Monday, June 30, 2014

चांगले प्रशासन केव्हा आणि कसे मिळेल? तारीख: 30 Jun 2014

प्रासंगिक

तारीख: 30 Jun 2014 00:11:14

चांगले प्रशासन केव्हा आणि कसे मिळेल?

मोदी सरकार स्थापन झाले आणि अनेकांना, त्यांच्या अपेक्षा आता ताबडतोब पूर्ण होणार, असे वाटू लागले. आयकर मर्यादा वाढणार, हे कळून अनेक सुखावले असतील. काही निर्णय तातडीने घेतल्यास लगेच त्यांचे परिणाम दिसू लागतात. पण, त्याचबरोबर काही वरकरणी कडू वाटणारे निर्णयसुद्धा नाइलाजाने घ्यावे लागतात. आजार जर जुना असेल, ज्वर अंगात मुरला असेल, तर झटपट उपचार करून गुण येत नाही. ‘पी हळद आणि हो गोरी,’ असे होत नसते. निर्णयांचा परिणाम दिसायला काही वेळ जावा लागतो. तोपर्यंत धीर धरणे गरजेचे असते. रेल्वेची दरवाढ हा तर एक वेगळ्या प्रकारचा निर्णय आहे. अगोदरच महागाईने हैराण केले आहे आणि त्यात ही दरवाढ प्रत्येक क्षेत्रात भाववाढीसाठी कारणीभूत ठरू शकते, याची जाणीव असूनही मोदी सरकारला ही दरवाढ का करावी लागली, ते विचारात घ्यावे लागेल. सवंग लोकप्रियतेच्या मागे लागून आजवर जुन्या शासनाने रेल्वेची दरवाढ केली नाही. रेल्वे तोट्यात चालली आहे. तो दूर करणे आवश्यक झाले होते. त्यातून आता कमी अंतरासाठीची आणि लोकलची दरवाढ अंशत: कमी करून शासनाने आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. पण, ज्याला पर्याय नाही, असे निर्णय घेतले नाही तर काय होते, याचे एक प्रत्ययकारी उदाहरण आपल्यासमोर आहे.
 रेल्वेची(एस टी ची) भाववाढ अपरिहार्य होती. सवंग लोकप्रियतेच्या मागे लागून एसटीची भाववाढ केली नाही आणि एसटी तोट्यात गेली. प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेने कमी अंतरावर प्रवास करणार्‍यांसाठी दरवाढ कमी असावी, हे तत्त्व मान्य केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरची दरवाढ कमी ठेवावी. रेल्वेतून होणार्‍या चोर्‍यांचे प्रमाण थांबवावे. प्रवाशांना चांगल्या सुविधा द्याव्यात. गर्दी कमी होण्यासाठी आणखी गाड्या सोडाव्यात. नवीन रेल्वे मार्ग तयार करावेत. अपघातांचे प्रमाण कमी कसे करता येईल, यावर भर द्यावा, अशा सूचना करण्याचा आपल्याला हक्क नक्कीच आहे. सुधारणेसाठी भाववाढ करावी लागली, तोटा दूर करण्यासाठी भाववाढ करावी लागली, हे जनतेला पटले मात्र पाहिजे. प्रामाणिक प्रयत्नांचा प्रत्यय आला पाहिजे, तरच लोक भाववाढ स्वीकारतील, एरवी नाही. मोदी सरकारकडून अपेक्षा खूप आहेत. त्या सर्व एकदम पूर्ण होणार नाहीत, हे समजावून सांगावे लागेल. जनतेने एकहाती सत्ता दिली आहे. तिचा सदुपयोग होतो आहे असे दिसले, तर जनतेची साथ नक्की मिळेल. योग्य असे संकेत मिळत आहेत. आता बजेट सेशन सुरू होईल. यावेळी जनतेला सरकारची खरी ओळख पटेल, यात शंका नाही.
 सध्या देशामध्ये चांगल्या प्रशासनाची आणि सुशासनाची अपेक्षा सर्वांनाच आहे. गुड गव्हर्नन्स किंवा चांगल्या प्रशासनासाठी एवढे पुरेसे आहे का? याचे उत्तर, नाही, असे आहे. केवळ राज्यकर्ते चांगले असले म्हणजे सुप्रशासन मिळेल असे नाही. राज्यकर्ते म्हणजे कोण? तर ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतचे सर्व जनप्रतिनिधी. हे चांगले असतील, जनतेच्या हिताचा विचार करणारे असतील, तर तेवढ्याने चांगले प्रशासन मिळेलच, असे नाही.
 चांगल्या जनप्रतिनिधींच्या सोबतीला चांगली कार्यपालिकाही आवश्यक असते. कार्यपालिका म्हणजे नक्की कोण? तर अगदी गाव-कोतवालापासून तो राष्ट्रपतीपर्यंतचे सर्व लहानमोठे अधिकारी. हेही चांगले म्हणजे लोकहित जपणारे हवेत. गाव-कोतवाल, तहसीलदार, जिल्हाधिकारी, आयुक्त, संचालक, सचिव आणि प्रधान सचिव यांच्यासारखे अधिकारी अशी ही भलीमोठी शृंखला आहे. हे जर चांगले नसतील, तर केवळ जनप्रतिनिधी चांगले असून चालणार नाही. अर्थात, जनप्रतिनिधींनी मनात आणले, तर त्यांचा वचक कार्यपालिकेकडून चांगला कारभार करून घेऊ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यादृष्टीने पहिले, महत्त्वाचे आणि आश्‍वासक पाऊल टाकले आहे, यात शंका नाही. एका पीएमओ कर्मचार्‍याचा मुलगा परीक्षेत उत्तम प्रकारे यश मिळवतो आणि देशाचा पंतप्रधान त्याचे तोंड गोड करून कौतुक करतो, याने एक वेगळाच संदेश दिला जातो आहे. याचा परिणाम असा होईल की, राज्यकर्ते आणि कार्यपालिका यातील दरी कमी होऊन एक आपलेपणाची भावना निर्माण होईल. याचा परिणाम कार्यपालिकेचे मनोबल आणि सहकार्य वाढण्यात नक्कीच होईल. आपल्या कार्यपालिकेला एक गौरवशाली परंपरा आहे. अर्थतज्ज्ञ कै. चिंतामणराव देशमुख, कार्यपालिकेचे मुकुटमणी शोभावेत, अशी त्यांची कारकीर्द होती. अनेक चांगले अधिकारी आजही आहेत.
 पण, या दोन घटकांच्या बाबतीत समाधानकारक स्थिती असली, तरी तेवढ्यानेच सर्व साध्य होईल, असे नाही. या दोन बाबी जरी साध्य झाल्या म्हणजे लोकप्रतिनिधी चांगले असतील आणि कार्यपालिका सचोटीने वागणारी आणि कर्तव्यदक्ष असेल, तरी लोकहित जपले जाईल, याची शंभर टक्के हमी देता येईल, असे नाही. राज्यपाल, लोकायुक्त, न्यायपालिका, निवडणूक आयोग, महालेखा नियंत्रक, लोकसेवा आयोग, पोलिस, गुन्हे अन्वेषण विभाग, आयकर विभाग, अन्यान्य नियामक मंडळे या सर्वांची दानतही लोकशाही मूल्यांची बूज असलेली असली पाहिजे/मूल्ये जपणारी असली पाहिजे. या प्रत्येक घटकाची सध्याची अवस्था पाहिली, तर प्रत्येकाच्या कारवाया आणि कारनामे हा प्रत्येकी एकेका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल! सरसकट सर्वांना दोष देणे अर्थातच योग्य आणि सत्याला धरून होणार नाही, हे खरे आणि तोच आशेचा किरण आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रारंभीच्या पंचेवीस/तीस वर्षांत तर यापैकी बहुतेकांनी एक गौरवशाली परंपरेचा शुभारंभ केला होता. आजही सचोटीचा आणि कार्यक्षमतेचा मापदंड ठरू शकतील, अशा व्यक्ती प्रत्येक ठिकाणी आढळून येतात. अशा व्यक्ती लोकांच्या आदराला कशा प्रकारे पात्र ठरतात, याची उदाहरणेही काही नवीन नाहीत.
 तिसरे असे की, कोणत्याही प्रकारचा रीमोट कंट्रोल नसावा. या पूर्वीच्या शासनाचा उल्लेख केवळ विषय स्पष्ट होण्यापुरताच करू या. कारण हा विचार काही निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून आपण केलेला नाही. राष्ट्रीय सल्लागार मंडळ वाईट लोकांचे मिळून बनलेले होते, असे नाही. (ही मंडळी निर्णय घेत ते शासनाला मान्य करावे लागत )पण, निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना(शासनाला) नव्हता, वरून निर्णय होत व त्यांच्या सूचनांचे पालन करावे लागत होते आणि परिणामांची जबाबदारी मात्र घ्यावी लागत होती. अशी व्यवस्था योग्य नाही. या व्यवस्थेचा त्रास मंत्रिमंडळाला होत होता. कदाचित आणखी काही दिवसांनी या प्रश्‍नाचे अधिक वस्तुनिष्ठ समीक्षण करता येईल. डॉ. मनमोहनसिंगांचे ‘मौनी सिंग’ होण्यामागचे खरे कारण हे होते.
 अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया प्रांतातील यार्क शहरात काही स्कूल डिस्ट्रिक्ट (शैक्षिक जिल्हा) आहेत. या जिल्ह्यांच्या बजेटच्या प्रती (ई-बजेट पद्धतीने) जिल्ह्यातील प्रत्येक रहिवाशाकडे पाठविण्यात येतात. आपली मते रहिवासी कळवतात. स्कूल डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधी बजेटवर जी चर्चा करतात, तिचे लाईव्ह टेलिकास्ट सादर होत असते. स्कूल डिस्ट्रिक्टची तुलना आपल्या येथील मोठ्या नगराशी किंवा तालुक्याशी करता येईल. पारदर्शी कारभार शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. मध्यंतरी एका स्कूल डिस्ट्रिक्टने फुटबालच्या मैदानात स्कोअर दाखविण्यासाठी काही आधुनिक प्रकारची यंत्रणा बसवण्यास प्रारंभ केला, तेव्हा यासाठी प्रतिनिधी सभेची संमती घेतली आहे का, तसेच या कामासाठी करदात्यांची संमती घेतली आहे का, अशी पृच्छा वृत्तपत्रात पत्रे लिहून नागरिकांनी केली. तेव्हा हा खर्च जनतेने दिलेल्या देणग्यांमधून करीत आहोत, असा खुलासा प्रशासनाने केला. अशी नित्य जागरूक जनता ही सुप्रशासनाची हमी देऊ शकेल.
 यॉर्क, पेन्सिल्व्हानिया, अमेरिका
 - वसंत गणेश काणे

Saturday, June 21, 2014

अमेरिकन गवळी -लोकशाही वार्ता - २१.०६.२०१४ रविवार


यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
अमेरिकेत पाश्‍चराइज्ड दूध मिळते. गॅलनभर दूध सोयीनुसार मॉलमधून घेऊन यायचे आणि ते फ्र ीजमध्ये ठेवून लागेल तसे वापरायचे, अशी पद्धत इथे रूढ आहे. हे दूध पाश्‍चराइज्ड तसेच होमोजीनाइज्ड असते. हे दूध फ्रीजमध्ये ठेवायचे आणि लागेल तसे वापरायचे. ते न तापवता वापरले तरी चालते. तसेच हे दूध कितीही तापवले तरी साय येत नाही किंवा यातील स्निग्ध पदार्थ वेगळे करता येत नाहीत. सौ नीलमने 'रॉ' (निरसं दूध) मिल्क म्हणजे कोणतीही प्रRिया न केलेले दूध मिळू शकेल का, याचा शोध घेण्यास सुरवात केली. इथल्या 'मंडईमध्ये' असं निरसं दूध ती शेतकर्‍याकडून बाजारात जाऊन घेत असे. आणि काय आश्‍चर्य? एक दिवस तिला फेसबुकवर एक जाहिरात दिसली. त्यात दुधाचे सगळे प्रकार (यात 'रॉ' मिल्कही - निरसं दूध - समाविष्ट होतं) घरपोच देण्याचा उल्लेख होता. डिलिव्हरी चार्जेस फक्त चार डॉलर इतकेच(!) होते. एका गॅलनला (साडे चार लिटर) दहा डॉलर असा दर होता. त्यामुळे दर आठवड्याला दूध न घेता दर दोन आठवड्यांनी घेण्याचे ठरविले. हे दूध तापविले की चांगली जाड साय येते. तूप वेगळे खरेदी करण्याची गरज पडत नाही.
पण गवळ्याला एक अभिवचन (डिक्लरेशन ) द्यावे लागते. गाईचे पोषण कशाप्रकारे झाले आहे, त्याबद्दल आश्‍वासन द्यावे लागते.
१. अ) दूध वाढावे, म्हणून गाईला हार्मोनचे इंजेक्शन दिलेले नाही. ब)तिला अँटीबायॉटिक औषधे/ इंजेक्शने दिलेली नाहीत. क) तिने जे गवत किंवा वनस्पती किंवा अन्य प्रकारचे अन्न खाल्ले आहे त्यावर कीटकनाशके फवारलेली नाहीत ड) रासायनिक खाते दिलेल्या गवतावर तिचे पोषण झालेले नाही.
२. तिचे पोषण पूर्णपणे नैसर्गिक अन्नावर झालेले आहे.
३. ती जी एमओ (जेनेटिकली मॉडिफाइड ऑरागॅनिझम) या प्रकारात मोडत नाही.
अशा प्रकारची गाय असेल तर दुधाचा भाव दहा डॉलरला एक गॅलन, असा असतो एरवी तो तीन डॉलरला एक गॅलन असा भाव असतो.
मुद्दा वेगळाच आहे. अमेरिकेतही घरपोच दूध पोचवणारे गवळी आहेत. हे गवळी ट्रकमध्ये कॅन भरभरून दूध आणतात आणि चार डॉलर डिलिव्हरी चार्जेस घेऊन घरोघर दूध पोचवतात ही माझ्यासाठी आश्‍चर्याची गोष्ट होती. म्हणून या 'घरपोच दूध' प्रश्नाकडे साहजिकच माझे लक्ष गेले.
अमेरिकेतील गोपालन आणि गोसंवर्धन
या प्रदेशात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे इथले 'गोठे' वातानुकुलित असतात. इथल्या गाईंना कृत्रिम रीत्या फळवतात. वासरू जन्माला येताच त्याला वेगळे करून बाटलीने दूध पाजून वाढवतात. त्यांना वातानुकुलित खोल्यात वाढवतात. ज्या कालवडी असतात, त्यांना गाई म्हणून वाढवतात. जे खोंड असतात, ते पुरेसे वाढले ही, त्यांची कत्तलखान्यात नेऊन हत्या करतात आणि त्यांच्या मासाचे पावाच्या आकाराचे तुकडे करून ते पॅक करून वातानुकुलित मॉलमध्ये विRीला ठेवतात.
याबाबत एक कथा कानावर आली. एक माणूस गायी पाळत आहे. जन्मलेले वासरू खोंड असेल तर त्याला पुरेसे वाढवून तो त्याला कत्तलखान्यात घेऊन जातो. त्याच्या मासाचे घनाकार तुकडे करून घरी घेऊन येतो. ते भल्यामोठय़ा फ्र ीज मध्ये रचून ठेवतो. रोज एक तुकडा काढून तो ओव्हनमध्ये शिजवतो आणि मिरे मीठ लावून खातो. हा साठा संपतो तोपर्यंत दुसरा खोंड मोठा झालेला असतो. आपल्या सारख्या गोपूजकांच्या आणि गोभक्तांच्या अंगावर शहारे आणणारा हा सर्व प्रकार आहे.
गोपूजक हिंदुस्थान म्हशीचे दूध पितो
एक मात्र नक्की आहे. इथे गोसंवर्धन आणि गोपालन मात्र उत्तम रीत्या होते. पण त्याचे कारण अगदी वेगळे आहे. खोंड कापून भरपूर मांस मिळते. ते चविष्टही असते, असे म्हणतात. या साठीच येथे गायींची निगा राखली जाते. येथे गोपूजन ही संकल्पनाच नाही. गोपूजाकांच्या आपल्या देशात गायींची काय अवस्था आहे, ते आपण पाहतोच आहोत. आपल्या येथे गोपूजन आहे. पण गोपालन आणि गोसंवर्धन याबद्दल न बोललेच बरे. याउलट अमेरिकेत किंवा पाश्‍चात्य देशात गोपालन आणि गोसंवर्धन उत्तम आहे पण गाई विषयी उत्तम दूध आणि भरपूर मांस देणारा प्राणी या व्यतिरिक्त दुसरा भाव नाही. आणखीही एक विरोधाभास आहे. गोपूजन करणारा हिंदुस्थान म्हशीचे दूध पितो. गोभक्षण करणारा अमेरिकन गायीचेच दूध पितो.
गायींना भरपूर दूध असते. सर्व दूध यंत्राने काढून घेतात. अगदी थेंब न थेंब काढून घेतात. आपल्या येथे दूध काढल्यानंतर वासरांसाठी दूध राखून ठेवतात. इथे वासरांना बाटलीने दूध पाजून वाढवतात. त्यामुळे वासरांसाठी दूध राखून ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच वासरांना वातानुकुलीत गोठय़ांमध्ये वाढवतात. कारण निदान सहा महिने तरी इथे भरपूर बर्फ पडत असतो. ही थंडी गाईंना किंवा वासरांना मानवत नाही. म्हणून ही व्यवस्था करावी लागते.
नॉनव्हेज,व्हेज आणि विगन
अमेरिकेत विविध प्रकारचे, प्रथा परंपरा जपणारे लोक आढळतात. नॉनव्हेज म्हणजे मांसाहारी हे आपल्याला माहीत आहे. यातही दोन प्रकार आहेत. काहींना बीफ(गोमांस ) चालत नाही. इतर सर्व मांसाहार त्यांना चालतो. काहींना हॅम (डुकराचे मांस) चालत नाही. बाकी सर्व प्रकार चालतात. व्हेजिटेरियन (शाकाहारी) यांना मांसाहार चालत नाही, हे आपल्याला माहीत आहे. पण दूध, दही चालते. आहार पद्धतीनुसार माणसांचा आणखी एक प्रकार इथे आहे. त्यांना 'विगन' असे म्हणतात. यांना दूध सुद्धा चालत नाही. दुधालाही ते मांसाहारच मानतात. प्राण्यापासून मिळालेला कोणताही पदार्थ त्यांच्या दृष्टीने नॉनव्हेजच असतो. अपवाद असतो तो फक्त आईच्या दुधाचा! ही मंडळी वनस्पतीपासून दुधासारखा पदार्थ तयार करून ते दूध म्हणून वापरतात. आपल्या इथे तर आजीबाईच्या उपासाला सुद्धा दूध, दही, ताक, तूप हे प्रकार चालतात. दुधाला मांसाहार समजायचे की शाकाहार हा वादाचा मुद्दा आहे, हा विषय तर्काच्या कसोटीवर न्यायचा म्हटले तर दूध हा मांसाहारच ठरणार नाही का? मात्र तर्काचा आधार आपण अनेकदा घेतच नाही. म्हणून शाकाहारी मंडळींनी श्रीखंड, बासुंदी, रसगुल्ले यावर ताव मारायला हरकत नाही.
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४0 0२२

Friday, June 20, 2014

इराकमधील संघर्ष आणि अमेरिकेची फटफजिती - तभा २०.०६.२०१४

इराकमधील संघर्ष आणि अमेरिकेची फटफजिती
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२ 
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हनिया

इराकमध्ये अमेरिकेच्या भरवशावर जे शासन उभे आहे त्याला पळता भुई थोडी झाली आहे. सद्ध्या इराकमध्ये जे काही घडत आहे, ते अमेरिका आणि इराक या दोन्ही देशांना चकित करणारी बाब आहे. याची करणे दोन आहेत. एक असे की, बंडखोरांना विजयापाठोपाठ विजय मिळत आहेत. दुसरे असे की, इराकी सैन्यातील अनेक सैनिक आणि अधिकारी बंडखोरांना सामील होत आहेत. अमेरिकेचे गुप्तहेर खाते हे जगातील एक सर्वोत्तम गुप्तहेर खाते मानले जाते. आपल्याला मिळणारी गुप्त माहिती अमेरिका बहुतेक सर्ववेळी इराकला उपलब्ध करून देत असते. पण या दोघांनाही पत्ता न लागू देता बंडखोर ज्या प्रकारे आणि ज्या वेगाने आपला जम बसवीत चालले आहेत, त्याचे या दोघांना तसेच जगालाही आश्चर्य वाटणे सहाजिकच म्हटले पाहिजे.
पुळचट नेता काय कामाचा?
इराकचे पंतप्रधान नूरी कमाल अल- मलिकी यांचे अवसान गळाले असून बहुसंख्य शिया संप्रदायाला साथीला घेऊनही अल्पसंख्य असलेल्या सुन्नी संप्रदायाच्या कडव्या बंडखोरांनी त्यांना पुरते जेरीस आणले आहे. आता सर्वत्र बंडखोरांचा वरचष्मा दिसत असून त्याला  नूरी कमाल अल- मलिकी यांचे पुळचट नेतृत्वच सर्वस्वी कारणीभूत आहे. मोसुल हे इराक मधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आणि महत्वाचे शहर आहे. सुन्नी बंडखोरांनी विद्युतवेगी हालचाली करून या शहरावर ताबा मिळवला आणि इराक आणि अमेरिकेबरोबरच जगही आश्चर्यचकित झाले. तेलाच्या खाणी असलेले बायजी यावरही बंडखोरांनी कब्जा मिळवला असून त्यांनी आता बगदादच्या दिशेने वेगाने कूच केले आहे. बगदाद शहरात फार मोठा नरसंहार होत असून सर्वत्र एकच भगदड माजली आहे.
प्रश्नाचे व्यापक स्वरूप
बंडखोरांचे हे यश इराक पुरतेच सीमित राहणार नसून सिरीयन बंडखोरांबरोबर हातमिळवणी करून त्यांनी एक इस्लामिक धर्मांध राज्य निर्माण करण्यात यश प्राप्त केले तर या विभागातील सत्तासंतुलन पार बिघडून जाईल. इराक आणि सीरिया यांच्या सीमारेषेवर निर्माण होणारे हे राज्य कोणालाच नको आहे. त्यात कर्ड तर आहेतच पण त्याचबरोबर तुर्की आणि इराणी लोकांनाही ते नको आहे. इराकच्या उत्तर भागात कर्ड लोक इराकच्या अडचणीचा फायदा घेत तिथल्या तेल विहिरींवर गुपचूप ताबा मिळविण्याच्या कामी आजवर गुंतले होते. आपले स्वतंत्र राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने दुर्बल इराक त्यांना सोयीचा होता. पण बंडखोरांची होत असलेली सरशी त्यांना आपले स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने एक अडसर वाटते आहे. तुर्कस्थानलाही कडवे सुन्नी सत्ताकेंद्र नको आहे. तुर्कस्थानचे लोकांनी फार मोठ्या प्रमाणात पाश्चात्य जीवनशैली स्वीकारली असून आपल्या शेजारी त्यांना कडव्या सुन्नींची सत्ता मुळीच नको आहे. इराण तर बोलूनचालून शिया बहूल देश. काय गंमत आहे पहा! इराक, तुर्कस्थान, इराण तसेच अमेरिका यापैकी कोणालाच इराकी बंडखोरांची सरशी व्हावी असे वाटत नाही. पण अल्पसंख्य असलेले बंडखोर एकामागून एक विजय मिळवत पुढे चालले आहेत. इराण आणि अमेरिका यांच्या मधून आताआता पर्यंत विस्तव जात नव्हता. काळ कुणाचा कसा सूड घेईल, ते सांगता येणार नाही, हेच खरे.
जिहादाचे जागतिक परिमाण
इराक आणि सीरिया यांचे एक कडवे इस्लामिक राज्य व्हावे ही बंडखोरांची भूमिका आहे. त्यांनी अल कायदाला मागे टाकले. दोन तीन वर्षांपूर्वी अमेरिकेने इराकमधून आपल्या फौजा मागे घेतल्या आणि बंडखोरांनी अल कायदाला बाजूला सारीत या भागात आपला जम बसवायला हळूहळू सुरवात केली. भारताच्या दृष्टीने विचार केला तर हे बंडखोर आणि अलकायदा हे सापनाथ आणि नागनाथ यांच्या सारखेच म्हणावे लागतील. त्यांच्यात डावेउजवे करता येणार नाही. या बंडखोरांना वेळीच आवर घातला नाही तर ही सगळ्या जगाचीच डोकेदुखी होऊन बसणार आहे. जिहाद ही आता भारतापुरतीच समस्या उरली नसून ती आता हळूहळू जागतिक समस्या होऊ पाहते आहे.
खेळी उलटली
इराकमधील अमेरिकेची खेळी तिच्यावरच उलटू पाहते आहे. इराक अण्वस्त्रे निर्माण करीत आहे, ही सबब पुढे करून अमेरिकेने सद्दाम हुसेनचा खातमा   केला खरा पण तो बरा होता असे म्हणण्याची वेळ अमेरिकेवर आली नाही, म्हणजे मिळवली. लक्षावधी डॉलर ओतून अमेरिकेने नवी इराकी सेना उभारली  पण ह्या सैन्यातील लहानमोठे अधिकारी सर्व सामग्रीसह बंडखोरांना फितूर झाले. त्यांनी मोसूल जिंकल्यावर तर तिथल्या बँकेतील गडगंज संपत्ती त्यांच्या हाती आयतीच सापडली.
विघटनाच्या वाटेवर इराक आणि अगतिक अमेरिका
आजवर जवळजवळ दहा हजार इराकी लोक या संघर्षात गारद झाले आहेत. इराकी सैन्याचा  भेकडपणा लक्षात आल्यामुळे कर्ड लोकांनी किरकुक शहराचा ताबा घेतला आहे. कारण या भागात तेलाच्या विहिरी आहेत. इराकच्या उत्तर भागात अगोदरच कर्ड लोकांचे प्रभुत्व होते, त्यामुळे त्यांना हे फारसे कठीण गेले नाही. अनेक राजकीय निरीक्षकांना ही इराकच्या विभाजनाची नांदी वाटते आहे. या सर्व बाबी इराक पुरत्याच सीमित राहिल्या असत्या तरी एकवेळ चालले असते. पण याचा परिणाम अमेरिकेत ओबामा यांना भोगावा लागतो आहे. ओबामांनी इराकमधून सर्वच सैन्य काढून घ्यायला नको होते. सैन्य काढून घेण्याची मागणी खुद्द इराकनेच केली होती, हे खरे. पण वर्षाभरातच इराकने कोलांटीउडी मारली आणि मदतीची मागणी केली. अमेरिकेनेही अगदी सर्व प्रकारची मदत देऊ केली. इराकचे पंतप्रधान मलिकीनी अमेरिकेनेच हवाई हल्ले करावेत, अशीही गळ  घातली. तीही अमेरिकेने मान्य केली आणि आणखी मदत हवी असेल तर तीही देऊ केली,शास्त्रे दिली पैसाही ओतला. अशाप्रकारे आता अमेरिका या संघर्षात अधिकाधिक गुंतत चालली आहे. असेच जर करावयाचे होते तर अमेरिकेने आपले सैन्य इराकमधून मुळात काढूनच का घेतले, अशी टीका अमेरिकेत ओबामा यांच्यावर होऊ लागली आहे. मलिकी याच्या रूपाने इराकमध्ये एक बाहुले उभे करणे, हे ओबामा यांचे फार मोठे अपयश मानले जात आहे. धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी अमेरिकेची स्थिती झाली आहे. आता आणखी अमेरिकन रक्त इराकच्या रणभूमीवर सांडले जावे, याला अमेरिकेत सक्त विरोध आहे. त्यामुळे हवाई हल्ले करून काही कार्यभाग साधतो का असा विचार ओबामा प्रशासनाने केला आहे. पण आकाशातून केलेले हल्ले परिणामकारक ठरत नाहीत आणि शस्त्रे स्वत: लढत नसतात. ती धारण करणारे इराकी सैन्य नादान, कमकुवत, कुचकामी आणि बेभरवशाचे झाले आहे.
ओबामा यांच्यावर टीकेचा भडिमार
इकडे अमेरिकेत ओबामा यांच्यावर टीकेचा भडिमार सुरु आहे. मलिकी सारख्या नादान, पळपुट्या आणि नालायक नेत्याचा भरवसा धरून ओबामा यांनी काय साधले असा प्रश्न जो तो विचारत सुटला आहे. इराक मध्ये उभा राहायला हवा आहे नवीन कणखर नेता की जो सैन्यात नवीन जोश निर्माण करील, जो सर्व समावेशक असेल, जो कडव्या सुन्नींना नेस्तनाबूत करू शकेल, जो इराकची विस्कटलेली आर्थिक घडी नीट मार्गाला लावील. पण आता वेळ गेल्यातच जमा झाली आहे. पैसा, शस्त्रे आणि रडतराउत घोड्यावर बसवून परदेशात नेते उभे करता येत नाहीत की आंतरराष्ट्रीय राजकारण साधता येत नाही. त्यातून हा काही अमेरिकेचा पहिलाच अनुभव नाही, तसाच तो ओबामा यांचाही पहिलाच अनुभव नाही. अमेरिकन रक्त सांडले, पैशापरी पैसा गेला, शस्त्रे तर नेमकी शत्रूच्याच हाती पडली. आणखी नाचक्की ती कोणती? अशी अमेरिकेची पुरती फटफजिती झाली आहे.       


Wednesday, June 18, 2014

अफगाणिस्तानमधील निवडणूक - लोकशाही वार्ता दी.१९ जून २०१४

अफगाणिस्थानमधील निवडणूक
तालिबान्यांचा पाडाव झाल्यानंतर सध्या अफगाणिस्थानमध्ये अध्यक्षपदाची तिसरी निवडणूक होत आहे. पहिल्या दोन निवडणुकीत हमीद करझई निवडून आले होते. अफगाणिस्थानच्या घटनेनुसार त्यांना तिसर्‍यांदा निवडणूक लढवता येणार नाही. याचा अर्थ असा की, या देशात या निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच शांततामय मार्गाने सत्तांतर होऊ घातले आहे. 
मावळते अध्यक्ष हमीद करझई
पहिल्यांदा करझई यांना असेंब्लीने अध्यक्षपदी नेमले होते. नंतर सलग दोनदा ते अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. आता अध्यक्षपदी नवीन व्यक्ती निवडून येणार असल्यामुळे 'नवी विटी नवे राज्य' या न्यायाने अफगाणिस्थानच्या राजकारणात काहीना काही बदल होतीलच यात शंका नाही. पण देशाच्या राजकारणाला एकदम नाट्यमय वळण लागेल, अशी शक्यता दिसत नाही. कारण एकतर करझई यांचे बंधू निवडून येतील किंवा निवडून येणारी व्यक्ती त्यांच्या आजवरच्या सहकार्‍यांपैकी असेल.पण करझई खर्‍या अर्थाने नवृत्त होतील, असे कुणालाही वाटत नाही.कारण त्यांचे निवासस्थान नवीन अध्यक्षांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर राहणार आहे. आतापयर्ंत ही वास्तू संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताब्यात होती. तिची आता डागडुजी सुरू असून ती माजी राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान होणार आहे.याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. ते आणि नवीन अध्यक्ष सतत एकमेकांच्या संपर्कात राहू शकतील किंवा नवीन अध्यक्षांना त्यांचा हस्तक्षेप सहन करावा लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने पाहता दोघांना वेगवेगळी सुरक्षा द्यावी लागणार नाही, हे जसे खरे आहे तसेच हेही खरे आहे की, हल्लेखोरांना हल्यासाठीच्या दोन्ही इमारती जवळजवळच सापडतील. तालिबान्यांचे पहिले लक्ष्य अध्यक्ष हेच असतील, हे सांगावयास नको. अध्यक्षाइतकीच सुरक्षा व्यवस्था आपल्यालाही असावी हा करझई यांचा हेतू आहेच.तसेच निवडून येणारा नवीन अध्यक्ष आपल्या तंत्राने चालणारा असावा, अशीही त्यांची सुप्त इच्छा आहे, असे मानले जाते. ऐषआरामात उर्वरित आयुष्य व्यतित करावे, असे त्यांना सुचविण्यात आलेही होते. पण त्यांनी हा प्रस्ताव नाकारला, असे म्हणतात. करझई ज्या प्रदेशातून आले आहेत, त्या प्रदेशातील राजकारण्यांना नैसर्गिक मृत्यू क्वचितच येतो. बहुदा त्यांचा खूनच होत असतो/ हत्याच होत असते. या मंडळींनी हे वास्तव गृहितही धरलेले असते.

परकीय फौजा निघून गेल्यावर काय होणार?
आणखीही एक मुद्दा विचारात घ्यावयास हवा. अफगाणिस्थानमधून परकीय फौजा २0१४ अखेर निघून जातील. अफगाणिस्थानचे सैनिक आणि सैन्य यांचीच सुरक्षा नवीन आणि माजी अध्यक्षांना मिळू शकेल. करझई यांनी अर्ज, विनंत्या,विनवण्या केल्या तरच आणि तसा तह अमेरिकेशी केला तरच काही अमेरिकन सैनिक स्थानिक सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी किंवा उरलेल्या उग्रवाद्यांना हुडकून काढण्यासाठी अशांत प्रदेशात राहतील. तह करण्याचा करझई यांचा इरादा नाही.त्यांना अमेरिकेकडून मदत आणि सवलतीच तेवढ्या हव्या आहेत, अशी बातमी बाहेर येते आहे. बाहेरच्या शक्तींकडून प्रत्यक्ष साह्य मिळाले नाही तर काय होते, याची कल्पना करझई यांना नाही, असे म्हणता येणार नाही. १९९२ साली रशियन फौजा अफगाणिस्थानमधून बाहेर पडल्या आणि रशियाच्या पाठिंब्याच्या भरवशावर असलेले सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कसे कोसळले हे करझई विसरले असतील, हे शक्यच नाही. याचे आणखीही एक कारण होते. देशाचे अर्थकारणही डबघाईला आले होते. सैनिकांचे अनेक महिन्यांचे पगार थकले होते, हेही एक महत्त्वाचे कारण होते.

भारताची भूमिका काय राहणार?
अशा परिस्थितीत करझई भारताकडे सहकार्यासाठी विनंती करू शकतात. अफगाणिस्थानच्या नवीन उभारणीच्या कार्यात भारताचे मोलाचे सहकार्य सध्या अफगाणिस्थानला लाभले आहे. त्याला आर्थिक मदतीची जोड द्यावी लागेल. पण अफगाणिस्थानच्या संरक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष सहकार्य करण्याचे भारताने ठरवले तर भारताच्या परराष्ट्र धोरणातला तो एक मोठा बदल असेल. मोदी सरकार हे पाऊल उचलील काय? असे पाउल सरकारने उचलावे काय? असे केले तर एक मोठा धोका असा आहे की, तालिबानी आणि त्यांचे पोशिंदे यांच्याशी भारताचा प्रत्यक्ष संघर्ष सुरु होईल. खुद्द भारतात विशेषत: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उपद्रव वाढेल. या प्रश्नाला दुसरीही एक बाजू आहे. तालिबानी, दहशतवादी आणि त्यांचे पोशिंदे यांच्याशी जर संघर्ष अपरिहार्यच असेल तर तो भारताच्या सीमेबाहेर आणि त्यांच्या उगमस्थानी किंवा उगमस्थानाच्या जास्तीतजास्त जवळच व्हावा, हे चांगले. इंटरनेटमुळे मध्यपूर्वेतील तरूण पिढी जागृत होत आहे. धमार्ंध शक्तींचा त्यांच्यावरील प्रभाव ओहटीला लागला आहे, असे म्हणतात. असे असेल तर धमार्ंध शक्ती जगभरच दुर्बल होत जातील. असे असेल तर भारतीय सहकार्याचे अफगाणिस्थानातच नव्हे तर बाहेरही स्वागतच होईल, अशी आशा आणि अपेक्षा बाळगण्यास हरकत नसावी. भारतात झालेल्या सत्तांतराचे भारताबाहेरही स्वागत झाले निदान त्या विषयी कुतहल निर्माण झाले आहेच.

सत्तांतर सनदशीर मार्गाने होईल काय?
अफगाणिस्थानमध्ये सत्तांतर कसे घडून येते, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ते शांततेच्या आणि निवडणुकीच्या माध्यमाने घडून यावे. तसे ते घडून येईल, अशी आशा आणि अपेक्षा बाळगण्यास सध्या तरी हरकत दिसत नाही. निवडणुकीच्या रिंगणात सुरवातीला अकरा उमेदवार होते. पाच एप्रिलला झालेल्या निवडणुकीत पहिले दोन उमेदवार ठरले डॉ अब्दुल्ला आणि अर्शफ घनी अमदझई. अफगाणिस्थानमधील निवडणूक पद्धती फ्रान्स देशातील निवडणूक पद्धतीशी मिळतीजुळती आहे. उरलेले उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणातून बाद झाले आहेत. डॉ अब्दुल्ला हे व्यवसायाने नेत्रशल्यविशारद आहेत. ते जुन्या सरकारात परराष्ट्रमंत्री होते. तर अर्शफ घनी अमदझई हे अर्थशास्त्रातील तज्ज्ञ असून त्यांनी जागतिक बँकेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.डॉ अब्दुल्ला हे पहिल्या फेरीत ५0 टक्क्याहून जास्त मते मिळवून विजयी झाले नसले तरी ते अपेक्षेप्रमाणे सर्वात जास्त मते मिळविणारे उमेदवार ठरले आहेत. त्यांना ४५ टक्के मते मिळाली आहेत. तर घनी यांना ३१.५ टक्के. सत्तर लाख लोकांनी मतदान केले.यात ३८ टक्के महिला आणि ६२ टक्के पुरुष होते.निवडणुकीवर अपेक्षेप्रमाणे हिंसाचाराचे सावट होतेच. ५0 ठार आणि शेकडो जखमी असा अंदाज आहे. डबघाईला आलेली आणि विस्कटलेली आर्थिक घडी, भ्रष्टाचार आणि अराजक असतांना हे मतदान घडून आले आहे.मतदानात गैरप्रकार झाल्याचे आरोप सगळेच उमेदवार करीत आहेत. १४ जूनला पार पडलेल्या दुसर्‍या फेरीत हिंसाचाराचे प्रमाण कमी होते पण मतदारांचा उत्साहही ओसरला होता. नुकताच डॉ अब्दुल्ला यांचेवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. २२ जुलाईलाच अंतिम निकाल हाती येईल.डॉ अब्दुल्ला हेच विजयी होतील, असे नक्की सांगता येत नाही. कारण पहिल्या फेरीत बाद झालेल्या नऊ उमेदवारांना मतदान करणारे मतदार दुसर्‍या फेरीत मतदान करताना या दोन उमेदवारांपैकी कोणाच्या पारड्यात आपली मते टाकतील हे सांगता येत नाही.
            अफगाणिस्थानमधील जनतेत लोकशाहीची बीजे रुजल्यासारखी वाटावीत, असे या निवडणुकीवरून वाटावे, अशी स्थिती नक्कीच आहे. हा देश जगातला अफू पिकवणारा एक प्रमुख देश मानला जातो. तो तालिबानी बंडखोरांच्या त्याचप्रमाणेच अफूच्याही मगरमिठीतून बाहेर येऊ शकला तर ते संपूर्ण जगाचे दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. निदान प्रारंभ तर चांगला झाला आहे. त्यामुळे आशावादी असायला हरकत नाही.
' वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ , नागपूर ४४0 0२२

Saturday, June 14, 2014

YORK - PENNSYLVANIA 16.06.2014 lOKSHAHIVARTA


            अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील यॉर्क काउंटी मध्ये(काउंटी म्हणजे जिल्हा) वसलेले हे त्याच नावाचे एक टुमदार शहर आहे. हे शहर 'व्हाईट रोज सिटी' या नावाने प्रसिद्ध आहे. हाऊस(सभागृह) ऑफ यॉर्क वर पांढर्‍या गुलाबाचे चिन्ह आहे. त्यावरून'व्हाईट रोज सिटी' हे नाव पडले, असे ऐकले. संमिर्श लोकसंख्या असलेले यॉर्क हे शहर मुख्यत: र्जमन लोकांनी वसवलेले आहे. मुख्य शहर आणि उपनगरे यांची मिळून या शहराची लोकसंख्या दहा लक्षापेक्षा जास्त आहे. ही अमेरिकेची पहिली राजधानी आहे. अमेरिकेच्या आजच्या राज्यघटनेचे लेखन या शहरात झाले आहे, असे या शहराचे ऐतिहासिक महत्त्व आहे पण, अनेकांचा पहिल्या राजधानीचा मान या शहराला द्यायला विरोध आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, ज्यावेळेला हे घडले त्यावेळी संयुक्त राज्य (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) अस्तित्वातच आले नव्हते. तर मग यॉर्क ही त्याची राजधानी कशी म्हणायची? आपण या वादात पडूया नको. राज्य घटनेच्या लेखनाची धुरा जेफरसन यांनी सांभाळली होती या कामात बेन्जामिनफ्रँन्क्लीन यांचाही मोलाचा सहभाग होता.
अमेरिका राष्ट्र या नात्याने लहान वयाचे आहे. त्यामुळे येथील प्रत्येक गाव कोणत्या ना कोणत्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच या राष्ट्राच्या उभारणीच्या कामात अनेकांचे महत्त्वाचे योगदान असते तसेच याची बहुतेकांना आदरयुक्त जाणीव असते. पण याची कायमस्वरूपी आठवण असावी म्हणून आपल्याप्रमाणे प्रात:स्मरण असावे, असे वाटते. एका अमेरिकन बुध कौशिक ऋषीने या देशात जन्म घ्यावा आणि त्याने असे प्रात:स्मरण रचावे, असे वाटून गेले. अशी या भूमीची आणि इथल्या व्यक्तींची महती नक्कीच आहे. असो.
यॉर्क शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. यापैकी मला तीन स्थळे विशेष महत्त्वाची वाटली शू हाउस, यार्क सिटी एरिना आणि यॉर्क सेन्ट्रल मार्केट ही तीन मला विशेष महत्त्वाची वाटली. अर्थात व्यक्तिपरत्वे आवडीनिवडी बदलणारच .
                                               'शू हाऊस' एक अफलातून कल्पना
जोड्याच्या आकाराचे 'शू हाऊस' ही एक अजब कमाल आहे. याची रचना करणारा एक अवलियाच म्हटला पाहिजे. याची बांधणी कर्नल मालोन हेन्स याने केली आहे. याचा पादत्राणे तयार करण्याचा व्यवसाय होता. माणूस हाडाचा 'बेपारी' होता. या व्यवसायातला तो बादशहा (विझार्ड) मानला जातो. निरनिराळ्या ठिकाणी त्याची चाळीस दुकानांची मालिका होती. आपली आणि आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी व्हावी म्हणून त्याने चक्क जोड्याच्या आकारचे 'शू हाउस' बांधले आहे. ४८ फूट लांब, १७ फूट रुंद आणि २५ फूट उंचीचे हे पादत्राणगृह हेन्सने १९४८ साली बांधले. बांधकामात लाकडाचा उपयोग मुख्यत: करण्यात आला असून आवश्यक तिथे तारा आणि सिमेंटचा वापर मजबुतीसाठी केला आहे. यात तीन बेड रूम्स, दोन बाथ रूम्स एक किचन आणि लिव्हिंग रूम आहे.
           सुरवातीला हेन्स वयस्कर दाम्पत्याला या 'गेस्ट हाउसमध्ये' रहायला बोलवी. त्यांची राजेशाही बडदास्त ठेवी. जाताना त्यांना कपडेलत्ते देऊन त्यांची बोळवण करी. पुढे तो हे 'गेस्ट हाउस' मधुचंद्राला येणार्‍या जोडप्यांना देऊ लागला. हेन्सच्या आरोग्यविषयक सवयी वाखाणण्यासारख्या होत्या. तो स्वत: निर्व्यसनी तर होताच पण धुम्रपानविरोधी मोहीम सुरू होण्या अगोदारपासूनच त्याचा धुम्रपानाला विरोध होता. रस्त्याने कोणी सिगरेट ओढत जाताना दिसला तर तो त्याच्या तोंडातील सिगरेट काढून घेई. त्याने सिगरेट पिणे सोडल्यास त्याला पैसे देऊ करी. त्याने जसा भरभरून पैसा मिळवला तसाच तो वाटून टाकला. 'मी या जगात निष्कांचन अवस्थेत जन्माला आलो आहे, निष्कांचन अवस्थेतच जगाचा निरोप घेईन', असे तो म्हणत असे. हे ऐकले की, 'मुठ्ठी बांधके आयेहो,(मूल जन्माला येत तेव्हा त्याच्या मुठी आवळलेल्या असतात), हाथ पसारे जाओगे', या (बहुदा) महात्मा कबीराच्या दोह्यातील पंक्तीची आठवण होते. असो. आज हे 'शू हाऊस' एक पर्यटन स्थळ झाले आहे.
                                     यॉर्क सिटी एरिना
यॉर्क शहरातील हे दुसरे एक महत्त्वाचे आणि कल्पकतेने उभारलेले स्थान आहे. इथे वर्षाचा बहुतेक काळ हा सर्व भूभाग बर्फाने झाकलेला असतो. स्केटिंग आणि बर्फावरची हॉकी हे खेळ या निमित्ताने खेळले जातात. निसर्गाच्या प्रतिकूलतेला अनुकूलतेत परिवर्तित करण्याच्या अमेरिकन लोकांच्या गुणाला आणि वृत्तीला दाद दिली पाहिजे, असे वाटते. अर्थात याला पर्यायही नाही, हेही खरे आहे .
                                          यॉर्क सेन्ट्रल मार्केट
यॉर्क सेन्ट्रल मार्केट ही योजना ग्राहकांसाठी तसेच शेतकर्‍यांसाठीही खूपच महत्त्वाची आहे. तशीच ती अनुकरणीयही आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये कोणताही मध्यस्त न ठेवता सरळ आणि प्रत्यक्ष संबंध निर्माण करण्यासाठीची ही योजना आहे. आपल्या नागपुरातील कॉटन मार्केटच्या दसपट आकाराची भलीमोठी आणि भरपूर उंचीची ही इमारत आहे. मधोमध हिंडण्यासाठी जागा असलेली लंबवतरुळाकृती टेबले मांडलेली रचना आपण पाहिलेली आहे. अशी रचना करून साधारणपणे संस्थेच्या कार्यकारिणीच्या सभा घेण्याची पद्धतीही आपल्या परिचयाची आहे. योग्य अंतर ठेवून असे शंभरावर गट मांडलेले असतात. एका गटात दहा ते पंधरा टेबले असतात. आतमध्ये विRेत्या महिला उभ्या असतात. टेबलांवर टोपल्यांमध्ये भाज्या ठेवलेल्या असतात. गिर्‍हाइक बाहेरच्या बाजूने येऊन भाजी निवडतात. भाजी निवडून झाली की ती आतमध्ये उभ्या असलेल्या विRेतीजवळ द्यायची. ती भाजी पिशवीत भरून विRेती तिचे वजन करते आणि किंमत सांगते. तेवढी रक्कम देऊन ती भाजी विकत घ्यायची, अशी विRीची पद्धती असते. सेन्ट्रल यॉर्क मार्केट मध्ये फक्त दर शुRवारी हा बाजार भरतो. आठवड्याच्या प्रत्येक वारी प्रत्येक भागात असा बाजार भरतो. भाजी/धान्य पिकवणारे आणि ग्राहक यांचा प्रत्यक्ष संबंध अशाप्रकारे येत असतो. या पद्धतीत मध्यस्त पूर्णपणे वगळला जातो. अशी पद्धती काही फेरफार करून आपल्या इथे राबवता येऊ शकते. आपल्या येथे भाजांचे भाव जेव्हा वाढतात, तेव्हा फायदा दलालांचाच होत असतो. वाढलेल्या किमतीचा लाभ ग्राहकांना फारसा मिळतच नाही. आमदार/खासदार निधीतून अशा इमारती बांधता येतील आणि शेतमाल विकणार्‍यांची सोय करता येईल. पण कुणीतरी हे मनावर घ्यावयास हवे आहे. आपल्या इथली हीच प्रमुख अडचण आहे.

वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४0 0२२

Thursday, June 5, 2014

My Trip to America - York - First Capital of America

मु.पो.– यॉर्क, अमेरिकेची पहिली राजधानी
माझी अमेरिका वारी
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२ 
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हनिया  
अमेरिकेतील पेन्सिलव्हनिया प्रांतातील यॉर्क काउंटी मध्ये(काउंटी म्हणजे जिल्हा) वसलेले हे त्याच नावाचे  एक टुमदार शहर आहे. हे शहर ‘व्हाईट रोज सिटी’ या नावाने प्रसिद्ध आहे. हाऊस (सभागृह) यॉर्क वर पांढऱ्या गुलाबाचे चिन्ह आहे, त्यावरून ‘व्हाईट रोज सिटी’ हे नाव पडले, असे ऐकले. संमिश्र लोकसंख्या असलेले यॉर्क हे शहर मुख्यत: जर्मन लोकांनी वसवलेले आहे. मुख्य शहर आणि उपनगरे यांची मिळून या शहराची लोकसंख्या दहा लक्षापेक्षा जास्त आहे. ही अमेरिकेची पहिली राजधानी आहे. अमेरिकेच्या आजच्या राज्यघटनेचे लेखन या शहरात झाले आहे,असे या शहराचे ऐतिहासिक महत्व आहे. पण अनेकांचा पहिल्या राजधानीचा मान या शहराला द्यायला विरोध आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, ज्यावेळेला हे घडले त्यावेळी संयुक्त राज्य (युनायटेड स्टेट्स फ अमेरिका) अस्तित्वातच आले नव्हते. तर मग यॉर्क ही त्याची राजधानी कशी म्हणायची? आपण या वादात पडूया नको. राज्य घटनेच्या लेखनाची धुरा जेफरसन यांनी सांभाळली होती या कामात बेन्जामिन फ्रन्क्लीन यांचाही मोलाचा सहभाग होता.
अमेरिका राष्ट्र या नात्याने लहान वयाचे आहे. त्यामुळे येथील प्रत्येक गाव कोणत्या ना कोणत्या दृष्टीने महत्वाचे आहे. तसेच या राष्ट्राच्या उभारणीच्या कामात अनेकांचे महत्वाचे योगदान असते तसेच याची बहुतेकांना आदरयुक्त जाणीव असते. पण याची कायमस्वरूपी आठवण असावी म्हणून आपल्याप्रमाणे प्रात:स्मरण असावे, असे वाटते. एका अमेरिकन बुध कौशिक ऋषीने  या देशात जन्म घ्यावा आणि त्याने असे प्रात:स्मरण रचावे, असे वाटून गेले. अशी या भूमीची आणि इथल्या व्यक्तींची महती नक्कीच आहे.असो.
यॉर्क शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. यापैकी मला तीन स्थळे विशेष महत्वाची वाटली शू हाउस, यार्क सिटी एरिना  आणि यॉर्क सेन्ट्रल मार्केट ही तीन मला विशेष महत्वाची वाटली. अर्थात व्यक्तिपरत्वे आवडीनिवडी बदलणारच .  
‘शू हाउस’ एक अफलातून  कल्पना
जोड्याच्या आकाराचे ‘शू हाउस’ ही एक अजब कमाल आहे. याची रचना करणारा एक अवलियाच म्हटला पाहिजे. याची बांधणी कर्नल मालोन हेन्स याने केली आहे. याचा पादत्राणे तयार करण्याचा व्यवसाय होता. माणूस हाडाचा ‘बेपारी’ होता. या व्यवसायातला तो बादशहा (विझार्ड) मानला जातो. निरनिराळ्या ठिकाणी त्याची चाळीस दुकानांची मालिका होती. आपली आणि आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी व्हावी म्हणून त्याने  चक्क जोड्याच्या आकारचे ‘शू हाउस’ बांधले आहे. ४८ फूट लांब, १७ फूट रुंद आणि २५ फूट उंचीचे हे पादत्राणगृह हेन्सने १९४८ साली बांधले. बांधकामात लाकडाचा उपयोग मुख्यत: करण्यात आला असून आवश्यक तिथे तारा आणि सिमेंटचा वापर मजबुतीसाठी केला आहे. यात तीन बेड रूम्स, दोन बाथ रूम्स एक किचन आणि लिव्हिंग रूम आहे..
सुरवातीला हेन्स वयस्कर दाम्पत्याला या ‘गेस्ट हाउसमध्ये’ रहायला बोलवी. त्यांची राजेशाही बडदास्त ठेवी. जातांना त्यांना कपडेलत्ते देऊन त्यांची बोळवण करी. पुढे तो हे ‘गेस्ट हाउस’ मधुचंद्राला येणाऱ्या जोडप्यांना देऊ लागला. हेन्सच्या आरोग्यविषयक सवयी वाखाणण्यासारख्या होत्या. तो स्वत: निर्व्यसनी तर होताच पण धुम्रपानविरोधी मोहीम सुरु होण्या अगोदारपासूनच त्याचा धुम्रपानाला विरोध होता. रस्त्याने  कोणी सिगरेट ओढत जाताना दिसला तर तो त्याच्या तोंडातील सिगरेट काढून घेई. त्याने सिगरेट पिणे सोडल्यास त्याला पैसे देऊ करी. त्याने जसा भरभरून पैसा मिळवला तसाच तो वाटून टाकला. ‘मी या जगात निष्कांचन अवस्थेत जन्माला आलो आहे, निष्कांचन अवस्थेतच जगाचा निरोप घेईन’, असे तो म्हणत असे. हे ऐकले की, ‘मुठ्ठी बांधके आये हो,(मूल जन्माला येत तेव्हा त्याच्या मुठी आवळलेल्या असतात), हाथ पसारे जावोगे’, या (बहुदा) महात्मा  कबीराच्या दोह्यातील पंक्तीची आठवण होते.असो. आज हे ‘शू हाऊस’ एक पर्यटन स्थळ झाले आहे.
 यॉर्क सिटी एरिना
यॉर्क शहरातील हे दुसरे एक महत्वाचे आणि कल्पकतेने उभारलेले स्थान आहे. इथे वर्षाचा बहुतेक काळ हा सर्व भूभाग बर्फाने झाकलेला  असतो. स्केटिंग आणि बर्फावरची हॉकी हे खेळ या निमित्ताने खेळले जातात. निसर्गाच्या प्रतिकूलतेला अनुकूलतेत परिवर्तित करण्याच्या अमेरिकन लोकांच्या गुणाला आणि वृत्तीला दाद दिली पाहिजे, असे वाटते. अर्थात याला पर्यायही नाही, हेही खरे आहे .
 यॉर्क सेन्ट्रल मार्केट
यॉर्क सेन्ट्रल मार्केट ही योजना ग्राहकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठीही खूपच महत्वाची आहे. तशीच ती  अनुकरणीयही आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये कोणताही मध्यस्त न ठेवता सरळ आणि प्रत्यक्ष संबंध निर्माण करण्यासाठीची ही योजना आहे. आपल्या नागपुरातील टन मार्केटच्या दसपट आकाराची भलीमोठी आणि भरपूर उंचीची ही इमारत आहे. मधोमध हिंडण्यासाठी जागा असलेली लंबवर्तुळाकृती टेबले मांडलेली रचना आपण पाहिलेली आहे. अशी रचना करून साधारणपणे संस्थेच्या कार्यकारिणीच्या सभा घेण्याची पद्धतीही  आपल्या परिचयाची आहे. योग्य अंतर ठेवून अशी शंभरावर  गट मांडलेले असतात. एका गटात दहा  ते पंधरा टेबले असतात. आतमध्ये विक्रेत्या महिला उभ्या असतात. टेबलांवर टोपल्यांमध्ये भाज्या ठेवलेल्या असतात. गिऱ्हाइक बाहेरच्या बाजूने येऊन भाजी निवडतात. भाजी निवडून झाली की ती आतमध्ये उभ्या असलेल्या विक्रेतीजवळ द्यायची. ती भाजी पिशवीत भरून विक्रेती तिचे वजन करते आणि किंमत सांगते. तेवढी रक्कम देऊन ती भाजी विकत घ्यायची, अशी विक्रीची पद्धती असते. सेन्ट्रल यॉर्क मार्केट मध्ये फक्त दर शुक्रवारी हा बाजार भरतो. आठवड्याच्या प्रत्येक वारी प्रत्येक भागात असा बाजार भरतो. भाजी/धान्य  पिकवणारे आणि ग्राहक यांचा प्रत्यक्ष  संबंध अशाप्रकारे येत असतो. या पद्धतीत मध्यस्त पूर्णपणे वगळला जातो. अशी पद्धती काही फेरफार करून आपल्या इथे राबवता येऊ शकते. आपल्या येथे भाज्यांचे भाव जेव्हा वाढतात, तेव्हा फायदा द्लालांचाच होत असतो. वाढलेल्या किमतीचा लाभ ग्राहकांना फारसा मिळतच नाही. आमदार / खासदार निधीतून अशा इमारती बांधता येतील आणि शेतमाल विकणाऱ्यांची सोय करता येईल. पण कुणीतरी हे मनावर घ्यावयास हवे आहे. आपल्या इथली हीच प्रमुख अडचण आहे.








































































बाल गुन्हेगारीसंबंधातले कायदे आपले आणि अमेरिकेतले.
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२ 
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हनिया  


टीव्ही/इंटरनेट वरच्या हरर फिल्स किंवा मालिका पाहून प्रभावित झाल्याची उदाहरणे काही कमी नाहीत. पण त्यामधील एका नायकाचे (खलनायकाचे) प्रत्यक्ष अनुकरण करण्याचा प्रयत्न नुकताच अमेरिकेतील एका प्रांतात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बारा वर्षाच्या दोन मुलींचा आपल्या मैत्रिणीवरचा हा प्रयोग पाहून तर धक्क्यातून सावरणे शक्यच होईना. त्यांनी आपल्या मैत्रिणीला मोजून एकोणीस वेळा भोसकले आणि एका पार्कमध्ये मरायला सोडून त्या तिथून निघून गेल्या. पण दुसराही एक धक्का बसला. पोलिसांनी या दोन मुलींना बालगुन्हेगार मानण्यास नकार देऊन मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे ठरविले आहे. चौकशी करता कळले की, हे अमेरिकेच्या कायद्याला धरून आहे. ही माहिती कळताच आपल्या येथील निर्भयावरील बलात्कार प्रकरणाची आठवण झाली. या प्रकरणातला बालगुन्हेगार हाच सर्वात जास्त क्रूरकर्मा होता पण आपल्या येथील कायद्यानुसार तो बालगुन्हेगार ठरला आणि तीन वर्षाची शिक्षा होऊन तो आता लवकरच सुटेलही.
‘स्लेंडरमॅन’ बालगोपालांचा आदर्श.
अमेरिकेतले हे प्रकरण धक्कादायक आहेच. पण ते या देशापुरतेच मर्यादित आहे, असे वाटत नाही. अशा बाबतीत आपला देशही अमेरिकेच्या फार मागे नाही. या प्रकरणातल्या तिन्ही मुली एका वर्गात शिकणाऱ्या मैत्रिणी होत्या. इतक्या की, त्या एकमेकीकडे रात्रीच्या मुक्कामासाठी (स्लीप ओव्हर)  सुद्धा जाऊन राहत असत. त्यापैकी दोघींनी तिसरीला मारण्याचा कट  केला. असे करण्याचे कारण असे की, त्यांना एका हॉरार मालिकेतील नायकाचे (खलनायकाचे) अनुकरण करायचे होते. या
नायकाचे (खलनायकाचे) मालिकेतील नाव आहे स्लेंडरमॅ. हा एक काल्पनिक नायक (खलनायक) असून त्याचा हॉरर फिल्म्स मध्ये नित्य वावर असतो. त्याचे स्थान एखाद्या ‘दादासारखे’ असून त्याच्यासारखे व्हायचे असेल तर निदान काही खून तुमच्या गाठीशी असले पाहिजेत, अशी इथल्या बालगोपालांची पक्की समजूत आहे. आपण त्याच्यासारखे व्हायचेच, असे या तीनपैकी दोन मुलींनी आपल्या मनाशी पक्के ठरविले आणि  त्या या दृष्टीने तयारीला लागल्या.
मुलीचे नशीब बलवत्तर
फेब्रुवारी महिन्यापासून त्यांनी या दृष्टीने निरनिराळ्या योजना आखल्याचे पोलीस तपासात बाहेर आले आहे. त्यांचा पहिला बेत असा होता की मैत्रीण झोपेत असतांना तिच्या तोंडात बोळा कोंबायचा आणि चाकूने वर करून तिला संपवायचे. त्यांचा दुसरा प्लन असा होता की, तिला बाथरूम मध्ये नेऊन संपवायचे कारण बाथरूम साफसफाई करून रक्त पुसण्याचे दृष्टीने बाथरूम सोयीची ठरणार होती. पण शेवटी एका पार्कमध्ये नेऊन तिला मारणेच सोयीचे होईल, असे ठरवून त्यांनी हा प्लन अमलात आणला. लपाछपीचा खेळ खेळण्याचे निमित्त सांगून त्या दोघींनी आपल्या तिसऱ्या मैत्रिणीला एका बागेत नेले आणि तिच्यावर  हृदयाजवळ  मोजून एकोणीस  वार केले. हे वार करून त्या दोघी तिसरीला तिथेच सोडून निघून गेल्या. ती तिथेच तशीच पडून राहिली असती तर नक्कीच मेली असती. कारण चाकूचे वार तिच्या हृदयापासून जेमतेम एक मिलीमीटर अन्तर राखून झाले होते. पण  दैव त्या मुलीच्या बाजूचे होते. ते बलवत्तर होते म्हणून एका सायकल स्वारचे तिच्याकडे लक्ष गेले. तिने त्याची करुणा भाकली आणि त्याला मदत करण्याची विनंती केली, ‘कृपा करून मला मदत करा, मला भोसकण्यात आले आहे’. दवाखान्यात पोचली तेव्हा ती  वेदनेने अतिशय तळमळत होती आणि हो/नाही एवढेच बोलू शकत होती.
ही फर्स्ट डिग्री मर्डर केस
पोलिसांनी तिच्या ‘त्या’दोन मैत्रिणी शोधून काढल्या. एकीजवळ तिच्या आईची भलीमोठी पर्स होती आणि त्यात एक मोठा धारदार चाकू होता. असा भयंकर प्रकार आम्ही प्रथमच पाहत आहोत, असे पोलीस म्हणत आहेत. या प्रकरणात दोन मुली सहभागी आहेत एवढ्यापुरतेच या गंभीरतेचे स्वरूप मर्यादित नाही, तर यात क्रूरतेची परिसीमा गाठलेली आहे, ही बाब अधोरेखित होते आहे, इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आम्ही हे प्रकरण एखाद्या प्रौढ व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यासारखे मानून पुढील कारवाई करणार आहोत. फेब्रुवारीपासूनच या मुली हा कट रचण्याच्या कामी लागलेल्या होत्या. ‘फर्स्ट डिग्री मर्डर’ करण्याचा प्रयत्न असे या गुन्ह्याचे स्वरूप आहे, असे आम्ही मानतो. आपल्या देशात मात्र ‘निर्भायाप्रकरणी’ असा विचार होऊ शकला नाही कारण कायदा आड आला.
दरम्यानच्या काळात मालिकाकर्त्यांनी या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून आम्ही हिंसेचा पुरस्कार करीत नाही तसेच ती क्षम्यही मानत नाही, असे जाहीर केले आहे.
अमेरिकेतले वातावरण
ह्या प्रकरणामुळे इथले अमेरिकेतले वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. काही घटक मालिकांना दोष देत आहेत, काही मुलेच बिघडली म्हणत आहेत तर काही आईबापांना दोषी धरत आहेत. आईबाप मात्र नशिबाला किंवा ‘हेचि फल काय मम तपाला’, असे म्हणत उसासे सोडत आहेत. कारण मुलांसाठी त्यांनी अमुक म्हणून करायचे ठेवले नव्हते. पोलीस हे प्रकरण बालगुन्हेगारीचे मानायला तयार नाहीत.
अमेरिकेसारख्या देशात जर असा कायदा असू शकतो तर मग आपल्या देशातही बालगुन्हेगारीच्या प्रश्नाचा नवीन संदर्भात विचार का केला जाऊ नये, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. नको त्या बाबतीत आपण अमेरिकेचे अंधानुकरण करण्यात आघाडीवर असतो, मग याच प्रश्नाचा पुनर्विचार का होऊ नये? असले प्रकार आपल्या देशातही वाढत्या प्रामाणात होत आहेत, तेव्हा या प्रश्नाचा साधक बाधक प्रकारे विचार झाला पाहिजे, असे वाटते.