Tuesday, July 15, 2014

बालगुन्हेगारांबाबतचे कायदे

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोघांच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची बातमी कानावर आली आणि आपल्या देशात एका वेगळ्या चर्चेला प्रारंभ झाला. दुसरीकडे केंद्रीय बालकल्याणमंत्री श्रीमती मनेका गांधी यांनी बालगुन्हेगारांसंबंधातील प्रचलित कायदा बदलण्यासंबंधात आणि बालपणाची वयोर्मयादा अठरावरून सोळा करण्याबाबत दुरुस्ती करण्याचा विचार बोलून दाखवला. त्यामुळे आपल्या देशात उलटसुलट चर्चेला प्रारंभ झाला आहे. निर्भयाप्रकरणातला बालगुन्हेगारच सर्वात मोठा क्रूरकर्मा होता, असे तपासात आढळून आले होते. पण त्याला बालगुन्हेगार म्हणून फक्त तीन वषार्ंची शिक्षा झाली होती. थोडी वेगळी पण बालगुन्हेगारीच्याच संबंधात काही प्रकरणे अमेरिकेत नुकतीच घडली आहेत. या निमित्ताने येथील फौजदारी कायदा काय म्हणतो आणि येथील पोलिस बालगुन्हेगारीच्या संबंधात काय विचार करीत आहेत, ते पाहणे उपयोगाचे होईल, असे वाटते.
'शाळा बाँबने उडवून देऊ' विद्यार्थ्यांची धमकी
मी अमेरिकेत नुकताच मुलाकडे पेनसिल्व्हॅनिया प्रांतातील यॉर्क या गावी रहायला आलो होतो आणि शाळेतून फोनवर निरोप आला की, 'शाळा बाँबने उडवून देण्याची धमकी आली असून संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आली आहे. मुलांना वर्गातून बाहेर आणण्यात आले असून ती मोकळ्या मैदानात बसून आहेत. पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही. श्वान पथक आणि बाँबचा शोध घेणारे पथक तसेच अग्निशामक दल शाळेत येऊन दाखल झाले आहे. हा निरोप आला तेव्हा आम्ही जेवत होतो. निरोप आला आणि मी एकदम हादरलोच. सून नीलम म्हणाली की, 'जेवणं झाली म्हणजे आपण शाळेभोवती एक चक्कर मारून येऊ'. 'शाळा बाँबने उडवून देण्याची धमकी आली आहे आणि तुला जेवण सुचतच कसं?', असं मी म्हणताच ती म्हणाली की, या सत्रातली ही चौथी धमकी आहे. प्रत्येकदा शाळेने धमकी देणार्याला पोलिसांची आणि बाँब शोधक पथकाची मदत घेऊन हुडकून काढले आहे. याही वेळी तसेच होईल'. 'धमकी देणारे कोण होते? शाळेशी कोणाचे वैर असणार आहे?' 'तिन्ही वेळी धमकी देणारी शाळेतलीच मुले होती'. मी आश्चर्यचकित झालो. या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते आणि त्यांना बाल गुन्हेगारांच्या शाळेत पाठविण्यात आले होते. मुलं असं का करीत आहेत? शाळेवरचा राग काढण्याचा हा प्रकार आहे, हे कळले आणि काय बोलावे तेच कळेना.
मुले मैदानात शांतपणे बसली होती
आम्ही गाडी काढली आणि शाळेच्या दिशेने निघालो. आम्हाला सांगण्यात आले की, आपल्याला शाळेत जाता येणार नाही. बाहेर मैदानात बसलेली मुले पाहता येतील. गेल्या खेपेला पालकांनी गोंधळ घातला होता तेव्हापासून असा प्रतिबंध घालण्यात आला आहे. तेवढ्यात आम्ही नातवाच्या फोनचा मागोवा घेतला. ओंकार मैदानात येऊन बसला आहे, असे त्याच्या फोनची स्थिती सांगत होती. शाळेपाशी रस्त्यावर पोचलो तर काही पालक बाहेर थांबले होते. त्यांनी आत जाऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवलेला दिसत होता. आम्ही तसेच शाळेच्या परिसराभोवती एक चक्कर मारून घरी परतणार तेवढ्यात फोनवर निरोप आला की, धमकी पोकळ होती. पोलिस आणि बाँब शोधक पथकाने शाळेची इमारत पिंजून काढली आहे आणि बाँब न आढळल्यामुळे मुले पुन्हा वर्गात परतली आहेत. मुले अशी का वागतात याचा विचार करीत आणि चर्चा करीत आम्ही घरी परत आलो.
बारा वर्षाच्या दोन मुलींचा प्रताप
टीव्ही/इंटरनेटवरच्या हॉरर फिल्म्स किंवा मालिका पाहून प्रभावित झाल्याची उदाहरणे इथे खूप ऐकायला येतात. पण त्यामधील एका नायकाचे (खलनायकाचे) प्रत्यक्ष अनुकरण करण्याचा प्रयत्न नुकताच अमेरिकेतील एका प्रांतात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बारा वर्षाच्या दोन मुलींचा आपल्या मैत्रिणीवरचा हा प्रयोग पाहून तर धक्क्यातून सावरणे शक्यच होईना. त्यांनी आपल्या मैत्रिणीला मोजून एकोणीस वेळा भोसकले आणि एका पार्कमध्ये मरायला सोडून त्या तिथून निघून गेल्या. पण दुसराही एक धक्का बसला. पोलिसांनी या दोन मुलींना बालगुन्हेगार मानण्यास नकार देऊन मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे ठरविले आहे. चौकशी करता कळले की, हे अमेरिकेच्या कायद्याला धरून आहे. ही माहिती कळताच आपल्या येथील निर्भयावरील बलात्कार प्रकरणाची आठवण झाली. या प्रकरणातला बालगुन्हेगार हाच सर्वात जास्त क्रूरकर्मा असूनही त्याला आपल्या येथील कायद्यानुसार फक्त तीन वर्षाची शिक्षा झाली. तो आता लवकरच सुटेलही.
'स्लेंडरमॅन' बालगोपालांचा आदर्श
अमेरिकेतले हे प्रकरण धक्कादायक आहेच. पण ते या देशापुरतेच र्मयादित आहे, असे वाटत नाही. अशा बाबतीत आपला देशही अमेरिकेच्या फार मागे नाही. या प्रकरणातल्या तिन्ही मुली एका वर्गात शिकणार्या मैत्रिणी होत्या. इतक्या की, त्या एकमेकीकडे रात्रीच्या मुक्कामासाठी (स्लीप ओव्हर) सुद्धा जाऊन राहत असत. त्यापैकी दोघींनी तिसरीला मारण्याचा कट केला. असे करण्याचे कारण असे की, त्यांना एका हॉरर मालिकेतील नायकाचे (खलनायकाचे) अनुकरण करायचे होते. या
खलनायकाचे मालिकेतील नाव आहे 'स्लेंडरमॅन'. त्याचे वागणे एखाद्या 'दादासारखे' असून त्याच्यासारखे व्हायचे असेल तर निदान काही खून तुमच्या गाठीशी असले पाहिजेत, अशी इथल्या बालगोपालांची पक्की समजूत आहे. आपण त्याच्यासारखे व्हायचेच, असे या तीनपैकी दोन मुलींनी आपल्या मनाशी पक्के ठरविले आणि त्या या दृष्टीने तयारीला लागल्या.
मुलीचे नशीब बलवत्तर
अनेक महिन्यापासून त्यांनी या दृष्टीने निरनिराळ्या योजना आखल्याचे पोलिस तपासात बाहेर आले आहे. त्यांचा पहिला बेत असा होता की मैत्रीण झोपेत असतांना तिच्या तोंडात बोळा कोंबायचा आणि चाकूने वार करून तिला संपवायचे. त्यांचा दुसरा प्लॅन असा होता की, तिला बाथरूम मध्ये नेऊन संपवायचे. कारण बाथरूम साफसफाई करून रक्त पुसण्याचे दृष्टीने सोयीची ठरणार होती. पण शेवटी एका पार्कमध्ये नेऊन तिला मारणेच सोयीचे होईल, असे ठरवून त्यांनी हा प्लॅन अंमलात आणला. लपाछपीचा खेळ खेळण्याचे निमित्त सांगून त्या दोघींनी आपल्या तिसर्या मैत्रिणीला एका बागेत नेले आणि तिच्यावर हृदयाजवळ मोजून एकोणीस वार केले. हे वार करून त्या दोघी तिसरीला तिथेच सोडून निघून गेल्या. ती तिथेच तशीच पडून राहिली असती तर नक्कीच मेली असती. कारण चाकूचे वार तिच्या हृदयापासून जेमतेम एक मिलीमीटर अन्तर राखून झाले होते. पण दैव त्या मुलीच्या बाजूचे होते. ते बलवत्तर होते म्हणून एका सायकलस्वाराचे तिच्याकडे लक्ष गेले. तिने त्याची करुणा भाकली आणि त्याला मदत करण्याची विनंती केली, 'कृपा करून मला मदत करा, मला भोसकण्यात आले आहे'. दवाखान्यात पोचली तेव्हा ती वेदनेने अतिशय तळमळत होती आणि हो/नाही एवढेच बोलू शकत होती.
ही फस्र्ट डिग्री र्मडर केस
पोलिसांनी तिच्या 'त्या'दोन मैत्रिणी शोधून काढल्या. एकीजवळ तिच्या आईची भलीमोठी पर्स होती आणि त्यात एक मोठा धारदार चाकू होता. बारा वषार्ंच्या मुलींचे बाबतीत असा भयंकर प्रकार आम्ही प्रथमच पाहत आहोत, असे पोलिस म्हणत आहेत. या प्रकरणात दोन मुली सहभागी आहेत एवढ्यापुरतेच या गंभीरतेचे स्वरूप र्मयादित नाही, तर यात क्रूरतेची परिसीमा गाठलेली आहे, ही बाब अधोरेखित होते आहे. इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आम्ही हे प्रकरण एखाद्या प्रौढ व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यासारखे मानून पुढील कारवाई करणार आहोत. अनेक दिवसांपासूनच या मुली हा कट रचण्याच्या कामी लागलेल्या होत्या. 'फस्र्ट डिग्री र्मडर' करण्याचा प्रयत्न असे या गुन्ह्याचे स्वरूप आहे, असे आम्ही मानतो. आपल्या देशात मात्र 'निर्भयाप्रकरणी' असा विचार होऊ शकला नाही. कारण कायदा आड आला.
दरम्यानच्या काळात'स्लेंडरमॅन'च्या मालिकाकर्त्यांनी या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून आम्ही हिंसेचा पुरस्कार करीत नाही तसेच ती क्षम्यही मानत नाही, असे जाहीर केले आहे.
अमेरिकेतले वातावरण
या प्रकरणामुळे इथले वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. काही घटक मालिकांना दोष देत आहेत, काही मुलेच बिघडली म्हणत आहेत तर काही आईबापांना दोषी धरत आहेत. आईबाप मात्र नशिबाला किंवा 'हेचि फळ काय मम तपाला', असे म्हणत उसासे सोडत आहेत. कारण मुलांसाठी त्यांनी अमुक म्हणून करायचे ठेवले नव्हते. पोलिस हे प्रकरण बालगुन्हेगारीचे मानायला तयार नाहीत.
अमेरिकेसारख्या देशात जर असा कायदा असू शकतो तर मग आपल्या देशातही बालगुन्हेगारीच्या प्रश्नाचा नवीन संदर्भात विचार का केला जाऊ नये, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. नको त्या बाबतीत आपण अमेरिकेचे अंधानुकरण करण्यात आघाडीवर असतो, मग याच प्रश्नाचा पुनर्विचार का होऊ नये?असले प्रकार आपल्या देशातही वाढत्या प्रामाणात होत आहेत, तेव्हा या प्रश्नाचा साधक बाधक विचार झाला पाहिजे, असे वाटते.
' वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,
पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४0 0२२
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया

No comments:

Post a Comment