Thursday, December 7, 2017

इसिसची अमर दग्धभू चाल

इसिसची अमर दग्धभू चाल
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

  इंटरनेट शाप की वरदान यावर निबंध लिहायचा झाला तर बहुतेक विद्यार्थी इंटरनेटला वरदान म्हणतील. पण इसिस सारख्या घातक चळवळीच्या निर्मिती व वाढीसाठी इंटरनेट निदान काही अंशी तरी कराणीभूत आहे, असे काही विद्वानांचे मत आहे.
  मध्ययुगातील मध्यपूर्व- मध्यपूर्वेतील बहुतेक देश मुस्लिम धर्ममतानुयायी आहेत. यातील बहुतेक देशात सुन्नी पंथाच्या कट्टरपंथीयांची संख्या शियांपेक्षा जास्त आहे. संपूर्ण जगाचा विचार केला तर मुस्लिमांमध्ये शियांचे प्रमाण 20 टक्के इतकेच आहे. क्रूरपणा, धर्मांधता, कट्टरता, महिलांविषयीचा पराकोटीचा अनुदार दृष्टीकोन आदी मानव विकासाच्या दृष्टीने अनुचित बाबींचा विचार केला तर या दोन्हीमध्ये डावे उजवे करण्यासारखी स्थिती नाही. एकच मुद्दा शियांच्या बाजूचा आहे. तो असा की, त्यांनी अजून तरी डोळ्यात भरेल असे अपहरण केलेले नाही किंवा पाश्चात्य पत्रकारांचे व नागरी किंवा लष्करी अधिकाऱ्यांचे शिरकाण केलेले नाही. तसेच सुन्नी बालवीरांच्या ऐवजी शिया बालवीरांचा वापर करून व त्यांच्या हस्ते गोळीबार करवून बंधकांच्या शरीराची चाळण केलेली नाही.
 शियाबहुल देश- शियापंथीय लोक बहुसंख्येने असलेले देशही संख्येने खूप कमी आहेत. इराकची लोकसंख्या 3 कोटी असून 99 टक्के लोक मुस्लिम आहेत. त्यातले (67 टक्के) लोक शियापंथीय आहेत. बहारीन ( 70 टक्के) , लेबॅनाॅन (36 टक्के, यात तिसरा धर्म ख्रिश्चन हाही मोठ्या प्रमाणात आहे), इराण(95 टक्के), अझेरबैजान (67 टक्के), यात शियांची संख्या बरीच आहे. यातील संख्येचे तपशील थोड्याबहुत प्रमाणात वेगवेगळे आहेत. कारण जनगणनाच धड झालेली नाही/होऊ शकलेली नाही. पण पाकिस्तान (10 टक्के), सीरिया (20 टक्के) आणि येमेन (40 टक्के) या देशात शिया अल्पसंख्येत असले तरी राजकीय दृष्टीने पाहता ते बरेच सामर्थ्य बाळगून आहेत.
  विज्ञान व मानवतेतील विषम प्रगती - इंटतनेटने माहितीचा महासागर जसा जगातल्या सर्व जनतेला उपलब्ध करून दिला आहे. तसाच तो मुस्लिमांनाही उपलब्ध झाला. याचा परिणाम भौतिक प्रगती वेगाने होण्यात झाला. पण सांस्कृतिक व मानसिक प्रगती मात्र त्या वेगाने झाली नाही. प्रचंड सत्ता व अलोट संपत्ती आली पण मने मात्र मध्ययुगातच घोटाळत राहिली. याचा परिणाम इसिस सारख्या चळवळींना जन्म देण्यात झाला आहे. इस्लाम या शब्दाचा मूळ अर्थ शांतता असून बहुसंख्य मुस्लिमांना शांतताच  हवी आहे. पण अल्पसंख्येत असलेल्या आततायी सुन्नीपंथीयांसमोर ते हतबल झाले आहेत. आततायी व शांततावादी यांच्या संबंधातील ही कथा सर्व जगभर सारखीच आहे. तर तमाचाच कायतो फरक आहे.
   संपूर्ण मध्यपूर्वेत जनआंदोलने निर्माण झाली. ही अरब स्प्रिंग या नावाने ओळखली जातात. जुन्या राजवटी बदलल्या. पण अनेक ठिकाणी निर्नायकी स्थिती निर्माण झाली. इसिस चळवळीने या स्थितीचा फायदा घेतला. तिने इराक व सीरिया या देशात हातपाय पसरायला सुरवात केली.
 इराकची विचित्र स्थिती- प्रथम इराकची स्थिती पाहू गेल्यास काय आढळते? इराकची लोकसंख्या 3 कोटी असून 99 टक्के लोक मुस्लिम असून त्यातले 67 टक्के लोक शियापंथीय आहेत. मात्र सुन्नीपंथीय असलेल्या सद्दाम हुसेन याने लष्करी क्रांतीद्वारेच 1979 मध्ये सत्तेवर आल्यापासून 2006 मध्ये फासावर लटकवले जाईपर्यंत शिया बहुसंख्य असलेल्या इराकवर सातत्याने राज्य केले होते. सद्दाम हुसेन अण्वस्त्रे व रासायनिक अस्त्रे बनविण्याच्या खटाटोपात आहे, असा आरोप ठेवून अमेरिकेने त्याचा काटा काढला. पण आरोपाला बळकटी मिळेल, असे काहीही इराकमध्ये आढळून आले नाही.
सीरियात शियांची शिरजोरी -   सीरियाची लोकसंख्या 2 कोटी असून 92 टक्के लोक मुस्लिम अाहेत. त्यातले सुमारे 20 टक्के लोकच शियापंथीय आहेत. असे असूनही लष्करी क्रांतीतून सत्तेवर आलेल्या हाफीज अल असाद हा अल्पसंख्यांक शियापंथीय असूनही तो सुन्नी बहुसंख्य असलेल्या सीरियावर गेली सतत 30 वर्षे राज्य करीत आहे. 2000 मध्ये हाफीज अल असाद हा निधन पावला. आणि त्यांचा तिसरा पुत्र बशर अल असाद वारसा हक्काने अध्यक्ष झाला. तोपर्यंत बशर याला प्रत्यक्ष राजकारणाचा काहीच अनुभव नव्हता. अननुभवी म्हणून त्यांच्या विरुद्ध टीका सुरू झाली. पण विरोधकांपैकी अनेक सरकारी अधिकाऱ्यांची पदावनती करून बशर असाद याने सत्तेवरील आपली पकड घट्ट केली. त्यामुळे वडिलांच्या निधनापासून आजपर्यंत अध्यक्षपदी निवडून (?) आलेला बशर अल असाद सतत सत्तेवर आहे.
  सीरियात शिया पंथीय 20 टक्के आहेत. याचा अर्थ असा नाही की ते देशभर सर्वत्र सारख्या प्रमाणात विखुरलेले आहेत. भू-मध्य महासागराच्या किनाऱ्याला लागून असलेल्या सीरियाच्या चिंचोळ्या किनारपट्टीवरच शियापंथीय जास्त आहेत. म्हणजे असे की, सीरियाच्या उर्वरित भागात सुन्नीपंथीयांचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. असे असूनही त्यांच्या छातडावर अल्पसंख्य शियापंथीय असाद तीन दशकांपेक्षा जास्त काळ पाय ठेवून उभा आहे. सुन्नीपंथीय इसीससाठी यापेक्षा सुपीक जमीन कोणती असणार? यावर उपाय म्हणून असादला पदच्युत करून तिथे आपल्या तालावर नाचणारे पण सुन्नीपंथीय असलेले बाहुले बसवले तर परिस्थितीत फरक पडेल काय, असा विचार काही अमेरिकादी पाश्चात्य राष्ट्रांच्या मनात का घोळतो आहे, हे या तपशीलावरून स्पष्ट होण्यास मदत होईल. पण माशी शिंकली ती इथेच, की रशियाला हे मान्य नाही. असो.
  इराक व सीरिया ही इसिससाठी सुपिक जमीन -  तसेच याच तपशीलावरून इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेनला इराक व सीरियामध्ये वेगाने हातपाय पसरणे का शक्य झाले ते लक्षात येईल. या संघटनेविरुद्ध अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय आघाडी एकीकडे आपापसात भांडत कशीबशी उभी राहिली. बहुदा म्हणूनच तब्बल तीन वर्षांनी या आंतरराष्ट्रीय फौजांना इसिसच्या ताब्यातील बहुतांश प्रदेश कण्हतकुथतच परत जिंकता आला.. सीरियातील राक्का हे शहर इसिसच्या राजधानी मानली जात होती. तीही इसिसने आता गमावली आहे.
  इसिसचे आधारस्तंभ - एकेकाळी इसिसचा ताबा जवळजवळ 35 हजार चौरस मैल क्षेत्रफळावर होता. लक्षावधी लोक इसिसच्या हुकुमतीखाली आले होते. या सर्व भागाचे प्रशासन चालवायचे म्हणजे खर्च आलाच. करवसुली, खनिज तेलाची विक्री, लुटालूट, अपहरण व खंडणी ही उत्पन्नाची साधने होती. शस्त्रास्त्रे तयार करणाऱ्या एकूणएक देशात तयार होणारी शस्त्रे इसीसला विकणारी व्यापारी मंडळी जगभर उपलब्ध होती. जवळजवळ प्रत्येक देशातून धर्मयुद्धात सहभागी होण्यासाठी तरूण व तरुणीही उपलब्ध होत असत. इसिसची चळवळ ऐन भरात असतांना जगभरातील 1500 सुन्नीपंथीय इस्लामी तरुणाई (तरूण व तरुणी) दररोज अहमहमिकेने अबु-बक्र-अल-बगदादी च्या आवाहनाला प्रतिसाद देत सीरियाच्या दिशेने प्रयाण करीत, असे म्हणतात. हे प्रयाण एकमार्गी असे. पश्चाताप होऊन परत आल्याचे उदाहरण निदान फारसे ऐकिवात तरी नाही. यातील बहुतेक आज अल्लाला प्यारे झाले असतील व धर्मयुद्धात शहीद झाल्यामुळे हे सगळे स्वर्गात निदान एकातरी परीबरोबर सुखैनेव कालक्रमणा करीत असतील, यात शंका बाळगण्याचे कोणतेही कारण नसावे!
  महिलांचे नकोसे जीवन - कोणतेही युद्ध असो. प्रथम पशुतुल्य जीवन वाट्याला येते ते महिलांच्या. इसिसने त्यांचा उपयोग विना मोबदला लैंगिक गुलाम म्हणून केला. तरुणींचे वस्तुमूल्य चांगलेच होते! त्यांचाही व्यापार व वापर करून पैसा उभारला जात होता. नकोशा झाल्या की एकतर त्यांना मारले तरी जाई किंवा त्यांच्या उरावर दुसरी सवत तरी आणली जाई.
 पूर्ण बीमोड नाही-  जवळजवळ 70 देशांची मोट बांधून उभारलेल्या आघाडीतील अमेरिका, फ्रान्स, रशिया या देशांनी आपापसात तणतणत, धर्माने मुस्लिम असलेल्या कुर्द पेशमर्गा सारख्या जमाती व इतर अनेक लढाऊ जमाती साह्याला घेऊन व आपल्या जवळील संहारक अस्त्रांचा व मानवरहित यानांचा  वापर करून करून इसिसला एकदाचे नमवले, हे मात्र मान्य करायलाच हवे. आज इसिसची कोंडी झाली आहे. निसटून जायला समुद्र किनारा हाताशी नाही. नवीन भरती थांबली आहे. पैशाचा ओघ आटला आहे. पण इसिसचा पुरता बीमोड झालेला आहे, असे म्हणता येणार नाही. स्फिंक्स पक्षाप्रमाणे तो राखेतून केव्हाही पुन्हा उभारी घेईल, अशी निदान आजतरी स्थिती आहे. कारण अनेक सुन्नीपंथीयांची मानसिकता बऱ्याच प्रमाणात आजही तशीच कायम आहे.
   दग्धभू धोरणाचा नव्याने वापर - यावेळी इसिसने दग्धभू धोरण स्वीकारले आहे. या धोरणाचा वापर युद्धशास्त्रसंमत आहे. हे जुने तंत्र दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने विशेष प्रमाणात वापरून याला नव्याने प्रतिष्ठा (!) मिळवून दिली होती/आहे. माघार घेताना तो प्रदेश स्वत:च असाकाही उध्वस्त करायचा जिंकून पुढे सरकणाऱ्या शत्रूला कोणत्याही प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा मिळू नयेत, असे या युद्धविषयक धोरणाचे थोडक्यात व सर्वांना समजेल अशाप्रकारे वर्णन करतात. यामुळे त्या भागात राहणाऱ्या मानवादी जीवित घटकांचे काय होत असेल हा क्षुल्लक तपशील, अर्थातच दुर्लक्षिला जातो! मोसूल व राक्का या एकेकाळच्या संमृद्ध शहरांची अक्षरश: राखरांगोळी करून इसिसने माघार घेतली आहे. समोर सरकणाऱ्या शत्रूसमोर आता इसिसने आपल्या ऐवजी निसर्गाला व रोगराईला शत्रू म्हणून उभे केले आहे.
 जेत्यांमध्ये वाद - आता जिंकणाऱ्यांध्ये वाद निर्माण होत आहेत. अमेरिकेला सीरियाच्या असादला पदच्युत करायचे आहे तर रशियाला तो हवा आहे. इसिसला हरवण्यात कुर्द जमातीने देऊ केलेली मदत मोलाची ठरली होती. तिचा परतावा म्हणून त्यांना आपले स्वतंत्र राष्ट्र हवे आहे. पण हा भूप्रदेश इराण, इराक, तुर्कस्थान, सीरिया व अन्य देशात आॅटोमन साम्राज्याचा अंत झाला तेव्हापासूनच वाटला गेलेला आहे. त्यामुळे इराण, इराक, तुर्कस्थान, सीरियादी देशांना हे मान्य होणार नाही, हे उघड आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. पुन्हा युद्धाचा भडका उडणार. कदाचित लढणाऱ्यांच्या बाजू बदललेल्या असतील, एवढेच. पुन्हा एकदा दग्धभू धोरणाचा कुणीतरी अवलंब करणार. मानवता पुन्हा पिचली जाणार. आजवर ती पुन्हा तरारून उभी राहिली आहे, हे जरी खरे असले तरी, दरवेळी असेच घडेल, याची काय हमी?

No comments:

Post a Comment