तरूण भारत, मुंबई रविवार, दिनांक १३/०७/२०२५ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.
ब्रिक्स परिषदेची फलश्रुती
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
2008 च्या जागतिक मंदीने सगळे जग हैराण झाले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी परस्पर सहकार्य करणारी एखादी व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता प्रकर्षाने वाटू लागली. शेवटी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांनी 16 जून 2009 ला एकत्र येऊन आणि या राष्ट्रांच्या नावांची आद्याक्षरे जुळवून, ब्रिक्स या नावाची संघटना स्थापन केली. ब्रिक हे नाव ब्राझील, रशिया, इंडिया (भारत) आणि चीन या देशांची आद्याक्षरे घेऊन तयार झाले आहे. डिसेंबर 2010 मध्ये ब्रिकमध्ये दक्षिण आफ्रिका (साऊथ आफ्रिका) सामील झाला आणि ‘ब्रिक’ या नावात बदल होऊन ते ‘ब्रिक्स’ झाले. रशिया हे विकसित राष्ट्र सोडता त्या काळी इतर राष्ट्रे आर्थिक दृष्टीने वेगाने प्रगत होणारी पण विकसनशील राष्ट्रे होती. केवळ आर्थिक दृष्टीनेच ब्रिक्सचे महत्त्व होते, असे नाही तर भौगोलिक आणि लोकसंख्येचा विचार करताही ब्रिक्सचे महत्त्व अनन्यसाधारण होते. जगातली जवळजवळ 42 टक्के लोकसंख्या ब्रिक्स देशातली आहे आणि जगातला 20 टक्के व्यापारही या देशांमध्ये होत असतो. सुरुवातीला ब्रिक्सच्या सदस्य राष्ट्रात राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या फारशी एकवाक्यता दिसत नव्हती, त्यामुळे हा ‘प्रयोग’ कितपत यशस्वी होईल, याबद्दल शंका वाटत होती. पण हे अंदाज चुकीचे ठरले आणि हा प्रयोग यशस्वी ठरला असून इतर अनेक राष्ट्रांत आज ब्रिक्सचे सदस्य होण्याची तीव्र इच्छा व्यक्त होतांना दिसते आहे. इजिप्त, इथिओपिया, इराण, युनायटेड अरब अमिरात हे ब्रिक्समध्ये सामील झाल्यामुळे ब्रिक्सचे दहा सदस्य झाले. 6 जानेवारी 2025 ला इंडोनेशियाही ब्रिक्सचा सदस्य झाला आहे.
ब्रिक्सची भागीदार राज्ये हिला संभाव्य सदस्यांची यादी असेही म्हणता येईल. हे देश निरीक्षक देश असतात. यथावकाश त्यांना सदस्यता प्रदान केली जाते. बेलारुस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकस्थान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान, व्हिएतनाम ही ब्रिक्सची भागीदार राज्ये आहेत.
सदस्यतेबाबत विचाराधीन देश - अझरबाईजान, बांग्लादेश, श्रीलंका, म्यानमार, सेनेगल, तुर्की, पाकिस्तान, व्हेनेझुएला
ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेधही केला. दहशतवादाला थारा देणाऱ्या देशांवर आर्थिक निर्बंध घालावेत, असेही सुचविले. ब्रिक्स देशांच्या नेत्यांनी रिओ द जानिरो मधे झालेल्या परिषदेनंतर प्रसिद्ध केलेल्या अतिविस्तृत जाहीरनाम्यात ग्लोबल साऊथबद्दल म्हणजेच विकसनशील देशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला आहे. या जाहीरनाम्यामुळे भारताच्या काही शेजारी देशांना योग्यतो संदेश गेला आहे.
शांघाय कोॲापरेशन ॲार्गनाझेशनची बैठक चीनमधील किंवगडाओ येथे नुकतीच पार पडली आहे. संरक्षणमंत्री स्तरावरील या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर थेट भूमिका घेणे टाळले गेले, ही डोळेझाक अपेक्षितच होती. जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करावा ही भारताची भूमिका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आग्रहाने मांडली. पण पहलगामचा किंवा दहशतवादाचा साधा उल्लेखही बैठकीच्या संयुक्त जाहीरनाम्यात नव्हता. पण पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील अस्थैर्याचा उल्लेख मात्र होता. त्यामुळे जाहीरनाम्यावर मान्यतादर्शक स्वाक्षरी न करण्याचा निर्णय आपल्या संरक्षणमंत्र्यांनी घेतला. चीन नेहमीच पाकिस्तानची बाजू लंगडी असूनही भारताची कोंडी करण्यासाठी पाकिस्तानला साथ देत असतो. पाकिस्तानला लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे पुरवतो. यांचा वापर पाकिस्तान भारतविरोधी कारवाया करण्यासाठी करतो, हे काय चीनला दिसत नसेल? दुसरीकडे चीन अब्जावधी डॉलरचा व्यापार भारतासोबत करतो हा उघडउघड दुटप्पीपणा आहे. ब्रिक्स परिषदेत भारताने असे घडू दिले नाही.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतर महत्त्वाच्या विषयांबरोबरच ब्रिक्स देशांनी मिळून विज्ञान आणि संशोधनविषयक रिपॉझिटरी भांडाराची स्थापना करावी असे सुचवले. महत्त्वाची खनिजे, पुरवठा साखळी, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी क्षेत्रांवर अशाप्रकारे भर राहील. जागतिक पातळीवर काम करणाऱ्या सुरक्षा समितीसकट अन्य सर्व संस्थांमधे तातडीने सुधारणा करण्याची गरज मोदी यांनी परिषदेत मांडली.
परिषदेमध्ये मोदींनी ग्लोबल साऊथचे प्रश्न आग्रहाने मांडले. ग्लोबल साऊथ मध्ये सामान्यत: आफ्रिका, लॅटिन अमेरिका, कॅरेबियन देश, आशियातील इस्रायल, जपान आणि दक्षिण कोरिया यांना वगळून उरलेले इतर देश आणि ओशियानियातील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड वगळता अन्य देश येतात. हे वर्गीकरण युनायटेड नेशन्स कॅानफर्न्स ऑन ट्रेड अॅंड डेव्हलपमेंटने (युएनसीटीएडी) केलेले असल्यामुळे प्रमाण मानले जाते. हे सर्व मिळून 69 देश होतात. हे देश कोणत्याही एका गटातटात मोडत नाहीत. यातील बहुतेक देश अविकसित, गरीब, दाट लोकसंख्या असलेले, पायाभूत सोयीसुविधांचा अभाव असलेले म्हणजे राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या खरेखुरे वंचित देश आहेत. हा एक विस्कळित आणि विखुरलेल्या देशांचा समूहच आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीप्रधान देश म्हणून भारतच या देशांची बाजू मांडणारा देश ठरतो. ‘विकसित देशांसाठीच्या दुहेरी मापदंडांचा फटका सातत्याने गरीब देशांना म्हणजे ग्लोबल साउथमधील देशांना बसतो आहे. या देशांना निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये महत्त्वाच्या स्थानांपासून वंचित ठेवले जात आहे’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विकसित देशांना सुनावले. अशाप्रकारे, भारत, ब्राझील आदी देशांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व मिळण्यापासून वंचित ठेवले जात आहे, हा मुद्दा मोदींनी मोठ्या खुबीने मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद तसेच अन्य प्रमुख जागतिक संस्था यांचे स्वरूप जोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक होणार नाही तोपर्यंत इतर सर्व बाबी व्यर्थ आहेत, अशी आग्रही भूमिकाही मोदी यांनी मांडली. गरीब देशांकडे सतत दुर्लक्ष होत असते. त्यामुळे गरीब देशांचा विकास खुंटतो आहे, साधनसंपत्तीचे समान वाटप होऊ शकत नाही. किंवा गरीब देशांचे सुरक्षा व आरोग्यविषयक प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत, ही बाब मोदींनी अधोरेखित केली.
पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत सातत्याने दहशतवादाच्या विरोधात जागतिक जनमत जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताच्या या प्रयत्नांना यश मिळत असून अनेक देशांचा भारताला पाठिंबा मिळतो आहे. ‘ब्रिक्स’ परिषदेतही पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाचा निषेध, ही भूमिका सिद्धान्त म्हणून स्वीकारण्याची आवश्यकता प्रभावीपणे मांडली. त्याचाच परिणाम म्हणून पहलगाम हल्ल्याचा निषेध, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि रसद पुरविणाऱ्या देशांवर आर्थिक निर्बंध आणि दहशतवाविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण, या मुद्द्यांवर परिषदेत सहमती घडून आली. पाकिस्तानची बाजू घेणारा चीन यावेळीच्या ठरावाला मुकाट्याने संमती देता झाला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’, असा नारा कंठरवाने देत असतात. अशी भूमिका असणाऱ्याची भूमिका खरे तर सामोपचाराची असावयास हवी. पण तसे नाही. सतत दंडुका आपटत खेकसणाऱ्या शिपायासारखी अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका असते. ब्रिक्स परिषद सदस्यदेशांच्या बाबतीतही त्यांची हीच भूमिका होती. ‘ब्रिक्स’ देशांवर दहा टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादण्याच्या त्यांच्या धमकीचे सावट रिओ दी जानिरोमधील परिषदेवर होते. स्वतंत्र चलन तर सोडाच पण स्थानिक चलनांमध्ये व्यापाराला प्रोत्साहन देतानाही आपला हेतू अमेरिकाविरोधी नाही, असे ब्रिक्सने स्पष्ट केले हे बरे झाले. अरेला कारे म्हणणाऱ्या खुद्द चीननेही हीच सौम्य भूमिका स्वीकारली ती काही उगीच नाही.
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांबाबत ‘गंभीर चिंता’ ब्रिक्सने व्यक्त केली. अमेरिकेची भीती वाटली म्हणून कठोर शब्द वापरायचे टाळले, अशी टीका ब्रिक्सवर केली जाते आहे. भीती आणि सावधगिरी यातल्या सीमारेषा धूसर असतात, ही जाणीव असल्यामुळेच ब्रिक्सने सावधगिरीचा पर्याय स्वीकारला, असे दिसते. आज जागतिक रचनेत वेगाने बदल होतो आहे. आपल्या हितसंबंधांना प्राधान्य देऊनच जागतिक भूमिका निश्चित करण्याकडे सर्वच देशांचा कल असतो. बड्या धेंडांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल ही जाणीव ठेवूनच ब्रिक्सच्या नरम भूमिका होत्या, हे स्पष्ट आहे.
परिषदेचे अतिविस्तृत म्हणजे 1600 शब्दांचे संयुक्त निवेदन सर्वस्पर्शीही आहे, इकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जागतिक शांतता, सौहार्द, बंधुभाव, व्यापारास उत्तेजन, दहशतवादाला प्रतिबंध, सायबर सुरक्षा, पर्यावरण प्रदूषण, हवामान बदल, पृथ्वीवर गारवा यावा म्हणून करावयाचे विविध प्रयत्न, अशा जवळपास सर्व विषयांस या संयुक्त निवेदनात स्थान देण्यात आले आहे, हे अमान्य करता यायचे नाही. संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय न्यायालय, संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, 'नाटो' आदी एकापेक्षा एक प्रभावशाली संघटना हळूहळू निष्क्रिय, निष्प्रभ आणि निराधार होत आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिक्स'मधील चर्चा पुरेशा गांभीर्ययुक्त वातावरणात पार पडल्या आहेत, याची नोंद घेण्याची आवश्यकता आहे.