Saturday, June 24, 2017

अमेरिकेतील हिंदू

अमेरिकेतील हिंदू
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
अमेरिकेत हिंदू धार्मिक अल्पसंख्यांक आहेत, हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांची संख्या २०१४ मध्ये ०.७ टक्के इतकीच होती. पण २०१५ मध्ये ती ०.८ टक्के झाली होती. एक वर्षात ०.१ टक्के वाढ ही कमी नाही. याचा अर्थ असा की हिंदूंची अमेरिकेतील संख्या वेगाने वाढली. संख्येच्या भाषेत सांगायचे तर ती एक मियीयनने ( दहा लक्षाने) वाढली आहे.
आले कुठून कुठून? - अमेरिकेतील हिंदू स्थलांतरित आहेत, हेही सांगायला नको. पण ते सगळे भारतातूनच तिथे गेलेले आहेत, अशी जर आपली कल्पना असेल, तर तसे नाही. जवळजवळ बावीस देशातून ते तिथे येऊन स्थायिक झालेले आहेत. अर्थात सर्वात जास्त संख्या भारतातून आलेल्यांचीच असणार, हे स्पष्ट आहे. पण नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, भूतान, मालदीव, अफगाणिस्थान, पाकिस्थान, म्यानमार, इंडोनेशिया यासारख्या आशियन खंडातील देशातून, तसेच आफ्रिकेतूनही हिंदू अमेरिकेत येऊन स्थायिक झाले आहेत.
१९६५ चा हार्ट- सेलर ॲक्ट - एकोणिसाव्या शतकापर्यंत अनेक हिंदू अमेरिकेत कामानिमित्त तेवढ्यापुरते येऊन राहत व परत जात. त्याकाळी स्थायिक हिंदूंचे प्रमाण अमेरिकेत खूपच कमी होते. १९६५ मध्ये अमेरिकेत इमिग्रेशन ॲंड नॅशनल सर्व्हिसेस ॲक्ट ( आयएन एस) पारित झाला आणि हिंदूंच्या अमेरिकेत येऊन स्थायिक होण्याच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागली. 
 हा कायदा हार्ट- सेलर ॲक्ट या नावानेही ओळखला जातो. हा कायदा पारित होईपर्यंत अस्तित्त्वात असलेल्या १९२१ च्या इमर्जन्सी कोटा ॲक्टनुसार काही विशिष्ट संख्येतच इतरांना प्रवेश देण्याचे धोरण अमेरिकेत कार्यवाहीत होते पण इमॅल्युअर सेलर व फिलिप हार्ट या अनुक्रमे न्यूयाॅर्क व मिशिगन च्या प्रतिनिधींनी अनुक्रमे सूचित व अनुमोदित केलेले कायद्याचे प्रारूप १९६५ साली कायद्याचे रूप घेते झाले व परिस्थितीत बदल झाला.
कायद्याचा तपशील - या कायद्याने दरवर्षी अमेरिकेत १ लक्ष ७० हजार ही स्थलांतरितांसाठीची संख्या निर्धारित करण्यात आली. देशागणिक किती लोकांना प्रवेश द्यायचा तेही ठरविण्यात आले. स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्याचे कौशल्य व अमेरिकेत पूर्वीच येऊन स्थायिक झालेल्यांशी असलेला नातेसंबंध यावर भर असावा, अशीही तरतूद करण्यात आली.
अमेरिकन हिंदूंची विशेषता - आज हिंदू- अमेरिकन इतर सर्व धर्मियात गुणवत्तेत अव्वल आहेत. याचे श्रेय अर्थातच प्रवेश देतांनाच गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या धोरणाला आहे, हे उघड आहे. याचा दुसरा एक अर्थ असाही होतो की प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या इतरांमधील गुणवत्ताधारकांच्या तुलनेत हिंदूंमधील गुणवत्ताधारकांची जास्त असते. कदाचित याचाच एक परिणाम असाही असावा की, अनेक हिंदू संकल्पना अमेरिकन जनमानसात परिचित व अनेकदा स्वीकार्य ठरल्या असाव्यात. कर्मसिद्धांत, पुनर्जन्म (रिइनकार्नेशन) व योग या केवळ संकल्पनाच अमेरिकेत परिचित आहेत असे नाही तर हे शब्दसुद्धा अमेरिकेत माहीत आहेत. आजमितीला २४ टक्के अमेरिकन पुनर्जन्म मानू लागले आहेत. पुनर्जन्माची संकल्पना ही हिंदू संकल्पनांमधील एक मध्यवर्ती (कोअर) संकल्पना आहे, हे लक्षात घेतले म्हणजे याचे महत्व लक्षात येईल.
 हिंदूंमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वात कमी आहे. शिक्षणाचे बाबतीत हिंदू इतरांच्या तुलनेत वरचढ आहेत. अमेरिकन-हिंदूपैकी ४८ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. तेवढ्याच हिंदूंचे वार्षिक उत्पन्न  १ लक्ष डाॅलर किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ७० टक्के अमेरिकन-हिंदूंचे वार्षिक उत्पन्न ७५ हजार डाॅलरपेक्षा जास्त आहे.
पहिली भारतीय महिला - १८८३ मध्ये पहिल्या हिंदू स्त्रीने शिक्षणासाठी अमेरिकन भूमीवर पदार्पण केले. ती महाराष्ट्रीयन होती. तिचे नाव आहे आनंदी गोपाळ जोशी. वयाच्या १९ व्या वर्षी तिने अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील विमेन्स मेडिकल काॅलेजमध्ये प्रवेश घेऊन ११ मार्च १८८६ ला एम डीची पदवी संपादन केली होती. १८८६ मध्ये ती भारतात परत आली व कोल्हापूरला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करू लागली. पण दुर्दैवाने काही महिन्यातच तिचे क्षयरोगाने निधन झाले. 
 १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथे जगविख्यात भाषण झाले. ते दोन वर्षे अमेरिकेत होते. या काळात अमेरिकेत त्यांची ठिकठिकाणी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी भाषणे झाली होती. १९०२ साली स्वामी रामतीर्थांनी अमेरिकेला भेट दिली होती. आपल्या दोन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी वेदांतावर भाषणे दिली होती. १९२० साली परमहंस योगानंद यांनी इंटरनॅशनल काॅंग्रेस आॅफ रिलीजिअस लिबरल्समध्ये बोस्टनला भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
१९६५ पूर्वी अमेरिकेत हिंदू फारसे जात नसत. त्यांची संख्या जेमतेम ५० हजार असेल तर असेल. हे बहुदा शीख असत. पण ते हिंदू म्हणूनच गणले जात.
अमेरिकेतील हिंदूविरोध - ४ सप्टेंबर १९०७ ला बेलिंगहॅम, वाॅशिंगटन येथे दंगे झाले. सुमारे ५०० गोऱ्यांनी हिंदूंच्या (शिखांच्या) घरांवर हल्ला केला. चिजवस्तू लुटून नेल्या. हे दंगेखार एशियाटिक एक्सक्ल्युजन लीगचे सदस्य होते. हिंदूंना अमेरिकेतून हकलून द्यावे कारण अमेरिका हा गोऱ्यांचा देश आहे, या मताची ही संघटना होती. अधिकाऱ्यांनी याकडे नुसताच कानाडोळा केला नाही तर सर्वांना संरक्षण देण्याच्या मिशाने एका हाॅलमध्ये कोंडून ठेवले. सहा जखमींना दवाखान्यात हलवावे लागले. सुदैवाने कोणीही मृत्युमुखी पडला नाही. एकाही दंगेखोरावर खटला भरण्यात आला नाही. मग शिक्षा होणे तर दूरच राहिले. ४०० हिंदूंना (शीख) बेलिंगहॅम जेलमध्ये संरक्षण करण्याच्या मिशाने डांबण्यात आले. असे दंगे इतर ठिकाणीही झाले.
शंभर वर्षानंतर त्या त्या ठिकाणच्या मेयरांनी २०१७ साली याबद्दल खेद व्यक्त केला व त्यांनी  ४ सप्टेंबर २००७ हा डे आॅफ हीलिंग ॲंड रिकनसिलिएशन घोषित करून दु:ख व पश्चा:ताप व्यक्त करून प्राय:चित्त घेतले.
अमेरिका फक्त गोऱ्यांसाठी-  १९२३ मध्ये युनायटेड स्टेट्स विरुद्ध तिसरा भगतसिंग प्रकरणी ते आणि अन्य आशियायी व्यक्ती स्वतंत्र गोरे लोक नाहीत आणि १७९० च्या कायद्यानुसार फक्त गोरे लोकच अमेरिकेचे नागरिक होऊ शकतात. १९२४ च्या कायद्यानुसार आशियायी, मध्यपूर्व आणि भारतीय यांना अमेरिकेत आश्रय मिळू शकणार नाही. हिंदूंना तर नाहीच नाही. अशा परिस्थितीत सुद्धा काही व्यावसायिक अमेरिकेत राहिलेच व त्यांनी आपला व्यवसायही केला. पण त्या वास्तव्याला कायद्याचे समर्थन नव्हते.  १९६५ साली इमिग्रेशन ॲंड नॅशनल सर्व्हिसेस (आयएनएस) ॲक्ट पारित होईपर्यंत ही स्थिती कायम राहिली. ॲक्ट पारित झाल्यानंतर मात्र हिंदू स्थलांतरित अमेरिकेत आपला कुटुंब कबिला घेऊनही राहू लागले. तेव्हापासूनच हिंदू धर्मगुरू सुद्धा अमेरिकन लोकांना हिंदू धर्माबाबत माहिती देऊ शकले. हिंदू धर्माशी अमेरिकेचा रीतसर परिचय व्हायला या वेळेपासून प्रारंभ झाला असे म्हणता येईल.
हिंदू विचारवंतांचा प्रभाव - पण या अगोदर १९६० च्या आसपास हिंदू विचारवंत आणि अमेरिकन यांच्यात सांस्कृतिक स्तरावर संपर्क होऊ लागला होता.स्वामी प्रभुपद यांच्या इंटरनॅशनल सोसायटी फाॅर कृष्णा काॅन्शसनेस - आयएससीओएन- इस्काॅन- या नावाच्या नव-हिंदू चळवळीने अमेरिकेत मूळ धरले होते. रिचर्ड अलपर्ट, जाॅर्ज हॅरिसन आणि अलेन गिन्सबर्ग यांच्या प्रभावा आणि प्रयत्नामुळे अमेरिकेत हिंदूधर्माचा प्रसार व्हायला सुरवात झाली होती. एवढेच नव्हे तर रिचर्ड अलपर्ट यांनी हाॅवर्ड विद्यापीठात रिचर्ड अलपर्ट नोकरीही केली. पण ते हिंदू धर्माची माहिती देतात हे उघड झाल्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली. या सर्व प्रकरणी त्यांना अमेरिकेत भरपूर प्रसिद्धी मिळाली. पुढे हे रिचर्ड अलपर्ट भारतात आले आणि त्यांनी नीम करोली बाबा यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी रामाचा दास या अर्थाचे सूचन करणारे राम दास हे नाव धारण केले व ते अमेरिकेत एक हिंदू शिक्षक या नात्याने परत आले.
हरे कृष्ण -  त्यांचा एक शिष्य जेफ्री कॅगल स्वत:ला हिंदूधर्माच्या प्रचाराला वाहून घेतले अनेक मंत्र, ऋच्या यांच्या सीडीज तयार केल्या व अमेरिकेत यांचा जागर होऊ लागला. अमेरिकेत त्यांना योगाचे राॅक स्टार मानले जाऊ लागले. बीटल्सचा त्या काळी अमेरिकेत बोलबाला होता. बीटलचा एक सदस्य जाॅर्ज हॅरिसन याने स्वामी प्रभुपाद यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याच्या गायनात हरे कृष्ण हे शब्द येऊ लागले. यामुळे सामान्यजनांना हिंदूधर्माची ओळख होण्यास मदत झाली. विशेषत: अमेरिकन तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. गाजलेल्या हाऊल या नावाच्या भयपटाचा (हाॅरर फिल्म) लेखक अलेन गिन्सबर्ग हिंदू धर्मामुळे अतिशय प्रभावित झाला तो याच काळात.  
अमेरिकेत ओम्कार - अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को मध्ये गोल्डन गेट पार्क पोलो फिल्ड नावाचे एक स्थळ आहे. या ठिकाणी दी ह्यूमन  बी-इन या नावाचा एक सांस्कृतिक देवाणघेवाण विषयक कार्यक्रम १९६७ मध्ये संपन्न झाला. यात ॲलन गिन्सबर्ग ने ओम्काराचे उच्चारण काही तास  केले. याशिवाय चिन्मय व महर्षी महेश योगी यांची शिष्य मंडळीही अमेरिकेत होती.
दिवाळीनिमित्त दीपप्रज्वलन - २००० मध्ये अमेरिकन संसदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन  व्यंकटचलापती समुद्राला यांनी सादर केलेल्या संस्कृत प्रार्थनेने झाले. भारताचे त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भेटीचे निमित्ताने हा सन्मान समारंभ आयोजित होता. ओहायओ प्रांताचे काॅंग्रेस सदस्य शेरोड ब्राऊन यांनी पुढाकार घेऊन परमा येथील शिव विष्णू मंदिराचे  पुजाऱ्यांना या निमित्ताने पाचारण केले होते. १२ जुलै२००७ रोजी राजन झेड यांनी नेवाडातील हिंदू धर्मगुरूंना पाचारण केले असता एका ख्रिश्चन दांपत्याने प्रार्थनेत व्यत्यय आणला होता. यावेळी गप्प राहणाऱ्यांवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. बराक ओबामा यांनी मात्र दिवाळीनिमित्त दीपप्रज्वलन करून प्रकाशाच्या अंधारावरील विजयाचे प्रतीक स्वरूपातील दर्शन व्हाईट हाऊस मध्ये घडविले. भारताशिवाय आजवर ७५ हजार परागंदा भूतानी नागरिकांनी अमेरिकेत आश्रय घेतला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या लोकांवर  परागंदा होण्याची वेळ का यावी हा स्वतंत्र विषय आहे. पण या सर्वांचा मुख्य धर्म मात्र हिंदू हाच आहे.
न्यूयाॅर्क शहरात कलीमाता
एंपायर स्टेट बिल्डिंग ही अमेरिकेतील १०२ मजली महाकाय इमारत या देशाचे भूषण आहे.  या एंपायर स्टेट बिल्डिंगवर गेल्या वर्षी लुई सायहाेय आणि सहकारी यांनी विजेची रोषनाई करून कालीमातेची प्रतिकृती उभी केली होती. ही प्रतिकृती आश्चर्यचकित करणारी आधुनिक करामतच म्हटली पाहिजे. कालीमाता ही अंधार दूर करणारी व साक्षात कालस्वरूप मानली जाते. भूतलावरून अनेक जीवजाती नष्टप्राय होत चालल्या आहेत. त्याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने जी जनजागरण मोहीम सुरू होती तिची सांगता अमेरिकेत एका विशेष प्रकारे झाली. अमेर्केतील एंपायर स्टेट बिल्डिंगचे संपूर्ण भागावर काली मातेचे रूप साकारले होते. संपूर्ण इमारतीवर विद्युत रोषनाई अशाप्रकारे केली होती की, त्यातून काली मातेचे दर्शन होत होते. पर्यावरणाला बाधक आचारविचार, जुन्या चुकीच्या समजुती, चालीरीती, रिवाज, भ्रामक कल्पना, असत्य, अन्याय, शोषण यांचा विनाश करणारी म्हणून कालीमाता  या इमारतीवर प्रगट झाल्याचे दाखवण्याचा या कला काराचा हेतू होता.
आमच्या यॉर्क गावाजवळील मंदीर - सॉरी, मंदीर नाही म्हणायचं, टेंपल म्हणायचं. हे मंदीर/टेंपल कंबरलँड या गावी एका टेकडीवर आहे. आजूबाजूला वृक्षान्चे दाट जंगल आहे. मंदिरासमोर एक बऱ्यापैकी मोठा कार पार्क आहे. समोरच तीन ध्वज आहेत. भारताचा तिरंगा, अमेरिकेचा आणि देवाचा भगवा! या ‘टेंपल’चे नाव हरी टेंपल आहे. हा 'हरी' आपल्या ‘रामकृष्ण हरी’ मधला ‘हरी’ नाही. तर हिंदू अमेरिकन रिलिजीअस इन्स्टिट्यूटमधला ‘हरी’ आहे. ‘हिंदू’ मधला ‘एच’, ‘अमेरिकन’ मधला ‘ए’, ‘रिलिजीअस’ मधला ‘आर’ आणि ‘इन्स्टिट्यूटमधला’ आय, असे एच, ए, आर, आय ही आद्याक्षरे मिळून झालेला ‘हरी’ आहे. असे हे ‘हरी टेंपल’ आहे.
हरी टेंपलची रचना - हरी टेंपल तीन माजली असून खाली बेसमेंटमध्ये प्रसाद वितरण आणि ग्रहण (म्हणजे जेवण ) आणि अतिशय सुसज्ज आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त स्वच्छतागृह, शॉवर घेता येईल असे स्नानगृह, मधल्या माळ्यासारख्या मजल्यावर पादत्राणे ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था असलेली ९’ बाय १३’ क्षेत्रफळाची सर्व भिंतींना खण असलेली खोली, तिला लागून कार्यालय आणि सर्वात वरच्या मजल्यावर १०० फूट बाय ६० फूट क्षेत्रफ़ळाचे मध्ये खांब नसलेले मंदीर/टेंपल आहे. लांबीच्या बाजूत  मधोमध गर्भगृह आहे. गर्भगृहात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या भव्य मूर्ती आहेत. मन्दिरात इतरही अनेक मूर्ती आहेत. कोणाचा कोणताही देव असू देत, इथे त्याची मूर्ती हमखास मिळेल. रुंदीच्या बाजूत असलेल्या मंचाचा उपयोग स्टेजसारखा करतात. भरतनाट्यम, भाषणे, दिवाळी निमित्तचे कार्यक्रम यासाठी स्टेज वापरतात. उत्तम ध्वनिक्षेपणव्यवस्था, प्रकाशव्यवस्था आहे. याच ठिकाणी अभ्यासवर्गही होतात. यात सर्व भारतीय भाषा शिकवण्यासाठीचे नि:शुल्क वर्ग आयोजित असतात. सौ प्राची पेंडसे आणि ऋजुता कर्वे या दोघी मराठीचे वर्ग घेतात. या दोघी स्वत: नोकरी करतात/ ‘वर्किंग वूमन’ आहेत. आपला व्यवसाय/ नोकरी सांभाळून दर रविवारी त्या हा वर्ग घेत असतात. देवदर्शनासाठी हिंदूंनी किंचितही कांकू न करता रविवार हा दिवस आपल्या ख्रिस्ती बांधवांप्रमाणे स्वीकारला आहे. रविवारी ख्रिश्चन चर्चमध्ये जातात, तर भाविक हिंदू देवदर्शनाला मंदिरात येतात. प्रसाद ग्रहण करून म्हणजे भोजन करूनच घरी जातात. कारण देवदर्शनातच अर्धा रविवार तरी जातोच. ३०/४० मैल अंतर पार करून कुटुंब कार चालवीत आलेले असते.
मंदिरातील अभ्यासवर्ग -- श्री विजय वरदराजन हे आयआयटी मुंबईहून इन्जिनिअरिंगची पदवी आणि पुढील गुणवत्ता अमेरिकेत हस्तगत करून स्थायिक झालेले गृहस्थ स्पर्धा परीक्षासाठींचे वर्ग नि:शुल्क घेत असतात. मंदिराची ‘वर्गणी’ वार्षिक चाळीस डॉलर इतकी आहे. आम्ही मंदिरात गेलो तेव्हा एका मंडलात बसलेले भाविक गीतापठण  आणि गीतेवर चर्चा करीत बसले होते. दाक्षिणात्य आणि हिंदी भाषिक लोक जास्त भाविक वाटले. मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचा एक हिस्सा बाहेर काढून त्याचे ‘डेक’ केले होते. डेकवर बाक ठेवलेले होते. वर छत नसल्यामुळे सूर्यप्रकाशाचा आनंद लुटता आला.

मंदिरात देवदर्शनाला आलेले वयस्क भाविक पाश्चात्य पोशाखात, वयस्क महिला साडी किंवा सलवार कमीज परिधान करून तर यापेक्षा वयाने लहान असलेली मुलेमुली तऱ्हेतऱ्हेचे कमी अधिक लांबीरुंदीचे आणि रंगीबेरंगी कपडे घालून येतात.

No comments:

Post a Comment