Monday, April 2, 2018

21 व्या शतकातील पहिला चिनी ‘सम्राट’

21 व्या शतकातील पहिला चिनी ‘सम्राट’ 
वसंत गणेश काणे,     बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  संशयाचं मळभ दूर व्हावं/ मनातली अढी दूर व्हावं आणि मतभेद दूर करण्यासाठी प्रत्येकानं एकमेकांच्या दिशेने दोन पावलं पुढे टाकावीत. परस्परावर विश्वास असेल तर हिमालय सुद्धा मैत्रीच्या आड येऊ शकणार नाही. काही कसोटीचे प्रसंग व अडचणी येऊनसुद्धा चीन व भारत यातील सलोख्याचे वातावरण विकास पावत आहे. भारतीय गजराज व चिनी ड्रॅगोन यांनी आपापसात न भांडता एकत्र येऊन नृत्याचे पदन्यास टाकले पाहिजेत. ही सुवचने आहेत, चिनी परराष्ट्र मंत्री श्री वांग यांची. ही साखरपेरणी आपण नुकतीच ऐकली असेल. पण असे काही ना काही चिनी राजकीय नेते जेव्हाजेव्हा बोलत असतात तेव्हातेव्हा चिनी सैनिक कुठे ना कुठे भारतात घुसखोरी करीत असतात, कोणती ना कोणती आगळीक काढीत असतात, असा आपला आजवरचा अनुभव आहे. यावेळी असा अनुभव येणार नाही, अशी अपेक्षा (डोकलाम भागातील सध्या सुरू झालेल्या आगळिकीकडे दुर्लक्ष करून) आपण करूया. पण यावेळी वांग यांच्या वक्तव्याला चीनमध्ये होऊ घातलेल्या/घडत असलेल्या एका फार मोठ्या व दूरगामी बदलाची पार्श्वभूनी आहे. ती समजण्यासाठी चिनी मानसिकतेचा मागोवा घेणे उपयोगाचे ठरणार आहे.
 सम्राटशासित चीन 
  आजवर चीनमध्ये मोठे म्हणावेत असे,  557 सम्राट/राजे/महाराजे होऊन गेले आहेत, असे म्हटले जाते. अर्थात यातले 2/4 कमी झाले किंवा वाढले तर आपल्याला काहीही फरक पडायला नको. या सर्वांचाच संपूर्ण चीनवर एकछत्री अंमल होता, असेही नाही. काहींच्या अधिकार कक्षा तर काहीशा मर्यादितच होत्या. आपण शेवटच्या म्हणजे सर्वात अलीकडच्या सम्राटाचा विचार करू. मांच्यू घराण्यातील शेवटचा सम्राट अगदी लहान वयात (केवळ दोन वर्षांचा असतांना?) 1908 साली सम्राटपदी विराजमान झाला होता. त्याचे नाव होते पू यी. विसाव्या शतकातील सर्वात चमत्कारिक वृत्तीचा अशी त्याची ख्याती(?) आहे. चीनमध्ये माओप्रणित क्रांती झाल्यानंतर त्याला 4 डिसेंबर 1959  ला क्षमापित करण्यात आले आणि चीनमधील राजवंशांची प्रदीर्घ परंपरा संपून शेतकऱ्यांची राजवट चीनमध्ये स्थिरपद झाली.
घटनादुरुस्तीतून एकाधिकारशाही
  चीनमध्ये सध्या अध्यक्षीय व साम्यवादी राजवट सुरू असून शी जिनपिंग हे विद्यमान अध्यक्ष आहेत. अध्यक्ष फक्त सतत दोनवेळाच अध्यक्षपदी राहू शकेल, अशी तरतूद माओने घटनेत करून ठेवली होती. सत्ता अमर्याद काळासाठी आपल्याच हाती रहावी यासाठी, दुसऱ्यांदा अध्यक्षपदी राहिल्यानंतरही पुन्हा कितीही वेळा अध्यक्षपदावर राहता येईल, अशी दुरुस्ती चीनच्या राज्यघटनेत करण्याचा प्रस्ताव कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीने दिला आहे. चीनच्या 1982 सालच्या घटनेतील दुसऱ्या भागातील 79 वे कलम या दृष्टीने बदलण्यात यावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष  या दोन्ही पदांवर निवड करण्याचा अधिकार चीनच्या नॅशनल पीपल्स काॅंग्रेसकडे असतो.
  गेल्याच वर्षी शी जिनपिंग यांनी दुसऱ्यांदा चीनचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. यावेळीच कूटनीतीचा वापर करून पॅालिट ब्युरोमध्ये आपल्याला ज्येष्ठ असलेल्या व्यक्ती येणारच नाहीत, अशी तजवीज शी जिनपिंग यांनी केली होती. कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वसाधारण सभेत (काॅंग्रेस) सुमारे दोन हजार सदस्य आहेत. यातून २५० संख्येची केंद्रीय समितीची निर्मिती होत असते व ही समिती २५ सदस्यांच्या पॉलिट ब्यूरोची आणि त्यातून पुन्हा सात सदस्यांच्या सर्वोच्च स्थायी समितीची   निर्मिती करते. पाॅलिट ब्युरोत ज्येष्ठ सदस्य असणारच नसल्यामुळे त्यामुळे शी जिनपिंग यांचा वारसदार कोण राहील, हा मुद्दाच समोर येणार नाही, ही बाब शी जिनपिंग यांनी सुरवातीलाच साध्य करून घेतली होती. शिवाय नवीन सदस्यातलेही विरोधक आणि स्पर्धक यांना वगळण्यात शी जिनपिंग यशस्वी झाले होते. हा सर्व खटाटोप करण्यामागचे त्यांनी दिलेली कारणेही नोंद घ्यावीत अशी  आहेत. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही, जनतेतील दारिद्र्याचे पुरतेपणी निर्मूलन झालेले नाही व चीनला आधुनिक करण्याचे कामही पूर्णत्त्वाला पोचले नाही. या बाबतीतल्या आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी तसेच शेती, उद्योग, संरक्षण व व्यापार या क्षेत्रातील आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी शी जिनपिंग यांना वेळ हवा आहे. मी जे काही करतो आहे, ते देशाच्या कल्याणासाठी अशी सोज्वळ भूमिका शी जिवपिंग यांनी घेतली आहे. विकासाचा आराखडा २०३५ पर्यंत पूर्ण होऊ शकेल असा प्राथमिक अंदाज आहे. २०१८ पर्यंत शी जिनपिंग चीनमध्ये अध्यक्षपदी राहू शकतील. याला विरोध झालाच तर तो त्यांच्याच वाढत्या वयाचा होईल किंवा त्यांचे प्राकृतिक स्वस्थ्य डळमळतांना दिसले तरच दुसरा कुणी त्यांच्यासमोर आव्हान देण्यास उभा राहू शकेल. पण तो त्यांच्या नंतरच्या पिढीतला म्हणजे त्यांच्याच तालमीत तयार झालेला असेल.
  घटनेचा गाभाच बदलतो आहे
   एका व्यक्तीकडे किती पदे असावीत, याबाबत चीनमध्ये निर्बंध नाहीत. त्यामुळे अध्यक्षपद, पक्ष सेक्रेटरीचे पद व केंद्रीय सैन्य समितीचे अध्यक्षपद ही तिन्ही पदे शी जिनपिंग यांनी अगोदरच आपल्याकडे घेतली आहेत. पण यात एक मेख आहे. अध्यक्षपद प्रत्येकदा पाच वर्षांचे म्हणजे दोनदा मिळवल्यास दहा वर्ष मुदतीचेच असू शकते, अशी चीनच्या घटनेत तरतूद आहे. पण पक्ष सेक्रेटरीचे पद व केंद्रीय सैन्य समितीचे अध्यक्षपद यांचे तसे नाही. या दोन पदांवर कितीही काळ राहता येते. त्यामुळे सहाजीकच या पदांचे (पर्यायाने या पदांवर असलेल्या व्यक्तीचे/व्यक्तींचे) पारडे सत्तासंतुलनाच्या दृष्टीने विचार करता जड असते. ही तफावत शी जिनपिंग यांना दूर करायची आहे. माओ चीनचा पहिला अध्यक्ष/संस्थापक अध्यक्ष होता. तो स्वत: एक हुकुमशहाच होता. तरीही एकाधिकारशाही निर्माण होऊ नये, अशी त्याची इच्छा होती. म्हणून ही तीन पदे तीन वेगवेगळ्या व्यक्तींकडे असावीत, असे त्याचे मत होते. तसेच अध्यक्षपदी दोनपेक्षा जास्त वेळा राहता येणार नाही अशी व्यवस्था माओने घटनेत केली होती. पण आता घटना दुरुस्तीमुळे तिन्ही पदे तहाहयात (?) शी जिनपिंग यांच्याकडेच राहू शकतील.
   विरोधात उभ्या ठाकल्या दोन महिला 
    चीनमध्ये याला जनतेतून विरोध होत असून तो मोडून काढण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले आहेत. पण चीनमधील दोन महिलांनीच या विरुद्ध बंडाचे निशाण उभारले आहे. यापैकी एक महिला आहे, ली डॅटोंग. त्या यूथ डेली या नावाच्या सरकारी वुत्तपत्राच्या माजी संपादक आहेत. दुसरी महिला आहे, वॅंग यिंग. या एक उद्योजक आहेत. शी जिनपिंग यांच्यासाठी ज्येष्ठ महिलांनी उभारलेला बंडाचा झेंडा अनपेक्षितच असणार. याचे कारण असे की,सामान्यत: चीनमध्ये अशी हिंमत करण्याच्या भानगडीत फारसे कुणी पडत नाही. त्यातून त्या महिला असाव्यात, हे तर अगदीच अनपेक्षित होते. याशिवाय सरकारी शिस्तीत जिची वृत्तपत्रीय कारकीर्द गेली अशी एक संपादक महिला पुढे येते, याला काय म्हणावे? दुसरी महिला तर विद्यमान उद्योजक आहे. या क्षेत्रातील व्यक्ती शासनाशी असलेले आपले औद्योगिक संबंध मधुर कसे राहतील, याच फिकिरीत असतात. ही व्यावहारिकता बाजूला सारून वॅंग यिंग विरोध करण्यास सरसावते, हेही अकल्पितच होते. रशियातील पोलादी पडदा (आयर्न कर्टन) जसा  हळूहळू विशविशीत होत गेला,तशी स्थिती चीनमधील बांबू कर्टनची होऊ नये, यासाठी चीनने भरपूर खबरदारी घेतली होती. तरीही हे घडते आहे. लोकेच्छा फारकाळ दडपता येत नाही, याचेच हे उदाहरण म्हटले पाहिजे.
 सोशल मीडियाचा वाढता प्रभाव 
  चीनमध्येही सोशल मीडिया दिवसेदिवस प्रभावी होत चालला आहे. वी चॅट (कट्यावरील आमच्या गप्पा) या नावाच्या सोशल मीडियावरील एक माजी संपादक ली डॅटोंग यांनी हे मत व्यक्त केले आहे. ‘अध्यक्षपदाच्या कालमर्यादेवरील दोनदा निवडून आल्यानंतर तिसऱ्यांदा तसा प्रयत्न करण्याची तरतूद साम्राज्यशाहीच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरेल’, असे ली डॅटोंग यांनी ठणकावून सांगितले आहे. त्या एवढेच म्हणून थांबलेल्या नाहीत. त्या पुढे म्हणतात, ‘यामुळे अराजकाची बीजे रोविली जातील. आमच्या पिढीने माओची राजवट भोगली आहे. ती संपल्यात जमा होत नाही, तोच ती पुन्हा जीवित होणार असे दिसते आहे’.
  असंतोषाच्या मुळाशी परकीय शक्ती?
  यावर उपाय म्हणून एक वेगळ्याच प्रकारची सेंसाॅरशिप चीनमध्ये आकाराला येत आहे. अशा विरोधी किंवा उपरोधी प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटताच त्या तात्काळ काढून ठेवण्याची यंत्रणा आता सज्ज झाली आहे. ग्लोबल टाईम्स या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत वृत्तपत्राने या सर्व प्रकाराच्या मुळाशी परकीय शक्ती आहेत, असे म्हटले आहे.ते काहीही असले तरी हा चीनचा अंतर्गतप्रश्न असल्याचे सांगून जगातील राष्टांनी यावर सावध प्रतिक्रिया नोंदविली आहे.
 भांडवलशाही, घराणेशाही, राजेशाही हे शब्द साम्यवादी शिव्या हासडण्यासाठी वापरतात. शी जिनपिंग हे अमर्याद व अक्षुण्ण सत्ता आपल्याच हाती ठेवण्या प्रयत्न करीत आहेत, ही बाब घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यासारखे तर झालेले नाहीना, असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडला आहे. असा विचार सर्वोच्चपदी विराजमान असलेल्या व्यक्तीच्या मनात का आला असावा?
 असे घडले शी जिनपिंग यांचे व्यक्तिमत्त्व
  या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी त्यांचा आजवरचा जीवनक्रम विचारात घ्यायला हवा. 65 वर्षांच्या शी जिनपिंग यांनी आपल्या पूर्वायुष्यात खूपच हालअपेष्टा सोसल्या आहेत. 1958 ते 1962 या कालखंड चीनमध्ये अति दूरची उडी ( दी ग्रेट लीप फाॅरवर्ड) ह्या शीर्षकानुसार गाजला. (यानंतर लगेचच चीनने भारतावर आक्रमण केले होते) या काळात शी जिनपिंग यांच्या वडलांना पदच्युत करून शिक्षित करण्यासाठी चीनच्या अतिथंड उत्तर भागात मजुरासारखे काम देण्यात आले होते. लांब उडी मारून झाल्यानंतर चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. जुन्या शिक्षणसंस्थांचे कार्य साम्यवादी विचारांशी जुळणारे नसल्यामुळे त्या संस्थांना टाळे ठोकण्यात आले. यामुळे शी जिनपिंग यांचे शिक्षण मध्येच थांबल्यासारखे झाले. पण तरीही त्यांनी कम्युनिस्टपक्षाचे सदस्यत्त्व कायम ठेवले. काहीही करून शिक्षण चालू ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न केले. पण या परिस्थितीली कंटाळून अनेक चिनी तरुणांनी देश सोडला व पाश्चात्य देशात शिक्षणासाठी गेले. यात शी जिनपिंगही होते.
  पेंग लीयुआन ह्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. एक उत्तम गायिका अशी त्यांची ख्याती आहे. सर्वच प्रकारे त्या शी जिनपिंग पेक्षा वरचढ होत्या/आहेत. अमेरिकेत शिक्षण घेतांना त्यांनी अपार कष्ट सोसले आहेत. ज्या व्यक्तीच्या वाट्याला असे जीवन येते, त्याच्या व्यक्तिमत्त्वर या/अशा जीवनाचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. अपरिहार्यपणे अशी व्यक्ती धूर्त बनते. दया, क्षमा, शांती ही मूल्ये त्याला त्याज्य वाटून तो वज्रादपि कठोर होतो. स्वप्नरंजनात अशी व्यक्ती रस घेऊ शकत नाही. रोकडी व्यावहारिकता हाच त्याचा स्वभावविशेष होतो. शेंडी तुटो वा पारंबी, अशी त्याची जिद्द कायम असते. केवळ भारतालाच नव्हे तर सर्व जगाला  कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाशी व्यवहार करायचा आहे, हे यावरून स्पष्ट व्हायला हरकत नसावी. भारतापुरते बघायचे झाल्यास पाकिस्थानला पाठीशी घालायचे व सीमप्रश्न कुठेना कुठे किंवा केव्हाही व कुठेही सतत पेटता ठेवायचा हा द्विलक्ष्यी कार्यक्रम शी जिनपिंग यांचा निदान पुढील दशकात तरी राहणारच, हे लक्षात ठेवून भारताला आपले धोरण आखावे लागणार आहे, असे या घटनादुर्स्तीचे निदान दोन प्रमुख संकेत असतील.

No comments:

Post a Comment