Sunday, September 24, 2017

अशी होते जर्मनीत चान्सेलरची निवड.

अशी होते जर्मनीत चान्सेलरची निवड.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
  जर्मनीत ॲंजेला मर्के ल यांचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनीयन ब्लाॅक हा पक्ष  33 टक्के मते मिळवून सत्तेवर आला आहे. 2013 च्या तुलनेत या वेळी पक्षाची टक्केवारी घटली असली तरी ॲंजेला मर्के ल याच सर्वात लोकप्रिय नेत्या ठरल्या आहेत. तर त्यांचा कडवा विरोधी असलेल्या उजव्या एएफडी (आल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी) पक्षाला सभागृहात प्रथमच प्रवेश मिळाला आहे.  त्या पक्षाला 13  टक्के मते मिळाली आहेत. ही फारच मोठी मजल आहे. वर्णभेदाचा पुरस्कार करणारा व मध्यपूर्वेतील निर्वासितांना/परागंदा मुस्लिम लोकांना जर्मनीत प्रवेश देऊ नये, ह्या मताचा आग्रह असलेला हा पक्ष आहे. या पक्षाला पूर्वीच्या कम्युनिस्ट प्रशासित पूर्वजर्मनीत 21 टक्के तर पश्चिम जर्मनीत 11 टक्के मते मिळाली आहेत. अशाप्रकारे संपूर्ण जर्मनीत मात्र 13 टक्के मते आहेत. जगभर सर्वत्र उजवे पक्ष जास्त मते घेऊ लागले आहेत. त्याला जर्मनीही अपवाद नाही. पण याउलट ॲंजेला मर्केल यांच्या पक्षासोबत आघाडी करणाऱ्या मार्टिन शुल्झ यांच्या सोशल डेमोक्रॅट पक्षाची स्थिती अत्यंत व अभूतपूर्व इतकी वाईट झाली आहे. ख्रिश्चन सोशल युनीयन हा पक्षही रिंगणात होता पण त्याला ॲंजेला मर्केल यांच्या पक्षाला मागे टाकता आले नाही.
  दिनांक 24 सप्टेंबर 2017 ला जर्मनीत पुढील चार वर्षांसाठी सर्वोच्च सभागृहातील सदस्यांची निवडणूक पार पडली. जर्मनीत मतदार आपला चान्सेलर प्रत्यक्ष मतदानाने निवडत नाहीत. यासाठी एक वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण पद्धती स्वाकारण्यात आली आहे.
निवडणुकीची वेगळी पद्धती - जर्मनीची 16 राज्ये व  प्रत्येकी 2 लक्ष 50 हजार मतदार असलेले 299 जिल्हे अशी विभागणी केलेली आहे. रविवारी (या वेळी 24 सप्टेंबर) ला प्रत्येक मतदाराच्या हाती पडणाऱ्या मतपत्रिकेत दोन रकाने असतात. उजव्या रकान्यात बंडस्टॅग ( पार्लमेंट) मध्ये आपले प्रतिनिधित्त्व कोण करणार ते नोंदवायचे असते, तर डाव्या रकान्यात आपल्या पसंतीच्या राजकीय पक्षाची निवड करायची असते. सर्व राजकीय पक्षांची नावे असलेला डावा रकाना सर्व मतदार संघात सारखाच असतो. तर उजव्या रकान्यातील उमेदवारांची नावे मतदारसंघनिहाय वेगवेगळी असतात.  ज्यांना इतरांपेक्षा जास्त मते ते उमेदवार त्या त्या मतदार संघातून निवडून येतात. असे 299 उमेदवार निवडून आले आहेत. या जागांना डेरेक मॅनडेट  (प्रत्यक्ष निवडून आलेले) असे नाव आहे.
  याशिवाय आणखी 299 जागा प्रत्येक पक्षाला जेवढी मते मिळाली असतील त्यानुसार/ त्या प्रमाणात त्या त्या पक्षाला मिळतात. यांना झिस्टिमे म्हणतात. मात्र यासाठी पक्षाला किमान 5 टक्के मते किंवा 3 जागा मिळाल्याच पाहिजेत. यामुळे पक्षांच्या भाऊगर्दीला आळा बसतो व स्थिर शासन मिळू शकते. समजा एखाद्या पक्षाचे 2 वा 3 च उमेदवार निवडून आले व पण देशभर त्या पक्षाला मिळालेली मते मात्र  5 टक्यापेक्षा कमी असतील तर पक्षाला मिळालेली मते विचारत घेतली जात नाहीत पण निवडून आलेल्या उमेदवारांची निवड मात्र अबाधित राहते. सर्व पक्षांना आपल्या उमेदवारांची यादी निवडणुकीअगोदर निवडणूक आयोगाला द्यावी लागते व ती प्रसिद्धही केली जाते. या यादीतून क्रमवारीने, पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागा पक्षाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार निश्चित करतात.
चान्सेलरची निवड - या दोन्ही प्रकारे निवडून आलेले 598 सदस्य चान्सेलरची निवड करतात. सामान्यत:  ज्या पक्षाला बहुमत मिळालेले असते, त्याचा प्रतिनिधी किंवा त्या आघाडीचा प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून निवडला जातो. बहुमताची खात्री असलेले पक्ष किंवा आघाड्या आपला चान्सेलरपदाचा उमेदवार कोण असेल ते मतदानाअगोदरच जाहीर करतात. यानुसार अॅंजेला मर्केल व पीअर स्टीनब्रुक यांची नावे मतदाना अगोदरच जाहीर झाली होती. चान्सेलरपदासाठीचा उमेदवार वयाची 18 वर्षे पूर्ण करणारा व जर्मनीचा नागरिक असला पाहिजे. तो सभागृहाचा सदस्य असलाच पाहिजे, असे नाही. 598 पैकी पन्नास टक्के +1 मते मिळविणारा उमेदवारच आजवर चान्सेलर म्हणून निवडून आला आहे. पण कोणालाच एवढी मते मिळाली नाही तर काय? असे झाल्यास 14 दिवसात चान्सेलरपदासाठी सभागृह पुन्हा मतदान करते. याही वेळी कोणालाही स्पष्ट बहुमत ( 50 टक्के+1) न मिळाल्यास पुन्हा 14  दिवसांनी मतदान घेतले जाते. यावेळी मात्र ज्याला सर्वात जास्त मते असतील ( ही मते 50 टक्के+1 इतकी असलीच पाहिजेत असे नाही) तो उमेदवार चान्सेलरपदी निवडून येतो  व मंत्री व सचिवांची निवड करतो.
चान्सेलरचे पद - चान्सेलरचे पद  पंतप्रधानपदासारखे  मानून चालायला हवे. ॲंजेला मर्केल आता चौथ्यांदा निवडून येत आहेत. जर्मनीने निवडलेल्या त्या पहिल्या महिला चान्सेलर आहेत. चान्सेलरचे पद 1867 साली बिस्मार्कनपासून निर्माण झाले आहे. अर्थात काळाच्या ओघात चान्सेलरपदाची भूमिका हळूहळू विकसित वबदलत राहिली आहे

No comments:

Post a Comment