Sunday, August 10, 2014

मोदींनी नेपाळ जिंकला! (विशेष :तरुणभारत,नागपूर) १०.०८.२०१४

विशेष (तरुणभारत,नागपूर)

तारीख: 10 Aug 2014 00:16:17

मोदींनी नेपाळ जिंकला!

पंतप्रधान मोदी यांनी नेपाळला भेट दिली आणि देशातल्या आणि देशाबाहेरच्या वर्तमानपत्रांत निरपवादपणे या भेटीबाबत स्तंभावर स्तंभ लिहिले गेले. सर्वात मार्मिक वृत्त न्यूयार्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झाले आहे, असे वाटते. मी तुम्हाला उपदेशाच्या चार गोष्टी ऐकवायला आलेलो नाही, तसेच तुमच्या अंतर्गत कारभारात तोंड खुपसायलाही आलेलो नाही. कारण नेपाळ हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, याची मला जाणीव आहे. मोदींच्या भाषणातले हे उद्गार उद्धृत करून न्यूयार्क टाईम्सने नेपाळहून त्यांच्या वार्ताहराने पाठविलेल्या वार्तापत्राचा प्रारंभ केला आहे. देशाची नवीन घटना लेखनाचे काम नेपाळमध्ये गेली चार वर्षे रखडत चालले आहे. पण याबद्दल काहीही न म्हणता नवीन घटना लेखनाच्या मुद्याचा उल्लेख करून त्यांनी आनंद आणि सामाधान व्यक्त केले, ही बाब वार्ताकाराला महत्त्वाची वाटली. या घटनेत नेपाळ हे सेक्युलर, डेमोक्रॅटिक, फेडरल रिपब्लिक असेल, असे म्हटले आहे. मोदींनी आपल्या भाषणात नेपाळचा उल्लेख सेक्युलर हा शब्द गाळून नुसता डेमोक्रॅटिक, फेडरल रिपब्लिक, असा केला, ही बाब या वार्ताहराच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. पण त्याचबरोबर घटना लेखनाचे तुमचे कार्य एक पवित्र (सेक्रेड) कार्य आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख करण्यास मोदी विसरले नाहीत, याची नोंद या वार्तापत्रात घेतली गेली आहे. मुत्सद्देगिरीचे हे दर्शन त्या वार्ताहराला घडले, ते आपल्या इथेही सर्वांना घडले पाहिजे. घटनालेखनाच्या कार्याची तुलना मोदींनी जुन्या काळात ऋषिमुनींनी केलेल्या वेद-उपनिषदांच्या रचनेशी केली, याचे वार्ताहराला कौतुक वाटलेले दिसते. घटनालेखनाचे रखडलेले काम लवकर उरकले, तर आपल्याला आनंद होईल, हा मुद्दाही त्यांनी अतिशय खुबीदारपणे मांडला, हेही वार्ताहराच्या नजरेतून सुटले नाही. घटनासमितीच्या सदस्यांसमोर मोदींनी पन्नास मिनिटे भाषण केले. परदेशात जाऊन कसे बोलावे, याचा हा एक पाठच आहे, असे म्हटले पाहिजे.

अंतर्गत प्रश्‍नांबाबत मौन

नेपाळची घटना कशी असावी, सर्वाधिकार अध्यक्षाला असावेत की पंतप्रधानाला या वादग्रस्त प्रश्‍नाबाबत ते एक शब्दही बोलले नाहीत. हिंदू धर्मीय लोक नेपाळमध्ये बहुसंख्येने आहेत. पण हिंदू धर्माला राज्यधर्म (स्टेट रिलिजन) म्हणून मानावे किंवा कसे ह्या मुद्यालाही त्यांनी आपल्या भाषणात स्पर्श केला नाही. नाकाने कांदे सोलणार्‍या अमेरिकेला हे दिसत नाही, त्या देशात ख्रिश्‍चन धर्म हा देशाचा स्टेट रिलिजन आहे. राज्य प्रशासन हे धर्मनिरपेक्षच असले पाहिजे, हे नमूद करण्यासाठी जी वैचारिक परिपक्वता लागते, ती अमेरिकेत नाही, हेच यावरून दिसून येते. भाषणाला प्रारंभ करताकरताच त्यांनी नेपाळच्या राजकीय नेत्यांबरोबरच जनतेशीही सुसंवाद साधायला प्रारंभ केला. सतरा वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर भारताचा पंतप्रधान नेपाळला भेट देतो आहे, याची जाणीव आपल्याला आहे, हे नमूद करून यापुढे असा उशीर होणार नाही, असे त्यांनी आश्‍वासन नेपाळच्या राज्यकर्त्यांना आणि जनतेला दिले. राजकीय शिष्टाचाराला फाटा देऊन फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार घेत असलेले नेपाळचे अशक्त पंतप्रधान सुशील कोईराला हे त्यांच्या स्वागतासाठी जातीने उपस्थित झाले होते, याचीही न्यूयार्क टाईम्सने नोंद घेतली आहे.

अविश्‍वासाच्या जागी विश्‍वासनिर्मिती

मोदी यांनी एक दशकभर नेपाळच्या मनात घर करून बसलेले अविश्‍वासाचे वातावरण दूर केले. जलविद्युतनिर्मितीच्या कामी साह्य, पर्यटनाला उत्तेजन हे दोन विषय तर त्यांनी आपल्या भाषणात मांडलेच, पण तयार होणारी अतिरिक्त वीज आम्ही फुकट नाही, तर विकत घेऊ, असे सुस्पष्ट आश्‍वासनही दिले. पन्नास वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर या दोन देशांत परस्पर विश्‍वासाचे वातावरण निर्माण व्हायला प्रारंभ होताना दिसतो आहे, असे मत अनेक वार्ताहरांनी आपल्या वृत्तात नोंदवले आहे. शब्दयोजनेबाबत झालेल्या एका लहानशा तपशिलातील मतभिन्नतेमुळे संयुक्तनिवेदनात जलविद्युतनिर्मितीच्या बाबतीतला उल्लेख वगळला गेला, पण हा विषय लवकरच मार्गी लागेल, असे दोन्ही पक्ष म्हणत आहेत.
या भेटीचा परिणाम म्हणून आता आमचे पुढारी आपापसातले मतभेद बाजूला सारतील, असा विश्‍वास नेपाळमधले राजकीय निरीक्षक मानत आहेत. सार्क देशातील अन्य नेत्यांबरोबरही स्नेहाचे संबंध निर्माण करण्यात मोदी यशस्वी होतील, असे मत इथे व्यक्त होताना दिसते आहे.

चीनची चतुर चाल

भारत आणि नेपाळमधील दुराव्याचा लाभ घेत चीनने नेपाळमध्ये शिरकाव करण्यास प्रारंभ केला आहे. सुरवातीलाच नेपाळ आणि चीनमधील सीमारेषा चीनने मुळीच खळखळ न करता मान्य करून आपले फासे टाकण्यास सुरवात केली; आणि आपण कसे समजूतदार आहोत, भारताचे धोरणच कसे आडमुठेपणाचे आहे, हे नेपाळच्या मनावर बिंबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे आता भारताला नव्याने संबंध प्रस्थापित करावे लागणार आहेत. नेपाळमध्ये राजेशाही होती. तिथल्या लोकशाही पुरस्कर्त्यांना भारताची सहानुभूतीच नव्हे, तर फूस असते, असे नेपाळच्या तत्कालीन सत्ताधार्‍यांना वाटत असे. त्यांची ही समजूत अगदीच चुकीची होती, असे म्हणता येणार नाही. पण मग इराण, इराक, सौदी अरेबिया, इजिप्त या देशांतील सर्वाधिकार्‍यांच्या बाबतीत भारताची हीच भूमिका होती का? त्यावेळी भारताचे लोकशाहीवरचे प्रेम का आटत होते? असाच प्रकार ब्रह्मदेश-म्यानमार बाबतही झाला. चीनने याचा फायदा घेऊन म्यानमारशी सूत जमवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला बर्‍यापैकी यशही मिळाले. रेल्वे उभारणी प्रकल्प उभारून देण्याचे चीनने आश्‍वासन दिले. कामाला प्रारंभही केला. पण सध्या या दोन देशांत बेबनाव झाला आहे. रेल्वेबाबतचा करार मोडला आहे, ही संधी आपण साधली पाहिजे आणि त्या देशाला वेळप्रसंगी थोडे झुकते माप देऊन संबंध नव्याने प्रस्थापित केले पाहिजेत. आपले नेपाळशी बिघडलेले संबंध सुधारण्याच्या दृष्टीने मोदींची ही नेपाळ भेट ऐतिहासिक महत्त्वाची ठरणार आहे, यात कुणालाही शंका वाटत नाही.

सर्व घटक अनुकूल

नेपाळ आपल्याला वाटतो तसा एक एकसंध देश नाही. तसा तो एकेकाळचा राजांचा देश आहे. त्या देशात परंपरागत असे शंभरपेक्षा जास्त गट आहेत. तेवढ्याच भाषा तिथे बोलल्या जातात. अनेक जातिपाती आहेत. भौगोलिक दृष्ट्याही नेपाळचे निदान तीन भाग पडतात. अशा देशात घटना समितीत एकमत होणे तसे कठीणच आहे. पण आता सगळेच परिस्थितीला वैतागले आहेत. देशभर रात्री तर सर्वत्र अंधाराचेच साम्राज्य असते. त्यामुळे नेपाळही प्रगतीसाठी आसुसलेला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, भारताच्या साह्याचे स्वागत अगदी एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले माओवादी सुद्धा करीत आहेत. मोदींच्या भेटीने आम्ही सगळे सुखावलो आहोत, आश्‍वस्त झालो आहोत आणि भारताचा हात हातात घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास उत्सुक आहोत, असे एकसुरात ऐकू येत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा संधी वारंवार येत नसतात. या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यात आपल्या परराष्ट्रीय धोरणाची यशस्विता सामावलेली आहे. केवळ भरघोस आर्थिक मदतच पुरेशी नसते. या मदतीच्या जोडीला भारताची मैत्रीची भूमिका नेपाळला मनोमन पटली पाहिजे. या दृष्टीने उत्तम पायाभरणी झाली आहे. मोदींच्या नेपाळ भेटीची ही मुख्य फलश्रुती आहे.
- वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०

No comments:

Post a Comment