Wednesday, July 9, 2025

 सामुद्रधुनींचे सामरिक व व्यापारी महत्त्व

तरूण भारत, नागपूर गुरुवार, दिनांक १०/०७/२०२५ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

  सामुद्रधुनींचे सामरिक व व्यापारी महत्त्व

 वसंत गणेश काणे, 

बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com  Blog - kasa mee?

  दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्यासमान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी किंवा भारतात काही ठिकाणी जलडमरूमध्य (‘जल-डमरू-मध्य’) म्हणतात. सामुद्रधुनी म्हणजे दोन भूभागांना वेगळे करणारा आणि दोन मोठे जलाशय जोडणारा एक अरुंद सागरी मार्ग होय. दोन जलाशयांना जोडणाऱ्या या अरुंद पट्टीला  ‘जल-डमरू-मध्य’ हे नाव  सार्थ वाटते. एकूण आकार डमरूसारखा दिसतो, म्हणून हे नाव! या सामुद्रधुनींना ऐतिहासिकदृष्ट्या आणि सध्याच्या काळात तर सामरिक दृष्ट्याही खूप महत्त्व आले आहे. अनेक सामुद्रधुनी व्यापारी आणि सामरिक अशा अनेक दृष्टींनी महत्त्वाच्या आहेत, त्यांचा उपयोग नौदलांची जहाजे आणि व्यापारी जहाजे ये जा करण्यासाठी करतात.  सामुद्रधुनींनी वर्तमान आणि इतिहासकाळात अनेकदा समस्याही निर्माण केल्या आहेत.

   होर्मुझची सामुद्रधुनी ही अशाच प्रकारची जगातील सर्वात सुंदर सामुद्रधुनींपैकी आणि समस्या निर्माण करणाऱ्यांपैकी एक आहे. इराणच्या आखाताला ओमानच्या आखाताशी ही जोडणारी एक अरुंद सामुद्रधुनी आहे. इराणच्या आखातातून समुद्राकडे शस्त्रे, सैनिक आणि व्यापारी वस्तू विशेषतहा खनिज तेल घेऊन  जाण्याचा हा एकमेव जलमार्ग आहे. त्यामुळे हा सामरिक दृष्ट्या प्रभावी कोंडी करण्याचा उत्तम मार्ग ठरला आहे जगातील एकूण खनिज तेल वाहतुकीच्या 20 टक्के वाहतूक ह्या सामुद्रधुनीद्वारे होते होर्मुझची सामुद्रधुनी सुमारे 170 किमी किंवा 21 नॉटिकल मैल लांब आहे.   दोन्ही तोंडांना तिची रुंदी जरी  सुमारे 50 किमी  असली तरी सर्वात अरुंद भाग सुमारे 34 किमी रुंद आहे. त्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सागरी वाहतुकीसाठी 3 किमी रुंदीची शिपिंग लेन ( जलवाहतुक पट्टी) निश्चित केलेली असते.  अशाप्रकारे होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून  जाणाऱ्या  प्रत्येक जहाजाचा वाहतूक मार्ग वेगळा ठेवलेला असल्यामुळे जहाजांमध्ये टक्कर होण्याची शक्यता नसते.  सद्ध्या इराण सरकारने युनायटेड नेशन्स कनव्हेंशन ऑफ दी लॅा ऑफ दी सी (यूएनसीएलओएस) किंवा दी लॅा ऑफ दी सी कनव्हेंशन  नुसार वाहतूक मार्गाला परवानगी दिली आहे. यामुळे या भागातील  लोकांचे आशियाच्या मुख्य भूमीपर्यंत पोहोचण्याचे अंतर कमी होते. यूएनसीएलओएस हा एक आंतरराष्ट्रीय रिवाज (कनव्हेंशन) असून त्यानुसार जहाजांच्या ये जा करण्याबाबतचे नियम घालून दिलेले आहेत.  नुकत्याच लढल्या गेलेल्या इराण आणि इस्रायल यांच्या युद्धप्रसंगी इराणने ही सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली होती.  त्यामुळे इराक, सौदी अरेबिया युनायटेड अरब अमिरात आणि अन्य देशांचा जलवाहतुकीचा मार्ग अडला असता किंवा त्यांना लांबचा वळसा घेऊन तरी जावे लागले असते. आता हा प्रसंग टळला म्हणून अख्ख्या जगाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

जगातील निरनिराळ्या कारणास्तव प्रसिद्ध असलेल्या इतर अशाच काही महत्त्वाच्या सामुद्रधुन्या अशा आहेत. 

मलाक्का सामुद्रधुनी- ही अंदमान समुद्र (हिंदी महासागर) आणि दक्षिण चीन समुद्राला जोडते. 900 किमी लांब व 65 ते 250 किमी रुंद असलेली ही सामुद्रधुनी मलाया द्विपकल्प आणि सुमात्रा (इंडोनेशिया) यांच्यामधली सामुद्रधुनी आहे. 25% तेल वाहतुकीमुळे चीनसाठी ही विशेष महत्त्वाची आहे. 

उत्तर वाहिनी (नॉर्थ चॅनेल)- आयर्लंड आणि इंग्लंड दरम्यानची वर्दळीची सामुद्रधुनी आहे. ही आयरिश समुद्र आणि अटलांटिक समुद्रांना जोडते. आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धांमुळे वेगळी प्रसिद्धी आहे.

पाल्क सामुद्रधुनी ही (तमिळनाडू) भारत आणि (जाफना) श्रीलंका यामधल्या या सामुद्रधुनीचा रामायणात उल्लेख आहे. (मन्नारची खाडी) हिंदी महासागर आणि (पाकची खाडी) बंगालचा उपसागर यांना ही जोडते. ईशान्येकडील बंगालचा उपसागर आहे तर नैऋत्येकडील मन्नाराचे आखात आहे.

इंग्रजी वाहिनी - इंग्लिश खाडी भौगोलिकदृष्ट्या डोव्हरच्या सामुद्रधुनीत येते. डोव्हरची सामुद्रधुनी युरोपीय भूभाग (फ्रान्सचा किनारा) आणि ब्रिटिश बेटांना जोडते. 

त्सुगारु सामुद्रधुनी - ही उत्तर ती जपानमध्ये आहे. त्सुगारु सामुद्रधुनी  जपानचे सर्वात मोठे बेट होन्शू आणि दुसऱ्या क्रमांकाची मोठी होक्काइडो बेटे यांच्यामध्ये ही सामुद्रधुनी आहे. जपान सागराला ही सामुद्रधुनी  प्रशांत महासागराशी  जोडते. 

डेव्हिस सामुद्रधुनी- ही उथळ सामुद्रधुनी ग्रीनलँड आणि कॅनडा यांच्या मध्ये असून ती अटलांटिक महासागर आणि बॅफिन उपसागराला जोडते.  जगातील सर्वात विस्तीर्ण सामुद्रधुनींपैकी ही एक आहे. ही सामुद्रधुनी उत्तर ते दक्षिण सुमारे 650 किलोमीटर लांब आहे आणि 320 ते 640 किलोमीटर रुंद आहे.

  फॉर्मोसा किंवा तैवान सामुद्रधुनी - ही जगातील सर्वात वर्दळीची 180 किमी कमीतकमी  रुंदी असलेली सामुद्रधुनी असून ही तैवानला चीनपासून अलग करते. दक्षिण आणि पूर्व चीन समुद्राच्या दरम्यान आहे. वन चायना तत्त्वाची सबब पुढे करून चीन तैवानला सामील करून घेण्यासाठी टपून बसला आहे.

  जिब्राल्टरची सामुद्रधुनी - ही अटलांटिक समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारी, (स्पेन) युरोप आणि (मोरोक्को) आफ्रिका खंड यांना वेगळे करणारी आणि दुसऱ्या महायुद्धात विशेष प्रसिद्धी मिळालेली सामुद्रधुनी असून ती सर्वात अरुंद ठिकाणी जेमतेम 8 नॅाटिकल मैलच रुंद आहे.

   इराणने आजपर्यंत कधीही होर्मुझ सामुद्रधुनी बंद केलेली नाही. 80 च्या दशकात इराण-इराक युद्धादरम्यान दोन्ही देशांनी सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला केला होता, परंतु वाहतूक थांबली नव्हती. कुणीही थांबवली नव्हती. यावेळी वाहतुक थांबली असती तर खुद्द इराणचेही नुकसानच झाले असते. कारण इराणचा स्वतःचा व्यापारही याच मार्गाने चालतो. दुसरे असे की, जर इराणने हा मार्ग रोखला असता तर त्याचा परिणाम त्याच्या शेजारी देशांच्या वाहतुकीवर आणि व्यापारावर झाला असता आणि इराणचे आपल्या शेजारी राष्ट्राशी असलेले संबंध बिघडले असते. 

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे जाण्यासाठीच्या मार्गांवर समुद्री सुरुंग लावून  किंवा पाणबुड्यांचा वापर करून इराण होर्मुझ मार्ग  रोखू शकला असता. क्षेपणास्त्रे, ड्रोन, वेगवान समुद्री नौका यांचाही इराण वापर करू शकला असता. 

पण हा अडथळा अमलात आणणे वाटते तेवढे सोपे नव्हते. अमेरिकन नौदल होर्मुझजवळच्या  बहरीनमध्ये ठाण मांडून आहे. इतर पाश्चात्य देशांच्या नौदलाच्या  येथे गस्ती तुकड्या डोळ्यात तेल घालून पाळत ठेवत असतात. 

इराणने यापूर्वीही अनेकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. आजपर्यंत इराणने सामुद्रधुनी कधीही बंद केली नसली तरी होर्मुझच्या निमित्ताने लहानमोठे संघर्ष झाल्याची इतिहासात नोंद आहे.  1980 ते 1988 या काळात "इराण आणि इराकमध्ये संघर्ष झाला होता. तेव्हा इराक इराणच्या तेल वाहून नेणाऱ्या  जहाजांवर हल्ला करायचा तर उत्तरादाखल  इराण इराकच्या माल वाहून नेणाऱ्या जहाजांवर हल्ला करायचा. इराणचे धाडस नोंद घ्यावी असे आहे.  अमेरिकन नौदलाच्या जहाजांवरही इराणने यापूर्वी हल्ले केले आहेत.  यावेळी तर इराणने कतारमधील अमेरिकन तळावरच बॅाम्बफेक केली होती. 2000 पासून इराण अण्वस्त्र तयार करतोय असा आरोप अमेरिका करते आणि इराण होर्मुझ बंद करू का म्हणून धमकी देत असतो. 2007 मध्येही अशीच बाचाबाची या दोन देशांमध्ये झाली होती. तेव्हा ‘पाहून घेईन’,  अशा धमक्यांची देवाणघेवाण उभयपक्षी झाली होती. 2019 मध्ये इराणने अमेरिकेचे सामुद्रधुनीवर पाळत ठेवणारे ड्रोन पाडले होते. एप्रिल 2023 मध्ये, इराणने एक क्रूड टँकर जप्त केला होता, तो वर्षभरानंतर परत दिला. असे एकमेकांवर गुरगुरण्याचे प्रकार सोडले तर मोठे संघर्ष झाले नाहीत.

  इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करीन, अशा धमक्या वारंवार देतो, हे पाहून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनी पाईप लाईनच्या साह्याने खनिज तेल आणि नैसर्गिक वायू पाठविण्याला सुरवात केली आहे. पण  ही योजना अजून पुरेशी आकाराला आलेली नाही. 

  इराणच्या शेजारी देशांकडे होर्मुझ सामुद्रधुनीशिवाय दुसऱ्या देशांना तेल पाठवण्यासाठी दुसरा कोणताही सोयीचा सागरी मार्ग नाही.  लाल समुद्रामार्गे माल पाठविता आला असता किंवा  किंवा ओमानमधून रस्तेमार्ग वापरता आला असता पण यात वळसा घ्यावा लागतो. म्हणजे मार्गाची लांबी वाढते म्हणजे वाहतुकीचा खर्च वाढतो. यामुळे शेवटी तेलाच्या किमती वाढल्या असत्या. तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा  देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असता. हे कुणालाच नको होते. होर्मुझ सामुद्रधुनी बंद होणे म्हणजे सर्व जगाचे अर्थचक्र रुळावरून घसरणे असा प्रकार झाला असता. 

  ही धमकी अमलात आली असती खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची पुरवठा साखळी (सप्लाय चेन) तुटली असती आणि बहुतेक देशातील पेट्रोल पंप बाधित झाले असते.  खनिज तेल आणि नैसर्गिक वायू  यांच्या तुटवड्यामुळे जगभर निदर्शनांचा आगडोंब भडकला असता. 

 यावरून हे स्पष्ट व्हावे की,  होर्मुझ बंद केल्याने इराणला फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झाले असते. युद्धाशी संबंध नसलेले देश जसे अगतिक झाले असते तसेच ते इराणशी शत्रृत्व करू लागले असते. या देशांनी पर्यायाचा शोध घेतला असता.

जसे की, तेल वाहतुकीसाठी भारताने तर युक्रेन युद्ध भडकल्यानंतर लगेचच रशियासारखा दुसरा मोठा  पुरवठादार देश शोधला आहे आणि बफर स्टॅाक तयार केला आहे.  पण अशा साठवणुकीला मर्यादा असणारच. चीन, जपानसारखे देश आफ्रिका, रशिया, अमेरिका, ब्राझील यांच्याकडूनही खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवू शकले असते, नव्हे तशी सुरवातही या देशांनी केली आहे. 


मक्तेदारीमुळे होऊ शकणारी अडवणूक, वाहतुक कोंडीची भीती आणि प्रदूषण यांच्या पासून सुटका व्हावी, या दुहेरी हेतूने जगात सद्ध्या पर्यायी इंधन शोधण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जैवइंधन, बायोमास, शैवाल इंधन, बायोडिझेल, अल्कोहोल इंधन, हायड्रोजन अशा निरनिराळ्या पर्यायांची चाचपणी होत आहे.  जगात 24 तासात कुठे ना कुठे सूर्यप्रकाश असतोच, तेव्हा सर्व जगाला गवसणी घालणारे एक ग्रिड उभारून सोलर उर्जेचा वापर करण्याचा वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड हा अभिनव पर्याय भारताने जगासमोर मांडला आहे. हा अभिनव आणि क्रांतिकारी ठरणारा असणार आहे.


                                                      होर्मुझची सामुद्रधुनी

No comments:

Post a Comment