Wednesday, October 18, 2017

इसीसची पोस्टर परी असलेली व्हाईट विडो

इसीसची पोस्टर परी असलेली व्हाईट विडो  
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  आज महिलांसाठी अमूक एक क्षेत्र वर्जित नाही. तरीही जगभर महिलांच्या संदर्भात एक नवीनच प्रकार वाढत्या प्रमाणावर कानावर पडतो आहे, कोणता आहे हा प्रकार? दहशतवादी गटात महिला वाढत्या प्रमाणात सामील होत आहेत, अशा वार्ता ऐकायला येत आहेत. यात कितपत तथ्य आहे? भारतापुरते बोलायचे झाले तर केरळमधून दहशतवादी गटात महिला सामील झाल्याच्या वार्ता वृत्तपत्रात आल्या होत्या. कल्याणची एक तरुणीही दहशतवाद्यांसोबत असतांना मारली गेल्याचे उदाहरण आहे. तसे ते आता जुने झाले आहे. नक्षलवाद्यांच्या पथकातही महिला आढळून येत आहेत. काहीतर नेतृत्त्वही करीत आहेत, असे उघडकीला आले आहे. तसेच हा प्रकार नवीनही नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात माताहारी नावाच्या गुप्तहेर महिलेची कथा आज वाचली तर ती काहींना कल्पित कथाही वाटू शकेल. 
  दहशतवादाकडे का वळतात? -  दहशतवादी महिला एकटदुकटच आढळून येत असल्यामुळे या वार्तेला जरा जास्तच प्रसिद्धी मिळते, असेही एक मत आहे. नुकतीच एक दहशतवादी महिला मारली गेल्याचे वृत्त समोर आले आहे. सोबत तिचा संपूर्ण जीवनवृत्तांतही जाहीर झाला आहे. ही महिला दहशतवादी का झाली, याचा शोध हिच्या जीवनवृत्तांतावरून लागू शकेल का? निदान अंदाज तरी बांधता येईल का?
पोस्टर परी ची व्हाईट विडो - सॅली अॅने जोन्स ही दहशतवादी महिला व्हाईट विडो या नावाने ओळखली जायची. दहशतवाद्यांच्या मोहिमा बिनचुकपणे आखण्यात तिचा हातखंडा होता. वय वर्ष 50 असलेली ही महिला दोन लेकरांची आई व व्हाईट विडो असली तरी ती इसीसची पोस्टर परीच होती. 2013 मध्ये तिने लहान मुलाला- ज्योज्योला- सोबत घेऊन  इंग्लंड सोडले व ती इसीस या दहशतवादी संघटनेत सामील झाली. नंतर तिने गुप्तता वगैरे काहीही पाळली नाही. सरळ ट्विटर अकाऊंट्स सुरू करून त्यावर शस्त्रास्राचे नेम धरतानाचे तिचे फोटो तिने प्रसिद्ध केले. यात केवळ पिस्तुलच नाही तर कॅलॅश्निकोव्ह सारखे हत्यारही दाखविले आहे. अशीही इसीसची पोस्टर परी होती.
कॅलॅश्निकोव्ह रायफल- मिखेल कॅलॅश्निकोव्ह हा एक रशियन लेफ्टनंट जनरल होता. तो संशोधक, इंजिनीअर, लेखक तर होताच  पण शस्त्रांचे डिझाईन तयार करण्यातही त्याचा हातखंडा होता. मास्कोमध्ये त्याचा पुतळा उभारलेला आहे. कारण तो एके 47या स्वयंचलित रायफलचा निर्माता आहे. ही रायफल गेली 50 पेक्षा जास्त वर्षे वापरात आहे. ती दहशतवाद्यांमध्येच केवळ नव्हे तर ड्रग माफियांमध्येही अतिशय लोकप्रिय आहे. काही सेकंदात अनेक गोळ्या या रायफलमधून डागता येतात. ही एक रायफल घेऊन आलेला दहशतवादी शेकडो लोकांना ठार मारू शकतो. ही रायफल बाळगण्याचा अधिकार व मान सामान्य अतिरेक्याला मिळवायचा असेल तर त्यासाठी आपली योग्यता सिद्ध करावी लागते व प्रशिक्षणही घ्यावे लागते. यावरून सॅली अॅने जोन्स चे महत्त्व व योग्यता लक्षात येऊ शकेल.
ड्रोन हल्ले- सीरियामधील रागा या शहरात अतिरेक्याचा बहुदा शेवटचा बालेकिल्ला उरला होता. इंग्लंडमधून आलेली सॅली अॅने जोन्सा मुक्काम या बालेकिल्यात होता. अतिरेक्यांना मारण्यासाठी पाश्चात्य राष्ट्रे ड्रोन्सचा म्हणजे मानवरहित विमानांचाच अनेकदा वापर करतात. यामुळे मनुष्यहानी होत नाही व संबंधिताला अचुक टिपताही येते. एका ड्रोन हल्यात सॅली अॅने जोन्स मारली गेली अशी खात्रीलायक माहिती  समोर आली आहे.
निरनिराळ्या नावानी ओळखली जाणारी जोन्स - सॅली अॅने जोन्स चे अतिरेक्यांनी वेगळे बारसे केले होते. काहींच्या मते तिनेच नवीन नाव धारण केले होते. ती आता उम्मा हुसेन अल् ब्रिटानी झाली होती. नामांतर करतांना तिने आपल्या मायदेशाचे नाव कायम ठेवले होते. मानसशास्त्राच्या अभ्यासकांच्या दृष्टीने ही घटनाही महत्त्वाची ठरावी अशी आहे. ती शकीना हुसेन या नावानेही ओळखली जायची. पत्रकारांनी तिचे बारसे व्हाईट विडो असे केले होते. अनेक अतिरेक्यांची अशी वेगवेगळी नावे असतात. यामुळे इतरांमध्ये संभ्रम निर्माण करता येतो.
 जोन्सचे महात्म्य -  सॅली अॅने जोन्स उर्फ  उम्मा हुसेन अल् ब्रिटानी उर्फ शकीना हुसेन उर्फ व्हाईट विडो हिचे अतिरेक्यात तीन कारणास्तव मोठे स्थान होते. एखादी अतिरेकी कारवाई कशी आखावी हे तिच्याकडूनच शिकावे, असे मानले जायचे. अतिरेक्यांची प्रचार यंत्रणा तिच्या भरवशावर चालत होती. अतिरेक्यांना समाजातील घटकांमधून सहानुभूती व साह्य मिळविण्याचे तिचे तंत्र वाखाणण्यासारखे होते. तिसरे असे की, अतिरेक्यांमध्ये नवीन तरूण व्यक्तींची भरती करण्याचे यशस्वी तंत्रही तिने साध्य केले होते. 
   राका शहर पडणार हे कळताच तिने तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि वाटेतच ती ड्रोन हल्यात मारली गेली असे म्हणतात. राका शहरातला लढा अतिरेक्यांचा शेवटचा लढा असेल, असे मानले जाते. अतिरेक्यांचा एक गट पाश्चात्य राष्ट्रांच्या सैनिकांना अडवण्यासाठी थांबला होता आणि दुसऱ्या गटाने अज्ञातस्थळी प्रयाण करण्याचे ठरविले होते. या गटात सॅली अॅने जोन्स उर्फ उम्मा हुसेन अल् ब्रिटानी उर्फ शकीना हुसेन उर्फ व्हाईट विडो हिचा समावेश होता.
जोन्स अतिरेक्यांच्या संपर्कात कशी आली? - सॅली अॅने जोन्स उर्फ  उम्मा हुसेन अल् ब्रिटानी उर्फ शकीना हुसेन उर्फ व्हाईट विडो हिने आपल्या 9 वर्षांच्या मुलाला- ज्योज्योला- सोबत घेऊन अतिरेक्यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी तिचा जुनेद हुसेन या अतिरेक्याशी विवाह झालेला होता. पोरसवदा जुनेद हुसेन हा मूळचा पाकिस्तानी होता. तो इंग्लंडचा नागरिक झाला. संगणक क्षेत्रात त्याला चांगलीच गती होती. वेबसाईट हॅक करण्यात तर तो तरबेज होता. त्याने 1300 अमेरिकन सैनिकांचे सर्व तपशील हॅककरून  अल्पावधीत मिळवले होते. 21 वर्षांचा हा तरूण 2015 मध्ये ड्रोन हल्यात ठार झाला. सॅली अॅने जोन्स उर्फ  उम्मा हुसेन अल् ब्रिटानी उर्फ शकीना हुसेन उर्फ व्हाईट विडो ही 50 वर्ष वयाची व जुनेद हुसेन हा 21 वर्ष वयाचा कोवळा तरूण हे तसे विरूप जोडपे होते. ही दोघे आपल्या सोबत सॅली अॅना जोन्सच्या लहान मुलाला -ज्योज्योला-सोबत नेत. वेळप्रसंगी त्याचा ढालीसारखा उपयोग करून निसटून जात. पण एकदा हुसेनने मुलाला सोबत नेले नव्हते. ही चूक त्याला भोवली व तो मारला गेला. सॅली अॅना जोन्स दुसऱ्यांदा विधवा झाली. आता मात्र ती व्हाईट विडो याच नावाने ओळखली जाऊ लागली.
कटकारस्थाने - जोन्सने 1300 अमेरिकन अधिकाऱ्यांची नावे प्रसिद्ध केली. ही माहिती तिच्या ठार झालेल्या नवऱ्याने हॅक केली होती. एकेकाला वेचून ठार करण्याचे ठरले होते. तसे आदेशही प्रसारित करण्यात आले होते.ही यादी अतिरेकी सतत जवळ बाळगीत असत. 2015 मध्ये जोन्सने हत्येचा एक खास कट रचला. इंग्लंडची राणी व व राजपुत्र फिलिप हे एका कार्यक्रमाला येणार होते. त्यांना टिपण्याचे ठरले होते. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव होऊन जपानने शरणागती ज्या दिवशी पत्करली होती, तो दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जाणार होता. पण हत्येचा हा बेत फसला.
   एका अमेरिकन सेनाधिकाऱ्याचे अपहरण करण्याचा बेत मात्र तडीस गेला. त्या अधिकाऱ्याचा शिरच्छेद करण्यात आला व या प्रसंगाची चित्रफीत काढून ती अमेरिकनांना जरब बसावी म्हणून जारी करण्यात आली. अमेरिकेने या घटनेची सर्वोच्च स्तरावर नोंद घेऊन तिला ठार करण्याचे आदेश दिले.
या सर्व काळात जोन्स इंग्लंडमधील परिचितांच्या संपर्कात असे. हवापाण्याच्या, शिळोप्याच्या गप्पा मारीत असे. एकदा मात्र तिने लंडन, ग्लासगो व कॅड्रिफ या शहरातील महिलांना खास आवाहन करून, ‘रमझानच्या पवित्र महिन्यात अतिरेकी हल्ले करा’ असे सुचविले होते. पण पुढे मात्र तिच्या संभाषणात वेगळेच मुद्दे येऊ लागले. असे एकदा तर ती म्हणाली होती,‘मला सीरियातून पळून इंग्लंडमध्ये परत यावे, असे वाटते’. कशासाठी हे मात्र तिने सांगितले नव्हते. ब्रिटिश नागरिकांनी मात्र तिला ब्रिटनमध्ये येऊ देऊ नये अशा सह्यांची मोहीमच राबवली होती.
 समस्यायुक्त बालपण-ग्रिनविचमध्ये जन्मलेली जेन्स इंग्लंडमधील केंट काऊंटी (जिल्हा) मधील चॅथॅम गावी रहात होती. आईबापाची ती एकुलती एक मुलगी होती. आईबापांचा घटस्फोट झाला, त्यानंतर बापाने आत्महत्या केली होती. त्यावेळी जोन्सचे वय दहा वर्षांचे होते. वयाच्या १६ व्या वर्षी तिने ब्युटिशियनची नोकरी पत्करली. पण तिला गीटार चांगली वाजवता येत असे. तसेच तिचा गळाही गोड होता. त्यामुळे तिने ब्युटिशियनची नोकरी सोडून एका महिला चमूच्या संगीत पथकात प्रवेश केला. पण याच काळात तिला ड्रग्जचाही नाद लागला.
  जोन्सचे दोन विवाह -  1996 मध्ये तिने जोनॅथन विल्किनसन नावाच्या कामगाराशी लग्न केले.  तिला या विवाहापासून एक मुलगा झाला. 1999 साली तिचा नवरा लिव्हरच्या आजाराने मेला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर 2004 मध्ये तिने दुसऱ्या ज्योज्यो नावाच्या मुलाला जन्म दिला.
   तिची आणि हुसेनची गाठभेट आॅनलाईन झाली होती. हुसेनने तिला सीरियाला येण्याबाबत प्रवृत्त केले. सोबत धाकट्या मुलाला ज्योज्योला घेऊन ती सीरियाला गेली.
ज्योज्योचे आजोबा सांगतात की, त्यांनी आपल्या नातवाला- ज्योज्योला - प्रथम हातात हॅंडगन घेतलेला एका व्हिडिओमध्ये पाहिले. पकडलेल्या शत्रूंना ठार करतांना दाखवणारा तो व्हिडिओ होता. ते म्हणतात, ‘माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मला अतिशय दु:ख झाले. मला अपराध्यासारखेही वाटत होते. ज्योज्यो आपल्या आई बरोबर जाण्यास तयार नव्हता. आजोबांजवळच थांबण्याची त्याची इच्छा होती. तो तसा हट्टच धरून बसला होता. पण …
   आपल्या सावत्र मुलीबद्दल ते म्हणतात,’ ते जेवढ्या लवकर तिला उडवतील, तेवढे बरे होईल. ती एक चक्रम व अत्यंत स्वार्थी मुलगी आहे.तिने सगळ्यांनाच दुखवले, रडवले आणि छळले आहे.’
  जोन्सच्या एक्झिटचा परिणाम-प्रत्यक्ष रणांगणावर जोन्सचा इसीसला फारसा उपयोग नव्हता.पण तरीही तिच्या जाण्याने अतिरेक्यांना जबरदस्त झटका बसला आहे. तिला वृत्तक्षेत्रात जसजशी पिरसिद्धी मिळू लागली तसतसा तिचा भाव अतिरेक्यांमध्ये वाढत गेला. इसीसची मोहिनी परकीय महिलांवर कशी पडते आहे, हे दाखवण्यासाठी इसीसने जोन्सच्या सदस्यतेचा भरपूर उपयोग करून घेतला. अझदेह मोवेनी हे व्यवसायाने पत्रकार असून त्यांनी ‘लिप्स्टिक जिहाद’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. बीबीसीवर बोलतांना त्यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. तेम्हणतात,’ ब्रिटिश महिला जगतात अतिरेक्यांना शिरकाव करण्याचा मार्ग जोन्सने खुला करून दिला आहे’.
   ‘मी जिहादी मुस्लिम महिलांच्या पलटणीची मुख्या आहे, ज्यांना जिहादी व्हायचे असेल, त्यांनी सीरिया मध्ये यावे’. एका मूळच्या पाश्चात्य महिलेने फक्त महिलांना केलेले हे बहुदा पहिलेच आवाहन असावे. याचा परिणाम किती झाला याचा शोध जो तो पाश्चात्य देश आपापल्या देशात घेत आहे.
  जोन्सचा धसका -   जोन्सच्या भूमिकेचा व आवाहनांचा पाश्चात्य देशांनी चागलाच धसका घेतला आहे / निदान होता. ‘आमच्या देशातील महिलांवर या आवाहनाचा काहीही परिणाम झालेला नाही’, हे ते वरवर भलेही म्हणत असोत. असे नसते तर अमेरिकेने जोन्सचा नायनाट करण्यासाठी खास आदेश प्रसारित केले नसते. पेटॅगाॅनच्या हिटलिस्टवर जोन्सचे नाव अग्रक्रमाने होते, ते काय विनाकारणच? एम 16 व पेंटॅगाॅनने जोन्सला ठार मारण्यासाठी संयुक्त कारवाई करण्याचे ठरविले ते काय उगीचच? शेवटी सीरिया व इराकच्या सीमेवर त्यांनी जोन्सला पळून जात असतांना गाठले व ड्रोन्सचा वापर करून तिला ठार केले, ती काय नित्याची कारवाई होती?
फक्त जोन्सलाच ठार करा - खरे तर जोन्सचा अंत जूनमध्येच झाला होता, असे म्हणतात. पण तिचा मुलगा ज्योज्यो तिच्याबरोबर होता किंवा कसे याची माहिती मिळत नव्हती. आज्ञा फक्त जोन्सला मारण्याचीच होती. ज्योज्योला मारायचे नाही, असे ठरले होते. पण जोन्स नेहमी ज्योज्योसहच असायची. त्याचा ती ढालीसारखा उपयोग करीत असे. तो सोबत असेल तर आपल्यावर प्राणघातक हल्ला होणार नाही, याची तिला कल्पना असावी. पण ज्योज्यो सुद्धा बाल अतिरेकी झाला होता. इराकी व पाश्चात्य युद्ध कैद्यांचे हात मागे बांधून त्यांना गुढग्यावर बसायला सांगितले जायचे. बाल अतिरेक्यांकडे मागून त्यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालण्याचे काम असे. या कामात बाल ज्योज्यो चांगलाच तरबेज झाला होता.  
  थेट अमेरिकेतून नियंत्रण - जोन्सला टिपणाऱ्या ड्रोनचे नियंत्रण थेट अमेरिकेतून केले जात होते. तिला टिपले तेव्हा सोबत ज्योज्यो नव्हता याची खातरजमा करून घेण्यात आली होती. पण जोन्सचे डिएनए सॅंपल घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला नाही. ज्योज्यो जर जिवंत असण्याची शक्यता असती तर त्याची ओळख पटविण्यासाठी जोन्सच्या डिएनए सॅंपलची गरज भासली असती. पण तसा प्रयत्न झाला नाही. याचा अर्थ मायलेक एकाचवेळी टिपले गेले असा तर अर्थ निघत नाही ना?  
   सीरियात इसीसमध्ये सामील झालेले पाच ब्रिटिश नागरिक आजवर ठार झाले आहेत. जोन्सही सहावी आहे. तिच्या शेवटच्या ट्विटर पोस्टमध्ये ती म्हणते, ’मी यानंतर विवाह करणार नाही. माझ्या दुसऱ्या नवऱ्याशी मी शेवटपर्यंत प्रामाणिक राहणार आहे’.
स्वर्गातल्या परी ऐवजी - सीरियात आता ठिकठिकाणी सामूहिक दफनभूमी आढळून येत आहेत. त्यातल्या ज्या अतिरेक्यांच्या आहेत, त्यात तर प्रेते धडपणे जमिनीत पुरलेलीही नाहीत. अनेक प्रेतांवर भटकी कुत्री ताव मारतांना दिसत आहेत. धार्मिक युद्धात वीरगतीला गेलात, तर प्रत्येकाच्या वाट्याला निदान एकतरी परी नक्कीच येणार होती. ते राहिले बाजूलाच, पण त्यांच्या वाट्याला आता फार तर कुत्र्याच्याच पोटात जागा मिळणार, हे नक्की झाले आहे.

  ज्या व्यक्ती इसीसमध्ये दाखल झाल्या आहेत, त्यांच्या बालपणी, कौटुंबिक व वैवाहिक जीवनात कोणती ना कोणती समस्या असतेच असते, असे एका पाहणीत आढळून आले आहे. पाश्चात्य किंवा अन्य देशातील नागरिक इसीसमध्ये सामील होण्याचे हेही एक कारण असेल का?

No comments:

Post a Comment