कॅनडातील प्रगल्भ मतदार
तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक ८/५/२०२५ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
कॅनडामधील हाऊस ॲाफ कॅामन्सच्या निवडणुका 2021 मध्ये पार पडल्या होत्या. 2015 मध्ये (68.3%), 2019 मध्ये (67%) आणि 2021 मध्ये (62.3%) तर 2025 मध्ये घेतलेल्या निवडणुकीत 68.29% मतदान झाले आहे. कॅनडातील प्रमुख पक्ष असे आहेत.
लिबरल पार्टी हा कॅनडातला सर्वत्र पसरलेला सर्वात जुना पक्ष आहे. तो केवळ जुनाच नाही तर सक्रीयही आहे! तो 70 वर्षे सत्तेवर होता, हे आणखी एक विशेष!!
याचे प्रमुख कारण असे आहे की, तो उदारमतवादी पक्ष आहे. दुसरे कारण हे आहे की, हा पक्ष किंचितसा डावीकडे झुकलेला आहे. याउलट याचा विरोधक कॅान्झरव्हेटिव पक्ष उजवीकडे झुकलेला आहे. तिसरा न्यू डेमोक्रॅटिक पक्ष जेव्हा जेव्हा लिबरल पक्षाला बहुमत मिळालेले नसते तेव्हा त्याला साथ देत आलेला आहे. लिबरल पार्टीने आपले धोरण सर्वसमावेशक ठेवले आहे. यामुळे समाजातील अनेक घटक या पक्षाला साथ देत आले आहेत.
लिबरल पार्टीची धोरणे आजवर तिला यश देत आली आहेत. आरोग्यसेवा, सेवानिवृत्तिवेतन, विद्यार्थ्यांना शिक्षणकर्ज, शांतता आणि सुरक्षेवर भर, इंग्लिश आणि फ्रेंच या दोन्ही भाषांचा राज्यकारभारात वापर, शस्त्रे बाळगण्याबाबत कडक नियम, नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांचा आणि स्वातंत्र्याचा आदर, समलिंगी विवाहांना मान्यता, गर्भपाताला मान्यता या धोरणांमुळे या पक्षाबाबत जनतेत अनुकूलतेची भावना असते. पण गेली 10 वर्षे सत्तेत असणे, पंतप्रधान जस्टिन ट्रुटो यांचा मनमानी कारभार, राजकीय आणि आर्थिक आघाडीवर कॅनडाची सतत सुरू असलेली घसरगुंडी, यामुळे मतदारात नाराजी (अँटि इनकंबन्सी) निर्माण झाली होती. पण पक्षाने या घटनेची दखल घेत ट्रुडो यांना पायउतार होण्यास भाग पाडले आणि त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेच्या मार्क कार्नी यांच्या हाती सत्तेची सूत्रे दिली. मार्क कार्नी राजकारणात नवीन होते. बँक मॅनेजमेंट हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. लिबरल पक्षाला 2021 मध्ये 32.62 % मते आणि 160 जागा मिळाल्या होत्या. 2025 मध्ये त्यात लक्षणीय वाढ होऊन 43.52% मते व 168 जागा मिळाल्या आहेत
कॅान्झर्व्हेटिव पार्टी ॲाफ कॅनडा - 2003 मध्ये उजवीकडे झुकलेल्या अनेक छोट्या पक्षांनी एकत्र येऊन या उजव्या समावेशी पक्षाची स्थापना केली आहे. डावीकडे झुकलेला लिबरल पार्टी हा पक्ष यांचा विरोधक आहे. 2006 ते 2015 या सलग कालखंडात हा पक्ष कॅनडात सत्तेवरही होता. पेरी पॅालिव्हर यांच्या कॅान्झर्व्हेटिव्ह उदारमतवादी पक्षाला 2021 मध्ये 33.74 % मते आणि 119 जागा मिळाल्या होत्या. 2025 मध्ये त्यात भरपूर वाढ होऊन 41.34% मते व 144 जागा मिळाल्या आहेत. पण तरीही पक्ष बहुमताच्या 172 या आकड्यापासून बराच दूर राहिला. स्वतः ट्रंप यांची स्तुती करणारे आणि त्यांचे स्वभावविशेषही असलेलेले पेरी पॅालिव्हर (पियरे पोलिव्रे) हे तर पराभूतच झाले आहेत. कॅान्झर्व्हेटिव्ह पक्षाने चुकीचे निर्णय घेतले नसते तर त्या पक्षाला याही पेक्षा चांगले यश मिळू शकले असते. याशिवाय त्या पक्षाने जगमीत सिंगांच्या खलिस्तान समर्थक पक्षाशी युती केली. यामुळे सर्व शिखांची मते त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्या पक्षाला मिळाली नाहीत. कारण सर्व शीख खलिस्तान समर्थक नाहीत, हे त्यांनी लक्षात घेतले नाही, किंवा हे त्यांना जाणवलेच नाही. कॅान्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या सभेत ‘खलिस्तान जिंदाबाद’, अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या यामुळे सर्व शीख मतदार काही या पक्षाकडे वळले नाहीत पण सर्व शिखेतर भारतीय आणि काही शीख मात्र त्यांच्या विरोधात गेले. शिखांच्या वैशाखीला पेरी पॅालिव्हर यांनी जातीने उपस्थिती लावली पण दरवर्षी त्यांच्या पक्षाचा दिवाळीनिमित्त होणारा कार्यक्रम शीख नाराज होतील ,या भीतीपायी चक्क रद्दच केला. हे हिंदूंना तर मुळीच आवडले नाही. पण इतरांनाही हा निर्णय योग्य वाटला नाही. त्यामुळे उजव्या विचारसरणीचे अनेक मतदारही डाव्या लिबरल पक्षाकडे वळले.
ब्लॅाक क्यूबेकॅाईस पक्ष- फ्रेंचबहुल क्यूबेक प्रांतातील ब्लॅाक क्यूबेकॅाईस हा एकेकाळचा फुटिरतावादी पक्ष आता आपल्या मूळ विभक्ततावादापासून बराच दूर गेला आहे. त्यामुळेच की काय याची मतांची टक्केवारी आणि मिळणाऱ्या जागा 2015 ते 2021 या कालखंडात सतत वाढत गेल्या आहेत. त्यामुळे तो आता कॅनडाची ब्रिटिश कॅनडा व फ्रेंच कॅनडा अशी फाळणी करा ही अतिरेकी मागणी यापुढेही अशीच गुंडाळून ठेवील आणि पर्यावरणसंवर्धनावर आपले लक्ष केंद्रित करील असे स्पष्ट दिसते आहे. येस फ्रॅंकॅाईस - ब्लॅंचेट यांच्या या पक्षाला 2021 मध्ये 7.64 % मते आणि 32 जागा मिळाल्या होत्या. पण 2025 मध्ये त्यांनी लिबरल पक्षासाठी जागा सोडल्यामुळे 6.34% मते व 23 जागा यांना मिळाल्या आहेत
न्यू डेमोक्रॅटिक पार्टी - जस्टिन ट्रूडो यांच्या उदारमतवादी लिबरल पार्टीला 2019 मध्ये बहुमतासाठी 13 मतांची आवश्यकता होती. न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने ही गरज पूर्ण केली. या पक्षाला मूळ भारतीय वंशाच्या कॅनेडियन अश्वेत वर्णाच्या जगमीत सिंग यांचे नेतृत्व लाभले आहे. या पक्षाचे 2019 च्या निवडणुकीत 50 टक्के जागांचे नुकसान (44 ऐवजी 24) झाले होते. तरीही जगमीत सिंग यांचा हा पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत 2019 आणि 2021मध्ये होता. पण 2025 मध्ये ही स्थिती राहिलेली नाही. जगमीत सिंग हे डाव्या विचारसरणीचे आणि खलिस्तान चळवळीचे समर्थक आणि फौजदारी वकीलही आहेत. खलिस्तनवादी भूमिकेमुळे हा पक्ष पुढे आला पण 2025 मध्ये भारताचा टोकाचा द्वेश त्याच्या पतनाला कारणीभूत झाला. शीख समाजाला सुद्धा त्यांची भारताचा द्वेश ही भूमिका मान्य झाली नाही, हे विशेष. या पक्षाला 2021 मध्ये 17.82 % मते आणि 25 जागा मिळाल्या होत्या. 2025 मध्ये त्या कमी होऊन 6.22 % मते व 7 जागा मिळाल्या आहेत.
ग्रीन पार्टी - एलिझाबेथ मे यांच्या पर्यावरणवादी ग्रीन पार्टीला 2015 मध्ये 1 जागा मिळाली होती 2019 मध्ये त्यात 2 ने वाढ होऊन 3 जागा मिळाल्या होत्या आणि मतांची टक्केवारी तर दुपटीने वाढली होती. 2021 मध्ये मात्र मतांची टक्केवारी जवळजवळ तिपटीने कमी झाली आहे. 2025 मध्येही हेच घडले कारण या पक्षाने लिबरल पक्ष जिंकावा म्हणून काही ठिकाणी उमेदवारच उभे केले मव्हते. ग्रीन पार्टीला 2021 मध्ये 2.33 % मते आणि 2 जागा मिळाल्या होत्या. 2025 मध्ये त्या कमी होऊन 1.23 % मते व 1 जागा मिळाली आहे.
मॅक्झिम बर्निअर यांच्या पीपल्स पार्टी या अतिउजव्या पक्षाला नगण्य मते मिळाली.
काही निरीक्षणे
1) लिबरल पक्षाच्या जागा वाढल्या ही समाधानाची आहे.
2) न्यू डेमोक्रॅट पक्षाचा सफाया झाला. जागा 25 वरून 7 पर्यंत तर जनाधार 17.82 % वरून 6.22 % पर्यंत कमी झाला.
3) अमेरिकेत 51 वे राज्य म्हणून सामील व्हा, मालामाल करीन या या डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रलोभनाला किंवा सामील न झाल्यास टेरिफवाढीचा जबरदस्त फटका बसेल या डोनाल्ड ट्रंप यांच्या धमकीचा मतदारांवर परिणाम झाला नाही. कॅनडाच्या मानभंगाला कडाडून विरोध करणाऱ्या मार्क कार्नी यांच्यावर, मतदारांनी विश्वास ठेवला.
4) ट्रंप यांचा उदोउदो आणि खलिस्तानवाद्यांशी जवळीक हा असंगाशी संग पेरी पॅालिव्हर यांच्या अंगाशी आला.
४) पण खलिस्तानवाद्यांचा प्रभाव लगेच संपेल असे नाही. कारण खलिस्तान समर्थक कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षात आहेत.
आज जगभर मतदार प्रलोभने, अपप्रचार, भावनिक आवाहने यांना बळी पडतांना पाहतो. कॅनडाच्या मतदारांनी या निवडणुकीच्या निमित्ताने दाखविलेली प्रगल्भता प्रशंसनीय आहे, असेच कोणीही म्हणेल.