Thursday, April 20, 2017

सत्ताबदलाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रशिया?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
 रशियन मतदार आपला नवीन अध्यक्ष प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने  मार्च २०१८ मध्ये निवडणार आहेत, असा आजचा निवडणूक कार्यक्रम सांगतो आहे. रशियन मतदार 
पहिल्या फेरीचे मतदान ११ किंवा १८ मार्च २०१८ ला करणार आहेत. कोणत्याही उमेदवाराला ५० टक्यापेक्षा जास्त मते न मिळाल्यास मतदानाची दुसरी फेरी तीन आठवड्या नंतर म्हणजे १ किंवा ८ एप्रिल २०१८ ला होईल. 
     पात्र कोण?- विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुन्हा निवडणूक लढविण्यास आता पात्र आहेत. रशियन लोकसभेत (ड्यूमा) व खालच्या स्तरावरील तत्सम कायदेमंडळात  ज्या राजकीय पक्षांना सध्या प्रतिनिधित्व आहे, ते पक्ष आपले उमेदवार अध्यक्षपदासाठी उभे करू शकतील. त्यांना यानिवडणुकीत भाग घेण्यास मुक्त द्वार ( फ्री ॲक्सेस) आहे. हे पक्ष आहेत, युनायटेड रशिया, कम्युनिस्ट पार्टी, लिबरल डेमोक्रॅट पार्टी, ए जस्ट रशिया व रोडिना ॲंड सिव्हिक प्लॅटफाॅर्म. स्वतंत्र उमेदवारांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांना हजारो मतदारांचा पाठिंबा दर्शक सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाला सादर करावे लागते. यातील सह्यांचे नमुनास्तरावर परीक्षण निवडणूक आयोग करतो व मग त्यांना निवडणूक लढविण्याची अनुमती मिळू शकते किंवा नाकारली जाते.
नोंदणीच नाकारलेला पक्ष - रिपब्लिकन पार्टी आॅफ रशिया उर्फ पीपल्स फ्रीडम पार्टी हा रशियातील उदारमतवादी व लोकशाही मानणारा राजकीय पक्ष आहे. याची स्थापना १९९० साली झाली. २००७ मध्ये या पक्षाची नोंदणी करून न घेता रशियन सुप्रीम कोर्टाने त्या पक्षाचे विसर्जन झाल्याचे जाहीर केले. या विरुद्ध या पक्षाने युरोपियन कोर्ट आॅफ ह्यूमन राईट्सकडे अपील केले.  नोंदणी करण्याचे नाकारणे ही अवैध बाब आहे, असा या कोर्टाने निर्वाळा दिला आणि २०१२ मध्ये या पक्षाला एक राजकीय पक्ष म्हणून पुन्हा नोंदवून घेण्यात आले. अशाप्रकारे रशियाच्या नाकावर टिच्चून नोंदणी मिळवणारा  व नोंदणीकृत झालेला हा पक्ष आहे.
अलेक्सी नॅवल्नीला निवडणूक लढविण्यास बंदी- २०१८ ची रशियन ड्यूमाची (पार्लमेंटची) निवडणूक लढविण्यास कंबर कसून उभ्या असलेल्या याच पार्टीच्या एका प्रमुख कार्यकर्त्याला - अलेक्सी नॅवल्नीला - निवडणूक लढण्यास मज्जाव करण्याचा निर्णय रशियन कोर्टाने दिला असून अलेक्सी नॅवल्नीने मात्र हा निर्णय राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. 
रशियन पद्धतीची कोर्टबाजी - आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. ही शिक्षा पाच वर्षांसाठी स्थगित (सस्पेंडेड सेंटेंन्स) आली आहे. यापूर्वीही अलेक्सी नॅवल्नीला अशी शिक्षा देण्यात आली होती. नवीन शिक्षा त्याच जुन्या शिक्षापत्राची सहीसही नक्कल ( १०० परसेंट काॅपी पेस्टेड) असल्याचे त्याने दाखवून दिले आहे.
 २००८ पासूनच अलेक्सी नॅवल्नीने भ्रष्ट पुतिन राजवटीविरुद्ध बंडाचा झेंडा लेख मालिकांची झोड उठवून  उभारला होता. त्यावेळी रशियाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर असलेल्या युरोपियन कोर्ट फाॅर ह्यूमन राईट्सने ही शिक्षा रद्दबातल ठरवतांना अलेक्सी नॅवल्नीला बचावाची वाजवी संधी दिली नसल्याचा ठपका ठेवला होता. हे निर्णय काय उलटसुलट येतील ते येवोत, असे म्हणत, सगळे मूग गिळून गप्प बसले असले तरी मी  मात्र २०१८ ची निवडणूक लढवीनच, असा दावा अलेक्सी नॅवल्नीने डिसेंबर २०१६ मध्ये केला होता. नुकतीच रशियन कोर्टाने अगोदरचा निर्णय बदलून त्याला रशियन निवडणूक लढविण्याची अनुमती दिली आहे. पण ही लढाई संपलेली दिसत नाही. 
 रशियन लोकांना उद्देशून अलेक्सी नॅवल्नी म्हणतो की, निवडणुकीच्या मार्गाने काहीही साध्य होणार नाही, हा तुमचा भ्रम आहे. अहो, १९९६ पासून या देशात निपक्षपाती निवडणुका झालेल्याच नाहीत, हे लक्षात घ्या. त्या एकदा का झाल्या ना, की परिस्थितीत बदल होतो की नाही ते पहा.
  २०११ मध्ये अलेक्सी नॅवल्नीने ॲंटि करप्शन फ्रंट स्थापन केला व एकेकेक कुलंगडी बाहेर काढण्यास सुरवात केली. त्याला मात देण्यासाठी आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप त्याच्यावरच लावून त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून सुरू आहे. कोर्टाने त्याची शिक्षा स्थगित केली असली तरी त्याच्यावर राजकारणात भाग घेण्याची बंदी मात्र कायम आहे. पण त्याच्या राजकीय पक्षाचे विसर्जन युरोपियन कोर्ट फाॅर ह्यूमन राईट्सने अवैध ठरविले आहे.
२०१५ मध्ये मतदारांच्या पुरेशा स्वाक्षऱ्या गोळा केल्यानंतर सुद्धा रशियन निवडणूक आयोगाने त्या पक्षाला निवडणूक लढविण्याची अनुमती दिलेली नाही.
‘१७ वर्षांची अनिर्बंध सत्ता उपभोगून आजचे सत्ताधारी मग्रूर झाले आहेत. त्यामुळे कितीही निर्भर्त्सना झाली तरी तिचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही’, असे अलेक्सी नॅवल्नी ठामपणे सांगतो आहे.
 ‘सध्याच्या सत्ताधाऱ्यांना फक्त स्वत:चे हितसंबंध जपण्यातच रस आहे. स्वत:चे आर्थिक हितसंबंध जपण्यातच ते इतके गुंतलेले आहेत की त्यांना देशाच्या हितसंबंधांबाबत काहीही देणेघेणे राहिलेले नाही. म्हणूनच त्यांना टीका सहन होत नाही की निवडणुकीच्या निमित्ताने कुणी विरोध करायला उभा ठाकलेला सहन होत नाही’, अशा शब्दात पराकोटीच्या असहिष्णुतेवर अलेक्सी नॅवल्नी सतत आसूड ओढीत असतो.
‘साम्यवादी म्हणवता, मग संपत्तीचे अवाजवी वाटप तुम्हाला कसे काय चालते? भ्रष्टाचाऱ्याचा विळखा सर्वव्यापी असून तो इतका घट्ट बसला आहे की, त्याच्या मगरमिठीतून न्यायालयेही सुटलेली नाहीत, ती केव्हा सुटतील ते सांगता येणार नाही. राजकीय परिवर्तन आज आवश्यक झाले आहे. युद्धावर व युद्ध सामग्रीच्या निर्मितीवर अवाढव्य खर्च करता आहात आणि देशाचे दैन्य दिवसेदिवस वाढते आहे, याची मुळीच चिंता नाही, याला काय म्हणावे?’ असा प्रश्न अलेक्सी नॅवल्नी विचारत असतो.  काळ कसा सूड घेतो याचे यासारखे चपखल उदाहरण सापडणार नाही. कारण नेमकी हीच वाक्ये एकेकाळी साम्यवादी मंडळी  ब्रिटन, अमेरिकेदी भांडवलशाही राष्ट्रांना उद्देशून बोलत असत.
‘अशा प्रकारच्या सत्तेच्या नशिबी व तिच्यासोबत सत्ताधीशांच्या नशिबीही शेवटी विनाश ठेवलेलाच आहे. हेच सर्व आता आपल्यासमोर घडते आहे/घडणार आहे. लोकहो, मला माहीत आहे की, हेच विचार तुमच्या मनातही जागृत झाले आहेत. पण तरीही तुम्ही शांत आहात. पण आता उघडपणे बोलण्याची/बजावण्याची वेळ आली आहे’. अलेक्सी नॅवल्नीच्या प्रचाराचा आशय वर नमूद केल्याप्रमाणे असतो. रशियन जनसागर वरून जरी शांत दिसत असला तरी त्याच्या अंतरंगात असा वडवानल आकाराला येतो आहे, असे जाणकारांचे मत आहे.
आजचे जनमत -  निवडणुकीला अजून जवळजवळ एक वर्षाचा अवधी आहे. सध्याच्या जनमत चाचणीनुसार व्लादिमीर पुतिन यांना ६६ टक्के लोकांची पसंती समोर आली आहे. पण निपक्षपातीपणे निवडणुका झाल्यास पुतिन यांचा पराभव विरोधी पक्षांनी एकत्रपणे पुरस्कारलेला उमेदवार करू शकेल, असे रशियातील व रशियाबाहेरील जाणकारांचे मत आहे. पण विरोधी पक्ष एकत्र येणे ही गोष्ट आवळ्यांची मोट बांधण्यासारखेच आहे/असते. पण ही हिंमत करून एक बहाद्दर उभा ठाकला आहे.  तो मात्र रशियाबाहेर आहे. कोण आहे तो?
विचित्र आडनाव- व्लादिमीर व्लादिमिरोव्हिच कारा-मुर्झाचा जन्म ७ सप्टेंबर १९८१ रोजी सुप्रसिद्ध रशियन पत्रकार व टेलिव्हिजन ॲंकर, ब्रेझनेव्ह या रशियन राज्यकर्त्याचा कठोर टीकाकार व सुधारणावाद व उदारमतवादाचा पुरस्कर्ता असलेल्या पित्याचा तसाच तडफदार सुपुत्र आहे. हे संपूर्णघराणेच रशियन क्रांतीशी संबंध राखून होते. प्रसिद्ध रशियन इतिहासकार व तत्त्वज्ञ सर्गे कारा-मुर्झाशीही याचा नातेसंबंध होता. रशियातील तातार या उच्चभ्रू खानदानाशीही याची वंशवेल जुळत होती. कारा-मुर्झा हे अाडनाव विचित्र वाटते. याचा शब्दश: अर्थ ‘काळा स्वामी’ असा होतो, असे म्हणतात.
 खुद्द व्लादिमीर पदव्युत्तर शिक्षण घेतलेला पत्रकार, सिनेनिर्माता, राजकारणी व लेखक म्हणून पुढे आला. पत्रकारिता तर त्याने वयाच्या १६ व्या वर्षीच सुरू केली होती. प्रगती करीत करीत तो बहुतेक जगन्मान्य पत्रकारितेत मानाचे स्थान मिळवता झाला. पण २०१२ मध्ये त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
कारा- मुर्झाचे अमेरिकेत वास्तव्य -  आर टी व्हि आय ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील रशियन व इंग्लिश भाषी दूरदर्शन वृत वाहिनी असून तिचे कार्यक्रम इस्रायल, जर्मनी व अमेरिकेतील रशियन भाषिकांसाठी प्रक्षेपित होत असतात. पत्रकार व राजकारणी असलेला व्लादिमीर, सार्वजनिक कार्यकर्ताही होता, त्याच्या सफाईदारपणे इंग्रजी बोलू शकण्याच्या कौशल्यामुळे तो नोकरीनिमित्त अमेरिकेतच बहुतेक काळ असे. व्लादिमीरचे अमेरिकेत चांगलेच बस्तान बसले होते. ही स्थिती २०१२ पर्यंत ठीक होती. पण त्या वर्षी अमेरिकेने मॅग्निट्सकी अॅक्ट पारित केला आणि सगळेच बदलले. कायदा पास केला अमेरिकेने आणि बडतर्फी होते करा- मुर्झाची?
मर्जी खपा होण्याचे कारण? - आता व्लादिमीरला रशियन वकिलातीत प्रवेश नाकारला गेला. याचे कारण रशियन राजदूतानेच असे सांगितले आहे की, व्लादिमीर आता पत्रकार राहिलेला नाही. आरटीव्हिआयने - रशियन वृत्त वाहिनीने - त्याला १ सप्टेंबर २०१२ ला नोकरीतून बडतर्फ केले. त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्यात आले. कोणतीही रशियन वाहिनी आता त्याला नोकरी देऊ शकणार नव्हती. याचे कारण काय होते म्हणाल तर ते होते अमेरिकेने पारित केलेला कायदा. कायदा अमेरिका पास करते आणि बडतर्फ होतो व्लादिमीर ? हा काय प्रकार? असा कोणता होता हा कायदा? त्या कायद्याचे नाव होते, सर्गेल मॅग्निट्स्की रूल आॅफ लाॅ अकाउंटिबिलिटी ॲक्ट, असे चांगले लांबलचक! एका रशियन व्यक्तीचे नाव असलेला अमेरिकन कायदा? हे काय गौडबंगाल?
कायद्याची पूर्वपीठिका - सुरवात थोडी अगोदर पासून केलेली बरी. सर्गेल मॅग्निट्स्की हा मास्को येथील एक रशियन कायदेपंडित होता. रशियातील करवसुली संबंधातील भ्रष्टाचाराचे एक भलेमोठे प्रकरण त्याने उजाडात आणले. लक्षात असे आले की, बहुतेक सर्व रशियन टॅक्स वसुली अधिकाऱ्यांचे हात या प्रकरणी बरबटले होते. या गौप्यस्फोटाची दखल घेण्याऐवजी सर्गेल मॅग्निट्स्कीलाच अटक झाली.  अतोनात छळ करून करून त्याला औषधोपचाराशिवाय ठेवण्यात आले, शेवटी त्याने तुरुंगातच प्राण सोडले. त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना अटक झाली नाही. अशाप्रकारे निर्दोष लोकांचा छळ करणाऱ्या व त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या व मानवतेचे हनन करणाऱ्या रशियन अधिकाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश (व्हिसा) नाकारण्यात यावा, असा या कायद्याचा आशय होता. असे जे कोणी अमेरिकेत असतील त्यांची संपत्तीही या कायद्याने जप्त होणार होती. हा कायदा भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या सर्वच रशियन अधिकाऱ्यांनाही लागू होणार होता. व्लादिमीर व्लादिमिरोव्हिच कारा-मुर्झाने या कायद्याचे स्वागत केले. या कायद्यामुळे येणारी बंधने पाहता आता रशियन अधिकारी भ्रष्टाचार करण्यापूर्वी दहादा विचार करतील, असे मत त्याने व्यक्त केले होते.
मानवी हक्क व रशिया -  मानवी हक्कांविषयीची  रशियाची बाजू सुरवातीपासूनच लंगडी व बेताबाताचीच राहिलेली आहे. त्यातच सर्गेल मॅग्निट्सकी सारख्याचा तुरुंगातच मृत्यू होणे व अमेरिकेने या संबंधात केलेल्या कायद्याला त्याचेच नाव देणे यामुळे रशियाची जगभर नाचक्की झाली व रशिया चांगलाच बिथरला. त्यातच व्लादिमीर व्लादिमिरोव्हिच कारा-मुर्झा सारख्या रशियन पत्रकाराने, या कायद्यामुळे रशियन अधिकाऱ्यांवर वचक बसेल, अशी टिप्पणी अमेरिकेत केल्यामुळे तर आगीत तेल ओतल्यासारखेच झाले.
पण व्लदिमीर व्लादिमिरोव्हिच कारा-मुर्झा एवढेच करून थांबला नाही. त्याने अमेरिकन काॅंग्रेसच्या ह्यूमन राईट्स कमीशन समोर २५ जुलै २०१२ ला साक्ष दिली. पारित केलेला कायदा रशियन जनतेच्या हिताचा आहे. यामुळे सामान्य रशियन नागरिकांच्या हक्कांचे व स्वातंत्र्याचे रशियात जे हनन होते आहे, ते करणाऱ्यांना आपल्या कृत्याची जबाबदारी स्वीकारून हिशोब द्यावा लागेल, असे विधान केले. 
 अमेरिकेसारखाच कायदा कॅनडा व यरोपियन युनीयननेही पारित करावा, असे अपील 
व्लादिमीरने केले. तो फ्रान्सलाही याच कामासाठी जाऊन आला. इकडे रशियाचा मात्र अक्षरशहा तिळपापड होत होता.
विषप्रयोग? -  होता होता २६ मे २०१५ चा दिवस उजाडला. व्लादिमीर मास्कोमधील एका रेस्टाॅरंटमध्ये दुपारचे जेवण घेऊन एका मीटिंगमध्ये सहभागी झाला असताना अचानक अस्वस्थ झाला. त्याला अचानक उलट्या होऊ लागल्या. हार्ट अटॅक असावा असे वाटून त्याला हृदयरोग तज्ञाकडे नेण्यात आले. त्याने व्लादिमीरचे हृदय ठणठणीत असल्याचा निर्वाळा दिला. आता शंका आली ती विषप्रयोगाची. ती खरी ठरली. व्लादिमीरवर  विषप्रयोग झाला होता!
मित्राच्या खुनाची आठवण -  या अगोदर २७ फेब्रुवारी २०१५ ला व्लादिमीरचा एक राजकीय सहकारी बोरिस नेमस्टोव्हचा काहीसा असाच खून झाला होता. याच काळात विषप्रयोगाची इतर उदाहरणेही समोर आली होती. व्लादिमीरची पत्नी येवगेनिया आता मात्र हादरली. उपचार व तपासणीसाठी व्लादिमीरला रशियाबाहेर हलवावे असा तिने धोशा लावला.
पण व्लादिमीर बरा झाला. रिपब्लिकन पार्टी आॅफ रशिया ही पीपल्स फ्रीडम पार्टी या व अशा सार्थ नावानेही ओळखली जाते. तिने जाहीर केले की, व्लादिमीर कोमातून बाहेर आला आहे व त्याने आपल्या पत्नीला ओळखले आहे. हळूहळू व्लादिमीर बरा झाला. आजाराचे कारण मात्र गुलदस्तातच राहिले. लवकरच ड्युमाच्या - रशियन पार्लमेंटच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या निपक्षपातीपणे व्हाव्यात यासाठी व्लादिमीर आग्रह धरू लागला, प्रचार करू लागला. 
दुसरा विषप्रयोग? - २ फेब्रुवारी २०१७ ला व्लादिमीरला तोच त्रास पुन्हा सुरू झाला. यावेळी त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवरच ठेवावे लागले. लक्षणे तीच, दवाखाना तोच, उपचार करणारी डाॅक्टरांची चमूही तीच. १९ फेब्रुवारीला त्याला डिसचार्ज देण्यात आला. आता मात्र त्याला रशियाबाहेर हलविण्यात आले. संभाव्य विषप्रयोगाच्या चौकशीची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली. या अगोदरची मागणी रशियात फेटाळण्यात आली होती. रशिया बाहेरच्या प्रयोगशाळांनी मात्र हळूहळू परिणाम करणारा विषप्रयोग असे निदान केले आहे.
भ्रष्टाचारात बुडालेला रशिया -  रशिया सध्या भ्रष्टाचारत पार बुडाला असून खालून वरपर्यंत म्हणजे अगदी अध्यक्ष पुतिन पर्यंत ही शृंखला अस्तित्वात आहे, असा आरोप केला जातो. शासकीय कर्मचाऱ्यांना रशियात पगार फारच कमी आहेत, असे म्हटले जाते. पण कुणाचीही तक्रार नसते. कारण जवळजवळ प्रत्येकाची वरकमाई इतकी असते, की पगार मुळीच न दिला तरी चालेल, असे विनोदाने व वक्रोक्तीने म्हटले जाते. रशियन जनता मात्र या प्रकारामुळे पार वैतागली आहे. पण रशियन गुप्तहेर संघटनेची व लष्कराची पकड इतकी पक्की आहे की, मोर्चे/निदर्शने यापेक्षा जास्त प्रभावी लढे अशक्यच असतात. ही मगरमिठी सहजासहजी सुटणारी नाही. खुद्द पुतिन गुप्तहेर संघटनेतून एकेक पायरी चढत आज अध्यक्षपदी विराजमान आहेत. आता लवकरच  म्हणजे मार्च/एप्रिल २०१८ मध्ये रशियात निवडणुका होऊ घातल्या आहेत. काहीही झाले तरी पुढची सहा वर्षे आपणच अध्यक्षपदी कसे राहू, यासाठी पुतिन कंबर कसून उभे ठाकले आहेत. पण संपूर्ण रशियात असंतोषाची आग धुमसते आहे. व्लादिमीर व्लादिमिरोव्हिच कारा-मुर्झा सारखे इतर अनेक बाहेरून बत्ती देण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. तर आत रशियात अलेक्सी नॅवल्नीची ची मुलुख मैदान तोफ जनसामान्यांना सावध करण्यासाठी उभ्या झालेल्या एक चळवळीचे प्रतिनिधित्त्व करीत आहे. व्लादिमीर व्लादिमिरोव्हिच कारा- मुर्झा हा या चळवळीतूनच उदयाला आलेला एक मोहरा मानला जातो. निवडणुका रीतसर झाल्या तर हा पक्ष भ्रष्टाचाराच्या एकाच मुद्यावर बाजी मारेल, असा अंदाज आहे. त्यातच रशियन तरुणाई यांच्या पाठीशी उभी आहे. तरुणाईने मनावर घेतले तर ती काय करू शकते, हे सांगायला हवे काय? पण  येनकेनप्रकारेण पुतिन निवडून आलेच तर? तर मात्र स्फोट अटळ असेल. नक्की काय होते ते यथावकाश कळेलच. त्यासाठी वाट पाहण्याशिवाय सध्या तरी दुसरे काही करण्यासारखे नाही

No comments:

Post a Comment