Monday, April 29, 2024

 हिरण्यगर्भ, बोसॅान आणि (हिग्ज बोसॅान) देवकण. ( (उत्तरार्ध))

हिरण्यगर्भ, बोसॅान आणि (हिग्ज बोसॅान) देवकण. 

( (उत्तरार्ध))

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ३०/०४/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

हिरण्यगर्भ, बोसॅान आणि (हिग्ज बोसॅान) देवकण. ( (उत्तरार्ध))

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

  हिरण्यगर्भ याचा अर्थ सोन्याच्या अंड्यात राहणारा असा आहे. विश्वाच्या निर्मितीचा स्रोत हिरण्यगर्भात आहे, असे वैदिक तत्त्वज्ञान सांगते. याने  पृथ्वी, सूर्य तारे यांची निर्मिती केली. ऋग्वेदातील हिरण्यगर्भ सूक्तात असे उल्लेख आहेत. 

हिरण्यगर्भ: समवर्तताग्रे भूतस्य जात: पतिरेक आसीत् ।

स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधेम॥ सूक्त ऋग्वेद-10-121-1  

तेजस्वी, सर्व प्राणीमात्रांच्या अगोदर निर्माण झालेला, एकमेवाद्वितीय, जगाचा पालनकर्ता असलेला, त्यानेच‌ पृथ्वी आणि अवकाश धारण केले आहे अश्या देवाला कोणती बरे आहुती द्यावी?

  विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यासाठी आज मांडल्या गेलेल्या सिद्धान्तांपैकी महास्फोटाच्या (बिगबँग) सिद्धान्ताला सर्वाधिक मान्यता आहे. पण महास्फोटानंतर पदार्थ/जडवस्तू (मॅटर) कशा तयार झाल्या, हे शास्त्रज्ञांच्या लक्षात येत नव्हते. जे जागा व्यापते आणि ज्याचे वजन करता येते, त्याला मॅटर किंवा पदार्थ/जडवस्तू असे म्हणतात. पण या जडवस्तू निर्माण कशा झाल्या हा प्रश्न मात्र अनेक वर्षे सुटत नव्हता.

    परमाणूपेक्षाही लहान असलेला एक कण (सबअॅटॅामिक) इतर कणांना वस्तुमान (मास) देतो अशी पीटर हिग्ज यांची संकल्पना होती. भारतीय वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांचेही या संदर्भांतील संशोधन असेच मोलाचे ठरले आहे.  त्यांच्या संकल्पनेतील उपअणुकणाला त्यांच्या सन्मानार्थ 'बोसॉन' असे नावही देण्यात आले होते. पण या कणाचे अस्तित्व मात्र सिद्ध करता आले नव्हते.

  पीटर हिग्ज  यांचे एडिंबरा येथे निधन झाले. विज्ञानातील बोजड संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजावून देण्यात त्यांचा हातखंडा होता. ब्रह्मांडाचे नियंत्रण करणाऱ्या मूलभूत शक्तिसंदर्भातील मानवाचे ज्ञान आणि समज यांना पीटर हिग्ज यांनी नवी दिशा दिली आहे. 

   हिग्ज यांनी 1954 साली एडिनबरो विद्यापीठातून डॅाक्टरेटची  पदवी संपादन केली. ज्याला आकारमान आहे त्याला वस्तूमान असलेच पाहिजे. असे आहे तर मग सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना त्यांचे वस्तूमान कसे प्राप्त होते हा प्रश्न  त्यांना बेचैन करत होता. त्यांनी कणांना (पार्टिकल) वस्तुमान मिळण्यासाठी मदत करणारा सूक्ष्मातिसूक्ष्म मूलकण अस्तित्वात असला पाहिजे हे मात्र 1964 मध्येच वर्तवले होते. पुढे 2012 मध्ये ते कण प्रत्यक्षात सापडल्यानंतर 2013 मध्ये त्यांना नोबेल पारितोषकाने गौरवण्यात आले.

 हिग्ज फील्ड आणि हिग्ज बोसॉन- पीटर हिग्ज यांनी एका वेगळ्या क्षेत्राची (हिग्ज फिल्ड) कल्पना सुचविली आहे. माशांसाठी जसे पाणी, तसे आपल्यासाठी हिग्ज फील्ड आवश्यक आहे, असे पीटर हिग्ज सुचवितात. तसेच त्यांनी वेगळ्या कणाचीही कल्पना मांडली आहे. हे वस्तुमानविरहित कण हिग्ज फिल्डच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची फिल्डशी प्रक्रिया होते आणि फील्डमधील कणांना वस्तुमान प्राप्त होते. हिग्ज बोसॉन कणांना देखील याच क्षेत्रातून वस्तुमान मिळते आणि  हे कण इतर कणांना वस्तुमान मिळण्यासाठी कारणीभूत ठरतात. 2012 साली स्वित्झर्लंडमधील एका संशोधन संस्थेने दोन अणूंची टक्कर घडवून आणली आणि या अणूंना वस्तुमान बहाल करणाऱ्या कणाचा शोध लावला. या प्रयोगात जे कण निर्माण झाले, त्यात बोस आणि हिग्ज यांनी कल्पिलेले कण होते. म्हणून ‘हिग्ज बोसॉन’ असे नाव पीटर हिग्ज आणि बोस यांच्या सन्मानार्थ  या कणाला देण्यात आले आहे. 50 वर्षांपूर्वी गणिताच्या मदतीने या कणाच्या अस्तित्वाचा सिद्धान्त पीटर हिग्ज यांनी मांडला होता. भारतीय वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांचेही या संदर्भांतील संशोधन याच मोलाचे होते. याच कणांना ‘देव कण’ (गॉड पार्टिकल) असे नाव मिळाले आहे. 

लार्ज हॅड्रॉन कोलायडर- विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पीटर हिग्ज यांनी वर्तवलेल्या हिग्स बोसॉन कणांचा शोध घेण्याची  मोहीम कणविषयक भौतिकशास्त्रज्ञांनी हाती घेतली. हा हेतू समोर ठेवून स्वित्झर्लंडमधील ‘युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रीसर्च’ (सर्न) या संस्थेने कणांना प्रचंड गती देणारे एक अजस्त्र यंत्र तयार केले. ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ (एलएचसी) नावाची प्रयोगशाळा म्हणजे जमिनीखाली असलेली भल्यामोठ्या व्यासाची एक लांब  नळी आहे. ही नळी सेमीकंडक्टर पदार्थांच्या कंकणाकृती चुंबकांची बनलेली असते. 'सर्न' ही एक अद्ययावत प्रयोगशाळा आहे. जिनेव्हा शहराजवळ जमिनीखाली अनेक किलोमीटर पसरलेल्या या प्रयोगशाळेत आण्विक कणांना प्रचंड वेग देऊन, त्यांच्या टकरी घडवून आणण्याची व्यवस्था आहे.  यामध्ये चुंबकीय बलाच्या मदतीने कण जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने फिरविले जातात व त्यांची टक्कर घडवून आणली जाते. 2012 साली या अणूंच्या टकरीनंतर ‘हिग्ज बोसॉन’ सापडला. अणूच्या मूलभूत संरचनेत त्याला वस्तुमान देणारा ‘हिग्ज बोसॉन’ नसता, तर हे विश्वच निर्माण होऊ शकले नसते, असे पीटर हिग्ज म्हणत असत. बोसॅानसह एकूण 17 कण सापडले आहेत. या गटाला आणि बलाला ‘स्टॅंडर्ड मॅाडेल’, असे म्हणतात. हे 17 कण दोन गटात विभागता  येतात. फर्मिॲान्स आणि बोसॅान्स. फर्मिॲान्स म्हणजे विटा. फर्मिॲान्स 12 असून याचेही दोन गट पडतात. 6 फर्मिॲान्सचा एक गट आणि 6 लेप्टॅान्सचा दुसरा गट. थोडक्यात फर्मिॲान्स + लेप्टॅान्स = भौतिक वस्तूचा अणू. बोसॅान्स 5 आहेत. प्रत्येक बोसान 3 पैकी एक बल वाहून नेतो. चौथे बल गुरुत्वाकर्षण आहे. याची पातळी अतिशय कमी असल्यामुळे त्याचा स्टॅंडर्ड मॅाडेलमध्ये समावेश केला जात नाही.

  गॉडडॅम  पार्टिकल- आज जग  हिग्ज बोसॅानला देव कण / 'गॉड पार्टिकल' म्हणत असले तरी, विज्ञान मात्र हे नाव मान्य करत नाही. लिऑन लेडरमन या शास्त्रज्ञाने या कणांवर 'गॉडडॅम  पार्टिकल' या नावाचे पुस्तक लिहिले. पण हे नाव  प्रकाशकाने  बदलून 'गॉड पार्टिकल' असे केले. ‘गॅाडडॅम’ हा शब्दप्रयोग लेखकाने ‘सहजासहजी हाती न लागणारा’ (चकमा देणारा) या अर्थी केला होता. पण प्रकाशकाला गॅाड आणि डॅम हे दोन शब्द जवळजवळ मांडलेले आवडत नव्हते. म्हणून त्याने डॅम हा शब्द वगळून ‘गॅाड पार्टिकल’ या शीर्षकानुसार ते पुस्तक प्रसिद्ध केले. तेच नाव आज रूढ झाले आहे. विश्वाच्या उत्पत्तीनंतर ग्रह-तारे, सजीव अथवा निर्जीव यांना प्राप्त झालेले वस्तुमान हे अणूमध्ये असलेल्या या अतिसूक्ष्म कणामुळे मिळाले आहे, असे गृहीतक पीटर हिग्ज यांनी गणिताच्या साहाय्याने मांडले होते.

पीटर हिग्ज जवळ मोबाईल नव्हता-पीटर हिग्स यांना 2013 मध्ये नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले. नोबेल समितीने त्यांना पारितोषिकाबद्दल कळवण्यासाठी फोन केला तेव्हा ते  भोजनासाठी हॅाटेलमध्ये गेले होते. तिथून परतत असताना एका परिचित व्यक्तीने त्यांना थांबवून नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तोपर्यंत त्यांना या गोष्टीचा पत्ताच नव्हता! त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी त्यांचे नाव घोषित करण्यापूर्वी त्यांच्यापर्यंत पोचू शकली नव्हती, म्हणून नोबेल पारितोषिक जाहीर झाल्याची बातमी सर्व जगाला त्यांच्या अगोदर कळली. ही बातमी कळणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये स्वत: पीटर हिग्ज यांचा क्रमांक बहुदा सर्वात शेवटचा असावा!!

No comments:

Post a Comment