फ्रान्समध्ये अार्थिक क्रांती होणार का?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
फ्रान्सम ध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मेरीन ले पेन यांचा दणदणीत पराभव करून इमॅन्युअल मॅक्राॅन निवडून आले असून रविवारी १४ मे २०१७ ला शपथविधी आयोजित आहे. ३९ वर्षाचे मॅक्राॅन हे आजवरचे फ्रान्सचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. (अपवाद नेपोलियन बोनापार्टचा, तो ३५ व्या वर्षी राष्ट्रप्रमुख झाला होता) निकाल जाहीर होताच इमॅन्युअल मॅक्राॅन यांनी आपण सर्वप्रथम युरोपीयन युनियनच्या खंद्या पुरस्कर्त्या व जर्मनीच्या चान्सेलर ॲंजेला मर्किन यांची भेट घेऊ, असा मनोदय व्यक्त केला आहे.
अशी झाली निवडणूक - ४ कोटी ७० लाख एकूण मतदारांपैकी, ७९ टक्के मतदान होऊन निवडणुकीच्या पहिल्या फेरीत एकूण चार उमेदवारंना अपक्ष मॅक्रॉन यांना २३.७५ टक्के, नॅशनल फ्रंटच्या पेन २१.५३ टक्के, रिपब्लिकन पार्टीचे फ्रँकोसिस फेलन यांना १९.९१ टक्के, तर डाव्यांचे उमेदवार मेलेंकॉन यांना १९.६४ टक्के मते मिळाली. फ्रान्समधील निवडणूक कायद्यानुसार दुसऱ्या फेरीसाठी मॅक्रॉन आणि पेन हेच दोन उमेदवार पात्र ठरले. या फेरीत मॅक्रॉन यांना ६६.१ टक्के (८० लाख) तर पेन यांना ३३.९ टक्के मते मिळाली. या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रथमच दोन प्रमुख पक्षांचे (सोशलिस्ट आणि रिपब्लिकन पार्टी) उमेदवार पहिल्या फेरीतच बाद झाले
मी ना डावा ना उजवा - पहिल्या फेरीत इमॅन्युअल मॅक्राॅन यांना सर्वात जास्त म्हणजे २४% मते मिळाली होती. ते मूळचे समाजवादी पण सध्या मध्यममार्गी, प्रगतीवादी, युनियनवादी म्हणून ओळखले जातात. तरीही फ्रान्सच्या सीमा सुरक्षित असाव्यात, असे मानणारे (युरोपियन युनियनमध्ये सामील असल्यामुळे सदस्य देशांच्या सीमा पुष्कळशा सैल झाल्या आहेत), पण मुस्लिंमांवर अन्याय होतो आहे, याही मताचे आहेत. तसेच उद्योगप्रधान धोरण, संरक्षणसिद्धता यावर त्यांचा भर असतो. सीरियातील फ्रान्सच्या हस्तक्षेप ते योग्य मानतात, समतोल विचारवादी व आंतरराष्ट्रीयवादी म्हणूनही जग त्यांना ओळखते. थोडक्यात असे की, युरोपियन कॉमन मार्केटशी संबध राखणे, युरोपीय राजकारण बळकट करणे, निर्वासितांना सशर्त का होईना, निवडक प्रवेश देणे आणि साऱ्या जगाशी पूर्ववत संबंध राखणे हे मॅक्रॉन यांचे धोरण आहे. इमॅन्युअल मॅक्राॅन हे अध्यक्षपदासाठीचे अपक्ष उमेदवार असले तरी फ्रान्समध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. फ्रान्समध्ये मतदानाच्या पहिल्या फेरीच्या तीन दिवस आधी अतिरेकी हल्ला झाला व निवडणुकीवर दहशतीचे सावट निर्माण झाले होते. यावेळी त्यांनी स्वीकारलेली वेगळीच भूमिका त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वाची परिचायक ठरावी, अशी होती. आपण नित्याचे व्यवहार चालूच ठेवले पाहिजेत, नाहीतर देशभर भयाचे वातावरण निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. दहशतीला शरण जाऊ नका. तोच तर अतिरेक्यांचा डाव असतो, म्हणून तो हाणून पाडला पाहिजे व आपले नित्याचे व्यवहारही सुरूच ठेवले पाहिजेत, असे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते. जनरल दी गाॅल नंतर प्रथमच कुणी नेत्याने कसोटीच्या प्रसंगी अशी सुस्पष्ट भूमिका घेतली असेल. फ्रॅंको फिलाॅन यांनी तर निवडणूक रद्द करण्याचा विचार बोलून दाखवला होता.
इमॅन्युअल मॅक्राॅन यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण - त्यांच्यावर रुढी व परंपरांचा पगडा नाही. तसे असते तर त्यांनी आपल्यापेक्षा २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या विवाहित व तीन मुलांची आई असलेल्या नाट्य शिक्षिकेच्या - ब्रिगिटीच्या- प्रेमात पडून आईवडलांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला नसता. (आक्षेप - पण तेव्हा त्यांचे वय होते वर्ष १७). ब्रिगिटीने आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेऊन २००७ मध्ये इमॅन्युअल मॅक्राॅन बरोबर विवाह केला व ती तीन मुलांसह नांदायला आली. त्यावेळी त्यांची वये अनुक्रमे ५५ व ३० अशी होती व ब्रिगिटीचा सर्वात मोठा मलगा इमॅन्युअल मॅक्राॅन पेक्षा २ वर्षांनी मोठा होता. निवडणूक प्रचारादरम्यान, भाषणांची टाचणे तयार करण्यापासून ते प्रवास, प्रचार, साथ व सल्लामसलत या कामी त्या सहयोगी वसहकारी असत. त्यांना आता सात नातवंडे असून हे कुटुंब इमॅन्युअल मॅक्राॅनमुळे एकत्र नांदते आहे. मॅक्राॅन कादंबरीकार होणार होते पण पण ते विज्ञान शिकले व कादंबरीमय जीवन जगले. विवाहामुळे हे जोडपे लोकांच्या चेष्टेचा विषय ठरले. पण मॅक्राॅनचे म्हणणे असे होते की, स्त्रीद्वेश (मिसोगायनी) आपल्या रोमारोमत भरला आहे. त्या डोनाल्ड ट्रंपची पत्नी त्यांच्यापेक्षा वीस वर्षाने लहान आहे, हे तुम्हाला चालते. आम्हा दोघातला तोच फरक मात्र तुम्हाला मान्य नाही.
प्रगतीचा चढता आलेख - मेधावी व कुशाग्र बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेले इमॅन्युअल मॅक्राॅन सन २००८ ते २००१२ मध्ये ते एका मोठ्या बँकिंग ग्रुपमध्ये एग्झिक्युटिव्ह होते. बॅंकर या नात्याने आपल्या गुंतवणूक कौशल्याने त्यांनी कंपनीची आणि स्वतःचीही भरभराट करून घेतली. याच काळात ते अब्जाधीश झाले
आर्थिक सल्लागार ते आंदोलनकर्ता असा प्रवास - २०१२ मध्ये मॅक्रॉन फ्रॅन्कॉइस होलँद त्यांचे अर्थविषयक सल्लागार बनले. दोन वर्षानंतर मॅक्रॉन यांना होलँद यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून स्थान मिळाले. सुस्त अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी रविवारीही काम, नियंत्रणाच्या जोखडातून क्षेत्रांची मुक्तता, कामाच्या तासात वाढ यादिशेने प्रयत्न केले. डाव्या विचारसरणीच्या विरोधकांनी मॅक्रॉन यांच्यावर कामगारविरोधी असल्याचा आणि कामगारांच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण करत असल्याचा आरोप ठेवून प्रखर विरोध केला. २०१६च्या एप्रिल महिन्यात मॅक्रॉन यांनी ‘एन मार्च’ (चला, कूच करू या) या राजकीय चळवळीचा प्रारंभ केला.
मतदारांना दिलेली आश्वासने - कर कमी करणार, खर्चही कमी करणार, गरिबांना दरमहा ठराविक रकम देणार, पायाभूत सुविधांवर भर देणार आणि प्रदूषण टाळण्यासाठी रिन्यूएबल एनर्जी वापरणार, लालफीतशाही संपवणार, कामाच्या तासात बदल करून ते आठवड्याला ३५ करणार, नोकरीच्या अटी बदलणार असा काय जाहीरनामा असतो होय? पण मतदारांनी विरोधकांच्या या टीकेकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांना मात्र हा जाहीरनामा भावला व त्यांनी मॅक्राॅनला अध्यक्षपदी निवडून दिले.
अतिउजवी मेरीन ले पेन - मेरीन ले पेन यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे २१.३% मते मिळाली आहेत. त्या वयाने ४८ वर्षांच्या आहेत. नॅशनल फ्रंट हा त्यांचा पक्ष असून त्या अतिउजव्या मताच्या, फ्रान्स फर्स्ट मानणाऱ्या , करारी व कडव्या म्हणून प्रसिद्ध आहेत. अतिरेकी हल्यानंतर मेरीन ले पेन यांची भूमिका प्रतिक्रिया स्वरूपाची होती. सीमांवर कडक निगराणी ठेवा व ज्यांच्या ज्यांच्या विषयी गुप्तहेर खात्याचे प्रतिकूल अहवाल आहेत, त्या सर्वांना देशाबाहेर हकला, असा आग्रह ले पेन यांनी धरला होता. फ्रान्स व फ्रेंच गणराज्य सुरक्षित कसे राहील, यावरच आपला भर असेल, असे त्या म्हणाल्या होत्या. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अशा दहा हजार संशयित अतिरेक्यांची नोंद सरकार दप्तरी असून ते सुटून आल्यानंतर राजरोसपणे वावरत आहेत/असावेत, याला भोंगळपणा म्हणू नये तर काय म्हणावे, अशी त्यांची भूमिका होती. ‘फ्रान्समधील मशिदी बंद करा. दुही माजवणाऱ्यांना देशाबाहेर काढा. सीमा सील करा. कट्टरवाद्यांचे नागरिकत्व रद्द करा, युरोपियन युनियनमधून बाहेर पडा, नाटोसारखे आंतरराष्ट्रीय गट हवेतच कशाला?’ अशा मुक्ताफळांची पखरण त्यांच्या भाषणात हटकून असायची. मतदानाच्या दुसऱ्या फेरीत मतदारांनी मॅक्राॅन यांची समतोल भूमिकाच उचलून धरली.
मेरीन ले पेन यांचा पराभव म्हणजे संकुचित अतिप्रखर अतिउजवी राष्ट्रवादाची भूमिका नाकारली, असा सूर काही पत्रकारांनी लावला आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान आपल्यापुरते पहा, जगाची उठाठेव हवी कशाला, असा आग्रह धरला होता. हीच भूमिका स्वीकारून ब्रिटन युरोपीयन युनियनमधून बाहेर पडले आहे. आता फ्रान्स युरोपीयन युनियनमध्येच राहणार हे स्पष्ट झाल्यामुळे युनियनवाद्यांना हायसे वाटत असणार, कारण मॅक्राॅल युरोपियन युनियनचे कट्टर पुरस्कर्ते आहेत.
अध्यक्षपदी एक अपक्ष उमेदवार - मतदारांनी मॅक्राॅन यांना मते देतांना मतदारांनी कोणता विचार केला असावा, याबद्दल वेगळे मतही मांडले जात आहे. हे मतदान जागतिकीकरणाच्या बाजूचे नाही, तसेच ते या अगोदरच्या फ्रेंच राजकीय व्यवस्थापनाचा पुरस्कार करणारेही नाही. मग या मतदानाचा अर्थ नक्की काय समजायचा? फ्रेंचांना अतिरेकी उजवी भूमिका मान्य नाही. अमेरिकन नागरिकांनी मात्र तिला मान्यता देऊन डोनाल्ड ट्रंप यांना विजयी केले आहे. ब्रिटननेही त्याचीच री ओढून युरोपीयन युनीयनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंच मतदारांना मात्र अति डावे किंवा अति उजवे, असे कोणतेच धोरण नको आहे. मेरीन ले पेन यांचा पुतिनधार्जिणेपणा व ज्यूद्वेश या दोन्ही भूमिका मतदारांनी नाकारल्या आहेत. अति डावेही दूर फेकले गेले आहेत. मतदारांनी मॅक्राॅन यांच्या मध्यममार्गी धोरणाला व युरोपियन एकतेच्या बाजूने पसंतीची मोहर उमटवली आहे, हे फ्रेंच मतदारांच्या परिपक्व विचारांचे द्योतक आहे, असा दुसरा विचार काही निरीक्षकांनी मांडला आहे. नेदरलंड व आॅस्ट्रियामध्ये सुद्धा उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी पक्षांची पीच्छेहाट झालेली दिसते आहे.
फ्रान्स समोरील समस्या - सध्या फ्रान्ससमोर आर्थिक विकासाची मंदावलेली गती, जागतिकीकरणाच्या विरोधात गेलेले जनमत, चैनी व रंगेल स्वभाव पण पैशाची मात्र कमतरता, सामाजिक ताणतणाव, सतात येणारे निर्वासितांचे लोंढे, दहशतवाद्यांचे हल्ले, सुमार योग्यतेचे राजकीय नेतृत्व असे प्रश्न आ वासून उभे आहेत. युरोपची स्थितीही याहून वेगळी नाही. पण फ्रान्समध्ये लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत, फ्रेंच लोक खरेखुरे सेक्युलर आहेत, सहिष्णुता हा त्यांचा स्वभावविशेष आहे, विचारस्वातंत्र्य हे मूल्य त्यांना प्राणापेक्षाही प्रिय असते. म्हणूनच त्यांनी बिगरराजकीय पृष्ठभूमी असलेल्या इमॅन्युअल मॅक्राॅनला निवडून दिले असावे. एन मार्च (फाॅरवर्ड - चला, कूच करू या/पुढे चलू या) या नावाची राजकीय जनचळवळ त्यांनी उभारली आहे. ‘मला डावे किंवा उजवे कोणीही वर्ज नाही. जनहिताची कामे होणे महत्वाचे’. पण एकट्याने अपक्ष म्हणून निवडून येणे वेगळे आणि जूनमध्ये संसदेच्या निवडणुका आहेत, त्यात विजय संपादन करणे वेगळे. म्हणजे हाताशी फक्त जेमतेम एक महिना आहे. तोपर्यंत त्यांना या जनचळवळीचे रुपांतर राजकीय पक्षात करून देशभर निरनिराळ्या मतदार संघात उमेदवार उभे करून निवडणुका जिंकायच्या आहेत. विरोधक पार्लमेंटमध्ये बहुमत मिळविण्याची प्रतिज्ञा करून कामास लागले आहेत. अर्थातच आघाडीवर आहेत, मेरीन ले पेन. पण बहुमत मिळाले नाही तर काय होईल? त्यासाठी फ्रान्समध्ये असलेली प्रधानमंत्र्याच्या निवडीची प्रक्रिया अभ्यासिली पाहिजे.
फ्रान्सचा प्रधानमंत्री कसा निवडला जातो - अध्यक्षाला आपल्या पसंतीचा प्रधानमंत्री निवडता येतो. तो नॅशनल असेम्ब्लीचा निवडून आलेला सदस्य असलाच पाहिजे, असे नाही. पण नॅशनल असेम्ब्लीला सरकारचा राजीनामा मागण्याचा अधिकार असल्यामुळे व्यवहार म्हणून अध्यक्षाने केलेल्या निवडीला बहुमत असलेल्या पक्षाची संमती असावी लागते.
एक जुना दाखला - राज्यघटनेतील या तरतुदीमुळे १९८६ मध्ये फ्रान्समध्ये जे घडले ते रंजक व बोधप्रद आहे. फ्रॅंको मिटरंड हे समाजवादी पक्षाचे नेते अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांचा समाजवादी पक्ष नॅशनल असेम्ब्लीतील सर्वात मोठा पक्ष होता. पण त्या पक्षाला बहुमत(५०टक्क्यापेक्षा जास्त जागा) नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्याला - जॅक्वस शिराक/चिराक यांना - प्रधानमंत्री नेमून त्यांच्या सोबतीने राज्य शकट हाकावा लागला. या प्रकाराला कोहॅबिटेशन अशी संज्ञा आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत पक्ष स्थापन करून निवडणुकीत पूर्ण बहुमत (५० टक्क्यापेक्षा जास्त जागा) न मिळाल्यास त्यांना आपल्या पसंतीचा प्रधानमंत्री निवडता येणार नाही. संसदेत ज्या पक्षाचे बहुमत असेल, त्याच्याशी जुळवून घ्यावे लागेल किंवा आघाडी करून तडजोड करावी, लागेल.
ट्रंपही पुतिनधार्जिणे नाहीत - यानिवडणुकीचे जगभर पडसाद उमटले. या निमित्ताने अमेरिकेतील काही बोलक्या घटनाचीही नोंद घेणे उपयोगाचे ठरेल. डोनाल्ड ट्रंप यांच्यावर पुतिनधार्जिणेपणाचा आरोप डेमोक्रॅट पक्षाने निवडणुकीच्या अगोदर व नंतरही केला होता. पण आजची वस्तुस्थिती वेगळीच आहे. सीरियात बशर अल असाद हा रशियाच्या छत्रछायेखाली वावरतो आहे. रासायनिक अस्त्रे वापरल्याचा ठपका ठेवून अमेरिकेने असादच्या फौजांवर मिसाईल्स डागली. रशियाने विरोध करताच सेक्रेटरी आॅफ स्टेट्स रेक्स टिलरसन यांनी रासायनिक अस्त्रांच्या वापराला एकतर तुमची (रशियाची) मूकसंमती तरी आहे किंवा असाद तुमचे ऐकत तरी नसावा, असे म्हणून ठणकावले आहे. त्याचबरोबर रशियाने युक्रेनमधून बाहेर पडावे, अशी भूमिका अमेरिकने घेतली आहे. १९८७ मध्ये अमेरिका व रशियात एक अण्वस्रविषयक करार झाला होता. हा करार इंटरमिजिएट रेंज न्युक्लिअर फोर्सेस ट्रिटी - आयएनएफ - या नावाने ओळखला जातो. मध्यम पल्ल्याची म्हणजे ५०० ते ५५०० किलोमीटर अंतर कापणारी मिसाईल्स दोन प्रकारची असतात. बॅलिस्टिक मिसाईलवर ती डागल्यानंतर मुख्यत: वातावरण व गुरुत्वाकर्षण यांचेच नियंत्रण असते. तर क्रूझ मिसाईलमध्ये अंगभूत शक्तियंत्रणा असते. ही दोन्ही प्रकारची मिसाईल्स नष्ट करण्याची तरतूद या करारात आहे. हा करार रशिया पाळत नाही, असा अमेरिकेने रशियावर ठपका ठेवला आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांना रशियाची फूस व शस्त्रपुरवठा होत असतो, असाही अमेरिकेचा आरोप आहे. याचा अर्थ काहीही निघत असला तरी यातून डोनाल्ड ट्रंप पुतिनधार्जिणे आहेत, असे अर्थ नक्कीच निघणार नाही.
पण मेरीन ले पेन यांची गत काय झाली असती? - मेरीन ले पेन यांची रशियाला अशा शब्दात ठणकावण्याची हिंमत झाली असती का? नक्कीच नाही. २०१४ मध्ये रशियाने मरीन ले पेनच्या नॅशनल फ्रंटला लक्षावधी डाॅलरचे ‘कर्ज’ दिले होते. एकदा तर हातात रक्कम पडते न पडते तोच मरीन ले पेन यांनी क्रीमियाला रशियात सैनिकी शक्तीच्या साह्याने सामील करून घेण्याच्या रशियाच्या कृतीचे समर्थन केले होते. कर्ज व पाठिंबा या दोन बाबी लागोपाठ घडून येत असतील तर त्या मागचा अर्थ समजावून सांगण्याची आवश्कता आहे काय? फ्रान्सची अध्यक्षा या नात्याने मेरीन ले पेन रशियाच्या हातची बाहुली बनल्या असत्या. असे विधान ट्रंप यांचेबाबतीत करता येईल का? नक्कीच नाही.
ज्यू लोकांबद्दलच्या भिन्न भूमिका - हिटलरने ६० लाख ज्यूंना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ठार मारले होते. याला होलोकास्ट असे नाव आहे. मेरीन ले पेन यांच्या नॅशनल फ्रंटला असे काही घडलेच नाही, असे वाटते. डोनाल्ड ट्रंप यांनी असे मानणाऱ्यांविरुद्ध कडाडून टीका केली आहे. यावरून डोनाल्ड ट्रंप व मेरीन ले पेन यांच्या विचारसरणीतील फरक स्पष्ट होण्यास मदत होईल. त्यामुळे मेरीन ले पेन यांच्या पराभवामुळे डोनाल्ड ट्रंप यांना वाईट वाटण्याचे कारण दिसत नाही.
हा तपशील हे स्पष्ट करतो की, ट्रंप यांना मेरीन ले पेनपेक्षा इमॅन्युअल मॅक्राॅन यांच्याशी जुळवून घेणेच सोयीचे व शक्य होणार आहे, जरी त्यांना मेरीन ले पेन याच निवडून याव्यात, असे वाटत होते तरी.
फ्रान्ससमोरचे आजचे प्रश्न - ढासळलेली व ढेपाळलेली अर्थव्यवस्था; मुस्लिम निर्वासितांचा प्रश्न; एवढेच नव्हेतर निर्वासितांच्या रूपाने प्रवेश करणारे छुपे अतिरेकी; निरनिराळी रूपे धारण करून येणारा व वाढता दहशतवाद; कुशल व अकुशलांमधील बेरोजगारी या समस्यांनी फ्रान्स त्रस्त आहे. या सर्वांवर उपाय करण्याची क्षमता इमॅन्युअल मॅक्राॅन यांच्यात अाहे, असे मानणारा समर्थक मतदार निराश होता कामा नये.असे झाले तर सर्वच फिसकटेल. आता आपल्याला काम करावे लागणार, शिस्तीचे पालन करावे लागणार, अक्षम व कामचुकारांना नोकरीला मुकावे लागणार अशी धास्ती वाटून कामगार संघटनांनी इमॅन्युअल मॅक्राॅन निवडून येताच निदर्शने करून इशारे द्यायला सुरवात केली आहे. या परिस्थितीवर मात करून इमॅन्युअल मॅक्राॅन यांना अार्थिक क्रांती घडवून आणायची आहे. युरोपियन युनियनचे विघटन थोपवायचे आहे. कडवी उजवी विचारसरणी जगभर डोके वर काढते आहे. संकुचित व्यक्तिमत्वाचे नेते लोकशाही मार्गाने नेदरलँड व ऑस्ट्रिया सारख्या लहान देशातच विजयी होत आहेत, असे नाही. तर जर्मनीसारख्या मोठ्या, परिपक्व, दुसऱ्या महायुद्धाचे चटके खाल्लेल्या देशातही कडवी उजवी विचारसरणी डोके वर काढते आहे. तिचा बंदोबस्त मात्र मार्केल ॲंजेला यांना करावा लागेल. फ्रान्स व जर्मनी हे युरोपियन युनियन चे खरेखुरे आधारस्तंभ आहेत, संयुक्त युरोपरूपी रथाची दोन चाके आहेत. त्यांच्या भरवशावर युरोपमध्ये आर्थिक क्रांती होण्याची शक्यता बळावली आहे.
No comments:
Post a Comment