Saturday, September 3, 2016

पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती नक्की केव्हा झाली?
वसंत गणेश काणे , 
२७२१, प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, 
पेन्सिलव्हॅनिया 
  ग्रीनलंडमध्ये ३.७ दशलक्ष वर्षांपूर्वीचा जीवाष्म (फाॅसिल्स) आढळून आल्यामुळे पृथ्वीवर तिच्या निर्मितीनंतरच्या लगेचच्याच काळात ( किशोरावस्थेतच?) जीवसृष्टी निर्माण व्हायला प्रारंभ झाला असला पाहिजे, या विधानाला बळकटी आली आहे. अशीच प्रक्रिया मंगळावरही झाला असणार, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. सरावलेल्या नजरेला हे जीवाश्म चटकन लक्षात येत असले तरी सामान्य व्यक्तीला हा खडकावरचा एक थरमात्र वाटतो. हा स्ट्रोमॅटोलाईट नावाचा खडकाचा प्रकार असून सूक्ष्मजीवाणुंमुळे त्याची निर्मिती होत असते. हे सूक्ष्म जीवाणू उथळ समुद्रात वाढत होते. याकाळात पृथ्वी बरीच ‘ताजी’(फ्रेश) असावी, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे असून त्याची नोंद ‘नेचर’मध्ये आहे. नेचर हे संशोधाला वाहून घेतलेले साप्ताहिक आहे.
पुरावा मिळत नव्हता - यापूर्वीही शास्त्रज्ञांना अशा प्रकारच्या अस्तित्वाची शक्यता निरनिराळ्या रासायनिक पृथक्करणानंतर जाणवत होती, पण प्रत्यक्ष पुरावा हाती लागला नव्हता. जीवाष्माचे अस्तित्व हा त्याकाळच्या जीवाच्या अस्तित्वाचा पुरावा मानला जातो. तो आता मिळाला आहे.
योगायोगाने लागलेला शोध - ग्रीनलंड मधील एका ओसाड भूमीवर गेली तीस वर्षे संशोधन सुरू होते. योगायोग असा की यावेळी पाऊस खूप पडल्यामुळे जी धूप झाली तिचा परिणाम की, वर्षानुवर्षे कायम असलेला बर्फाचा थर वाहून गेला व खालची जमीन उघडी पडली. या ठिकणी उघड्या पडलेल्या खडकावर हा जीवाष्म आढळून आला आहे.
मंगळावरही जीवसृष्टी होती(?) - मंगळावर सुद्धा असेच स्ट्रोमॅटोलाईट प्रकारचे खडक दिसून येत आहेत. या खडकाचे स्वरूप थरावरथर असलेल्या ढिगाऱ्यांसारखे, स्तंभांसारखे किंवा पत्र्यांसारखे असते. पाणी आटून गेल्यावर असे खडक निर्माण होत असतात.सायनोबॅक्टेरिया नावाची एककोष वनस्पती प्रकाशसंस्लेषणाच्या (फोटोसिंथेसिस) साह्याने जगतांना आजही तलाव, उथळ पाणी, नद्या एवढेच नव्हेतर मातीतही वाढतांना दिसते.मंगळावर पाणी होते पण लवकरच ‘उडून’ गेले. पण हा लहानसा कालावधी सुद्धा सायनोबॅक्टेरियाची निर्मिती व्हायला पुरेसा आहे. मंगळावरही असेच थर दिसत आहेत. त्यामुळे मंगळावरील औटघटकेच्या जलसृष्टीतही सायनोबॅक्टेरियाने आपले पाय मंगळावर त्या कालावधीत रोवले असावेत, या शक्यतेची पुष्टी होते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

No comments:

Post a Comment