Saturday, September 3, 2016

विशाल बलुचिस्थानच्या दिशेने पडणारी पावले?
वसंत गणेश काणे , 
२७२१, प्राईम रोज लेन नाॅर्थ, 
याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया 
  १९७१ मध्ये पाकिस्थानमधून जवळजवळ १ लक्ष ५० हजार चौरस किलोमीटर किंवा ५७ हजार चौरस मैल क्षेत्रफळाचा भूभाग कापला गेला. आता जे पाकिस्थान उरले आहे त्यातला ४० टक्के भाग बलुचिस्तान म्हणून ओळखला जातो. बलुची लोक इराण व अफगाणिस्थानातही आहेत. बलुची लोकांनी दिलेल्या सदिच्छांचा उल्लेख करून मोदींनी त्याचे आभार मानले आणि पाकिस्थानच्या अंगाचा तिळपापड झाला. अनेक वर्षांपूर्वी गुलाम मोहम्मद बलोच या बलुची नेत्याने बलोच नॅशनल मूव्हमेंट नावाची एक राजकीय संघटना स्थापन केली होती. बलुचिस्थान हा स्वतंत्र देश असावा, ही या नेत्याची भूमिका होती. या नेत्याचा २००९ साली पाकिस्थानी सुरक्षा दलांनी खून केला असे म्हणतात. मृत्यू अगोदर काही दिवसांपूर्वी त्याने अपहरण झालेल्या एका अमेरिकन नागरिकाची - जाॅन सोलेकीची - सुटका करून घेण्याचे कामी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बलोच नॅशनल मूव्हमेंटचे विद्यमान अध्यक्ष खलील बलोच यांनी मोदींचे ( जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे नेते नरेंद्र मोदी यांचे) आभार मानले आहेत. बलुचिस्थानमध्ये पाकिस्थान बलुचींचा वंशविच्छेद करीत असून मानवी हक्कांचे तेथे हनन होत आहे, असा खलील बलोच यांचा दावा आहे. मोदींनी लाल किल्यावरून १५ आॅगस्टला केलेल्या उल्लेखाला त्यांनी ‘एक सकारात्मक घटना’ म्हणून संबोधले आहे. त्यांनी आंतर राष्ट्रीय स्तरावर या घटनेची नोंद घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त करीत अमेरिका व युरोपने भारताचे अनुसरण करावे, अशी साद घातली आहे. ६८ वर्षे पाकव्याप्त बलुचिस्थानमध्ये गेली १६ वर्षे छळ आणि वंशविच्छेद याशिवाय दुसरे काहीही घडत नसल्याचे जगाच्या नजरेला पुन्हा एकदा आणून दिले आहे.  
आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे माहेरघर पाकिस्थान - आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादाचे माहेरघर पाकिस्थान आहे, असे सांगत त्यांनी तालीबान, लष्कर-ए- तोयबा, दाईश(इसीस), लष्कर-ए-खुरसन, लष्कर-ए- जांन्हवी यासारख्या धार्मिक कट्टरवाद्यांना पाकिस्थान केवळ पाठिंबाच देत नाही तर त्यांचे सबलीकरण करीत आहे, हे दाखवून दिले. सैनिकी प्रशिक्षण, वैद्यकीय, सैनिकी व आर्थिक मदत यासाठी हे घटक पाकिस्थानवर अवलंबून आहेत. त्याच्या नाड्या आवळाच्या असतील तर पाकिस्थानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दडपण आणण्याची आवश्यकता आहे, ही बाब  खलील बलोच यांनी नव्याने व्यक्त केली आहे. क्वेटा येथील सिव्हिल हाॅस्पिटलवरील हल्ला, बलुच व्यक्तींचे अपहरण आणि बलुच बहुल वस्त्यांवर हल्ले करतांना रासायनिक शस्त्रांचा वापर  करून पाकिस्थान बलुच राष्ट्रवादाला चिरडू पहात आहे. स्पिलिंजी व सायजी येथील जलसाठ्यात विष कालवून पाकी लष्कराने मानवी वंशासोबत सर्व प्राणी वंशही मृत्युमुखी लोटले. यामुळे पाऊस व नैसर्गिक जलसाठ्यावरच जनजीवन अवलंबून असलेल्या बलुचबहुल भागातील लोकांचे जगणेच पाकिस्थानने अशक्य केले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करणाऱ्या बलुच, चीनव्याप्त गिलगीत व पाकव्याप्त काष्मीरमधील लोकांचे मोदींनी आभार मानताच परागंदा होऊन जगभर  विखुरलेल्या  अनेक बलुच लोकांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे तसेच पाकिस्थानच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत.
 नेसेसरी सर्जिकल आॅपरेशन - तसे पाहिले तर स्वातंत्र्यदिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करणाऱ्यांचे आभार मानण्याशिवाय मोदींनी आणखी काहीही म्हटलेले नाही. पण पाकिस्थान हादरण्याचे एक मुख्य कारण हे असावे की पाकिस्थानला बांगलादेशच्या निर्मितीचा इतिहास आठवला असावा. पण इतिहास सांगतो की, बांग्लादेशातील मुक्तिवाहिनीला पाठिंबा देण्यावाचून दुसरा पर्यायच पाकिस्तानने शिल्लक ठेवला नव्हता. भारताची ती कृती परदेशातील राजकारणात ढवळाढवळ करण्याची नव्हती तर पाकिस्थानमधीलच एका भागाने दुसऱ्या भागात सुरू केलेला नरसंहार, अत्याचार, बलात्कार व लूट थांबवण्यासाठी तसेच त्यामुळे निर्वासितांचे भारतात येणारे लोंढे थांबवण्यासाठी केलेली आवश्यक वैद्यकीय शस्त्रक्रिया ( नेसेसरी सर्जिकल आॅपरेशन) स्वरुपाची होती. 
दोन भाषणे -  मोदींचे स्वातंत्र्यदिनी व्यक्त केलेले आभारप्रदर्शनपर उल्लेख हे औपचारिक नमस्कार- चमत्कारासारखे नव्हते, हे शेंबड्या पोरालाही समजेल. मोदींवर आगपाखड करणाऱ्यांनी ते मुद्दाम जाणवून देण्याची खरंतर आवश्यकता नव्हती. पण ही मंडळी १४ आॅगस्टचे आपले स्वातंत्रयदिनानिमित्तचे भाषण नबाब शरीफ यांनी काष्मीर भारतमुक्त करण्याला अर्पण केले होते, हे मात्र सोयीस्करपणे विसरत आहेत.
  बलुचिस्थान हा पाकिस्थानचा भाग आहे, त्यामुळे अशा वक्तव्यामुळे भारत आपल्या अंतर्गत प्रश्नाबाबत ढवळाढवळ करतो आहे, हा आरोप करण्यास पाकिस्थानला निमित्त मिळाले, अशी चिंता व्यक्त करणाऱ्यांना हे कसे कळत नाही की, पाकिस्थान काष्मीरप्रकरणी नेमके हेच करतो आहे. पण एवढेच या प्रश्नाचे मर्यादित स्वरूप नाही. वस्तुस्थिती नव्याने स्पष्ट होण्यासाठी थोडे मागे जावे लागेल.
पठाणांचा लढा व आपण केलेला विश्वासघात - वायव्य सरहद्द प्रांतातील पठाण नेते खान अब्दुल गफ्फार खान किंवा सरहद्द गांधी किंवा बादशहा खान हे वयाच्या ९८ व्या वर्षी २० जानेवारी १९८८ रोजी अल्लासदनी चिरविश्रांतीसाठी गेले.अहिंसक चळवळीचा हा पठाणपुरुष महात्मा गांधींचा निकटचा सहकारी होता. खुदाई खिदमतगार ही अहिंसक चळवळ उभारून त्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले होते. त्यांची बोधवचने पाहिली की, हा खान भारतीय विचारधारेशी किती जवळीक बाळगून होता, ते लक्षात येईल. 
बोधवचने - जो आपल्या कृतीने किंवा उक्तीने कोणालाही दुखावणार नाही तो मुसलमान अशी इस्लाम धर्माची शिकवण आहे.ईश्वरनिर्मित जीवसृष्टीच्या कल्याणासाठी व सुखासाठी जो झटतो तो मुसलमान. एखादा समज सुसंस्कृत आहे किंवा नाही, हे पहायचे असेल तर त्या समाजात स्त्रियांना कसे वागवले जाते ते पहा. सत्य, प्रेम व मानवतेची आणि ईश्वराची सेवा हा माझा धर्म आहे. प्रत्येक धर्म प्रेम व बंधुभावच शिकवतो. आजचे जग विनाश, हिंसा आणि द्वेशाच्या मार्गाने जात आहे. पण संयम आणि सत्यवादित्त्व यात अशी शक्ती आहे की ज्यापुढे कोणतीही सत्ता टिकाव धरू शकणार नाही. यासारखी त्यांची दहा वचने जगात प्रसिद्धी पावली आहेत. ती मुळातूनच वाचावीत अशी आहेत. भारतरत्न प्रदान करून ज्या दोन भारतीय नसलेल्या दोन महापुरुषांचा या देशाने गौरव केला त्यापैकी पख्तुन (पठाण) नेते  खान अब्दुल गफ्फार खान (१९८७) हे पहिले आणि आफ्रिकन नेते नेल्सन मंडेला(१९९०) हे दुसरे आहेत. या सर्व गोष्टींची उजळणी करणे ही नवीन पिढीसाठी जेवढे आवश्यक आहे, तेवढेच ते जुन्या पिढीसाठीही आवश्यक आहे, एवढे आपण या नेत्यांना विसरत चाललो आहोत. ही उजळणी करण्याचे दुसरेही एक कारण आहे. फाळणीच्या वेळी या अनभिषिक्त पख्तून नेत्याची म्हणजेच पर्यायाने सर्वच पख्तून जनतेची भारतात सामील होण्याची इच्छा होती. जर पाकिस्थानच्या दोन शकलांमध्ये हजारो मैलाचे अंतर असू शकते तर वायव्य सरहद्द प्रांत हा भारताचा दूरस्थ भाग का असू शकत नाही, असा त्यांचा आपल्या नेत्यांना सवाल होता. पण आपल्याला कधी एकदा सत्ताधीश होतो याची घाई झाली होती आणि आपण वायव्य सरहद्द प्रांताला अक्षरश: पाकिस्थानच्या घशात घातले. त्यावेळी तुम्ही आम्हाला लांडग्यांच्या तोंडी दिले, आम्हाला भारतात सामील व्हायचे होते, हा त्यांचा आक्रोश आजही हृदय हेलावून टाकील, असा आहे.  हा सर्व इतिहासही नव्याने सांगण्याची ही वेळ आली आहे.
 एक धर्म एक असेल तर तेवढ्या भरवशावर एक राष्ट्र उभे होत नाही/ करता येत नाही. युरोप हे जुने उदाहरण आहे. तर पाकिस्थान हे त्यातल्यात्यात नवीन उदाहरण आहे. मुस्लिम धर्मी सिंधी, पंजाबी, बलुची, पख्तून व बंगाली (तरी बरे की हे सर्व बहुतांशी सुन्नी आहेत) यांचे एक राष्ट्र झाले नाही/ होणार नाही. बांग्ला देश निर्माण झाला यामागचे हेही एक कारण आहे. उद्या सिंध व बलुचिस्थान वेगळे झाले तर त्यामागचेही हे एक प्रमुख कारण असेल. 
अमेरिकेतील अभ्यासातील एक निष्कर्ष- हे आपण म्हणून चालणार नाही. या विषयावर अमेरिकेत एक अभ्यास म्हणून  संशोधन व विचार सुरू आहे. पाकिस्थानचे आणखी तुकडे होणे आवश्यक आहे, असा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. जिये सिंध(सिंधू राष्ट्र), पख्तुनिस्थान,बलुचिस्थान निर्माण व्हायला हवे आहेत. 
विशाल बलुचिस्थान - एवढेच नव्हे तर विशाल बलुचिस्थानची कल्पना या अभ्यासात मांडली असून त्यात कोणकोणते भूभाग असावेत, हे दाखवणारा विशाल बलुचिस्थानचा नकाशाही काहींनी तयार केला आहे. यात इराण मधील सिस्तान, पाकिस्थानमधील बलुचिस्थान, अफगाणिस्थानमधील निमरूज प्रांतातील चहार हा जिल्हा, हेलमंद आणि कंदहार हे भाग सांस्कृतिक व वांशिक दृष्ट्या एकसारखे असल्यामुळे त्यांचे एक सलग राष्ट्र होऊ शकते. काही ऐतिहासिक कारणांमुळे या सगळ्यांचा धर्म इस्लाम आहे या एकाच कारणास्तव हे तीन वेगळ्या देशात असणे तेथील मानवमनाला मान्य होणारे नाही. ऐतिहासिक काळात ज्याने जो भाग जिंकला त्याने तो आपल्या राज्यास जोडला पण या कारणास्तव मानसिक जवळीक कशी निर्माण व्हावी? अमेरिकेच्या या भूमिकेला एक राजकीय कारणही आहे. बलुचिस्थानचया टोकाला समुद्राला लागून असले ग्वाडार हे बंदर बांधण्यासाठी चीन आपले वित्तबळ, मनुष्यबळ व तंत्रबळ देऊ करतो आहे. बलुचिस्थानातून या बंदराच्या साह्याने चीनला अरबी समुद्रात प्रवेश हवा आहे. शिवाय बलुचिस्थान हा नुसता भूभाग नाही तो नैसर्गिक वायू व खनिजांनी अतिसंपन्न असलेला प्रदेश आहे. यात कोळसा व गंधकासारखे अधातू व क्रोमियम, लोह यासारखे धातूही आहेत, हिऱ्यांनाही वाण नाही. मोदी जेव्हा या विषयाला हात घालतात तेव्हा काष्मीरचे तुणतुणे ऐकवणाऱ्या पाकिस्थानला त्याच्याच भाषेत दिलेले उत्तर एवढाच त्याचा अर्थ नाही तसे असते तर जगभरातील सिंधी, पश्तून, बलुचि लोकांनी ठिकठिकाणी जी निदर्शने केली ती केली नसती. उद्याची महासत्ता असलेला भारत आपल्या आसपास असणाऱ्या मानवांचे दु:ख, दारिद्र्य, हालअपेष्टा यांच्याकडे ठरवले तरी डोळे बंद करून पाहू शकणार नाही, असे ही निदर्शने सुचवीत आहेत. हे लोक आजचे कुणीही असले तरी एकेकाळचे आपले हे कुणीकरी होते, कधी काळी त्यांना आपला उपासना पंथ बदलावा लागला, म्हणून आपण त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही,  हे विसरून कसे चालेल?

No comments:

Post a Comment