हे निमित्त करून मालदीवने भारताची जी सैनिकी पथके (77 सैनिक आणि 12 वैद्यकीय कर्मचारी), जी उभयपक्षी मान्यतेनुसार आजवर मालदीवमध्ये होती, त्यांना भारतात परत जाण्यास सांगितले आहे. याच्या उत्तरादाखल भारत आणि  अन्य काही राष्ट्रांना हिंदीमहासागरविषयक रणनीतीची नव्याने आखणी करावी लागणार आहे. मालदीव आणि चीन यातील करार गुप्त स्वरुपाचा आहे. चीन म्हणे घातक नसलेली शस्त्रेच मालदीवला पुरवणार असून त्यांच्या वापराविषयीचे प्रशिक्षणही देणार आहे. पण या समजुतीत राहण्यात अर्थ नाही. याला जोडूनच चिनी संशोधन/गुप्तचर जहाज शियांग यांग हाँग 03 डॉकिंगने मालदीवला भेट दिल्याचे वृत्त आहे.  भारतासोबतच्या तणावाच्या या काळात मालदीव हळूहळू नवे मित्रही जोडतो आहे. चीनसोबत संरक्षण करार केल्यानंतर अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी कट्टर इस्लामिक देश तुर्कीसोबत नवा करार केला आहे. तुर्कीसोबतच्या या नव्या करारानुसार मालदीवने आपल्या भोवतालच्या समुद्रात म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये गस्त घालण्यासाठी लष्करी ड्रोन्सची खरेदी 3 मार्च 2024 रोजी केली आहे. म्हणजे हा करार भारतीय सैन्याच्या माघारीपूर्वी झाला असल्याची गंभीर दखल भारताने घेतली आहे.

 दर्पोक्ती!

 ‘‘मालदीव कोणत्याही देशाच्या मदतीवर अवलंबून नाही. आमचा देश जरी लहान असला, तरी भोवतालचा  हिंद महासागर हिशोबात घेतला तर आम्ही नऊ लाख चौरस किलोमीटरचा स्पेशल इकॉनॉमिक झोन असलेला एक ‘भला मोठा देश’ आहोत. हा महासागर कोणत्याही विशिष्ट देशाची मालमत्ता नाही'', ही मोहम्मद मुइज्जू यांची दर्पोक्ती हास्यास्पद असली तरी ती हसण्यावारी नेण्यासारखीही नाही. हिंदी महासागरात मालदीव मोक्याच्या जागी आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा राखण्यासाठी आणि व्यापारी जलमार्ग अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मालदीव अतिशय महत्त्वाचा आहे. उत्तरादाखल भारताने आपली आयएनएस जटायू ही युद्धनौका  लक्षद्वीपमधील मिनीकॅाय बेटावर मालदीवपासून 130 किलोमीटर अंतरावर  आणून ठेवली आहे. त्यामुळे भारतालाही पाळत ठेवणे  (ऑपरेशनल सर्व्हिलन्स) सोयीचे होणार आहे. 

मालदीव कसा?

    मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक कंकणाकृती द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान 26 बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैऋत्येस 750 किलोमीटरवर आणि भारताच्या नैऋत्येस 600 किलोमीटरवर आहेत. मालदीव द्वीपसमूहाने जरी समुद्रातील  90,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे, तरी या बेटसमूहातील जलयुक्त भाग वगळला तर सर्व बेटसमूहांचे एकूण क्षेत्रफळ फक्त सुमारे 400 चौरस किमी आहे. म्हणजे हा ‘भला मोठा देश’ नक्कीच नाही. समुद्रात बुडालेल्या एका पर्वताची पाण्यावर आलेली शिखरे म्हणजे ही बेटे असून हा पर्वत लक्षद्वीपापर्यंत पसरलेला आहे.  तशी इथे एकूण 1200 बेटे आहेत. पण 6 लाख मनुष्यवस्ती फक्त 200 बेटांवरच आहे. बहुतेक बेटांची समुद्रसपाटीपासूनची उंची फक्त 8 फूट इतकीच आहे. त्यामुळे अनेकदा अगोदर अस्तित्वात असलेली बेटे समुद्रात बुडून जावीत व सागरांतर्गत उलथापालथींमुळे नवीन बेटे  निर्माण व्हावीत, असा प्रकार या भागात नेहमी सुरू असतो. सागराच्या उथळपणामुळे सुरवातीला या भागात नौकानयन करणे अतिशय धोकादायक मानले जात असे. म्हणून पूर्वी मसाल्याचे पदार्थ वाहून नेणारी जहाजे या बेटांना वळसा घालून जायची. आता मात्र अचुक नकाशे उपलब्ध आहेत. 

  एकट्या माले या  राजधानीच्या शहराची लोकसंख्याच एक लाख आहे. बाकीच्या अनेक बेटांवरील लोकसंख्या तर शेकड्यातच असते. इसवी सन 1117 च्या सुमारास येथे दीवा महाल साम्राज्य होते, असे उल्लेख आहेत. तसे सद्ध्या माहीत असलेला मालदीवचा इतिहास, 2,500 वर्षांहून अधिक जुना आहे. येथील सुरुवातीचे रहिवासी हे गुजराती असल्याचं मानलं जातं. तर काहींच्या मतानुसार या बेटांचा सांस्कृतिक इतिहास तसा तिसऱ्या शतकापासून सुरू होतो. मालदीववर 12 व्या शतकापर्यंत हिंदू राजांचे राज्य होते. यानंतर ते बौद्ध धर्माचे केंद्र बनले. तमिळ चोला राजांनीही येथे राज्य केल्याचं सांगितलं जातं. येथे अनेक वर्षे बौद्धधर्म आचरणात होता. पुढे अरब व्यापाऱ्यांच्या आगमनानंतर या बेटात इस्लाम धर्माचा शिरकाव झाला आणि आज येथे 98 टक्के लोक सुन्नीपंथीय इस्लाम धर्मीय आहेत. 1965 पर्यंत येथे ब्रिटिशांची सत्ता होती. 

  आज इथे पर्यटन, मासेमारी, स्कुबा डायव्हिंग, हॅाटेलिंग हे मुख्य व्यवसाय आहेत. जोडीला औषधी पाण्याचे झरेही आहेत. मालदीवच्या उत्तर आणि दक्षिण बाजूने असलेल्या  समुद्राच्या  पट्ट्यातून  भारताचा 50 टक्के व्यापार होतो. आखाती तेलापैकी 80 टक्के येथून येते. चीनचाही आफ्रिका आणि आखाताला होणारा निम्मा व्यापार मालदीव समुद्रातून होतो. ही बेटे केव्हा बुडतील याचा काहीही भरवसा नाही, हे जाणून येथील राज्यकर्ते भारतात जमीन विकत घेण्याचा विचार करीत असतात, असे म्हणतात. 

   मालदीवचे नवीन अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू  

   मालदीवमध्ये सप्टेंबर 2023 च्या पंचवार्षिक निवडणुकीत, चीनधार्जिण्या पीपल्स नॅशनल कॅांग्रेसचे (पीएनसी) मोहम्मद मुईझ्झू  यांना 1,29,000 म्हणजे 54% मते मिळाली, तर भारतस्नेही मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमडीपी) मोहम्मद सोली यांना 1,10,000 म्हणजे 46% मते मिळून मोहम्मद मुईझ्झू   हे विजयी झाले. मालदीवमध्ये नव्याने निवडून आलेले अध्यक्ष  मुईझ्झू  हयांचा कल  चीनकडे असला तरी मुईझ्झू यांच्या आधीचे अध्यक्ष इब्राहीम सोली यांचा मात्र भारताविषयी विशेष स्नेहभाव होता. इब्राहीम सोली यांच्याच्याविरोधात अध्यक्षीय निवडणुकीत प्रचार करताना मुईझ्झू यांनी, तोपर्यंत मालदीवमध्ये उभयपक्षी मान्य तरतुदीनुसार तैनात असलेली भारतीय सैन्यदलाची तुकडी, यानंतर  तिथे असू नये अशी भूमिका घेतली होती. ही भूमिका ‘इंडिया आऊट’ मोहीम म्हणून गाजली होती. सोली यांचा पराभव करून मुईझ्झू सत्तेवर आले आणि त्यांनी भारतीय सैनिकी पथकाविषयी आवाज उठवण्यास सुरुवात केली. आता 10 मार्च 2024 रोजी भारतीय पथकातील काहींची रवानगी भारतात केली जात असून 10 मे 2024 पर्यंत उर्वरित सैनिकही भारतात रवाना होणार आहेत. मुईझ्झू जरी भारतविरोधी असले, तरी मालदीवच्या आधीच्या काही राज्यकर्त्यांचे भारताशी घनिष्ट संबंध होते. त्यामुळे भारत आजही सहकार्याची भूमिका कायम ठेवूनच वागतो आहे, पण बदललेल्या परिस्थितीकडे भारत फारकाळ दुर्लक्ष करून शकणार नाही. चीनला आपल्याला अनुकूल असलेल्या मुईझ्झू यांचा मालदीवमध्ये प्रभाव वाढवायचा आहे. आपल्या प्याद्याचा प्रभाव  वाढणे आणि खुद्द आपलाच प्रभाव वाढणे, यात चीनच्या दृष्टीने फारसा फरक नाही. याउलट प्याद्याच्या हातून आपल्याला हवेते साधून घ्यायचे आणि स्वत: नामानिराळे राहायचे, यातच चीनची सोय अधिक आहे. आज ना उद्या मालदीवला चीनचा हा कावा  कळेलही, पण तोपर्यंत मालदीववर चीनची मगरमिठी पक्की झालेली असेल. ‘बॉयकॉट मालदीव’ हे भारतीय पर्यटकांनी ‘इंडिया आऊट’ विरुद्ध उभे केलेले प्रत्युत्तर  उत्फूर्त आहे. त्याला भारताची फूस किंवा चिथावणी नाही. मालदीवचे अर्थकारण भारतातून येणाऱ्या पर्यटकांकडून मिळणाऱ्या पैशावर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मुईझ्झू यांची चीनधार्जिणी भूमिका लक्षात येताच शेकडो भारतीय पर्यटकांनी आपली मालदीवमधील आरक्षणे रद्द करून आपला मोर्चा भारताचा भाग असलेल्या निसर्गरम्य लक्षद्वीपकडे वळवला आहे.

मालदीवमध्येही मोदी मॅजिक   

    मुईझ्झू यांची भारतविरोधी आणि चीनधार्जिणी भूमिका लक्षात येताच शेकडो भारतीय पर्यटकांनी आपली मालदीवमधील आरक्षणे रद्द करून आपला मोर्चा भारताचा भाग असलेल्या निसर्गरम्य लक्षद्वीपकडे वळवला. आता मात्र मुईझ्झू यांची पाचावर धारण बसली आहे. याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप या भारतीय बेटांच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केल्यानंतर तर मालदीवमधील तीन मंत्र्यांचा जळफळाट होऊन त्यांनी अत्यंत असभ्य प्रतिक्रिया दिल्या आणि मालदीवमध्ये सोशल मिडियावर मालदीवच्या या तीन मंत्र्यांनी  मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. यावर संताप व्यक्त करीत भारताने मालदीवचे भारतातील हायकमीश्नर इब्राहीम शाहीब यांना भारताच्या परराष्ट्रव्यवहार मंत्रालयात बोलवून चांगलेच खडसावले व जाब विचारला. तेव्हा मात्र  मुईझ्झू यांनी माफी मागत या तीन मंत्र्यांना निलंबित केले आणि भारतीय पर्यटकांनी  आपला मालदीववर टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन केले. भारत, रशिया आणि चीनमधून मालदीवला बहुसंख्येने पर्यटक येत असले तरी त्यात भारताचा क्रमांक पहिला, रशियाचा दुसरा तर  चीनचा तिसरा क्रमांक लागतो.  

   भारतीय पर्यटकांच्या भूमिकेमुळे मालदीवची अर्थव्यवस्था पार कोलमडण्याच्या स्थितीत येऊ घातली आहे. मालदीवचे एक प्रभावी नेता, मोहम्मद नाशीद हे मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे संस्थापक सदस्य आणि 2008 ते 2012 पर्यंत अध्यक्षपदी होते.  मे 2019 ते नोव्हेंबर 2023 या काळात मजलीसचे (संसद) स्पीकरही होते. खरे लोकशाहीवादी म्हणून ख्याती असलेले  मोहम्मद नाशीद भारताचे महत्त्व जाणून आहेत. ते भारताच्या स्नेहभावाची खात्री असलेले जुने, जाणते नेते आहेत.  त्यांनी तर मालदीवच्या जनतेच्या वतीने भारतीयांची माफी मागून पर्यटनावरील बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. मालदीवचे यापूर्वीचे अध्यक्ष निवडून येताच अगोदर भारतभेटीवर आले होते. तर मुईझ्झू मात्र अगोदर चीनच्या भेटीला गेले आहेत. तरीही याला प्रत्युत्तर देताना भारताने मालदीवला केली जाणारी सर्वप्रकारची मदत काही कमी केलेली नाही कारण तसे केले तर निर्माण होणारी पोकळी चीन ताबडतोब भरून काढील आणि  चीनचा मालदीवमधला हस्तक्षेप आणि प्रभाव आणखी वाढेल. (पूर्वार्ध)

No comments:

Post a Comment