Thursday, January 31, 2019

मी, तुलसी गॅबार्ड बोलते आहे-------

मी, तुलसी गॅबार्ड बोलते आहे-------
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  ‘मी हिंदू- अमेरिकन असल्याचा मला अभिमान असून काॅंग्रेसवर (अमेरिकेतील लोकसभा) निवडून आलेली असून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा माझा मनोदय आहे. असा प्रयत्न करण्याचा विचार असलेली मी पहिलीच हिंदू- अमेरिकन आहे’, हे उद्गार आहेत, 4 वर्ष मुदतीसाठी निवडून आलेल्या तुलसी गॅबार्ड यांचे. त्या डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्या आहेत.
   37 वर्ष वय असलेल्या तुलसी यांनी 11 जानेवारी2019 ला अमेरिकेतील व्हाईट हाऊसवर अध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी 2020 साली होणाऱ्या निवडणुकीत  आपण उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे.
    त्यांचा निवडणूक लढण्याचा मनोदय जाहीर होताच अमेरिकेतील धार्मिक कट्टरतावाद्यांनी त्यांच्याविरुद्ध एकच हलकल्लोळ माजविला आहे. काही समाज माध्यमांनी तर त्यांना  कट्टर हिदूराष्ट्रवादी (हिंदू नॅशनॅलिस्ट) ठरविले आहे. हिंदू नाव धारण करणारा असा कट्टर असतो, असे गृहीत धरून ही मोहीम अमेरिकेत सध्या सुरू आहे.
 या अपप्रचाराला तुलसींनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘उद्या अशीच टीका हे लोक मुस्लीम, ज्यू, जपानी, स्पॅनिश किंवा आफ्रिकन अमेरिकन्सवरही करतील. भारत हा अमेरिकेचा आशियातील घनिष्ट मित्र असून त्या संवेदनशील भागात भारताचे महत्त्व सतत वाढते आहे. खरेतर माझ्या अध्यक्षपदासाठी उभे राहण्याच्या घोषणेचे एक ऐतिहासिक प्रथम घटना म्हणून हेडलाईनच्या स्वरुपात समाज माध्यमात स्वागत व्हावयास हवे होते. पण मला वाटते की, आपल्या या प्रगत देशातील शिक्षित अमेरिकनांपैकीही अनेकजण, जगातील या तिसऱ्या क्रमांकाच्या (हिंदू) धर्माबाबत विनाकारण संशय व भीती बाळगून आहेत आणि धार्मिक कट्टरतने माझ्यासह माझ्या समर्थकांकडे बघत आहेत.’
   अमेरिकेतील काॅंग्रेसवर निवडून आलेल्या तुलसी या पहिल्याच हिंदू असून त्यांनी रिलिजिअस न्यूज सर्व्हिससाठी लिहितांना म्हटले आहे की, ‘त्या स्वत:, त्यांचे समर्थक व देणगीदार यांच्याबाबत अपप्रचार करणाऱे, अमेरिकेतील सर्व  हिंदू- अमेरिकनांवर विनाकारण व निराधार आरोप करीत आहेत’.
    ‘मी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत अनेकदा  चर्चा केली आहे, ही बाब पुरावा म्हणून जेव्हा पुढे केली जात असलेली पाहून मला सखेद आश्चर्य वाटते आहे. याद्वारे मी कशी एक सामान्य व्यक्ती किंवा संशयित व्यक्ती आहे, हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. पण मग माजी अध्यक्ष  ओबामा, सेक्रेटरी हिलरी, माजी अध्यक्ष क्लिंटन, व वर्तमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि माझे अनेक सहकारी असे आहेत की ज्यांनी मोदींची भेट घेतली आहे, किंवा त्यांच्यासोबत खांद्यालाखांदा लावून काम केले आहे. त्यांच्याबाबत या टीकाकारांना काय म्हणायचे आहे?’
   ‘अमेरिका व भारत या दोन देशात सैनिकी व्यूव्हरचनाविषयक भागीदारी एक तातडीची गरज म्हणून सुरू झाल्याला आता अनेक दशके होत आहेत. माझ्या देशाशी असलेल्या माझ्या बांधिलकीबाबत प्रश्नचिन्ह उभे करणे हा दुहेरी मापदंडाचा प्रकार असून त्याची पाळेमुळे धार्मिक कट्टरतेत दडलेली आहेत. यामागे मला तरी एकच कारण दिसते आहे. ते म्हणजे मी हिंदू आहे व ते नाहीत. मी स्वत: इतर अहिंदूंबाबत असा प्रश्न उपस्थित करीत नाही’, याची नोंद घ्यावी.
    ‘मला यानिमित्ताने काही जुने अनुभव नव्याने आठवत आहेत. 2012 आणि 2014  साली मी निवडणूक लढवत असतांनाची गोष्ट आहे. रिपब्लिकन धार्मिक कट्टरत्यांनी मला विरोध तर केलाच पण हिंदूंबद्दल एक भयगंड निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला. हिंदूंना अमेरिकन काॅंग्रेसवर निवडून येऊ देऊ नका, असे उघड व जाहीर आवाहन करण्यात आले. कारण काय तर म्हणे, हिंदुइझम अमेरिकन घटनेशी सुसंवादी नाही.’
   ‘असेच 2016 सालीही घडले. माझा रिपब्लिकन प्रतिस्पर्धी सतत ऊर बडवत होता की, तुलसीला मत म्हणजे सैतानाला मत होय. कारण तुलसी गॅबार्ड ही एक हिंदू होती.’
   ‘2016 मध्ये बेन कार्सन सारखे रिपब्लिकन म्हणत होते की, मुस्लीम-अमेरिकनांना अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवा. तर डेमोक्रॅट पक्षाच्या सिनेटर्सनी न्यायपालिकेवर कॅथाॅलिकनांना नेमण्यास विरोध केला होता कारण होते, त्यांच्या भावना कॅथाॅलिसिझमशी जोडलेल्या होत्या. अशा कृती व असे दृष्टीकोण अमेरिकन घटनेची पायमल्ली करीत आहेत. ते भय निर्माण करीत आहेत. ते लोकांना त्यांच्या धर्माच्या आधारावर काळोखात ढकलत आहेत.’
   2012 साली मी, तुलसी गॅबार्ड, निवडून आले. तेव्हा मी मनाचा पक्का निर्धार केला होता की मी शपथ घेईन, ती गीतेवर हात ठेवूनच. हिंदू धर्मग्रंथांमधला व योगावरचा तो सर्वोच्च ग्रंथ आहे. मला शहाणपण (वीझडम) आणि आध्यात्मिक सांत्वन (सोलेस) श्रीकृष्णाच्या शिकवणुकीतून आयुष्यभर मिळत आले आहे. इराक बरोबरच्या युद्धात मी मध्यपूर्वेत कार्यरत असतांनाही मला गीतेतील शिकवणुकीचा आधार मिळत होता.

   हिंदूविरोधाचा धोशा लावून जे असंतोष निर्माण करीत आहेत, त्यांचे पितळ उघडे पडले असून, त्यांना ‘गप्प रहायला काय घ्याल’, असे खडसावण्याची वेळ आली आहे. धर्म, वंश व लिंग यांच्या आधारावर अमक्याला मत देऊ नका, असा जर कुणी प्रचार करीत असेल तर ते कृत्य दुसरे तिसरे काहीही नसून अनअमेरिकन ठरते.

No comments:

Post a Comment