Thursday, September 8, 2016

चीन आणि भारत संबंध काल व आज
वसंत गणेश काणे
    कोमिंगटाॅंग या चीनच्या सत्ताधारी राष्ट्रीय पक्षाचे नेते चॅंग- काई-शेखची यांची  सत्ता माओ त्से तुंग यांच्या नेतृत्त्वाखालील कम्युनिस्ट फौजांनी पूर्णत: उलथली (१९४८-१९४९) असून एका सरंजामशाहीचा शेवट झाला आहे  आणि त्यामुळे आता चीनमधील अंतर्गत परिस्थिती सुधारेल व चिनी जनतेला सुखासमाधानाचे दिवस येतील या भोळसट समजुतीला अनसरून आपण चीनला केवळ मान्यताच दिली नाही तर संयुक्त राष्ट्रसंघात जुन्या राष्ट्रवादी चीनच्या वाट्याची जागा कम्युनिस्ट चीनला मिळावी असा आग्रह आपण कम्युनिस्ट चीनकडून फारशी आग्रहाची विनंती नसतांनाही केला. ही जागा साध्यासुध्या सदस्याची नव्हती तर नकाराधिकाराचा (व्हेटोचा) अधिकार असलेल्या महाशक्तीची होती. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटानंतर जुन्या लीग आॅफ नेशन्सच्या ऐवजी संयुक्त राष्ट्र संघ (युनायटेड नेशन्स आॅर्गनायझेशन) या नावाची नवीन जागतिक संघटना अस्तित्वात आली. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया व राष्ट्रवादी चीन या युद्धात विजयी झालेल्या पाच राष्ट्रांनी स्वत:ला  महाशक्तीं ठरवून आपल्याकडे नकाराधिकार घेतला. नकाराधिकार याचा अर्थ असा की हे पाच स्थायी सदस्य व अन्य इतर राष्ट्रांनी निवडून दिलेले सहा सदस्य यांच्या मिळून होणाऱ्या अकरा राष्ट्रांच्या  सुरक्षा समितीसमोर एखादा विषय/ मुद्दा चर्चेला आला तर या पाच राष्ट्रांपैकी कोणतेही एक राष्ट्र त्या विषयावर चर्चा करू नये असे म्हणू शकत होते. खरे पाहता अमेरिका व रशिया याच खऱ्या अर्थाने त्या युद्धानंतर महाशक्ती म्हणण्याच्या योग्यतेच्या उरल्या होत्या. या युद्धात जर्मनी व जपान हरले होते हे खरे पण विजय संपादन करूनही फ्रान्स व इंग्लंड युद्धामुळे इतके जर्जर झाले होते की, त्यांचा समावेश युद्धानंतरच्या महाशक्तीत करणे योग्य ठरते का याबाबत एकापेक्षा जास्त मते असू शकतात. राष्ट्रवादी चीनला तर या युद्धातला कच्चा लिंबू म्हटले तरी चालावे अशी स्थिती होती, इतका जबर तडाखा जपानने चीनला लगावला होता. पण हे पाच विजयी वीर होते. जपान व जर्मनीचा पराभव झाला होता. असे म्हणतात की, इतिहासही ज्येत्यांनी आपली भलावण करणारी व आपणच कसे योग्य होतो, आपलीच बाजू कशी न्यायाची होती, हे सांगणारी चोपडी असते. त्याच न्यायाने खऱ्या पहिलवानासोबत असणारे कुस्ती जिंकल्यानंतर स्वत: त्याच तोऱ्याने वावरतात, तसा काहीसा प्रकार राष्ट्रवादी चीनच्या बाबतीत झाला आणि नकाराधिकार असलेल्या महाशक्तीचा दर्जा त्याला मिळाला. या राष्ट्रवादी चीनला माओने धूळ चारली आणि तायवान बेटात अमेरिकेने दिलेल्या अभयामुळे राष्ट्रवादी चीन दोन श्वापदांच्या लढतीत हरलेल्या श्वापदाप्रमाणे गुरगुरत राहिला आहे.
  चीनची पाठराखण-  चीनवर खरी सत्ता कम्युनिस्ट पक्षाने मिळवल्यानंतर सुरक्षा समितीमधील राष्ट्रवादी चीनची जागा या नवीन सत्तेला मिळावी म्हणून या कम्युनिस्ट चीनची बाजू मनापासून आणि कंठरवाने कोणी मांडली असेल तर ती आपण. काही राजकीय निरीक्षकांचे मत तर असे होते की, रशिया स्वत: कम्युनिस्ट असूनही याबाबत फारसा उत्साह न दाखवता मम म्हणून गप्प बसत होता. कारण चीन उद्याचा आपलाही प्रतिस्पर्धी आहे, हे तो जाणून होता. अर्थात राष्ट्रवादी चीनची जागा वारसा हक्काने कम्युनिस्ट चीनला मिळावी हे निसर्ग नियमाला व वस्तुस्थितीला अनुसरूनच होते, असे म्हणणारे चूक ठरले नसते, यात शंका नाही. म्हणून भारताची भूमिका कम्युनिस्ट चीनच्या बाजूने असण्यालाही कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण कम्युनिस्टांबाबत असलेला अनुभव व अगदी टोकाची अशी वेगळी राज्यपद्धती असलेल्या कम्युनिस्ट चीनला सहजासहजी प्रवेश द्यायला अमेरिकादी राष्ट्रे खळखळ करीत होती. शेवटी २५ आॅक्टोबर १९७१ ला ठराव क्र २७५८ नुसार कम्युनिस्ट चीनला राष्ट्रवादी चीनच्या जागी व ऐवजी संयुक्त राष्ट्र संघात प्रवेश मिळाला.
 चीनला प्रतिष्ठा मिळावी म्हणून प्रयत्न - माओच्या नेतृत्त्वाखाली जिंकलेले कम्युनिस्ट हे विजयी बंडखोर म्हणूनच जगासमोर उभे होते. त्यांचा अतिशय कळवळा येऊन आपण त्यांच्यवर प्रतिष्ठेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न केला. इंडोनेशियातील बांडुंगला झालेलेल्या आशियायी व आफ्रिकन देशांच्या परिषदेत तर भारतीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे एखाद्या स्टेज मॅनेजरप्रमाणे वावरत होते व स्वत: पडद्याआड राहून चीनच्या चाऊ-एन-लायला समोर करीत होते, अशी टिप्पणी तत्कालीन वार्ताहरांनी केली होती. एवढेच नव्हे तर काहींनी नेहरूंना तसे स्पष्टपणे विचारले सुद्धा होते.
काष्मीर प्रिन्सेस गमावले - या परिषदेत कम्युनिस्ट चीनने मात्र नेहरूंना आपण फारसे मानत/ मोजत नाही, हे जाणवून देण्याची एकही  संधी सोडली नाही. यावेळची एक घटना आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे अशी आहे. कम्युनिस्ट चीनच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन येण्याची जबाबदारी भारतावर होती. यासाठी भारताने काष्मीर प्रिन्सेस नावाचे विमान देऊ करून जठार नावाचे निष्णात पायलट यांना त्यांना घेऊन येण्याचे कामी नेमस्त केले होते. या विमानात टाईम बाॅम्ब ठेवून ते उडवून लावण्याचा कट विरोधकांनी रचला होता. याचा सुगावा कम्युनिस्ट चीनला लागला. पण आपणास काहीही माहिती मिळालेली नाही, अशाप्रकारे वावरत त्यांनी या विमानाच्या प्रवासाचे वेळापत्रक तसेच कायम ठेवत कटवाल्यांना बेसावध ठेवले. फक्त त्या विमानातून नेत्यांना न पाठवता दुय्यम दर्जाचे प्रतिनिधी ,पत्रकार, यांना प्रवास करू दिला. व चाऊ-एन-लाय व अन्य मोठी नेते मंडळी मात्र दुसऱ्या विमानाने बांडुंगला आली. काश्मीर प्रिन्सेस हे विमान ११ एप्रिल १९५५ रोजी बाॅम्बस्फोट होऊन पडले व जठारांसारख्या निष्णात पायलटाला व दीक्षित आणि कर्णिक या त्यांच्या सहकाऱ्यांना आपण मुकलो. चीनच्या या कृतीचे प्रतिपक्षाची चाल उधळून लावणारी एक यशस्वी प्रतिचाल म्हणून जगभरातील युद्धपंडितांनी कौतुक केले व कम्युनिस्ट चीनचा दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नालाही  यामुळे हातभार लागला. चाणक्य नीतीचा विचार केला तर आपणही याबाबत चीनला दोष देऊ शकणार नाही, हेही खरे. पण आपण उतावळेपणाने चीनला स्वत:हून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळावी म्हणून मनापासून झटत असतांना , ती राजवट चीनमध्ये स्थिरपद व्हावी, या इच्छेने वावरत असतांना चीनचा प्रतिसाद कसा होता, हे लक्षात घेणेही आवश्यक होते.
   अशा उदाहरणांची मालिकाच दाखवता येईल. तिबेटमध्ये इंग्रजांना सुझरेंटीचे अधिकार होते. त्यानुसार ल्हासा या तिबेटच्या राजधानीत सैन्य ठेवण्याचा अधिकार इंग्रजांना होता. सुझरेंटीचे स्वरूप स्पष्ट करून सांगण्याचा हा प्रसंग नाही, त्याची विषय स्पष्ट होण्यासाठी आवश्यकताही नाही. हे अधिकार ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर वारसा हक्काने आपल्याकडे आले पण परदेशात सैन्य ठेवणे व सुझरेंटीसारखा लोकशाहीशी विसंगत अधिकार स्वत:कडे ठेवणे हे आपल्या लोकशाहीनिष्ठ (की बावळट), समाजवादाची पाठराखण करण्याची उदात्त भूमिका घेऊन जगात शांतीचा संदेश घेऊन चालणाऱ्या ( की ज्या तिबेटचे चीनसारख्या लांडग्यापासून संरक्षण करता यावे म्हणून ब्रिटिशांनी जिद्दीने मिळवलेला अधिकार केवळ वारसा हक्काने मिळालेला असतांना भोळसटपणे स्वत:हून सोडून देणाऱ्या ) आम्ही तशी उघड व जोरकस मागणी नसतांनाही मनाचा पराकोटीचा उदारपणा दाखवीत सरळ सोडून दिला.
   भारत व तिबेट यांच्यामधील सीमारेषा (मॅकमहोन लाईन) ब्रिटिशांनी जवळजवळ पूर्ण करीत आणली होती. या विषयीच्या करारावर ब्रिटन व तिबेटच्या वतीने १९१४ मध्ये साक्षऱ्याही झाल्या होत्या. चीनची स्वाक्षरी होण्याची औपचारिकता तेव ढी राहिली होती.(अर्थात राष्ट्रवादी चीननेही खळखळ करीतच स्वाक्षरी केली असती पण स्वाक्षरी केली असती असे अभ्यासकांचे मत आहे). कम्युनिस्ट चीननेही ही रेषा आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणून आपल्याला बरीचशी मान्य असली तरी तिचे मॅकमहोन लाईन हे नाव मात्र आवडत व मान्य नाही असे म्हटले होते, तसेच तिबेट हे स्वतंत्र राष्ट्र नसल्यामुळे त्याच्या वतीने झालेल्या स्वाक्षरीला तसा अर्थ नाही, असाही आक्षेप घेतला होता. या सीमारेषेला असलेल्या मॅकमहोन लाईन या नावाला साम्राज्यवादी विचारसरणीचा दुर्गंध लागलेला आहे, असे म्हटले होते. जुलमी भांडवलशाही व सरंजामशाही राष्ट्रवादी चीनचे विद्यमान वारसदार म्हणून तुम्हाला सुरक्षा समितीत राष्ट्रवादी चीनची जागा (नकाराधिकाराह) चालते, नव्हे तो आपला अधिकारच आहे, असे तुम्हाला वाटते, पण मॅकमहोन लाईन या नावामुळेच ती तुम्हाला नकोशी व नावडती का आहे, वारसा हक्काने नुसते अधिकारच मिळत नाहीत, तर जबाबदारीही स्वीकारावी लागते, हे कम्युनिस्ट चीनला आडवळणाने तरी म्हणावे/ जाणवून द्यावे, असे यावेळी आपल्याला हे का सुचले नाही, हे कळत नाही. अपवाद होता बहुदा फक्त सरदार पटेलांचा. पण त्यांचे सावधगिरीचे इशारे अरण्यरूदन ठरले. तिबेटमध्ये सेना ठेवण्याचा अधिकार साम्राज्यवादी परंपरेचे प्रतीक स्वरुपाचा आहे म्हणून आपण सोडून देताच चीनने तिबेटवर आपली पकड पक्की करण्यास सुरवात केली. दलाई लामा या चीनच्या धर्मगुरूंना जिवाच्या भीतीने तिबेट सोडून १८ एप्रिल १९५९ ला भारतात आसाममधील तेजपूरला अमेरिकन गुप्त हेर संघटना सीआयएच्या मदतीने येऊन आश्रय मागावा लागला. तो आपण देताच चीनचा असा काही तिळपापड झाला की विचारूच नका. चीनने तिबेट खालसा केले. भारत व चीन या दोन महासत्तांमधले( नव्हे आपण त्यावेळी तरी आकारानेच मोठे होतो) तिबेट हे बफर स्टेट (दोन मोठ्या देशांच्या सीमा परस्परांना स्पर्श करू न देणारा छोटा देश) काळाच्या ओघात विलीन झाले. आणि भारत व चीनच्या सीमा एकमेकांना भिडल्या. पण या काळात चीन अत्यंत सावधपणे व समजुतदारपणे वागत होता. भारत व चीनमधला पंचशील करारही (२९ एप्रिल १९५४) या अगोदरच्या  काळातला कथाभाग आहे. गौतम बुद्धाचा शांततेचा, अहिंसेचा संदेश देणारी पाच तत्त्वे पंचशील म्हणून प्रसिद्धी पावली आहेत. आपणही जणु बुद्धाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे शांतीदूत आहोत असा आव आणित एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करायचा नाही या प्रमुख तत्त्त्वाशी मिळती जुळती पाच तत्त्वे असलेल्या एका खर्ड्यावर २९ एप्रिल १९५४ ला आपली स्वाक्षरी मिळविण्यात चीनने आंतरराष्ट्रीय राजनीतीतला एक  महत्त्वाचा टप्पा पार केला होता. १९५९ मध्ये दलाई लामा यांना आश्रय दिला हा आपल्या अंतर्गत कारभारात भारताने केलेला हस्तक्षेप आहे, असे चीन मानत असे.
  पुढच्या घटनाक्रम तर्काला अनुसरून घडलेला दिसतो. चीनच्या सीमारेषा ओलांडून घुसखोरी करण्याला आपण विरोध करताच सीमा ओलांडून आक्रमण करून आपल्याला लज्जास्पद पराभव पत्करण्यास १९६२ मध्ये चीनने भाग पाडले व आपण जागे होऊन युद्धसज्जतेच्या दिशेने प्रयत्नास लागणार हे पहाताच २१ नोव्हेंबर १९६२ ला शहाजोगपणे स्वत:च एकतर्फी युद्धविराम घोषित करून आपल्या शांतताप्रियतेची टिमकी वाजविली. आपल्या देशातील साम्यवादी मंडळीही मान वर करून भारताचेच कसे चुकले होते, साम्यवादी राष्ट्रे दुसऱ्या देशावर आक्रमण करीत नसतात, पहा चीननेच कशी स्वत:हून युद्धविरामाची घोषणा केली असे सांगण्यास मोकळी झाली.
  पाकव्याप्त काष्मिरमधील भूभागावर चीनला रस्ता बांधण्याची अनुमती देऊन पाकिस्थानने चीनशी संधान बांधले व आपल्या जखमेवर मीठ चोळले. साररूपात व ढोबळपणे मांडलेला हा कथाभाग असाच पुढे नेता येईल पण नवीन पिढीला चीनची ओळख व्हावी व जुन्या पिढीला जुन्या घटनांचा विसर पडू नये म्हणून, ही उजळणी.
  याला प्रतिसाद स्वरुपात पाकिस्थानची कड घेणे, भारताला सुरक्षा समितीत कायम सदस्य म्हणून प्रवेश देण्यास विरोध करणे, एनएसजीच्या सदस्यतेला विरोध करून अण्विक कार्यक्रमात खोडा घालणे यासारख्या भूमिका घेतल्या आहेत. सत्ताकारणाचे एक तत्त्व आहे, असे म्हणतात. ज्या शिडीला धरून तुम्ही चढता ती शिडी पहिल्यांदा लाथाडून दूर करायची असते. चीन आपल्या बाबतीत नेमके हेच करतो आहे. पण आताआता पर्यंत आपल्या डोळ्यांवर इतकी झापड होती की, कधीकधी तर रशियाने आपल्याला जागे केले आहे.
जी २० ची बैठक - पण मोदी हे एक वेगळेच रसायन आहे. चीनच्या पूर्व किनाऱ्यावरील हॅंगझोऊ शहरातल्या जी-२० बैठकीचे निमित्ताने चीनमध्ये असतांना दक्षिण चिनी समुद्र ही काही तुमच्या बापजाद्यांची जहागीर असल्यासारखे वागू नका, असेही खडसावले.चिनी नेत्यांना आपल्याला झोपाळ्यावर बसवून अगत्यपूर्वक बोलणारे मोदी असेही बोलू शकतात हे चीनला दाखवून दिले. तसेच शेजारच्या देशांमध्ये दहशतवादाचे विष पेरणाऱ्या, रक्‍तपात प्रायोजित करणाऱ्या, अतिरेक्‍यांना बळ देणाऱ्या पाकिस्तानला मदत करू नका, असेही ठणकावले. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपेक) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, हा भारताचा चिंतेचा विषय कसा आहे, हा मुद्दा मोदींनी याचवेळी चर्चे दरम्यान उपस्थित केला. व्हिएटनामशी शस्त्रास्त्रे विषयक करार चीनच्या नाकावर टिच्चून केला. घसघशीज रक्कम कर्ज म्हणूनही दिली. अमेरिकेशी शस्त्रस्त्रविषयक सागरी व सैनिकी सहकार्याचे करारही केले. शासकीय पातळीवर जे करायला हवे त्याला प्रारंभ झाला आहे. पण सामाजिक पातळीवरची स्थिती काय आहे?
   आज भारत चीनमध्ये व्यापार संबंध प्रस्थापित झाले आहेत. पण हे विषम आहेत. चीनचा माल आपल्या देशात जास्त खपतो, त्या प्रमाणात आपला माल चीनमध्ये खपत नाही. खुल्या व्यापाराचे तत्त्व मान्य केल्यावर देश म्हणून आपण काही म्हणू शकणार नाही. पण भारतीय जनता खूपकाही करू शकते. साधे पतंग,लसूण यासारख्या चीनमधून आयात होणाऱ्या वस्तू घ्यायच्या नाहीत, असे ठरविले तरी बरेच काही होण्यासारखे आहे. चिनी बनावटीचे  गणपती न घेण्याचे ठरविले तरी चीनला पाचसातशे कोटींचा फटका बसेल. पण सध्यातरी हे होणे आहे काय? ज्याने त्याने स्वत:ला प्रश्न विचारून उत्तर शोधावे हे चांगले.
    'जी-२० राष्ट्रांच्या बैठकीच्या मोदींनी चीनमध्ये आल्यावर  झिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीत मोदींनी त्यांच्याशी दहशतवादासह विविध मुद्द्यांवर मनमोकळी चर्चा केली. 'बऱ्याच प्रयत्नांनंतर चीन व भारताचे संबंध सुधारले आहेत. दोन्ही देशांमध्ये असेच संबंध राहावेत अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आहे. वादाच्या मुद्द्यावर योग्य दिशेनं पुढं जायला हवं,' असं झिनपिंग यावेळी म्हणाले.
  पंतप्रधान मोदी यांनीही झिनपिंग यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला. 'चीन व भारतानं परस्परांचा आदर राखायला हवा. दोन्ही देशांचे संबंध केवळ दक्षिण आशियासाठीच नव्हे तर जगाच्या दृष्टीनंही महत्त्वाचे आहेत,' असं म्हणत  मोदींनीही उचित प्रतिसाद दिला. किर्गिझस्तानातील चिनी दूतावासावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही मोदी यांनी यावेळी निषेध केला. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य होते. अंदर की बात काय आहे, हे मी जाणतो, हे दोघेही एकमेकांना सांगत होते. याला म्हणतात आंतरराष्ट्रीय राजनीती. ही माहिती अगोदरच्यांना माहीत नव्हती का? असे नव्हते. मात्र एक लहानशी गल्लत होत होता. ते बाहेर वापरायची नीती घरात वापरत होते आणि घरात वापरायची नीती बाहेर वापरत होते. चूक छोटीशीच आहे पण फरक केवढा पडला?

Saturday, September 3, 2016

हिलरी क्लिंटन यांच्यावर  ईमेल्स व क्लिंटन फाऊंडेशन बाबत होत असलेली टीका अन्याय्य व वाजवीपेक्षा कठोर असली तरी ती त्यांनी स्वत:च ओढवून घेतली असल्यामुळे त्यासाठी त्या स्वत:च जबाबदार आहेत, असे ज्येष्ठ स्तंभलेखक यूजीन राॅबिनसन यांचे मत आहे. याबाबत होत असलेली तपासणी व व निर्माण होत असलेल्या संशयाला त्या स्वत:च कारणीभूत आहेत.
ईमेल्सबद्दल बोलायचे झाले तर गेले अनेक महिने शोध घेतल्यानंतरही ठपका ठेवावा असे काहीही आढळून आलेले नाही. एफबीआय वर विश्वास ठेवायचा नसेल तर वेगळी गोष्ट आहे. पण नाहीतर ईमेल्स हाताळतांना महत्त्वाचे असे चुकीचे हाताळण्या प्रकार इतका गौण आहे की, सारासार विचार करणारा कोणीही प्राॅसिक्युटर हे प्रकरण पुढे नेईल,असे वाटत नाही. प्रतिकूल परकीय किंवा अन्य कुणीही या ईमेल्स हॅक केल्या नाहीत, असे एफबीआयला आढळले आहे.
   याचा अर्थ असा की, टीकाकार काहीही म्हणत असले तरी, हे प्रकरण इथेच संपायला हवे होते पण तसे झाले नाही. का? तर त्याला खुद्द हिलरी क्लिंटन यांच्या कृती व उक्ती कारणीभूत आहेत.    मुळात असे की, हिलरी क्लिंटन यांनी अधिकृत ईमेल अकाऊंट त्यांनी बाजूला सारायला नकोच होता. तसेच आपल्या खाजगी सर्व्हर वापरून त्यांनी खाजगी ईमेल अकाऊंट वापरायला नको होता. आपण सोयीचे म्हणून हा सामान्यत: निवडला नसता असा मार्ग निवडला या म्हणण्याला काहीही अर्थ नाही.
केवळ आपलेच नियंत्रण या पत्रव्यवहारावर असावे, अशी त्यांची भूमिका असावी.यादृष्टीने आपला खाजगी ईमेल अकाऊंट यादृष्टीने त्यांना सुरक्षित वाटला असावा. हे केवळ गोपनीयतेसाठी होते की आणखी काहीतरी लपवायचे होते? एक लक्षात ठेवायला हवे की, हितशत्रू गेल्या दशकापासून क्लिंटन कुटुंबियांच्या मागे लागलेले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या हाती काही लागू नये म्हणून ही काळजी हिलरी क्लिंटन यांनी घेणे अगदी स्वाभाविक आहे.
  पण मग असे सरळ म्हणून मोकळे व्हायचे ना, तर नाही. अगोदरच्या सेक्रेटरींनी जे केले तेच मी केले, असे म्हणून लोकांना पटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे खरे नव्हते. यापूर्वी कुणीही असे केले नव्हते. अशी सारवासारव हिलरी क्लिंटन का करीत आहेत, तेच कळत नाही.
  पण  ईमेल्समुळे बसलेले राजकीय चटके पाहता मी पुन्हा असे करणार नाही, हे त्यांचे म्हणणे योग्य वाटते.हा निर्णय या टीकेपोटी आहे की मनापासूनचा आहे? त्यापेक्षा ‘जे झाले त्याचे मला दु:खआहे.क्षमस्व’, असे म्हणणे योग्य झाले असते.
  क्लिंटन फाऊंडेशन व हिलरी क्लिंटन यांच्या भेटीचे वेळापत्रक हा मुद्दा तर याहूनही गौण आहे. बिल व हिलरी या उभयतांनी हे धर्मादाय फाऊंडेशन उभारले. आपला फार मोठा पैसा त्यात त्यांनी ओतला. त्याच्या कार्याची तारीफ टीकाकारह करतात. लक्षावधी गरीब एडग्रस्त लोकांना त्यांनी एचआयव्ही प्रतिबंधक औषधे विनामूल्य पुरविली. कोणताही शहाणा हे कार्य प्रशसंशनीय आहे, असेच म्हणेल. खुद्द् डोनाल्ड ट्रंप यांनीही क्लिंटन फाऊंडेशनला चांगली घसघशीत देणगी दिलेली आहे. याचा अर्थ या फाऊंडेशनचे कार्य चांगले आहे, हे त्यांना मान्य आहे. फाऊंडेशनला देणगी व हिलरी क्लिंटन यांचे सेक्रेटरी आॅफ स्टेट या नात्याने मेहेरनजर याची सांगड आज डोनाल्ड ट्रंप व विरोधक घालीत आहेत. हा आरोप माझ्या मते हास्यास्पद आहे कारण बहुतेक देणगीदार एवढ्या बड्या आसामी आहेत की त्यांनी तशीही भेट मिळालीच असती.
   बहारीनच्या राजपुत्राला भेट मिळावी म्हणून क्लिंटन फाऊंडेशनच्या माध्यमाचा आधार घेतल्याची माहिती आहे. पण तो देश अमेरिकेच्या लष्करी शृंखलेतील एक महत्त्वाचा मित्र आहे.
एक अडदांड व अपात्र व्यक्ती अध्यक्षपदावर दावा सांगते आहे. त्यामुळे हिलरी क्लिंटन यांनी ही निवडणूक जिंकलीच पाहिजे पण अनुभवाने शहाणेही झाले पाहिजे
एका धीरोदात्त मातृत्त्वाचे हिलरी क्लिंटन यास  खुले पत्र
वसंत गणेश काणे , 
२७२१, प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया 
९४२२८०४४३० 
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 
या पत्राच्या मूळ लेखिका हेलन विकर्ट या स्तंभ लेखिका या नात्याने कार्यरत असून त्यांच्या लेखाचा, भाषांतराच्या मर्यादेत व आशयाशी प्रामाणिक राहून केलेला हा काहीसा स्वैर अनुवाद आहे. मूळ पत्र वाचण्याची मजा काही औरच आहे. अनावृत पत्राचा नमुना, अमेरिकेतील महिलांच्या विश्वातील एक मतप्रवाह, निवडणुकीच्या राजकारणातील प्रचाराचा नमुना अशा अनेक दृष्टीने हे पत्र रंजक, मनोवेधक व बोधप्रद वाटावे, असे आहे.

प्रिय मिसेस क्लिंटन,
  अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन. इतिहासाने नोंद घ्यावी अशी ही घटना! स्त्रिमुक्ती चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा! स्त्रिला जखडणारी काचेची भिंत तू एकदाची भेदलीसच. पण यासाठी किती मूल्य चुकवावे लागले आहे? कल्पना आहे का?
   मी एका सुंदर मुलीची आई आहे. आपल्या जीवनाचे मोल अमोल आहे, अशी शिकवण तिला द्यावी. त्याचे मूल्य जगातील सर्व बाबींपेक्षा जास्त आहे, हे मला तिच्या मनावर बिंबवायाचे आहे. ईश्वराने तिला या भूतलावर एक विशिष्ट हेतू समोर ठेवून पाठविले आहे, असे माझे तिला सांगणे असते. या भूतलावरील आपल्या स्थानाबद्दल तिला कधीही शंका असू नये, यावर माझा कटाक्ष असतो.
एका प्रमुख राजकीय पक्षाने एका महिलेला, तिने जीवनात जे साध्य केले त्याची दखल घेत अध्यक्षपदासाठीची उमेदवारी बहाल करावी, ही घटना आपणा महिलांना साजरी करता यावी इतकी सनसनाटी स्वरूपाची ठरली असती तर किती चांले झाले असते बरे! जिचा आदर्श समोर ठेवावा, जिची प्रशंसा करावी, अशी एखादी व्यक्ती माझ्या मुलीसमोर ठेवता आली असती तर मला किती बरे वाटले असते म्हणून सांगू? पण माझे, माझ्या मुलीचे व देशातील असंख्य महिलांचे दुर्दैव असे की, मी हे करू शकत नाही.
  मिसेस क्लिंटन मला वाईट याचे वाटते की, केवळ माझ्या मुलीलाच नव्हे, तर सगळ्याच मुलींना - आणि तेही या देशातल्याच नव्हे तर सर्व जगातल्या- तू हे दाखविले आहे की, आपल्यावरचे या जगातले अदृश्य बंधन भेदायचे असेल तर तुम्हाला खोटं बोललं पाहिजे, फसवलं पाहिजे, शिव्या दिल्या पाहिजेत, अपमान केला पाहिजे, रुबाब कसला पाहिजे आणि दुर्लक्ष केले पाहिजे. स्वत:ला कमी लेखून तू इतरांनाही धोका देत आहेस. 
  आपल्या नवऱ्याला, तो आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात अनेकानेक महिलांवर घाला घालीत असतांना, त्यांना कमी लेखत असतांना तू त्याकडे कानाडोळा करून त्याला तसे वागू दिलेस हा आदर्श मी माझ्या मुलीसमोर ठेवू का? त्या महिलांची काहीच किंमत नव्हती का? मला सांग, असे तू करणार नाहीस, अशी मी आशा बाळगते. तू त्या महिलांच्या अधिकारांसाठी जशी भांडलीस, तशीच माझ्याही अधिकारांसाठी भांडणार आहेस का? असे तू करणार नाहीस, अशी मी आशा बाळगते. भगिनीभावाचे काय? आपल्या नवऱ्याची दुष्कृत्ये तू चव्हाट्यावर मांडलीस का? नाही. तू तसे केले नाहीस. उलट त्या दुष्कृत्य करणाऱ्याला तू बळ दिलेस आणि बळी पडलेल्यांना गप्प बसवलेस. तू हे सर्व कसे सहन करतेस ग? हेच का महिलांचे सबलीकरण? चांगलय!
समानतेच्या बाता मारतेस आणि आपल्याच हाताखालच्या महिला अधिकाऱ्यांना पुरुषांपेक्षा कितीतरी कमी पगार देतेस? जे देश आपल्या देशातील महिलांना वाईट वागवतात, त्यांना छळतात इतकेच नव्हे तर त्यांना ठार मारतात, तरीही त्या देशांकडून तू देणग्या स्वीकारतच असतेस? तरीही आपण कशा महिलांच्या समान हक्कांचा पुरस्कार करीत आहोत, अशा बाता मरत असतेस. दुहेरी मापदंड? नाही?
 अमेरिकेचे स्वप्न साकार व्हावे यासाठी अहर्निश झटणाऱ्या आमच्या सारख्यांशी जवळीक साधण्याचा तुझा खासा प्रयत्न सुरू असतो. पण संघर्ष काय चीज आहे याची तुला सुतराम कल्पना नाही. तुझे १२ हजार डाॅलर किमतीचे ते अर्मानी जाकीट? एका भाषणाची तुझी फी २ लक्ष ५० हजार डाॅलर? ह्या गोष्टी बरंच काही सांगून जातात. ढोंगबाजी नव्हे का ही?
 तुझा आदर्श ठेव आणि विसंबून रहा, असे मी माझ्या मुलीला कसं सांगू? अमेरिकन मुलांसमोर जिचा आदरेश ठेवावा अशी तू आहेस, असे तुला प्रामाणिकपणे वाटते का? माझी मुलगी बातम्या बघते. परदेशात अमेरिकनांवर हल्ले झाले, त्यांची कत्तल झाली हे तिच्या कानावर आहे आणि हे तुझ्या डोळ्यासमोर घडत असूनही तू काहीही न करता शुंभासारखी नुसती गप्प उभी राहिलीस? त्यांच्या रक्ताने तुझे हात डागाळलेले असतांना सर्व दोष इतरांवर ढकलण्याचा तू अटोकट प्रयत्न केलास? आणि वर तोंड करून सभागृहाला सांगितलेस, आता काय त्याचे? अप्रामाणिकपणा नव्हे का हा?
   या सगळ्याचा अर्थ असा होतो की, मिसेस क्लिंटन, तू महिलांची तारणहार नाहीस. या देशातील महिलांच्या माथी आपले खोटे नाणे मारण्याचा तुझा खटाटोप आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अनेकांना तो खरा वाटतो आहे. माझ्या व माझ्या मुलीच्या वतीने तू लढावस असं मला वाटत नाही. तुझ्या समोर फक्त एकाच महिलेचे हितसंबंध आहेत आणि ती महिला तूच आहेस. अमेरिका देश म्हणून एकसंध असावा यासाठी तू काहीही केलेले नाही. याउलट फूट पाडण्याचे मात्र खूप प्रयत्न केलेस. त्यात यशस्वीही झालीस. अभिनंदन! तू सत्तेसाठी हापापलेली अाहेस. सत्ता मिळविण्यासाठी तू कोणत्याही थराला जाशील. तू लुच्ची आहेस, भामटी आहेस तुझ्यामुळे देशाची मान खाली गेली आहे.
मिसेस क्लिंटन, खरी महिला कसे व्हावे, हे मला माझ्या मुलीला शिकवता यावे, ही माझी प्रार्थना आहे. सबल महिला. स्वाभिमानी महिला. निर्मात्याच्या नजरेतून जी स्वत:ला पाहू शकेल, अशी महिला. करुणा, दया, सेवा व निस्वार्थी भाव असलेली महिला. जी प्रामाणिक आणि समतोल वृत्तीची असेल आणि इतरांच्या अपेक्षांकडे लक्ष देणारीही.
   मिसेस क्लिंटन, तसं पाहिलं तर मी तुझे आभारच मानले पाहिजेत. माझ्या मुलीने कसे होऊ नये, हे तुझ्याकडे पाहून मला चांगले कळले आहे. आता तिने कसे व्हावे, ते दाखवण्याचे धैर्य मला प्राप्त होवो.
तुझी विश्वासू
हेलन विकर्ट
ताजा कलम.
  जाताजाता, भावी अध्यक्षासाठी, मग तो डोनाल्ड ट्रंप असो वा तू, मी ईश्वराचरणी प्रार्थना करते. ईश्वर आम्हाला असे करावयास सांगतो. तो कोणत्याही हृदयात सत्य आणि प्रामाणिकपणा निर्माण करू शकतो. 


मित्रवर्य प्रभाकर चांदे
ज्येष्ठ सहकारी व मित्र प्रभाकर उपाख्य बाबूराव चांदे यांचे देहावसान झाल्याचे वृत्त कानावर पडले आणि माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा कालखंड नजरेसमोर उभा राहिला. धरमपेठ शाळेत आम्ही अनेक वर्षे बरोबर काम केले होते. त्या निमित्ताने आम्ही चांगले मित्र झालो होतो. त्यांचा व्यासंग फार दांडगा होता. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना एक वेगळाच आनंद व समाधान वाटत असे. त्यांचे इंग्रजी विषयाचे ज्ञान उत्तम होतेआणि स्टेट्समन सारखी वृत्तपत्रे ते नियमितपणे वाचत. माझे वाचन सामान्यत: प्रादेशिक वृत्तपत्रापुरतेच असे. त्यामुळे त्यांच्या तोंडून स्टेट्समन किंवा टाईम्स आॅफ इंडिया सारख्या वृत्तपत्रातील बातम्या व लेखांवर आमचे बोलणे नित्यनियमाने होत असे. त्या काळी प्रसार माध्यमे आजच्या सारखी सहज आटोक्यात असलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या सोबतचा वार्तालाप मला खूपच महत्त्वाचा वाटत असे. ते वृत्तपत्रातही लिहीत असत. त्या निमित्ताने त्यांचे त्यावेळचे तरूणभारताचे संपादक श्री मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांचेशीही बोलणे व वार्तालाप होत असे. लेखक वर्तमानपत्रात  लेख लिहितांना उत्तरोत्तर अधिकाधिक कडक भाषा वापरू लागतो आणि त्यामुळे वृत्तकपत्रीय लेखनात हळूहळू टोकाची भाषा वापरण्याची लेखकाला कशी सवय लागते व त्यामुळे लेखात केवळ शिवराळपणा शिवाय दुसरे काही कसे आढळत नाही, याबद्दल श्री. बाबूराव यांनी त्यांचा कसा सोदाहरण पाठ घेतला घेतला हे त्यांनी मला बोलतांना सांगितले. विषय महत्त्वाचा होता म्हणून म्हणा, बाबूरावांनी शिकवलेला धडा त्यांना नेमका लागू पडत होता म्हणून म्हणा किंवा त्यांची सांगण्याची पद्धत परिणामकारक होती म्हणा पण हा मुद्दा माझ्या कायमस्वरुपी लक्षात राहिला आहे. आजही काही लिहून हातावेगळे केल्यावर ह्या गोष्टीचे स्मरण मला दरवेळी होते आणि लिहिलेल्या मजकुरावरून मी पुन्हा एकदा हात फिरवतो. 
 त्यांनी  घर बांधताना ग्काॅन्ट्रॅक्टर ग्राहकाला कसा बेजार करतो, या विषयावर लिहिलेले ‘विश्वासघात’ हे नभोनाट्य त्यावेळी विशेष गाजले होते.
पुढे बाबूराव कामठीच्या पोरवाल काॅलेजमध्ये गेल्यानंतर भेटी हळूहळू कमी होत गेल्या. आता एवढ्यात रस्त्यावरच भेटी व नमस्कार चमत्कार व्हायचे. बाबूरावांच्या हाती काठी असे. मी त्यांना म्हटले, ‘बाबूराव हातात काठी आली’. त्यावर ते म्हणाले, रस्त्यावरची कुत्री त्रास देतात. म्हणून ही काठी असते’. यावर मी हसलो आणि तेही हसले. 
त्यांची शेवटची आठवण म्हणून हा हसरा चेहराच यापुढे साथ देत राहील. 
  ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तेष्टांना त्यांच्या वियोगाचे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना.
वसंत गणेश काणे,     
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२हल्ली मुक्काम प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया  ९४२२८०४४३०    E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
झोपी गेलेल्याला जागे केले
वसंत गणेश काणे 


 ॲबर्डीन ॲसेट मॅनेजमेंट ही जगातील आर्थिक घडामोडींवर नजर ठेवणारी अभ्यासकांची यंत्रणा आहे, असे म्हटले तरी सध्यापुरते चालेल. ॲबर्डीनने नुकताच एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला असून त्याचे शीर्षक आहे, ‘इंडिया: दी जायंट अवेकन्स’. मोदी शासनाने हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांना मनापासून दाद देत एका महाशक्तीला जागे केल्याचे श्रेय हा अहवाल नरेंद्र मोदी व मोदी शासनाला देत आहे. 
 जुना निद्रिस्त राक्षस -  आजवर चीनला निद्रिस्त राक्षस (स्लिपिंग जायंट) अशी संज्ञा पाश्चात्य जगत देत असे. चिनी लोक अफीमबाज असून अहोरात्र अफूच्या अमलाखाली व्सनाधीन अवस्थेत असतात. या अर्थी हा शब्दप्रयोग होत असे. याला जागे करू नका, तसाच अफूच्या अमलाखाली निद्रिस्त अवस्थेत राहू द्या, कारण तो जर जागा झाला तर सर्व जगाला भारी पडेल, अशी भीती व्यक्त केली जात असे. या निद्रिस्त राक्षसाला माओने जागे केले. त्याच्या हाती बंदूक दिली, मनात चंगीजखानचा अरेराव, खुनशीपणा, अत्याचार ठासून भरला. याचा परिणाम आज जग बघते आहे. चंगीजखानबद्दल असे सांगतात की, तो महापराक्रमी तर होताच. पण एकानंतर एक प्रदेश तो पादाक्रांत करीत पुढे जातांना जिंकलेल्या प्रदेशातील पुरुषांना ठार करीत असे आणि स्त्रियांशी संभोग करून त्यांच्या उदरी आपले बीजारोपण करीत असे. आजची एक शास्त्रीय पाहणी असे सांगते की, युरोपमधील निम्म्या लोकांच्या रक्तामध्ये चंगाजखानचा डिएनए आढळतो.
दोन निद्रिस्त शक्तीतील मूलभूत फरक -  भारतही एक निद्रिस्त महाशक्तीच होती. राजकीय व मानसिक गुलामगिरीमुळे गलितगात्र झालेली. तिला जागे करण्याचे प्रयत्न शस्त्रधारण न करता शस्त्रसंन्यास घेऊन महात्मा गांधींच्या नेतृत्त्वाखाली जसे झाले तसेच शस्त्रधारण करून क्रांतिकारकांनी केले. परिणामत: भारत स्वतंत्र झाला पण परवशतेमुळे आलेली ग्लानी जात नव्हती. 
मोदी शासनची विशेषता - आज ही निद्रिस्त शक्ती मोदी शासन भारतात स्थिरपद झाल्यानंतर जागी होत आहे, असे ॲबर्डीन अहवाल सांगतो आहे. या अहवालाचे महत्त्व काहीसे वेगळे आहे. एखाद्या त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून झालेले निदान आणि आपला आपण घेतलेला आढावा यात नाही म्हटले तरी फरक पडतोच आणि असतोचही. मोदी शासनाच्या काळात झालेल्या सुधारणांची या अहवालात मुक्तकंठाने स्तुती केली असून मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख तसाच चढता कायम आहे, असे हा अहवाल म्हणतो. आर्थिक सुधारणांची गती मंदावली असून मोदींच्या लोरप्रियतेला ओहोटी लागल्याची हाकाटी या अहवालात साफ धुडकावून लावली आहे. केनेथ अकिंटेवे हे जनरल मॅनेदरपदावर असून त्यांनी भारतीय रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुरामन राजन यांच्याशी या विषयाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे/केल्याचे नमूद केले आहे. मोठमोठे बॅंकर्स व कार्पोरेट अधिकारी यांच्याशीही त्यांनी विचारविनिमय केला आहे. ते पुढे नमूद करतात की, मोदींची लोकप्रियता अक्षुण्ण असून आर्थिक सुधारणांमधील जोश तसाच कायम आहे. एका रचनात्मक बदलाच्या बीजारोपणाचे काम पूर्ण झालेले असून त्याची फळे आता दिसू लागतील.
माळेतील मुकुटमणी -  मेक इन इंडिया, स्वच्छ भारत, एफडीआय (फाॅरिन डायरेक्ट इंनव्हेस्टमेंट - परकीय भांडवलाची गुंतवणूक) अशी सुधारणा व उपक्रमांची मालिका नमूद करून याबाबत अहवालात आवर्जून उल्लेख केलेला आढळतो. जीएसटीला (गुड्स ॲंड सर्व्हिसेस टॅक्स - वस्तू व सेवा कर) तर या सर्वांचा मुकुटमणी म्हणून या अहवालात संबोधले आहे.
बदलांतील विशेषता -   सध्या भारताची स्थिती उत्तम असून हे आर्थिक बदल केवळ गरजेपोटी नव्हे तर व्यवस्थापनाचा एक प्रकार म्हणून या देशाने स्वीकारले आहेत. मोदी शासनाने भारताचा राजकीय व आर्थिक नकाशाच बदलून टाकला आहे. हा केवळ दोन वर्षात केलेला विक्रम आहे. या सुधारणांचे स्वरूप धडाकेबाज घोषणा यासारखे नसून ही थंड डोक्याने केलेली दीर्घकालीन उपाययोजना आहे. दर आठवड्याला कह्यात राहू न पाहणाऱ्या कोणत्या ना कोणत्या समस्येवर अभिनव पद्धतीने उपाययोजना केल्याचा अनुभव येतो आहे.
समस्या हाताळण्याचे अभिनव तंत्र - अजूनही बऱ्याच समस्या हाताळणे बाकी आहे, असेही हा अहवाल म्हणतो. पण मोदी शासन त्या समस्या सोडविण्याचे कामी जिद्दीने लागलेले आहे. जी समस्या सरळपणे सुटत नाही असे दिसते, त्या समस्येला वळसा घालून हे शासन पुढे जाते आहे. बरीच गुंतणूक आलेली असली तरी बरीच अजून येणे बाकी आहे. पायाभूत सोयी सुविधांमध्ये खूप बदल व्हावयास हवे आहेत. यावर उपाय म्हणून नरेन्द्र मोदींनी मेक इन इंडियाचा मार्ग चोखाळला आहे. यातून  पायाभूत सुधारणा घडून येतील व कारखानदारीचा पायाही घातला जाईल. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व कौशल्यांना वाव मिळून विकासही साधला जाईल. अशी थोडीथोडकी नव्हेत, तर निदान २५ उपक्षेत्रे सध्या दृष्टीला पडत आहेत.
 रघुरामन राघव यांनी रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून पार पाडलेले काम महत्त्वाचे होते, असे नमूद करून हा अहवाल म्हणतो, रघुरामन राघव यांची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल पण त्यांना पर्यायच नाही/नव्हता असे म्हणणे बरोबर नाही. महत्त्व आहे नीती निर्धारणाचे. ते पूर्ण झाले आहे.
 विश्वसनीय आर्थिक धोरण( क्रेडिबल माॅनिटरी पाॅलिसी), भाववाढीवर (इन्फ्लेशन) बारिक नजर, दिवाळखोरी याबाबतची कायदेशीर तरतूद पूर्ण झाली आहे. भारत ही केवळ स्वस्त बाजारपेठ नाही ती चांगली बाजारपेठ आहे. अरूण जेटलींनी सादर केलेले अंदाजपत्रक समधानकारक असून आता रिझर्व्ह बॅंक व्याजदर कमी करू शकेल.
 जी एस टी अर्थकारणातील महत्त्वाचा टप्पा ठरेल यात शंका नाही पण अनुकूल परिणामांसाठी दोन वर्षे वाट पहावी लागेल. राज्याराज्यात विकासाबाबत स्पर्धा (काॅम्पिटिटिव्ह फेडरॅलिझम) घडवून एक चांगला पायंडा पडतो आहे. मोदी शासनाचे हे आणखी एक वैशिष्ट्य ठरेल.
ॲबर्डीनचे स्थानमहात्म्य - स्काॅटलंडच्या ईशान्य दिशेला अॅबरडीन हे बंदर असलेले शहर डी व डाॅन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. पेट्रोलियम उद्योगामुळे हिला एका आंतरराष्ट्रीय नगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्व जगातील नागरिक या नगरीत आढळून येतील. 
नौकानयनाचा इतिहास, मासेमारी, खनीज तेल उद्योग याशी संबंधित वस्तूसंग्रहालय (म्युझियम) हे या लतत गजबजलेल्या बंदराचे वैशिष्य आहे.
ॲबर्डीन शहराला ग्रॅनाईट शहर असेही नाव आहे. कारण येथील अनेक इमारतींच्या बांधकामात ग्रे-स्टोन दगड वापरला आहे. १९ व्या शतकातले महाविद्यालय ही सुद्धा या शहराची ओळख आहे. १३ व्या व१७ व्या शतकातलेया खुणाही या शहराने जपून ठेवल्या आहेत.
सर्वच संपन्न शहरात अर्थकारणाशी संबंधित पथदर्शक केंद्रे असतात, असे नाही.भारतातलेच उदाहरण घ्याना. एकट्या मंगलोर शहराच्या टापूत अखिल भारतीय स्तरावर कार्य करणाऱ्या एक नाही दोन नाही तर पाच बॅंका जन्माला आल्या आहेत. तसेच हे ॲबर्डीन शहर. स्काॅटलंडही एक चिमुकला प्रदेश. स्काॅटलंड यार्ड हे नाव पोलिस खात्याशी संबंधित म्हणून अधिक परिचित व प्रसिद्धीच्या झोतात आहे/ निदान होते. 
ॲबरडीन ॲसेट मॅनेजमेंट ही जगातील आर्थिक घडामोडींवर नजर ठेवून असलेली एक दिग्गज यंत्रणा आहे. झोपी गेलेल्या भारताला मोदी शासनाने जागे केले असे जेव्हा म्हणते, तेव्हा त्याला विशेष महत्त्व प्राप्त होते कारण हे एका त्रयस्थ संस्थेने केलेले मूल्यमापन (थर्ड पार्टी इव्हॅल्यूएशन) आहे.


उशिराने सुचलेले शहाणपण की बदललेली रणनीती
वसंत गणेश काणे , 
२७२१, प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, 
पेन्सिलव्हॅनिया 
फ्लोरिडा हे अमेरिकेतील महत्त्वाचे राज्य आहे ते या दृष्टीने की निकालाला कलाटणी देणयाचे सामर्थ्य ज्या मोजक्या राज्यांमध्ये आहे, त्यात या राज्याचा समावेश होतो. या राज्याच्या वाट्याला २९ इलेक्टर्स आहेत. २००८ व २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाने या राज्यात ५० टक्यांपेक्षा जास्त मते घेतली होती म्हणून ‘विनर टेक्स अॉल’ या नियमानुसार डेमोक्रॅट पक्षाचे सर्व म्हणजे २९ इलेक्टर्स निवडून आले होते. २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाला जेमतेम एक टक्याची बढत मिळाली होती. हे राज्य २०१६ साली ५० टक्यापेक्षा जास्त मते मिळवून डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षकडे खेचून आणायचे आहे.
तुष्टिकरणाची राजनीती -   मेक्सिकोची सरहद्द ओलांडून बेकायदा प्रवेश करता येऊ नये म्हणून भिंत बांधण्याचा अट्टाहास जरी त्यांनी कायम ठेवला तरी मेक्सिकन मतदारांना खूष करण्याचा भरपूर प्रयत्न त्यांनी केला. 
 तुम्हाला सुख व समृद्धीचे जीवन जगता आले पाहिजे. रस्त्यावर चालतांना बंदुकीच्या गोळीला बळी पडू की काय अशी धास्ती वाटू नये. तुमच्या मुलांचा चांगल्या शिक्षणावर अधिकार असला पाहिजे. स्वत:च्या मालकीचे चांगले घर व चांगले जीवन जगायला तशीच चांगली नोकरी मिळायला हवी. अध्यक्षपदी निवडून आल्यावर मी हे घडवून आणीन. अशाच प्रकारचे आश्वासन त्यांनी आपल्या आफ्रिकन-अमेरिकन मतदांना दिले आहे. 
 तुष्टीकरण हे दुधारी शस्त्र असते, हे या राज्यात दिसून आले. भिंत घालून बेकायदेशीर रीत्या घुसणाऱ्या मेक्सिकन लोकांना थोपवण्याचा मुद्दा गोऱ्या अमेरिकन लोकांची (त्यातही सनातनी गोऱ्यांची) मते मिळवून देईल पण अशा प्रकारे आजवर येऊन नागरिक व मतदार झालेल्यांना दुखावेल. डोनाल्ड ट्रंप यांनी ही तारेवरची कसरत साधायचा प्रयत्न केलाय खरा पण दोन्ही डगरीवर हात ठेवण्याचा प्रयत्न किती फलदायी ठरला, हे ८ नोव्हेंबरलाच कळेल. 
याचवेळी ट्रंप यांनी डेमोक्रॅट पक्षावरही हल्ला चढवला. ते तुम्हाला गृहीत धरतात. माझ्या धोरणावुसार तुम्हाला तुमचा व्पारउदीम करता येईल, गाठी पैसा साठवता येईल. 
अमेरिकेत प्रचारसभा मैदानात न होता वातानुकूलित विशाल सभागृहात होत असतात. यावेळी तर बाहेर वीज वारावादळाचे थैमान सुरू होते आणि आत ट्रंप गर्जत होते. एवीतेवी त्यांनी आजवर तुमची उपेक्षाच केली आहे. मग मला मत देऊन का बघत नाही. तुमची सगळी दुखणी मी दूर करीन. अहो, हे माझे दुसरे घरच आहे. माझी अनेक रिझाॅर्ट्स फ्लोरिडामध्ये आहेत. 
बेकायदेशीर रीत्या घुसलेल्यांना बळजबरीने हद्दपार करीन, अशी ट्रंप यांची घोषणा होती पण तिचा उल्लेखही त्यांनी केला नाही. कारण त्यांचेच बरेच भाईबंद अशाच बेकायदेशीरपणे घुसून आता फ्लोरिडात मतदार झाले आहेत. हा धोरणातील नरमपणा समजायचा की कुठे काय बोलावे किंवा बोलू नये, याबाबतचे शहाणपण समजायचे?
स्विंग स्टेट्स २०१२ - या नंतर ट्रंप यांचे पाय वळणार आहेत ओहायओ (१८ इलेक्टोरल व्होट्स), नाॅर्थ कॅरोलिना, (१५ इलेक्टोरल व्होट्स),  पेन्सिलव्हॅनिया ( २० इलेक्टोरल व्होट्स) या स्विंग स्टेट्सकडे.
   ओहायओ या राज्याच्या वाट्याला १८ इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स असून २००४, २००८ व २०१२ साली अनुक्रमे रिपब्लिकन पक्ष, डेमोक्रॅट पक्ष व डेमोक्रॅट पक्ष यांना सर्वच्या सर्व म्हणजे १८ इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स  मिळाली होती.  २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाला दोन टक्याची बढत मिळाली होती. हे राज्य हे राज्य २०१६ साली ५० टक्यापेक्षा जास्त मते मिळवून डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षाकडे खेचून आणायचे आहे.
 नाॅर्थ कॅरोलिना या राज्याच्या वाट्याला १५ इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स असून २००४, २००८ व २०१२ साली अनुक्रमे रिपब्लिकन पक्ष, डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांना सर्वच्या सर्व म्हणजे १५ इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स  मिळाली होती. २०१२ मध्ये रिपब्लिकन पक्षाला २.२ टक्याची बढत मिळाली होती. ही बढत टिकवून हे राज्य २०१६ साली ५० टक्यापेक्षा जास्त मते मिळवून डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षकडेच टिकवून ठेवायचे आहे. 
 पेन्सिलव्हॅनिया या राज्याच्या वाट्याला २० इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स असून २००४, २००८ व २०१२ या तिन्ही साली  डेमोक्रॅट पक्षाला सर्वच्या सर्व म्हणजे २० इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स  मिळाली होती. २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाला भरपूर म्हणजे ५.२ टक्याची बढत मिळाली होती. हे राज्य २०१६ साली ५० टक्यापेक्षा जास्त मते मिळवून डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन   पक्षाकडे खेचून आणायचे आहे. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच कदाचित सध्या डोनाल्ड ट्रंप यांचा सूर एकदम बदलला आहे. त्यांची भाषा काहीशी मवाळ झाली आहे. डोनाल्ड ट्रंप यांना नरम राजनीतीचा साक्षात्कार होण्यामागचे हे जसे  एक कारण असावे तसेच याचे आणखीही एक कारण संभवते. ते आहे पुतळ्यांचे पीक.
  पुतळ्यांचे पीक -  ट्रंपना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरवात झाली आहे. अमेरिकेत पुतळेच पुतळे उभारण्यास सुरवात झाली आहे. या पूर्वी कधीही पाहिले नसतील असे पुतळे. कुणाचे म्हणाल तर डोनाल्ड ट्रंप यांचे.  मग त्यात विशेष काय? अहो, ते पूर्णाकृती पुतळे पूर्णपणे विवस्त्र आहेत. जणू असा आहे हा ट्रंप, असे पुतळे उभारणाऱ्यांना म्हणायचे आहे. अमेरिकेत संपूर्ण देशभर असे पुतळे रात्रीतून उभारले जात आहेत. अमेरिकन लोकांचीही कमाल आहे! काही त्यांच्यासोबत चक्क सेल्फी काढत आहेत!! पार्कांचे/ बगीच्यांचे/ रस्ते व्यवस्थापनाचे अधिकारी मात्र ते पुतळे तत्परतेने काढून/कापून टाकीत आहेत. कारण काय? तर पूर्वअनुमती न घेता पुतळे उभारले म्हणून. नग्न पुतळा उभारला म्हणून नाही? एक पुतळा कापून काढल्यानंतर पाय तसेच उरले तेव्हा एक महिला म्हणाली, ‘तेही घेऊन जा की, ते सुद्धा नकोत’.
टोकाचा प्रचार - रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीयपदाच्या अधिकृत उमेदवाराचे नग्न पुतळे देशभरातील मोठमोठ्या शहरात ठिकठिकाणी उभारले जात आहेत. कुणाच्या सुपीक डोक्यातील ही कल्पना आहे? त्या गटाचे नाव आहे इंडेक्लाईन. त्यांना ही कल्पना एका रिॲलिटी शो वरून सुचली. ‘दी ॲप्रेंटिस ‘, नावची ही टी व्ही रिॲलिटी सीरिज होती. ही सीरिज डोनाल्ड ट्रंप यांनी होस्ट केली होती, असे म्हणतात. त्या मालिकेतील एका दृश्यावरून पुतळे उभारण्याची ही कल्पना सुचली असावी, असा काहींचा अंदाज आहे. अमेरिकेतील राजकीय आणि सैनिकी सर्वोच्चपद डोनाल्ड ट्रंप यांना कधीही बळकावता येऊ नये, म्हणून आपली ही मोहीम आहे, असे या गटाचे म्हणणे आहे. यासाठी एका खास मूर्तिकाराची योजना करण्यात आली होती. डोनाल्ड ट्रंप यांचा चेहरा अतिशय उग्र व कडक असून पोट ढेरपोटे दाखविले आहे. डोनाल्ड ट्रंप यांची उमेदवारी अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध व शिवराळ व्यक्तिमत्त्वाची उमेदवारी आहे, असे या विवस्त्र पुतळ्यांच्या निमित्ताने या गटाला जनतेसमोर मांडायचे आहे. अमेरिकेत हे सर्व चालते. खुद्द ओबामा यांना ‘कुत्ता’ म्हणणार ‘ॲंकर्सही’ आहेत.
कधीकाळी ही भूमी आमची होती -  डोनाल्ड ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार समितीने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पुतळा तोडतांनाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. न्यूयार्कच्या डेमोक्रॅट मेयरची प्रतिक्रिया मासलेवाईक आहे. ‘ हे सर्व खूपच भीतिदायक आहे. तसे, कपडे परिधान केलेले डोनाल्ड ट्रंपही मला आवडत नाहीतच, म्हणा.’  पोलिस गोळीबारात ठार झालेल्या आफ्रिकन- अमेरिकन नागरिकांची नावे सुद्धा अन्य काही ठिकाणी विमानांच्या वापरात नसलेल्या धावपट्ट्यांवर लिहिलेली आढळतात. त्यासोबत मजकूर असतो,’कधीकाळी ही भूमी आमची होती’.
ही चाल नक्की कुणाची? -  तशीही आफ्रिकन-अमेरिकन व्होट बॅंक डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधातच आहे. यांची टक्केवारी दहा टक्क्याच्या आतच असेल. पण या निमित्ताने गोऱ्यांची व्होट बॅंक आपोआप तयार होत आहे, हे यांना कळत नसेल का? का तसे घडावे म्हणूनच हे प्रकार घडवले जात आहेत. राजकारण्यांचीही लीला अगाध असते, असेच सर्वसामान्यांनी म्हणावे, अशी स्थिती आहे खरी.
  टेम्प्टेशन नव्हे ट्रेम्प्टेशन -  ते काहीही असले तरी ट्रंप यांच्या प्रचार तंत्राला यश मिळताना दिसत आहे.  टेम्पटेशन हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे. जनमानसावर ट्रंप यांची जी मोहिनी पडते आहे तिला उद्देशून ‘ट्रंप्टेशन’ हा नवीन शब्द वृत्तसृष्टीने तयार केला आहे.
     सावधगिरीचा उपाय म्हणून म्हणा किंवा उद्या पराभव पदरी आला तर करावयाचे समर्थन म्हणून म्हणा, या निवडणुकीत पक्षपात होईल, असा कांगावखोर संशय ट्रंप वारंवार व्यक्त करीत आहेत. टीका करणाऱ्या पत्रकारांची ओळखपत्रे रद्द करण्याची धमकी तर ते सतत देत असतात. कारस्थानी, कपटी, खोटारडी, भ्रष्टाचारी अशी शेलकी विशेषणे हिलरी क्लिंटन यांच्यासाठी ते वापरतात पण मतदारांबाबत बोलतांनाचा त्यांचा कनवाळूपणा वाखाणण्यासारखा आहे. यात बेकायदा प्रवेश करणारे लक्षावधी स्थलांतरितही आता समाविष्ट आहेत. कारण त्यांचे एकेकाळचे तेवढेच भाईबंद आज अमेरिकेतील नागरिकत्व प्राप्त करून या निवडणुकीत मतदार झाले आहेत. पुतळ्यांचा विषय मात्र त्यांनी स्वत: व रिपब्लिकन पक्षाने सुद्धा अनुल्लेखाने टाळला आहे.  त्यामात्र  याउलट हिलरी क्लिंटन धापा टाकीत टाकीत नोकऱ्यांबाबत बोलत मध्यमवर्गीयांचा पाठिंबा मिळवण्याच्या खटाटोपात आहेत. ट्रंप यांची आश्वासने पोकळ आहेत अशी अलिप्त व कुंपणावरील रिपब्लिकन मतदारांची खात्री पटावी म्हणून   हिलरी क्लिंटन आपली योजना अभ्यासपूर्वक व  तपशीलवार मांडीत असतात. पण ही टाळी घेणारी वाक्ये नसतात. ट्रंप यांचे करभरणा विवरणपत्र जाहीर न करणे, श्वेतवर्चस्ववादी भूमिका, रशियाशी संधान या पलीकडे त्यांच्या टीकेची मजल जात नाही. टाळ्या व हशा मिळवत आणि भाषणादरम्यान श्रोत्यांचा प्रतिसाद मिळवत त्यांची करमणूक करण्याची क्षमता जास्त कुणात आहे? लक्ष खेचून घेण्याचे सामर्थ्य जास्त कुणात आहे? यात ट्रंप आघाडीवर आहेत.
  जास्त प्रसिद्धी ट्रंपच्या बाजूला -  ट्रंप यांनी नुकतेच एक टोमणा मारणारे विधान केले. रशियाने  हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल्स हॅक  कराव्यात असेही म्हटले. हिलरी क्लिंटन यांना राक्षसिणीची उपमा दिली. नाटोला असलेला पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचेशी त्यांचे सूत जुळतांना दिसते आहे. ज्या मुस्लिम- अमेरिकन जोडप्याचा मुलगा इराकमध्ये अमेरिकेच्या बाजूने लढतांना वीरगतीला गेला, त्यांच्याशी ट्रंप यांचे वंशपरंपरागत वैर दिसते. हे जोडपे डेमोक्रॅट पक्षाच्या अधिवेशनात उपस्थित झाले होते. हा ट्रंप यांना हिलरी क्लिंटन यांचा प्रसिद्धी स्टंट वाटला. वर्ल्ड ट्रेड सेंटर उध्वस्त झाल्यापासून अमेरिकन जनमत इस्लामविरोधी झाले आहे. त्यामुळे ट्रंप यांची ही चाल यशस्वी होतांना दिसते आहे. वृत्तसृष्टीही, नापसंती व्यक्त करीत का होईना, त्यांना चालता बोलता प्रसिद्धी देते आहे. त्या मानाने हिलरी क्लिंटन  यांची भाषा मवाळ असते. त्यांच्या मुद्देसूद भाषणांचे प्रसिद्धीमूल्य कमीच असणार. या विषम स्थितीमुळे वृत्तसृष्टीत द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे. अध्यक्षीय लढतीचे वृत्तसमालोचन कसे करायचे? एक धरसोड वृत्तीचा, बोलभांड आणि दुसरा व्यवहारवादी, प्रसिद्धीपासून दूर राहण्याची भूमिका घेऊन चालणारा, निरस तपशील मांडणारा असेल तर पत्रकारांनी काय करावे? दोघांनाही न्याय कसा द्यावा? खरे असे आहे की, मतदारांपैकी बहुतेकांचे मत अगोदरच निश्चित झालेले असते. फारच थोडे कुंपणावर असतात, पण तेच निवडणुकीचे भवितव्य ठरविणार आहेत. त्यांचे प्रबोधन कसे करावे? ट्रंप एकतर चुकीचे तरी बोलत असतात, नाहीतर शिव्या तरी देत असतात. सतत गर्जना करीत असतात.
 यावर एक उपाय आहे. ‘फेअरनेस डाॅक्ट्रिन’ अमलात आणावयास हवे. १९८७ पर्यंत रेडिओ व टीव्ही वर दोन्ही पक्षांना समसमान वेळ देण्याचे बंधन होते. पण ट्रंप यांची चुकीची व वादनिर्माण करणाऱ्या वक्तव्यांनाही तेवढाच वेळ देता येईल का? न्यूयाॅर्क टाईम्सचे तर म्हणणे असे आहे की ट्रंप यांच्या वाट्याला आलेल्या वार्तांकनाचे डाॅलरमधले मूल्य हिलरी क्लिंटन पेक्षा कितीतरी जास्त आहे. यासाठी त्यांना एक छदामही खर्च करावा लागलेला नाही. एक पक्ष जर सतत चुकीची विधाने वारेमाप करीत असेल तर त्यालाही तेवढाच वेळ मिळावा का, वृत्तपत्रात तेवढीच जागा मिळावी का? 

विशाल बलुचिस्थानच्या दिशेने पडणारी पावले?
वसंत गणेश काणे , 
२७२१, प्राईम रोज लेन नाॅर्थ, 
याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया 
  १९७१ मध्ये पाकिस्थानमधून जवळजवळ १ लक्ष ५० हजार चौरस किलोमीटर किंवा ५७ हजार चौरस मैल क्षेत्रफळाचा भूभाग कापला गेला. आता जे पाकिस्थान उरले आहे त्यातला ४० टक्के भाग बलुचिस्तान म्हणून ओळखला जातो. बलुची लोक इराण व अफगाणिस्थानातही आहेत. बलुची लोकांनी दिलेल्या सदिच्छांचा उल्लेख करून मोदींनी त्याचे आभार मानले आणि पाकिस्थानच्या अंगाचा तिळपापड झाला. अनेक वर्षांपूर्वी गुलाम मोहम्मद बलोच या बलुची नेत्याने बलोच नॅशनल मूव्हमेंट नावाची एक राजकीय संघटना स्थापन केली होती. बलुचिस्थान हा स्वतंत्र देश असावा, ही या नेत्याची भूमिका होती. या नेत्याचा २००९ साली पाकिस्थानी सुरक्षा दलांनी खून केला असे म्हणतात. मृत्यू अगोदर काही दिवसांपूर्वी त्याने अपहरण झालेल्या एका अमेरिकन नागरिकाची - जाॅन सोलेकीची - सुटका करून घेण्याचे कामी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बलोच नॅशनल मूव्हमेंटचे विद्यमान अध्यक्ष खलील बलोच यांनी मोदींचे ( जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे नेते नरेंद्र मोदी यांचे) आभार मानले आहेत. बलुचिस्थानमध्ये पाकिस्थान बलुचींचा वंशविच्छेद करीत असून मानवी हक्कांचे तेथे हनन होत आहे, असा खलील बलोच यांचा दावा आहे. मोदींनी लाल किल्यावरून १५ आॅगस्टला केलेल्या उल्लेखाला त्यांनी ‘एक सकारात्मक घटना’ म्हणून संबोधले आहे. त्यांनी आंतर राष्ट्रीय स्तरावर या घटनेची नोंद घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त करीत अमेरिका व युरोपने भारताचे अनुसरण करावे, अशी साद घातली आहे. ६८ वर्षे पाकव्याप्त बलुचिस्थानमध्ये गेली १६ वर्षे छळ आणि वंशविच्छेद याशिवाय दुसरे काहीही घडत नसल्याचे जगाच्या नजरेला पुन्हा एकदा आणून दिले आहे.  
आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे माहेरघर पाकिस्थान - आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादाचे माहेरघर पाकिस्थान आहे, असे सांगत त्यांनी तालीबान, लष्कर-ए- तोयबा, दाईश(इसीस), लष्कर-ए-खुरसन, लष्कर-ए- जांन्हवी यासारख्या धार्मिक कट्टरवाद्यांना पाकिस्थान केवळ पाठिंबाच देत नाही तर त्यांचे सबलीकरण करीत आहे, हे दाखवून दिले. सैनिकी प्रशिक्षण, वैद्यकीय, सैनिकी व आर्थिक मदत यासाठी हे घटक पाकिस्थानवर अवलंबून आहेत. त्याच्या नाड्या आवळाच्या असतील तर पाकिस्थानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दडपण आणण्याची आवश्यकता आहे, ही बाब  खलील बलोच यांनी नव्याने व्यक्त केली आहे. क्वेटा येथील सिव्हिल हाॅस्पिटलवरील हल्ला, बलुच व्यक्तींचे अपहरण आणि बलुच बहुल वस्त्यांवर हल्ले करतांना रासायनिक शस्त्रांचा वापर  करून पाकिस्थान बलुच राष्ट्रवादाला चिरडू पहात आहे. स्पिलिंजी व सायजी येथील जलसाठ्यात विष कालवून पाकी लष्कराने मानवी वंशासोबत सर्व प्राणी वंशही मृत्युमुखी लोटले. यामुळे पाऊस व नैसर्गिक जलसाठ्यावरच जनजीवन अवलंबून असलेल्या बलुचबहुल भागातील लोकांचे जगणेच पाकिस्थानने अशक्य केले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करणाऱ्या बलुच, चीनव्याप्त गिलगीत व पाकव्याप्त काष्मीरमधील लोकांचे मोदींनी आभार मानताच परागंदा होऊन जगभर  विखुरलेल्या  अनेक बलुच लोकांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे तसेच पाकिस्थानच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत.
 नेसेसरी सर्जिकल आॅपरेशन - तसे पाहिले तर स्वातंत्र्यदिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करणाऱ्यांचे आभार मानण्याशिवाय मोदींनी आणखी काहीही म्हटलेले नाही. पण पाकिस्थान हादरण्याचे एक मुख्य कारण हे असावे की पाकिस्थानला बांगलादेशच्या निर्मितीचा इतिहास आठवला असावा. पण इतिहास सांगतो की, बांग्लादेशातील मुक्तिवाहिनीला पाठिंबा देण्यावाचून दुसरा पर्यायच पाकिस्तानने शिल्लक ठेवला नव्हता. भारताची ती कृती परदेशातील राजकारणात ढवळाढवळ करण्याची नव्हती तर पाकिस्थानमधीलच एका भागाने दुसऱ्या भागात सुरू केलेला नरसंहार, अत्याचार, बलात्कार व लूट थांबवण्यासाठी तसेच त्यामुळे निर्वासितांचे भारतात येणारे लोंढे थांबवण्यासाठी केलेली आवश्यक वैद्यकीय शस्त्रक्रिया ( नेसेसरी सर्जिकल आॅपरेशन) स्वरुपाची होती. 
दोन भाषणे -  मोदींचे स्वातंत्र्यदिनी व्यक्त केलेले आभारप्रदर्शनपर उल्लेख हे औपचारिक नमस्कार- चमत्कारासारखे नव्हते, हे शेंबड्या पोरालाही समजेल. मोदींवर आगपाखड करणाऱ्यांनी ते मुद्दाम जाणवून देण्याची खरंतर आवश्यकता नव्हती. पण ही मंडळी १४ आॅगस्टचे आपले स्वातंत्रयदिनानिमित्तचे भाषण नबाब शरीफ यांनी काष्मीर भारतमुक्त करण्याला अर्पण केले होते, हे मात्र सोयीस्करपणे विसरत आहेत.
  बलुचिस्थान हा पाकिस्थानचा भाग आहे, त्यामुळे अशा वक्तव्यामुळे भारत आपल्या अंतर्गत प्रश्नाबाबत ढवळाढवळ करतो आहे, हा आरोप करण्यास पाकिस्थानला निमित्त मिळाले, अशी चिंता व्यक्त करणाऱ्यांना हे कसे कळत नाही की, पाकिस्थान काष्मीरप्रकरणी नेमके हेच करतो आहे. पण एवढेच या प्रश्नाचे मर्यादित स्वरूप नाही. वस्तुस्थिती नव्याने स्पष्ट होण्यासाठी थोडे मागे जावे लागेल.
पठाणांचा लढा व आपण केलेला विश्वासघात - वायव्य सरहद्द प्रांतातील पठाण नेते खान अब्दुल गफ्फार खान किंवा सरहद्द गांधी किंवा बादशहा खान हे वयाच्या ९८ व्या वर्षी २० जानेवारी १९८८ रोजी अल्लासदनी चिरविश्रांतीसाठी गेले.अहिंसक चळवळीचा हा पठाणपुरुष महात्मा गांधींचा निकटचा सहकारी होता. खुदाई खिदमतगार ही अहिंसक चळवळ उभारून त्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले होते. त्यांची बोधवचने पाहिली की, हा खान भारतीय विचारधारेशी किती जवळीक बाळगून होता, ते लक्षात येईल. 
बोधवचने - जो आपल्या कृतीने किंवा उक्तीने कोणालाही दुखावणार नाही तो मुसलमान अशी इस्लाम धर्माची शिकवण आहे.ईश्वरनिर्मित जीवसृष्टीच्या कल्याणासाठी व सुखासाठी जो झटतो तो मुसलमान. एखादा समज सुसंस्कृत आहे किंवा नाही, हे पहायचे असेल तर त्या समाजात स्त्रियांना कसे वागवले जाते ते पहा. सत्य, प्रेम व मानवतेची आणि ईश्वराची सेवा हा माझा धर्म आहे. प्रत्येक धर्म प्रेम व बंधुभावच शिकवतो. आजचे जग विनाश, हिंसा आणि द्वेशाच्या मार्गाने जात आहे. पण संयम आणि सत्यवादित्त्व यात अशी शक्ती आहे की ज्यापुढे कोणतीही सत्ता टिकाव धरू शकणार नाही. यासारखी त्यांची दहा वचने जगात प्रसिद्धी पावली आहेत. ती मुळातूनच वाचावीत अशी आहेत. भारतरत्न प्रदान करून ज्या दोन भारतीय नसलेल्या दोन महापुरुषांचा या देशाने गौरव केला त्यापैकी पख्तुन (पठाण) नेते  खान अब्दुल गफ्फार खान (१९८७) हे पहिले आणि आफ्रिकन नेते नेल्सन मंडेला(१९९०) हे दुसरे आहेत. या सर्व गोष्टींची उजळणी करणे ही नवीन पिढीसाठी जेवढे आवश्यक आहे, तेवढेच ते जुन्या पिढीसाठीही आवश्यक आहे, एवढे आपण या नेत्यांना विसरत चाललो आहोत. ही उजळणी करण्याचे दुसरेही एक कारण आहे. फाळणीच्या वेळी या अनभिषिक्त पख्तून नेत्याची म्हणजेच पर्यायाने सर्वच पख्तून जनतेची भारतात सामील होण्याची इच्छा होती. जर पाकिस्थानच्या दोन शकलांमध्ये हजारो मैलाचे अंतर असू शकते तर वायव्य सरहद्द प्रांत हा भारताचा दूरस्थ भाग का असू शकत नाही, असा त्यांचा आपल्या नेत्यांना सवाल होता. पण आपल्याला कधी एकदा सत्ताधीश होतो याची घाई झाली होती आणि आपण वायव्य सरहद्द प्रांताला अक्षरश: पाकिस्थानच्या घशात घातले. त्यावेळी तुम्ही आम्हाला लांडग्यांच्या तोंडी दिले, आम्हाला भारतात सामील व्हायचे होते, हा त्यांचा आक्रोश आजही हृदय हेलावून टाकील, असा आहे.  हा सर्व इतिहासही नव्याने सांगण्याची ही वेळ आली आहे.
 एक धर्म एक असेल तर तेवढ्या भरवशावर एक राष्ट्र उभे होत नाही/ करता येत नाही. युरोप हे जुने उदाहरण आहे. तर पाकिस्थान हे त्यातल्यात्यात नवीन उदाहरण आहे. मुस्लिम धर्मी सिंधी, पंजाबी, बलुची, पख्तून व बंगाली (तरी बरे की हे सर्व बहुतांशी सुन्नी आहेत) यांचे एक राष्ट्र झाले नाही/ होणार नाही. बांग्ला देश निर्माण झाला यामागचे हेही एक कारण आहे. उद्या सिंध व बलुचिस्थान वेगळे झाले तर त्यामागचेही हे एक प्रमुख कारण असेल. 
अमेरिकेतील अभ्यासातील एक निष्कर्ष- हे आपण म्हणून चालणार नाही. या विषयावर अमेरिकेत एक अभ्यास म्हणून  संशोधन व विचार सुरू आहे. पाकिस्थानचे आणखी तुकडे होणे आवश्यक आहे, असा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. जिये सिंध(सिंधू राष्ट्र), पख्तुनिस्थान,बलुचिस्थान निर्माण व्हायला हवे आहेत. 
विशाल बलुचिस्थान - एवढेच नव्हे तर विशाल बलुचिस्थानची कल्पना या अभ्यासात मांडली असून त्यात कोणकोणते भूभाग असावेत, हे दाखवणारा विशाल बलुचिस्थानचा नकाशाही काहींनी तयार केला आहे. यात इराण मधील सिस्तान, पाकिस्थानमधील बलुचिस्थान, अफगाणिस्थानमधील निमरूज प्रांतातील चहार हा जिल्हा, हेलमंद आणि कंदहार हे भाग सांस्कृतिक व वांशिक दृष्ट्या एकसारखे असल्यामुळे त्यांचे एक सलग राष्ट्र होऊ शकते. काही ऐतिहासिक कारणांमुळे या सगळ्यांचा धर्म इस्लाम आहे या एकाच कारणास्तव हे तीन वेगळ्या देशात असणे तेथील मानवमनाला मान्य होणारे नाही. ऐतिहासिक काळात ज्याने जो भाग जिंकला त्याने तो आपल्या राज्यास जोडला पण या कारणास्तव मानसिक जवळीक कशी निर्माण व्हावी? अमेरिकेच्या या भूमिकेला एक राजकीय कारणही आहे. बलुचिस्थानचया टोकाला समुद्राला लागून असले ग्वाडार हे बंदर बांधण्यासाठी चीन आपले वित्तबळ, मनुष्यबळ व तंत्रबळ देऊ करतो आहे. बलुचिस्थानातून या बंदराच्या साह्याने चीनला अरबी समुद्रात प्रवेश हवा आहे. शिवाय बलुचिस्थान हा नुसता भूभाग नाही तो नैसर्गिक वायू व खनिजांनी अतिसंपन्न असलेला प्रदेश आहे. यात कोळसा व गंधकासारखे अधातू व क्रोमियम, लोह यासारखे धातूही आहेत, हिऱ्यांनाही वाण नाही. मोदी जेव्हा या विषयाला हात घालतात तेव्हा काष्मीरचे तुणतुणे ऐकवणाऱ्या पाकिस्थानला त्याच्याच भाषेत दिलेले उत्तर एवढाच त्याचा अर्थ नाही तसे असते तर जगभरातील सिंधी, पश्तून, बलुचि लोकांनी ठिकठिकाणी जी निदर्शने केली ती केली नसती. उद्याची महासत्ता असलेला भारत आपल्या आसपास असणाऱ्या मानवांचे दु:ख, दारिद्र्य, हालअपेष्टा यांच्याकडे ठरवले तरी डोळे बंद करून पाहू शकणार नाही, असे ही निदर्शने सुचवीत आहेत. हे लोक आजचे कुणीही असले तरी एकेकाळचे आपले हे कुणीकरी होते, कधी काळी त्यांना आपला उपासना पंथ बदलावा लागला, म्हणून आपण त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही,  हे विसरून कसे चालेल?
पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती नक्की केव्हा झाली?
वसंत गणेश काणे , 
२७२१, प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, 
पेन्सिलव्हॅनिया 
  ग्रीनलंडमध्ये ३.७ दशलक्ष वर्षांपूर्वीचा जीवाष्म (फाॅसिल्स) आढळून आल्यामुळे पृथ्वीवर तिच्या निर्मितीनंतरच्या लगेचच्याच काळात ( किशोरावस्थेतच?) जीवसृष्टी निर्माण व्हायला प्रारंभ झाला असला पाहिजे, या विधानाला बळकटी आली आहे. अशीच प्रक्रिया मंगळावरही झाला असणार, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. सरावलेल्या नजरेला हे जीवाश्म चटकन लक्षात येत असले तरी सामान्य व्यक्तीला हा खडकावरचा एक थरमात्र वाटतो. हा स्ट्रोमॅटोलाईट नावाचा खडकाचा प्रकार असून सूक्ष्मजीवाणुंमुळे त्याची निर्मिती होत असते. हे सूक्ष्म जीवाणू उथळ समुद्रात वाढत होते. याकाळात पृथ्वी बरीच ‘ताजी’(फ्रेश) असावी, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे असून त्याची नोंद ‘नेचर’मध्ये आहे. नेचर हे संशोधाला वाहून घेतलेले साप्ताहिक आहे.
पुरावा मिळत नव्हता - यापूर्वीही शास्त्रज्ञांना अशा प्रकारच्या अस्तित्वाची शक्यता निरनिराळ्या रासायनिक पृथक्करणानंतर जाणवत होती, पण प्रत्यक्ष पुरावा हाती लागला नव्हता. जीवाष्माचे अस्तित्व हा त्याकाळच्या जीवाच्या अस्तित्वाचा पुरावा मानला जातो. तो आता मिळाला आहे.
योगायोगाने लागलेला शोध - ग्रीनलंड मधील एका ओसाड भूमीवर गेली तीस वर्षे संशोधन सुरू होते. योगायोग असा की यावेळी पाऊस खूप पडल्यामुळे जी धूप झाली तिचा परिणाम की, वर्षानुवर्षे कायम असलेला बर्फाचा थर वाहून गेला व खालची जमीन उघडी पडली. या ठिकणी उघड्या पडलेल्या खडकावर हा जीवाष्म आढळून आला आहे.
मंगळावरही जीवसृष्टी होती(?) - मंगळावर सुद्धा असेच स्ट्रोमॅटोलाईट प्रकारचे खडक दिसून येत आहेत. या खडकाचे स्वरूप थरावरथर असलेल्या ढिगाऱ्यांसारखे, स्तंभांसारखे किंवा पत्र्यांसारखे असते. पाणी आटून गेल्यावर असे खडक निर्माण होत असतात.सायनोबॅक्टेरिया नावाची एककोष वनस्पती प्रकाशसंस्लेषणाच्या (फोटोसिंथेसिस) साह्याने जगतांना आजही तलाव, उथळ पाणी, नद्या एवढेच नव्हेतर मातीतही वाढतांना दिसते.मंगळावर पाणी होते पण लवकरच ‘उडून’ गेले. पण हा लहानसा कालावधी सुद्धा सायनोबॅक्टेरियाची निर्मिती व्हायला पुरेसा आहे. मंगळावरही असेच थर दिसत आहेत. त्यामुळे मंगळावरील औटघटकेच्या जलसृष्टीतही सायनोबॅक्टेरियाने आपले पाय मंगळावर त्या कालावधीत रोवले असावेत, या शक्यतेची पुष्टी होते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.