Wednesday, May 21, 2025

 अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स आणि सेकंड लेडी उषा चिलुकुरी

तरूण भारत, नागपूर गुरुवार, दिनांक २२/०५/२०२५ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.


अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स आणि सेकंड लेडी उषा चिलुकुरी

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com  

Blog - kasa mee? 


   डोनाल्ड ट्रंप आणि जे डी व्हान्स ही जोडी अमेरिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवडून आली आहे. यांच्या स्वभाव, विचार आणि ध्येय धोरणाचा जागतिक राजकारणावर निदान येती चार वर्षेतरी खूप परिणाम होणार आहे. ट्रंप आपल्याला पुष्कळसे माहीत झाले आहेत. व्हान्स यांचे तसे नाही. त्यांच्या सहधर्मचारिणी तर भारतीय वंशाच्या आहेत. या जोडप्याचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न म्हणूनच महत्त्वाया ठरतो.

 अमेरिकेचे विद्यमान उपाध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हान्स हे सामान्यांमधून वर आलेले स्कॉट्स-आयरिश आहेत. ते एक अमेरिकन रिपब्लिकन राजकारणी, वकील, लेखक आणि माजी सैनिक आहेत. ते 2023 पासून ओहायोमधील सिनेटर आहेत. व्हान्स रिपब्लिकन पक्षाकडून 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत उपाध्यक्षपदाचे उमेदवार होते. 

  मिडलटाउन हायस्कूलमधून 12 वी उत्तीर्ण झाल्यावर व्हान्स यूएस मरीन कोरमध्ये सामील झाले. त्यांनी 2003 ते 2007 दरम्यान युद्ध वार्ताहर म्हणूनही  काम केलेले आहे. नंतर त्यांनी पदवी संपादन केली. त्यांनी आपले लहानपण, शिक्षण आणि त्याकाळची कठिण परिस्थिती यावर ‘हिलिबिली एलिजी- आधुनिकतेपासून दूर असलेल्याची शोकगाथा’, या  नावाचे पुस्तक लिहिले आहे.  2016 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीदरम्यान या पुस्तकाला खूप प्रसिद्धी मिळाली होती. 

  2016 च्या निवडणुकांमध्ये व्हान्स यांनी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांना प्रखर  विरोध केला होता. परंतु नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली व ते ट्रम्प यांचे प्रमुख पाठीराखे झाले. ट्रम्प यांनीही व्हान्स यांची 2024 च्या निवडणुकीत आपले उपराष्ट्राध्याक्षीय उमेदवार म्हणून निवड केली. अमेरिकेतील प्रमुख पक्षाकडून मूळच्या एखाद्या सामान्य व्यक्तीला नामांकन मिळाल्याचे हे बहुदा पहिलेच उदाहरण असावे. 

   गर्भपात, समलिंगी विवाह, अल्पवयीन मुलांचे लिंगबदल आणि बंदूक वापरनियंत्रण या सगळ्यांना व्हान्स यांचा विरोध आहे. ते पुराणमतवादी  धोरणांना प्रोत्साहन देत असतात. व्हान्स यांचा युक्रेनला रशियाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकन लष्करी मदत देण्यालाही विरोध आहे. हा तपशील दोन दृष्टींनी महत्त्वाचा आहे. एकतर आजतरी ते डोनाल्ड ट्रंप यांच्या पूर्ण विश्वासातले सहकारी आहेत. तसेच त्यांच्याकडे अमेरिकेचा भावी अध्यक्ष म्हणूनही पाहिले जाते. पण डोनाल्ड ट्रंप यांच्या मनात वेगळाच विचार घोळतो आहे, असे म्हणतात. डोनाल्ड ट्रंप यांची ही अध्यक्षपदाची दुसरी कारकीर्द आहे. घटनेतील तरतुदीनुसार त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होता येणार नाही. पण त्यांनी दुसरी कारकीर्द पूर्ण व्हायच्या अगोदरच राजीनामा दिला तर? अध्यक्ष म्हणून दोन कारकिर्दी पूर्ण होणार नाहीत आणि त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होता येईल. पुढे काय होणार ते आज सांगता येणार नाही. असो.

   व्हान्स यांनी  ‘हिलिबिली एलिजी- आधुनिकतेपासून दूर असलेल्याची शोकगाथा’  लिहिलेली आपण पाहतो आहोत. पुढे मात्र ते उत्तम पोशाखाचे चाहते, भांडवलवादी (कॅपिटलिस्ट) झाले, राजकारणात शिरले आणि सिनेटर झाले. अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीला येतांना युक्रेनच्या झेलेन्स्कींनी सूट का परिधान केला नाही म्हणून ते भडकलेले आपण पाहतो. झेलेन्स्की या मुळातल्या रांगड्या  आणि विनोदी अभिनेत्याचे एका लढाऊ वृत्तीच्या राजकारण्यात झालेले रुपांतर त्यांना भावले नाही.  मात्र झेलेन्स्की सुटाबुटात भेटीला आले नाहीत, हा मुद्दा त्यांना आक्षेपार्ह वाटला. परिस्थितीनुसार माणूस किती बदलू शकतो, हे आपल्याला या निमित्ताने जाणवू शकेल. कट्टर ट्रंप विरोधक ते पराकोटीचे ट्रंप समर्थक या त्यांच्यातील बदलाचेही म्हणूनच आपल्याला आश्चर्य वाटायला नको. एकेकाळी त्यांना ट्रंप  महामूर्ख आणि निंदनीय वाटत होते, पण तो आज इतिहास झाला आहे.  कोणेएकेकाळाचे प्रागतिक आणि विचारी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले व्हान्स  आज ट्रंप यांचे ‘केवळ कैवारी’ झाले आहेत. युरोपीयन युनीयन एक प्रतिष्ठित राष्ट्र संघटना! पण तिची किंचितही पत्रास न बाळगता त्यांनी खरडपट्टी काढीत पुरती शोभा केली. ग्रीनलंडने अमेरिकेत सामील व्हावे हा ट्रंप यांचा निरोप घेऊन त्यांना ‘मान न मान, मै तेरा मेहमान’, अशा भूमिकेत ग्रीनलंडला जातांना आपण पाहिले आहे. फटकळपणा एकवेळ मान्य करता येईलही पण राजकीय सभ्यतेच्या मर्यादा आपण ओलांडतो आहोत, असे त्यांना वाटले नाही, हे मुद्दे उधृत करून वृत्तसृष्टी त्यांच्यावर खपा झाली याची त्यांना पर्वा नाही. तसेच मागे एकदा कमला हॅरिस यांचा उल्लेख ‘निपुत्रिक बाई’ (चाइल्डलेस लेडी) करूनही त्यांनी सभ्यतेच्यामर्यादा ओलांडल्या होत्या.  ‘व्हान्स यांना तुमचे उत्तराधिकारी समजायचे का?’, असा प्रश्न डोनाल्ड ट्रंप यांना विचारला असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले होते. पण व्हान्स ही अतिशय सक्षम व्यक्ती आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती. व्हान्स ही जबरदस्त महत्त्वाकांक्षा असलेली व्यक्ती आहे. रिपब्लिकन पक्षातही त्यांचा दबदबा आहे. पण ट्रंप यांचे पारडे जड आहे, हे या चतुर राजकारण्याला जाणवले आणि त्याने विरोध करायचे सोडून पलटी मारली. ट्रंप यांनीही, ‘झाले गेले (वॅाशिंगटन जवळच्या) पोटोमॅक नदीला मिळाले’, असे म्हणत व्हान्स यांना पलटूराम न मानता एकदम आपले उपाध्यक्षपदाचे उमेदवार बनवले. राजकारणात अशी भूमिका घेणे आवश्यक असते. व्हान्स यांचे राजकीय चातुर्य निश्चितच वरच्या दर्जाचे आहे, ते असे. त्याची नोंद ट्रंप यांनी घेतली आणि  त्यांनी व्हान्स यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे. राजकीय शिष्टाचाराला अनुसरून  भारतानेही मेहमाननवाजीत कसर ठेवलेली नाही. 

  व्हान्स सहकुटुंब सहपरिवार भारत भेटीवर आले  होते. पंतप्रधान मोदी यांनी बालगोपालांबरोबर नेहमीप्रमाणे दिलखुलास गप्पागोष्टी केल्या. व्हान्स आणि पंतप्रधान मोदीं या दोघात  भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर चर्चा झाली. टेरिफ कपात आणि त्याचवेळी भारत आणि अमेरिकेत दृढतर व्यापारी स्नेहसंबंध असा दुहेरी हेतू साधण्याचे बाबतीत भारताचे प्रयत्न किती फलदायी होतात, ते यथावकाश समोर येईलच. उर्जा, संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान यात भारताला विशेष रुची आहे. जागतिक प्रश्नांसोबत प्रादेशिक महत्त्वाचे विषयही चर्चेला घेतले गेले. संवाद आणि शांततायुक्त भूमिकेतून वाटाघाटी हेच समस्या हाताळण्याचे योग्य मार्ग आहेत यावर उभय पक्षांची सहमती होती. आधुनिक व्यापार करार करतांना रोजगार निर्मितीवर भर दिल्यास दोन्ही देशातील जनतेचे जीवनमान उंचावेल, असे व्हान्स यांचे मत होते. 

  व्हॅन्स यांच्या कायदेतज्ञ तेलगू पत्नी उषा चिलुकुरी या आता  अमेरिकेच्या उपाध्यक्षाची पत्नी या नात्याने सेकंड लेडी ठरतात. तसे खुद्द व्हॅन्स आंध्राचे जावई आहेतच.  या जोडप्याबद्दल एक हलकाफुलका किस्सा सांगितला जातो. उषा आपल्या पतीला कासवाची उपमा देतात. ‘संकटाची थोडीशीही चाहूल लागताच कासव जसे आपले अंग चोरून कवचाखाली घेते, तसे ‘ह्यांचे वागणे असते’, असे त्या विनोदाने म्हणत असत. आज  व्हॅन्स यांनी परराष्ट्र व्यवहार, मंदी आणि अर्थकारण, रोजगारक्षेत्राच्या समस्या यावर ट्रंप यांची येती राजवट लक्ष केंद्रित करील, असे घोषित केले आहे. यावरून त्यांना अमेरिकेसमोरील गंभीर समस्याची जाणीव आहे. जे. डी व्हान्स काहीसे फटकळ स्वभावाचे म्हटले पाहिजेत. त्यांच्या पत्नी उषा या संयमी आहेत. जेडींच्या सल्लागार म्हणून आता त्या ओळखल्या जातात. उषा या मूळच्या भारतीय आहेत दोन संस्कृतींचा मिलाफ सांभाळून संसार चालवणाऱ्या उषा व्हान्स या अमेरिकेच्या राजकारणात आता ठळकपणे दिसू व वावरू लागल्या आहेत. धकाधकीच्या राजकारणात सतत व्यग्र असलेल्या आणि काहीशा शीघ्रकोपी स्वभावाच्या व्यक्तीची साथ द्यायची तर 

जोडीदाराच्या अंगी संयम, समजुतदारपणा आणि हजरजबाबीपणा असावा लागतो. हे गुण उषा व्हान्स यांनी आत्मसात केले  आहेत.  काहींच्या मते हे गुण अंगी होते म्हणूनच उषा सहधर्मचारिणीची भूमिका वठवण्यात यशस्वी झाल्या आहेत. व्हान्स अमेरिकन सैन्यात मरीन होते. निवृत्तीनंतर त्यांनी आत्मचरित्र लिहिले आणि ते गाजले. यावर सिनेमाही तयार झाला, हे खरे आहे. पण हे सर्व घडू शकले उषा यांच्यामुळे. यंदा जेडींनी अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्याचबरोबर उषा अमेरिकेच्या 'द सेकंड लेडी' झाल्या. पण यासाठीची गुणसंपदा त्यांनी त्या अगोदरच संपादन केली होती.

  भारतीय वंशाच्या उषा पतिसहवर्तमान भारताच्या दौऱ्यावर नुकत्याच येऊन गेल्या आहेत. आपण आपल्याच देशात आलो आहोत, असे त्यांच्या व्यवहारतून जाणवत होते. इवान, विवेक, मीराबेल या आपल्या मुलांना त्या अमेरिकन संस्कृतीतच वाढवत आहेत, यात शंका नाही. पण आपल्या मुलांना भारतीय संस्कृतीचीही ओळख आणि  आवड असावी, अशी त्यांची भूमिका आहे. विशेष हे आहे की, त्यांचे पती जेडी हेही उषा यांच्या भारतीय संस्कृतीचा पूर्ण सन्मान राखतात. या दोघांचे लग्न जसे ख्रिश्चन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीने झाले आहे तसेच या दोन संस्कृर्तीचा मेळ आपल्या पुढच्या पिढीत दिसावा असे त्यांना मनोमन वाटते. 



No comments:

Post a Comment