Tuesday, October 31, 2017

कांडला ते अफगाणिस्तान व्हाया छाबहार’


‘कांडला ते अफगाणिस्तान व्हाया छाबहार’
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   अबू रायहान अल्- बिरुनी हा एक मुस्लिम खगौलशास्त्रज्ञ, गणिती, भूगोलतज्ञ, वैज्ञानिक व इतिहासकार मध्ययुगात होऊन गेला. त्याने इस्लामला भारताचा सखोल परिचय करून दिला, असे मानतात. गणितीय तंत्र वापरून त्याने पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला होता असेही मानतात. भारताचा समुद्रकिनारा छाबहार बंदरापासून सुरू होतो, असे लिहून ठेवले आहे. इराणमध्ये पूर्वेकडे टिस नावाचे शहर होते. तेच आजचे छाबहार बंदर होय. ही कथा आहे दहाव्या शतकातली.
आज एकविसावे शतक आहे. बिरुनीचे शब्द या शतकात खरे होत आहेत. भारताने एक जहाजभरून गहू अफगाणिस्तानला पाठविण्यासाठी छाबहार बंदराचा उपयोग केला आहे. अफगाणिस्तानला समुद्र किनारा नाही. त्यामुळे इराणमधील छाबहार बंदराचा आधार भारताने धेतला आहे. सध्या छाबहार बंदराचा विकास व्हावा, म्हणून भारत इराणला मदत करीत आहे. हा गहू पाठवताना भारताने पाकिस्तानला एकप्रकारे वळसा घालून अफगाणिस्तानला अन्नतुटवड्याच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानची निर्मिती होण्यापूर्वी भारताच्या सीमा अफगाणिस्तानशी जोडलेल्या होत्या. त्यामुळे भारतातून अफगाणिस्तानला जाण्याचा खुश्कीचा मार्ग उपलब्ध होता. आता पाकिस्तानच्या निर्मितीनंतर हा मार्ग बंद झाला/केला आहे. त्यामुळे जल वाहतुकीने प्रथम इराणच्या छाबहार बंदरात व तिथून अफगाणिस्तानमध्ये मात्र जमिनीवरून वाहतुक करून भारताने पाकिस्तानने केलेली अफगाणिस्तानची कोंडी फोडली आहे व भारत आणि अफगाणिस्तानमध्ये एक नवीन व्यापारी मार्ग निर्माण केला आहे व भारताचा समुद्रकिनारा छाबहारपासून सुरू होतो हे दहाव्या शतकात होऊन गेलेल्या बिरुनीचे शब्द वेगळ्याप्रकारे खरे करून दाखविले आहेत.
इराण व अमेरिका यातील तणाव -   या मार्गात एक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, निदान होती. सध्या इराण व अमेरिकेच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे ही वाहतुक इराण मार्गे केल्यास अमेरिकेची नाराजी ओढवली जाईल की काय, अशी शंका वाटत होती. जुन्या काय किंवा नवीन काय, अमेरिकन शासनाचा/प्रशासनाचा एक अजब खाक्या होता व आजही आहे. ज्याच्याशी अमेरिकेचे बिनसते, त्याच्याशी इतरांनी संबंध ठेवलेले तिला आवडत नाही. पण याबाबत तसे झाले नाही. कारण अफगाणिस्तान आपल्या पायावर उभा रहावा, तालिबान्यांचा अफगाणिस्तानच्या मागे लागलेला ससेमिरा संपावा व स्थिरपद तसेच पाश्चात्यधार्जिणी राजवट अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित व्हावी, असे अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसापूर्वी, नक्की सांगायचे तर 21 आॅगस्टला अमेरिकेने अफगाणिस्तानच्या संदर्भातील आपल्या धोरणाची काहीशी नव्याने आखणी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीच खुद्द असे प्रतिपादन केले की, युद्धदग्ध अफगाणिस्तानला स्थिरता पात्र व्हावी, त्याची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून भारताने पुढाकार घ्यावा.
भारताकडून अपेक्षा - आजवर अमेरिकेने एवढ्या स्पष्टपणे अफगाणिस्तानबाबतच्या आपल्या भारतापासूनच्या अपेक्षा व्यक्त केल्या नव्हत्या. पाकिस्तानने कान फुंकल्यामुळे असे होत होते. अमेरिका दहशतवादाच्या विरुद्ध असली तरी भारताविरुद्ध होणाऱ्या दहशतवादी कारवाया व अमेरिका आणि  पाश्चात्य राष्ट्रे यांच्याविरुद्ध होणाऱ्या दहशतवादी कारवाया यात अमेरिका फरक करीत असे. कारण अमेरिकेला अफगाणिस्तानात काहीही करायचे झाले तरी पाकिस्तानची मदत लागत असे.
  दुसरे कारण असे होते की, अमेरिका आणि  पाश्चात्य राष्ट्रे यांच्याविरुद्ध होणाऱ्या दहशतवादी कटांची माहिती पाकिस्तान त्यांना पुरवीत असे. त्यामुळे पाकिस्तानच्या भारतद्वेशाची अमेरिका फारशी दखल घेत नसे.
  तिसरे कारण असे होते की, भारताविरुद्ध होणाऱ्या कारवाया काश्मीर प्रश्न न सुटल्यामुळे होत आहेत असे अमेरिका आणि  पाश्चात्य राष्ट्रांना पटवण्यात पाकिस्तानला यश मिळत होते. पण अगोदर भारतात व नंतर अमेरिकेत नवीन राजवट आल्यानंतर अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांचा भ्रमनिरास होण्यास सुरवात झाली. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरप्रकरणी दहशतवाद्यांना मदत करू नये व अफगाणिस्तान प्रकरणी भारताने फार मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, अशी भूमिका अमेरिकेने घेतली. अमेरिकेच्या धोरणात हा फार मोठा बदल घडवून आणण्यात मोदी शासनाला यश मिळाले. भारत व अमेरिका यातील संबंध पूर्वीपेक्षा दृढ झाले. यासाठी ट्रंप यांना पुन्हा एकदा मिठी मारण्याची राहूल गांधी यांची सूचना अमलात आणण्याची गरज पडली नाही, याची नोंद घ्यावयास हवी.
भारताच्या परराष्ट्र नीतीचा विजय -  भारतीय जहाज गहू भरून छाबहार बंदराकडे गेले त्याच्या काहीच दिवस अगोदर अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट रेक्स टिलरसन भारत भेटीवर आले होते. त्यांच्यात व परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यात अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी हरकत तर घेतली नाहीच उलट गहू पाठविण्याच्या या व्यवहाराला पाठिंबा दिला. ही केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर चीनलाही चपराकच आहे. कारण भारताला अफगाणिस्तानप्रकरणी दूर ठेवावे, असे पाकिस्तान प्रमाणे चीनचेही धोरण होते व अमेरिका त्याला मान्यता देत असे.
  आमचा वाद इराणच्या नेतृत्त्वाशी आहे, इराणच्या जनतेशी नाही, एवढेच म्हणून रेक्स टिलरसन थांबले नाहीत तर इराणसोबत वाजवी व्यापारी संबंध ठेवायला आमची हरकत नाही. हे जसे युरोपच्या बाबतीत लागू आहे तसेच ते भारताच्या बाबतीतही लागू आहे, असे त्यांनी जाहीर केले.
  वळसा घालून विळखा सोडवला - गहू पाठविण्याचा हा व्यवहार केवळ व्यापारी व्यवहार नाही, त्याला मानवतावादाची किनार आहे. पंजाब व अफगाणिस्तान यातील खुष्कीचा  प्राचीन मार्ग पाकिस्तानने बंद केला. त्याला पर्याय म्हणून गुजराथमधील कांडला बंदरातू न छाबहारकडे जाणाऱ्या जलमार्गाचा पर्याय उभयपक्षी सोयीचाही आहे. छाबहारमधून हा गहू ट्रकद्वारे अफगाणिस्तानमध्ये नेण्यात आला. ही वाहतुक प्रथम जल वाहतुक व नंतर ट्रक द्वारे वाहतुक अशी असली तरी ती किफायतशीर आहे. तसेच पाकिस्तानला वगळून होणारीही आहे. ही वाहतुक वळसा घालून करावी लागत असली तरी अफगाणिस्तानला पाकिस्तानच्या विळख्यातून सोडवणारी आहे.
  भारत, इराण व अफगाणिस्तान यांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एकत्र येऊन एकीकडे  हिरवी झेंडी दाखवीत असतांना पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून ‘कांडला ते अफगाणिस्तान व्हाया छाबहार’ मार्गाच्या श्रीगणेशाच्या निमित्ताने इराण व अफगाणिस्तान यांचे अभिनंदन केले. या पर्यायी मार्गाचे भविष्यात खूप महत्त्व असणार आहे.
संबंधांचे इंद्रधनुष्य
सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यापारी देवघेव, तंत्रज्ञान, सेवाक्षेत्र, राजकीय व्यवहार अशा अनेक रंगी संबंधांचे हे इंद्रधनुष्य या तिन्ही देशांना आवडेल यात शंका नाही.
   अलेक्झांडर या मार्गाने गेला तेव्हा छाबहारचे नाव टिस असे होते. ते  पाकिस्तानमधील ग्वादार बंदरापासून केवळ 100 किलोमीटर दूर आहे.  या बंदराचा विकास चीनच्या मदतीने झाला आहे. पण बलूच लोकांचा याला विरोध आहे. कारण यामुळे आपले शोषण होईल, अशी त्यांना सार्थ भीती वाटते आहे. तर जवळच्याच छाबहार या इराणमधील बंदराचा विकास भारताच्या मदतीने होतो आहे. त्याचे इराण व अफगाणिस्तानमध्ये स्वागत होते आहे. हा चीनच्या सैनिकी व व्यापारी रणनीतीला भारताने दिलेला शह आहे.
  भारत व अफगाणिस्तान यात हवाई वाहतुक यापूर्वीच सुरू झाली आहे. याशिवाय छाबहार ते झाहेदान हा लोहमार्ग हा अफगाणिस्तानच्या सीमेजवळून जाणारा लोहमार्ग बांधण्याचे लक्षावधि डाॅलर किमतीचे कंत्राटही भारताला मिळाले आहे. लोहमार्गाने होणारी वाहतुक  रस्त्यावरील वाहतुकीच्या संदर्भात कमी खर्चाची असणार आहे.
अफगाणिस्तान व भारताचे पूर्वापार संबंध - भारताचे अफगाणिस्तानशी पूर्वापार घनिष्ठ संबंध आहेत. अफगाणिसातानशी निखळ मैत्री व उभयपक्षी उपकारक ठरतील असे व्यापारी संबंध ठेवणारा व कायमपणे ठेवू इच्छिणारा भारत हा एकमेव देश आहे. 1980 साली रशियाच्या सक्रिय पाठिंब्यावर अफगाणिस्तानात डेमो क्रॅटिक रिपब्लिक आॅफ अफगाणिस्तान स्थापन झाल्याबरोबर भारताने त्याला मान्यता दिली.
1990 मध्ये अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध झाले व तालिबानी राजवट आली. या काळात 1995 पर्यंत भारताचे अफगाणिस्तानशी असलेले संबंध अगदीच सुमार होते. म्हणून तालिबानी राजवट उलथून लावण्याच्या कामी भारताने साह्य केले. हा एवढा कालखंड सोडला तर मानवतावादी दृष्टीकोनातून मदत, व पुनर्निर्माण कार्यात भारताचा कायम सहभाग होता व आहे. शिक्षणसंस्थांसाठी, हाॅस्पिटलसाठी  इमारती बांधून देणे, रस्ते तयार करणे, तांत्रिक साह्य देणे, सलमा धरण बांधून देणे, संसद सभागृह उभारून देणे व होतकरू विद्यार्थ्यांना हजारोंच्या संख्येत शिक्षण व शिष्यवृत्या देणे, सैनिकी प्रशिक्षण देणे ही कामे भारताने निखळ मैत्रीच्या भूमिकेतून पार पाडली आहेत. म्हणूनच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना भारताने याहीपेक्षा मोठी व महत्त्वाची भूमिका अफगाणिस्तानबाबत स्वीकारावी, असे वाटते, तर या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या नाकाला मिरच्या झोंबत आहेत. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचा अफगाणिस्तानमधून फौजा परत घेण्याची भूमिका आज बदलली आहे. इराणच्या समुद्किनाऱ्यावर चाबहार बंदर बांधण्याच्या निर्णयाचा अफगाणिस्तानलाही लाभ होणार आहे. एरवी अफगाणिस्तानमध्ये जायचे तर पाकिस्तानच्या भूमीवरून जावे लागते. यावेळी पाकिस्तान सतत काहीना काही अडथळे निर्माण करतो. आता भारतातून समुद्मार्गे चाबहार बंदरात फक्त सात दिवसात मालाची वाहतुक करता येईल. शांत, सुरक्षित व पुनर्निर्मित अफगाणिस्तान निर्माण करण्याची भारताची भूमिका आहे, हे भारताला जसे भूषणावह आहे, तसेच अशी भूमिका घेणारे देश जगात खूप कमी असावेत, ही एक विदारक वस्तुस्थितीही आहे, हे आपण विसरता कामा नये

No comments:

Post a Comment