Tuesday, February 21, 2017


अमेरिकेचा स्वदेशी जागरण मंत्र -  बाय अमेरिकन ॲंड हायर अमेरिकन
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
 २००८ मध्ये प्रथम अमेरिकेत जाण्याचा योग आला त्यावेळी अमेरिकेत बी अमेरिकन, बाय अमेरिकन, हा नारा बुलंद होतो आहे, असे ऐकले होते. प्रत्यक्षात अमेरिकन माॅल्समध्ये मात्र याचा प्रत्यय आला नव्हता. बाजारपेठा (माॅल्स) चिनी, बांग्लादेशी, व्हिएटनामी वस्तूंनी काबीज केल्याचे आढळले. खाउजा - म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचा हा परिणाम होता, असे म्हटले जायचे.
इतिहास काय सांगतो? - राष्ट्रीय हितसंबंध जपतांना उच्च ध्येयांना तिलांजली देण्याची आवश्यकता नसते, असे दाखले इतिहासात अनेक सापडतात. ॲनी-मारी स्लाॅटर या न्यू अमेरिका नावाच्या एका संस्थेच्या अध्यक्षा व प्रमुख कार्यकारी अधिकारीही आहेत. न्यू अमेरिका हा पक्षातीत भूमिका असलेला अमेरिकेतील एक विचार मंच आहे. त्या एक नामवंत लेखिकाही असून, दी आयडिया दॅट इज अमेरिका : कीपिंग फेथ विथ अवर व्हॅल्यूज इन ए डेंजरस वर्ल्ड, या लांबलचक नावाचा एक ग्रंथ लिहून त्यांनी तो नुकताच हातावेगळा केला आहे. आपण या ग्रंथाचा विचार का करायचा? याचे कारण असे की, अमेरिकन विचारवंत आजकाल जे विचार व्यक्त करीत असतात, त्यांची जातकुळी प्राचीन भारतीय विचारवंतांच्या जातकुळीशी मिळती जुळती आहे, असे वाटू लागते. स्वतंत्रपणे विचार करीत ते या विचारांप्रत येऊन पोचले असतील, तर ती त्यांच्यासाठी कौतुकाची बाब आहे. तसेच स्वतंत्रपणे व मुक्त वातावरणात विचारवंत जेव्हा विचार करू व मांडू लागततात, तेव्हा ते भारतीय विचारवंतांसारखेच विचार मांडू लागतात, ही आपल्यासाठी, समाधानाची व आनंदाची बाब वाटू लागते.
धुतल्या तांदळासारखे कोण आहेत? - अमेरिकेत नुकतेच जे जनमत मंथन अध्यक्षीय निवडणुकीच्या निमित्ताने घडून आले, त्याने विचारवंतांना हलवून सोडले आहे, काही तर हादरूनही गेले आहेत. डोनाल्ड ट्रंप रशियाच्या व्हाल्दिमीर पुतिनशी केवळ राजकीय हातमिळवणीच करीत आहेत, असे नाही, तर ती दोघे एकाच तात्त्विक पातळीवरही आले आहेत, या समजुतीने अमेरिकन विचारविश्वात एकच खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी नुकतेच बिल ओरिली याच्याशी मुलाखतीदरम्यान बोलतांना व्यक्त केलेले विचार या अस्वस्थतेच्या मुळाशी आहेत. कोण आहे हा बिल ओरिली? बिल ओरिली उर्फ विल्यम जेम्स हा अमेरिकन टेलिव्हिजन सूत्रधार (होस्ट), लेखक, पत्रकार, स्तंभलेखक व राजकीय वार्ताहर अशा निरनिराळ्या नात्यांनी बहुविध कार्यक्षेत्रात सव्यसाचित्त्वाने वावरत असतो. त्याची राजकीय टिप्पणी हा फाॅक्स न्यूज चॅनेलवरील एक नित्यनियमित कार्यक्रम असतो. त्याच्याशी झालेल्या वार्तालापात डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटले आहे की, मला हे मान्य आहे, की, पुतिन हे एक हत्यारे आहेत. पण असे अनेक हत्यारे आहेत, त्याचे काय?. शिवाय आपला देश सुद्धा याबाबत धुतल्या तांदळासारखा आहे काय?
अमेरिका फर्स्टला असलेली काळी पृष्ठभूमी - आजकाल अशी वृत्ते प्रिंट व सोशल मीडियाद्वारे वायुवेगाने पसरतात. यावेळीही तसेच झाले. तेव्हापासून निर्माण झालेल्या निषेधांच्या वावटळी शमण्याचे नावच घेत नसून अमेरिकेत एकच हलकल्लोळ माजला आहे. अमेरिका फर्स्ट हे डोनाल्ड ट्रंप यांचे हे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना दिलेले आश्वासन होते. त्याला अनुसरून बोलतांना वरील वाद निर्माण करणाऱ्या विधानाप्रत ते पोचले होते. चर्चेदरम्यान  डोना ल्ड ट्रंप म्हणाले की, इतर देशांच्या बाबतीत आपण चांगले/वाईट असे कोणतेच निदान करू नये. ते देश आपापल्या देशांच्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी त्यांना जे योग्य वाटते, ते करीत आहेत, आपणही तसेच करायला हवे. मुळात सर्व देशांची एकमेकांशी वागतानाची भूमिका हीच असते, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
विनाकारण वादंग - याबाबतची आपली भूमिका मांडतांना न्यू अमेरिकाच्य ॲनी-मारी स्लाॅटर यांचे म्हणणे असे आहे की, डोनाल्ड ट्रंप यांच्या  वरील विधानांमुळे एवढी अस्वस्थता का निर्माण झाली, याचा शोध घेतला पाहिजे. आपल्या देशातील डावीकडे किंवा उजवीकडेही झुकलेले समीक्षक अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणावर टीका करतांना यापेक्षा वेगळे काय म्हणत असत. इतर देशांवर टीका करण्यापूर्वी, त्यांच्यावर बंधने लादण्यापूर्वी, त्यांच्यावर आक्रमण करण्यापूर्वी, आपल्या पायाखाली काय जळते आहे, ते पहाना. इतर देशातील बंडांना आपण खतपाणी घातले आहे, त्या देशात हत्या घडवून आणल्या आहेत, निष्पाप नागरिकांना यमसदनी पाठविले आहे, विध्वंस घडवून आणला आहे, तिथल्या राजवटीतच नव्हे तर समाजजीवनातही अस्थिरता निर्माण केली आहे. आपल्या या पापांचे स्मरण आपल्याला असले पाहिजे.
अमेरिका फर्स्टची ऐतिहासिक पृष्ठभूमी - अमेरिका फर्स्ट या भूमिकेमागची मूलभूत तत्त्वे आपल्याला अमेरिकेने इतिहास काळात वेळोवेळी अनुसरलेली आढळतील, असे ॲनी-मारी स्लाॅटरम्हणत आहेत. अलेक्झांडर हेमिल्टन हा तर अमेरिकेच्या जन्मदात्यांपैकी एक होता, असे मानले जाते ना? अमेरिकन राज्यघटनेचा भाष्यकार म्हणून अख्खे जग त्याला ओळखते.अमेरिकन अर्थकारणाचा पाया त्याने घातला, असेी मानतात.
अमेरिकन राज्यघटना काय म्हणते? -  - थाॅमस जेफरसन तर डिक्लरेशन आॅफ इंडिपेंडन्सचा (अमेरिकन राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे यात अनुस्युत आहेत, अब्राहम लिंकनचे म्हणणे होते) लेखकच होता. यांचे देखील म्हणणे काय होते? अमेरिकेला स्वत:ची ओळख (अमेरिकन आयडेंटिटी) असली पाहिजे, असे हे दोघे म्हणत असत. परराष्ट्रीय धोरण हा नंतरचा व गौण विषय आहे. एक राष्ट्र म्हणून आपल्याला एका सूत्रात बांधणारे विचार व आपला ध्येयवाद ही अमेरिकेची खरी ओळख (अमेरिकन आयडेंटिटी) आहे व असली पाहिजे. 
तसे पाहिले तर अमेरिका हे राष्ट्रांचे राष्ट्र आहे, असे इतिहास सांगतो.  युरोपातील फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली या सारख्या राष्ट्रातून, आफ्रिकन देशातून, क्युबा व मेक्सिको इथून आलेल्या स्थलांतरितांनी हे राष्ट्र उभारले आहे. ते अनेक मानव समूहांचे बनलेले असले तरी आज मात्र  एक स्वतंत्र एकजिनसी राष्ट्र आहे.
अमेरिका फर्स्ट बाबत डोनाल्ड ट्रंप यांची भूमिका - डोनाल्ड ट्रंप नक्की काय म्हणाले आहेत, ते प्रथम पाहू. अमेरिका फर्स्ट बाबत दोन साधे निकष ते सांगतात. बाय अमेरिकन हा एक आणि हायर अमेरिकन हा दुसरा. म्हणजे काय? अमेरिकेत निर्माण झालेल्या वस्तू खरेदी करा व प्रथम अमेरिकन नागरिकांना नोकरीत घ्या. जगातील सर्व देशांबरोबर आम्हाला मैत्री व स्नेहाचे संबंध हवे अाहेत. पण असे करतांना आम्हाला जगाला हे सांगायचे आहे की, प्रत्येक देशाला आपल्या हितसंबंधांना प्राधान्य देण्याचा अधिकार आहे. तसेच आमची जीवनपद्धती आम्ही दुसऱ्यांवर लादू इच्छित नाही. पण ती कशी उत्तम आहे, याचे उदाहरण आम्ही अशाप्रकारे प्रस्तुत करीत राहू की ते पाहून इतरांनाही ती स्वीकारावीशी वाटेल. 
महत्त्व कशाला? - कोण बोलतंय व काय बोललं जातय यात आपल्याला भेद करता आला पाहिजे. काय बोललं जातंय, ते महत्त्वाचे आहे. अमेरिका फर्स्ट या शब्दप्रयोगाला एक ऐतिहासिक वर्णवर्चस्ववादी (ज्यू विरोधी) संदर्भ आहे, हे मान्य. या ऐतिहासिक संदर्भामुळे प्राप्त झालेला गर्भितार्थ बाजूला सारून आपण विचार करूया. आज तो संदर्भ बहुसंख्य अमेरिकनांनाही माहीत नाही. मग इतरांबद्दल तर बोलायलाच नको. ज्या नेत्यांवर आपला विश्वास आहे व ज्याला आपले समर्थन आहे, ते नेते नेमके हेच म्हणत असत, हे लक्षात घ्या, असे विधान ॲनी-मारी स्लाॅटर  यांनी केले आहे.
कुप्रसिद्ध ऐतिहासिक संदर्भ - अमेरिका फर्स्ट, या शब्दप्रयोगाला एक कुप्रसिद्ध ऐतिहासिक संदर्भ आहे. अटलांटिक महासागर आकाशातून एकट्याने पार करणाऱ्या चार्ल्स लिंडबर्ग या वैमानिकाने हा शब्दप्रयोग प्रथम योजला होता. त्याच्या मुलाचे अपहरण झाले होते. त्या मुलाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. पत्रकारारांनी तिला शतकातील सर्वात क्रूर हत्या ठरविले होते. पुढे युरोपात गेल्यावर तो हिटलरच्या प्रभावाखाली आला होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने अलिप्त रहावे, आपल्या पुरते पहावे (अमेरिका फर्स्ट) कारण  ब्रिटिश व ज्यू हे लोक सारखेच वाईट व दुष्ट आहेत, त्यांचा पुळका घेऊन लढू नये, अशी हिटलरच्या नेतृत्त्वाखालील जर्मनीची भूमिका होती.(ही संपूर्ण  कथा एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरावी, अशी आहे).
अमेरिका फर्स्टचे पाठीराखे - बाय अमेरिकन आणि हायर अमेरिकन हा आजचा नारा असला तरी ते प्राचीन अमेरिकन राष्ट्रवादी परंपरेतील एक टोकाचे पाऊल आहे. त्याला अलेक्झांडर हेमिलटन व थाॅमस जेफरसन या राष्ट्रपुरुषांच्या वैचारिक भूमिकेची पृष्ठभूमी आहे, हे विसरून चालणार नाही. अमेरिकन उद्योगांचे संरक्षण त्यात अभिप्रेत आहे. जरी जागतिक बाजारपेठेतील मनुष्यबळ अमेरिकन मनुष्यबळापेक्षा स्वस्त असले आणि त्याचा वापर केल्यामुळे जरी वस्तूंच्या किमती कमी होत असल्या तरी अमेरिकेने आपल्या मनुष्यबळाच्या हिताचा विचार प्रथम का करू नये?
बेकारी व आऊट सोर्सिंग - अर्थात, स्वयंचलनामुळे जेवढे कामगार बेकार झाले आहेत, तेवढे बाहेरून स्वस्तात  काम करून घेतल्यामुळे ( आऊट सोर्सिंग) झालेले नाहीत, असे अर्थशास्त्री व उद्योजक यांचे म्हणणे आहे आणि ते खरे आहे. पण व्यापार वाढला की आय वाढते. तिचे  न्याय्य वाटप होणे किंवा न होणे, हे आपल्या हाती आहे/असते. आपले शेजारी भिकारी आहेत, म्हणून कमी वेतनावर त्यांना काम करण्यास प्रवृत्त करण्याचे धोरण शेवटी जागतिक मंदीला कारणीभूत ठरेल. याचा अंतिम परिणाम म्हणून अमेरिकन मनुष्यबळही बेकार होईल. दुसरे असे की, अमेरिकेत उद्योग उभारणाऱ्यांनी अमेरिकेतील मनुष्यबळ वापरले पाहिजे, ही अट घालण्यात चूक ती कोणती? तसेच असे उद्योग उभारणाऱ्यांसाठी वेगळी कररचना केली, तर चुकले कुठे? यातून जी बचत होईल ती अमेरिकन राष्ट्रात सुबत्ता निर्माण व्हावी म्हणून का वापरू नये? निदान हा विचार ऐकून घ्यायला व त्यावर विचार करायला तरी नक्कीच हवा, असे ॲनी-मारी स्लाॅटर यांचे आग्रहाचे म्हणणे आहे.
प्रत्येक राष्ट्राचा मूलभूत हक्क - ‘आपले राष्ट्रीय हितसंबंध सर्वतोपरी मानणे हा प्रत्येक राष्ट्राचा हक्क आहे’, ही डोनाल्ड ट्रंप यांची भूमिका आहे. माजी रिपब्लिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे सल्लागार व अमेरिकन चाणक्य हेन्री किसिंजर यांचीही हीच वास्तववादी व रोखठोक/सडेतोड (ब्लंट) भूमिका होती. ती अशी की, जोपर्यंत संपूर्ण जगाचे असे सरकार अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत आपापले हित साधण्यासाठी राष्ट्राराष्ट्रात स्पर्धा ही असणारच. तेव्हा याबाबत अवाजवी व वेगळी नैतिक भूमिका घेणे व तसे दावे करणे ही एक धोकादायक फसवणूक ठरल्याशिवाय राहणार नाही. उजव्या व डाव्या अशा दोन्ही बाजूला झुकणाऱ्यांना नैतिक व व्यावहारिक अशा दोन्ही  दृष्टींनी ही वास्तवता मान्य असावयास हवी. आंधळेपणाने मोठ्या उद्दिष्टांच्या मागे धावणे हा नसता साहसवादच ठरण्याची शक्यता आहे. 
अमेरिकेची अपुरी व चुकीची धोरणे - खोट्या श्रेष्ठतेच्या, ज्येष्ठतेच्या नादाला लागून व्हिएटनाममधील भांडवलवादी शासनाला वाचवण्याच्या प्रयत्नात अमेरिकन रक्त विनाकारणच सांडले गेले, इराकमध्ये लोकशाहीवादी राजवट स्थापन करण्याच्या प्रयत्नात विध्वंस व विनाशाशिवाय दुसरे काहीही हाती लागले नाही. हेन्री किसिंजर यांच्या मते जगात आदर्श व्यवस्था निर्माण करण्याच्या हव्यासापायी अमेरिका पाच युद्धे लढली. त्यापैकी व्हिएटनाम, इराक व अफगाणिस्तान या देशातील युद्धे तिने मध्येच अर्ध्यातच सोडली. हा सर्व अपुऱ्या व चुकीच्या धोरणांचाच परिपाक होता.
परतफेडीचा एक वेगळा प्रकार - डिफ्युज रेसिप्राॅसिटी -  आंतरराष्ट्रीय संबंधात परतफेडीचे अनेक प्रकार असतात. अगदी प्राथमिक स्वरुपाचा प्रकार म्हणजे अ ने ब ला मदत केली. की ब ने अच्या मदतीची ताबडतोब परतफेड करायची. गेली साठ वर्षे अमेरिका व अन्य बडी राष्ट्रे यापेक्षा वेगळ्या प्रकारे मदत/व्यवहार करीत होती. अ ने ब ला मदत केल्यावर ब लगेच अ ची परतफेड न करता क ला वेगळ्याप्रकारे, क ड ला आणखी वेगळ्या प्रकारे मदत करायचा. शेवटी सर्व व्यवहारात अ ने दिलेल्या मदतीची परतफेड व्हायची पण ती वेगळ्या स्वरुपात असे. या प्रकाराला डिफ्यूज रेसिप्राॅसिटी असे म्हणतात. अमेरिकेतील दोन्ही पक्षांच्या राजवटीत हा प्रकार सुरू होता. यामागची तात्त्विक भूमिका अशी की, अशाप्रकारे जगात सुसंपन्नता/स्थिरता निर्माण झाली तर त्याचा फायदा मदत करणाऱ्या देशाला अप्रत्यक्षपणे होतच असतो. यातूनच भविष्यात स्थिर व मुक्त जागतिक अर्थकारण निर्माण होईल व ग्लोबल व्हिलेजची संकल्पना प्रत्यक्षात उतरेल, असे मानले जाते. डोनाल्ड ट्रंप यांना हा प्रकार बंद करायचा आहे.
ग्लोबल व्हिलेज कसे साकारेल? - पण अनेकांना ही पद्धत मान्य नाही. ग्लोबल व्हिलेजच्या दिशेने जायचे असेल तर १९४५ सालच्या म्हणजे जगातील दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वच व्यवस्थापनविषयक संस्थात  व तंत्रात बदल होण्याची आवश्यकता आहे. उदारणादाखल सांगता येईल की, बराक ओबामांचा सुद्धा नाटोमधील सदस्यांना आग्रह असे की, प्रत्येक सदस्य राष्ट्राने संरक्षण कार्यातील आपापला वाटा उचलला पाहिजे. मग तो खारीचा का असेना. सीरियातील युद्धात जगातील ३४ देश सहभागी आहेत, असे सांगतात. मोठा वाटा अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी यांच्यासारख्या बड्या राष्ट्रांचाच आहे व असणार, ही वस्तुस्थिती असली तरी मोजून ३४ राष्ट्रे ही लढाई लढत आहेत, हे विसरून चालणार नाही.  कदाचित काहींनी त्यातील काही लहान राष्ट्रांची नावेही ऐकली नसतील. कोणी प्रत्यक्ष लढत असेल तर, कोणी कपडे सांभाळीत असेल. पण ३४ राष्ट्रांचा सहभाग आहे, याचे एक वेगळे महत्त्व आहे व असते.
स्वातंत्र्याचे वारे व अमेरिका - डोनाल्ड ट्रंप यांची भूमिका अशी आहे की, अमेरिकेने आपली जीवनपद्धती इतरांवर थोपू नये. निरनिराळ्या प्रकारचे करारमदार करून पायात पाय अडकवू न घेऊ नयेत. स्वातंत्र्याचे वारे अमेरिकेच्या मदतीशिवायही जगात वाहू शकेल, असे थाॅमस जेफरसन या राष्ट्रपुरुषाचेही भाकित होते, याचे स्मरण ते या निमित्ताने करून देत आहेत. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पोलिसाची भूमिका वठवू नये. काय व्हायच्या त्या मारामाऱ्या होऊन जाऊ द्याव्यात. शेवटी विजय हा सर्वात  महत्त्वाचा. तोच सर्व गोष्टी न्याय्य ठरवीत असतो.
रांगडा नवराष्ट्रवाद - डोनाल्ड ट्रंप यांना अमेरिकेने देशभक्ती व रांगड्या (क्रूड) राष्ट्रवादाची कास धरावी, असे वाटते. हा अनेकांना नवराष्ट्रवादाचा उदय वाटतो आहे. आज जगात खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण माघारतांना दिसत आहे. या मार्गानेच जगातील सर्व राष्ट्रे एकमेकाशी प्रामाणिक राहतील, असे डोनाल्ड ट्रंप यांना वाटते आहे. अनेकांना नवराष्ट्रवादाची ही कल्पना मुळात मध्ययुगीन आहे, असे वाटते आहे. त्यांना प्रुशियाची (प्राचीन रशिया) आठवण होते. प्राचीन रशियातील (१८ वे शतक) टोळ्यांमध्ये या सारखा राष्ट्रवाद अस्तित्वात होता, असे मानतात. रशियातील हजारो शेतकर्यांना मातृदेशासाठी बलीदान करण्याची प्रेरणा  या राष्ट्रवादातून मिळत असे, असेही मानतात. 
नागरिकाच्या जीविताचे मोल जास्त - पण आता ही संकल्पना मागे पडली असून राष्ट्रीयत्त्वाचे नव्हे तर सर्व सामान्य नागरिकांच्या जीविताचे मोल वाढले आहे, असे म्हटले जाते. मुळात अमेरिकेची निर्मिती राष्ट्रवादाच्या संकल्पनेनुसार झाली नसून ती जगाच्या एकत्त्वाच्या संकल्पनेवर आधारित आहे, असे म्हणतात. म्हणूनच अमेरिका हे राष्ट्रांचे राष्ट्र आहे, असे म्हटले जाते. युरोपातील फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली या सारख्या राष्ट्रातून, आफ्रिकन देशातून, क्युबा व मेक्सिकोमधून आलेल्या स्थलांतरितांनी हे राष्ट्र उभारले आहे. ते मुळात अनेक मानवसमूहांचे बनलेले असले तरी आज मात्र एकजिनसी राष्ट्र आहे. सर्व मानव जन्माने समान आहेत. प्रत्येक मानवाला जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा व सुखाचा शोध घेण्याचा अधिकार आहे, या नवीन संकल्पनेत अभिप्रेत आहे. हे अधिकार आपल्याला राष्ट्रवादाच्या संकल्पनेतून नव्हे तर मानवतेच्या संकल्पनेतून मिळालेले आहेत. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची प्रयोगशाळा म्हणजे अमेरिका. भूतलावरील सर्वांना लोकशाही शासनव्यवस्था, कायद्यासमोर समानता व सर्वांना समान अधिकार प्राप्त व्हावेत, म्हणून हा अमेरिकन प्रयोग आहे.
सर्व थोर अमेरिकन अध्यक्षांनी या तत्त्वाचा अंगिकार केला होता. वुड्रो विल्सन हा त्यांचा मुकुटमणी शोभतो. अब्राहम लिंकन म्हणाला होता की, अमेरिका ही जगाची सर्वोत्तम व अंतिम आशा ( लास्ट बेस्ट होप आॅफ अर्थ) आहे, ते यामुळेच.
वुड्रो विल्सनचा उदोउदो अनेकांना मान्य नाही. ते त्याला दांभिक, वर्णवर्चस्ववादी, व खुजा मानतात. पण तो वेगळा मुद्दा आहे. जगातल्या इतर कुणापेक्षा आपण चांगले नव्हतो, हे मान्य करू या. इतरांसारखेच आपणही हत्यारे होतो. आपल्या चुका, उणिवा मान्य करीत आपण उच्च आदर्शांचा पाठपुरावा करू या. हेच अमेरिकेचे वेगळेपण असेल, असे म्हणत ॲनी-मारी स्लाॅटर समारोपाकडे वळतात.
अमेरिकन असणे म्हणजे नक्की काय?-  एखाद्या ध्वजाप्रती, भूभागाप्रती किंवा विशिष्ट मानव समूहाप्रती निष्ठा बाळगणे म्हणजे अमेरिकन असणे नव्हे. आपल्या निष्ठा यापेक्षा उच्च प्रतीच्या व श्रेष्ठ असल्या पाहिजेत. आपल्या निष्ठांनी वंश, वर्ण, उपासना पद्धती, लिंग, संस्कृती यांच्या नर्यादा ओलांडायला हव्यात. सर्वांची ओळख मानव म्हणून असावी व हेतू मानवाच्या कल्याणाचा असावा. अमेरिकेने आजवर या देशात व जगात भीषण प्रकार ( टेरिबल थिंग्ज) केले आहेत. अमेरिकेतील स्थानिकांचा वंशविच्छेद, हिरोशीमा व नागासाकी वरील अण्वस्त्र हल्ले, व्हिएटनामवरील सृष्टी निष्पर्ण करणारे नापाम बाॅम्बचे हल्ले यांचे स्मरण ॲनी-मारी स्लाॅटर यांना होत असावे, असे वाटते. इतरही असेच वाईट वागत होते, असे म्हणत आपण अशा वर्तनाला मान्यता देऊ शकणार नाही किंवा त्याचे समर्थनही करू शकणार नाही. असे जर आपण म्हणू लागलो तर आपल्यातले जे सर्वोत्तम आहे, त्याचाच आपण बळी देऊ व ज्याने आपल्याला श्रेष्ठत्त्व दिले आहे किंवा जे आपल्याला श्रेष्ठत्त्व देऊ शकणार आहे, त्यालाच पायदळी तुडवल्यासारखे (ट्रॅम्पल)  होणार आहे.
अमेरिकन समाजशास्त्रींचे हे विचारमंथन  ऐकले की, भारतीयांच्या विचारमंथनाने विचारांची ही मर्यादा केव्हाच ओलांडली होती, हे जाणवते. काही शतकांपूर्वी नव्हे सहस्रकांपूर्वी, विश्वातील सर्व उत्तम विचार आमच्याप्रत येवोत, ही ऋग्वेदातील प्रार्थना किंवा वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना आपल्याकडे केव्हाच रुजली व वाढली होती. अमेरिकन विचारविश्व सुद्धा याच दिशेने आता कुठे चालू लागणार अशी चाहूल, लागते आहे.


Sent from my iPad

No comments:

Post a Comment