Thursday, March 3, 2016

शिकवणी असावी की नसावी?
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
 (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   जे मूल विश्रांती, खेळ, मौज मजा यात किंचितही वेळ न दवडता सतत अभ्यासात व्यस्त असते  ते, हुशार होणार, अशी आपली अनेकांची समजूत असते. अशा मुलाबद्दल आपल्या मनात आदर व सहानुभूतीची भावना असते.
पण अशी मुले आपल्या आयुष्यातील  ६ ते १७ वर्षाचा कालखंड ( पहिली ते १२ वी), सात तासांची शाळा, दोन ते तीन तास शिकवणी वर्ग व एक दोन तास तिथे जाणे येणे यात खर्च करीत असतात. याशिवाय गृहपाठ असतो तो वेगळाच. आजकाल गृहपाठ करून घेणारेही शिकवणी वर्ग निघाले आहेत, असे म्हणतात. सामान्यत: हे काम बहुतेक कुटुंबात आईवडलांचे ( की आईचेच?/ ती स्वत: नोकरी करीत असो वा नसो)असते. असे केल्यामुळे मुलाची बुद्धी तजेलेदार व्हायला हवी, नाही का?
पण असे होत नाही. मग काय होते?
शिकवणी वर्गामुळे मुलाचा आत्मविश्वास पांगळा होतो. घरी पालक अभ्यास ‘करून’ घेत असतील तरीही हाच परिणाम होणार.
अशी मुले स्वत:च्या पायावर उभी राहू शकत नाहीत. सतत कुणाच्या ना कुणाच्या भरवशावर अवलंबून राहण्याची सवय त्यांच्या अंगवळणी पडते.
त्यांची समस्येला स्वत:हून सामोरे जाण्याची वृत्ती ( प्राॅब्लेम साॅल्हिंग बिहेविअर) खुंटते. समस्यांची आयती सोडवणूक त्यांना  हवीशी वाटू लागते.
स्वयंअध्ययनाची जागा (सेल्फ स्टडी ) गृहपाठ सोडवणे( तोही कुणाच्या ना कुणाच्या मदतीने) ही प्रक्रिया घेते.
मूल वर्गातील शिकवण्याकडे लक्ष देईनासे होते, कारण तो भाग शिकवणी वर्गात घेतला जाणारच असतो.
शिकवणी वर्गामुळे खेळण्याबागडण्यासाठी वेळच मिळत नाही, अनेकदा शाळेच्या वर्गातला व शिकवणी वर्गातला असा दुहेरी अभ्यास त्याचे मन:स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतो.
मग, शिकवणी वर्ग नसावेतच का? तर तसेही नाही. काही कारणांमुळे ते आवश्यकही असतात.
१. एखादा विषय कच्चा असेल तर किंवा शाळेतील शिक्षण पुरेसे पडत नसेल तर.
२. मूल वर्गात सतत मागे पडत असेल तर.
३. वर्गात शिकवलेले मुलाला समजत नसेल पण वर्गातील इतरांना मात्र समजत असेल तर.
४. पराकोटीची स्पर्धा असेल तर (जसे- स्पर्धा परीक्षा)
५. वर्गात दिले जाऊ शकत नाही, घरीही देता येत नाही किंवा मिळू शकत नाही असे विशेष प्रकारचे शिक्षण असेल तर.
   योग्य भूमिका तारतम्याने घेता येणे ही पालकांसाठी मात्र कसोटीची बाब आहे. यासाठी पालकांसाठी  शिकवणी वर्ग असावेत का? आवश्यक आहेत का?

No comments:

Post a Comment