Friday, June 20, 2014

इराकमधील संघर्ष आणि अमेरिकेची फटफजिती - तभा २०.०६.२०१४

इराकमधील संघर्ष आणि अमेरिकेची फटफजिती
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२ 
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हनिया

इराकमध्ये अमेरिकेच्या भरवशावर जे शासन उभे आहे त्याला पळता भुई थोडी झाली आहे. सद्ध्या इराकमध्ये जे काही घडत आहे, ते अमेरिका आणि इराक या दोन्ही देशांना चकित करणारी बाब आहे. याची करणे दोन आहेत. एक असे की, बंडखोरांना विजयापाठोपाठ विजय मिळत आहेत. दुसरे असे की, इराकी सैन्यातील अनेक सैनिक आणि अधिकारी बंडखोरांना सामील होत आहेत. अमेरिकेचे गुप्तहेर खाते हे जगातील एक सर्वोत्तम गुप्तहेर खाते मानले जाते. आपल्याला मिळणारी गुप्त माहिती अमेरिका बहुतेक सर्ववेळी इराकला उपलब्ध करून देत असते. पण या दोघांनाही पत्ता न लागू देता बंडखोर ज्या प्रकारे आणि ज्या वेगाने आपला जम बसवीत चालले आहेत, त्याचे या दोघांना तसेच जगालाही आश्चर्य वाटणे सहाजिकच म्हटले पाहिजे.
पुळचट नेता काय कामाचा?
इराकचे पंतप्रधान नूरी कमाल अल- मलिकी यांचे अवसान गळाले असून बहुसंख्य शिया संप्रदायाला साथीला घेऊनही अल्पसंख्य असलेल्या सुन्नी संप्रदायाच्या कडव्या बंडखोरांनी त्यांना पुरते जेरीस आणले आहे. आता सर्वत्र बंडखोरांचा वरचष्मा दिसत असून त्याला  नूरी कमाल अल- मलिकी यांचे पुळचट नेतृत्वच सर्वस्वी कारणीभूत आहे. मोसुल हे इराक मधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आणि महत्वाचे शहर आहे. सुन्नी बंडखोरांनी विद्युतवेगी हालचाली करून या शहरावर ताबा मिळवला आणि इराक आणि अमेरिकेबरोबरच जगही आश्चर्यचकित झाले. तेलाच्या खाणी असलेले बायजी यावरही बंडखोरांनी कब्जा मिळवला असून त्यांनी आता बगदादच्या दिशेने वेगाने कूच केले आहे. बगदाद शहरात फार मोठा नरसंहार होत असून सर्वत्र एकच भगदड माजली आहे.
प्रश्नाचे व्यापक स्वरूप
बंडखोरांचे हे यश इराक पुरतेच सीमित राहणार नसून सिरीयन बंडखोरांबरोबर हातमिळवणी करून त्यांनी एक इस्लामिक धर्मांध राज्य निर्माण करण्यात यश प्राप्त केले तर या विभागातील सत्तासंतुलन पार बिघडून जाईल. इराक आणि सीरिया यांच्या सीमारेषेवर निर्माण होणारे हे राज्य कोणालाच नको आहे. त्यात कर्ड तर आहेतच पण त्याचबरोबर तुर्की आणि इराणी लोकांनाही ते नको आहे. इराकच्या उत्तर भागात कर्ड लोक इराकच्या अडचणीचा फायदा घेत तिथल्या तेल विहिरींवर गुपचूप ताबा मिळविण्याच्या कामी आजवर गुंतले होते. आपले स्वतंत्र राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने दुर्बल इराक त्यांना सोयीचा होता. पण बंडखोरांची होत असलेली सरशी त्यांना आपले स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने एक अडसर वाटते आहे. तुर्कस्थानलाही कडवे सुन्नी सत्ताकेंद्र नको आहे. तुर्कस्थानचे लोकांनी फार मोठ्या प्रमाणात पाश्चात्य जीवनशैली स्वीकारली असून आपल्या शेजारी त्यांना कडव्या सुन्नींची सत्ता मुळीच नको आहे. इराण तर बोलूनचालून शिया बहूल देश. काय गंमत आहे पहा! इराक, तुर्कस्थान, इराण तसेच अमेरिका यापैकी कोणालाच इराकी बंडखोरांची सरशी व्हावी असे वाटत नाही. पण अल्पसंख्य असलेले बंडखोर एकामागून एक विजय मिळवत पुढे चालले आहेत. इराण आणि अमेरिका यांच्या मधून आताआता पर्यंत विस्तव जात नव्हता. काळ कुणाचा कसा सूड घेईल, ते सांगता येणार नाही, हेच खरे.
जिहादाचे जागतिक परिमाण
इराक आणि सीरिया यांचे एक कडवे इस्लामिक राज्य व्हावे ही बंडखोरांची भूमिका आहे. त्यांनी अल कायदाला मागे टाकले. दोन तीन वर्षांपूर्वी अमेरिकेने इराकमधून आपल्या फौजा मागे घेतल्या आणि बंडखोरांनी अल कायदाला बाजूला सारीत या भागात आपला जम बसवायला हळूहळू सुरवात केली. भारताच्या दृष्टीने विचार केला तर हे बंडखोर आणि अलकायदा हे सापनाथ आणि नागनाथ यांच्या सारखेच म्हणावे लागतील. त्यांच्यात डावेउजवे करता येणार नाही. या बंडखोरांना वेळीच आवर घातला नाही तर ही सगळ्या जगाचीच डोकेदुखी होऊन बसणार आहे. जिहाद ही आता भारतापुरतीच समस्या उरली नसून ती आता हळूहळू जागतिक समस्या होऊ पाहते आहे.
खेळी उलटली
इराकमधील अमेरिकेची खेळी तिच्यावरच उलटू पाहते आहे. इराक अण्वस्त्रे निर्माण करीत आहे, ही सबब पुढे करून अमेरिकेने सद्दाम हुसेनचा खातमा   केला खरा पण तो बरा होता असे म्हणण्याची वेळ अमेरिकेवर आली नाही, म्हणजे मिळवली. लक्षावधी डॉलर ओतून अमेरिकेने नवी इराकी सेना उभारली  पण ह्या सैन्यातील लहानमोठे अधिकारी सर्व सामग्रीसह बंडखोरांना फितूर झाले. त्यांनी मोसूल जिंकल्यावर तर तिथल्या बँकेतील गडगंज संपत्ती त्यांच्या हाती आयतीच सापडली.
विघटनाच्या वाटेवर इराक आणि अगतिक अमेरिका
आजवर जवळजवळ दहा हजार इराकी लोक या संघर्षात गारद झाले आहेत. इराकी सैन्याचा  भेकडपणा लक्षात आल्यामुळे कर्ड लोकांनी किरकुक शहराचा ताबा घेतला आहे. कारण या भागात तेलाच्या विहिरी आहेत. इराकच्या उत्तर भागात अगोदरच कर्ड लोकांचे प्रभुत्व होते, त्यामुळे त्यांना हे फारसे कठीण गेले नाही. अनेक राजकीय निरीक्षकांना ही इराकच्या विभाजनाची नांदी वाटते आहे. या सर्व बाबी इराक पुरत्याच सीमित राहिल्या असत्या तरी एकवेळ चालले असते. पण याचा परिणाम अमेरिकेत ओबामा यांना भोगावा लागतो आहे. ओबामांनी इराकमधून सर्वच सैन्य काढून घ्यायला नको होते. सैन्य काढून घेण्याची मागणी खुद्द इराकनेच केली होती, हे खरे. पण वर्षाभरातच इराकने कोलांटीउडी मारली आणि मदतीची मागणी केली. अमेरिकेनेही अगदी सर्व प्रकारची मदत देऊ केली. इराकचे पंतप्रधान मलिकीनी अमेरिकेनेच हवाई हल्ले करावेत, अशीही गळ  घातली. तीही अमेरिकेने मान्य केली आणि आणखी मदत हवी असेल तर तीही देऊ केली,शास्त्रे दिली पैसाही ओतला. अशाप्रकारे आता अमेरिका या संघर्षात अधिकाधिक गुंतत चालली आहे. असेच जर करावयाचे होते तर अमेरिकेने आपले सैन्य इराकमधून मुळात काढूनच का घेतले, अशी टीका अमेरिकेत ओबामा यांच्यावर होऊ लागली आहे. मलिकी याच्या रूपाने इराकमध्ये एक बाहुले उभे करणे, हे ओबामा यांचे फार मोठे अपयश मानले जात आहे. धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी अमेरिकेची स्थिती झाली आहे. आता आणखी अमेरिकन रक्त इराकच्या रणभूमीवर सांडले जावे, याला अमेरिकेत सक्त विरोध आहे. त्यामुळे हवाई हल्ले करून काही कार्यभाग साधतो का असा विचार ओबामा प्रशासनाने केला आहे. पण आकाशातून केलेले हल्ले परिणामकारक ठरत नाहीत आणि शस्त्रे स्वत: लढत नसतात. ती धारण करणारे इराकी सैन्य नादान, कमकुवत, कुचकामी आणि बेभरवशाचे झाले आहे.
ओबामा यांच्यावर टीकेचा भडिमार
इकडे अमेरिकेत ओबामा यांच्यावर टीकेचा भडिमार सुरु आहे. मलिकी सारख्या नादान, पळपुट्या आणि नालायक नेत्याचा भरवसा धरून ओबामा यांनी काय साधले असा प्रश्न जो तो विचारत सुटला आहे. इराक मध्ये उभा राहायला हवा आहे नवीन कणखर नेता की जो सैन्यात नवीन जोश निर्माण करील, जो सर्व समावेशक असेल, जो कडव्या सुन्नींना नेस्तनाबूत करू शकेल, जो इराकची विस्कटलेली आर्थिक घडी नीट मार्गाला लावील. पण आता वेळ गेल्यातच जमा झाली आहे. पैसा, शस्त्रे आणि रडतराउत घोड्यावर बसवून परदेशात नेते उभे करता येत नाहीत की आंतरराष्ट्रीय राजकारण साधता येत नाही. त्यातून हा काही अमेरिकेचा पहिलाच अनुभव नाही, तसाच तो ओबामा यांचाही पहिलाच अनुभव नाही. अमेरिकन रक्त सांडले, पैशापरी पैसा गेला, शस्त्रे तर नेमकी शत्रूच्याच हाती पडली. आणखी नाचक्की ती कोणती? अशी अमेरिकेची पुरती फटफजिती झाली आहे.       


No comments:

Post a Comment